शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

आनंदयात्री

आनंदयात्री


"नमस्कार काका. चालेल ना?"

"नमस्कार. आहेस का? आणि काय चालेल ना?".....मी

"हो. आहे. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल सांगते. मी अनघा अजीत बापट."

"हो.".....मी

"माझी जन्मतारीख २१ जुलै १९८६. मी 'सिस्टीम इंजिनीअर' आहे."

"हो"

"त्याआधी एक. मी तुझी परवानगी न घेता "तुला" असा एकेरीत उल्लेख केला आहे. चालेल ना?"........मी

"हो. मला अनघा म्हणा. बास्स."

"कदचित वयामुळे माझ्या तोंडात 'अहो अनघा' बसणे अवघड आहे.".......मी

"नाही.... ए अनघा म्हणा."

ही माझी अनघा बापट या अजब वल्लीशी झालेली पहिली ओळख. एखादा पारंगत टायपिस्ट टाईप करत असताना शब्द कसे पटापट कागदावर सांडतील तसे ते संगणकाच्या पडद्यावर उमटत होते.

मी नुसताच आपला 'हो का?, अरे वा!, किती मस्त!, सहीच, फारच छान, वा वा वा' वगैरे अर्थहीन पण भावना दाखवणारे शब्द वापरत होतो. एखाद्या व्यक्तीशी माझे पहिल्यांदाच बोलताना असे होते. पण अनघाकडे असल्या शब्दांचा फापटपसारा नाही. कमीत कमी शब्दात संवाद साधण्याची तिची कोकणस्थी हातोटी लक्षात आली. शब्द कमीत कमी आणि रोखठोक असले तरी भावनाहीन नव्हते. मुलायम होते, आश्वासक होते. अर्थात हे कमी शब्द किती फसवे आहेत हे नंतर माझ्या लक्षात आले. फसवे म्हणजे, पुढे मी जेंव्हा तिच्याशी फोनवरून संवाद साधू लागलो तेंव्हा हे लक्षात आलं की ही मुलगी प्रचंड बोलघेवडी आहे. बोलघेवडेपणा आणि बडबड यात फरक आहे. बडबड्या व्यक्तीची बडबड ही अर्थहीन असू शकते. आजच्या तरूणाईच्या भाषेत त्यात "पी.जे." खूप असतात. अनघाच्या लडिवाळ बोलघेवडेपणात अर्थहीन बोलण्याला फाटा असतो. अर्थात नुसते बोलघेवडेपणा असून चालत नाही. ती काही आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरची चर्चा नाही. विचारांच्या लहरी जुळाव्या लागतात. गवयाबरोबरची पेटी गवयाच्या सुरांचा लडिवाळ पाठलाग करू लागली तरच ते गाणे रंगते. तसे विषयांच्या, आवडीच्या तारा जर जुळल्या तरच ते तानपुरे सुरात झंकारतात. तरच त्या गप्पा उत्स्फूर्त होतात. 'चला आता गप्पा मारायला सुरू!' असे म्हणून शिट्टी वाजवून हास्य क्लबमधे जसे हसायला सुरूवात करतात तश्या गपा मारता येत नाहीत. त्या गप्पा उत्स्फूर्तपणे हृदयाच्या गाभार्‍यातून याव्या लागतात. आता काय बोलू असा प्रश्न पडला की समजावे त्या गप्पा नाहीत. संवाद पुढे चालू ठेवण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे. अनघाशी गप्पा मारताना मला आज काय बोलू हा प्रश्न कधीच पडला नाही. नंतरच्या काही संवादात.....

"मी अनघा."

"बोल्".....मी

" अहो काका....."

"थांब. मला काका नको म्हणू ना.".......मी

"मग?"

"आजोबा चालेल्.".....मी

"बरं. तर आजोबा...."

आणि मग आजोबा नातीच्या मानलेल्या नात्याची भन्नाट जमलेली वीण, पुढे फोनवरील आनंददायी संवादातून अधिकच घट्ट होत गेली. आणि अनघा हे अजब व्यक्तीमत्व हळूहळू साकार व्हायला लागलं.

तसा मी माझ्यापेक्षा खूप लहानात रमणारा. अर्थात बाल अणि तरूणाई मला आनंदाने सामावून घेते हे माझे भाग्य. माझे यापूर्वीचे मित्र हे एखाद दुसरा सन्माननिय अपवाद सोडला तर सारेच्या सारे सक्तीचे मित्र ( Compulsary Friends) होते. म्हणजे त्यांचे माझ्याशी काहीतरी काम म्हणून त्यांची माझ्याशी मैत्री. जे मित्र आणि मैत्रिणी (माझ्या वयाला हा जरा धाडसी शब्द आहे नाही का?) मला जीव लावणारे भेटले त्यातली अनघा ही एक शुद्ध शंभर नंबरी सोन्याची मोहोर. कोणाशी आपल्या तारा, आता या वयात आता जुळतील याची खात्री नाही, तरूणाईने दूर सारण्याच्या वयोगटात कधीच प्रवेश केलेला. अशावेळी "ऑर्कुट"वर गाळ उपसताना ही शुद्ध मोहोर सापडली. "ऑर्कुट"वर सर्व काही गाळ नाहीये. पण मी म्हणजे "कचारावाला". म्हणजे ते कचरावाले असतात ना, की जे कचरा शोधतात आणि त्यात उपयोगी काही सापडतय का ते पाहत असतात. तसे ऑर्कुटवर शोधत असताना या आनंदमूर्तीशी परिचय झाला. माहिती वाचून मैत्रीची विनंती केली. मान्य होईल याची खात्री नव्हती. कारण वयात बराच फ़रक असेल अशी अटकळ होती. पण "फ़ारतर काय नाही म्हणेल. मैत्री करणार नाही. मारणार तर नाही!" या माझ्या नेहमीच्या तत्वानुसार मी आपण तिला मैत्रीची विनंती केलीये हे विसरूनही गेलो. आणि एके दिवशी सकाळी "ई टपाल" पाहताना संदेश दिसला. अनघाने मैत्रीची विनंती मान्य केली आहे." "अनघाने तुमच्या स्क्रॆप बुकमधे लिहिले आहे." थोडेसे आश्चर्य वाटले. आणि आनंदही झाला. उत्सुकतेने स्क्रॆप बुक पाहीले. "तुमची प्रोफाईल वाचली. आणि मैत्री कराविशी वाटली." असे तिने लिहीले होते. मनाच्या खोल कोपर्‍यात कुठेतरी एक विचार चपलेतल्या खड्यासारखा बोचत होता की माझ्या मित्रांच्या यादीतले ९०% मित्र अगदी लक्षात ठेऊन संपर्क न ठेवण्यात पटाईत होते. त्यात आणखी एकीची भर पडली तर? विचार थोडा अस्वस्थ करत होता. पण विवेकाने त्यावर बर्‍यापैकी मात केली. विचार केला की खरंच तसे झाले तर आपण काय करू शकणार आहोत? आणि मग मी माझ्या दैनंदिन जीवनात गुरफटून गेलो. आणि अचानक मला अनघा "चॅट"वर भेटली. मग तिथून आमच्या गप्पांची आनंदयात्रा सुरू झाली. गप्पांची मैफल रंगू लागली. आणि त्यातून हे व्यक्तीमत्व प्रकट होत गेलं.

अनघा हे परमेश्वराने तयार केलेले अजब रसायन आहे. परमेश्वराने आपल्या कारखान्यात "अनघा" ही व्यक्ती साकार करताना, चुकून तिच्यात विचित्र आवडीचे, व्यक्तीमत्वाचे काही थेंब जे तिच्यासाठी नव्हते, ते त्याच्या हातून पडले. आणि हे पार्सल पृथ्वीवर पाठवल्यावर त्याच्या लक्षात ही चूक आली असावी. (चूक करण्याची ही परमेश्वरी देणगी आजही बरेच उद्योजक पुढे चालू ठेवताना दिसतात. "जाऊ दे. थोडासा फरक झाला तर त्यात काय होतय. वापरणारा पाहून घेईल." ही एखाद्या उत्पादनाच्या बाबतीतली वृत्ती काय दाखवते?). पण परमेश्वराने स्वतःच तयार केलेल्या 'प्रोग्रामींग" नुसार आता एकदा पाठवलेली व्यक्ती तिच्या कपाळी लिहीलेल्या "Date of Expiry" च्या आत परत मागवणे परमेश्वरालाही शक्य नव्हते. या मुलीला ट्रक चालवायला येतो आणि चालवायला आवडतो, ती आधुनिक युगातली संगणकाचे शिक्षण घेतलेली असूनही तिला शहरी वातावरणापासून दूर खेड्यातच रहायला आवडते, हे या परमेश्वराचे एकाचा "Behavioural Pattern" भलत्याच मशीनला लावून पाठवल्याचे हे उदाहरणच नाही का?

"तुम्ही खूप लवकर विसरता हो. आपण गप्पा मारतो ना? मग माझे डिटेल्स लक्षात ठेवा ना?"

"अग वय झाले ना? आणि तुला तर माहीत आहेच की आज काल विसरायला का होते ते. पण आता नक्की लक्षात ठेवीन."........मी

"तुमचा देवावर विश्वास आहे ना?"

"हो.".........मी

"बरं. मी आता जाते."

'थांब. एक सुचवू का? "........मी

"हो."

"माझ्याशी फोनवर बोलशील का? माझा फोन नंबर आहे ......." .........मी

" थांबा"

नंतर एक मिनीटातच....

"पहा मिस-कॉल आला का ते?"

मला धावपळ करावी लागली. कारण नेहमीच्या माझ्या ढिसाळपणानुसार फोन भलतीकडेच होता. पण मिस-कॉल आला होता.

"हो. आलाय."..........मी

आणि नंतर आमची नेहमीच फोनवर गप्पांची मैफल रंगत गेली. आणि तिच्या व्यक्तीमत्वाचे एक एक कंगोरे उलगडत गेले. अनघाचं व्यक्तीमत्व फणसासारखं आहे. फणस हा एखाद्या साध्या फळासारखा पटकन तोडून खाल्ला असे होत नाही. त्याला काटे असतात. त्याचे गरे काढणं ही एक त्रासदायक प्रक्रिया असली तरी ती कला आहे. पण एकदा का गरे काढले कि मग त्यासारखा निखळ आनंद नाही. गरे खाणे हा एक निर्मळ आनंद असला तरी फार गरे खाणे हेही धोकादायक ठरते. मी अनघाला कोरफडीची उपमा देतो. कोरफड ही जीवनदायिनी आहे. पण कोरफडीला काटेही असतात. त्यामुळे कोरफड ही जपून हाताळावी लागते. तसे अनघा हे काटेरी व्यक्तीमत्व आहे. एकदा का त्या कांट्यावर मात केली किंवा त्या कांट्यानी तुम्हाला बोचायचं नाही असं ठरवलं आणि अनघाने तुम्हाला तिच्या भावविश्वात प्रवेश दिला की मग अनघाशी मैत्री, संवाद, गप्पांची मैफल साधणं, जमणं ही एक आनंदयात्रा ठरते. स्वच्छ निर्मळ वातावरणात वनराईतून, जंगलातून फिरण्याच्या आनंदी अनुभवासारखा हा आनंददायी अनुभव आहे. जंगलातून पुढे पुढे जाताना काय आश्चर्य समोर येणार आहे हे पाहणे नयनरम्य असते, तसे आज अनघा आपल्या पोतडीतून काय काढणार आहे हे ऐकणं हा एक जीव सुखावणारा आनंद आहे. तिच्याशी गप्पांचा आनंददायी अनुभव म्हणजे भीमसेनांच्या मस्त जमलेल्या शुद्धकल्याण किंवा यमनच्या मैफलीसारखा आहे. बहरात असलेल्या सचीनच्या फलंदाजीसारखा आहे. फरक इतकाच की सचीन बहरात येणं किंवा आण्णांची मैफल जमणं यावेळी तुम्ही तिथे हजर असण्याचा योग यावा लागतो. पण इथे तसे नाहीये. मला मैफल जमण्याचा योग येण्याची वाट पहावीच लागत नाही. प्रत्येक गप्पाष्टक जमलेली मैफल असतेच. आणि तिच्या आवाजात तर एक प्रकारचा जादुई नाद आहे. A Hypnotic Quality. एखादी शस्त्रक्रिया करताना भूल देतात. कशासाठी? तर तुम्हाला वेदना जाणवू नयेत म्हणून. तिच्याशी गप्पा, तिचे शब्द आणि तिचा आवाज या गोष्टी मला नेहमीच एखाद्या वेदनाशामकासारख्या वाटत आल्या आहेत. माझ्या मनावर आलेलं दु:खाचं मळभ दूर करण्याची ताकद तिच्या या गप्पात आहे. तिला वेळ नसेल तर ती, "आजोबा, मला आत्ता वेळ नाहीये. आपण नंतर बोलुया का?" हेही अश्या आवाजात आणि शब्दात सांगेल की माझ्यावर तरी त्याच्या परीणाम, भाजलेल्या जखमेवर Soframycin लावल्यावर जसे थंड वाटते तसा होत आलेला आहे. या मुलीच्या विचारांची श्रीमंतीच इतकी जबरदस्त आहे की हिच्याशी संवाद साधण्याचा, तिच्या ओघवत्या अनुभवात रंगण्याचा मला कधीच कंटाळा आला नाही.

अनघाची आणखी एक हल्लीच्या दिवसात दुर्मिळ होत चाललेली खासियत म्हणजे झोकून देऊन काम करणे. एकदा एखादी गोष्ट किंवा काम आपण स्विकारल्यानंतर ते आपण किती वेळ करतोय याचा विचार करायाचा नसतो असे ती मानत असावी असे मला वाटले. चला ६ वाजले. माझी वेळ संपली. मी चालले ही वृत्ती नाही. एक "वर्कहोलिक" या नावाचा समूह असतो. नशेबाजाला दारू नसेल तर अस्वस्थता येते. तशी या मंडळींना काम केले नाही तर अस्वस्थता येते. पण अनघाचे मात्र तसे नाहीये. ती जीव तोडून काम करेल. पण अवाजवी काम करणार नाही. तिच्या सहकार्‍यांना मदत करण्यासाठी ती राब राब राबेल, झटेल, प्रसंगी त्यांचे काम अंगावर ओढवूनही घेईल. पण उगिचच अंधळ्यासारखे काम करत बसणार नाही. सहकार्‍याची अडचण योग्य आणि रास्त असेल तरच ती राबेल, पण एखादा उगीचच टगळ मंगळ म्हणून तिला कामाला लावणार असेल तर ती त्याला त्याच्या "स्टेटस" चा विचार न करता सडेतोडपणे फटकारेल. पण मग ती फटकळ आहे का? एखाद्याला व्यक्तीला ती चुकत असताना ती व्यक्ती चुकते आहे हे रोख ठोकपणे सांगणे - मग जरी ती व्यक्ती अनघाची वरिष्ठ असली तरीही - हा जर फटकळपणा असेल तर मग, हो. ती फटकळ आहे. पण इथेच तिच्या क्षमतेची अजुन एक बाजू दिसते. ही मुलगी अतिशय गोड बोलते. एखाद्याची चूक सडेतोडपणे सांगताना ती त्याचा मानच ठेवेल, असभ्य शब्द तर वापरणार नाहीच नाही. मृदू शब्दात पण ठामपणे आपल्याला काय सांगायचे ते ती सांगेल. आणि ते ऐकणारा जर नीट लक्ष देउन ऐकत नसेल तर त्याला ही आपल्याला झापते आहे, जे चाललय हे तिला अयोग्य वाटतय आणि आवडलेले नाहीये हे कळणारच नाही. इतके तिचे शब्द आणि स्वर फसवा असू शकतो. शब्दाची यथायोग्य निवड आणि स्वर तर इतका मधुर की ऐकणारा तिला नाही म्हणूच शकत नाही. " तू एक महामूर्ख आहेस." हे ती त्या व्यक्तीला सांगतानाही अशा शब्दात आणि स्वरात सांगेल की ऐकणारा " हो. तुझे म्हणणे खरे आहे. आता मी सुधारेन." असे त्याला स्वत:ला कळायच्या आत पटकन म्हणून मोकळा होईल. ती त्या व्यक्तीला तू चुकत आहेस आणि जे करतोयस ते बरोबर नाहिये हे सांगताना ती त्याला हे अशा अतिशय गोड शब्दात सांगेल की त्याला वाटावे की हि आपला सत्कारच करते आहे. इथे त्या व्यक्तीच्या हुशारीची आणि अनुभवाची कसोटी लागते. कारण तिच्या गोड शब्दातून काय शिकायचे आहे हे समजणे ही सुद्धा एक कलाच आहे.

"आजोबा, मी गेले महिनाभार सुट्टीच घेतलेली नाहीये."

"काय?"...........मी

"हो आजोबा. मी महिनाभर सुट्टी नाही घेतलेली. माझा एक सहकारी सुट्टीवर चालला आहे. मग त्याचे काम नको का करायला?"

"पण मग म्हणून सुट्टी नाही?"...........मी

"काय करणार? कोणीतरी काम करायला हवे ना?"

"हो. ते खरं. पण मग तूच का? आणि तुझ्या रत्नागिरिच्या क्लासचे काय?"............मी. ती "मायक्रोसॉफ्ट" चा एक कोर्स करत होती हे मला ठाऊक होते.

"बुट्टी. नंतर बघू. त्याची अडचण आहे तर करायला नको का?"

"पण मग तुझ्या अडचणीला ही मंडळी उभी राहतात का?"...........मी.

"जाउ द्या हो. आपण आपलं काम करत रहायचं."

"अग पण शेवटी शारीरीक क्षमतेला मर्यादा आहेत ना?"..........मी

"असू दे. मी चांगली काटक आहे. आजोबा पहा मी ट्रक ड्रायव्हर आहे. म्हणजे काटक आहे ना?" मी गप्पच झालो.

पण ही मुलगी चटकन रागवतेही. आणि राग व्यक्त करण्याची तिची अभिनव पद्धत म्हणजे ती गप्प बसेल. असेच एकदा गपा मारत असताना ती अचानक गप्प झाली. थोड्या वेळाने माझ्या ही गोष्ट लक्षात आली.

"नुसते मीच बोलतोय. तू काहीच बोलत नाहीयेस. रागवली आहेस का?"..........मी.

"नाही हो. तुम्ही बोला. मी ऐकते. कधी नाही ते तुम्ही बोलता आहात. म्हणून तुम्हाला थांबवले नाही."

"हो का? मला वाटले तू रागवली की काय."...........मी.

" आजोबा, तुम्हाला माहीतीये की मी रागावलेना की एकदम गप्प बसते. शांतपणे बसून राहते. मग ते आईच्याही लक्षत येतं. मग ती सारखी विचारते. मग मी आईला म्हणते कि मला काहीही झाले नाहीये. मी जरा शांत बसते. आणि मग थोड्या वेळाने माझा राग शांत होतो. मग मी परत बोलायला लागते. मग सर्व ओळखतात की गाडी रूळावर आलीये."

"हो.".........मी. आता ऐकण्याची माझी पाळी होती.

"आजोबा आजोबा आज मी जाम खूष आहे.आज मी जे काम हातात घेतलं होतं ना ते माझ्या मनासारखे पूर्ण झाले. आणि वेळेत." आजोबा आजोबा असे ती दोनदा म्हणाली किंवा ऐका नं असे म्हणाली की समजावे कि ती आज जाम खूष आहे आणि संमेलन रंगणार. एखाद्यासाठी त्या व्यक्तीच्या गरजेच्यावेळी, वेळ काळाचे भान न ठेवता, झोप वगैरे विसरून ती राबेल, झोकून देऊन मदत करेल तेंव्हा तिला होणारा आनंद हा तिच्या शब्दातून ओसंडून जात असतो, तिला होणारे अतिव समाधान तिच्या स्वरातून जाणवते. आणि मग त्या स्वरातल्या समाधानाची मलाही साथ पसरल्यासारखी लागण होते. याचा मी अनुभव घेतला आहे. भीमसेनांचं सवाई गंधर्व महोत्सवातलं गाणं जसं नेहमी रंगतच, तसे तिच्याशी बोलणं हा मला नेहमीच आनंद असतो. असे कधीही होत नाही किंवा असे कदापिही होणार नाही कि आज अनुशी गपा नको मारायला. माझ्या मनावर मळभ आले असेल, माझा मूड खराब झाला असेल (जे माझे हल्ली दु:खद घटनेमुळे वरचेवर होत असतं) तर अनुशी गप्पा मारणे हे एखाद्या "ईमर्जन्सी मेडिसीन" सारखे माझ्यावर काम करते. तिला अनु अशी हाक मारायची परवानगी तिने मला दिली आहे.

"वा वा."..........मी

"आजोबा ऐका नं. मनासारखं काम झालं म्हणून मला खूप समाधान वाटलंय."

.....आणि अशाच गप्पांच्या मैफलीतून मला शोध लागला की की अनघा ही उत्तम कविता करते. अतिशय तरल आणि भावूक कविता करणे हा तिचा हातखंडा प्रयोग आहे. तिच्या कवितातून तिची सूक्ष्म निरीक्षणशक्ती जाणवते. विशेषतः मनुष्य स्वभावाचे निरीक्षण करण्याची तिची शक्ती अफाट आहे. ते तिच्या कवितातून जाणवते. शारदेचा वरदहस्त घेउन आलेली ही मुलगी. आम्ही म्हणजे "र"ला "र" आणि "ट" ला "ट" लावणारे. ही मुलगी खरोखरच महान आहे. तिच्या नितांतसुंदर कवितांच्या काही ओळी उदाहरणादाखल देतो. पहा ती काय म्हणते ते :

"हृदयातली स्पंदनं मोजायची नसतात । त्याच्यातली थरथर हृदयात साठवायची असते"

"त्याच्यातली नि:शब्दता जाणून घ्यायची असते।स्पर्शातले हितगुज शब्दात तोलायचे नसते" किंवा ही कविता पहा:

"प्रत्येक वळणावर एक नवीन मैत्री घडत असते।पुढचं वळण वळेपर्यंत ओळखही विसरून गेलेली असते ॥"

या अजब रसायनात परमेश्वराने अध्यात्माचाही एक थेंब टाकलेला दिसतो. ही मुलगी देव वेडी नाही. समज यायच्या वयात देव आहे असेन मानणारी. पण जीवनाच्या एका टप्प्यात काहीतरी घडते आणि देव आहे, असे वाटू लागते. तसे काहितरी घडले असावे का? माहीत नाही. पण यामुलीवर अतिशय चांगले संस्कार आहेत. आणि संस्कार शेवटी कसे होतात तर आइ वडिल, मोठे बहिण भाऊ वगैरे यांच्या वागणूकीतूनच होतात ना? यामुलीच्या अध्यात्मिक बैठकीला तिच्यावरचे माता पित्याचे संस्कार कारणीभूत आहेत असे मला वाटते. ही मुलगी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी शुबंकरोती, रामरक्षा, मारूती स्तोत्र म्हणते, जवळ्च्या मंदीरात आठवड्यातून तीन वेळा जाते. गुरूचरित्राच्या पारायणाला बसायला आवडतं. पण देवाच्या मागे लागणार नाही. कारण देव देव करायचे असेल तर ते व्यवस्थित, नीट , साग्रसंगीत आणि वेळेत व्हायला पाहिजे अश्या ठाम मताची ती आहे.

तर अशा, विचारांचे सॊंदर्य आणि शब्दांचे माधुर्य असलेली अचाट बुद्धीमत्तेची, ही अफ़ाट गुणवान मुलगी. एक एक शब्द तर फ़णसाचा रसाळ गरा. तिची बोलण्याची पद्धत आणि शब्द निवड हे तिच्यावर तिच्या आई-वडिलांनी केलेले संपन्न संस्कारच दर्शवतात. तिच्यावर सुसंस्कार करणारे तिचे आई-वडिल हे तर महानच. विहिरीत पाणी भरपूर आहे. पण ते बादलीत आले नाही तर त्याचा उपयोग काय? जशी विहिरीतले पाणी भरून घेण्याची बादलीची क्षमता महत्वाची. तसे ते संस्कार आपल्यात भिनवणे, त्याप्रमाणे आचार विचार असणे हे मानणे महत्वाचे. आणि म्हणून हे संस्कार आपल्यात भिनवून घेणारी, त्या संस्काराप्रमाणे आचरण ठेवणारी अनु ऊर्फ अनघा ही तितकीच महान. आणि अश्या गुणवान मुलीची ओळख असणे हे भाग्यच. त्यातून आजोबाच्या जवळीकीचे नाते तिने जोडणे हे परमभाग्य. अणि ही दोन्हीही भाग्ये माझ्या वाट्याला आली आहेत. जंगलातून, हिरवाईतून जाणारी पाउलवाट ही निरागस, निर्व्याज बालमैत्रिणीसारखी असते. तिथे हेवेदावे, मानापमान, वैयक्तिक फ़ायदे यांना स्थान नाही. पुढे या पाउलवाटेचे "हायवे"मधे कधी रूपांतर होते ते समजत नाही. आणि मग ती पाउलवाट पुन्हा काही सापडत नाही. आज या "हायवे"च्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करताना अनुने ज्या सहजतेने आजोबा-नातीचे नाते जोडलय त्यामुळे ही पाउलवाट मला पुन्हा सापडल्यासारखे वाटले. ही सहजता, निरागसता ठरवून आणता येत नाही. त्यासाठी खोलवर मनात, मनाच्या तरल सूक्ष्म पातळीवर मायेचा ओलावा असावा लागतो. आणि तो आहे असे मला वाटले. तिची ही निरागसता, निर्व्याजता अखंड राहो. अशा या माझ्या नातीला उदंड, आनंदी, यशस्वी दीर्घायुष्य मिळो. तिच्या आयुष्याचे तानपुरे सतत सुरात झंकारत राहोत आणि हे मानलेले आनंदी नाते चिरकाल टिकून राहो अशी, मी या विश्वाचे नियमन करणाया शक्तीकडे मनापासून प्रार्थना करतो. पु. ल. देशपाडे यांचे शब्द जसेच्या तसे वापरून मी म्हणतो की,

"केवळ वयाची वडिलकी याखेरीज जवळ काहीही नसताना इतकाच आशीर्वाद द्यायचा,गुणवंत हो, मोठी हो, यशस्वी हो, मुली औक्षवंत हो!"

ॐ तस्सत्

श्रीराम पेंडसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा