मागिल काही लेखात आपण दिनचर्या आणि काही आसने पाहिली. त्या आसनांचे परिणाम आणि उपयोग मी सांगितले होते. त्यावेळी मी असेही म्हणालो होतो की प्रत्येक आसनाचा स्वतंत्ररीत्या उपयोग सांगणे कठीण आहे. मागिल लेखात जी आसने पाहीली त्यात आपण विपरीत करणी या आसनचा विचार केला नव्हता. म्हणजे ते राहून गेले नव्हते. मी ती आसने सांगताना हे आसन गाळले होते. कारण त्यात आणि शवासनात थोडासाच फरक होता. म्हणून त्याचा स्वतंत्र विचार केला नव्हता. या लेखात त्याचा विचार नंतर करुया.
या सर्व आसनांबद्दल लिहिताना त्या त्या आसनाचा उपयोग सांगितला होता. त्यावेळी मी म्हटले होते की प्रत्येक आसनाचा स्वतंत्र परिणाम सांगणे अशक्य आहे. या सर्व आसनांच्या एकत्रित परिणामाचा विचार केला पाहिजे. आणि त्यावेळी एक गोष्ट सांगितली नव्हती. ती सांगतो. ती म्हणजे ही सर्व आसने काहीही झाले नसताना , काहीही होऊ नये म्हणूनही करावीत. सर्वसाधारण स्वास्थ्यासाठीही ही आसने करावीत. सर्वसामान्य स्वास्थ्यासाठी किंवा ही आसने ज्यासाठी सांगितली आहेत त्यासाठी करताना काही शंका उपस्थित होतील. त्यासंबंधी पाहूया. सर्वप्रथम नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे आसने कधी करावीत. कुठे करावीत वगैरे.
सर्वसाधारणपणे सकाळी आसने करावीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी वातावरण स्वच्छ असते. वाहनांनी सोडलेल्या धूराचे साम्राज्य नसते, माणसांची वर्दळ अजिबात नसते. वातावरणातली धूळ जमिनीवर बसलेली असते. त्यामुळे हवा शुद्ध असते. शिवाय आपल्याकडे येणार्या लोकांची वर्दळही नसते. त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपणास आसने करता येतात. संध्याकाळी वाहने माणसे यांच्या रहदारीमुळे वातावरणातले प्रदूषण वाढलेले असते. म्हणून सहसा हा योगाभ्यास संध्याकाळी करू नये. अर्थात आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण वगैरेमुळे सकाळी वेळ होणे शक्य होईल असे नाही. मग त्यांनी हा अभ्यास करायचा नाही का? करायचा. अवष्य करायचा. संध्याकाळी करायचा. मी फक्त योग्य वेळ सांगितली. मग संध्याकाळी आसने करायची असतील तर वेळ निवडताना शक्यतो अशी वेळ निवडावी की हा अभ्यास करताना कोणाचा व्यत्यय येणार नाही. तुम्ही सुरूवात केली आणि बेल वाजली, कोणीतरी आले. असे झाले की मग ते जे एक वातावरण निर्माण झालेले असते ते बिघडते. आपल्या आसनांची, आपल्या आसनात जाण्याच्या मनस्थितीची, लय बिघडते. एक मजेदार उदाहरण सांगतो. क्रिकेटची आवड असणार्यांना हे पटकन कळेल. एखादा फलंदाज सुंदर खेळत असताना मधेच शीतपेये आली की त्याची एकाग्रता भंग पावते, लय सुटते आणि तो नंतर लगेचच बाद होतो. तशी आपल्या मनाची एकाग्रता भंग पावते. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण हा अभ्यास करणार ती खोली बर्यापैकी मोकळी असावी. हवेशीर असावी. त्यात खेळती हवा असावी. कसे आहे की पंखा लावला की हवा खेळेल की. पण जर खोलीत सामानाची फार गर्दी असेल तर पंखा लावूनही हवा खेळती राहणार नाही. जरी खिडक्या असल्या तरी. आता, १ बीएचके, २ बीएचके च्या युगात हे जरा कठीणच आहे हे मला मान्य. पण नक्की काय असावे हे जर कळले तर आपण त्या दिशेने त्यातल्यात्यात साध्य करण्याचा प्रयत्न करू शकू. कोणत्याही योगाभ्यासात शरीर आणि मन याला महत्त्व आहे. आणि म्हणून या योगाभ्यासाचा मानसिक आणि शारीरीक आनंद, जर हा अभ्यास विनाव्यत्यय झाला तर घेता येईल आणि त्याचा योग्यतो उपयोग होईल. हा योगाभ्यास करताना शांतता असावी. संगित ऐकत योगासने करू नयेत. आणि संगित हवेच असेल तर ते इतपत असावे की कानावर काहीतरी सूर पडत आहेत. पण ते काय आहेत ते कळत नाहीये. भाजी आमटीतल्या मिठासारखे आहे हे. मीठ जास्त झाले तर पदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. त्या मिठाकडेच लक्ष जाईल. पण जर मीठ योग्यप्रमाणात असेल तर त्यामिठाचे अस्तित्व जाणवणार नाही. पण पदार्थाचा आस्वाद घेता येईल. संगीत वाद्य संगीत असावे. कंठ्य संगीत असू नये. कारण मग आपल्या शरीरावर लक्ष न राहता त्या संगितावर लक्ष केंद्रित होईल. मंद आवाजात रवीशंकरांची सतार, किंवा हरीप्रसादांची बासरी, किंवा शिवकुमारांचे संतूर असे असावे. की ज्यायोगे वातावरणही प्रसन्न असेल आणि आपल्याला आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. जे या अभ्यासच्या परिणामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
दुसरा प्रश्न मम्हणजे पोषाख काय असावा. महत्त्वाचे म्हणजे पोषाख हा सैलसर असावा. पुरूषानी "टी शर्ट" आणि ट्रॅक सूट पेहेरावा. स्त्रियांनी पण असाच पोषाख करायला हरकत नाही. पण याला पर्याय म्हणून सलवार कुडता हरकत नाही. बाकी इतर साहित्य त्यात्या आसनात आले आहेच.
तिसरा लोकप्रिय प्रश्न म्हणजे काय खावे. म्हणजे या व्यायामाआधी खाल्ले तर चालेल का? त्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही आहे. कसे ते सांगतो. खाल्ले तर चालेल. कारण या सर्व स्थिती स्थिर अवस्था असल्याने खाण्याचा संबंध येत नाही. पण खाल्ले तर सामान्यपणे आपल्या मनावर पेंग येते. झोप लागण्याची शक्यता असते. म्हणून खाऊ नये. पण खायचेच असेल तर त्याला पर्याय असा की हा अभ्यास करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हलका आहार घ्यावा.
नंतरचा येणारा प्रश्न म्हणजे किती वेळ आसने करावीत? खरे तर याचे निश्चित उत्तर देणे अवघड आहे. सर्वसामान्यपणे ढोबळमानाने रोज तासभराचा सराव करावा. आणि प्रत्येक आसनाला कमीतकमी १५ मिनिटे तरी द्यावीत. आता १५ मिनिटे दिल्यास तासात ही सर्व आसने बसणार नाहीत. मग तासाभरात आसने करून मग १० मिनिटे शवासन करावे. हे वेळेचे गणित ज्याचे त्याने ठरवायचे आहे. तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ, आणि हा योगाभ्यास करण्याची तुम्हाला कितपत गरज वाटते आहे, किती निकड आहे त्यावर हे अवलंबून आहे. कशाला प्राधान्य द्यायचे - आपल्या प्रकृतीला की काम आणि पैसा याला हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
आणि आता थोडेसे विपरित करणी या स्थितीबद्दल पाहूया. बरीचशी शारीरीक दमणूक झाली कि या आसनात बरे वाटते. तसेच उच्च रक्तदाब असणार्या व्यक्तींना रक्तदाब वाढलेल्या काळात या आसनात आराम मिळतो. या आसनात कसे जायचे हे दाखवणारी दोन चित्रे दिली आहेत. त्या चित्रावरून सहज कळेल की त्या अवस्थेत कसे जायचे. बाकी इतर माहिती मागील लेखात आली आहे. म्हणून फक्त चित्रे इथे दिली आहेत.
या अवस्थेत १५ मिनिटे ते अर्धा तासपर्यंत राहता येते. शरीर अणि मनावर आलेला थकवा, मरगळ याने दूर होण्यस मदत होते. चांगली विश्रांती मिळते. ह्रदयविकार असणार्या व्यक्तींना गुरुत्वाकर्षणामुळे ह्रदयावर येणारा ताण या आसनात कमी होतो.
या पुढील लेखात आपण पुन्हा एकदा दिनचर्या, पथ्यापथ्य यावर चर्चा करू.
॥ ॐ तत्सत् ॥
॥ जय श्रीराम ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा