सोमवार, २८ डिसेंबर, २००९

स्वप्न

स्वप्न



आज अचानक मनी उसळला

कल्लोळ आठवणींचा

तिच्या जन्मदिनी ध्यास घेतला

स्वप्ने रंगवण्याचा ॥१॥



स्वप्नाच्या या सुरम्य जगती

सयी विहार करती

आठवणींच्या पडद्यावरती पुष्पें

मोहक फुलती ॥२॥



मनात चित्रे उमटत येता

रंग उधळण करती

दीपावलीच्या जणू रातीच्या

नभांगणासम दिसती ॥३॥



स्वप्नी रंगता भान विसरले

तन मन मोहरले

मनोराज्यी ते डुंबत डुंबत

चिंब चिंब झाले ॥४॥



स्वप्ने सारी मनोरम असती

निर्मळ जलसम ती

ज्याच्यासंगे जळ ते मिसळे

तेचि रंग खुलती ॥५॥



स्वप्नांच्या या रंग जलाशयी

मन चित्त विहरती

जणू सागरी मत्स्य कन्यका

सळ सळ सळ पळती ॥६॥



गट्टी जमली नभो मंडळी

शुक्र तारकांशी

शोधित राही चित्त बावरे

मनमिलन राशी ॥७॥



चंद्रकोरीच्या बग्गीमध्ये

विसावले मन माझे

चांदरातीच्या शीतलतेने

मनीचा दाह विझे ॥८॥



इंद्रलोकी मी असेन नृपती

सखी असे राणी

स्वर्गभूमीतील मनराज्यांची

मनरम हीच कहाणी ॥९॥



देवभूमीतील तरू शिखरांवर

फुले तारकांची

वार्‍यासंगे तरू डोलता

होई पखरण त्यांची ॥१०॥



शुभ्र सड्यातून जाता जाता

वाट लुप्त झाली

मार्ग त्यातूनी शोधित असता

वसुंधरा टक्करली ॥११॥



धक्क्याने त्या उंच उडालो

धडपड गडबड झाली

सखी मात्र त्या बग्गीमध्ये

राहूनच गेली ॥१२॥



बग्गीमागे पळता पळता

पाताळी कोसळलो

धरतीने मग मला झेलले

भानावर आलो ॥१३॥



आणि!! अचानक जागा झालो

मधुर खग ध्वनीनी

मन मोहरले शांत जाहले

प्रभात किरणांनी ॥१४॥



डोळे उघडून पहाता पहाता

एक सत्य दिसले

मंच रिकामा दिसला...आणि

स्वप्नची उधळूनी गेले


..........श्रीराम पेंडसे

शनिवार, २६ डिसेंबर, २००९

निर्झरी

निर्झरी

संध्याकाळचे साडे पांच वाजत आले होते. मुंबई सेंट्रलच्या फलाटावर मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. अस्वस्थतेचे कारण? मी दोघींची वाट पाहत होतो. आता कुणाचीतरी वाट बघण्याचे माझे वय कधीच संपले होते हा भाग निराळा. पण तरीही मी, त्या दोघीही येत नव्हत्या म्हणून अस्वस्थ होतो. वाट बघायच्या वयातही मी कोणाची वाट बघीतल्याचे आठवत नाही. आणि आता माझी वाट बघणारी, कधीच "वाट पाहून पाहून दमले" म्हणत आपल्या निर्मात्याकडे निघून गेली. मग मी आता कोणाची वाट पहात होतो? थांबा. असे चमकून पाहू नका. किंवा काय हिरवट म्हातारा दिसतोय राव, अश्या चमत्कारिक नजरेनेही नका बघू! मी वाट पहात होतो त्यातली एक म्हणजे, जयपूर एक्सप्रेस!!! गाडी फलाटाला लागायची वाट बघत होतो. पांच पन्नासला गाडी सुटणार होती, आणि अजून गाडीचा पत्ता नव्हता. गाडी येणार कधी? आपण डबा शोधणार कसा? उगाचच माझे बी.पी. वाढायला लागले होते. अखेरीस गाडी आली. डबा शोधला. बसलो. आता दुसरीची वाट बघत होतो. कोण ही दुसरी? एक पंचविशीतली तरूणी!! अल्लड? अवखळ? आवाजावरून तरी तसे वाटायचे. पण प्रत्यक्ष काय ते माहीत तव्हते. लवकरच कळणार होते. माझी उत्सुकता ताणली गेली होती. ही तरूणी म्हणजे माझी मानलेली नात अद्विका. अद्विका चेतन. ही मला आज भेटायला येणार होती. वेळ दहा, फारतर पंधरा मिनीटेच उरलेला! आता ही बाई कधी येणार? बोलणार कधी? का नुसता माझा चेहेरा पहायला येणार होती कोण जाणे! बरे मी काही गाजलेले व्यक्तीमत्व नव्हतो, की आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीने, विशेषतः मुलीने मला भेटायला धडपडत यावे! मला काही कळत नव्हते. फक्त इतकेच कळत होते की ज्या अर्थी ही महान मुलगी इतकी तडतड करत भेटायला येतीये म्हणजे जगाच्या दृष्टीने नसलो तरी कोणाच्यातरी दृष्टीने विशेषतः तिच्या दृष्टीने आपण काहीतरी आहोत. कदाचित विशेष आहोत. पण तरीही माझे वाढलेले बी.पी. काही कमी होत नव्हते. अद्विका उर्फ योगिता उर्फ योगी ही माझी मुंबईतली मुलुंडला राहणारी नात. नातं पूर्णतया मानलेलं. पण ते नातं रक्ताचं असावं अश्या ओढीने ही मुलगी मला, भांडुपहून संध्याकाळची मुंबईची तुफान गर्दी कापत कापत भेटायला येत होती. रक्ताच्या नात्यातही ही ओढ आजच्या दिवसात अभावानेच पहायला मिळते. ही मुलगी इतकी धडपड करून येत आहे - केवळ काही दिवसांच्याओळखीवर - याचंच खरंतर मला कौतुक होते. अप्रूप होतं. कोणत्या अनामिक आपुलकीपोटी ही पोर भेटायला आली? कोणता ऋणानुबंध आहे हा? की गेल्या जन्मीचा हा बंध आहे? मी बराच विचार करतो. किती जण विशेषतः मुली केवळ काही दिवसांच्या ओळखीवर भेटायला येतील? इतके कशाला? मी स्वतःला हाच प्रश्न विचारून पाहीला की मी स्वत: तिच्याजागी असतो तर असा गेलो असतो का? हा प्रश्न मी मला, माझ्या मनाला त्यानंतर कित्येकवेळा विचारला, अजूनही विचारतो आणि त्याचं उत्तर प्रामाणिकपणे सांगायचे, तर "नाही, नसतो गेलो" असेच येत राहिले. या अनामिक मायेच्या ओलाव्याचे रहस्य उलगडलेले नाहीये. तेंव्हाही उलगडले नव्हते आणि आजही उलगडलेले नाही. याची उत्तरे अजूनही मला सापडलेली नाहीयेत. एक तर मला असे कोणी भेटायला येऊ शकेल आणि ते ही एक मुलगी आणि ती पण काही दिवसांच्या ओळखीवर? हे माझ्या स्वप्नातही नव्हते. माझ्या तर्कसंगत बुद्धीला ते झेपत नव्हते. इतक्या लांबून. कामावरून लवकर निघून, आपल्याला कोणीतरी भेटायला येऊ शकतं यावर एकतर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या सततच्या नकारात्मक वृत्तीच्या मनाला ते पटत नव्हतं. पण तरीही ते सत्य होतं. ती जेंव्हा मला म्हणाली होती की, "आजोबा, मी तुम्हाला भेटायला येणार आहे." तेंव्हा मी ते फारसे मनावर घेतले नव्हते. पण खरंच तिचा आदल्या दिवशी फोन आला तेंव्हा मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. आयुष्यात मला असं कोणी भेटायला येण्याच्या वेळा फार थोड्या आल्या. मी कोणालातरी भेटायला जाण्याचे योगच अधिक आले. मला भेटायला लोक कधी आले? आई, वडिल आणि आता सौ. गेल्यावर. त्यामुळे " मी स्टेशनवर भेटायला येते" असे तिने म्हटल्यावर माझ्या मनात अपार उत्सुकता, आनंद दाटून आला होता. इतके दिवस तिच्याशी फोनवर बोलणारा मी, आता काय बोलू असा प्रश्नही मनात कुठेतरी अस्वस्थ करत होता. फोनवर बोलणे निराळे हो! तिथे आपला चेहेरा दिसत नसतो. पण प्रत्यक्षात भेट झाल्यावर बोलणे निराळे. तिथे नेहमीच बोबडी वळते. नेहमी लंब्या चौड्या गप्पा मारणारा मी. पण प्रत्यक्ष भेट आणि तीही तुलनेने एका अनोळखी तरूण मुलीशी? काय बोलू मी? वयात असलेला खूप मोठा फरक आणि तरूण पिढीचे विषय! कसे जमणार? नाही म्हटले तरी थोडेसे टेन्शन आले होते. अखेर ती आली. गाडी सुटायला १० मिनिटे असताना ती आली. ती आली! तिने पाहिले!! तिने जिंकले!!!..... थांबा. परत असे या सुप्रसिद्ध उद्गारांनी दचकू नका. ती माझी नात आहे हे लक्षात ठेवा. अहो मी वर म्हणालो ना? मला सॉलिड टेन्शन आले होते हो! त्यामुळे मी ती आल्यावरची प्रतिक्रिया दिली आहे बरे का!! अहो मुलींना भेटून सैर भैर होण्याचे माझे वय केंव्हाच सरले आहे!!! पण अद्विका आली तीच मुळी वार्‍याच्या, एखाद्या मंद, सुखावणार्‍या झुळुकीसारखी. भर उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्या असताना वाहू लागलेल्या थंड गार झुळूकीसारखी! सगळे टेन्शन पूर्णपणे कादून टाकणारी झुळूक होती ती. एखाद्या मुलीशी बोलताना येणारा अवघडपणा घालवून टाकणारी झुळूक. ही मुलगी जरी मुंबईची अशक्य गर्दी तुडवत आली असली तरी चेहेरा प्रसन्न आणि हसरा होता. इतक्या गर्दीतून धडपडत आल्याचा लवलेशही चेहेर्‍यावर नव्हता. आपण आपल्या सख्ख्या आजोबांशीच बोलत आहोत अशी वागण्यातली सहजता! तरीही तिच्या चेहेर्‍यावर आजोबांना बघण्याची उत्सुकता लपत नव्हती. सर्वच आजोबा-नातींचं सूत नेहमीच जमते असे नाही. पण काही नातींचे आजोबा लोक हे खूप आवडते असतात. लाडके असतात आणि जणू अश्याच आपल्या आवडत्या सख्ख्या आजोबांना भेटल्यावर होणारा आनंद अद्विकाच्या चेहेर्‍यावरून स्पष्ट ओसांडून वाहत होता. दहा मिनीटे इकडच्या तिकडच्या, हवापाण्याच्या गप्पा झाल्या. खरतर दहा मिनिटे हा काही गप्पा मारण्यासाठी पुरेसा वेळच नव्हे. दहा मिनिटात होते ती फक्त ओळख. कारण तितक्या वेळात आणखी काय बोलणार ना? पण तरीही, ती आवर्जून आल्याचे मला प्रचंड कौतुक होते. काय बोललो याला महत्त्व नव्हतेच. काही वेळा कितीही भडाभडा बोलले तरीही ते अपुरे पडते, आणि काही वेळा अतिशय कमी शब्दात किंवा काहीही न बोलता बरेच काही समजते. काही लोकांची ही खासियत असते की ही मंडळी डोळ्यांनी बोलतात. अगदी पटकन सांगता येईल असे उदाहरण म्हणजे माझ्या पिढीतला महान कलावंत - राज कपूर. तो मनुष्य डोळ्यांनी बोलायचा. या मुलीला बोलायची जबर आवड आहे, त्याचप्रमाणे हिची ही पण एक खासियत आहे की हिचा चेहेरा बोलका आहे आणि तितकेच तिचे डोळेही प्रचंड बोलके आहेत. तिची बडबड चालू असली तरीही ती डोळ्यानी खूप बोलते. वेगळं बोलते. म्हणून म्हणालो की काय बोललो याला महत्त्व नव्हतेच. ती आवर्जून आली याचाच मला जबर आनंद झाला होता. गाडी सुटण्याची घंटा झाली. डब्यातून तिच्या बरोबर खाली उतरलो. आणि निघताना तिने मला भर प्लॅटफॉर्मवर अगदी वाकून नमस्कार केला. मी इकडे तिकडे चमकून बघितलं की कोणी पाहत नाहिये ना? कारण "हाय, फाईन, थँक यू" या युगात हरवत चाललेल्या सुसंस्काराचे दर्शन होते. लोकांना न पटणारे!! चेष्टेला आमंत्रण देणारी कृती होती ती. पण खरंतर तिच्यावरच्या संस्कारांचे हे दर्शन, सुखद होते. तर ही अशी, अद्विका या अतिशय लोभसवाण्या, सालस, सरळ स्वभावाच्या पण तरीही अत्यंत मनस्वी मुलीशी माझी झालेली ही पहिली प्रत्यक्ष आमने सामने भेट. तसे ही प्रत्यक्ष भेट होण्याआधी मी तिच्याशी भरपूर गपा मारल्या होत्या आणि अजूनही गप्पा मारतो. अगदी मनापासून गप्पा मारतो. बोलघेवडेपणा हा तिचा आवडता छंद. निदान मला तरी असे वाटले. आणि मला हिच्याशी आता मी काय बोलू असा प्रश्न कधीच पडला नाही. त्यातून हे अजब रसायन उलगडत गेलं. पण याची सुरूवात कशी झाली?......

...... या भन्नाट मैत्रीची सुरूवात अशी झाली. तर ऒर्कुटवर मी मागे, कुणाचे नविन स्क्रॅप आले आहेत का हे बघत होतो. महिना एप्रील असावा. सौ. जाउन सात आठ महिनेच झाले होते. मन अतिशय अस्वस्थ असायचे. मग अशावेळी मी ऑर्कुटवर वेळ घालवत असे. कोणी बोलायला असले की मग मला विसरायला होत असे. त्यावेळी मला "अद्विका चेतन" नावाच्या व्यक्तिने माझी प्रोफ़ाईल वाचलेली दिसली. नांव थोडेसे वेगळे होते. Uncommon होते. म्हणून कुतुहलाने तिची प्रोफाईल वाचली. आणि मैत्रीची विनंती केली. मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे वयातल्या खूप मोठ्या फरकामुळे विनंती मान्य होईल की नाही ते ठाउक नव्हते. पण तिने ती विनंती मान्य केली. आणि तिने जो पहीला मला स्क्रॅप पाठवला, त्यातून तिच्या मोठ्यांचा आदर ठेवण्याच्या संस्कारीत मनाचे पहीले दर्शन घडले. तिने लिहीले होते. " सर्वप्रथम तुम्हाला माझा आदरपूर्वक नमस्कार." मी तिला विनंती केली होती की मल काका नको म्हणू. त्यावर तिचे उत्तर, " ठीक आहे. मग मी तुम्हाला आजोबा म्हणते. कारण मी कोणाला आजोबा अशी हाक मारायला कोणीच नाहीये." आणि मग इथून या आजोबा नातीच्या, सख्ख्या नसलेल्या पण सख्ख्या वाटाव्या अश्या नात्याची वीण घट्ट होत गेली, त्यातून एक मनोरम, आनंददायी चित्र तयार व्हायला लागले. स्क्रॅपच्या माध्यमातून आणि नंतर मेलच्या मधून बोलत होतो. ऑन लाईन ही बोलत होतो. मग मी तिला फोनवर बोलशील का? अशी विनंती केली. ती विनंतीही तिने मान्य केली. आम्ही फोनवर बोलू लागलो. बोलता बोलता कळले की "चेतन" हे तिचे "अहो' आहेत. आणि मग तिच्याशी गप्पा मारताना अद्विका हे व्यक्तीमत्व हळू हळू साकार व्हायला लागले. आणि ही मुलगी अफाट आहे याचे प्रत्यंतर मला लगेच ती प्रत्यक्ष भेटायला येणार आहे असे म्हणाली तेंव्हा आले. ते कसे याचा किस्सा वर आला आहेच.

अद्विका तरूण पिढीची प्रतिनिधी आहे. तरीही ही मुलगी आधुनिकता आणि पारंपारीक संस्कार यांचे अनोखे पण आल्हाददायी मिश्रण आहे. ती एकत्र कुटुंबात राहते. अगदी मिळून मिसळून. हे ही हल्ली त्या मानाने कमी दिसणारे दृष्य आहे. घरी सासरे, सासू आणि दोन नणंदा आहेत. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचे वागणे नाही पटले तरी पण ही मुलगी सर्वांशी अगदी मिळून मिसळून आहे. छोट्या छोट्या कुरबुरी प्रयेक घरात असतातच. माझ्या मते जगात असे Ideal सुखी कुटुंब नाही, की ज्या घरात सून आणि मुलगी असताना सून कोण आणि मुलगी कोण असा प्रश्न पडावा! जे कोणी असे म्हणत असतील की "आम्ही खूप सुखी आहोत." त्यापैकी जवळ जवळ सर्व जण खोटेच बोलत असतात असे मी मानतो. प्रत्येक कुटुंबात मतभेद हे असतात. छोट्या मोठ्या कुरबुरी असतातच. पण त्या कुरबुरी, छोटे मोठे वाद झेलायला, त्या कुरबुरींच्या काट्यांचे सुखद फुलात रूपांतर करायला धैर्य लागते, तशी मानसिकता लागते, क्षमता लागते, आणि जबर इच्छाशक्ती लागते. आणि हे सर्व तिच्याकडे आहे असे मला तिच्याशी बोलताना, तिला प्रत्यक्ष भेटल्यावर वाटले. मी अद्विकाच्या या सुखी कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून आलोय. मी त्यांचा मनमिळावू पाहुणचार अनुभवून आलोय. त्यांच्या घरातले आनंदी वातावरण पाहून आलोय. ती घरातली सून वाटण्यापेक्षा मुलगीच वाटते. या कुटुंबाला भेटल्यावरच मी हे बोलतोय. या मनस्वी मुलीची दोन लक्षात येणारी वैशिष्ट्ये आहेत. तिची ती बलस्थाने आहेत. बलस्थाने म्हणजे मला असे म्हणायचे आहे की या दोन गोष्टी म्हणजे तिची Identity आहे. ओळख आहे, एक म्हणजे रानावनातून खडकातून खळखळत वाहणार्‍या निर्झरासारखे खळखळून हसणे, आणि दुसरे म्हणजे गप्पांचे प्रचंड वेड. बरे गप्पा म्हणजे फालतू बडबड नव्हे बरे का! एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवण्याची, आपलेसे करून घेण्याची क्षमता तिच्या गप्पात आहे. एखादा एरंडेल प्यायल्यासारखा चेहेरा बदलण्याची खात्री तिच्या या हास्य-धबधब्यात आहे. तुमच्या मनावरचे मळभ काढून टाकण्याची ताकद तिच्या व्यक्तिमत्वात, तिच्या नुसत्या उपस्थितीत आहे. याचं प्रत्यंतर मला नेहमीच तिच्याशी गप्पा मारताना येतं. तिच्या उपस्थितीत दु:खाला नेहमीच No Entry असते. मग ती अशी अचानक भेट असो, किंवा फोनवरची गप्पांची मैफल असो. तिचे आणखी एक वेड म्हणजे हिंदी सिनेमे. या मुलीला सिनेमाचे प्रचंड वेड आहे. आधुनिक हिंदी सिनेमांचा हा जणू चालता बोलता ज्ञानकोषच आहे. मला स्वतःला हिंदी सिनेमांचे बिलकूल वेड नाही. मी फारसे सिनेमे बघतही नाही. पण तिच्याकडचा सिनेमाच्या बाबतीतला माहितीचा साठा पाहून मी चकित झालो. ही मुलगी मनस्वी आहे असे मी म्हणालो होतो. मनस्वी म्हणजे मला नक्की काय म्हणायचे आहे? सर्व मनस्वी माणसे थोडी हट्टी असतात. पण सर्व हट्टी माणसे मनस्वी नसतात. मनस्वी म्हणजे ही मुलगी स्वतःच्या मतांबद्दल आग्रही आहे. तिची मते ठाम असतात. कोणत्याही गोष्टीत. जे स्वतःला पटत नाही ते ती नाही स्विकारणार. एखादी गोष्ट तिला नसेल पटत तर ती तोंडावर सांगेल. पण तेही समोरच्या व्यक्तीचा योग्य तो आदर ठेवूनच. पण तरीही समोरच्या व्यक्तीने पटवून देईपर्यंत ती आपल्याच मतावर ठाम राहील. माझ्या मते याला हट्टीपणा नाही म्हणत. माझ्या मते हट्टीपणा म्हणजे समोरच्याचे मत ऐकून न घेणे, त्याला त्याचे मत सिद्ध करण्याची संधी न देणे. ती तसे नाही करणार. ती म्हणेल की तुमचे म्हणणे पट्वून द्या. पण पटले नाही मात्र साफ साफ सांगून टाकेल. मग तिथे कोण आहे हे ती नाही पाहणार. पण तरीही ती समोरच्याचा योग्य तो मानच ठेवेल. याला मी मनस्वी व्यक्तीमत्व म्हणतो. आपल्या आयुष्यात दु:खे नेहमीच येतात. दु:खे कोणाला चुकलेली नाहीत. आणि त्या दु:खाची तीव्रता, झळ त्या आपल्यालाच कळते. कारण आपल्याला ते भोगावे लागते. आपण त्यातून गेलेलो असतो. आपल्या दु:खात आपण दुसर्‍याकडे मदतीची हाक देतो तेंव्हा आपण हे विसरतो की तो पण अश्याच प्रसंगातून गेला असू शकेल. पण या ग्रेट मुलीचे वैशिष्ट्य असे की ही एखाद्याच्या मदतीला आपलाच प्रॉब्लेम आहे असे समजून जाईल. आणि यथाशक्ति मदत करेल. आपल्या काही कटकटी आपल्यालाच सोडवाव्या लागतात. पण अशावेळी एखादी व्यक्ती नुसती मदतीला धावून आली तरी ते पुरेसे होते. मला हे एकदा तिच्याबाबतीत जाणवले. असाच मी कधीतरी प्रचंड अस्वस्थ होतो. कारण नेहमीप्रमाणे सौ. च्या आठवणी!! मी तिला हे त्यादिवशी सांगितले की "मी आज खूप अस्वस्थ आहे." ती पटकन विचारही न करता म्हणाली, "मी येऊ का?" नाहीतर काय होते? "हं ठीक आहे. मी पहातो कसे जमतय ते!!!" किंवा " बघू. आज जमणार नाही. चार दिवसांनी चालेल का?" तो पर्यंत आपली गरज संपलेली असते. अद्विकाला असे पटकन येणे शक्य नाहीये हे मलाही माहीत होते. पण नुसते ती म्हणाली हेच मला तेंव्हातरी पुरेसे होते. अर्थात यात तिची, एकदा एखाद्याला आपले मानल्यानंतर त्याच्या दु:खात सहभागी होण्याची वृत्तीच दर्शवते नाही का?

.........त्यानंतर अद्विकाने मला दुसरा धका दिला तो पुढच्याच महीन्यात म्हणजे जुलै २००९ मधे, माझ्या वाढदिवसाच्यादिवशी. वाढदिवस हा काही साजरा करण्याचा विषय, निदान माझ्या दृष्टीने तरी, राहिलेला नाहीये. लक्षात ठेवून वाढदिवस साजरे होतात ते फक्त नेते मंडळींचे. आपल्यासारख्या सामान्यांचे नाहीत! आणि त्यातून परमेश्वराने माझ्या वाढदिवसाच्या दोनच दिवस आधी सौ. ला आपलेसे करून घेऊन वाढदिवस हा विषय या पुढे कायमचा संपवून टाकला आहे. वाढदिवसाचे कौतुक ज्या वयात असतं आणि वाढदिवस साजरे करण्याचं जेंव्हा माझं वय होतं, त्या वयात, वाढदिवसाच्या दिवशी पालकांना नमस्कार केल्यावर " आज का बरं? काय आहे आज?" अशी रूक्ष स्वरात विचारणा व्हायची. पूर्वी कसे ढिगभर मुले असायची. कुणाकुणाचे वाढदिवस लक्षात ठेवणार ना? पण आमच्या बाबतीत तसे नव्हते. आम्ही एकटेच होतो!! मग आम्हीच अवघडत सांगत असू की "आज माझा वाढदिवस आहे." " अस्सं? आज तुझा वाढदिवस आहे का? बरं ठीक आहे." पालक फारच खूष असले तर, "अरे वा . छान!!!" पण त्यानंतर फुलस्टॉप. अश्याच संवादांची सवय लागलेली. इतरांचे वाढदिवस आमच्या पालकांच्या लक्षात राहतात. आठवणीने पेढे, हार किंवा गुलाबाची फुले आणली जायची. आपल्याच वाढदिवसाचा काय प्रॉब्लेम आहे? हे कधीच न सुटलेले कोडे होते. आणि हेच त्यावेळी मनावर कोरले गेलेले होते की वाढदिवस हा आपल्यासाठी नाही. बरं फक्त माझ्याच बाबतीत हे होत होतं असं नाही. माझ्या बहिणींच्या बाबतीतही हाच प्रकार होत असे. आम्हाला हार तुरे नको होते. पेढेही नको होते. चार मायेच्या, प्रेमाच्या शब्दांनी काम भागले असते. पण नाही. ते कधिच झाले नाही. त्यामुळे हे आपल्यासाठी नाही हेच मनावर बिंबलेले. अर्थात मोठेपणी हे चित्र बदलले. पण तरीही आपले वाढदिवस हे महत्त्वाचे नाहीतच हेच मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, दगडी पायर्‍यांवरून घसरू नये म्हणून टाकीचे घाव घालून खड्डॅ पाडलेले असतात ना तश्या पर्मनंट खड्ड्यांसारखे, घट्ट रूतुन बसलेले होते. आमच्या लहानपणी आम्ही महत्त्वाचे नव्हतो. आमच्या मोठेपणी आता आपले कौतुक बास असे मनावर ठसले होते. मला इथे व. पु. काळे यांचे एक वाक्य आठवले. जे माझ्या पक्के लक्षात राहिले आहे. " लहानपणी आम्ही आमच्या आई वडिलांच्या गाद्या काढत होतो. आता आम्ही आमच्या मुलांच्या गाद्या काढतो." आणि अश्या मानसिक नकारात्मक पार्श्वभूमीवर ही मुलगी केवळ मला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला मुंबईहून आली? हा जिव्हाळा माझ्या बुद्धीबाहेरचा होता. धक्का मला आवाक करणारा होता,आनंददायी होता, सुखाचा होता, तरीही मला न पेलणारा होता. मला त्या दिवशी झालेला आनंद, मला तरी शब्दात न मांडता येणारा आहे. वर्णन करण्यापलिकडचा आहे. मला वाटते की बहुतेक माझा तो आयुष्यातला सर्वात आनंदी वाढदिवसाचा दिवस असावा. सौ.च्या अकाली मृत्यूचे कायमचे मळभ वाढदिवसावर असूनही तो दिवस मला आनंदाचा गेला. समाधानाचा गेला. त्या दिवशी अद्विका, तिचे "अहो" आणि तिचे तिला वडिलांप्रमाणे असलेले त्यांचे कौटुंबिक मित्र असे तिघे जण आले होते. मला तर त्या दिवशीही धड बोलायला सुचत नव्हते. मला माझ्या भावना आवरणं अवघड जात होतं. खूप धडपड करावी लागत होती. मला कसंबसं जमलं ते. हे सर्व तिला कळलं होतं. मी ते चेहेर्‍यावर न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तरीही त्या चतुर मुलीच्या हे लक्षात आलं होतं. त्यादिवशी तिने आजोबांच्या या मनस्थितीवर अतिशय सहजतेने पांघरूण घातलं. आजोबांची विचीत्र मनोअवस्था आपल्याला समजली आहे हे तिने तेंव्हा जाणवू दिलं नव्हतं. आपण आपल्या सख्ख्या आजोबांबरोबर आहोत, या कुटुंबातलेच एक आहोत अश्या सहजतेने ती वावरली होती. पण नंतर कधीतरी विषय निघाला असताना तिने, माझी मनस्थिती माझ्या डोळ्यात दिसली होती हे बोलून दाखवलं होतं. पण त्यादिवशी तिच्या चेहेर्‍यावर समाधान होते. आजोबांना भेटून शुभेच्छा दिल्याचा आनंद चेहेर्‍यावरून ओसांडून जात होता. आणि म्हणून हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील. हा दिवस असा संस्मरणिय झाला, अतिशय आनंदी गेला! कसं सांगू? शब्द सुचत नाहीयेत. याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे अद्विका ऊर्फ योगिता उर्फ योगी या माझ्या महान नातीलाच द्यावे लागेल. आणि हे श्रेय मी जर तिला नाही दिले, तर हा तिच्यावर नुसताच अन्याय नाही, तर तिचा स्वतःचा, तिच्या सुंदर, निरागस भावनांचा, तिच्या माझ्यावरच्या निर्मळ मायेचा हा अपमानच ठरेल......

.....त्यानंतर मी या माझ्या लाडक्या नातीला दोन तीन वेळा भेटलेलो आहे. त्यात मला आणखी एक गोष्ट कळली म्हणजे ही मुलगी रागावते पण. तिला रागही येतो. तसा सगळ्यानाच येतो हो!!! पण तिला राग येतो हे मला कळण्याचे काहीच कारण नव्हते. कारण अद्विका माझ्यावर कधीच रागवली नाहीये अणि ती दुसर्‍यावरही चिडलेले मी पाहीले नाहीये. त्यामुळे हा तिच्या स्वभावाचा पैलू तिने मला सांगितल्यावर कळला. गपा मारतान मी तिला विचारले होते की,

"तू कधी रागवली आहेस का?"

" हो, आजोबा. चिक्कारवेळा. मला राग आवरला नाही की मी लहानपणी वस्तू फेकायची. अगदी लहान असताना मी जेवणाचे ताट पण फेकले आहे. पण आता मी रागावली ना की सांगते कि गप्प बसा सगळे जण. मला शांत बसू द्या जरा. असे मी म्हणते आणि डोळे मिटून बसून राहते."

ही गेल्या महीन्यातली भेट नेहमीचे जिवलग भेटावे अशी सहज होती. त्यात सहजता होती. त्यावेळी तिची अजून एक मैत्रीण भेटली. सुनीता तिचे नाव. या मुलीने मला आधीच मित्र केले होते. भेटण्याचा योग हा नंतर आला. अद्विकाप्रमणे ही पण मला आजोबा म्हणते. अद्विकाप्रमाणे हिच्याशीपण मी भरपूर गप्पा मारल्या आहेत. अतिशय सुस्वभावी आणि मन मिळावू मुलगी आहे ही. अद्विकाची मैत्रिण शोभावी अशी. त्या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी आहेत. मागे एक हिंदी सिनेमा आला होता. "सीता और गीता". या दोघींच्या प्रवृत्तीही त्या सिनेमातल्या व्यक्तीमत्वासारख्या होत्या असे मला उगाचच वाटून गेले. या दोघींना गेल्या महिन्यात भेटण्याचा योग आला. त्यात पहिल्या भेटीचे टेन्शन नव्हते. मला मुंबई सेंट्रल स्टेशनवर आलेल्या अवघडलेपणाचा आता लवलेशही नव्हता. बोबडी वळण्याचा प्रश्न नव्हता. अद्विकाच्या वागण्यातली ती सहजता, मोकळेपणा, पहिल्या दिवशीची आपुलकी जशीच्या तशी टिकून होती. ती आजोबांबद्दल वाटणारी माया, ते प्रेम, जिव्हाळा कायम होता. गप्पांना विषयाची कमतरता नव्हती. मी त्यांच्या घरी भोजनाचा पाहूणचारही घेऊन आलोय. तिच्या "अहों"शी पण गप्पा मारून आलोय. हे दोघेही "मेड फॉर इच अदर" आहेत. तिचे "अहो" हे पण तिच्या इतके बोलघेवडे नसले तरी पण बोलके आहेत, अतिशय सुस्वभावी आहेत. त्यांच्याशी गप्पा मारणे हा ही एक निखळ आनंद आहे. मनमिळावू आहेत. फक्त फरक इतकाच आहे की तिच्या मानाने ते अबोल आहेत. म्हणजे त्यांना बोलायला नकोय का? तर मला तसे नाही वाटत! बोलायला हवंय. गप्पाही ते मारतील. पण या लेखाच्या नायिकेसारखा हास्य आणि गप्पांचा धबधबा नसेल तो. अगदी मितभाषी! अर्थात तिच्या उपस्थितीत फार थोड्याना गप्पांचा चान्स मिळतो. पण माझ्यासारख्यांना तसे चालतेही. कारण ती बोलत असताना मलाच काय पण कोणालाही कधीच कंटाळा येत नाही. कुणाच्या घरी अगदी पहिल्यांदा गेल्यावर मला नेहमीच अवघडल्या सारखे होते. पण त्यादिवशी मात्र असे बिलकूल झाले नाही हेच तिच्या सुस्वभावी, मनमिळावू, व्यक्तीमत्वाचे खूप मोठे यश आहे असे मला वाटते. आणि या अश्या निरागस आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाने, अतिशय सुस्वभावी मुलीने मला आजोबा मानले, एखादी सख्खी नात काय करेल अशी मनापासून माझ्यावर माया केली, निखळ, निर्मळ आणि निर्व्याज प्रेम केले, हे मी माझे भाग्यच समजतो. माझ्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षण मी माझ्या मनाच्या खोल कप्प्यात, जसे लहान मूल त्याला दिलेली कॅडबरी झोपतानासुद्धा आपल्या मुठीत घेऊन झोपते, तसे अगदी जिवापाड जपून ठेवीन. अत्तर उडाले तरी जसा अत्तराचा वास कमी होत नाही, तसा या क्षणांचा सोनचाफ्याच्या सुगंधासारखा मन सुखावणारा, मनाला दिलासा देणारा परीणाम कधीही कमी होणार नाही. तरी या अश्या माझ्या अफाट नातीला उदंड सुखी आयुष्य लाभो, तिच्या आनंदाचा, हास्याचा धबधबा कधीच न आटो, तिच्या आयुष्याचे आनंदवन होवो, आणि तिच्या या निरागस आणि आनंदी व्यक्तीमत्वाने तिच्या सहवासात आलेल्यांच्या मनात आणि तिच्या आनंदमयी कुटुंबात सतत सुख व समाधानाची कारंजी फुलत राहोत, तिच्या आयुष्याची सतार कायम जुळलेल्या सुरात झंकारत राहो, अशी मी या जगाचे नियंत्रण करणार्‍या शक्तीकडे मना पासून प्रार्थना करतो. पु. ल. म्हणतात तसे, "केवळ वयाची वडिलकी यापलिकडे हातात काहीही नाहीये. तेंव्हा फक्त आशीर्वाद द्यायचा की मोठी हो, यशस्वी हो, मुली औक्षवंत हो "



............श्रीराम पेंडसे

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

सप्तपदी

सप्तपदी

सप्तपदी म्हणजे तरी काय आहे?

बरोबरीने आधार देण्याचे वचन आहे

एकामेकांचे सख्य सुखवर्धिनी आणि,

दॄढ होण्याचे दिवा स्वप्न आहे ॥१॥



एकामेकांचे मनोधैर्य वाढवण्याच्या

भीष्मनिश्च्यायाचा भगिरथ ठराव आहे

सातजन्म सुखी जीवनाचा

अबाधीत सुमंगल करार आहे ॥२॥



आयुष्याचा हा भगीरथ ठराव

परमेश्वरसभेत नामंजूर झाला

साताजन्माचा मनोरम आधार

जग नियंत्याने काढून घेतला ॥३॥



दिनकर हळू हळू निमत असताना

सोबतीची वाट बघत होतो

हातात हात घालून मी

सप्तपदीची वाट चालणार होतो ॥४॥



अशीच वाट बघता बघता

सांडलेला काळोख कळलाच नाही

नंतर भयाण रातीत कळले

की कुडीत प्राणच उरला नाही ॥५॥



स्वप्नं अत्तरासारखी उडून गेली

जाणिवा राठ आणि निबर झाल्या

फ़्रीझमधल्या कणकेसारख्या

थंड आणि बधीर होऊन गेल्या ॥६॥



आयुष्य हे खडकाळच असते

सारखी ठेच लागतच असते

असेच धडपडत धक्के खात

जगायचे स्वप्न बघायचे असते ॥७॥



या स्वप्नांची सोनेरी किनार

थोडाच वेळ अस्तित्वात असते

काळी किनार मात्र नेहमी

सर्व स्वप्नांना गढूळ करते ॥८॥



सप्तपदीचा अलिखीत ठराव

प्राक्तनामुळे फ़ेटाळला गेला

अल्लादिनच्या दिवास्वप्नाचा

चकणा चूर करून गेला ॥९॥



सांज वय हे खरोखरी

स्वप्नांचे वय असते का?

आणि सारी ही दिवास्वने

जागेपणीच दिसतात का? ॥१०॥





.....श्रीराम पेंडसे

प्रारब्ध

प्रारब्ध

पडद्यावरची डोंगरी रेष

बघता बघता सरळ झाली

एक हसरा प्रसन्न जीव

बरोबर घेऊन निघून गेली



"सॉरी, सारे संपले आहे"

शब्द पहा किती स्वस्त होते

सांत्वनी अर्थहीन शब्द ते

नसते वापरले तरी चालले असते



"आम्ही काही करू शकलो नसतो"

म्हणत सफेद कोट कोरा झाला

तितक्याच निर्विकारपणे तो

दुसरा पडदा पाहू लागला



ही पांढरी कोटधारक मंडळी

संत पदाला योग्य असतात

सहजतेने सत्य स्विकारत

दुसर्‍या मृत्यूला सामोरे जातात



असा हा संत महात्मा

आपल्या वाट्यालाच का येतो

कुठल्या पापाची फळे म्हणून

देव अशी कठोर शिक्षा देतो



तेंव्हा मात्र खात्री पटली

आपण किती हताश आहोत

मी मोठा, मी विशेष तज्ञ

नियंत्यापुढे सर्व खुजे आहोत



आम्ही इतके मूढ कसे की

आम्हाला खुणाही नाही कळल्या

अश्रूंच्या महा पाणलोटात

सार्‍या जाणिवा वाहून गेल्या



मनुष्य प्राणी, निर्मात्यापुढे

पहा किती हतबल असतो

"बरे झाले, सुटली बिचारी"

असे समाधान मानून घेतो



का बरे सुटली ती?

वेळ तिची आली होती?

की नियतीपुढची आगतीकता

त्या उद्गारात दिसत होती?



काय होते तिच्या प्रारब्धात

की बोलकी उर्जा बंद पडावी?

हां हां म्हणता बघता बघता

जीवनज्योत अकस्मात निमावी?



किती दु:खे किती घाव

झेलले होते तिने एकटीने

चटका लागू दिला नव्हता

तिने आपल्या शिकस्तपरीने



श्रीराम पेंडसे
पाऊस

उजळ काजळ मेघ दाटले जलधींचे संमेलन भरले

बघता बघता नभ झाकोळले सवितेला ते झाकून गेले १

अवघ्या समस्त रवीकिरणांशी जलधींचे जणू युद्ध जुंपले

जलबिंदूंनी मेघ लगडले गर्जत गर्जत बरसू लागले २

मेघ घेऊनी आला वारा त्या थेंबांच्या होती धारा

गारा वारा आणि पर्जन्यधारा करिती वसुंधरेवर मारा ३

पाऊस आला झरझर आला जमिन झाडे भिजवून गेला

धुंद मृदगंघ पसरला सारा परिसर कुंद झाला ४

सोसाट्याचा वारा आला मेघ घेऊनी धूम पळाला

पळता पळता त्याने केला रवीकिरणांचा मार्ग मोकळा ५

नभचर किरणे घेऊनी आला तरूशिखरावर उधळीत आला

त्यांनी सारा आसमंत पांघरला अवघ्या सृष्टीचा स्वर्ग जाहला ६

सायंकिरणे वने पखरती पल्लवी सुवर्णकणही बहरती

मधूनच जलसर झरझर येती क्षणभर त्या जरतारी दिसती ७

हलक्या सुवर्णधारा झरती अवघा परीसर प्रसन्न करती

लता पल्लवे बेभान होती अवघी सृष्टी बहरून येती ८

चिंब भिजली सारी धरा वनराई प्रसन्न झाली जरा

या इथे आनंदे फिरूया जरा निसर्गानंद लुटूया खरा ९



श्रीराम पेंडसे

किलबील

किलबील

घंटा झाली, शाळा सुटली

वर्गा वर्गाची दारे उघडली

रडके हसरे चेहेरे घेऊन

मुले मुली बाहेर आली ॥१॥

आई धावली मावशी धावली

बाबा काका मागे राहिले

आपले नेहमीचे सवयी चेहेरे

सर्व चिमुकले शोधू लागले ॥२॥

आज शाळेत काय झालं

आया ताया विचारू लागल्या

सर्व चिमण्या उत्सुकतेने

एक सुरात किलबिलू लागल्या ॥३॥

प्रार्थना शिकवली, गोष्ट शिकवली

आकडे शिकवले अक्षरे शिकवली

नाच झाले, गाणी झाली

खूप खूप धमाल आली ॥४॥

चित्रे काढली, खाऊ खाल्ला

डबा मात्र नाही खाल्ला

नंतर मात्र आम्ही सगळ्यांनी

मस्तपैकी केला कल्ला ॥५॥

काळ

काळ

कालचक्र हे अविरत फ़िरते
चक्र असूनही सरळ जाते
जात असूनही कुणा न दिसते
फ़क्त त्याची गती जाणवते

रहस्य आहे त्याचे विराट
ऒघही त्याचा असे अफ़ाट
होते मानवाची त्यात फ़रपट
हेच आपण जाणावे नीट

भल्या आणि महान विभूती
लहान आणि मोठी पाती
कालौघात ती वाहून जाती
पण त्याला नाही त्याची क्षिती

कुणी न ओळखे या काळाला
कुणासाठीही तो न थांबला
भल्या भल्यांना संपवून गेला
कुणाचेही भय कधी नसे तयाला

असती एक म्हण प्रसिद्ध
आहे काळ औषध सिद्ध
त्यास नाही काही निषिद्ध
होती त्यात सर्वच विद्ध

लहान मोठे घावही शमती
तीव्र सौम्य दु:खेही विरती
महादुर्घटनाही विसरती
अशी आहे काळाची महती

काळतत्वे कुणीतरी मांडली
ती तत्वेही कुणा न कळली
नंतर कळले ती तर चुकली
चूक मात्र कधीही न कळली

गझल

गझल

माझेच प्रतिबिंब मी त्या गझलेत पाहीले
त्या बिंबात माझे, मन चित्त जणू हरवले
माझीच जीव नौका, कशी वेगात भिरभिरे
अती वेग त्या तरेचा, देई तनास शिरशिरे
स्वप्नी ते जगण्याचे, स्वप्न कधिच विरले
वास्तवी अस्तित्वाचे, सत्यच फ़क्त उरले
अश्या या कातरवेळी, अवघे सखेजन जमले
त्या अप्रूप सहवासी, जीवन पुन्हाच फ़ुलले
त्या सर्व न-स्वप्नांना, नव अर्थ स्पर्शू झाला
त्या चित्त विद्ध "मी"चा, मन आत्मा शांत झाला





........श्रीराम पेंडसे

दु:ख

दु:ख

सखी विरहाचे दु:ख नेहमी

सतत ठुस ठुस करत असते

मधुमेहीच्या न भरणार्‍या

जखमेसारखे भळभळत असते ॥१॥



आठवणी काही सरत नाहीत

जखमा काही भरत नाहीत

नको त्या आठवणींचे लोंढे काही

थोपवून धरता येत नाहीत ॥२॥



श्रावण झर झर सरींसारखे

दु:ख....येते, दु:ख.... थांबते

आणि मात्र जाता जाताना

तुमचे मन झाकोळून टाकते ॥३॥



आठवणींची भानगड अशी की,

त्या यायच्या काही थांबत नाहीत

जणू साबणाच्या पाण्यावरचे

बुडबुडे जाता जात नाहीत ॥४॥



दु:ख नेहमीच कसे असते?

भूकंपाने तडकलेल्या जमिनीसारखे

तुमचे रूपडे मात्र दिसते

पाणी नसलेल्या प्रपातासारखे ॥५॥



सुख आणि दु:ख या

एकाच नाण्याच्या बाजू असतात

नेहमी नेहमी हीच नाणी

आपल्याला कधीच सापडत नसतात ॥६॥



ही नाणी नेहमीच घडतात

जग नियंत्याच्या टांकसाळीत

नंतर त्यांची बरसात होताना

थोडीच पडतात आपल्या ओंजळीत ॥७॥



या नाण्यांची खरी गम्मत ही

छाप - कांटा उडवल्यावर दिसते

आपल्या आयुष्यात नेहमी नेहमी

कांट्याचीच बाजू वर येते ॥८॥



मला आधी कळलेच नाही की

नेहमी नेहमीच असे का होते

नाणे उचलल्यानंतर समजले

की दोन्ही बाजूला कांटेच होते ॥९॥



सखीच्या आयुष्यात नेहमीच

कांट्याचीच बाजू वर आली

नंतर नंतर तिला मात्र

त्याची सवयच होत गेली ॥१०॥



सखीच्या मनोवृत्तीने मात्र

कांट्याचे जाईत रूपांतर केले

त्या कंटक पुष्पांनी तिचे

अवघे जीवन सुगंधी केले ॥११॥



सखी सदा झिजत राहीली

रक्तचंदनाच्या खोडा परी

आम्ही मात्र समजलो तिला

जंगली आंब्याच्या लाकडा परी ॥१२॥



दिवस गेले, महीने गेले,

संवत्सरही उलटून गेले

सखी नसण्याचे परीणाम मात्र

अजिबात कमी नाही झाले ॥१३॥



आता मागे वळून पाहताना

सत्य समजू लागले आहे

सखी या जन्मीतरी दिसणार नाही

ही काळ्या दगडावरची रेघ आहे ॥१४॥



तुम्ही म्हणाल की वर्षापूर्वीच

हे सत्य का नाही कळले?

मित्रा, विज्ञान युगातला तू?

इतके तुझे डोके कसे संपले ॥१५॥



अनपेक्षित अश्या त्या धक्क्याने

काळ थबकल्या सारखे वाटले

विचार संपले, मन थांबले

चित्त गोठले, डोके झोपले ॥१६॥



होते असे कधी.... कधी

विचार करून करून होते

यावर मात केलीच पाहीजे

हेच वारंवार जाणवत होते ॥१७॥



अश्या विचित्र कातर क्षणी

जिवलगाची वाट पाहत आहे

उषःप्रभे नंतर येणारा

सूर्योदय मला दिसत आहे ॥१८॥



सूर्याची ती प्रभात किरणें

आनंद सयी जागवतील का?

त्यांच्या सुवर्णमुलाम्याने त्या

चिरंतर ठेवा होतील का? ॥१९॥



अश्या या सुवर्ण ठेवीमुळे

जीवन सार्थकी लागेल का?

या चिरंतर ठेवीच्या व्याजावर

मी जगी उपयोगी असेन कां? ॥२०॥





.............श्रीराम पेंड्से

चित्त विद्ध

चित्त विद्ध

आज दीपावलीच्या शुभ दिनी

मन खूप खूप अस्वथ होतं

तुझ्यासाठी दिवाळी कधीच सरली

हेच जणू ओरडून सांगत होतं ॥१॥



ऐन दिवाळीच्या कानठळी कल्लोळात

जन जल्लोशापासून अलिप्त होतो

मन भावविश्वाच्या अंधारकोषात

केविलवाण्या गटांगळ्या खात होतो ॥२॥



शुभेच्छांचे छोटे छोटे संदेश

मोबाईलवर सारखे किणकिणत होते

मन भावनेच्या कल्लोळात ते

खूपच अर्थहीन भासत होते ॥३॥



शेवटी छापील शब्दच ते

मनोलाटा त्यात दिसतील कशा?

चित्त खळबळाटीचा सारा प्रकोप

मनात पसरला दाहीदिशा! ॥४॥



सगे सोयरे विचारत होते की

आज दिवाळीचे काय काय केले?

काय खरेदी, गोड काय होते?

फराळाचे काय काय खाल्ले? ॥५॥



स्वरात उसने बळ आणून

जाणिवी थरथर लपवत होतो

अमुक अमुक खाल्ले, तमुक केले

सर्वांना हसत खेळत सांगत होतो ॥६॥



सर्व काही ठीक असल्याचा

केविलवाणा प्रयत्न करत होतो

अस्थिर मनाचा दाहक आगलोळ

विझून जाण्याची वाट पाहात होतो ॥७॥



आठवणींचा दरबार भरला होता

आरोपीच्या पिंजर्‍यात उभा होतो

सुखी दु:खी आठवणींनी मात्र

आतल्या आत जळत होतो ॥८॥



त्या आठवणींच्या आगडोंबाची

भली मोठ्ठी ज्योत झाली

काळ्या पांढर्‍या सर्व सयींची

क्षणार्धात राख रांगोळी करून गेली ॥९॥



तरीही डोळ्यातून सुख दु:खाचा

पाणलोटी ओहोळ झरझरू लागला

प्रतिपदेच्या शुभ स्वागतासाठी

चित्तगाभारा रिकामा करून गेला ॥१०॥



आणि मग चंचल चित्ताने जणू

आत्मसंयमिनीचा धावा केला

त्या माउलीने अति तत्परतेने

विद्धात्म्याला प्रतिसाद दिला ॥११॥



संयमिनीच्या सूक्ष्म तरल वृत्तीला

विद्धचिताची थरथर जाणवली

त्या थरथर लाटेतूनच तिने

विद्ध-भग्न वृत्ती शांत केली ॥१२॥



शब्द आणि स्वर लहरी इथे,

आश्वासक आणि कोमल होत्या

संयमिनीच्या वृत्तीसारख्या

धीर-गंभीर आणि तरल होत्या ॥१३॥



श्रीराम पेंडसे

चांद राती

चांद राती



रिमझीम रिमझीम श्रावणसरीत

अंग माझे भिजले गं

सय तुझी येता येता

मन मोहरून आले गं



मन उफाळ वार्‍याच्यासंगे

उंच ऊंच उधळले गं

आठवणींच्या हिंदोळ्यावर

मस्त झुलून आले गं



चांदण्यांची बकुळफुलें मी

तुझ्याचसाठी खुडली गं

त्यांचा मोहक गजरा मी

तुझ्या केसात माळला गं



त्या बकुळीच्या दरवळाने मी

धुंद कुंद झालो गं

तुझ्या गहिर्‍या मिठीत मी

खोल खोल हरवलो गं



तुझ्या विद्युत् स्पर्शाने मी

धुंद स्वप्नी बुडालो गं

तारकांच्या जाईसड्यात मी

आकंठ न्हालो बुडालो गं



माझे घायाळ चित्त तन

तुझ्या नाजुक मिठीत निमाले गं

तुझ्या मलमली स्पर्शाने

ते पार विरघळून गेले गं



तुझ्या माझ्या मिलनास

चंद्र साक्षी होता गं

टिपूर चांद लोटात मी

देह भान विसरलो गं



काळ थांबला, पळे थांबली

पण धुंदी न ओसरली गं

मन माझे हरवून मी

स्वर्गी डुंबत होतो गं





................ श्रीराम पेंडसे

भूत

सूर्य बुडाला ऊजेड निमाला

काळ्या शाईची दौत फुटली

टच्च शांततेच्या टीपकागदावर

मावळतीकडे पसरू लागली



शांत खोल जलाशयावर

गूढ बोचरी शांतता पसरली

पक्शी थांबले, प्राणी लपले

अवघी सृष्टी थिजून गेली



भयाण बोचर्‍या काजळी शांततेत

रातकिडे सुरात किरकिरू लागले

काळ्याकुट्ट काजळरातीने

सार्‍या आसमंतास मिठीत घेतले



त्या जलडोहाच्या काठावरती

वट वृक्षांच्या मजल्यांवरती

सर्व अतृप्त भुतावळींची

विराट महासभा भरली होती



कुणाची कुजबुज, फिदीफिदी हसणे

आरडा ओरडा, भयाण रडणे

सर्व भुतांचे तारस्वरांचे

गर्जू लागले एकसुरी तराणे



आणि अचानक फटक्यासरशी

आसमंत सारा गोठून गेला

संथ संथ मंद पदरवाचा

काळ्या काचेला तडा गेला



टॉक्ss टॉक्ss टप्ss टप्ss

पदरव तिथे शांत ssझाला

बुळुकss डुबुकss गूढ आवाज

ताणलेल्या शांततेला चिरत गेला



अरे ss बापरे ss लई भारी

आपल्यापेक्षा आहे कोणीतरी

महासमंधराज आला वाटतं

कबंधे पाहती भिरी भिरी



पुन्हा बुळुकss पुन्हा डुबुकss

पिशाच्च दुनिया टरकून गेली

असंख्य वट-पारंब्यांवर

उलटी होऊन लटकू लागली



आणि अचानक सारा परिसर

लख्ख उजेडाने नाहून गेला

मोठ्ठा विजेचा डोंब लोळ

आसमंती कल्लोळ माजवून गेला



पाऊस कोसळला आभाळ फुटले

वातावरण धुंद धूसर झाले

काळ्या गडद जलपृष्ठावर

ढोल ताशे वाजू लागले



निसर्गाचे तांडव पाहून

सारी भुते पसार झाली

जलप्रपाती त्या प्रकोपात

गूढ छाया एकटी राहीली



टॉक्ss टप्ss नादाचा स्वामी

वट-तरूंच्या आश्रयास गेला

जलतांडवातून सुटकेसाठी

काळोखी ढोलीत जाऊन बसला



घटीका गेल्या पळे चालली

पाऊस बदाबद कोसळतच होता

ढोलीमधला अस्वस्थ आत्मा

तास मिनीटे मोजतच होता



अखेर पाऊस कंटाळून थांबला

निसर्ग प्रकोप शांत झाला

तिकडे उगवतीच्या गालांवरती

मंद रक्तिमा पसरू लागला



रविकिरणांच्या आगमनाने

तरूवर सोन्-नुलामा पसरला

कोवळ्या मृदू किरण उबेने

अवघा आसमंत लपेटून गेला



काळ्या ढोलीतून हळू हळू

एक वाटसरू बाहेर आला

आळोखे पिळोखे देत देत

सृष्टी बहर न्याहाळू लागला



जलाशयावर तजेला होऊन

आदीदेवास वंदन करून

शांत शांत पावले टाकत

परतीची वाटचाल करू लागला





श्रीराम पेंडसे

आरोग्यम् धनसंपदा १२ - पाठदुखी उपचार भाग २

आरोग्यम् धनसंपदा १२ - पाठदुखी उपचार भाग २
मागच्या लेखात पाठदुखीच्या आणि मानेच्या विकारांच्या उपचारांच्या संदर्भात आपण आयुर्वेदिक औषधोपचार, पथ्यापथ्य विचार पाहीले. या आणि या पुढील भागातून आपण यावरील योगोपचार पहाणार आहोत. मी मागेच सांगितले होते त्याचा पुनःरुच्चार करतो. या लेखमालेत शस्त्रकर्म याचा विचार केलेला नाही. कारण या लेखमालेचा तो हेतू नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे असे की मला शस्त्रकर्म याविषयावर लिहीण्याचा अधिकार नाही असे मला वाटते. तसा विचार केल्यास योगोपचार यावरही लिहायला मला अधिकार आहे की नाही माहीत नाही. पण मला जी माहिती आहे ती मी सांगणार आहे. तुम्ही त्यातले जे जमेल ते, आणि जमेल तसे पडताळून पाहून स्विकारायचे आहे. असो. आपण मागच्या लेखात पाहिले होते की या व्याधीवर सर्वसामान्यपणे विश्रांती देऊन मणक्यातली हालचाल थांबवणे, वेदनाशामक औषधे, कमरेला व मानेला बेल्टस् व काही पथ्ये वगैरे उपचार केले जातात. आणि आपण हेही पाहिले होते की या उपचारांना मर्यादा आहेत. आयुर्वेदिक औषधे दीर्घकाळ घेता येतात पण परीणाम व्हायला खूप वेळ लागतो. ऍलोपाथीची औषधे दीर्घकाळ घेता येत नाहीत. त्यांचे वाईट परीणाम होतात. तिच गोष्ट विश्रांतीची आहे. तिचे वाईट परीणाम होत नाहीत पण विश्रांती दीर्घकाळ घेता येत नाही. आपापले उद्योग, व्यवसाय यामुळे विश्रांती किती काळ घ्यायची याच्यावरही मर्यादा येतात. आणि मग या सर्वातून आपण हे दुखणे एकदाचे कायमचे संपवावे म्हणून शस्त्रक्रियेपाशी येऊन पोहोचतो. आपल्याला आधुनिक तज्ञ सांगतात की शस्त्रक्रिया याशिवाय आता इलाज नाही. शस्त्रक्रियेने दुखणे कायमचे जाईल. शस्त्रक्रियेच्या मर्यादा सांगितल्या जात नाहीत. कधी कधी असेही सांगितले जाते कि शस्त्रक्रिया करून पाहू. उपयोग झाला तर झाला. पण रूग्णाची अवस्था इतकी वाईट झालेली असते आणि तो इतका हतबल झालेला असतो, की तो म्हणतो, "काय वाटेल ते करा पण माझी यातून सुटका करा." शस्त्रक्रिया या विषयात मी तज्ञ नाही हे मी आधी सांगितले आहेच, पण मला जे माहित आहे ते सांगतो. या शस्त्रक्रियेला आधुनिक वैद्यकात "डिकॉम्प्रेशन" असे गोंडस नाव आहे. यात सरकून बाहेर आलेल्या चकतीचा भाग कापून काढतात. म्हणजे ज्यामुळे कॉम्प्रेशन आले आहे ते कारण दूर केले जाते. पण त्यामुळे स्नायूंची बिघडलेली संरचना सुधारत नाही. पाठीच्या कण्याला असलेला नैसर्गिक बाक वेडावाकडा झालेला असतो. तो काही शस्त्रक्रियेने जात नाही. मग रुग्ण झोपून आहे, विश्रांती घेत आहे, तोपर्यंत ठीक असते. हालचाल सुरू झाली की, पुन्हा गाडी मूळपदावर येते. अशावेळी डॉक्टर म्हणतात की, "मी आधीच सांगितले होते कि शस्त्रक्रिया करून पाहू. उपयोग झाला तर झाला." मग रूग्णाला असे वाटू लागते की शस्त्रक्रियेने काही उपयोग झाला नाही. पैसा वाया गेला असेही वाटू लागते. मूळ कारण तसेच राहते. आणि मग ती व्याधी पुन्हा पुन्हा उपटते. पण योगोपचारात व्याधीचे परीणाम दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. स्नायूंची बिघडलेली संरचना सुधारण्याचा प्रयत्न करतो.

मग काय केले पाहीजे? कोणते तत्त्व स्विकारले पाहीजे? तर मूळ कारणावर मात केली पाहीजे. पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत झालेला बिघाड सुधारला पाहीजे. पाठीच्या कण्याच्या विकृत वक्रतेत बदल केला पाहीजे. पाठीच्या कण्याची बिघडलेली वक्रता पुन्हा नैसर्गिक केली पाहिजे. मग हे कसे होणार? कसे करायचे? काय करायचे? तर स्पर्श, दाब, वेदना, घर्षण तपमानात होणारी वाढ आणि नाश ही साखळी उलट झाली पाहीजे. म्हणजे घर्षण कमी झाले पाहीजे, त्यासाठी दोन मणक्यातले अंतर वाढले पाहीजे. त्यासाठी स्नायूंची लांबी वाढली पाहीजे. पाठीच्या कण्याची नैसर्गिक वक्रता परत आणता आली पाहीजे. आपल्या रोजच्या जीवनात पाठीच्या कण्याची नैसर्गिक अवस्था बिघडलेली असते. प्रत्येक सांध्याची हालचाल करणारे स्नायूंचे दोन गट असतात, जे ऐकमेकांच्या विरुद्ध दिशेने हालचाल करतात. त्यात समतोल असला की आपोआपच शरीराची बैठक, हालचाल सुधारते. जेंव्हा पाठदुखीचा रुग्ण तिरपा उभा राहतो, तेंव्हा त्याच्या या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करणार्‍या स्नायूंचे संतुलन बिघडलेले असते. त्याचे ते तसे उभे राहणे, हे त्याने आपल्या वेदनेचे शमन करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या नकळत परीस्थितीशी जुळवून घेण्यातून आलेले असते. हळूहळू तीच त्याची नैसर्गिक अवस्था व्हायला लागते. कमरेतल्या कण्याची वक्रता वाढली किंवा सपाट झाली तर पाठदुखी सुरू होते. आणि हे थांबवायचे असेल तर ती पाठीच्या कण्याची नैसर्गिक वक्रता परत आणता आली पाहीजे. आणि हे योगोपचाराने शक्य आहे. हेच पाठदुखीसाठीच्या योगोपचाराचे तत्त्व आहे. पाठदुखीचे योगोपचार आणि मानेकरिता योगोपचारात बराच फरक आहे. म्हणून या लेखात फक्त पाठदुखीचा विचार केला आहे. मानेतील मणक्याच्या व्याधीवरील उपचार पुढील लेखात पाहू.

ही लेखमाला लिहीताना मी वारंवार एका गोष्टीचा इशारा दिला होता. यापूर्वीचे लेख ज्यांनी वाचले नाहित आणि हा लेख नव्याने वाचत आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, की त्यातील उपचार हे तुमच्या माहितीसाठी आहेत. हे वाचून आणि चित्र पाहून करण्याचा प्रयत्न करू नये. ते करताना एखाद्या तज्ञ योगशिक्षकाकडून शिकून घ्यावेत. त्या शिक्षकासमोर ते काही महिने करावेत. म्हणजे आपण करत आहोत ते बरोबर आहे का हे कळेल. अन्यथा कुठे चुकीच्याठिकाणी ताण बसला तर व्याधी बरी व्हायच्या ऐवजी भलतेच होऊन बसेल. म्हणून मुद्दाम ही धोक्याची सूचना देत आहे. यासंबंधी पुढे दिलेल्या पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास अधिक माहिती अधिकृतरीत्या मिळेल या सर्व व्याधींवरचे उपचारही तेथे दिले जातात याची कृपया नोंद घ्यावी.



संजीवन योग फाउंडेशन

कबीरबाग मठ संस्था

५१, नारायण पेठ

पुणे ४११ ०३०

दूरध्वनी : ०२०-२४४५०१८१, २४४८४४२३, २४४८०४२४

फॅक्स : ०२०-२४४८१९३७

इ मेल : drkarandikar@hotmail.com



मग यासाठी योगोपचाराचा क्रम कसा असला पाहिजे ते पहा. सर्वप्रथम कमरेला ताण (Lumber Traction), पादांगुष्ठासन, पाठीच्या कण्याला पिरगळण्याचा ताण(Rotational Stretch to Spine or Twisting), शशांकासन आणि सगळ्यात शेवटी शवासन हा असा क्रम असला पाहीजे. आणि व्यवस्थित हे शिकून घेतल्यनंतर आठवड्यातून किमान एक दिवसा आड एक असे, तीन दिवस प्रत्येकी एक तास असे केले गेले पाहिजे. यानंतर विचारला जाणारा अतिशय लोकप्रिय प्रश्न म्हणजे हे आम्हाला किती दिवस करावे लागेल? याचे मी मागे उत्तर दिले होते. परत एकदा सांगतो. ही आसने, हे उपचार हा आपल्या दिनचर्येचा भाग झाला पाहिजे. मागे मी म्हटल्याप्रमाणे आपण अंघोळ रोज करतो. तो अपल्य दिनचर्येचा एक भाग आहे. आपण जिवंत आहोत तो पर्यंत. तसे ही योगसने ही कायम करण्याची गोष्ट आहे. नैमित्तीक नाही. तरच त्याचे कायमस्वरूपी परीणाम दिसतील.

पाठीच्या कण्याचा ताण : (आता सर्वप्रथम पाठीच्या कण्याच्या ताणाबद्दल पाहू या. हा ताण म्हणजे Lumber Traction. आधुनिक वैद्यकात दिले जाणारे Traction आणि योगोपचारातले Traction ताय फरक आहे. इथे रुग्णाच्या कमरेला दोर बांधून तो दोर भिंतीतल्या हूकला अडकवला जातो. (चित्र क्र.१) चित्रात तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती पायाने भिंत ढकलत आहे. डाव्या आणि उजव्या बाजूचे संतुलन संभाळत ती व्यक्ती स्वतःचे स्वत:च Traction घेत आहे.त्यामुळे कमरेच्या मणक्याच्या स्नायूंची लांबी हळू हळू वाढते आणि चेतांवरील दाब नाहीसा होतो. हेच Traction दोर न लावताही घेता येते. चित्रात तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती भिंतीला टेकून उभी आहे. रूग्ण जमिनीवर उताणा झोपलेला असून भिंतीला टेकून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या गुढघ्यावर जोर देत आहे. यात खुब्याच्या सांध्यातून Traction दिले जाते. आणि यात कोणत्याही प्रकारचा अतिरीक्त ताण मणके किंवा चेतांवर येत नाही. (चित्र क्र.२)

शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. एक म्हणजे शरीराची ठेवण करणारे (Structral), बैठक निर्माण करणारे (Postural), आणि हालचाल करणारे (Movement).या सर्वाना पूर्ववत नैसर्गिक अवस्थेत आणणे हे योगशास्त्राचे धेय्य आहे. मग यावर काम करणारी आसने आता पाहू.

पादांगुष्ठासन : कधी कधी मांडीच्या मागिल बाजूने विजेचा शॉक बसल्यासारख्या वेदना सुरू होतात. याला "सायटिका" म्हणतात. बैठे काम सतत करण्याने मांडीचे स्नायू आखडून जातात. आणि त्यामुळे सायटिक चेता (Nerve) दाबली जाते. या आसनामुळे मांडीच्या मागच्या स्नायूची लांबी वाढते.मैदानी खेळ खेळणार्‍या खेळाडूंना याची गरज भासते. कारण त्यांचे मांडीत असलेले "Hamstring" या नावाचे स्नायू नेहमीच आखडतात. हे आसन करताना चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीला काटकोनात झोपावे. (चित्र क्र. ३) दोन्ही पावले भिंतीला टेकून ठेवावी. नंतर उजवा पाय गुढग्यात दुमडून पोटाजवळ घ्यावा. दोन्ही हातानी पाऊल पकडून ठेवावे. मांडी भिंतीला समांतर ठेवत संपूर्ण पाय भिंतीला समांतर करण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळी कमर आणि कुल्ले जमिनीवर घट्ट टेकवून ठेवावेत. जर हाताने पाऊल पकडणे जमत नसेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे पावलाभोवती दोर किंवा मुलीची पंजाबी ड्रेसची ओढणी गुंडाळावी. आणि पाय गुढ्ग्यातून सरळ करत मांडीसह संपूर्ण पाय भिंतीला समांतर करण्याचा प्रयत्न करावा.

मेरूदंडासन : म्हणजे पाठीच्या कण्याला पिरगळणारा ताण. A Rotational Stretch to Spine or Twisting. चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीजवळ दोन्ही गुढग्यावर बसावे. पावले पालथी ठेवावीत. (चित्र क्र.४) हळूहळू गुढग्यावर उभे राहत डावा गुढगा आणि पाऊल तसेच ठेवत उजवे पाऊल जमिनीवर टेकवावे. आणि मांडी जमिनीला समांतर आणि पाय काटकोनात ठेवत श्वास घेत घेत दोन्ही खुब्यातून धड घट्ट धरून ठेवत पोट छाती मान उजव्याबाजूला वळवावे.या ताणामुळे पाठीच्या कण्याला लवचीकपणा येतो. मणक्यातून बाहेर येणार्‍या चेतांवरचा ताण नाहिसा होतो. ज्याना गुडघेदुखीचा त्रास आहे त्याना हे आसन लोखंडी खुर्चीवर बसूनही करता येते. यात चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्ची भिंतीकडे पाठ करून ठेवा.आणि त्यात चित्रात दाखवल्याप्रमाणे बसावे. पाय काटकोनात ठेवावेत. पोट चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्चीच्यापाठीला टेकवून ठेवावे. मांडी हलू नये म्हणून एक ब्लँकेटची घडी मांडी आणि खुर्चीची दांडी यात ठेवावी म्हणजे दोन्ही मांड्या स्थिर राहतील. उजवा हात दुमडून खुर्चीची कड पकडा. (चित्र क्र.५) डावा हात पाठीवर ठेवा. आणि शरीर कमरेतून हळू हळू डावीकडे, बाटलीचे फिरकीचे झाकण आपण उघडतो तसे फिरवायला सुरूवात करा. आणि संपूर्ण पाठीचा कण उभ्या अक्षाभोवती ९० अंशात वळवा (Rotation around the vertical axis). हीच क्रिया शरीराच्या विरूद्ध बाजूला करा. हीच क्रिया उभे राहूनही करता येते. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पाय जमिनीला समांतर ठेवावा. त्यासाठी घरच्याघरी करायचे असल्यास टीपॉयवर किंवा डायनिंग टेबलावर किंवा स्टूलावर पाय जमिनीला समांतर ठेवावा. जमिनीला पाय समांतर राहण्यासाठी आवष्यकता असेल तर पायाखाली उशी किंवा चादरीची घडी ठेवावी. आणि जो पाय वर आडवा ठेवला असेल त्याबाजूला शरीर कमरेतून चित्रात दाखवल्याप्रमाणे वळवावे. (चित्र क्र.६)

शशांकासन : या आसनात पाठीचा कणा खुब्याच्या सांध्यातून पुढे आणावा लागतो. (चित्र क्र,७) त्यासाठी खिडकी असलेल्या भिंतीकडे पाठ करून गुडघ्यावर बसावे. पुढे सरकू नये म्हणून कमरेला दोर लावावा. आपल्यासमोर लोड उभा ठेवावा. सरळ बसून हात वर न्यावेत. आणि मग कमरेतून वाकत पुढे जात पोट व छाती लोडावर टेकवावे. ही कृती करताना सर्व हालचाल खुब्याच्या सांध्यातच झाली पाहीजे या कडे लक्ष ठेवावे. पाठीला पोक येऊ देऊ नये. सामान्यपणे सांगितले जाते की पाठीचे दुखणे असताना पुढे वाकू नये. मग शशांकासनात तर नेमके तेच आहे. मग खरे काय? दॉक्ट्र सांगततकी पुढे वाकू नये म्हणजे पाठीच्या कण्यात बाक आणू नये असे आहे. पण आपल्या आसनात खुब्याच्या सांध्यात हालचाल घडवणे हा हेतू आहे. पाठीच्या कण्यातून वाकणे तिथे अपेक्षित नाही. त्यामुळे त्यात पाठीच्या कण्यावर कुठेच ताण येत नाही.

अश्या तर्हेने आपण पाठीच्या कण्याविषयी लागणारे उपचार पाहीले. पुधील लेखात आपण मानेच्या दुखण्यावरचे योगोपचार पाहूया.





ॐ तत्सत्





श्रीराम पेंडसे



डिसेंबर २००९

आरोग्यम् धनसंपदा - ११ : पाठ दुखी आणि मान दुखीचे उपचार -भाग १

आरोग्यम् धनसंपदा - ११ : पाठ दुखी आणि मान दुखीचे उपचार -भाग १

मागच्या लेखात आपण पाठदुखीची कारणे, आणि लक्षणे पाहिली होती. आणि त्यादष्टीने शरीर रचनेचाही विचार केला होता. त्यावेळी त्यात मान दुखी आणि गुडघेदुखी यांचा समावेश केला नव्हता. पाठ दुखी, गुडघे दुखी आणि मान दुखी यांच्या योगोपचारात फरक असतो. म्हणजे या तिन्हीवर वेगवेगळे उपचार आहेत. पण आयुर्वेद आणि आहारातील पथ्यापथ्य, दिनचर्या किंवा आधुनिक उपचार यांचा विचार करता फारसा फरक नाही. म्हणून मला असे वाटले की उपचारांची चर्चा करण्यापूर्वी मान दुखी आणि गुडघेदुखी याच्याही कारणे आणि लक्षणे यांचा विचार व्हावा. आणि म्हणून उपचार, दिनचर्या यांची चर्चा करण्याआगोदर या मणके आणि हाडांच्या या दुखण्यात मान दुखी आणि गुडघेदुखी याचा विचार आधी करू. आणि मग उपचारांबद्दल पाहूया.

मानेच्या दुखण्याचा विचार करताना आधी त्याची रचना पाहू. आणि मग या दुखण्याचे परीणाम कुठे कुठे होतात ते पाहू. मानेत एकंदर सात मणके असतात. आणि पाठीच्या मणक्याप्रमाणे दोन मणक्यात छोटीशी रबरी चकती असते. मानेतल्या मणक्यातले सर्वात वरचे दोन मणके यांना महत्त्व आहे. कारण पहिला मणका, ज्याला Atlas असे म्हणतात, त्यावर मस्तक तोललेले असते. हा मणका एखाद्या रिंगसारखा असतो. त्याच्या खालचा दुसरा मणका जो असतो, ज्याचे नाव आहे Axis, तो या पहिल्या मणक्याला तोलून धरतो. तो दिसयला एखद्या विट्टीच्या टोकासारखा असतो. आणि हे टोक त्या पहिल्या मणक्याच्या रिंगसारख्या भागात एखाद्या दरवाज्याच्या कडीसारखे जाऊन बसते, आणि एखाद्या पाचरेसाखे काम करते. याला Atlanto Axial Joint म्हणतात. आणि या रिंगमधून मुख्य मज्जारज्जू जातो. सहसा या पहिल्या दोन मणक्यातल्या सांध्याला काही इजा होत नाही. फक्त अपवाद एखाद्या जबर अपघाताचाच. मानेच्या दुखण्यांची रोजच्या व्यवहारामुळे जी देणगी आपल्याला मिळते त्यात सहसा तिसर्‍या ते सातव्या मणक्यात दोष निर्माण होतो. पहील्या दोन मणक्यात नाही. या मानेतल्या मणक्यात दोष निर्माण झाला की त्याचा परीणाम मानेच्या हालचालीवर, खांद्याच्या हालचालीवर आणि हाताच्या हालचालीवर होतो.

आता आपण याची कारणे पाहू. कारणांमधे, मणक्यातील अंतर कमी-जास्त होणे, मणके झिजणे, मणके एकावर एक चढणे अशी कारणे असतात. ही व्याधी व्यवसायाभिमुख आहे. म्हणजे कारकुनी काम करणारे, कॉम्पुटरसमोर बसून तासनतास काम करणारे, आचारी, पुढे वाकून काम करणारे, सतात वाहन चालवणारे अशांना हा त्रास अधिक होतो. रोज दीर्घकाल वाहन चालवणार्‍यात दोन चाकी चालवणार्‍यांना सहसा पाठदुखी होते आणि चार चाकी चालवणार्‍यांना मानेचे दुखणे होते. कारण त्यामानाने, दुचाकी वाहनांची धक्केरोधक यंत्रणा (Shock Absorbers) ही त्यामानाने कमजोर असते. म्हणजेच रस्त्यातील खड्ड्यांचा पाठीच्या मणक्यावरील विपरीत परीणाम हा दुचाकीस्वारांच्यात अधिक प्रमाणात दिसतो. कारकुन मंडळी किंवा कॉम्पुटरवर काम करणार्‍यांच्यात वर्षानुवर्षे सतत एकाच अवस्थेत मान कलती राहील्याने ती दुखायला लागते.

लक्षणांच्यात मान दुखणे, खांदे दुखणे, खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे, दंड दुखणे, कोपर दुखणे. हाताला, हाताच्या बोटांना मुंग्या येणे, डोके दुखणे, चक्कर येणे असे प्रकार होउ लागतात. कधी कधी हात जड होतो, बधीरता येते, हात अवघडल्यासारखा होतो. खांदे दुखतात. हाताच्या खांद्यातून हालचालीवर मर्यादा येते. हात वर जात नाही. आपण कसा डोक्यातून शर्ट काढतो तसा अजिबात काढता येत नाही. या सर्वांच्या जोडीला सामान्यपणे तीव्र वेदना असतात.

आता यावरील उपचाराची दिशा पाहूया. यात औषधॉपचार आणि इतर उपचार (Non distructve), आणि शस्त्र कर्म (distructve) असे दोन भाग असतात. यातला शस्त्र कर्म हा भाग आत्ता तरी यालेखाचा हेतू नाही आणि तूर्तास आपल्या लेखमालेच्या हेतूशी विसंगत आहे. शिवाय शस्त्र कर्म या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा मला कोण्ताही नैतिक अधिकार नाही. म्हणून मी त्यावर काही भाष्य करणार नाही. Non distructve उपचारात बर्‍याच वेळी विश्रांतीने फरक पडतो. पण विश्रांती ही सध्याच्या वेगवान आणि व्यवसायाभिमुख युगात सहसा शक्य नसते. व्यायाम किंवा आसने हाही उपाय आहे. पण तो भाग आपण पुढच्या लेखात पाहू. औषधी उपचारात मान दुखी आणि पाठ दुखी या दोन्हीवर उपचार सारखेच असतात. प्रथम बाह्य उपचार पाहू या. यात प्रामुख्याने लेप अणि तेलचे मर्दन असते. लेप गोळी किंवा "दु:ख दबाव लेप" या नावने हा लेप बाजारात मिळतो. भुकटीच्या स्वरूपात किंवा गोळीच्या स्वरूपात हा मिळतो. भुकटी असेल तर पाण्यात कालवून त्याचा दाट गंधासारखा लेप करवा. लोखंडी पळीत घेउन तो अगदी जेमतेम सोसवेल-सोसवणार नाही इतपत गरम करून दुखर्‍या भागावर लावावा. तेलाने मर्दन करायचे असल्यास महानारायण तेलाचा मसाज करावा. मसाज करताना चोळण्याची दिशा नेहमी खालून वर म्हणजे हृदयाच्या दिशेने ठेवावी. मान किंवा पाठीचे दुखणे खूप तीव्र असेल तर. महानारायण तेलात गवती चहाचा अर्क (Lemon grass Oil) मिसळून त्याचा मसाज करावा. मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावा. लावलेले तेल जिरवावे. साधारण १०० मि.ली. महानारायण तेलात ५ मि.ली. अर्क मिसळावा.

पोटात औषधे घेताना प्रधान औषध आहे लाक्षादी गुग्गुळ. शिवाय सिंहनाद गुग्गुळ हे औषध सूज, व दु:ख कमी करण्यासाठी उपयोगी असते. त्रिफळा गुग्गुळ हे ही औषध सूज करण्यासाठी वापरतात. या सर्वाच्या जोडीला जे अशक्त आहेत त्यांनी अस्कंद चूर्ण घ्यावे. किंवा अश्वगंधा पाक घ्यावा. ज्यांना हाताला मुंग्या येतात त्यानी लाक्षादी वटीसह संधीवातादी वटी, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या गोळ्या घ्याव्यात. मी मागे सांगितल्याप्रमाणे गोळ्या कुटून पाण्याबरोबर, मधातून घ्याव्यात. गिळू नयेत. पाठ दुखी ही मूतखड्यामुळे आहे असे असेल तर गोक्षुरादि गुग्गुळ आणि रसायन चूर्ण घ्यावे. पोटात वायू धरल्याने पाठ दुखत असेल तर सौभाग्य सुंठ, अभयारिष्ट, आणि एरंडेल तेलाची पोळी याचा उपयोग करावा. जर वजन हिसक्याने उचलल्यास पाठीत उसण भरते. अशावेळी विश्रांती घ्यावी, गरम पाणी प्यावे. कमरेच्या मणक्यात झीज असेल तर एरंड पाक आणि काल्शा चूर्ण वापरावे.पाठीचे दुखणे असणार्‍यांनी आपल्या नेहमीच्या जेवणात आले, पुदिना आणि लसूण यांच्या चटणीचा वापर करावा. याच्या पथ्यापथ्याचा विचार करताना थंड पदार्थ, दही केळे, किंवा केळ्याची शिकरण, फरसान , मिठाई, मांसाहार, अंडी, मीठ पापड हे पदार्थ टाळावेत. आणि अपुनर्भव चिकित्सेत म्हणजे दुखणे टाळण्याच्या दृष्टीने त्रिफळा गुगूळ, गोक्षुरादि गुग्गुळ, आणि लाक्षादि गुग्गुळ याचा वापर करावा.

या पुढच्या लेखात आपण यावरील योगोपचाराचा विचार करू.

ॐ तत्सत्



श्रीराम पेंडसे

अंतर्याम नोव्हेंबर २००९

शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

आनंदयात्री

आनंदयात्री


"नमस्कार काका. चालेल ना?"

"नमस्कार. आहेस का? आणि काय चालेल ना?".....मी

"हो. आहे. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल सांगते. मी अनघा अजीत बापट."

"हो.".....मी

"माझी जन्मतारीख २१ जुलै १९८६. मी 'सिस्टीम इंजिनीअर' आहे."

"हो"

"त्याआधी एक. मी तुझी परवानगी न घेता "तुला" असा एकेरीत उल्लेख केला आहे. चालेल ना?"........मी

"हो. मला अनघा म्हणा. बास्स."

"कदचित वयामुळे माझ्या तोंडात 'अहो अनघा' बसणे अवघड आहे.".......मी

"नाही.... ए अनघा म्हणा."

ही माझी अनघा बापट या अजब वल्लीशी झालेली पहिली ओळख. एखादा पारंगत टायपिस्ट टाईप करत असताना शब्द कसे पटापट कागदावर सांडतील तसे ते संगणकाच्या पडद्यावर उमटत होते.

मी नुसताच आपला 'हो का?, अरे वा!, किती मस्त!, सहीच, फारच छान, वा वा वा' वगैरे अर्थहीन पण भावना दाखवणारे शब्द वापरत होतो. एखाद्या व्यक्तीशी माझे पहिल्यांदाच बोलताना असे होते. पण अनघाकडे असल्या शब्दांचा फापटपसारा नाही. कमीत कमी शब्दात संवाद साधण्याची तिची कोकणस्थी हातोटी लक्षात आली. शब्द कमीत कमी आणि रोखठोक असले तरी भावनाहीन नव्हते. मुलायम होते, आश्वासक होते. अर्थात हे कमी शब्द किती फसवे आहेत हे नंतर माझ्या लक्षात आले. फसवे म्हणजे, पुढे मी जेंव्हा तिच्याशी फोनवरून संवाद साधू लागलो तेंव्हा हे लक्षात आलं की ही मुलगी प्रचंड बोलघेवडी आहे. बोलघेवडेपणा आणि बडबड यात फरक आहे. बडबड्या व्यक्तीची बडबड ही अर्थहीन असू शकते. आजच्या तरूणाईच्या भाषेत त्यात "पी.जे." खूप असतात. अनघाच्या लडिवाळ बोलघेवडेपणात अर्थहीन बोलण्याला फाटा असतो. अर्थात नुसते बोलघेवडेपणा असून चालत नाही. ती काही आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरची चर्चा नाही. विचारांच्या लहरी जुळाव्या लागतात. गवयाबरोबरची पेटी गवयाच्या सुरांचा लडिवाळ पाठलाग करू लागली तरच ते गाणे रंगते. तसे विषयांच्या, आवडीच्या तारा जर जुळल्या तरच ते तानपुरे सुरात झंकारतात. तरच त्या गप्पा उत्स्फूर्त होतात. 'चला आता गप्पा मारायला सुरू!' असे म्हणून शिट्टी वाजवून हास्य क्लबमधे जसे हसायला सुरूवात करतात तश्या गपा मारता येत नाहीत. त्या गप्पा उत्स्फूर्तपणे हृदयाच्या गाभार्‍यातून याव्या लागतात. आता काय बोलू असा प्रश्न पडला की समजावे त्या गप्पा नाहीत. संवाद पुढे चालू ठेवण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे. अनघाशी गप्पा मारताना मला आज काय बोलू हा प्रश्न कधीच पडला नाही. नंतरच्या काही संवादात.....

"मी अनघा."

"बोल्".....मी

" अहो काका....."

"थांब. मला काका नको म्हणू ना.".......मी

"मग?"

"आजोबा चालेल्.".....मी

"बरं. तर आजोबा...."

आणि मग आजोबा नातीच्या मानलेल्या नात्याची भन्नाट जमलेली वीण, पुढे फोनवरील आनंददायी संवादातून अधिकच घट्ट होत गेली. आणि अनघा हे अजब व्यक्तीमत्व हळूहळू साकार व्हायला लागलं.

तसा मी माझ्यापेक्षा खूप लहानात रमणारा. अर्थात बाल अणि तरूणाई मला आनंदाने सामावून घेते हे माझे भाग्य. माझे यापूर्वीचे मित्र हे एखाद दुसरा सन्माननिय अपवाद सोडला तर सारेच्या सारे सक्तीचे मित्र ( Compulsary Friends) होते. म्हणजे त्यांचे माझ्याशी काहीतरी काम म्हणून त्यांची माझ्याशी मैत्री. जे मित्र आणि मैत्रिणी (माझ्या वयाला हा जरा धाडसी शब्द आहे नाही का?) मला जीव लावणारे भेटले त्यातली अनघा ही एक शुद्ध शंभर नंबरी सोन्याची मोहोर. कोणाशी आपल्या तारा, आता या वयात आता जुळतील याची खात्री नाही, तरूणाईने दूर सारण्याच्या वयोगटात कधीच प्रवेश केलेला. अशावेळी "ऑर्कुट"वर गाळ उपसताना ही शुद्ध मोहोर सापडली. "ऑर्कुट"वर सर्व काही गाळ नाहीये. पण मी म्हणजे "कचारावाला". म्हणजे ते कचरावाले असतात ना, की जे कचरा शोधतात आणि त्यात उपयोगी काही सापडतय का ते पाहत असतात. तसे ऑर्कुटवर शोधत असताना या आनंदमूर्तीशी परिचय झाला. माहिती वाचून मैत्रीची विनंती केली. मान्य होईल याची खात्री नव्हती. कारण वयात बराच फ़रक असेल अशी अटकळ होती. पण "फ़ारतर काय नाही म्हणेल. मैत्री करणार नाही. मारणार तर नाही!" या माझ्या नेहमीच्या तत्वानुसार मी आपण तिला मैत्रीची विनंती केलीये हे विसरूनही गेलो. आणि एके दिवशी सकाळी "ई टपाल" पाहताना संदेश दिसला. अनघाने मैत्रीची विनंती मान्य केली आहे." "अनघाने तुमच्या स्क्रॆप बुकमधे लिहिले आहे." थोडेसे आश्चर्य वाटले. आणि आनंदही झाला. उत्सुकतेने स्क्रॆप बुक पाहीले. "तुमची प्रोफाईल वाचली. आणि मैत्री कराविशी वाटली." असे तिने लिहीले होते. मनाच्या खोल कोपर्‍यात कुठेतरी एक विचार चपलेतल्या खड्यासारखा बोचत होता की माझ्या मित्रांच्या यादीतले ९०% मित्र अगदी लक्षात ठेऊन संपर्क न ठेवण्यात पटाईत होते. त्यात आणखी एकीची भर पडली तर? विचार थोडा अस्वस्थ करत होता. पण विवेकाने त्यावर बर्‍यापैकी मात केली. विचार केला की खरंच तसे झाले तर आपण काय करू शकणार आहोत? आणि मग मी माझ्या दैनंदिन जीवनात गुरफटून गेलो. आणि अचानक मला अनघा "चॅट"वर भेटली. मग तिथून आमच्या गप्पांची आनंदयात्रा सुरू झाली. गप्पांची मैफल रंगू लागली. आणि त्यातून हे व्यक्तीमत्व प्रकट होत गेलं.

अनघा हे परमेश्वराने तयार केलेले अजब रसायन आहे. परमेश्वराने आपल्या कारखान्यात "अनघा" ही व्यक्ती साकार करताना, चुकून तिच्यात विचित्र आवडीचे, व्यक्तीमत्वाचे काही थेंब जे तिच्यासाठी नव्हते, ते त्याच्या हातून पडले. आणि हे पार्सल पृथ्वीवर पाठवल्यावर त्याच्या लक्षात ही चूक आली असावी. (चूक करण्याची ही परमेश्वरी देणगी आजही बरेच उद्योजक पुढे चालू ठेवताना दिसतात. "जाऊ दे. थोडासा फरक झाला तर त्यात काय होतय. वापरणारा पाहून घेईल." ही एखाद्या उत्पादनाच्या बाबतीतली वृत्ती काय दाखवते?). पण परमेश्वराने स्वतःच तयार केलेल्या 'प्रोग्रामींग" नुसार आता एकदा पाठवलेली व्यक्ती तिच्या कपाळी लिहीलेल्या "Date of Expiry" च्या आत परत मागवणे परमेश्वरालाही शक्य नव्हते. या मुलीला ट्रक चालवायला येतो आणि चालवायला आवडतो, ती आधुनिक युगातली संगणकाचे शिक्षण घेतलेली असूनही तिला शहरी वातावरणापासून दूर खेड्यातच रहायला आवडते, हे या परमेश्वराचे एकाचा "Behavioural Pattern" भलत्याच मशीनला लावून पाठवल्याचे हे उदाहरणच नाही का?

"तुम्ही खूप लवकर विसरता हो. आपण गप्पा मारतो ना? मग माझे डिटेल्स लक्षात ठेवा ना?"

"अग वय झाले ना? आणि तुला तर माहीत आहेच की आज काल विसरायला का होते ते. पण आता नक्की लक्षात ठेवीन."........मी

"तुमचा देवावर विश्वास आहे ना?"

"हो.".........मी

"बरं. मी आता जाते."

'थांब. एक सुचवू का? "........मी

"हो."

"माझ्याशी फोनवर बोलशील का? माझा फोन नंबर आहे ......." .........मी

" थांबा"

नंतर एक मिनीटातच....

"पहा मिस-कॉल आला का ते?"

मला धावपळ करावी लागली. कारण नेहमीच्या माझ्या ढिसाळपणानुसार फोन भलतीकडेच होता. पण मिस-कॉल आला होता.

"हो. आलाय."..........मी

आणि नंतर आमची नेहमीच फोनवर गप्पांची मैफल रंगत गेली. आणि तिच्या व्यक्तीमत्वाचे एक एक कंगोरे उलगडत गेले. अनघाचं व्यक्तीमत्व फणसासारखं आहे. फणस हा एखाद्या साध्या फळासारखा पटकन तोडून खाल्ला असे होत नाही. त्याला काटे असतात. त्याचे गरे काढणं ही एक त्रासदायक प्रक्रिया असली तरी ती कला आहे. पण एकदा का गरे काढले कि मग त्यासारखा निखळ आनंद नाही. गरे खाणे हा एक निर्मळ आनंद असला तरी फार गरे खाणे हेही धोकादायक ठरते. मी अनघाला कोरफडीची उपमा देतो. कोरफड ही जीवनदायिनी आहे. पण कोरफडीला काटेही असतात. त्यामुळे कोरफड ही जपून हाताळावी लागते. तसे अनघा हे काटेरी व्यक्तीमत्व आहे. एकदा का त्या कांट्यावर मात केली किंवा त्या कांट्यानी तुम्हाला बोचायचं नाही असं ठरवलं आणि अनघाने तुम्हाला तिच्या भावविश्वात प्रवेश दिला की मग अनघाशी मैत्री, संवाद, गप्पांची मैफल साधणं, जमणं ही एक आनंदयात्रा ठरते. स्वच्छ निर्मळ वातावरणात वनराईतून, जंगलातून फिरण्याच्या आनंदी अनुभवासारखा हा आनंददायी अनुभव आहे. जंगलातून पुढे पुढे जाताना काय आश्चर्य समोर येणार आहे हे पाहणे नयनरम्य असते, तसे आज अनघा आपल्या पोतडीतून काय काढणार आहे हे ऐकणं हा एक जीव सुखावणारा आनंद आहे. तिच्याशी गप्पांचा आनंददायी अनुभव म्हणजे भीमसेनांच्या मस्त जमलेल्या शुद्धकल्याण किंवा यमनच्या मैफलीसारखा आहे. बहरात असलेल्या सचीनच्या फलंदाजीसारखा आहे. फरक इतकाच की सचीन बहरात येणं किंवा आण्णांची मैफल जमणं यावेळी तुम्ही तिथे हजर असण्याचा योग यावा लागतो. पण इथे तसे नाहीये. मला मैफल जमण्याचा योग येण्याची वाट पहावीच लागत नाही. प्रत्येक गप्पाष्टक जमलेली मैफल असतेच. आणि तिच्या आवाजात तर एक प्रकारचा जादुई नाद आहे. A Hypnotic Quality. एखादी शस्त्रक्रिया करताना भूल देतात. कशासाठी? तर तुम्हाला वेदना जाणवू नयेत म्हणून. तिच्याशी गप्पा, तिचे शब्द आणि तिचा आवाज या गोष्टी मला नेहमीच एखाद्या वेदनाशामकासारख्या वाटत आल्या आहेत. माझ्या मनावर आलेलं दु:खाचं मळभ दूर करण्याची ताकद तिच्या या गप्पात आहे. तिला वेळ नसेल तर ती, "आजोबा, मला आत्ता वेळ नाहीये. आपण नंतर बोलुया का?" हेही अश्या आवाजात आणि शब्दात सांगेल की माझ्यावर तरी त्याच्या परीणाम, भाजलेल्या जखमेवर Soframycin लावल्यावर जसे थंड वाटते तसा होत आलेला आहे. या मुलीच्या विचारांची श्रीमंतीच इतकी जबरदस्त आहे की हिच्याशी संवाद साधण्याचा, तिच्या ओघवत्या अनुभवात रंगण्याचा मला कधीच कंटाळा आला नाही.

अनघाची आणखी एक हल्लीच्या दिवसात दुर्मिळ होत चाललेली खासियत म्हणजे झोकून देऊन काम करणे. एकदा एखादी गोष्ट किंवा काम आपण स्विकारल्यानंतर ते आपण किती वेळ करतोय याचा विचार करायाचा नसतो असे ती मानत असावी असे मला वाटले. चला ६ वाजले. माझी वेळ संपली. मी चालले ही वृत्ती नाही. एक "वर्कहोलिक" या नावाचा समूह असतो. नशेबाजाला दारू नसेल तर अस्वस्थता येते. तशी या मंडळींना काम केले नाही तर अस्वस्थता येते. पण अनघाचे मात्र तसे नाहीये. ती जीव तोडून काम करेल. पण अवाजवी काम करणार नाही. तिच्या सहकार्‍यांना मदत करण्यासाठी ती राब राब राबेल, झटेल, प्रसंगी त्यांचे काम अंगावर ओढवूनही घेईल. पण उगिचच अंधळ्यासारखे काम करत बसणार नाही. सहकार्‍याची अडचण योग्य आणि रास्त असेल तरच ती राबेल, पण एखादा उगीचच टगळ मंगळ म्हणून तिला कामाला लावणार असेल तर ती त्याला त्याच्या "स्टेटस" चा विचार न करता सडेतोडपणे फटकारेल. पण मग ती फटकळ आहे का? एखाद्याला व्यक्तीला ती चुकत असताना ती व्यक्ती चुकते आहे हे रोख ठोकपणे सांगणे - मग जरी ती व्यक्ती अनघाची वरिष्ठ असली तरीही - हा जर फटकळपणा असेल तर मग, हो. ती फटकळ आहे. पण इथेच तिच्या क्षमतेची अजुन एक बाजू दिसते. ही मुलगी अतिशय गोड बोलते. एखाद्याची चूक सडेतोडपणे सांगताना ती त्याचा मानच ठेवेल, असभ्य शब्द तर वापरणार नाहीच नाही. मृदू शब्दात पण ठामपणे आपल्याला काय सांगायचे ते ती सांगेल. आणि ते ऐकणारा जर नीट लक्ष देउन ऐकत नसेल तर त्याला ही आपल्याला झापते आहे, जे चाललय हे तिला अयोग्य वाटतय आणि आवडलेले नाहीये हे कळणारच नाही. इतके तिचे शब्द आणि स्वर फसवा असू शकतो. शब्दाची यथायोग्य निवड आणि स्वर तर इतका मधुर की ऐकणारा तिला नाही म्हणूच शकत नाही. " तू एक महामूर्ख आहेस." हे ती त्या व्यक्तीला सांगतानाही अशा शब्दात आणि स्वरात सांगेल की ऐकणारा " हो. तुझे म्हणणे खरे आहे. आता मी सुधारेन." असे त्याला स्वत:ला कळायच्या आत पटकन म्हणून मोकळा होईल. ती त्या व्यक्तीला तू चुकत आहेस आणि जे करतोयस ते बरोबर नाहिये हे सांगताना ती त्याला हे अशा अतिशय गोड शब्दात सांगेल की त्याला वाटावे की हि आपला सत्कारच करते आहे. इथे त्या व्यक्तीच्या हुशारीची आणि अनुभवाची कसोटी लागते. कारण तिच्या गोड शब्दातून काय शिकायचे आहे हे समजणे ही सुद्धा एक कलाच आहे.

"आजोबा, मी गेले महिनाभार सुट्टीच घेतलेली नाहीये."

"काय?"...........मी

"हो आजोबा. मी महिनाभर सुट्टी नाही घेतलेली. माझा एक सहकारी सुट्टीवर चालला आहे. मग त्याचे काम नको का करायला?"

"पण मग म्हणून सुट्टी नाही?"...........मी

"काय करणार? कोणीतरी काम करायला हवे ना?"

"हो. ते खरं. पण मग तूच का? आणि तुझ्या रत्नागिरिच्या क्लासचे काय?"............मी. ती "मायक्रोसॉफ्ट" चा एक कोर्स करत होती हे मला ठाऊक होते.

"बुट्टी. नंतर बघू. त्याची अडचण आहे तर करायला नको का?"

"पण मग तुझ्या अडचणीला ही मंडळी उभी राहतात का?"...........मी.

"जाउ द्या हो. आपण आपलं काम करत रहायचं."

"अग पण शेवटी शारीरीक क्षमतेला मर्यादा आहेत ना?"..........मी

"असू दे. मी चांगली काटक आहे. आजोबा पहा मी ट्रक ड्रायव्हर आहे. म्हणजे काटक आहे ना?" मी गप्पच झालो.

पण ही मुलगी चटकन रागवतेही. आणि राग व्यक्त करण्याची तिची अभिनव पद्धत म्हणजे ती गप्प बसेल. असेच एकदा गपा मारत असताना ती अचानक गप्प झाली. थोड्या वेळाने माझ्या ही गोष्ट लक्षात आली.

"नुसते मीच बोलतोय. तू काहीच बोलत नाहीयेस. रागवली आहेस का?"..........मी.

"नाही हो. तुम्ही बोला. मी ऐकते. कधी नाही ते तुम्ही बोलता आहात. म्हणून तुम्हाला थांबवले नाही."

"हो का? मला वाटले तू रागवली की काय."...........मी.

" आजोबा, तुम्हाला माहीतीये की मी रागावलेना की एकदम गप्प बसते. शांतपणे बसून राहते. मग ते आईच्याही लक्षत येतं. मग ती सारखी विचारते. मग मी आईला म्हणते कि मला काहीही झाले नाहीये. मी जरा शांत बसते. आणि मग थोड्या वेळाने माझा राग शांत होतो. मग मी परत बोलायला लागते. मग सर्व ओळखतात की गाडी रूळावर आलीये."

"हो.".........मी. आता ऐकण्याची माझी पाळी होती.

"आजोबा आजोबा आज मी जाम खूष आहे.आज मी जे काम हातात घेतलं होतं ना ते माझ्या मनासारखे पूर्ण झाले. आणि वेळेत." आजोबा आजोबा असे ती दोनदा म्हणाली किंवा ऐका नं असे म्हणाली की समजावे कि ती आज जाम खूष आहे आणि संमेलन रंगणार. एखाद्यासाठी त्या व्यक्तीच्या गरजेच्यावेळी, वेळ काळाचे भान न ठेवता, झोप वगैरे विसरून ती राबेल, झोकून देऊन मदत करेल तेंव्हा तिला होणारा आनंद हा तिच्या शब्दातून ओसंडून जात असतो, तिला होणारे अतिव समाधान तिच्या स्वरातून जाणवते. आणि मग त्या स्वरातल्या समाधानाची मलाही साथ पसरल्यासारखी लागण होते. याचा मी अनुभव घेतला आहे. भीमसेनांचं सवाई गंधर्व महोत्सवातलं गाणं जसं नेहमी रंगतच, तसे तिच्याशी बोलणं हा मला नेहमीच आनंद असतो. असे कधीही होत नाही किंवा असे कदापिही होणार नाही कि आज अनुशी गपा नको मारायला. माझ्या मनावर मळभ आले असेल, माझा मूड खराब झाला असेल (जे माझे हल्ली दु:खद घटनेमुळे वरचेवर होत असतं) तर अनुशी गप्पा मारणे हे एखाद्या "ईमर्जन्सी मेडिसीन" सारखे माझ्यावर काम करते. तिला अनु अशी हाक मारायची परवानगी तिने मला दिली आहे.

"वा वा."..........मी

"आजोबा ऐका नं. मनासारखं काम झालं म्हणून मला खूप समाधान वाटलंय."

.....आणि अशाच गप्पांच्या मैफलीतून मला शोध लागला की की अनघा ही उत्तम कविता करते. अतिशय तरल आणि भावूक कविता करणे हा तिचा हातखंडा प्रयोग आहे. तिच्या कवितातून तिची सूक्ष्म निरीक्षणशक्ती जाणवते. विशेषतः मनुष्य स्वभावाचे निरीक्षण करण्याची तिची शक्ती अफाट आहे. ते तिच्या कवितातून जाणवते. शारदेचा वरदहस्त घेउन आलेली ही मुलगी. आम्ही म्हणजे "र"ला "र" आणि "ट" ला "ट" लावणारे. ही मुलगी खरोखरच महान आहे. तिच्या नितांतसुंदर कवितांच्या काही ओळी उदाहरणादाखल देतो. पहा ती काय म्हणते ते :

"हृदयातली स्पंदनं मोजायची नसतात । त्याच्यातली थरथर हृदयात साठवायची असते"

"त्याच्यातली नि:शब्दता जाणून घ्यायची असते।स्पर्शातले हितगुज शब्दात तोलायचे नसते" किंवा ही कविता पहा:

"प्रत्येक वळणावर एक नवीन मैत्री घडत असते।पुढचं वळण वळेपर्यंत ओळखही विसरून गेलेली असते ॥"

या अजब रसायनात परमेश्वराने अध्यात्माचाही एक थेंब टाकलेला दिसतो. ही मुलगी देव वेडी नाही. समज यायच्या वयात देव आहे असेन मानणारी. पण जीवनाच्या एका टप्प्यात काहीतरी घडते आणि देव आहे, असे वाटू लागते. तसे काहितरी घडले असावे का? माहीत नाही. पण यामुलीवर अतिशय चांगले संस्कार आहेत. आणि संस्कार शेवटी कसे होतात तर आइ वडिल, मोठे बहिण भाऊ वगैरे यांच्या वागणूकीतूनच होतात ना? यामुलीच्या अध्यात्मिक बैठकीला तिच्यावरचे माता पित्याचे संस्कार कारणीभूत आहेत असे मला वाटते. ही मुलगी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी शुबंकरोती, रामरक्षा, मारूती स्तोत्र म्हणते, जवळ्च्या मंदीरात आठवड्यातून तीन वेळा जाते. गुरूचरित्राच्या पारायणाला बसायला आवडतं. पण देवाच्या मागे लागणार नाही. कारण देव देव करायचे असेल तर ते व्यवस्थित, नीट , साग्रसंगीत आणि वेळेत व्हायला पाहिजे अश्या ठाम मताची ती आहे.

तर अशा, विचारांचे सॊंदर्य आणि शब्दांचे माधुर्य असलेली अचाट बुद्धीमत्तेची, ही अफ़ाट गुणवान मुलगी. एक एक शब्द तर फ़णसाचा रसाळ गरा. तिची बोलण्याची पद्धत आणि शब्द निवड हे तिच्यावर तिच्या आई-वडिलांनी केलेले संपन्न संस्कारच दर्शवतात. तिच्यावर सुसंस्कार करणारे तिचे आई-वडिल हे तर महानच. विहिरीत पाणी भरपूर आहे. पण ते बादलीत आले नाही तर त्याचा उपयोग काय? जशी विहिरीतले पाणी भरून घेण्याची बादलीची क्षमता महत्वाची. तसे ते संस्कार आपल्यात भिनवणे, त्याप्रमाणे आचार विचार असणे हे मानणे महत्वाचे. आणि म्हणून हे संस्कार आपल्यात भिनवून घेणारी, त्या संस्काराप्रमाणे आचरण ठेवणारी अनु ऊर्फ अनघा ही तितकीच महान. आणि अश्या गुणवान मुलीची ओळख असणे हे भाग्यच. त्यातून आजोबाच्या जवळीकीचे नाते तिने जोडणे हे परमभाग्य. अणि ही दोन्हीही भाग्ये माझ्या वाट्याला आली आहेत. जंगलातून, हिरवाईतून जाणारी पाउलवाट ही निरागस, निर्व्याज बालमैत्रिणीसारखी असते. तिथे हेवेदावे, मानापमान, वैयक्तिक फ़ायदे यांना स्थान नाही. पुढे या पाउलवाटेचे "हायवे"मधे कधी रूपांतर होते ते समजत नाही. आणि मग ती पाउलवाट पुन्हा काही सापडत नाही. आज या "हायवे"च्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करताना अनुने ज्या सहजतेने आजोबा-नातीचे नाते जोडलय त्यामुळे ही पाउलवाट मला पुन्हा सापडल्यासारखे वाटले. ही सहजता, निरागसता ठरवून आणता येत नाही. त्यासाठी खोलवर मनात, मनाच्या तरल सूक्ष्म पातळीवर मायेचा ओलावा असावा लागतो. आणि तो आहे असे मला वाटले. तिची ही निरागसता, निर्व्याजता अखंड राहो. अशा या माझ्या नातीला उदंड, आनंदी, यशस्वी दीर्घायुष्य मिळो. तिच्या आयुष्याचे तानपुरे सतत सुरात झंकारत राहोत आणि हे मानलेले आनंदी नाते चिरकाल टिकून राहो अशी, मी या विश्वाचे नियमन करणाया शक्तीकडे मनापासून प्रार्थना करतो. पु. ल. देशपाडे यांचे शब्द जसेच्या तसे वापरून मी म्हणतो की,

"केवळ वयाची वडिलकी याखेरीज जवळ काहीही नसताना इतकाच आशीर्वाद द्यायचा,गुणवंत हो, मोठी हो, यशस्वी हो, मुली औक्षवंत हो!"

ॐ तस्सत्

श्रीराम पेंडसे

रविवार, २० सप्टेंबर, २००९

गणेशोत्सव - २०२०

ऑगस्ट २०२०...........


............... सकाळचे १० वाजले होते. गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होउन तिसरा दिवस उजाडला होता. म्हणजे प्रतिपदा आली होती. पण लोकांची नाचायची हौस भागली नव्हती. बघ्यांच्या चेहेर्‍यावर उपहासपूर्ण हसू दिसायला लागले होते. मिरवणूक चालूच होती. पुढच्या वर्षी लवकर या यापेक्षा हे दहा दिवस कधी संपतात असे बर्‍याच जणाना झाले होते. जणू काही पुढच्या वर्षी नका लवकर येऊ हीच भावना होती. मी विसर्जन घाटावर फेरफटका मारला. नदीला जबर पाणी टंचाईमुळे पाणी नव्हते. त्यामुळे पूर्णपणे विसर्जित न झालेल्या मूर्तींचे केविलवाणे अवशेष सर्वत्र दिसत होते. तसेच एक पुलावर तर आणखी भयानक परिस्थिती होती. लोक घाइघाईत येत होते. वास्तवीक खाली घाटावर जायला व्यवस्थित मार्ग होता. पण लोक पुलावर गाड्या थांबवत होते. आणि खाली जाण्याचेही कष्ट न घेता वरून खाली मूर्ती फेकत होते. तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस लोकांना खाली जायची विनंती करत होते. पण त्यांचे फार थोडे जणच ऐकत होते. नंतर नंतर तर पोलिसांनी सुद्धा सांगणे सोडून दिले.


आणि गेल्या दहा दिवसात तर बघायला नको. कानाचे पडदे फाटतील अश्या आवाजाच्या स्पीकर्सच्या भिंती. तेच ते आवाजाच्या तालावर धावणारे दिवे, की ज्यांच्या हालचाली आणि ते गाणे याचा संबंध नाही. गाणे जलद लयीत असले की कि ते कोणत्याही दिव्यांच्या पळापळीशी जमतेच!!! ढोल लेझीमची पथके इतिहासजमा झाली होती. प्रत्येक गणेश मंडळाला प्रायोजक आले होते. त्यामुळे काय कार्यक्रम कारायचा हे ते प्रायोजक ठरवत. मंडळांची संख्या हजारावर जाउन पोहोचली होती. त्यामुळे रस्त्यातून जाताना कोणता आवाज कोणत्या मंडळाचा हे ओळ्खणे अवघड होत होते. अर्थात याचा एक फायदा झाला म्हणा. दिवसा रस्त्यात चिटपाखरूही नसायचे. एका मित्राकडे संध्याकाळी आरतीला बोलावले होते. गेलो. घरात कुठे आरास वगरे दिसेना. हळू हळू लोक जमा होत होते. आरतीची वेळ झाली. पण गणपतीची मूर्ती, आरास कुठेच दिसेना. मला हा काय प्रकार आहे ते कळेना. यजमान आले. त्यानी एक स्विच "ऑन" केला. आणि समोरील भिंतीवरचा एल. सी.डी. पडदा उजळून निघाला. त्यावर गणपतीची सुबक मूर्ती, त्याला केलेली आरास वगैरे दिसत होती. कुतुहलाने मी विचारले असता मित्र म्हणाला की "काय करणार? मूर्तीच्या किमती कमीतकमी १५००च्या पुढे आहेत. आणि मूर्ती आणली तरी इथे आरास करायला, सजवायला वेळ कुणाला आहे? पूजेला गुरूजी मिळत नाहीत. मग संगणकावर पूजेसकट सर्व प्रोग्रामीग केले. आणि त्याला सर्व आरतीच्या वेळा देऊन ठेवल्या आहेत. ती वेळ झाळी की संगणक पूजा करतो, आरती करतो, मंत्रपुष्प वाहतो. आपण फक्त नैवेद्य या मोठ्या पडद्यासमोर आणून ठेवायचा. आणि हात जोडून फक्त उभे राहयचे.सर्व सगळं आपोआप होते. तिथून बाहेर पडता पडता मी मित्राला विचारले की, "गणपतीच्या आशीर्वादाचेही प्रोग्रामीग केले आहे का? म्हणजे आपण काय मागू त्यानुसार आशीर्वाद मिळतो का?" नंतर बरेच दिवस तो मित्र माझ्याशी बोलत नव्हता.................

ऑगस्ट २००९.............


...............गणपती ही विद्येची देवता आहे. लोकमान्यानी गणेशोत्सव सुरु केला तेंव्हा त्याकाळची सामाजीक स्थिती ही वाईट होती. वाईट म्हणजे इंग्रजी अंमल होता. आणि लोकानी एकत्र यावे, आपल्या संस्कृतीबद्दल जनजागृती व्हावी, एकात्म भावना वाढावी असा उद्देश होता. इंग्रजी सत्तेविरुद्ध चळवळ करायची असेल, सत्ता उलथून टाकायची असेल तर जनतेने एकत्र येणे गरजेचे होते. म्हणून लोकांसाठी लोकमान्यानी हा उत्सव सुरू करण्यात पुढाकार घेतला. दर्जेदार समाजप्रबोधनपर चर्चासत्रे, भाषणे असे स्वरूप असायचे. मग त्यानंतर त्यात गाणे आले. हळू ह्ळू त्याचे स्वरूप बदलत गेले. विस्तार वाढला. स्वातंत्र्य मिळाले आणि प्रबोधनाची गरज संपली. आणि एखाद्या गोष्टीची गरज संपल्यावर त्याचे जे होते ते गणेशोत्सवाचे एकविसाव्या शतकात झाले. तिथीचे संदर्भ संपले. गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीलाच करायची असते. म्हणून त्या दिवसापर्यंत थांबावे लागत असे.

इथे मला ज्ञानेश्वरीचा संदर्भ द्यायचा आहे. भगवद् गीतेच्या नवव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात : "अवजानन्ती मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥११॥" त्यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात " मज अनावरणा प्रावरण।भूषणातीतासि भूषण।मज सकळ कारणा कारण। देखती ते॥१६२॥ मज सहजाते करिती।स्वयंभाते प्रतिष्ठिती।निरंतराते आव्हानिती। विसर्जती गा॥१६३॥" त्याचा अर्थ असा: "मी वस्त्र नेसवण्याजोगा नसूनही सर्वजगाला पांघरून घालणारा त्या मला पांघरूण घालतात, भूषणातीत(स्थूल, सूक्ष्म आकाररहित) निराकार असा जो मी, त्या मला अलंकार घालतात, मी सर्वजगाचा उत्पन्न करणारा (जग्त्कारण) असून त्या मलाही दुसर्‍या उत्पन्न करणार्‍या कारणाची कल्पना करतात. मी सहज अनादि नित्य असून माझ्या मूर्ती करतात. मी सदाच स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात व मी नित्य सर्वत्र (नित्य उपलब्ध स्वरूप)असताना माझे आवाहन करतात व त्या माझे विसर्जनही करतात.( संदर्भ : श्रीगुरू साखरे महाराज संपादीत 'सार्थ ज्ञानेश्वरी)

लोकसंख्या वाढली. तशी गर्दी वाढू लागली. आणि मग गर्दीला आकर्षित करण्यास महत्त्व आले. हलते देखावे, संगिताच्या तालावर नाचणार्‍या दिव्यांची आरास असे प्रकार वाढले. पहाटे ५ वाजेपर्यांत लोक देखावे पहायला जागू लागले, भटकू लागले. आणि त्यातून मग पादचार्‍यांसाठी एकमार्गी रस्त्याचा प्रयोग केला गेला. पुणेकरांनी तोही पचवला समाज प्रबोधन वगैरे, तापल्या तव्यावर पाणी पडल्याबर जसे उडून जाईल तसे उडून गेले. आणि लोकांच्या उत्साहाला २००७ मधे पहीला फटका बसला. रात्री १० नंतर ध्वनिवर्धकांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. लोकांचा उत्साह काही कमी झाला नाही. लोकमान्य आणि त्यांची तत्त्वे, कधीच काळच्या ओघात विसर्जित झाली. विसर्जनाच्या मिरवणूकांच्या कालावधीचे प्रमाण वाढले. अर्थहीन नाचणे, कानाचे पडदे फाटतील अशा आवाजातली तितकीच अर्थहीन प्रसंगाला अगदीच न शोभणारी गाणी यासाठी मिरवणूकीतला वेळ कमी पडू लागला. मिरवणूकीत आधी कोण यावरून मानापमानची नाटके रंगू लागली. मग त्यासाठी आपण चतुर्दशी उलटून गेली आहे, पौर्णिमा लागली आहे वगैरे किरकोळ तपशिल लोकोत्साहापुढे बाजूला ठेवले. आणि त्यातच ३२ तासांच्या मिरवणूकीचा ऊच्चांक नोंदवला गेला. आणि.....! आणि २००९ मधे गणेशोत्सवाला निसर्गाने न भूतो न भविष्यती तडाखा दिला. दहीहंडीच्या सुमाराला "स्वाईन फ्लू" नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला. बळी घेतले. आणि पुणेरी गणेशोत्सवाची रयाच गेली. एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या कलाकाराची त्याच्या पडत्या काळात जशी अवस्था होते तसे झाले पुणेरी गणेशोत्सवाचे. दहा दिवसातल्या रविवारीही रस्ते मोकळे असे दुर्मिळ दृश्य पायला मिळाले. ऑस्ट्रेलिया-बांगला देश क्रिकेट कसोटी सामन्यात स्टेडियममधे प्रेक्षकच नसतात. तसेच काहीसे दृश्य पुण्यातल्या गणपती मंडळानी पाहीले. आणि आणखी लोकक्षोभ होण्यापूर्वी जवळजवळ सर्व मंडळानी मिरवणूक बारा तासात संपवण्याचा मंडळांना न पचणारा पण अपरिहार्य निर्णय घेतला. सर्व एकत्र येऊन बैठका झाल्या. आणि सर्व ठरले. एका मंडळाने तर प्रतिज्ञा केली की रात्री १२ च्या आमच्या गणपतीचे विसर्जन नाही झाले तर पुढील वर्षी आमचा गणपती विसर्जन मिरवणूकीत नसेल. अट्टल दारूड्याने "मी आता दारू सोडलीये आणि मला दारू पिताना पकडून दाखवावे. मी दारू सोडून देईन." या आणि त्या मंडळाच्या विधानातला फोलपणा कोणाही शहाण्याच्या लक्षात येइल. आणि बरोबर झालेही तसेच. त्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन २ च्या सुमाराला झाले. आता इतक्या गर्दीत थोडेसे पुढे मागे(?) होणारच हो. इतके काय मनाला लावून घ्यायचे. जनतेची स्मृती ही अतिशय कमी असते हेच खरे. पहाटे ५ पूर्वी मिरवणूक संपवण्याच्या निर्धाराचे तीन तेरा वाजले, वाजवले गेले. आणि यातला उद्वेगजनक भाग म्हणजे या मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण करणार्‍या एका वाहिनीने " वा वा. पहा पुणेकर किती धीराचे आहेत पहा. त्यानी स्वाईन फ्लूचे सावट धीराने झुगारून दिले आहे आणि पहा कसे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आले आहेत." खरतर जनतेने आपल्या नाच धिंगाण्याच्या तल्लफेपुढे स्वाईन फ्लूचा धोका पत्करला होता. दुसर्‍या दिवशीचे दुपारचे १० वाजले. तरीही मिरवणूक चालूच होती.............

२०२०.............

.............आणि आज तिसरा दिवस उजाडला आहे. अजूनही मिरवणूक चालूच आहे. कुतुहलाने मिरवणूकीतल्या एकाला विचारले असता त्याने सांगितले की अजून निम्मी मंडळे बा़की आहेत. लोक बेभान होऊन नाचातच आहेत. आणि सहनशील नागरिक हताश नजरेने, बधीर होऊन पाहत आहेत. त्यांच्या चेहेर्‍यावर "ही कटकट संपणार कधी?" हे प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसतय..........



श्रीराम पेंडसे
रणथंभोर राष्ट्रिय व्याघ्र प्रकल्प सहल




मी रोज सकाळी पर्वतीला जात असतो. जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात तिथे "इन सर्च आउटडोअर्स" यासंस्थेच्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजीत केलेल्या सहलींचे परिपत्रक मिळाले. माझे मेहुणे बरीच अभयारण्ये हिंडून आले आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. तेंव्हा ते म्हणाले की रणथंभोरला वाघ दिसण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. जून २३ला इन सर्च आउटडोअर्सची रणथंभोरची सहल होती. तेंव्हा त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. सहलमूल्य भरलं. आमचा १० जणांचा ग्रूप होता. ६ ज्येष्ठ नागरिक आणि उरलेले तरूण पिढीचे प्रतिनिधी असे आम्ही होतो. जायचा दिवस उजाडला. पुणे बस स्टेशनवर आलो. तिथे आमच्या ग्रूपचे इतर लोकही भेटले.



बस सुटली.सारे आपापल्या स्थानावर शांत झाले. मला संदीप खरेच्या "गाडी सुटली, रूमाल हलले, टचकन झाले डोळे ओले" या कवितेची आठवण झाली. इथे फरक इतकाच होता की इथे बस होती. गाडी नव्हती. निदान माझ्यापुरते तरी हलायला रूमाल नव्हते किंवा ओले होणारे डोळेही नव्हते. जे ओले होणारे डोळे होते ते घरी तरी होते, पुण्याबाहेर तरी होते किंवा कायमचे मिटलेले! आयुष्यात आपल्यासाठी कुणाचे तरी डोळे ओले होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाल्याचा हा इशारा होता. त्यालाच ज्येष्ठ नागरिकत्व म्हणायचं का? एकटा असा ट्रीपला कधी मी गेलो नव्हतो. अश्या मोठ्या ट्रीपला सौ. बरोबर असायची. भक्कमपणे पाठीशी असायची. पण आज ती नव्हती. जणू काही संपूर्ण बस मधे मी एकटाच आहे की काय असे वाटून गेले. एकटेपणाची खरी खुरी झळ आता जाणवू लागली होती. ग्रूप मधल्या सर्वांशी बोलणे झाले होते. पण अजून "तुम्ही कोण?, मी कोण?" या पातळीपर्यंतच ओळखपरेड पोहोचली होती. त्यामुळे त्यांच्याशी संभाषण ५/१० वाक्यांपलीकडे गेले नाही. आणि अश्या वेळी माझ्या नातीचा मेसेज आला. माझी मुलगी आणि घरातली जनता यांच्याशिवाय इतर कोणालातरी मी सहलीला जाणार आहे, हे माहित आहे आणि शुभेच्छा द्याव्या असे वाटतंय हे पाहून आनंद झाला, बरे वाटले. ही नात कोकणात डेरवणला असते. अनघा बापट तिचे नाव. अतिशय मनस्वी आणि लाघवी व्यक्तिमत्व. ही अनघा म्हणजे एक अजब रसायन आहे. त्याबद्दल विस्ताराने नंतर कधी तरी लिहिन. आत्ता फक्त इतकेच की तरल आणि भावूक कविता लिहिणे हा तिचा हातखंडा प्रयोग आहे. तसेच ललित आणि वैचारीक लिखाणातही ती उस्ताद. तिचा "शुभस्ते पंथानम्" मेसेज आला. तो असा :




"बस सुटली, रूमाल हलले, क्षणात सारे चित्र बदलले

झाडे मागे पळू लागली, गाडीमध्ये गडबड झाली,


कोणी आपले फोन उचलले, कोणी भेसूर सूर लावले,

गाडी सुटली बरे वाटले, एकदाचे सगळे स्वस्थ झाले"

आजोबांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने खास ही कविता लिहिली होती. केवळ पांच दहा मिनीटांत रचली. शारदेचा वरदहस्त घेउन आलेली ही मुलगी. आम्ही म्हणजे "र"ला "र" आणि "ट" ला "ट" लावणारे. ही मुलगी खरोखरच महान आहे.




खरंच गाडी सुटली आणि बरे वाटले. पण ते फार काळ टिकले नाही. आठवणी भरतीच्या लाटांसारख्या अंगावर येऊ लागल्या. आणि या मानसिक एकांतवासात तीन तासांत मुंबईला कधी पोहोचलो ते कळले नाही. दादरला उतरून टॅक्सीने मुंबई सेंट्रलला गेलो. पुढे जयपूर एक्सप्रेसने जायचे होते. दोन तासांचा अवधि होता. थोडी पोट पूजा केली. तिथे गाडी फलाटाला लागायची वाट बघण्यात ओळखी आणखी थोड्या गडद होत गेल्या. पुणे स्टेशनवर झालेल्या ओळखीच्या पातळीमधे आणखी वाढ झाली. संभाषणाची गाडी "तुम्ही कुठे राहता? पहिल्यांदाच येताय का? काय गरम होताय हो आज." या पातळीला येऊन पोहोचली. खरंतर ही सारी प्रश्नोत्तरे निरर्थक असतात. पण व्यक्ती कशी आहे? बोलायला हंवय का? गप्पांची हौस आहे का? एकमेकांच्यात मिसळायला हंवय का? याचा थोडा फार अंदाज येऊ शकतो. आणि मग ट्रीप आनंददायी जाणार की "बोअर" होणार हे लक्षात येते. आमच्यात दोन ज्येष्ठ नागरिक जोडपी होती. म्हणजे माझ्यादृष्टीने ते बाद. कारण एकट्या माणसाशी जोडप्याचा संवाद जुळणे सहसा अवघड असते. आणि ते बरोबरही होते. म्हणजे दहापैकी चार जण बाद. दोन तरूण होते. एक मुलगा आणि एक मुलगी. बहुतेक त्यांचे लग्न ठरले असावे असे वाटले. पण माहित नाही. काही अंदाज येत नव्हता. ते एकमेकांचे इतके जिवलग होते की, ते दोघे केवळ खोल्या वेगळ्या असल्यानेच, झोप आणि व्यक्तिगत आन्हिके सोडल्यास पूर्ण वेळ एकत्र असत. त्यांच्या भावविश्वात इतरांना प्रवेश नव्हता. त्यामुळे तेही बाद. उरले तीन. एक एकटे माझ्यासारखे ज्येष्ठ नागरिक आणि दोन तरूण मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. बस्स. या तिघांशीच संवाद साधण्याची शक्यता होती. तसा मी माझ्यापेक्षा वयाने खूप लहानात रमणारा. मला माझा एक लांबचा जावई म्हणायाचासुद्धा कि " काका, वयाने वाढला तरी मनाने लहानच राहिला." मला भा. रा. भागवतांचा "फास्टर फेणे" आवडतो, हॅरी पॉटर आवडतो. त्यामुळे तो मला असे म्हणाला असेल. मला माहित नाही. त्यामुळे तो निखिल नावाचा मुलगा आणि पूनम ही संगणकप्रणाली अभियंता यांच्याशी माझे छान सूत जुळेल असे वाटले. आणि तसेच झालेही. पण मनाच्या सुप्तकोपर्‍यात कुठेतरी शंका होती कि आपले "ज्येष्ठ नागरिक" यांच्याशी जमणे जरा अवघडच दिसतंय. एका "ज्येष्ठ नागरिक" जोडप्याबद्दल. सुरूवातीला बस स्टँडवर त्यांची भेट झाली तेंव्हाच त्यांच्या चेहेर्‍यावर मला थोडासा "कॅस्ट्रॉइल लूक" दिसला होता. पण मी माझ्या मनाचे खेळ असतील असे समजून दुर्लक्ष केले होते. त्यांच्याशी आपले जमेल असा माझा अंदाज होता, तो साफ चुकला. कसा ते पुढे येईलच.




गाडी फलाटाला लागली गाडीत बसलो. आणि इथे अजून एक सुखद धक्का वाट बघत होता. माझी मुंबईत एक मानलेली नात आहे. मुलुंडला असते. अद्विका तिचे नाव. आजवर तिला मी कधीही भेटलेलो नव्हतो. पण ती मात्र आज मला आवर्जून भेटायला आली. मी लिहिलेल्या एका कवितेतल्या ओळींचे प्रत्यंतर तेंव्हा मला प्रथम तिथे आलेलं होतं. कोण कुठली अद्विका? तिने मला यापूर्वी आयुष्यात कधीही पाहिलेही नव्हते. काय फोनवर बोलणे होत असेल तितकेच. पण केवळ तितक्या ऋणानुबंधावर तिला यावसं वाटलं? हा आश्चर्याचा पण सुखद धक्का होता. पोरगी कामावरून लवकर निघून मुद्दाम आजोबांना भेटायला मुलुंडहून धडपडत आली. मनात विचार आला की, "अरे इतक्या लांबून ही मुलगी दगदग करून भेटायला येते. मी हिच्या जागी असतो तर असे गेलो असतो का? " खूप खूप विचार करूनसुद्धा, "नसतो गेलो " असेच प्रामाणिक पण दुर्दैवी उत्तर पुन्हा पुन्हा, निदान त्यावेळी तरी येत होते. आज कदाचीत "गेलो असतो" असे उत्तर येइलही. कोणत्या अनामिक आपुलकीपोटी ही पोर भेटायला आली? कोणता ऋणानुबंध आहे हा? की गेल्या जन्मीचा हा बंध आहे? याची उत्तरे अजूनही मला सापडलेली नाहीयेत. मी बराच विचार करतो. पण या अनामिक मायेच्या ओलाव्याचे रहस्य उलगडलेले नाहीये. तेंव्हाही नव्हते आणि आजही नाही. आपल्यासाठी इतक्या लांबून कोणीतरी केवळ भेटण्यासाठी येऊ शकतं हा धक्काच मुळी सुखद होता, अनपेक्षित होता आणि न झेपणाराही होता. इथे मात्र माझे डोळे पापण्यांमागे ओले व्हायला लागले होते. केवळ वयाला शोभलं नसतं म्हणून त्या पाण्याला पापण्यांचे दरवाजे बंद केले. गाडी सुटण्यापूर्वी तिने मला वाकून नमस्कार केला. आजच्या युगात लोप पावत चाललेल्या संस्कारांच्या या दर्शनाने मात्र ते डोळ्यातलं पाणी, रखवालदाराची नजर चुकवून कैर्‍या पाडायला धावणार्‍या व्रात्य मुलासारखं, पापण्यांचे पहारे चुकवून बाहेर यायला धडपडूं लागलं. गाडी सुटली आत आलो. आणि दोन अश्रू बाहेर आले. आता मात्र मी त्याना थोपवलं नाही. बाहेर येऊ दिलं. गाडीने वेग घेतला आणि वातनुकूलित डब्याच्या थंडाव्यात ते अश्रू वाळून गेले.




सवाईमाधोपूर स्टेशनवर पाय ठेवला आणि राजस्थानी रणरणत्या ४०+ तपमानाचा पहिला फटका बसला. त्यातून ए.सी.तून बाहेर आल्यामुळे तो अधिक जाणवला. हॉटेलमधे जाण्यासाठी कँटरमधे बसलो. सीट्स वर बसलो तर भाजून निघत होते. पुढचे तीन चार दिवस काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आला. हॉटेलमधे आलो. थोडेसे ताजेतवाने होउन जेवणासाठी डायनिंग हॉलमधे आलो. एकटेपणा आता संपत आला होता. कारण तोपर्यंत ग्रुपमधल्या सहप्रवाश्यांच्या ओळखी आपण जणु काही सहज रोज भेटणारे आहोत इतक्या पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या. जेवणानंतर विश्रांती घेऊन दुपारी ४ च्या सुमाराला निघालो. आम्हाला सूचना दिल्या गेल्या होत्या की कँटरमधून कोणत्याही परिस्थित खाली उतरायला परवानगी नाही. आणि खरंच नशिबाने वाघ दिसला तर अजिबात आवाज करायचा नाही. अखेरीस आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात भाजत भाजत व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. आणि आमचा कँटर अभयारण्याच्या भव्य कमानीतून आत शिरला. (चित्र क्र. १)




राजस्थानातलं सवाई माधोपूरजवळचं हे "रणथंभोर राष्ट्रीय उद्यान". हे वर्षानुवर्षे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. एके काळी जयपूरच्या महाराजांनी आणि नंतर ब्रिटीशांनी शिकारीसाठी हे जंगल वापरलं. नंतर श्री. वाल्मिक थापर आणि श्री. फत्तेचंद राठोड यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रदेश भारत सरकारने १९५५ मधे "व्याघ्र संरक्षित क्षेत्र" म्हणून जाहिर केला. या दोघांनी १९६०-६१ सालापासून या जंगलात हिंडून वाघांचा अभ्यास केला. आज हा जो प्रकल्प आहे हा या दोघांच्या अमाप आणि निस्वार्थी कष्टांचा परिपाक आहे. सुमारे ४०० चौ. कि.मी. असलेल्या या जंगलात अधिकृतपणे सुमारे ४५/५० वाघ आहेत. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांच्या मधे असलेले हे अभयारण्य आहे. दुसर्‍या संरक्षित क्षेत्रात वाघांची संख्या घटत चालल्याने इथून वाघांच्या दोन जोड्या पाठवण्यात आल्या आहेत. "रणथंभोर" या नावाचीसुद्धा एक गम्मत आहे. 'रण' म्हणजे वाळवंट. 'थं' म्हणजे डोंगर. आणि 'भोर' म्हणजे दरी. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला वाळवंट किंवा पठार आणि त्यामधे दरी. म्हणून या प्रदेशाला रणथंभोर असे नाव पडले. सर्व प्रदेश तसा वैराण आहे. त्यामानाने जंगल कमी. फार भलेमोठे वृक्ष तिथे नाहीत. आणि प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात दिसतं तसं घनदाट जंगलही नाही. पण वड, पिंपळ, असेच वृक्ष प्रामुख्याने दिसतात. फरशीच्या स्लॅबप्रमाणे दिसणारे तुळतुळीत ओके बोके खडक हे इथल्या डोंगराचे वैशिष्ट्य.


ठरल्या कार्यक्रमानुसार तीन वेळा आम्ही इथे येणार होतो. इथे एकंदर ५ मार्ग आहेत. आणि कोणत्याही मार्गावर गर्दी होऊनये म्हणून कँटर किंवा जिप्सी गाड्याना वनप्रशासनातर्फे मार्ग ठरवून दिला जातो. इथे अभयारण्यात तीन मोठे तलाव आहेत. पदम तलाव, राजबाग तलाव आणि मलिक तलाव. (चित्र क.२) शिवाय मोगलकालीन वास्तूंचे अवशेष आहेत. इथला "जोगी महाल" हा अजूनही राजघराण्यातल्या व्यक्तींसाठी वापरात आहे. सर्व प्राणी या पाणवठ्यावर येतात. (चित्र क्र.३) तसेच मार्गाच्या बाजूला काही छोटीशी डबकीही दिसली. त्यामुळेच इथे वाघ दिसण्याची सर्वाधिक शक्यता असते. जुन्या काळातले वास्तूंचे अवशेष जागोजागी दिसत होतेच. गाडी दोन कमानीतून आत शिरली. "तो पहा...." म्हणेपर्यंत सर्व जण उठून उभे राहिले. आणि नंतर म्हणणार्‍याने वाक्य पूर्ण केले ".... मस्त मोर दिसतोय." सर्व जण फुग्यातली हवा गेल्यासारखे परत खाली बसले. चला! मोरांचे दर्शन झाले. (चित्र क्र.६) पण पुढे पुढे इतके मोर दिसले की मोर दिसण्याचे कौतुक त्या दिवशी संध्याकाळपर्यंत संपूनही गेले. निदान मला तरी तसे वाटले. जवळ जवळ एक दीड किलोमीटर गेल्यावर एका छोट्याश्या रस्त्याला गाडी वळून थांबली. इथून हा रूट सुरू होणार होता. प्रशासकीय गोष्टी पूर्ण करण्यासाठी गाडी थांबली होती. आणि तिथे एक गम्मत पाहायला मिळाली. तिथे गाडी थांबली असताना तिथल्या झाडावर काही पक्षी होते. त्याला टकाचोर म्हणतात. काळे डोके आणि काळी शेपटी. पण शेपटीचे टोक मात्र पांढरे. मधला भाग पिवळसर तपकीरी रंगाचा आणि पंखावर, एखाद्या गडद साडीच्या पदराला असणार्‍या पांढर्‍या किनारीसारखा पट्टा. (चित्र क्र.४) तुम्ही हातावर पोळीचा तुकडा, बिस्कीट वगैरे ठेवले तर ते पक्षी तुमच्या हातवर येउन बसतात. अगदी बिनधास्त पणे. आणि खातात. अजिबात घाबरत नाहीत. खूप मजा वाटते पाहताना. अक्षरशः दोन तीन पक्षी एकाचवेळी हातावर येउन बसतात. (चित्र क्र.५)




आणि आम्ही त्या "टायगर ट्रेल" वर निघालो. रस्ता अतिशय खराब होता. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर दिसणारी "फेव्हीकॉल"ची जाहिरात आठवा. त्याप्रमाणे आमचा कँटर हेलकावे घेत घेत चालला होता. या अभयारण्यात त्यामानाने प्राण्यांच्या जाती फारश्या दिसल्या नाहीत. ठिपकेदार हरणांनी पहिले दर्शन दिले. ( चित्र क्र.७) नीलगायींचे कळपही दिसले. सांबरही दिसले. ससे, रानडुक्करे, चितळ असे प्राणी दिसले. माकडे तर भरपूर होती. ठेचकाळत ठेचकाळत पुढे पुढे जात होतो. आणि अचानक कचकन ब्रेक दाबत गाडी थांबली. " काय झाले काय झाले?" असा कल्ला झाला. आणि पुढून तो गाईड म्हणाला, " शू.... शांती रखो. शेर....!" आमच्या पुढे अजून दोन गाड्या थांबल्या होत्या. आणि तिन्ही गाड्यातले आम्ही सर्व जण श्वास रोखून समोर बघत होतो. रस्त्यापासून १००एक फूटावर एक डबके होते. आणि त्यात व्याघ्रराजांची स्वारी आरामात पाण्याच्या थंडाव्याचा आस्वाद घेत शांतपणे पहुडली होती. प्राण्याना भावना असतात का? हा वादाचा विषय असेलही. पण मला जे माहीत आहे त्याप्रमाणे प्राण्याना भावना नाहीत. मानवाइतक्या त्या विकसीत तर नाहीतच नाहीत.. त्या अत्यंत अस्फूट आहेत. निद्रा, भय, मैथुन आणि पोट भरणे इतक्यापुरत्याच त्या मर्यादित आहेत. पण मला त्या वाघाच्या चेहेर्‍यावर मुक्ततेचे समाधान दिसत होते. (चित्र क्र.८) माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला माहित आहे. पण मला कायमच प्राणीसंग्रहालयातल्या किंवा सर्कशीतल्या वाघाच्या चेहेर्‍यावर दिनवाणे मिश्रित त्रासिक भावच दिसत आले आहेत. "....काय शिंची कटकट आहे राव! धड जगूही देत नाहित ही माणसे! इथे मला एक आख्खा बैल दिवसाला लागतो. आणि ही मंडळी सकाळी काही तुकडे आणि रात्री काही तुकडे देतात. छे! खर्‍याची दुनियाच नाही राहिली....." असे भाव त्या वाघाच्या तोंडावर असतात. आणि इथे? इथे मात्र भूमिका बदलल्या होत्या. आम्ही बंदिस्त होतो. तो मोकळा होता. जणू काही "...काय बघायचे असेल ते मनसोक्त बघून घ्या..." असेच त्याला जर बोलण्याची कला असती तर म्हणाला असता. लहान मुलांच्या खेळातल्या "स्टॅच्यू" च्या खेळासारखा सारखा सर्वांचा स्टॅच्यू झाला होता. एक पांच दहा मिनिटांनतर तो उठला पाण्याबाहेर आला. (चित्र क्र.९) आणि तिथून दहा पंधरा फूटावर जाऊन बसला आणि पांच एक मिनिटात झोपून ही गेला. "आता तुम्ही निघा" अशीच जणू काही सूचना होती. आम्ही तेथून निघालो. तापल्या तव्यावर पॉपकॉर्न उडावेत तसे टणाटण कँटरमधे उडत उडत अजून दोन किलोमीटरवर रस्त्याच्या टोकाला आलो. इथे बंधार्‍यामुळे एक अगदी छोटासा तलाव झाला होता. त्यात भरपूर मगरी होत्या. त्या तलावात चित्र बलाक, पाणकोंबडी, स्वर्गीय नर्तक असे बरेच पक्षी झुंडीने दिसले. थोडा वेळ थांबलो. मोर तर अगणित दिसले. परत फिरलो. वाघोबा अजूनही तिथेच विश्रांती घेत पडले होते. त्यांच्या विश्रांतीचे रहस्य आम्हाला दुसर्‍या दिवशी समजले. त्या दिवशी त्या वाघाने शिकार करून जवळ जवळ सगळी नीलगाय रिचवली होती. आणि आपल्याला कसे सणाच्या दिवशी श्रीखंड किंवा आम्रखंड दुपारी अंगावर येते तसे त्याला बहुतेक झाले होते. आम्ही परत तिथे काहीतरी हालचाल होईल या आशेने १०/१५ मिनिटे थांबलो. तितक्या वेळात त्या वाघोबाने तीन चार वेळा मान वर करून पाहिले. दोनदा जांभई दिली. शेवटी पंजा वर करून "बाय बाय"चा इशारा केला. आणि आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. संध्याकाळी मुक्कामावर परत आलो. चहा आणि मस्तपैकी गरमागरम कांदा भजी आमची वाट बघत होती. नंतर जेवणे झाली रात्री सर्वांची आपापल्या नातेवाईकांना "वाघ दिसल्या"ची फोनाफोनी, मेसेजामेसेजी झाली. वाघ इतक्या लवकर दिसेल ही अपेक्षा नसल्याने सर्व आनंदात होते.


दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता पुन्हा आम्ही व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारात पुन्हा एकदा येउन पोहोचलो. आज आता आम्हाला दुसरा "रुट मिळाला होता. आज त्या तलावांवर जायचे होते. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. वातावरणात माफक थंडावा होता. म्हणजे कालच्या मानाने बरेच थंड होते. या नवीन रूटवर आम्ही पुढे पुढे जात राहीलो. तिन्ही तलावाच्या काठी गेलो. एक तलावाच्याकाठी तिथल्या फॉरेस्ट गार्डने सांगितले की '..... शायद शेर दिख सकता हैं, कल रातमेही उसने किल किया हैं. वो वापस आयेगा...." झाले! आम्ही थांबलो. पण अर्धा तास थांबूनही काही तो "शेर" दिसला नाही. आज सकाळी बहुतेक आमचे नशिब आमच्या बाजूने नव्हते. असे सारखे सारखे वाघ दर्शन द्यायला लागले तर कसे चालेल? त्यांना पहायला कोणी फिरकणारही नाही. साधारण सकाळी १०च्या सुमाराला आम्ही परत मुक्कामी आलो. आज व्याघ्रराज नाराज होते बहुतेक. हॉटेलवर आल्यावर न्याहारी झाली. नंतर तिथल्याच शहरातल्या एका दुकानाता खरेदीला गेलो. सर्वांची खरेदी आटोपली. निदान त्या दिवसापुरती तरी. दुपारचे भोजन उरकले. आणि थोडीशी विश्रांती घेउन पुन्हा दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा व्याघ्रदर्शनाच्या आशेने कँटरने भाजत भाजत प्रवेश द्वाराजवळ येऊन पोहोचलो. यावेळी आमच्या गाईडने वाघ दिसण्याची शक्यता असणारा रूट मिळण्याची फिल्डींग लावली होती. आणि नशिबाने तसा रूट मिळाला आहे असे त्याने आम्हाला सांगितले. सर्वांचे चेहेरे एकदम खुलले. आणि आमच्या कँटरने पुन्हा एकदा त्या वनचरांच्या जादुई दुनियेत प्रवेश केला.





आम्हाला पुन्हा अगणित मोर दिसले. आता आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले होते. आणि आम्ही पुढे पुढे जात असताना आमच्या समोर तीन कँटर थांबलेले दिसले. पुढे जायला जागा नसल्याने आम्ही थांबलो. आणि आमच्या कँटरपासून १५ फूटावर एक वाघ मस्तपैकी पाण्यात डुंबत होता. ती वाघिण आहे असे त्या गाईडने सांगितले. मला पडलेला प्रश्न म्हणजे हे त्याला कसे कळले? त्या वाघिणीच्या गळ्यात कुत्र्याला बांधतात तसा पट्टा होता. कुतुहलाने त्या गाईडला विचारले असता तो म्हणाला कि तो " रेडिओ ट्रॅकर बेल्ट" आहे. (चित्र क्र. १०) मला गम्मत वाटली. आपण नाही का लहान मुलाला म्हणत कि "....तुला चॉकलेट देतो पण इथे गुपचूप बैस...." म्हणून. बहुतेक तिला तशी समज देऊन तिथे आणून बसवले असावे. की ".....इथे गुपचूप बसायचे आहे. लोक बघायला येणार आहेत. नंतर रात्री अर्धा बैल मेजवानी मिळेल....." कालच्याही वाघाचे दर्शन असेच ठरवून दिल्या सारखे वाटले. कुठेतरी कृत्रिमपणा वाटत होता. पुन्हा हे माझ्या मनाचे खेळ असतीलही. माझी ही मते ऐकून समस्त व्याघ्रप्रेमी माझ्या अंगावर चाल करून येतीलही. पण माझा नाईलाज आहे. मला जाणवलं ते हे असं होतं. कुठेतरी अनैसर्गिक वाटले. खूप सहज वाटणारा योगायोग? A far fetched coincidence? As if Tiger was meant to be present there. माहित नाही. मला मात्र राहून राहून तसे वाटत होते. पण वाघ दिसल्याच्या नादात ही गोष्ट कुणाला जाणवली नसेलही. आणि त्यामुळे कुणाला काही खटकण्याचा प्रश्नच आला नाही. मी मात्र आता इकडे तिकडे पहात होतो की काही वेगळे आणखी दिसतय का बघावं. तर समोरच्या झाडावर बंड्या दिसला. (चित्र क्र.११) हा आणि खंड्या यात फरक आहे. "किंग फिशर" म्हणजे खंड्या. आणि "व्हाईट चेस्टेड किंग फिशर" म्हणजे बंड्या. नेहमी बंड्या आणि खंड्या यांच्यात गल्लत होते. माझ्या माहितीप्रमाणे बंड्या पुष्कळ वेळा दिसतो. खंड्या फार कमी दिसतो. आकाशात आता ढगांचे संमेलन भरलं होतं. (चित्र क्र. १२) त्यानी गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यांची सूर्यकिरणांशी लढाई चालू होती. पण ढगांची गणसंख्या कमी पडल्याने त्यांना सूर्याला झाकून टाकणे नीट जमले नव्हते. आणि त्यामुळे वर छाया प्रकाशाचा मस्त खेळ रंगला होता. ढगांच्या फटीतून सूर्यकिरण, एखादा कापडी पडदा फाडून तळपती तलवार बाहेर येऊन दिसावी तसे ते दृश्य दिसत होते. (चित्र क्र. १३) आणि त्या सूर्या किरणांमुळे त्या ढगाना एक रूपेरी किनार दिसत होती. जणू काही चांदीचे मखरच वाटत होते. अतिशय विलोभनीय दृश्य दिसत होते ते. (चित्र क्र. १४) इतर जनता मात्र अनिमिष नेत्रांनी जे बघायचे ते सोडून वाघ बघण्यात दंग होती. त्यांना हे कळत नव्हते की वाघ नंतर प्राणिसंग्रहालयातही पहायला मिळू शकतो. पण हा निसर्गाचा मनोहर चमत्कार पुन्हा पहायला मिळेल याची खात्री नाही. असो हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. सुमारे २०/२५ मिनिटे थांबून आम्ही तेथून पुढे निघालो. आणि त्या रूटवर अजुन २/३ कि. मी. गेलो. आता वाघ दिसण्याची शक्यता नाही असे गाईडने जाहीर करून टाकले. आम्ही परत फिरलो. तिथे रस्त्याच्या एका बाजूला वडाचे एक झाड होते. त्याच्या पारंब्या वरून जाऊन पलिकडच्या बाजूला गेल्या होत्या. आणि एक प्रकारची नैसर्गिक कमान तयार झाली होती. जाताना ही कमान दिसली नव्हती, जाणवली नव्हती. कारण त्यादृष्टीने आम्ही बघितलेच नव्हते. जणू काही निसर्गाच्या साम्राज्याचे प्रवेशद्वारच होते ते. (चित्र क्र.१५) वरती "वेलकम" अशी पाटी निसर्गाने आपल्या भाषेत लिहिली होती. जणू काही निसर्गाला सुचवायचं होतं की, "....इथे या आणि आमचे हे अफाट सौंदर्य पहा. परत गेल्यावर तुमच्या नशिबी काँक्रिटची जंगलं आणि प्रदूषणं तर आहेतच. पण आत्ता आलाच आहात तर शुद्ध, स्वच्छ, निर्मळ आणि भरपूर ऑक्सिजनयुक्त वातावरणाचा आनंद लुटा....." आम्ही त्या कमानीतून परतीच्या मार्गाला लागलो. आणि अर्ध्या कि. मी.वर एक आश्चर्य वाट पहात होतं. आमच्या गाडीपुढेच एक वाघ रस्त्याच्या मधोमध शांतपणे चालला होता. काय डौलदार चाल होती त्याची! मागे काय आहे, कोण आहे याची त्याला फिकिर नव्हती. आम्ही त्याच्या मागे मागे त्याच्या वेगाप्रमाणे जात होतो. त्याने मागे वळून पाहण्याचे कष्टही घेतले नाहीत. साधारण ५० फूट गेल्यावर तो जंगलात जाण्यासाठी वळला. इथे मात्र आम्ही थांबलो. एकदा त्याने मागे वळून पाहिले. आणि दूरवर तो झाडीतून दिसेनासा झाला. हे मात्र नैसर्गिक दर्शन झाले. ठरवून बसवण्याचा वगैरे प्रश्नच येत नव्हता किंवा इथे आम्हाला तो दर्शन देण्यासाठीही आला नव्हता. त्याचा तो त्याच्याच मस्तीत चालला होता. तो जाताना तिथे आम्ही असायला एकच गाठ पडली. हे मात्र आमचे नशिब. हा मात्र योगायोग नक्की. वाघाचे मला अपेक्षित होते ते हे असे दर्शन. आमच्या कँटरने परतीची वाटचाल सुरु केली. जाताना त्या वाघिणीपाशी परत एकदा कौतुकाने थांबलो. परत १५/२० मिनिटे पुन्हा तेच. पुन्हा वाट बघणे कोणत्यातरी हालचालीची. आणि या वेळी मात्र वाघिणीने हालचाल केली. डोके वर केले. आमच्याकडे पाहिले, आणि पाणी प्यायला सुरुवात केली. कालच्या वाघापेक्षा ही नक्कीच निराळी(?) हालचाल होती. पण मनातली कृत्रीम दृश्याची भावना जात नव्हती. आपल्याला नक्की काय अपेक्षित होते? कोणती हालचाल हवी होती? वाघ पहायचा होता म्हणजे कसा पहायचा होता? मला काही सांगता येत नव्हते. समाधान झाले का? हो समाधान झाले. कसले समाधान? फक्त वाघ पाहिल्याचे समाधान इतकेच समाधानकारक उत्तर माझ्यापुरते तरी मी देईन. इतरांचे मला माहित नाही. संध्याकाळी ७ च्या सुमाराला हॉटेलवर परत आलो. परत कांदा भजी वाट बघत होतीच.



तिसरा दिवस. आज जंगलात जायचे नव्हते. आज सकाळी जवळच चालत फेरफटका मारायचे ठरवले होते. बाहेर पडलो. चालत चालत निघलो. आमच्या हॉटेलपासून थोडे अंतर गेल्यावर जंगल सुरू झाले. झाडी फार दाट नव्हती. पुन पक्षी पहायला मिळाले. आपल्याकडे दयाळ दिसतो. त्या कुलातला पक्षी दिसला. पुढे जाता जाता एक मोठे मुंग्यांचे वारूळ दिसले. साधारण दोन एक फूट उंचीचे असेल. त्यात मुंग्या नव्ह्त्या. तसेच पुढे गेलो. ठिपकेदार हरणे दिसली. एक छान सुतार पक्ष्याचेही दर्शन झाले. मस्तपैकी झाडाच्या खोडावर बसून धारदार चोचीने "टक टक" करत बसला होता. फिरून साधारण ११ च्या सुमाराला परत हॉटेलवर आलो. आणि विश्रांती घेतली जेवण झाले. आणि दुपारी ३ च्या सुमाराला पुन्हा एकदा या ट्रीपमधले शेवटचे अभयारण्यात निघालो. यावेळी मुख्य अभयारण्यात जायचे नव्हते. साधारण १० कि.मी. वर असलेल्या "सवाई मानसिंग" अभ्यारण्यात जायचे होते. याला "बनास सँक्चुरि" म्हणतात. इथे चिता दिसण्याचा संभव होता. वाघाच्या मानाने चित्त्याचे दर्शन खूप दुर्मिळ असते. चित्ता हा प्राणी त्यामानाने बेभरवशी आहे. वाघ सहसा कारणाशिवाय माणसांवर हल्ला करणार नाही, जो पर्यांत तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही. वाघ भुकेलेला असला तरी बहुतांशी माणसांवर तो चालून जाणार नाही. अगदी जरी वाघ तुमच्या शेजारून जात असला तरीही तो तुमच्याकडे लक्षही देणार नाही. अपवाद फक्त नरभक्षक वाघाचा. पण चित्त्याचे तसे नाही. तो माणसांवरही अकारण हल्ला करतो. सहसा चटकन दिसत नाही. तो झाडावर सहज चढू शकतो. आणि वाघाच्यामानाने खूपच चपळ असतो. चित्ता हा तसा बुजरा प्राणी आहे. आणि म्हणून त्याचे नैसर्गिक दर्शन तसे अवघड असते. त्यामुळे चित्ता दिसेल याची खात्री नव्हती. तरीही आम्ही गेलो. पुन्हा "फेव्हीकॉल" प्रमाणे ठेचकाळत गेलो. इथे प्रदेश बराच दगडाळ होता. आज कँटर नव्हता. दोन जिप्सी गाड्या करून गेलो होतो. पण "फेव्हीकॉल इफेक्ट" अजिबात कमी नव्हता. हा प्रदेश आणखी वैराण होता. नोंदणी वगैरे सोपस्कार करून मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो. कुठे एखादा ससा किंवा नीलगाय यापलिकडे काहिच दिसले नाही. शेवटी एका कड्याच्या टोकाला येऊन थांबलो. इथे सूर्यास्त पाहण्याची आयडिया होती. त्याकड्याच्या टोकावरून खाली गाव काड्यापेटीसारखे दिसत होते. तशातही आमच्यातल्या लीडरला खाली चित्त्याने मारलेली नीलगाय दिसली. पण आम्हाला चित्ता काही दिसला नाही. नंतर दिसला. पण कसा त्याचे रहस्य पुढे येईल. ढगांनी सूर्य झाकायला सुरूवात केली आणि सूर्यास्त पाहण्याच्या आशा मावळल्या. आम्ही परत फिरायचे ठरवले.


....आणि मी सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे माझा एका जोडप्याबद्दलचा चुकलेला अंदाज इथे उघड झाला. आम्ही चर्चा करत होतो की ट्रीपनंतर भेटले पाहीजे. फोटो एकमेकांना दिले पाहिजे. त्यावेळी त्या जोडप्यातली कवळी वाजली त्यांनी आपल्या सौं. ना ताकिद दिली की "तू भलते सलते बडबडू नकोस. नंतर भेटायचे जमणार नाही." तरीही मी थोडासा नेट लावून म्हणालो की लगेचच्या रविवारी भेटूया. पण नाही. त्या कवळीने आपल्या अर्धांगीला झापले. मी ऐकतोय याकडे लक्षही दिले नाही. किंबहुना मी ऐकवे अशीच इच्छा असावी असे आता मला वाटते. "आपण सहलीला आलो आहोत. आपला इतरांशी काहीही संबंध नाही. ट्रीप संपली. संबंध संपला. घरी बोलवा वगैरे संबंध अजीबात वाढवायचे नाहीत. पुन्हा चूकुन माकून पुढच्या ट्रीपला भेटलो तर पाहू. नाहीतर नाही." मला कळत नाही की ही असली माणसे ट्रीपला का येतात? माणसात मिसळायचे नसेल तर गुपचूप घरी बसा की. किंवा फिरण्याची इतकीच हौस असेल तर स्वतंत्ररीत्या ट्रीपा काढा! एखादा साथीचा रोग साथ पसरला की लागण झालेल्याना कसे वेगळे ठेवतात, तसे माणूसघाणेपणाच्या रोगाची लागण झालेलांनी इतरांपासून आणि इतरांनी त्यांच्यापासून दूर राहवे हे बरे. त्यावेळी मग मी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकांशी पुण्यात येईपर्यंत एक अक्षरही संवाद साधला नाही. माझ्या मेंदूच्या कॉम्पुटरमधून त्यांची उपस्थिती पूर्णतया "डिलिट" केली. आणि दुसरे म्हणजे ही मंडळी आपल्यापासून दूर राहणार नसतील तर पुन्हा मी कधीतरी "इन सर्च आउटडोअर्स" बरोबर गेलो तर हे ज्येष्ठ नागरिक नसतील त्याच ट्रीपला फक्त जायचे असे मनोमन ठरवून टाकले.


आम्ही परत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आलो. दोन जिप्सीपैकी आमची जिप्सी पुढे निघून आली. दुसर्‍या जिप्सीतला गाईड म्हणाला ".... रूको. शेर बतता हूँ...." ती जिप्सी थांबली. अर्थात त्यानी परत आल्यावर आम्हाला "टुक टुक" केलं. त्या गाईडने लांबवर एका झाडावर बसलेला चित्ता दाखवला. पण नंतर त्याने सांगितलेली कथा मजेदार आहे. " ये तो पकडा हुवा शेर है। इसे जंगलमे रोज छॉड दिया जाता है। मगर उसे आदतसी हुवी है इसलिये वो हर रोज शामको इधर आता है और बैठता हैं।" परत हॉटेलवर आलो. चहा , रात्री जेवण आणि नंतर झोप.


आज आता शेवटचा दिवस होता. आज रणथंभोरचा किल्ला पहायला जायचे होते. त्या किल्ल्यात एक गणपतीचे मंदिर आहे. त्रिमुखी गणपती आहे हा. महाराष्ट्रात जसे अष्टविनायकाला महत्त्व आहे तसे या गणपतीला राजस्थानात महत्व आहे. दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. आजचा दिवस गर्दी असण्याची शक्यता नव्हती. म्हणून आज आम्ही जायचे ठरवले होते. हा किल्ला त्या अभयारण्यातच आहे. मला पुन्हा पडलेला प्रश्न असा की या गणपतीच्या दर्शनाला जाणारे शेकड्याने लोक असतात. त्यांना वाघाच्या हल्ल्याचा धोका नाही का? की वाघ पर्यटक आणि स्थनिक रहीवासी यातला फरक ओळखू शकतात? ती मंडळी आपण सारसबागेत फिरावे तशी किंवा मुंबईकर जसे जुहू बीचवर बागडतात तशी आरामात चालत हिंडत होती. आणि पर्यटकांपैकी कोणी उतरण्याचा प्रयत्न केला किंवा हात पाय बाहेर काढला तरी आरडा ओरडा होत असे. असे का हे मला शेवटपर्यंत समजले नाही नंतर विचार करता मला असे वाटले की पर्यटकांपैकी कोणी भरकटला तर त्याला आवरणे अशक्य होइल आणि वाघाला आयते अन्न मिळेल. असे होऊ नये म्हणून घेतलेली ही काळजी असावी. अर्थात माझे हे मत मलाच पटलेले नाहिये. पुन्हा कँटर सकाळी ७ वाजता अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशला. आता "टायगर ट्रेल" वर जायचे नसल्याने परवानगी, पास वगैरेचा प्रश्न नव्हता.

आणि त्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी आलो. हा किल्ला इ.स. ९४४ च्या सुमाराला राजपुतांनी बांधला. समुद्र सपाटीपासून सुमारे ७०० फूट उंचीवर असलेला ह किल्ला त्याकाळी एक महत्वाचे नाके होते. ११९२ मधे महंमद घोरीकडून पृथ्विराज चौहानचा पराभव झाला. त्यानंतर त्याचा नातू गोविंदराजने राजपुतांचा लढा पुढे चालू ठेवला. पुन्हा मोगल, रजपुत, मोगल असे करत करत शेवटी अकबराने हा किल्ला १५५९ साली जिंकला. नंतर १७ व्या शतकात जयपूरच्या कछवा महाराजांकडे हा किल्ला आला. ते अगदी स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हा किल्ला जयपूरच्या महाराजांकडे होता. या किल्ल्यात हिंदूंची तीन देवळे आहेत. गणेश, शिव आणि रामलालजी यांची देवळे आहेत. १२व्या शतकात लाल दगडांनी बांधलेली ही देवळे पर्यटकांचे आकर्षण आहेत. सर्व किल्ला हिंडून पाहिला. त्रिमुखी गणपतीचे दर्शन घेतले आणि खाली आलो. कँटरमधे बसलो. आणि मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आलो. मागे वळून पाहीले शेवटचे आणि परत हॉटेलवर आलो. चहा न्याहारी झाल्यावर पुन्हा एकदा खरेदी झाली. जेवण झाले आणि दुपारच्या गाडीने परतण्यासाठी भाजत भाजत सवाई माधोपूर स्टेशनवर आलो. सगळ्यांनाच परतीचे वेध लागले होते. प्रत्येकाचे आरक्षण निरनिराळ्या ठिकाणी असल्यामुळे आता पुन्हा लवकर भेट होणार नाही यापेक्षाही ज्यांना नंतर संपर्कच ठेवायचा नव्हता त्यांचे "कॅस्ट्रॉइल लूक" चेहेरे बघण्यापासून सुटलो याचाच अधिक आनंद होता. ज्याना मनापासून भेटायचे आहे ते संपर्क ठेवतील याची खात्री होती. सकाळी बोरीवली स्टेशनवर उतरून पुण्याची बस पकडली आणि दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात परत आलो.


सहल संपली. पुन्हा एकदा मी काँक्रिटच्या जंगलात आणि माझ्या भावविश्वात प्रवेश केला. मुंबईत आलो तेंव्हाच निसर्गाची जादू ओसरली होती. जे पाहून आलो ते खरं होतं का की मला सारखं वाटत होतं तसं घडवून आणलेलं होतं? देव जाणे. पण मला जे पटलं, जसे भावलं तसं मी लिहून काढलय. त्या व्याघ्रराजाचं देखणं दर्शन कृत्रीम असावं असं मला का बरे वाटावे? कदाचीत मी काँक्रिटच्या जंगलातला प्राणी आहे. म्हणून मग या काँक्रिटच्या जंगलात माणूस रूपी श्वापदात राहणार्‍या मला, या अत्यंत देखण्या वनराजाचं दर्शन कृत्रीम वाटलं असेल, संस्थाने विलीन झालेल्या महाराजांसारखे! पण एक नक्की की ते दर्शन कृत्रीम असलं तरी त्या हिंस्त्र श्वापदाच्या चेहेर्‍यावरचे भाव मात्र निश्चितच निरागस होते, नैसर्गिक होते ..... सिमेंटच्या जंगलातल्या दोन पायावर चालणार्‍या ओळखिच्या श्वापदाच्या चेहर्‍यावर असे भाव क्वचित पहायला मिळतात. हो ना?



श्रीराम