मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

एकला चलो रे!

 पाउण शतकी आयुष्य

     सरलं कधी कळलं नाही

खाच खळगे असती थोडे
     हायवे ट्रॅफिकसारखं नाही
चारचौघांसारखं गेलं
     सरलं कधी कळलं नाही

नशिबाचा प्रखर प्रकाश
     डोळ्यास सहन झाला नाही
आयुष्य त्यात होरपळलं
     मला कधीच कळलं नाही

संसार बरा सुखी होता
     न्यून त्यातलं कळलं नाही
त्याचा तोल सावरताना
      जीवन सरलं कळलं नाही

सखे सारे गायब होती
     एकटेपण संपलं नाही
एकला चलो रे सत्य
     मला कधी झेपलं नाही

एकटेपणाची दु:खे माझी
     कधी कधीच संपली नाहीत
एकटेपणाची सारी सुखे
     मी कधी भोगलीच नाहीत

पाऊण शतकी वयात जरी
     एकटेपणा परवडत नाही
इथे कुणाला वेळ नाही
     हे काही कधी उमगत नाही

गूढ घहिरी शांतता असली
     तरी ऐकटेपण झेपत नाही
अशा वेळी तिथे कधीच
     सुख समाधान मिळत नाही

नशिबाच्या फाशांनी
     साथ कधीच दिली नाही
वाट बघता प्रकाशाची
     वेळ संपली कळली नाही

रस्ता संपला तरी देखिल
     जीवन मला कळलं नाही
काळ्या विवरात शिरताना
     सरलं कधी कळलं नाही
 
     सरलं कधी कळलं नाही
     सरलं कधी कळलं नाही ॥


...........श्रीराम पेंडसे

निर्वाण

 एखादं महान व्यक्तिमत्व निधन पावलं की "महानिर्वाण" म्हणण्याची प्रथा आहे. पण मी एक सामान्य माणूस. त्यामुळे मला माझ्या मृत्यूस महानिर्वाण म्हणण्याची परवानगी नाही. म्हणून मी फक्त "निर्वाण" असं म्हणालो.


मृत्यू हा विषय तसा दु:ख निर्देशक आहे. आसपास ग्लूमी वातावरण असतं. सर्व घरात, वास्तूत वातावरण दु:खी असतं. पण या कवितेत तुम्हाला असं दु:खी, निगेटिव्ह वातावरण आढळणार नाही. ही कविता लिहीताना मी प्रचंड पॉझिटिव्ह मन:स्थितीत होतो व अजूनही आहे सुद्धा. माझे संगितातले मानस गुरू आणि ज्येष्ठ संवादिनीवादक श्री उपेंद्र सहस्रबुद्धेसर (माझ्या इतका मठ्ठ विद्यार्थी सरांना आयुष्यात भेटला नसेल त्यामुळे सरांच मला झेलण्याचं धैर्य अचाट आहे.) शिकवताना त्यांच्या सांगितीक भाषेत सांगत असतात की कधी कधी गरजेनुसार कणसूर स्वर लागला पाहिजे, तसं कवितेत मे बी कुठेतरी चार्ली चॅपलिन स्टाईल करुण विनोदाचा कणसूर लागलेला सापडेल. माहित नाही. वरवर वाचणार्‍याला कदाचित नाही सापडणार. पण आपण कसा विचार करतो, एखादी घटना कशी घेतो त्यावर हा कणसूर सापडणं अवलंबून आहे. तरी कवितेचा आस्वाद घ्यावा ही विनंती.



हात पाय पसरुनी शांत
     सतरंजीवर पहुडलो होतो
मुखावर मिश्किल हास्य होते
     हार व फुले झेलत होतो ॥१॥

शरीर शांत असले तरी
     मन चित्त मोकळे होते
आज का बरं इतके जन
     आजूबाजू वावरत होते?॥२॥

पिसासारखा आत्मा माझा
     सारे घरभर बागडून आला
काय करावे हे न समजून
     पुन्हा शरीरात शिरु लागला ॥३॥

नाकात कापूस ठासल्याने
     सारा श्वासच कोंडला होता
तनु प्राणरहित असल्यामुळे
     आत्म्यास प्रवेश बंद होता ॥४॥

समस्त जन खाली वाकून
     पदस्पर्श नमस्कार करीत होते
माझ्या शतक महोत्सवाचे
     जणू हे सारे निमीत्त होते? ॥५॥

खुर्चीवर बसवून कुणी मला
     शाल आणि हार का देई ना?
त्यासाठी झोपून का राहायचे
     हेच मुळी मजला समजे ना ॥६॥

इतकी जनता सभोवती
     बघायची कधी सवय नव्हती
आयुष्यात कधी कधी एकटं
     एकटं असण्याची सवय होती ॥७॥

कन्या व नातींच्या नेत्रातून
      अश्रूंचे पाणलोट वाहत होते
इतर काही जणींचे रुमाल
       अश्रूपातामुळे ओलसर होते ॥८॥

समस्त महिलामंडळाचे चेहेरे
     उदास व रडके दिसत होते
पुरुषमंडळींचे मुखडे मात्र
     भावनारहित व कोरडे होते ॥९॥

पुरुष मंडळी उतावळले होते
     कधी एकदा भट्टीत ढकलतो
रुपाली वैशाली वाडेश्वरला
     इडली वडा सांबार हाणतो II१०॥

अचानक सारे बदलले आणि
     सारा सीन झूमआउट झाला
आता फक्त डोकी दिसली
     माझाच चेहेरा मला दिसला ॥११॥

छतावरुन आता खाली मला
     लवकर लवकर यायचे होते
पण वजनरहित अवस्थेमुळे ते
     प्रयत्न करुनही जमत नव्हते ॥१२॥

छतावरुन सुटका झाली
     अंबर निळाई दिसू लागली
तेंव्हा अखेर समजले मला,
     अंतिम यात्रेची सुरुवात झाली ॥१३॥

या सार्‍या विश्व पोकळीत
     फक्त गडद अंधारच होता
आता पुढे काय यासाठी
      सारा साराच वेळच होता ॥१४॥

दोन्ही हातात झोळी होती
     एक जड आणि दुसरी हलकी
जड झोळीत दु:खे होती
     हलकी झोळी रिकामी होती ॥१५॥

सारी सुखे वाटून टाकली
     म्हणून झोळी हलकी झाली
सार्‍यांची दु:खे बरोबर घेतली
     मग दुसरी झोळी जड झाली ॥१६॥

चरम सत्य जेंव्हा समजले
     सारे "मी"पण गळून पडले
व्यक्तिमत्वातला अहंपणा
     वृथा असतो मात्र समजले ॥१७॥

तरी "मी" "मला" "माझ्या" "माझे"
     सारे सारे इथे सोडायचे आहे
सारे जग मिथ्थ्या आहे
      हेच अंतिम सत्य आहे ॥१८॥

............श्रीराम पेंडसे