॥ आरोग्यं धनसंपदा ॥
आपण मागच्या लेखात मानवी मनाचे व्यापार आणि त्याचे महत्त्व पाहिले होते. या लेखमालेचा उद्देश हा आपले दैनंदिन जीवन ताण तणावमुक्त व्हावे, शारिरीक स्वास्थ्य लाभावे हा आहे. आणि मी त्यावेळी असेही सांगितले होते कि यात मनाचा सहभाग बराच आहे. मन व शरीर एकमेकांवर अवलंबून असणार्या गोष्टी आहेत. एक बिघडले कि दुसरे बिघडतेच. आणि म्हणून दोन्हीचे स्वास्थ्य राहणे गरजेचे आहे. दोन्हीपैकी एक चाक पंक्चर होउन चालणार नाही. आणि दोन्ही तर नाहिच नाही. म्हणून स्वास्थ्याचा विचार करताना दोन्हीचा विचार झाला पाहीजे. दोन्हीचे स्वास्थ्य लाभले तर त्याला "संपूर्ण स्वास्थ्य" म्हणता येइल.
मागच्या लेखात मी म्हटले होते कि आपण मनस्वास्थ्यासाठी योगासनात आसनांचा राजा म्हणता येइल अश्या "शवासना"चा विचार आपण करू. पण नंतर विचार करताना मला वाटले कि त्याही आधी दिनचर्या सांगितली पाहिजे. जेंव्हा आपण दैनंदिन दृष्टीकोनातून स्वास्थ्याचा विचार करतो त्यावेळी पहिली गोष्ट प्रामुख्याने विचारात घेतली पाहिजे ती अशी कि आहार विहार किंवा दिनचर्या. दिनचर्येची व्याख्या अशी कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. शब्दकोषात त्याचा अर्थ सापडेल. पण मला अपेक्षित असलेला अर्थ आणि यालेखमालेचा उद्देश याचा विचार करता मी त्याची व्याख्या अशी केली आहे कि " आपल्या मनाच्या आणि शरिराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने रोजच्या रोज विशिष्ट क्रमाने केलेली कृत्ये." अर्थात अशी कृत्ये कि जी केल्यावाचून पर्याय नाही. आज हे केलं नाही तर चालेल हा निकष ज्या कृत्यांच्याबाबतीत लागू पडणार नाही अशी कृत्ये. एक छोटेसे उदाहरण देतो कि ज्यामुळे क्रम आणि अनिवार्यता या दोन्हीचे स्पष्टीकरण मिळेल. सकाळी फिरणे हे अनिवार्य कृत्यात बसत नाही. सकाळी फिरले तर उत्तमच. पण नाही फिरलात तर तोटा नाही. तोटा होउ शकेल पण तो दीर्घकालिन असेल. पण सकाळी उठल्याबरोबर दात घासणे हे मात्र अनिवार्य कृत्यात बसते. आज दात घासले आहेत. आता तीन दिवस घासले नाहित तरी चालेल. असे चालेल का? नाही. चालणार नाही. म्हणून हे अनिवार्य कृत्यात बसेल. आता एकदा दात सकाळी घासल्यावर नंतर प्रत्येक खाण्यावर दात घासले तर उत्तमच. पण गरज नाही. प्रत्येक वेळी खाण्यानंतर नाही घासले तरी चालतील. मात्र सकाळी उठल्यावर गरजेचे आहे.
आता या दिनचर्येत कशाचा समावेश होउ शकेल ते पाहू. आयुर्वेदात याला आहार विहार म्हणतात. आहार म्हणजे खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळावगैरे. आणि विहार म्हणजे हालचाल, राहणीमान व इतर दैनंदिन कृत्ये. मगाशी आपण स्वास्थ्य या एका शब्दाचा उल्लेख केला. स्वास्थ्य हे 'स्वस्थ' या शब्दाचे रूप आहे. जरा विचार करायला लावणारी एक गोष्ट सांगतो. एखादी व्यक्ती शरीराने सुदृढ आहे, मनाने स्वस्थ आहे. मग त्या व्यक्तिला आरोग्यसंपन्न म्हणता येइल का? जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) स्वास्थ्याची काय व्याख्या केली आहे पहा. "अशी अवस्था की ज्यात शारीरीक, मानसिक आणि अध्यात्मिक समाधान लाभले आहे." ( It is a state of physical, mental and spititual well being.) यातल्या अध्यात्मिक या भागावर आपण सध्यातरी चर्चा करणार नाही. फक्त त्यासंदर्भात काही गोष्टी सांगतो. शारीरीक आणि मानसिक या शब्दाबरोबरच अध्यात्मिक या शब्दालाही खूप महत्त्व आहे. "अध्यात्म म्हणजे चित्ताचे समत्व" असे ज्ञानेश्वर म्हणतात. हे काय आहे ते समजाऊन सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात कि "समत्व म्हणजे जेथे मन आणि बुद्धिचे ऐक्य झाले आहे अशी अवस्था." सध्याची उपचारपद्धति पाहिली तर असे लक्षात येइल कि आधुनिक वैद्यक शरीराचा मळ काढून टाकणे, शरीरावरील आणि मनावरील आघातांची तीव्रता कमी करणे यातच समाधानी असते. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेले चित्तचे समत्व इथे नाहीच. आधुनिक वैद्यकात चित्त ही संकल्पनाच नाही. आधुनिक वैद्यक मन यापलिकडे जातच नाही. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि अंतःकरण यामुळेच शरीराचे व्यापार चालू राहतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त पहिल्या दोनांवरच आधुनिक वैद्यकात सध्या उपचार करतात. तिसर्यावर त्यांच्याकडे उपाय नाहीत. पण अंतःकरण किंवा चित्ताचा विचार योगशस्त्रात होतो. आणि या विचाराचा अभ्यास हा वेगळा विषय आहे. त्याबद्दल नंतर चर्चा करू. सध्या दिनचर्या यापुरतीच चर्चा मर्यादित ठेउ.
यावर आयुर्वेदात सखोल चर्चा आहे. आहार-विहाराचे बरेच नियम सांगितलेले आहेत. काय करावे, काय करू नये याचा दीर्घ विचार त्यात आहे. मी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे हे ग्रंथ अतिप्राचिन आहेत्. त्यामुळे त्यातील आहार विहाराच्या कल्पना त्या काळच्या आहेत. आजच्या काळासाठी त्या कालबाह्य असतील. पुन्हा त्यातले आजच्या काळाला काय अनुरूप करता येइल ते पाहू. त्या काळचे उल्लेख आणि संदर्भ न देता त्याचे आजच्या परिस्थितीनुरूप रूपांतर केले आहे. यातले आपण किती घ्यायचे, काय सोडून द्यायचे, काही गोष्टी कालनुरूप कश्या आज चपखल बसतील याचे बदल कसे करायचे ते तुम्ही ठरवायचे आहे.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. प्रातःविधीनंतर वड, करंज वगैरे झाडाच्या कडू तुरट तिखट रसाच्या मऊ मृदू टोकांच्या काड्या हिरड्यांना न दुखवता चावाव्यात. आजही गुजराथी लोक हे करतात. याला "दातण" म्हणतात. आधुनिक काळात याची जागा "ब्रशिंग"ने घेतली आहे. परिणाम एकच. मुख आणि दांत स्वच्छ व्हावेत. खाण्यानंतर दांतात काही अन्नकण अडकून राहतात. सर्वसामान्यपणे आपण रात्री जेवणानंतर दांत ब्रशने घासत नाही. (हे वाचल्यावर काहीजण म्हणतील आम्ही घासतो. एकदम मान्य. म्हणूनच मी सर्वसामान्य हा शब्द वापरला.) अशावेळी या दांतात अडकलेल्या कणाचे दुर्गंधीत रूपांतर होते. मी या लेखात दिनचर्येची व्याख्या सांगताना म्हटले होते त्याप्रमाणे रात्री दांत घासणे हा दिनचर्येचा भाग होउ शकणार नाही, ते एक शरीराला लागलेले चांगले वळण असेल. पण सकाळी उठल्यावर दांत घासणे हा दिनचर्येचा भाग होइल.
यानंतर आयुर्वेदाने सांगितलेला उपचार म्हणजे सर्वांग अभ्यंग. अभ्यंग म्हणजे तेलाने मर्दनकरणे. यासाठी निरनिराळी औषधीसिद्ध तेलं वापरायला सांगितली आहेत. आजच्या जगात हे शक्य नाही. हा प्रकार आज काल फक्त बाळंतिणिच्याबाबतीत केला जातो. पण याचा ग्रंथोक्त उपयोग असा सांगितला आहे कि याने वार्धक्य, श्रम, वात यांचा नाश होतो. दृष्टी स्वच्छ होते. आयुष्य वाढते. यानंतर व्यायाम सांगितला आहे. व्यायाम कधी करावा, किती करावा, कोणी करावा तसेच अति व्यायामाचे दुष्परिणाम याचे विस्तृत विवेचन प्राचीन ग्रंथातून आढळते. अतिव्यायामाने तृष्णा, श्रम, श्वास, ग्लानी, शक्तिपात, खोकला आणि प्रसंगी वांतीही उत्पन्न होऊ शकते.
नंतर येतो तो क्रम स्नानाचा. स्नान करताना ऊन पाणी वापरावे. ऊन पाण्याने स्नान करताना गळ्याखालून स्नान करावे. केसाला आणि मस्तकालामात्र थंड पाणी वापरावे. कारण ऊन पाण्याने डोक्यावरून स्नान केल्यास केसांस आणि दृष्टीस धक्का पोहोचतो. स्नान कधी करू नये याबद्दल सांगताना म्हटलं आहे कि स्नान भोजनानंतर तसेच ज्वर व इतर विकारांत करू नये.
भोजन कोणत्या काळी, कोणाबरोबर करावे याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वेही या ग्रंथातून सांगितली आहेत. सध्या ही कालबाह्य असली तरी त्यातला घेण्यासारखा भाग म्हणजे भोजन शांतपणे बसून, सावकाश आणि चवीने घ्यावे. घाई गडबड केल्याने अपचनाचा धोका होऊ शकतो. ग्रंथातून चर्चा करताना त्यात काय खावे, कोणत्या काळात खावे, कोणत्या ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये याची सखोल चर्चा केलेली आहे. उदाहरणादाखल एक दोन गोष्टी सांगतो. थंडीत (हेमंत ऋतुत) खूप भूक लागते व म्हणून अशावेळी मधुर आम्ल, लवण रसाचे तसेच स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. परंतु उन्हाळ्यात म्हणजे वसंत आणि ग्रीष्म ऋतुत उन्हामुळे शरीरातील कफदोष कमी होऊन वायुदोषाची वृद्धी होते. म्हणून या काळात तिखट, खारट व आंबट पदार्थांचे सेवन अत्यल्प प्रमाणात करावे तसेच व्यायामही करू नये.
थोडक्यात वाग्भटाचार्यांच्या शब्दात सांगायचे तर :
" नक्तं दिनानि मे यान्ति , कथंभूतस्य संप्रति ॥
दु:खमांग न भवत्येवं , नित्यं सन्निहितस्मृती: ॥
इत्याचारः समासेन, यं प्राप्नोति समाचरत ॥
आयुरारोग्य ऐश्वर्यं यशोलोकांश्च शाश्वताम ॥
म्हणजे
" मी काय करतोय, कोठे आहे, माझे वय काय, माझे मन कोठे गुंतले आहे हे क्षणोक्षणी ध्यानात असू द्यावे, म्हणजे दु:ख होत नाही. हा थोडक्यात सदाचार सांगितला आहे. याप्रमाणे जो आपली वर्तणूक ठेवेल तो दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्यं, यश अणि मोक्ष पावेल."
पुढील लेखात मन आणि शरीर यांच्या स्वास्थ्यासाठी योगाच्या माध्यमातून सहज सुलभ काय करता येइल हे पाहू.
॥ ॐ तत्सत ॥
॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा