शनिवार, २५ जुलै, २००९

आरोग्यं धनसंपदा-४

मागच्या लेखात मी दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर लिहिले होते. त्यात आपण आजच्या युगास पोषक दिनचर्या कशी असावी हे पाहिले होते. आजच्या लेखात मानवी मन, त्याचा शरीराशी संबंध व त्याअनुशंगाने संपूर्ण स्वास्थ्यासाठी योगाभ्यास याचा विचार करू.
मी मागे म्हटल्याप्रमाणे मानवी मन ही अतिशय क्लिष्ट व समजण्यास अवघड गोष्ट आहे. माणसाच्या मनात काय विचारांची आंदोलने आहेत ते फक्त त्या व्यक्तिलाच समजेल. दुसर्‍या व्यक्तिला त्या व्यक्तिच्या चेहेर्‍यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून, लिहिण्याच्या पद्धतीवरून, अक्षराच्या वळणावरून, स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवरून मनातले विचार हे थोड्याफार प्रमाणात समजू शकतात. पण ते निश्चित नाही. ते म्हणजे हवामानखात्याच्या अंदाजासारखे आहे. मानवी मन एखाद्या बॅंकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टसारखे आहे. तो व्हॉल्ट फक्त त्याच्या मालकालाच उघडता येतो. आणि त्यात काय आहे हे फक्त त्या मालकालाच माहित असते. बँकेच्या व्हॉल्टमधे प्रथम बँक किल्ली लावून पहिले कुलूप उघडते आणि नंतरच मग तो व्हॉल्ट फक्त मालकाच्या किल्लीनेच उघडतो. इथे तसे नाहीये. फार फार तर इतपत म्हणता येईल की इथे मानवी मनाच्या बाबतीत मनोविकारतज्ञ आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या किल्लीने तुमच्या मनाचे पहिले कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न अश्यासाठी म्हणतो कि ते मनाचे कुलूप उघडले जाईल याची खात्री नसते. अंधारात तीर मारण्यासारखे आहे ते. कारण काही व्यक्ती आपल्या मनाची दारे इतक्या घट्ट बंद करतात की कोणत्याही किल्लीने ती दारे उघडत नाहीत.
हे असं का होते? तर त्याला निश्चित कारणे नाहीत. ३+२=५ असे वैज्ञानिक गणिती उत्तर त्याला नाही. पुष्कळ कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून एखादी व्यक्ती स्वतःभोवती एक अभेद्य भिंत बांधते. अनियमीत दिनचर्या, अनियमित आहार, जेवणाच्या अनियमित वेळा, विश्रांतीचा आभाव, कॉटुंबिक समस्या, कामाचा ताण आणि त्यामुळे येणार्‍या कार्यपद्धतीच्या समस्या अश्या अनेक कारणांनी मनाचे संतुलन बिघडते. त्या व्यक्तिची जडण घडण कशी आहे, स्वभाव कसा आहे, तो स्वभाव लहानपणापासून कसा आणि कोणत्या वातावरणात विकसित झाला आहे, त्यावर कोणते संस्कार झाले आहेत, कॉटुंबिक वातावरण कसे आहे त्यावर त्याच्या मनोकोषाची जडण घडण, त्याची अभेद्यता अवलंबून आहे. निरोगी, निरामय, आनंदी व्यक्तिच्याबाबतीत हा मनोकोष, ही भिंत त्रासदायक ठरत नाही.
मागच्या लेखात मी म्हटलं होतं की शरीर हे वस्तूरूप आहे. पण मन मात्र तसे नाही. ते वस्तूरूप नाही. त्याला आकार नाही. जडत्व नाही. ती एक उर्जा आहे. पंचेंद्रिये, पंचकर्मेंद्रियेही भॉतिक आहेत. त्यांच्या संरचनेत अडथळा आला की शारीरीक व्याधि निर्माण होतात. व्याधी हे 'विघटन' या शब्दाचे रूप आहे. आणि या संरचनेत बदल होण्याची पूर्वसूचना मनाला, चित्ताला मिळते. चित्त तुमच्या मेंदूत धोक्याची घंटा वाजवतं. पण आपण कामाच्यामागे आणि पैश्याच्या मागे पळण्याच्या नादात या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो. मग शारीरीक व्याधि, दु:ख व त्यातून मानसिक अशांतता निर्माण होते.
मन ही एक उर्जा आहे. म्हणून ती प्रवाही आहे. तिचा निश्चित मार्ग आहे. योगशास्त्रात या उर्जेला 'चित्त' म्हणतात. आणि या उर्जेच्या नैसर्गिक संचाराला 'वृत्ति' म्हणतात. आणि या नैसर्गिक संचारात, त्याच्या मार्गात बाधा आली, अडथळा आला कि मग व्याधिची निर्मिती होते. ही वृत्ति म्हणजे उर्जेची नैसर्गिक ओढ. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे व कर्मेंद्रियाचे कार्य हे एक उर्जेवर चालते. त्या इंद्रियाची विशिष्ट विषयाकडे नैसर्गिक ओढ असते. जसे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या विषयांकडे अनुक्रमे कान, त्वचा, जिभ, डोळे व नाक यांची नैसर्गिक ओढ आहे. मग तो विषय आणि इंद्रिय याबरोबर मन आले, सुख-दु:ख या संवेदना आल्या. सुख ही अनुकूल आणि दु:ख ही प्रतिकूल संवेदना आहे. आणि दु:ख या संवेदनेमुळे व्याधी शरीरात आली हे जाणवते.
दु:ख या संवेदनेची जाणिव त्या व्यक्तिला बर्‍याच आधी झालेली असते. डॉक्टरना ते जाणवेलच असे नाही. पण मनाला ती जाणिव मात्र होते. पण त्यातून मार्ग काढण्याची मनाची क्षमता नाही. ती क्षमता बुद्धिची आहे. सार-असार म्हणजे चांगले वाईट बुद्धिला समजतं. पण एकट्या बुद्धीचं ते काम नाही. मग यातून मार्ग काढण्यासाठी मन व बुद्धी एकमेकांशी समन्वीत झाल्या पाहीजे. एकत्र आल्या पाहिजेत. त्याला "चित्ताचे समत्व" म्हणतात. व्याधि ही मनोव्यथा या अवस्थेत असतानाच त्यावर वार झाला पाहिजे. म्हणजे व्याधि समूळ जाईल. आणि योगशास्त्राने हे शक्य आहे. यालाच योगशास्त्र "चित्तवृत्ती निरोध" असं म्हणतं.
आणि हा वृत्तीनिरोध, अभ्यास आणि वैराग्य याच्या सहाय्याने करता येईल असे महामुनी पतंजली म्हणतात. यातील वैराग्या क्षणभर बाजूला ठेवूया. कारण हा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या कक्षेतला विषय नाही. पण अभ्यास मात्र शक्य आहे. अभ्यास पुस्तकाच्या सहाय्यानेही करता येईल. पण मग ते फक्त शाब्दिक ज्ञान होईल. त्यात आनुभविक ज्ञान येणार नाही. जसे पुस्तके वाचून पोहता येणार नाही. किंवा पाकशास्त्रावरची पुस्तके वाचून केलेला पदार्थ त्याच्या चित्रात दाखवल्यासारखा होईल याची खात्री नसते. त्यापेक्षा तो भलताच निघतो. म्हणून तो पदार्थ किंवा पाककला जसे आईच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी शिकणे गरजेचे आहे, तसा इथे गुरुपदेश आवश्यक आहे. गुरू असणे, प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. माझे गुरुजी डॉ. करंदीकर उर्फ आचार्य योगानंद म्हणतात, "कोणत्याही आसनाचा अभ्यास हा पायरी पायरीने केला पाहिजे. एकदम १००% अवस्था प्राप्त होणार नाही. प्रथम शारीरिक अवस्था, नंतर शरीरांतर्गत होणार्‍या बदलांची जाणिव, त्यातून होणारे मानसिक व बौद्धिक बदल आणि सर्वात शेवटी अनुभवाला येणारी "आनंदावस्था" असा हा कष्टसाध्य व दीर्घ प्रवास असला तरी यात यश निश्चित आहे. अशी अवस्था चांगल्यापैकी जमू लागली व जास्त वेळ टिकवता आली म्हणजे आपोआप वेगळे वृत्तिनिरोध अनुभवता येतात. शुद्धता, संतोष, तप आणि स्वाध्याय याही अवस्था अनुभवता येतात. प्रत्येक आसनात चालू असणार्‍या श्वासावर चित्त ठेवून प्राणायाम ही साधतो आणि मन निर्विचार होवून कोणत्याही विषयोपभोगाची इच्छा मनात उरत नाही. श्रद्धा, निष्ठा ठेवून अनुष्ठानपूर्वक केलेला दीर्घ अभ्यास 'आसनजय' अवस्था प्राप्त करून देतो. महामुनी पतंजलीनी आसनजयाच्या व्याख्येत सांगितले आहे कि "ततो द्वंन्द्वानभिघातः॥" म्हणजे सुख-दु:ख शीत-ऊष्ण अश्या द्वंद्वापासून वेगळे असलेले स्वास्थ्य अनुभवता येते. ही अवस्था अनुभवण्याची आहे. व म्हणुन ती "शब्दातीत" आहे."
म्हणुन आपण पांच सोप्या आसनांनी सुरूवात करणार आहोत. नेहमी योगासनाचा विचार करताना अमुक तमुक आसनाचा उपयोग काय याचे नेमके उत्तर देणे शक्य नसते. आसनांच्या बाबतीत जो परिणाम अपेक्षित आहे, तो सर्व, किंवा त्या गटात असणार्‍या सर्व आसनांचा एकत्रित परिणाम असतो हे लक्षात ठेवावे. त्यामुळे अमुक एखादे आसन कश्यासाठी आहे हे सांगणे अवघड आहे. ढोबळ मानाने सांगता येईल. पण नेमका परीणाम, ज्याला इंग्रजीत "पिन पॉइंट इफेक्ट" म्हणतात, तसे सांगणे कठिण आहे. कारण मी याच लेखात म्हटल्याप्रमाणे गणिती तत्त्व लागू पडणार नाही. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेले तरी ३+२=५ हेच उत्तर येईल. पण एखाद्या आसनाचे तसे नाही. सुप्तवीरासनाचा उपयोग एखाद्या व्यक्तिला होईल पण तशाच प्रकारच्या व्याधिने त्रस्त असणार्‍या दुसर्‍या व्यक्तिस त्याचा तितकाच उपयोग होईलच असे नाही. जरी आसन तेच असले, करण्याची पद्धत तीच असली तरीही.
ही पांच आसने म्हणजे सुप्तवीरासन, सुप्तबद्धकोनासन, विपरीत दंडासन, विपरीत करणी, आणि सेतुबंधसर्वांगासन. यासह शवासन केल्यास ही आसने मानसिक शांतता, स्वास्थ्य आणि शरीराला तसेच मनाला विश्रांती देतील. वरीलपैकी शवासनासह तीन आसने प्रत्येकी २० मिनीटे केल्यास मनाला आणि शरीराला आनंददायी विश्रांती मिळू शकेल. या पुढील लेखात वरील आसने करण्याच्या पद्धती, साहित्य व आसनांचा स्थूल मानाने परिणाम याचा विचार करू.

॥ ॐ तत्सत ॥
॥ जय श्रीराम ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा