रविवार, २० सप्टेंबर, २००९

संस्कृती

खर तर हा विषय लिहीण्यासाठी, चर्चेसाठी घ्यायचा म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाने शिवधनुष्याला हात घालण्या सारखे आहे. म्हणजे या विषयावर लिहीण्याची माझी पात्रता आहे का हे मला माहीत नाही. पण धाडस करतोय. त्याबद्दल क्षमस्व. मला जेव्हढे माहीत आहे ते सांगतो. जिथे माझे चुकत असेल तर नसे नि:संकोच सांगावे.



प्रथम संस्कृती म्हणजे काय ते पाहूया. संस्कृती या शब्दाचा शब्दकोषातला अर्थ असा : "संस्कृती म्हणजे कल्पना, विचारधारा आणि दृष्टीकोन यांची त्या त्या समाजात रूजलेली परंपरा. संस्कृती म्हणजे मानवी ज्ञान, विश्वास आणि वागणूकी, ज्या सामाजिक विचारांवर अवलंबून आहेत त्यांची एकत्रित संरचना. संस्कृती हे एखाद्या विचाराचे समूहाचे, मूल्यांचे एकत्रिकरण आहे जे त्या गटाचे प्रतिनिधित्व करते." वाचूनच दम लागला ना? म्हणून मग मी त्याचा साधा सोपा असा अर्थ लावला की संस्कृती म्हणजे "धर्म". धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे नव्हे. ही वर सांगितलेल्या विचारधारांची मानवाने त्याच्या सोयीसाठी ठेवलेली नावे आहेत. आता धर्म या शब्दाची एक मजेदार व्याख्या पहा. "धर्म म्हणजे A natural physiological behavioural pattern of a specie. जसे शिकार करणे ही वाघाची नैसर्गिक कृती आहे. म्हणून तो त्याचा धर्म आहे. संस्कृती या शब्दाचा संधी हा "सं + कृती" असा करता येइल. इथे "कृती' म्हणजे समाजातले वागणे, बोलणे, राहणीमान, पोषाख यांच्या आचरण्याच्या पद्धती. "सं" याचा मी घेतलेला अर्थ म्हणजे संतुलीत, संस्कारीत असे म्हणता येइल. अगदी साधा सोपा अर्थ घ्यायचा झाला तर संस्कृती म्हणजे संस्कारीत कृती. A balanced or processed Action. आता संस्कार म्हणजे काय ते पहा. संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीचे, प्रथेचे एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेले परीणाम. ही गोष्ट समजण्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो. पोळी करण्यासाठी प्रथम गव्हाच्या पिठात पाणी घालतो व कणिक मळतो. म्हणजे त्यावर पाण्याचे संस्कार झाले. म्हणजेच त्या पिठाचे कण त्या पाण्यामुळे एकत्र आले, एकमेकाना बांधले गेले. नंतर पोळी लाटतो. म्हणजेच त्या मळलेल्या पिठावर वजनाचे, दाबाचे संस्कार झाले. नंतर ती पोळी तव्यावर टाकतो. नुसती तव्यावर टाकून चालणार नाही. त्याखाली उष्णता हवी. त्याशिवाय पोळी तयार होणार नाही. म्हणजे त्यावर उष्णतेचे संस्कार आले. तसे हे आहे. नुसती कणिक, पाणी, आणि शेगडी किंवा गॅस असे शेजारी शेजारी ठेऊन पोळी तयार होईल का? नाही. हे तीनही संस्कार झाल्याखेरीज ती पोळी तयार होणार नाही. ते परिणाम कसे आहेत म्हणजे चांगले की वाईट हा वेगळा मुद्दा आहे. कारण चांगले आणि वाईट या सापेक्ष गोष्टी आहेत. कशापेक्षा चांगले, वाईट हे कोण ठरवणार? म्हणून चांगले की वाईट या वादात न पडता संस्कारीत कृती म्हणजे काय ते समजून घ्यावे.


आता हे संस्कार आले कुठून? कसे आले? तर मानवाच्या या पृथ्वीवरील अस्तित्वापासून याचा उगम आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून शिकत असतो. तो जे काही शिकतो ते पाहून पाहूनच शिकतो. म्हणजे असे पहा की त्याची आई सतत त्याच्याशी बोलत असते. मग त्याची वाणी विकसीत झाली कि तो आपल्या आईचे शब्द म्हणायला शिकतो. ते मूल जसजसे वाढत जाते, त्याची बुद्धी विकसित होते तसतसे ते मूल आजूबाजूच्या व्यक्ती कश्या बोलतात, ते पाहून त्यांची नक्कल करू लागते. अगदी सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गातली मुले त्यांच्या बाईंची नक्कल करतात. घरी आल्यावर "शाळा शाळा" खेळतात. नंतर ते मूल मोठे होते. पहिली ते पांचवीपर्यंतच्या काळात त्याच्या ज्ञान मिळवण्याच्या कक्षा वाढत जातात. म्हणजे आता तो फक्त आईकडूनच शिकत नाही तर आता शिक्षक, मित्र, मित्र मैत्रिणींचे पालक या सगळ्यांचे अनुकरण करायला सुरूवात होते. आणि मग पांचवीच्यापुढे दहावीपर्यंतचा काळ हा या सर्वांचे संस्कार मनावर, शरीरावर, व्यक्तिमत्वावर कोरले जाण्याचा, पक्के रूजण्याचा काळ असतो. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात झालेले संस्कार पुसले जात नाहीत. बदलू म्हटले तरीही बदलले जात नाहीत. म्हणून हा काळ फार महत्त्वाचा आहे.


माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून प्रगती करत आहे. निरनिराळ्या गोष्टी शिकत आहे. निरनिराळे शोध सतत लावत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसागणीक माणूस प्रगतच होत आहे. आधुनिक युगात विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले आयुष्य सुलभ व कष्टहीन बनवले आहे. एकविसाव्या शतकात कष्टहीनतेच्या नादात सांस्कृतीक बदल होणे अपरिहार्य आहेत. परंपरागत चालत आलेल्या चाली रीती बदलणार नाहीत. बदलेल ते त्यांचे सादरीकरण. पूर्वीच्या काळी देवाची पूजा अर्चा यांचे खूप प्रस्थ असे. आता कालानुरूप त्याचा कालावधी कमी झालाय. पूर्वी गुरूजी पूजा सांगत असत. आता त्यांची जागा स्त्री पुरोहितांनी घेतली आहे. पूजेतल्या क्रियांचा अर्थ माहीत नसे. गुरूजींनी सांगितले की पाणी हातावरून सोडा की आपण ते सोडतो. पण ते का तसे सोडायचे हे माहीत नसते. त्याचा आता अर्थ सांगितला जातो. अनादी काळातल्या धार्मिक उपचारातला त्याकाळी गरजेचा असलेला पण आताच्या युगात अनावष्यक असलेला भाग गाळून त्यात सुटसुटीतपणा आणला गेला आहे. अर्थात त्यामागे वेळ नाही हे कारण प्रमुख आहे. अजूनही वेळ नसण्याच्या आजच्या आधुनिक संगणकाच्या युगातही आपणाला पूजा वगैरे उपचार करावेसे वाटतात हे संस्कारांचे लक्षण आहे. मग त्याच्या पद्धतीत बदल करतो. हल्ली गुरूजी मिळत नाहीत ही खंत आहे. कारण आता पाठांतराचा जमाना राहीला नाही. त्यातून आंग्लाळलेल्या संस्कृतीत संस्कृत भाषा म्हणजे आणखी अवघडच काम. शब्दोच्चाराचीच पंचईत. त्यामुळे पौरोहित्य हा प्रकार दुर्मिळ होत चालला आहे. पण संस्कार मनावर ठसलेले असल्याने पूजादि कार्ये आणि विधी करायचे तर असतात. मग यजमानानेच पोथी वाचून पूजा सांगणे हे आलं. त्यासाठी सुलभ पोथ्या तयार झाल्या. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने त्या त्या पूजेचे, संस्काराचे सुटसुटीकरण केले. कालानुरूप कालबाह्य झालेले उपचार गाळले. आजच्या काळाला अनुसरून योग्य ते उपचार ठेवले. त्यापुढेही जाऊन त्या त्या पूजेच्या कॅसेट, सी,डी, निघाल्या कि ज्यावरून पूजा सांगितली जाऊ लागली. गुरूजींची गरज संपली. पण परंपरा नाही संपली. संस्कार नाही लोप पावले. त्यांचा प्रभाव कमी नाही झाला. काळाप्रमाणे त्याचे अनुसरण्याचे मार्ग बदलले.

तिच गोष्ट इतर चाली रीतींबद्दल आहे. पोषाखाचे पहा. कसा काळानुरूप पोषाख बदलत गेला. मला आठवतय की मी कॉलेजमधे असताना म्हणजे सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी मुली साड्या नेसून येत असत, मुले मोठ्या बॉटमच्या किंवा बेल बॉटम पँट आणि शर्ट वापरत असत. आता आज साडी अदृश्य झाली आहे. तिचे स्थान आता लग्न समारंभापुरते सीमित राहिले आहे. झब्बा, कुडता , शेरवानी, धोतर, फेटे हे प्रकारसुद्धा लग्न समारंभापुरते मर्यादित राहिले आहेत. हा संस्कृतीतला बदल आहे का? नाही. माझ्या मते हा काळानुरूप झालेला सादरीकरणातला बदल आहे. आपल्या संस्कृतीवरचे हे पाश्चात्य संस्कृतीचे हे आक्रमण आहे हे मात्र नक्की. आपण आंग्लाळलो आहोत. त्याचे हे परीणाम आहेत. पण तरीही काही भागात जिथे या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला नाही अश्या भागात अजूनही आपली परंपरा पाळली जाते. अगदी साधे एक उदाहरण देतो. मला आठवतय कि माझ्या लहानपणी संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावत असत. नंतर परवचा म्हटला जाता असे. म्हणजे, रामरक्षा, मारूती स्तोत्र, "शुभंकरोती...." म्हटले जात असे. पाढे पाठ करून ते यावेळी म्हणायची पद्धत होती. आणि हे सगळे केले नाही तर जेवायला मिळत नसे. आज हे होत नाही. कारण याची ना मुलांना गरज भासते ना त्यांच्या आई वडिलांना. मग मुले साधी साधी बेरजा वजाबाकीची गणिते कॅलक्युलेटरवर सोडवतानाची केविलवाणी दृश्ये बघायला मिळतात. पाहून खेद होतो, कधी कधी राग येतो.



व्यक्तीवरच्या संस्काराचे अजून एक उदाहरण घेउया. लहानपणापासून आपल्यावर म्हणजे माझ्यावरतरी असे संस्कार झाले आहेत की आपल्यापेक्षा वडिलधार्‍या व्यक्तींना खाली वाकून नमस्कार करावा. अगदी पायाला हात लावून नमस्कार करावा. त्यांना मान द्यावा. त्यांच्याशी आदबीने बोलावे. वडिलधारी व्यक्ती म्हणजे फक्त वयाची वडिलकी असे नसून, एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असली तरी जर ज्ञानाने मोठी असली, तरीही त्या व्यक्तीला वडिलधारेपणाचा मान द्यावा अशी आम्हाला मिळालेली शिकवण. पण ही विचारधारा कुठेतरी लोप पावत चालली आहे असे उगाचच वाटून गेले. कारण आजा काल मुले घरात मुक्त वातावरण असल्याने कधी कधी उलटही बोलताना दिसतात. आणि ते पालकांकडून कौतुकमिश्रित हसण्यावारी नेले जाते. आणि मग असे लक्षात आले की हे कालानुरूप बदल झाले असू शकतील. इथे तुम्ही तुमच्या मुलांवर कसे संस्कार करता त्यावर हे अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आचार विचार, वागणूक याना फार महत्त्व आहे. कारण तेच पुढची पिढी उचलणार आहे. माझी प्राजक्ता नावाची एक मानलेली आणि अभिमानास्पद व्यक्तीमत्वाची मुलगी अमेरिकेत आहे. तिने तिच्या मुलावर योग्य आणि चांगले संस्कार केले आहेत. संस्कार केले म्हणजे काय केलय? असं कर, तसं कर, हे कर ते कर, म्हणून ती त्याच्या मागे लागली नाही. तिने कोणतीही गोष्ट मुलाला आग्रहाने किंवा मारून मुटकून शिकवली नाही. तर तिने स्वतःच्या वर्तनाचा वस्तुपाठ त्याच्यासमोर ठेवला. ती स्वतः आपल्या आई बाबाना, आजी आजोबांना, सासू सासर्‍यांना खाली वाकून नमस्कार करते. त्याप्रमाणे तो मुलगा आईचे बघून रोज देवाला नमस्कार करतो, रामरक्षा वगैरे स्तोत्रे म्हणतो. अमेरिकेत जाऊनही त्या मुलीने आपली संस्कृती सोडलेली नाही. ती आंग्लाळलेली नाही. ती स्वत: मनाने भारतीयच आहे, तिच्या सूक्ष्म मनाच्या गाभार्‍यात आपली संस्कृती घट्ट रूजलेली आहे, रूतलेली आहे. मी मागे म्हटलं आहे की आपण वागू त्याचे आपली मुले अनुकरण करतात. आपली वाणी आणि आपली कृती या एकमेकांना पूरक असायला हव्यात. तो चांगला नागरीक व्हावा म्हणून जे संस्कार करायला हवेत ते त्याचे आई वडिल जाणून बुजून आपल्या स्वतःच्या वागणूकीतून करतात. अर्थात ही गोष्ट खरी की त्या मुलांनाही ते घ्यावेसे वाटले पाहीजे. आणि एक गोष्ट नक्की की मुले वाईट गोष्टी चटकन उचलतात. म्हणून संस्कार कोणाचे याला खूप महत्त्व आहे. संस्कार हे चांगले किंवा वाईट असे नसतात. संस्कार हे संस्कारच असतात. ते जिथे रूजणार आहेत ती माती सक्षम हवी. सुपिक हवी. तरच येणारी फळे चांगली असतील. खडकावर बीज रूजणं हा फक्त दैवी चमत्कारच असतो. आणि जर हल्लीच्या काळात जर संस्कारांचे विडंबन झाले असेल तर त्याला प्रामुख्याने दूरदर्शनच सर्वस्वी जबाबदार आहे असेच मी म्हणेन. मग हे आपण बदलू शकत नसू तर "कालाय तस्मैनमः' असे म्हणून मी सोडून द्यायला शिकलोय. असो. मुद्दा हा आहे की आपण अजून संस्कृती सोडली नाहीये. आपण सवलती घेतो आहोत. कधी कधी त्याचा अतिरेक होतो.


संस्कृती संस्कृती म्हणत असताना, सुसंस्कृत असणं म्हणजे काय असाही प्रश्न बर्‍याचवेळा पडतो. सुसंस्कृत असणं याचा अर्थ पाहिला तर त्याला इतर अनेक कंगोरे आहेत. नुसतं लिहायला वाचायला येणं म्हणजे सुशिक्षित असणं. पण सुशिक्षित असलेला सुसंस्कृत असेलच असं नाही. दोन्ही मध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. उच्च विद्याविभूषित असणारा, मोठ्या हुद्द्यावर काम करणारा, गलेलठ्ठ पगार घेणारा मनुष्य सुसंस्कृत असेलच असे नाही. भलेही तो घरी देवाधर्माचं करत असेल, परंतु माणसाशी माणूस म्हणून वागणं जर त्याला जमत नसेल तर तो सुसंस्कृत आहे असं मी म्हणणार नाही. हेच.. एखादा अडाणी, शेतमजूर.. मिळणारे पैसे देवाधर्माच्या नावाखाली न घालता, जर एखाद्या गरजूला देत असेल, बायको-मुलांना सुखी ठेवण्यासाठी धडपडत असेल तर तो सुसंस्कृत आहे असे माझे मत आहे. समाजाला (यामध्ये कुटुंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी, आणि इतर समाज हे सगळेच आले) कोणत्याही प्रकारे त्रास होईल असं वर्तन न करणारा म्हणजे सुसंस्कृत अशी व्याख्या मी माझ्या पुरती केली आहे.
शेवटी संस्कृती संस्कृती म्हणजे आहे तरी काय....?? "जुने ते सोने.." असा सूर न लावता काळानुरूप जे योग्य ते उपयोग्य असे मानले तर सामाजिक जाणिवेची संस्कृती जपणं म्हणजे संस्कृती !! "कालाय तस्मै नम:" म्हणताना आपणही त्या बदलत्या काळाचा एक भाग आहोत हे विसरून कसं चालेल? बरोबर ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा