रविवार, २५ एप्रिल, २०१०

कान्हा व्याघ्र प्रकल्प आणि भेडाघाट सहल

प्रास्ताविक :

...............तीन महीने आधी ठरवलेल्या आणि बुक केलेल्या ट्रीपला जायचा दिवस उजाडला. माझी पांच वर्षाची नात आभा जशी सगळ्यांना उत्साहाने सांगत सुटते, तसे माझे आख्या जगाला सांगून झाले होते की ट्रीपला चाललोय. फक्त वर्तमानपत्रात नोटीफिकेशन द्यायचं तेव्हढं बाकी होतं. माझी लेक अनु आणि इतर सर्व मानलेले बहीण, भाऊ, नाती आणि लेकी एका सुरात सांगत होते की, "जपून जा. दगदग करू नका." माझी अत्यंत जिवलग आणि सख्खी मैत्रिण "सखी", तर सारखी सांगत होती की, "श्री, जास्त तडतड नको रे करूस. शहाणपणा करू नकोस. आता तुझे वय नाही धावपळ करायचे. जपून जा. औषधे सगळी नीट घेतलीस ना? कुठे धडपडू नकोस बाबा. संभाळून रहा. तू तसा व्यवस्थीत आहेस रे. पण तू परत येईपर्यंत उगाचच काळजी." अश्या शब्दात बजावत होती. तिला माहित होते की हा तिचा मित्र किती वांड आणि धडपड्या आहे ते. म्हणून तर तिच्या सुरात काळजी होती. वास्तवीक काळजी करण्याचे कारण नव्हते. आज पहिल्यांदा का जात होतो. यापूर्वी याच "इन सर्च" बरोबर दोन ट्रीपा केल्या होत्याच की. पण मला या उद्गारामागे कळकळ दिसत होती, आपुलकी जाणवत होती. माझ्यासारख्या कारण नसताना धडपडणार्‍या माणसाबद्दलची आस्था, काळजी दिसत होती. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्याच रविवारी माझ्यावर ही ट्रीपच मुळी रद्द करावी लागते की काय असा प्रसंग आला होता. मला स्कूटरचा अपघात झाला. मानवी मन पहा कसे असते ते. मी पडल्यावर, मला कोण उचलणार, काय आणि कुठे लागलय, स्कूटरला काय झालय याच्याही आधी सर्वप्रथम डोक्यात वीजेसारखा विचार चमकून गेला की आता ट्रीप बोंबलली. आजूबाजूला दोन चार लोक जमले. त्यांनी उठवलं. उठून उभा राहीलो. दोन चार पावले स्वतःच्या पायावर चाललो. आणि मनाने टुणकन उडी मारली. चालता येतय म्हणजे फ्रॅक्चर नाही. म्हणजे ट्रीप जमणार. स्कूटरला आणि मला कुठे लागलय ते सावकाशीने बघता येईल. पण चला ट्रीप तर वाचली! माझी मुलगी अनु आणि मला जीव लावणारे माझे मित्र, मैत्रिणी, बहीणी, नाती की जे सर्व हाताच्या बोटावर मोजण्या इतके निघतील, त्यांच्या मानसिक पाठबळरूपी ईश्वराच्या कृपेने धडधाकट त्या अपघातातून बचावलो आणि ३ मार्चला दुपारी ठीक ३ वाजता पुणे स्टेशनवर घड्याळाखाली येऊन दाखल झालो...............

३ मार्च, २०१० :

...............ट्रीपला येणार्‍यांचा सुरूवातीचा आकडा १३ होता. तो जणू अशुभ असावा म्हणून की काय गळत गळत ८ वर आला. आणि आम्ही आठ जण पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या घड्याळाखाली जमलो. मागच्या रणथंभोरच्या ट्रीपचा अनुभव कुठेतरी मेंदूत टोचत होता. म्हणजे ट्रीप कशी होईल याबद्दल मुळीच शंका नव्हती. ट्रीप कशी जाईल याची मनात कुठेतरी टोचणी होती. दांडेलीच्या ट्रीपमधले श्री कुलकर्णी सोडल्यास ओळखीचे कोणी नव्हते. आणि आम्ही दोघे सोडल्यास बाकी सर्व महिलामंडळ होते. त्यामुळे कसे, किती जमेल वगैरेचा अंदाज शून्य होता. अनोळखी व्यक्तींबरोबर प्रवास करणे म्हणजे एखादी लॉटरी लागण्यासारखे असते. जर तुम्हाला ही लॉटरी लागली नाही तर मग प्रवास हा एकट्यानेच केल्यासारखा होतो. अर्थात ग्रुपने जात असताना ग्रुपमधल्या इतर सर्वच जणांच्या बाबतीत ट्युनींग जमत नाही असे सहसा होत नाही. त्यामुळे ट्रीप अगदीच बोअर होत नाही. अश्या प्रवासात खूप ओळखीचे किंवा नातेवाईक असतील तर गाडी सुटली तरी गपा सुरू होत नाहीत. आणि झाल्याच तर त्या आपल्या कुटुंबाच्या कोषात अडकून पडतात. ते Gym मधे कसे एक Cycling Equipement असते की जिथे जीव तोडून पॅडल मारत राहता, पण सायकल एक मिलीमीटरसुद्धा पुढे सरकत नाही. तश्या प्रवासातल्या नातेवाईकांबरोबरच्या गप्पा या, वैयक्तीक हेवेदावे, "अमुक अमुक कशी नीट वागत नाही, आणि तिचा नवरा कसा बाईलवेडा आहे, अगदी बायकोच्या पदराखाली आहे हो", वगैरे वगैरेच्या कुटुंबकोषातून कधी बाहेर पडतच नाहीत...............

..............आज संकष्टी चतुर्थी होती. बरोबर काही आणले नव्हते उपास सोडण्यासाठी. डायनिंगवाला विचारायला आलाच नाही. मग महिलामंडळापैकी कोणीतरी मला सामावून घेतले. प्रवासाला जाताना बायकांना थोडेसे जास्त खायचे आणायची सवय असते. ते पथ्यावर पडले. ती पुरीभाजी खाल्ली आणि तो डायनिंगवाला आला विचारायला की "खाना लाऊं क्या साब?" काय सांगणार त्याला? आमचं टायमिंग असेच चुकते नेहमी. एखादी गोष्ट हवी असते तेंव्हा मिळत नाही, आणि गरज नसताना चार चार जण विचारतील की आपल्यालाच खरच आपण नसतानासुद्धा फार व्हीआय.पी. असल्यासारखे वाटायला लागते. पण इतक्या प्रेमाने त्याने विचारले म्हणून मग त्याच्याकडून दहीभात घेतला. नंतर झोप येईना. वास्तवीक माझे रेल्वेत असे होत नाही. मला झोप लागते. मला प्रचंड आवडते रेल्वे गाडीच्या डब्यात झोपायला. आणि त्यातून जर ए. सी. असेल तर मग सर्व कसे "आहा!!! काय सुख!" असे असते. पण आज काय झाले होते काही कळेना. एकटा होतो म्हणूनही असेल कदचित. नंतर पं राजन साजन मिश्रा यांचा भन्नाट जमलेला शुद्धकल्याण ऐकून झाला. तरीही काही जमेना. मग माझी एक मानलेली पण अतिशय लाडकी नात - अद्विका - जी मुंबईत असते, तिला फोन लावला. गप्पा मारल्या. मन:स्थितीची लेव्हल थोडीशी वाढली. साडेबारा वाजून गेले. झोप काही येईना. आणि माझी ही मनस्थिती जणू ओळखल्याप्रमाणे सुमेधा उर्फ सुमाचा फोन आला. सुमेधा ही मुंबईत गोरेगावला राहणारी माझी मानलेली बहिण. अतिशय सहजतेने तिने हे नातं जोडलय. सख्खी बहिण काय करेल अशी तिची माझ्यावर माया आहे. वय विसरून ती माझ्याशी दिलखुलास गप्पा मारते. तिची वैचारीक पातळी ही खूपच उच्च आहे. त्यामुळे ती माझ्या मानसीक पातळीपर्यंत खाली येऊन गप्पा मारते की की मी तिच्या वयाच्या पातळीपर्यंत खाली जातो हे सांगणे अवधड आहे. ट्युनिंग जमलय हे मात्र खरं. मला वाटते की या मुलीला मन वाचण्याची कला अवगत असावी. तिला माझ्या मनाची Vibrations समजतात. सतारीची ताणलेली तार झंकारायला लागते तशी माझ्या मनाची तार Vibrate व्हायला लागली की ती शांत करण्याची क्षमता तिच्या गप्पात आहे. माझ्या जिवलगाच्या व्याख्येप्रमाणे माझ्या मनाचे तरंग तिला न सांगताच समजण्याची ताकद तिच्यात आहे. खरंतर माझ्याशी रक्ताचे नाते नसलेल्या अशा या काही जणी आहेत. जागेआभावी फक्त नमुन्यादाखल इथे काहींचे उल्लेख करतो. वयातला फरक बाजूला ठेवून, त्यांना त्यांच्या विचारधारेला जे भावलं, त्यांच्यावरच्या त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या संस्कारात जे बसलं, त्यांच्या मनाला जे नाते पटलं ते जोडून त्या माझ्या जिवलग झाल्या आहेत. डेरवणची अनघा आणि मुंबईतली वर सांगितलेली अद्विका या नाती, आत्ता जिच्याबद्दल बोललो ती सुमेधा जी मला भाऊ मानते, माझी मुंबईतली बहीण निलीमा की जिच्याशी पहिल्या दिवसापासून सख्ख्या भावासारखी वेव्ह लेंग्थ जमली आहे पण गप्पा मात्र लेखी झाल्या असल्या तरी भरभरून झाल्या आहेत, मला वडिल मानणारी अमेरिकेतली प्राजक्ता की जी माझ्यावर माझ्या सख्ख्या मुलीप्रमाणे प्रेम करते. फक्त ही हजारो मैलावर असल्याने प्रत्यक्ष गप्पा खूप कमी झाल्या असल्या तरी लेखी गप्पा मनमुराद आणि अमर्याद झाल्या आहेत. आणि शेवटी, अगदी सुरूवातीला जिचा उल्लेख आला आहे ती रसिका उर्फ "सखी" ही अत्यंत जिवलग सख्खी मैत्रिण. माझ्यावर मनापासून प्रचंड माया करणारी, जिवाला जीव लावणारी. या सगळ्यांशी मी मनापासून मनमुराद गप्पा मारल्या आहेत. काय ॠणानुबंध आहे हा? माझ्यात असे काय खास आहे की या सर्व जणींनी माझ्यावर इतका जीव लावावा? खरंतर काहीही नाहीये. मी अगदी सामान्य माणूस आहे हो. नातेवाईकांच्या बाबतीत तर मी मुळीच श्रीमंत नाही. आणि मित्रांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आयुष्यात सतत कंपलसरी मित्रांचीच सवय लागलेली. माझ्याशी कोणी चांगला बोलायला लागला, प्रेमात वागू लागला की समजावे काहीतरी माझ्याकडून हवय. हीच सवय आयुष्यभर लागलेली. पण इथे हे असं कधीच नव्हतं. या सर्वजणींनी माझ्यावर भरभरून प्रेम केलय, माया केली आहे. मला पडलेले हे एक कोडे आहे की हा कोणता अनामिक ऋणानुबंध आहे? याचे उत्तर मला कधीच सापडलेले नाही. कधीच सापडणार नाही. आणि खरंतर शोधण्याचा मी प्रयत्नही करणार नाही. कारण या सर्वांचे माझ्यावर निर्व्याज प्रेम आहे, निखळ माया आहे. आणि त्याला भलतीच उत्तरे शोधायचा प्रयत्न करून ती माया, ते प्रेम हिणकस नाही करायचे मला. माझ्या मनावर आलेले दु:खाचे सावट कमी करण्यात यांचा खूपच मोठ्ठा वाटा आहे हे उघड सत्य आहे. त्यामुळे ही मानलेली नाती मला सख्ख्या नात्यांपेक्षा नेहमीच भावत आली आहेत. आनंददायी वाटली आहेत. या मानलेल्या नात्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक स्वार्थ कधीच गुंतलेला नसतो. हा आर्थिक स्वार्थ, ते इस्टेटी वाटणीचे घोळ हेच नेहमी मानसिक कटकटींचे व दु:खाचे कारण असते. या आर्थिक हव्यासापोटी नेहमीच नातेसंबंध ताणले जातात, तुटतात असे माझे ठाम मत आहे. पण मानलेल्या नात्यात असा फालतूपणा कधीच नसतो आणि म्हणून मानलेली नाती नेहमीच सच्ची, शुद्ध आणि आनंददायी असतात. असो. तर सुमेधाचा फोन झाला आणि नंतर झोपेच्या प्रयत्नांना यश आले. अर्थात झोप लागता लागता एका गोष्टीची मात्र अजिबात कल्पना नव्हती की उद्या महिलामंडळातल्या एका आनंदयात्रीशी ओळख होणार आहे, गप्पांची भन्नाट मैफल जमणार आहे, भीमसेनांच्या "सवाई"मधल्या जमलेल्या आनंददायी तोडी सारखी...............

४ मार्च :

...............गाडी बराच बेळ थांबल्याने जाग आली. मोठे स्टेशन होते. मला वाटते ईटारसी होते. सगळा डबा गुडुप होता. पाय मोकळे करावेत, चहाचा शोध घ्यावा म्हणून खाली उतरलो. आमच्या सर्वांच्या जागा एकाच डब्यात नव्हत्या. इतरांना भेटावे म्हणून दुसर्‍या डब्यात गेलो. आणि अलिबाबाच्या गुहेतला खजिना असल्यासारखे हे आनंदाचे झाड भेटले. आणि ते म्हणजे आमच्या ग्रुपच्या मेंबर डॉ. अनुराधा तारकुंडे. खूप भटकंती केलेल्या या आनंदयात्रीला भटकंतीबरोबरच गप्पांचे प्रचंड वेड. मनापासूनच्या गप्पाना ओळखीची गरज नसते हे सिद्ध करणारा उत्साह. त्यांचे अनुभव त्यांच्या भटकंतीचे किस्से ऐकता ऐकता जबलपूर कधी आले ते कळलेच नाही. आणि अनुराधाताईंशी गप्पा मारणे हा एक निखळ आनंद आहे हा साक्षात्कार झाला. अनुराधाताईंशी गप्पाष्टक जमणार आणि उरलेली ट्रीप भन्नाट जाणार याची ही नांदीच होती. हॉटेलवर साधारण १०.३० पर्यंत पोहोचलो. नास्ता, फ्रेश होणे, अंघोळ, दुपारी १.३० ला जेवण आणि एकामेकांच्या ओळखी, आणि नंतर थोडीशी विश्रांती घेउन दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध भेडाघाटला जायला निघालो. इथे संगमरवराचे डोंगर आहेत. दोन डोंगरांच्यामधे एक नैसर्गिक घळ तयार झाली आहे. त्या घळीतून नर्मदा नदी वाहते. नदीचे पाणी संथ आहे. नदीचे पात्र साधारण १५० फूट रूंद असावे. या नदीच्या पात्रातून साधारण एक कि.मी.ची चक्कर मारून आणतात. घाटावरून जिथून निघतो तिथे पात्र साधारण ६०/७० फूट खोल आहे. आणि पुढे पुढे त्याची खोली वाढत जाते. ती खोली जवळ जवळ ६०० फूट इतकी असते. ही चक्कर तास दीड तासाची होते. तर असे आम्ही निघालो. दोन्ही बाजूने उत्तुंग वर गेलेले संगमरवरी खडक प्रतल अणि त्यावर पडलेली सूर्यकिरणे हा प्रकाशाचा खेळ खूप मजेदार दिसत होता. आपण असे समजतो की संगमरवर सामान्यपणे पांढरेच असते. पण इथे आपल्याला, पांढर्‍याच्या बरोबर निळा, काळा, पिवळा, सोनेरी, गुलाबी, हिरवा, राखाडी अश्या अनेक रंगांचे संगमरवर पहायला मिळते. आणि हे संगमरवराचे डोंगर माहिमच्या हलव्याच्या स्लॅब एकमेकांवर ठेवल्यासारखे दिसत होते. भूगर्भशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर ही घळ Weathering पेक्षा Plate Formation मुळे झालेली होती. आणि त्यामुळे संगमरवराचे प्रतलांचे पातळ स्लॅबसारखे तुकडे एकामेकांवर रचून ठेवल्यासारखे दिसत होते. एखाद्या खोपटातल्या पुस्तकाच्या दुकानात जागेच्या कमतरतेमुळे निरनिराळ्या आकाराची पुस्तके कशी वेडीवाकडी रचून ठेवलेली असतात. त्या पुस्तकांकडे पाहील्यावर वाटते की एखादे मधले पुस्तक काढून घेतल्यावर सर्व चळत गडगडत खाली येईल तसे या एकामेकांवर रचल्यासारख्या दिसणार्‍या प्रतलांकडे पाहून वाटत होते. या प्रतलांकडे पाहील्यावर निरनिराळे आकार दिसल्याचा भास होत होता. एखाद्या विशीष्ट कोनातून पाहील्यावरच असे आकार दिसत असत. दृष्टीभ्रमाने कसे निरनिराळे भास होतात तसा हा प्रकार होता. या आकारात एखादा साधू बसल्यासारखे, तर कुठे तीन चेहेरे तर कुठे मोटरगाडी उलटी पडल्याचा भास होत होता. या ठिकाणी बर्‍याच हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे अशी आमच्या गाईडने माहीती दिली. साधारण पाऊण तासानंतर परत फिरलो. होडीतून उतरल्यावर चहा झाला आणि माग आम्ही तिथून धुवाधार फॉल्स पाहायला गेलो................

...............जबलपूरजवळच एक ५/६ कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे. नर्मदेच्या पात्रात सुमारे ५० फूट खोल असा ड्रॉप आहे. त्याने हा धबधबा तयार झाला आहे. तिथे रिलायन्सने त्यावरून जाणारी केबल कार उभारली आहे. पण या धबधब्यापर्यंत अगदी जवळ पायी जाता येते.या धबधब्याची मजा अशी की अगदी जवळ जाईपर्यंत तो कळतच नाही. आवाजही कमी येतो. त्या पाण्याच्या जोरामुळे तिथे थंडावा आला होता. अंगावर पाण्याचे तुषार छान उडत होते. पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. मधलेच पाणी हिरव्या रंगाचे दिसत होते. पण ते पाणी फक्त खाली पडेपर्यंत. नंतर नेहमीसारखे पांढरे शुभ्र फेसाळलेले दिसायचे. ते ज्या खडकावरून पडत होते त्या खडकाचा कोन आणि पाण्याचा जोर यामुळे हा रंगाचा मनोहर खेळ झाला होता. खूपच छान दिसत होते ते दृश्य. तिकडे सूर्य पश्चिमेकडे झुकत असताना या धबधब्याचे जे पाणी पुढे वाहत होते त्यावर त्याचे किरण पडले होते आणि पाण्याऐवजी वितळलेले सोने वाहत जात आहे की काय असा भास होत होता. त्याच ठिकाणी पुढे सनसेट पॉईंट होता. सूर्य अस्ताला जात होता. त्यामुळे या सनसेट पॉईंटवर सूर्यास्त बघायला गेलो. सामान्यपणे सर्व सनसेट पॉईंटवरून जसा सूर्यास्त दिसतो तसाच दिसत असला तरी इथे फरक असा होता की सुरूवातीला प्रवाही रुप्याच्या रसासारखे दिसणारे पाणी हळू हळू सूर्य खाली जात असताना त्याचे सुवर्णरसात रूपांतर झाले. सूर्य अजून खाली गेल्यावर त्याचे तांबड्या लोहरसात रुपांतर झले आणि शेवटी सूर्य पूर्ण अस्ताला गेल्यावर ते पाणी एकदम साध्या पाण्यासरखे दिसायला लागले. ही सारी दृश्ये कॅमेरा आणि मन यात साठवत परत फिरलो...............

...............परतीच्या वाटेवर एका डोंगरावर "चौसष्ट योगिनी" चे मंदीर आहे. ते पहायला गेलो. फक्त मी आणि अनुराधाताई असे आम्ही दोघेच जण गेलो. आम्हालाच प्रचंड उत्साह ना!!! बाकी सगळे बसमधे बसून होते. साधारण पुण्यातल्या पर्वती इतक्या उंचीची ती टेकडी आहे. जवळ जवळ दीड एकशे पायर्‍या चढून जावे लागते. माहोल सगळा पर्वतीच्या मंदीरासारखाच आहे. हे मंदीर सुमारे इ.स. १००० च्या सुमाराला बांधले गेले असावे. याला मदनपूर देऊळ पण म्हणतात. या देवळाच्या सभोवती एक वर्तुळाकार भिंत आहे आणि त्यात चौसष्ट कोनाडे आहेत. दुर्गा हे शंकराचे स्त्री रूप समजले जाते. देवीची एकंदर आठ रूपे आहेत असे मानतात. त्यांना अष्टशक्ती असेही म्हणतात. आणि या प्रत्येकीच्या आठ दासी की ज्यांना योगिनी म्हणतात. म्हणून योगिनीची चौसष्ट रूपे आहेत असे मानले जाते. आणि त्या वर्तुळाकार भिंतीतल्या कोनाड्यात या चौसष्ट योगिनीच्या मूर्ती आहेत. या मूर्ती उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत आहेत. बहुतेक चार हाताच्या मूर्ती आहेत. आणि या मूर्तींच्या मुळे या देवळाला " चौसष्ट योगिनी मंदीर" असे नाव पडले आहे. या परिसरातल्या मुख्य देवळात शंकर पार्वतीची नंदीवर आरूढ झालेली मूर्ती आहे. ही अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे. माझ्या माहितीप्रमाणे ही अशी नंदीवर आरूढ झालेली शिव-पर्वतीची एकमेव मूर्ती आहे. हे गौरी शंकराचे मंदीर इ. स. ११५५ मधे कलचौरी राणी अल्हणदेवी हिने आपला पुत्र नरसिंहदेव याच्या सत्तेच्या काळात बांधले. या मंदीराच्या सभागृहाच्या बाहेर एक शिलालेख आहे. त्यावर असा उल्लेख आहे की "महाराजा विजयसिंग (इ. स. ११८०-११९५) याची आई महाराणी गोसलदेवी दररोज इथे दर्शनाला येत असे." आता त्या मंदीराच्या गाभार्‍याचाच भाग फक्त उरला आहे. अंधार पडला होता. खाली उतरलो ते एक आनंद मनात साठवून आणि दुसरीकडे थोडीशी हुरहूर मनात ठेवून की जे आले नाहीत त्यांची एक अप्रतिम शिल्प पाहण्याची संधी हुकली. संध्याकळी परत आल्यावर विश्रांती, जेवण हे नित्य नेमाचे कार्यक्रम पार पडले. नेहमीप्रमाणे सुमाचा फोनही झाला. आणि उद्या सकाळी ५ वाजता उठायच्या तयारीने निद्रादेवीची आळवणी करत झोपलो. सकाळी ६ वाजता कान्हा किसलीला जाण्यासाठी निघायचे होते...............

५ मार्च :

...............ठरल्याप्रमाणे ठीक ६ वाजता कँटरने हॉटेल सोडले.सकाळी निघताना चहारूपी पेट्रोल शरीरात भरले होतेच. निघताना बरोबर पॅक्ड नाश्ता बरोबर घेतला होताच. ८.३० च्या सुमाराला एका गावात चहाची टपरी पाहून नाश्त्यासाठी थांबलो. हे एक महत्त्वाचे पोटकर्म पार पडले. आणि पुढे निघालो. वातावरण छान थंड होते. आणि ९.३० च्या सुमाराला कान्हापाशी पोहोचलो. आम्ही जाणार होतो त्याला किसली गेट म्हणतात. त्या आधी एक गेट आहे. त्याला खटिया गेट म्हणतात. कारण त्याच्याजवळचे गाव आहे त्याचे नाव खटिया. त्या गावाच्या नावावरून त्याला खटिया गेट नाव पडले. आज सकाळी कान्हा जंगलात सफारीचा कार्यक्रम नव्हता. म्हणून मग हॉटेलमधे लगेच न जाता तिथेच थोडेशी पायी भटकंती करायचे ठरवले. त्या गेटपासूनच्या जवळच जंगलात जाणारी पायवाट होती. त्या पायवाटेने जायला सुरूवात केली. इन सर्चचा प्रतिनीधी आणि आमच्या सहलीचा प्रमुख शौरी सुलाखे हा अत्यंत हुशार माणूस. हरहुन्नरी व्यक्तीमत्व. प्रचंड हिंडलेला हा. निरनिराळ्या वनस्पतींची माहिती सांगत होता. पक्ष्यांचे आवाज आणि त्यावरून कोणता पक्षी ते समजावून देत होता. या जंगलात साल आणि सागाची भरपूर झाडे आहेत. काही शिसवीची झाडे पण दिसतात. ऐनाची पण झाडे दिसली. ऐन ओळखण्याची खूण म्हणजे त्याची साल ही मगरीच्या पाठीसारखी दिसते. साल वृक्षाचे लाकूड हे अत्यत कठीण असते. या लाकडापासून रेल्वेचे स्लीपर्स बनवले जातात. म्हणून ब्रिटीशानी, त्यांच्या काळात याची प्रचंड प्रमाणावर लागवड केली. आणि ते लाकूड इंग्लंडला स्लीपर्स बनवण्यासाठी नेले. मगाशी सांगीतलेले ऐनाचे लाकूड बांधकामासाठी वापरले जाते. तेंदूची झाडे पण दिसली. तेंदूची पाने विड्या बनवण्यासाठी वापरली जातात. त्या झाडाच्या खोडावरपण मगरीच्या पाठीसारखी नक्षी असते. पण ऐनाच्या खोडाच्या मानाने ती नाजूक असते आणि ते खोडपण आकाराने लहान असते. आज आम्हाला काही पक्षीपण पहायला मिळाले. त्यात काळ्या मस्तकाचा हळद्या (Black Hooded Golden Orial), सुतार (Woodpecker), लांब शेपटीचा कोतवाल (Racket Tailed Drango), हिरव्या रंगाचे कबुतर, वेडा राघू, टिटवी वगैरे बरेच पक्षी पाहीले. काही वनस्पती या दुसर्‍या झाडवर जगणार्‍या असतात. त्यांना Parasite म्हणतात. आम्ही तिथल्या झाडांवर काही Parasite पाहीले. ते ऑर्किड्स होते. साधारण एक दीड किलोमीटर चक्कर मारली. सूर्य बर्‍यापैकी वर आला होता आणि त्याने आपले भाजण्याचे काम करयला सुरूवात केली होती. म्हणुन मग आम्ही परत फिरलो आणि ११.३० च्या सुमाराला मोगली रिसॉर्ट या आमच्या नियोजीत हॉटेलवर आलो. खोल्या छान होत्या. हॉटेलचा परीसर खूप मोठा होता. भरपूर झाडीनी वेढलेल्या दोन दोन ब्लॉक्सच्या छोट्या बिल्डिंगा जंगलात राहील्याचे वातावरण निर्माण करत होत्या. अंघोळ जेवण आणि विश्रांती उरकून दुपारी २.३० च्या सुमाराला कान्हा जंगलाच्या पहील्या सफारीवर निघालो. इथे पण तुम्हाला जिप्सीने जावे लागते. बरोबर वनविभागाचा गाईड असतो. वनखात्याची परवानगी वगैरे सोपस्कार उरकून किसली गेटमधून वृक्ष, झाडी प्राणी यांच्या जादुई दुनियेत प्रवेश केला................

...............१९३० च्या सुमाराला कान्हाचे जंगल हे साधारण दोन विभागात होते. २५० चौ. कि.मी. चा हॅलॉन विभाग आणि ३०० चौ. कि.मी चा बंजर विभाग. १ जून १९५५ रोजीकान्हाचे जंगल हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषीत केले गेले. आणि कान्हा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती होऊन हा कान्हा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जाऊ लागला. हे राष्ट्रिय उद्यान सुमारे १९०० चौ. कि.मी. वर पसरलेले आहे. त्याचे दोन विभाग आहेत. एक म्हणजे कोअर विभाग आणि दुसरा म्हणजे बफर विभाग. कोअर विभाग हा सुमारे ९४० चौ. कि.मी. आहे्. हा संपूर्ण आरक्षित असून सर्व सामान्य नागरिकांना तेथे जाण्यास बंदी आहे. हा कोअर विभाग जैविक कटकटींपासून (Biotic Disturbances) मुक्त आहे. हे संरक्षित क्षेत्र पट्टेरी वाघांसाठी (Royal Bengal Tiger) प्रसिद्ध आहे. इथे सध्या सुमारे ८९ वाघ आहेत. म्हणून हा भाग राष्ट्रिय व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या भागाला वेढणारा भाग म्हणजे बफर झोन. हा सुमारे १००० चौ. कि. मी. असून याचा जवळ जवळ ४०% भाग जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलातही आम्ही सुरूवातीला पाहिलेली ऐन, साल, साग, तेंदू ही झाडे होतीच. या जंगलात गवताळ प्रदेशाचे काही तुकडे आहत. खूप मोठे मोठे गवताळ प्रदेशाचे भाग हे या जंगलाचे वैशिष्ट्य आहे. कान्हाच्या जंगलात बारशिंगा (Indian Swamp Deer) सापडतो. हा बारशिंगा फक्त इथे कान्हातच सापडतो. निरनिराळ्या वाटांनी २ ते अडीच तास फिरलो. मोर, हरणे, गवा, सांबर बघायला मिळाले. वाघोबाने मात्र हुलकावणी दिली. उद्या अजून दोन सफारी बाकी होत्या. मागच्यावेळी रणथंभोरला पहिल्या फटक्यात वाघ दिसला तसे आत्ता दिसेल ही मुळीच अपेक्षा नव्हती. खरं तर वाघ दिसणं हा खूपच नशिबाचा भाग आहे. वाघाच्या गळ्यातल्या ट्रॅकर बेल्टच्या सहायाने वाघाचा ठाव ठिकाणा समजू शकतो. तरीही तो पहायला मिळेल याची खात्री नाही देता येत. अखेरीस तो वन्य प्राणी आहे. पाळिव प्राणी नाहीये. त्यामुळे माणसाचे कायदे कानू त्याला लागू नाहीत. तुम्हाला तो सारखे सारखे दर्शन द्यायला नट किंवा नेता थोडीच आहे? की चला आज पुण्याचे लोकं येणार आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना सहज दिसेल अश्या ठिकाणी जाऊन बसूया !!! वाघ काही तुमच्या चेहेर्‍यावरचे आश्चर्यमिश्रीत भाव पाहण्यासाठी येत नसतो. तो जंगलचा अनभिषिक्त सम्राट आहे. वाघ हा निशाचर प्राणी. तो रात्रभर हिंडतो. आणि दिवसा सावली पाहून विश्रांती घेणं पसंत करतो. संध्याकाळी पाणवठ्यावर पाणी प्यायला आणि भक्ष्य सापडेल या आशेने तो तिथे येतो. वाघाचे जंगलात वावरण्याचे क्षेत्र ठरलेले असते. तो त्याचे हे क्षेत्र सोडून दुसर्‍या क्षेत्रात सामान्यपणे जात नाही. त्याच्या हालचालींचा मार्गही बर्‍याच अंशी ठरलेला असतो. तो त्याच्या सवयी सहसा बदलत नाही. त्यामुळे कोणता वाघ कुठे असेल हे बर्‍याच प्रमाणात अचूक सांगता येते. म्हणूनच सामान्य जनतेसाठी जंगलात फिरण्याची वेळ सकाळी ६ ते १०.३० आणि दुपारी ३ ते ५.३०/६ अशी ठेवली आहे की ज्या काळात प्राणी बाहेर पडतात, आणि दिसण्याची शक्यता अधिक असते. ६.३० ला पार्क सर्वसामान्य जनतेला बंद केला जातो. अखेरीस आता वाघ दिसण्याची शक्यता नाही असे ठरल्यानंतर परत फिरलो आणि ६ वाजता किसली गेटमधून बाहेर पडलो. हॉटेलवर आलो. जेवण झाले. आणि उद्या पहाटे ५ वाजता उठायच्या तयारीने झोपायचा विचार केला. मला तशीही झोप आज काल तुकड्या तुकड्याने लागते. त्या प्रमाणे पटकन नाहीच लागली. मध्यरात्रीनंतर जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत अशक्य अश्या वेळी म्हणजे १। च्या सुमाराला सुमाचा फोन आला. आता मला मात्र ती वेळ चालते, योग्य असते. कारण असेही झोपेचे प्रॉब्लेम असतात आणि शिवाय कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता निवांतपणे गप्पा मारता येतात. नेहमी प्रमाणे गप्पा झाल्या. झोपेची आळवणी सुरू केली आणि उद्या वाघ दिसणार का? असा प्रश्न मनात घोळत असतानाच निद्रादेवीने माझ्या मेंदूचा ताबा कधी घेतला ते कळलेच नाही. दुसर्‍या दिवशी खरच वाघ दिसला का? दिसला तर कसा दिसला? सहजा सहजी दिसला का? कसे होते त्याचे दर्शन?..............

६ मार्च :

...............सकाळी ६ वाजता किसली गेट उघडते. तिथे नंबर लावण्यासाठी म्हणून ५.३० ला निघालो. तत्पूर्वी ५ वाजता गरम गरम वाफाळलेला चहा आला. आज नाश्ता तिकडे पार्कमधेच करायचा होता. त्यामुळे पॅक्ड नाश्ता बरोबर घेऊन पावणे सहा वाजता पुन्हा एकदा वाघ दिसेल या आशेने किसली गेटजवळ रांगेला लागलो. उगवती हळूहळू उजळायला लागली होती. गालावर अजून लाली नव्हती पसरली. ती लाली पसरवणारा रवीराज अजूनही निद्रिस्त होता. त्याची हालचाल सुरू झाली होती. म्हणूनच उगवती उजळली होती. वातावरण थंड आणि मनोहर होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. निरनिराळे पक्ष्यांचे आवाज येत होते आणि आमचा हरहुन्नरी शौरी त्या आवाजाचा वेध घेत त्यांची नावे सांगत होता. ६ वाजता परवानगी मिळाली आणि आम्ही त्या जादुई दुनियेत परत एकदा प्रवेश केला. आज थोड्या वेगळ्या वाटेने निघालो. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत असताना मात्र उगवतीच्या गालावर ह्ळू हळू मंद रक्तिमा पसरायला लागला होता. जसजसा रवीराज वर यायला लागला तसतसे उगवतीच्या चेहेर्‍यावरचे रंग आणि भाव एखाद्या तरूणीला तिचा जिवलग दिसल्यावर जसे तिच्या चेहेर्‍यावरचे भाव आणि रंग बदलतात तसे बदलायला लागले होते. झाडांच्या गर्दीतून सूर्य मस्तपैकी लपंडाव खेळत होता. जणू काही तो उगवतीशीच लपंडाव खेळत होता का? त्या फांद्याच्या फटीतून त्याचा गोळा मस्तपैकी रंग बदलताना दिसत होता. आधी लाल मग त्याचा नारंगी मग सोनेरी मग पिवळा, आणि अखेरीस त्याला या लपंडावाचा कंटाळा आला म्हणून की काय तो तप्त चांदीच्या रसासारखा पांढरट पिवळा असा दिसायला लागला. आता त्याच्याकडे पाहणे अशक्य होत होते. हवा अजूनही आल्हाददायक होती. तेव्हढ्यात तो गाईड म्हणाला "अरे शेर !!". सगळे जण माना वर करकरून इकडे तिकडे पाहू लागले. समोर एक नाला होता. त्यात थोडेसे गवत वाढलेले होते. आणि तो नाला ओलांडताना वाघ दिसला होता. मला तरी तो दिसला नाही. पण आमच्या जीपमधील दोघांना दिसला. म्हणजे त्याची शेपटीसह मागची बाजू दिसली. तेथून परत फिरलो. परत येत असताना एक गवताळ जमीन दिसली. त्यात दोन हत्ती होते. त्यामुळे तिथे वाघ आहे असे त्या गाईडचे म्हणणे होते. ते हत्ती त्या वाघाच्या मागे मागे होते. पुन्हा दोघा तिघांना दिसला. मला आत्ता सुद्धा नाही दिसला. ८॥ वाजायला आले होते. परत फिरायचे ठरवले. त्या जंगलात एक मध्यवर्ती जागा होती. तिथे कँटीन होते. तिथे नाश्ता करायचे ठरले होते. तिकडे जायला निघालो. परतताना एक जीप भेटली. त्यातले लोक आनंदाने सळसळत होते. त्यांना वाघ दिसला होता. अगदी त्यांच्या जीपसमोरच आला होता. त्यांनी फोटो काढला होता तो त्यातला एक इसम दाखवत होता. तो इसम उत्साहाच्या भरात बोलून गेला " देखो ये शेर हमरे पिछे था। हम उसे एक पालतु कुत्तेके माफिक १००/२०० फूट ले गये।" काय समजतो काय हा माणूस स्वतःला? ज्या प्राण्याने नुसती मान वर करून जबडा जरी उघडला असता आणि दोन चार पावले जीपजवळ उडी मारली असती तरी या माणसाची XXX ओली झाली असती, भंबेरी उडाली असती. संध्याकाळच्या सफारीत अशी छोटीशी घटना घडली. फार थोड्यांच्या लक्षात आली असेल. ते येइलच पुढे. आपण स्वतःला उगाचच किती श्रेष्ठ आणि अतिशहाणे समजतो याचे हे उदाहरणच नाही का? जर समजा जीपमधून उतरण्याची परवानगी असती तर या महामानवाची जीपमधून उतरण्याची हिम्मत तरी झाली असती का? आणि उतरला असता तर पळता भुई थोडी तर झालीच असती पण स्वर्गाचे वन वे तिकीट नक्कीच होते. आणि हा मूर्ख आणि वरचा मजला रिकामा असलेला माणूस वाघाची बरोबरी कुत्र्याबरोबर करत होता!!! कुठला मुजोरपणा आहे हा? दोष त्याचा नाही. दोष वृत्तीचा आहे. दोष हा नेहमी दुसर्‍याला हीन लेखण्याच्या मानसिकतेचा आहे. दोष त्याच्यावरच्या संस्कारांचा आहे. दोष माणसाच्या खोट्या अहंमान्यतेचा आहे. दोष तो राहत असलेल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आहे. हा नक्की उत्तरेतला असला पाहीजे. कारण तिथल्या लोकांची मनोवृत्ती ही अशीच अरेरावीची आणि मग्रूर असते. साधे रेल्वेतल्या आरक्षणाचे उदाहरण घ्या की! आपल्याकडच्या किंवा दक्षिणेकडच्या गाड्यातल्या आरक्षणाच्या मानाने उत्तरेकडच्या आरक्षणाची खात्री देता येत नाही. कागदावर भले तुमचे नाव असेल. पण प्रत्यक्षात तुम्हाला तुमची आरक्षित जागा मिळेलच याची खात्री नाही देता येत. असो. तर आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि तिथले म्युझियम पहाण्यासाठी त्या मध्यवर्ती ठिकाणी पोहोचलो. जमले तर "टायगर शो" बघायचा होता. जमले तर अशासाठी की तो वाघ कुठे आहे हे समजण्यावर ते शो चे अवलंबून असते. टायगर शो म्हणजे वाघ कुठे आहे याचा नक्की ठावठिकाणा घेऊन तिथे तुम्हाला हत्तीवरून घेऊन जातात. थोडक्यात हे वाघाचे कृत्रीम दर्शन असते. पण सर्वांनाच हे नाही मिळत. त्यासाठीही नंबर लावावा लागतो. कारण वाघ त्या ठिकाणी किती वेळ थांबेल याची काहीही खात्री नसते. त्यामुळे तो तिथे आहे तितक्या वेळात जितक्यांना जमेल तितक्यांनाच तो दिसतो. अर्थात इतरांचे की ज्यांना वाघ पहायला मिळत नाही अशांचे टायगर शो चे पैसे परत केले जातात. तर आम्ही या मध्यवर्ती ठिकाणी नाश्ता करत होतो. बाहेर आलो न आलो तोच कल्ला झाला, "चलो चलो! शेर साईट हो गया है. टाईगर शो के नंबर के लिये चलो." आम्ही गडबड करत पुन्हा किसली गेटपाशी आलो. नंबर लावला. लवकरचा नंबर लागला. जीपने पुन्हा जंगलात ज्याठिकाणी वाघ दिसला होता तिथपर्यंत आलो. आताचे पुढचे थोडे अंतर हत्तीवरून जायचे होते. तसे हत्तीवरून तिथे आलो. समोर वाघाची स्वारी झोपलेली होती. शांतपणे. बहुतेक रात्रीच्या भ्रमंतीनंतर दमून पहुडला असावा. त्याने डोळे उघडून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. आता १०॥ वाजत आले होते. उन तापायला लागले होते. प्राण्यांची फिरण्याची वेळ जवळ जवळ संपत आली होती. वाघाचे दर्शन पुरती पांच मिनीटे सुद्धा नाही झाले. मला उगाचच भारतातल्या सर्वात श्रीमंत देवाचे, रांगेत कित्येक तास तिष्ठत उभे राहून मिळणार्‍या मिनीटभराच्या दर्शनासारखे वाटले. वाघ दिसल्याचे फक्त समाधानच मानायचे असेल तर हो. वाघ दिसला होता. पण त्यात आनंद नक्कीच नव्हता. हे असे काही वाघाचे दर्शन मला तरी अपेक्षीत नव्हते. मग कसे होते? सांगता येत नव्हते. पण असा वाघ पाहून काही मनाचे समाधान होत नव्हते हे मात्र खरे. ११ वाजता परत फिरलो आणि आमच्या "मोगली रिसॉर्ट"वर आलो. मस्तपैकी अंघोळ केली, विश्रांती घेतली आणि नेहमीप्रमाणे दीड वाजता जेवायला डायनिंग हॉलवर आलो. चर्चा टायगर शो ची होती, कुठे शेपूट दिसल्याची होती. पण मला वाटते बहुतेक प्रत्येकालाच वाघ जसा दिसायला हवा होता तसा न दिसल्याची रूखरूख होती. जेवण झाले. पुन्हा विश्रांती झाली आणि अडीच वाजता आम्ही या मुक्कामातल्या शेवटच्या सफरीवर जाण्यासाठी तयार झालो. ठीक ३ वाजता आम्ही जंगलात किसली गेटमधून प्रवेश केला तोच मुळी मनात वाघ दिसण्याची दुर्दम्य आशा ठेवून...............

...............जीप आणि चालक सकाळचाच होता. कुठेतरी वाघाच्या हालचालीची कुणकुण होती. त्याप्रमाणे त्याची आणि शौरीची कोणत्या मार्गाने जाऊया ही चर्चा झाली. ही सर्व मंडळी शौरीच्या ओळखीची होती. त्याप्रमाणे निघालो. सकाळी जेथे कँटीन होते तिथे एक म.प्र. वनखात्याचे म्युझियम आहे. ते अगोदर बघयला गेलो. वाघासंबंधी सर्व माहिती आणि फोटो होते. कान्हाच्या जंगलात सापडणारे इतर प्राणी आणि पक्षी यांची माहिती होती. ते पाहीले आणि पुढे निघालो. ४॥ वजून गेले होते. वाघ दिसण्याच्या अपेक्षित मार्गावर जात होतो. जाता जाता मधे भरपूर मोर दिसले. नीलपंख (Indian Blue Jay), गरूड, भारद्वाज, टिटवी, वेडा राघू, पांढरे ठिपकेवाले घुबड (Spotted White Owlet) हे पक्षी दिसले. शिवाय तिथल्या तळ्याच्या काठी आणि तळ्यात एक वेगळ्या प्रकारचे बदक पाहिले. त्याचा आवाज शिट्टी मारल्यासारखा येतो. म्हणून त्याला Whistling Duck असेही म्हणतात. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही बदके झाडावर घरटी करतात. शिवाय प्राण्यांच्यात गवा, बारशिंगा दिसला. हरणं आणि सांबर भरपूर होते. निरनिराळ्या दिशेने दोन चकरा झाल्या. वाघ दिसण्याचे लक्षण दिसेना. डिगडौलाच्या रस्त्यावरही जाऊन आलो जेथे वाघ दिसल्याच्या बातम्या होत्या. पण नाही. वाघाने हुलकावणी दिली ती दिलीच. परत फिरलो. वाटेत एक कोल्ह्याचे जोडपे दिसले. कसे मस्तीत चालले होते दोघे. आधी झुडूपातून एक आला. त्यामागोमाग दुसराही. दोघेही रस्त्याच्या मधोमध थांबले. आणि प्रेमाने धुंद झालेली जोडपी जशी जुहू बीचवर आजूबाजूच्या गर्दीकडे, आवाजाकडे पूर्ण दुर्लक्ष करून एकामेकांच्या मिठीत मग्न असतात तसे या कोल्ह्याच्या जोडीचे आजुबाजूचे जंगल विसरून एकमेकांच्या तोंडात तोंड घालून प्रणयाराधन चालले होते. ५ एक मिनीटे हा खेळ चालू होता. बहुतेक आम्ही पहात होतो हे त्यांना जाणवले असेल. हळूच एक एक करून दोघेही बाजूच्या जंगलात पसार झाले. आणि आम्ही वाघ दिसण्याची आशा सोडून देऊन परतीच्या मार्गाला लागलो. तितक्यात तो गाईड म्हणाला,"रुको रुको. यहांसे शेर गया है" आमची जीप त्या रस्त्याला वळाली. तो गाईड आणि ड्रायव्हर दोघेही खूप उत्तेजीत झाले होते. त्यानी वाघाच्या पावलाचे ठसे पाहून सांगितले कि वाघ अगदी ५ एक मिनीटांपूर्वी इथून गेला आहे. "चलो चलो. जल्दी करो." आणि आमच्या ड्रायव्हरने गाडी त्या रस्त्यावर जमेल तितक्या वेगात मारायला सुरूवात केली. अजून काही वाघ दिसत नव्हता. पण त्या दोघांना पूर्ण खात्री होती की वाघ पुढे आहे. आणि तो रस्त्यावरूनच चालला आहे. आणि त्याच्या पुढेही एक जीप असली पाहीजे. एक वळण पार केले. अजून पावलांचे ठसे पुढे पुढे जातच होते. दुसरे वळणही पार केले. आणि गाडीने एकदम वेग रोखला आणि आम्ही श्वास!! समोर गाडीच्या पुढे जेमतेम १० फूटावर एक वाघ शांतपणे धीरगंभीर पावले टाकत चालला होता. गाडी वाघाच्या मागून त्याच्या चालीच्या वेगाने जात होती, सगळे एकदम चित्रासारखे स्तब्ध झाले. सगळेजण श्वास रोखून पहात होते. फक्त प्रत्येकाचे कॅमेरे मात्र क्लिकक्लिकत होते. तो वाघ जगाची फिकीर नसल्यासारखा आपल्याच मस्तीत चालला होता. मान खाली घालून पूर्णपणे विचारात गढल्यासारखा. एखादी व्यक्ती कशी विचारात गढल्यावर मान खाली घालून चालते, त्या व्यक्तीला आजुबाजूचे वातावरण जाणवत नसते. कोण माणसे आहेत, ती काय करत आहेत याचे त्या व्यक्तीला भान नसते. तसे त्या वाघाला मागे पुढे जीप आहे याचे भानही नव्हते असे वाटत होते. त्याच्या चालण्यात एक प्रकारचा डौल होता. एक प्रकारची मस्ती होती. It was an elegence of a ruler, an arogence of a powerful king. साधारण चार पांचशे फूट गेल्यावर त्या वाघाच्या लक्षात आले असावे की आपण आपल्या क्षेत्राच्या सीमा ओलांडतो आहोत की काय. आणि तो गपकन थांबला. त्यावेळी एका जीपमधला एक इसम भले मोठे झूम लेन्स लावलेल्या कॅमेर्‍याने जीप बाहेर अर्धे अंग काढून फोटो काढत होता. वाघ गपकन थांबला आणि त्याने नुसती त्या जीपकडे एक नजर टाकली आणि तो कॅमेरावाला सटपटला आणि त्याचा एकदम तोल गेला. कुणाच्या लक्षातही ही घटना आली नसेल. मला नंतर हे कोणीतरी सांगितले. आणि मला तो सकाळचा मुजोर आठवला. असे सकाळी झाले असते तर तो सकाळचाही असाच पडायला आला असता यात मला मुळीच शंका नाही. तर तो वाघ आडवा झाला. क्षणभर तिथे थांबला. त्याने आमच्या जीपकडे बघीतले. मस्तपैकी पोझ दिली......... आणि काय दुर्दैव!!! माझ्या कॅमेर्‍याची बॅटरी संपली. आमची अशी नेहमीच बस चुकते. आपल्याला घाई असेल तेंव्हा बस कॅन्सल होते, आपण वेळेवर गेलो की गाडी नेमकी लेट असणारच, तिकीटाच्या विंडोवर आपला नंबर आला की नेहमीच तिकीटे संपतात. आपल्याला रिक्षा हवी असेल तेंव्हा रिकामा रिक्षावाला आपल्या विरूद्ध दिशेने जाणारा मिळतो की जो आपल्या दिशेने यायला तयार नसतो आणि आपल्या दिशेने जाणारे सर्व भरलेले असतात. अहो, साधे चितळ्यांच्या दुकानातही बाकरवडीसाठी नंबरात उभा राहिलो ना, तर माझ्या पुढच्या माणसानंतर बाकरवडी कायम संपतेच. दिवस बदलून पाहिला, वेळ बदलून पाहिली, पण हे संपण्याचे नशिब मात्र अबाधित साथ देत राहीले. शेवटी कंटाळून चितळे बाकरवडी खाणेच सोडून दिले. कोणी दिली तरच खातो. चितळ्यांकडून विकत आणून खाणे सोडून दिलय!!! वाघाने दिलेली शेवटची पोझ मिळाली नाही म्हणून मी थोडासा खट्टू झालो खरा पण पु. लं च्या "तुझे आहे तुजपाशी" मधल्या काकाजीच्या "हे असं का? याला उत्तर नाही. घोडा अडिच घरेच जाणार. हे असेच चालायचे" या उद्गारांची सवयशी झाल्यामुळे वाईट मात्र वाटले नाही. फोटो अनुराधाताईंच्याकडून मिळेल हे माहित होते. त्यामुळे ती निराशा पटकन वितळूनही गेली. तो वाघ मनात म्हणाला असावा की "झाले ना तुमचे फोटो काढून?" त्याने एकदा इकडे तिकडे पाहिले आणि परत मान खाली घालून बाजूच्या जंगलात शांतपणे नाहीसा झाला...............

...............आणि सर्वजण एकदम लहान मुलांच्या खेळातला "स्टॅच्यु" सुटल्यासारखे भानावर आले. वाघाचे हे असे दर्शन आम्हाला हवे होते. ते अगदी जाता जाता त्या वाघाने जणू नाराज होऊ नका असे म्हणत आम्हाला दिले. मला इथे त्याही परीस्थितीत संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. "याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥" खरंच कान्हाच्या जंगलातला हा शेवट किती सुखावणारा होता. सगळे जण एक प्रकारच्या Trance मधे होते. जीप किसली गेटच्या बाहेर येईपर्यंत सर्व चिडीचुप होते. प्रत्येक जण त्या थरारक क्षणाची फिल्म मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिवाईंड करून पाहण्यात मग्न होता. नंतर आम्हाला एक रणथंभोरवरची फिल्म दाखवली. टी शर्ट वगैरे खरेदी करून चहा प्यायला थांबलो. आणि चहा पोटात जात असताना सगळ्यांना एकदम कंठ फुटला. प्रत्येकाच्या आवाजात ते थ्रिल जाणवत होतं प्रत्येक जण आनंदाने फुलून निघाला होता. दिवसभराच्या वणवणीने दमलेले चेहेरे आता फुलले होते. समाधान चेहेर्‍यावरून ओसंडून वाहत होते. कारणही तसेच होते ना !! कान्हाला ज्यासाठी इतकी धडपड करून यायचं ते साध्य झालं होतं. मोगली रिसॉर्टवर आलो. वाघ दिसल्याचा घरी फोन फरून झाला होताच. वाघ दिसल्याच्या आनंदातच चर्चा करत करत जेवलो. ट्रीप संपल्याची कुठेतरी हुरहूर मनात होतीच. उद्या सकाळी ११ वाजता जबलपूरहून पाटणा पुणे एक्सप्रेस होती. त्यासाठी ६ वाजता परतीच्या प्रवासाला निघायचे होते. मग ५॥ ला उठायचे होते. नेहमीप्रमाणे सुमाचा फोन झाला. म्हणजे आता झोपेचा प्रॉब्लेम येणार नव्हता. लहान मुलाच्या उत्साहात तिला आणि ज्यांना ज्यांना सांगणे शक्य होते त्यांना वाघ दिसल्याचे सांगून झाले. दुपारी टायगर शो मधे दिसलेल्या वाघाचे इतक्या उत्साहात वर्णन सांगितले गेले नसावे. संध्याकाळच्या वाघाची डौलदार चाल मनात आठवत झोपेच्या आधीन झालो...............

७ मार्च :

...........सकाळी ५॥ ला चहा आला. बाडबिस्तरा कालच आवरून ठेवला होता. ठरल्या प्रमाणे निघालो. आणि पावणे दहा वाजता जबलपूर स्टेशनवर आलो. आणि तिथे पहीला दणका बसला की गाडी जवळ जवळ २॥ तास लेट होती. म्हणजे ती १॥ वाजता येणार होती. मग स्टेशनच्या विश्रामगृहात सामान टाकून वाट पहात बसायचे ठरवले. अनुराधाताई म्हणाल्या, "बाहेर जाऊन फिरून येऊ, फळे मिळाली तर पाहू." मलाही तिथे नुसतेच हातावर हात बांधून बसणे बोअरच होत होते. मग आम्ही दोघे फिरून आणि भरपूर गप्पा मारून आलो. त्यात तास दीड तास गेला. स्टेशनवर आल्यावर कळले की गाडी अजून तासभर उशीरा म्हणजेच २ च्या सुमाराला येईल. एका अर्थी ते बरेच वाटत होते. कारण गाडी एकूण तीन तास लेट. त्यातला जेमतेम तासभर भरून काढेल असे गृहित धरले तरी ती पुण्याला तिच्या पहाटे ५॥ या नियोजीत वेळेपेक्षा २ तास तरी उशीरा जाईल. म्हणजे ७॥ वाजता पोहोचेल. ही ५॥ पेक्षा बरी वेळ आहेना. कारण त्या अतिपहाटेला रिक्षाचा त्रास असतो. त्यामुळे हे लेट प्रकरण तसे बरेच वाटले. फक्त आधी कळले असते तर जो वेळ प्लॅटफॉर्मवर घालवला तो मोगली रिसॉर्टमधे तरी घालवता आला असता ना? अखेर गाडी सव्वादोन वाजता आली. गाडीतले जेवण, नंतरची नित्यनियमीत सुमा फोनाफोनी आणि गप्पा व अखेरीस परत तुटक तुटक झोप असे करत दौंडला जाग आली.........

८ मार्च :

.............७॥ वाजता पुणे स्टेशनवर उतरलो. जबलपूरच्या स्टेशनवरच वेळ जाता जात नसताना इतरांचे फोन पत्ते, वगैरेची देवाणघेवाण झाली होतीच. प्रत्येकाचे फोटो एकामेकांना हवे होतेच. त्याची ही सोय होती. या ट्रीपमध्येही थोडिशी गटबाजी झाली. पण अनुराधाताईच्या अष्टपैलू उपस्थितीने ती गटबाजी जाणवली नाही. ही ट्रीप आनंददायी जाण्यात निसर्गाबरोबरच त्यांच्या नितांत सुंदर गप्पांचाही महत्त्वाचा वाटा होता हे त्यांचे श्रेय मान्य करावेच लागेल................

समारोप :

..............चला! बरेच दिवस गाजत असलेली ट्रीप अखेरीस पार पडली. छान वाटले. त्या मुजोर माणसाच्या वृत्तीचे दर्शन हे माणसातल्या प्राण्याचे दर्शन होते, तर दुसरीकडे त्या वाघाच्या धीर गंभीर चालीत त्याच्या नकळत मानवी वृत्तीतली अपेक्षित असलेली संतुलीत वृत्तीची झलक होती का? की मलाच असा भास होत होता? हे दोन्ही प्रकार पाहील्यावर असे वाटले की माणूस हा पशू वृत्ती किती सहजी दाखवतो!! तो हीन पातळीवर चटकन उतरू शकतो. पण पशूत सभ्य वृत्ती ही सहज-वृत्ती असते. त्याला त्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. ही वृत्ती हा त्याचा धर्म असते. तुम्हाला "धर्म" याची एक वेगळी व्याख्या सांगतो म्हणजे हे तुम्हाला पटेल. It's a natural physiological behaviourial pattern of a specie. माणसाच्या बाबतीत मात्र तो अखेरीस जरी पशू असला तरी तो जादा हुशार असल्याने, त्याला बुद्धीचे वरदान असल्याने, तो आपली अपेक्षीत सभ्य वृत्ती चटकन सोडतो. कारण त्याला ते करणे सोपे असते ना? त्याला काही कष्ट पङत नाहीत. पण सभ्य वृत्ती जपण्यासाठी कष्ट करावे लागतात. असो. फोटोची अदलाबदली करून झाली. हळू हळू ट्रीपचा परीणाम ओसरू लागला. पण माझ्या बाबतीत बोलायचे तर मी त्या Trance मधून अजून बाहेर यायला तयार नव्हतो. कारण मला आता पुढच्या ट्रीपचे वेध लागलेले होते................

...............२७ अप्रिल - कॉर्बेट राष्ट्रिय उद्यान...........

आठवण

आठवण आठवण काय असते?

गतकाळाची फिल्म असते

भल्या बुर्‍या सरल्या प्रसंगांची

तिखट गोड भेळपुरी आसते १हिंदी चित्रपटांसारखे तिथे

भरपूर चढ उतार असतात

मिश्र भावनांच्या कथेचा मात्र

अंत नेहमीच दु:खद करतात २आठवण हा एक सोहळा असतो

सुखद क्षणांना उजाळा असतो

काळ्या दु:खद क्षणांचा तो

अपरीहार्य मेळावा असतो ३रसिका उर्फ सखी माझी

अत्यंत जिवलग मैत्रिण आहे

सख्खी बहीण काय लावेल

असा जीव लावत आहे ४ही अति जिवलग मैत्रिण

मला नेहमीच म्हणत असते

सुखाचे क्षण आठवत रहा

दु:खाला दूर सारत रहा ५मित्रा तू माझा जिवलग रे

दु:ख कसे तुझे पाहू रे

तुला बरे वाटले म्हणजे

माझे मन शांत होते रे ६आठवणींच्या या सोहाळ्यात

मी बर्‍याचदा हरवून जातो

चांगल्या आठवणीत तरंगताना

दु:खाचे शेवाळं बाजूला सारतो ७ते सहज कधीच जमत नाही

शेवाळ जलपर्णी एकत्र होतात

चांगल्या आठवणीतलं तुमचं

जगणं असह्य करून टाकतात ८सखी मात्र नेहमी नेहमी

सदा मदतीला हजर असते

जलपर्णी वेढून घेत असता

हात धरून बाहेर काढते ९सखीला सौ. माहित नाही

तिचे जाणे मात्र माहित आहे

माझे दु:ख तिला जाणवते

हे ही मला ठाऊक आहे १०सखीची अतिव माया आहे

म्हणून तिला दु:ख जाणवते

माझ्यावर आपल्या मायेची ती

सदा पखरण करत असते ११आठवणी विचारून येत नाहीत

नको त्या मागे रहात नाहीत

हव्या त्या कधीच येत नाहीत

वेळेची बंधने पाळत नाहीत १२आठवणी नेहमी येतात त्या

भरतीसारख्या अंगावर येतात

सुखद मुंगीच्या पावलांनी जातात

दु:खद मात्र हत्तीची पावले घेतात १३

मृत्यू

मृत्यू म्हणजे काय आहे?

उत्तर नसलेले कोडे आहे

न परतीच्या रेषेपलिकडचे

न सुटणारे गणित आहे १लक्ष्मणरेषा पार केल्यावर

उत्तर सापडणारे सत्य आहे

परत येता येणार नाही

म्हणून बंद कुपीतले कूट आहे २मृत्यू म्हणजे काय आहे?

अंधार खाईची खाण आहे,

जीवनाचे अस्तित्व पुसल्याच्या

कटू सत्याची जाण आहे? ३"शी ईज नो मोअर"

म्हणणं किती साधं आहे

डोक्यावर पांढरी चादर टाकणं

किती किती सोपं आहे!! ४श्वास थांबला हालचाल थांबली

आवाज थांबला डोळे निमाले

व्यक्तीमत्वाच्या अस्तित्वाच्या

सर्वच खुणा नष्ट झाल्या ५काल होती आज नाही

इतकं का ते सोपं आहे?

अपरिहार्य सत्य असलं तरी

पचवणं खूप जड आहे ६पोकळी आहे म्हणून अस्तित्व आहे

अस्तिव संपलं की पोकळी होते

त्या अस्तित्वाची सवय असते

म्हणून ती पोकळी टोचत राहते ७मागे राहिलेले जिवलग जीव

गत जीवाला शोधत राहतात

जीव तर सापडत नाहीच नाही

सयी मात्र मेंदू कुरतडत राहतात ८मन चित्त अहंकार आत्मा

न दिसणार्‍या गोष्टी आहेत

कोणतेही वस्तुमान नसलेल्या या

बुद्धीजीवी संकल्पना आहेत ९कोणत्याही अशा संकल्पनेला

अंत हा कधीच असत नाही

तरीही एखादे व्यक्तीमत्व

कधीच अमर का असत नाही? १०एखादी पणती विझली तरी

आपण ती जपून ठेवून देतो

एखादे अस्तित्व विझले तर

लगेच जाळून मोकळे होतो ??? ११