शनिवार, २५ जुलै, २००९

आरोग्यं धनसंपदा-६

आरोग्यम् धनसंपदा
मागच्या लेखात आपण दोन आसनांचा विचार केला होता. ती म्हणजे सुप्तवीरासन आणि सुप्तबद्धकोनासन. आज आपण पुढील आसने बघणार आहोत. आजच्या लेखात आपण विपरितदंडासन, सेतुबंध सर्वांगासन आणि शवासन यांचा विचार करण्याचा प्रयत्न करुया. प्रयत्न म्हणालो इतक्यासाठीच की यातल्या शवासनाचा विचार करताना बर्‍याच इतर गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. म्हणून कदाचित शवासन पुढील लेखात पहावे लागेल. पुन्हा एकदा मागे सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून देतो. आणि ती म्हणजे या पाचही आसनांचे एकत्रीत परिणामांची चर्चा सर्वात शेवटी करू.


विपरितदंडासन :
हे आसन तीन प्रकारने करता येते. तिन्ही प्रकारात वेगवेगळी अनुभूती येते. कारण या तिन्ही प्रकारात शरीराच्या अवस्थेत थोडा थोडा फरक होतो. आणि तितका थोडासा फरक वेगळा परिणाम साधण्यास, वेगळी अनुभूती देण्यास पुरतो. अजून एक गोष्ट. विपरीत म्हणजे उलट. आपण नेहमी उभे राहतो. तेंव्हा आपले डोके छातीच्या वर असते. परंतु हे आसन केल्यानंतर आपल्या डोक्याची अवस्था ही छातीच्या पातळीच्या खाली जाते. जवळ जवळ शीर्षासनासारखी स्थिती होते. चित्र पाहिल्यावर हे अधिक स्पष्ट होईल.

प्रकार १ : जमिनीवरील विपरितदंडासन
साहित्य : लोड, उशी, ब्लँकेट
कृति : लोड आणि उशीची रचना चित्रात दाखवल्याप्रमाणे करा.( चित्र क्र.१) म्हणजे उशी आडवी आणि त्यावर लोड उभा. म्हणजे वरून पाहिले तर + खुणेसारखी रचना व्हायला हवी. चित्र क्र.१ मधे दाखवल्याप्रमाणे ब्लँकेटची तिहेरी घडी करून ती लोडापुढे ठेवा. नंतर त्या लोडावर बसा.(चित्र क्र.२) गुडघ्यात पाय थोडेसे दुमडून ठेवा. हाताचे तळवे जमिनीवर टेकून कोपरे जमिनीवर आणा. आणि हळू हळू लोडावर झोपत पाठ लोडावर टेकवा आणि खांदे ब्लँकेटच्या घडीवर आणा. पाय सरळ करा. हाताचे तळवे छताकडे, कोपरे जमिनीवर टेकलेली आणि पावले उभी आणि जमिनीला काटकोनात.(चित्र क्र.३) या स्थितीत किमान १० मिनीटे पडून रहा.
या आसनावस्थेतून बाहेर येताना पाय गुढघ्यात दुमडा,हात कोपरात दुमडून छातीवर घ्या, ऊजव्या कुशीवर वळत लोडावरून खाली या, हात पाय लांब करत ताणून द्या आणि उठून बसा.
फायदे आणि परिणाम : छातीचा पिंजरा डोक्याच्याबाजूला जमिनीकडे कललेला असल्याने काही फासळ्या पायाकडे, काही वर्तुळाकार आणि काही मानेकडे ताणल्या जातात. उदरपोकळी जमिनीला समांतर राहते. पाठीचा कणा "विपरीत" दिशेने वक्र झाल्याने उदरपोकळीत साठलेले रक्त शुद्धिकरणासाठी विनासायास फुफ्फुसाकडे व ह्रदयाकडे जाऊ शकते. फासळ्या उघडल्यामुळे फुफ्फुसाच्या प्रसरणाला अधिक जागा मिळते आणि श्वासोश्वास सुलभ होण्यास मदत होते.

प्रकार २ : खुर्चीवरचे विपरितदंडासन - १
यात जमिनीवरच्या आसनापेक्षा यात पाठीच्या कण्याला वक्रता अधिक येते.
साहित्य : दोन लोड, उशी, ब्लँकेट, खुर्ची.
कृति : खुर्ची, दोन लोड व ब्लँकेटची चित्रात दाखवल्याप्रमाणे रचना करा. खुर्चीसमोर दोन लोड एकमेकांवर ठेवा. त्यावर ब्लँकेटची तिहेरी घडी ठेवा.(चित्र क्र.४) खुर्चीवर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय आत घालून बसा.(चित्र क्र.५) नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे गुढघ्यात पाय दुमडून पाय आणि मांड्या यांचा काटकोन करा. आणि खुर्ची हाताने धरून ठेवत पाठीवर झोपत शरीर ब्लँकेटच्या दिशेने न्या. खांदे ब्लँकेटवर ठेवा. खुर्चीच्या आतील बाजूने हात घालून खुर्चीचे मागचे पाय धरा. छातीच्या तळापासून खुब्यापर्यंतचे शरीर खुर्चीच्या बैठकीवर आणि मान उशीवरून जमिनीकडे तिरकी ठेवा.(चित्र क्र.६) ही आसन स्थिती आपल्याला सहन होईल त्याप्रमाणे ५ मि. ते १० मि. ठेवा.
आसनातून बाहेर येताना हात बाहेर काढून खुर्चीची पाठ धरा, खांदे कोपरातून उचलत खुर्चीत सावकाश ऊठून बसा. व खुर्चीतून बाहेर या.
फायदे आणि परिणाम : लोडावरील आसनापेक्षा या स्थितीत शरीराला बाक अधिक मिळतो. छातीचा पिंजरा सर्व बाजूने उघडल्यामुळे फुफ्फुसाच्या प्रसरणाला अधिक जागा मिळते.

प्रकार २ : खुर्चीवरचे विपरितदंडासन - २
साहित्य : ब्लँकेट, खुर्ची.
कृति : यात वरील प्रकार १ पेक्षा फार फरक नाही. खांद्याखालचे दोन्ही लोड काढून टाकलेले आहेत.(चित्र क्र.७) डोक्याचा माथा ब्लँकेटवर टेकल्यावर दोन्ही हाताचे कोपरे खुर्चीच्या विरूद्ध दिशेला जमिनीवर टेकवून हाताचे तळवे डोक्यामागे ठेवा आणि बोटे एकमेकात गुंतवा. अशी आसनस्थिती ३ ते ५ मि. ठेवा. नंतर वर सांगितल्याप्रमाणे बाहेर या.
फायदे आणि परिणाम : या आसनात पाठीच्या कण्याला ताण बसल्यामुळे आणि छातीचा पिंजरा सर्वाधिक प्रसरण पावल्यामुळे फुफ्फुसे व ह्रदय यांची कार्यक्षमता वाढते तसेच ऊदरपोकळीचेही प्रसरण झाल्यामुळे तेथील अवयवांची क्षमता वाढते.

सेतुबंध सर्वांगासन :
साहित्य : लोड, ब्लँकेट
कृति : लोड उभा ठेवून त्यामागे ब्लँकेटची तिहेरी घडी आडवी ठेवा.(चित्र क्र.८) ब्लँकेटच्या विरूद्ध दिशेला तोंड करून पाय गुढग्यात दुमडून लोडावर बसा.(चित्र क्र.९) दोन्ही हातानी लोड धरून ठेवून त्यावर हळूहळू उताणे झोपा. झोपताना खांदे जमिनीवर आणा. मान व डोके ब्लँकेटवर आणा. पाय सरळ करा. हात शरीराला काटकोनात ठेवून तळवे आकाशाकडे करा.(चित्र क्र.१०) ५ ते १० मि. या स्थितीत पडून राहिल्यावर हात कोपरात दुमडून छातीवर घ्या, पाय गुढघ्यात दुमडून पोटाजवळ घ्या. ऊजवीकडे वळत लोडावरून खाली येत कुशीवर वळा आणि उठून बसा.
फायदे आणि परिणाम : या आसनात उदरपोकळी जमिनीला समांतर राहते. छातीचा आकार वक्राकार झाल्याने सर्व फासळ्या ताणल्या जातात. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. मान व डोके जमिनीला समांतर राहिल्याने मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो.
हे आसन विश्रांतीचे आहे. याचा अभ्यास संध्याकाळी अवश्य करावा. दिवसभराचा थकवा याने दूर होतो व मेंदू ताजातवाना होतो. ह्रदयविकार असणार्‍या व्यक्तिंना संपूर्ण शारिरीक आणि मानसिक विश्रांती या आसनात मिळते.

पुढील लेखात आपण शवासनाचा विचार करू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा