आरोग्यं धनसंपदा 2
मागच्या लेखात आपण दैनंदिन जीवनात कोणत्या मानसिक आणि शारिरीक ताणाला सामोरे जात असतो याचा थोडक्यात आढावा घेतला होता आणि त्यावेळी म्ह्टले होते की पुढील लेखात मानवी मन, मनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व वगैरेचा विचार करु.
खरंतर मानवी मन या विषयाला हात लावणं हा थोडस धाडसी विचार आहे हे मान्य. भल्या भल्या महान मंडळीनी त्यावर संशोधन केले आहे. त्यावर मी बोलणे कितपत योग्य आहे हा एक विचार आहे. म्हणून आधीच एक गोष्ट सांगतो की मी यातला तज्ञ नाही. पण मला आलेले अनुभव व मी जे काही शिकलो आहे त्यावर हे सर्व आधारित आहे.
मानवी मन ही एक अतिशय गुंतागुंतीची गोष्ट, वस्तू आहे. आता वस्तू म्हटलं की तिथे त्रिमीतीच्या व्याख्या आल्या. जडत्त्व आलं. कोणतीही जड वस्तू ही त्रिमीतीच्या माध्यमातून आपणांस समजू शकते. त्याला आकार आला म्हणजे लांबी, रुंदी, जाडी आली. रंग, रुप आलं. वास, चव हे ही गुण काही प्रमाणात चिकटले. कोणतीही जड वस्तू ही शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यां माध्यमांतून आपणांस समजू शकते. तिचे ज्ञान होते. ती वस्तू दाखवता येते. पण मनाचे तसे नाही. जसं आयुर्वेदात शरीरशास्रात सांगितलं आहे की आपलं जड शरीर त्रिदोषांपासून बनलेले आहे. त्रिदोष म्हणजे कफ, वात, पित्तदोष. आपल्याला सर्वसाधारणपणे माहित असलेले कफ म्हणजे खोकला किंवा थुंकीतून पडणारा कफ नव्हे, वात म्हणजे पोटातून येणारे गुडगुड आवाजही नव्हेत, किंवा पित्त म्हणजे बाईल नाही. "दोष" ही संकल्पना आहे, दोष म्हणजे डिफेक्ट्स नव्हेत. ते दाखवता येत नाहीत. त्याचे शरीरावरचे परिणाम दिसतात. शरीर हे या तीन दोषांची संतुलित अवस्था आहे. यातील एकाचे जरी संतुलन बिघडले तरी व्याधी निर्माण होते. तसे मनाचे आहे. मन दाखवता येत नाही. तरी त्याचे अस्तित्व त्या त्या व्यक्तिला जाणवते. एका व्यक्तिला दुसरया व्यक्तिच्या मनाचे अस्तित्व जाणवत नाही, समजत नाही. समजतात ते परिणाम. मनाचे शरीरावरचे परिणाम दिसतात, जे समजताना कधी कधी आपल्या मनाचे आपल्याच शरीरावरचे परिणाम समजत नाहीत. पण दुसर्याच्या न दिसणार्या मनाचे त्या व्यक्तिच्या शरीरावरचे, वागण्यातले परिणाम मात्र दिसतात.
स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवनात शरीर आणि मन या दोन्हीच्या स्वास्थ्यास महत्त्व आहे. दोन्हीपैकी एकाचे जरी स्वास्थ्य बिघडले तरी आपले जीवन दु:खी होऊ शकते. म्हणजे शरीर त्रास देत असेल तर मनस्वास्थ्य बिघडेल आणि मन थारयावर नसेल तर शरीराकडे दुर्लक्ष होऊन त्याचेही स्वास्थ्य बिघडते. आणि म्हणून स्वास्थ्यासाठी जेव्हा योगसाधनेचा विचार होतो तेव्हा शरीर व मन या एकमेकांवर अवलंबून असणार्या वस्तूंना महत्त्व आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वस्तू म्हटल्यावर जडत्त्व आलं. म्हणजेच शरीर आणि मन या दोन्ही जड स्वरूपीच आहेत. फक्त मन हे सूक्ष्म आहे आणि य दोन्हींना बांधून ठेवणारा आत्मा हा मात्र चैतन्यरुपी आहे. आत्म्याच्या अस्तित्त्वानेच मन व शरीराला अस्तित्त्व आहे. पण सामान्यपणे आपण आत्म्याच्या बाबतीत काहीच करु शकत नाही. ती एक उर्जा आहे. म्हणून मग आत्म्याचे अस्तित्त्व असेपर्यंत या उरलेल्या दोघांना सांभाळून, अंजारुन गोंजारुन आपले आपल्या हातात असलेले जीवन आपणास सुखी करता येईल.
शरीर जड असल्याने क्षर आहे. क्षर म्हणजे झीजणारे, जीर्ण होणारे आहे. पण मनाचे तसे नाही. मन अत्यंत अस्थिर, चंचल असते. मन स्थिर झाले कि त्याला आपण चित्त म्हणतो. मन हे अत्यंत शक्तिमान आहे. पण जोपर्यंत ते स्थिर होत नाही तोपर्यंत ते शरीराच्या द्रुष्टीने कोणतेही विधायक कार्य करु शकत नाही. जसे पाण्याच्या वाफेत प्रचंड शक्ति आहे, पण ती वाफ बाहेर जाऊ दिली तर ती शक्ति वायाच जाते, नाही का? पण जर ती वाफ कोंडली, तिला दिशा दिली तर तिचे रुपांतर यांत्रिक शक्तित करता येते. तसेच मनाच्या चंचलतेवर ताबा मिळवता आला, नियमनाने एकाग्र करता आले तर शरीरालाही स्वास्थ लाभू शकेल. म्हणून मन एकाग्र करण्याची आवश्यकता आहे, जे योगाच्या माध्यमातून साधता येते. याच माध्यमातून शरीर आणि मनाचि शक्ती विकास पावू शकते.
आता आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार करायचा झाला तर सर्व प्रथम आपण ''ताण - तणाव'' म्हणजे काय ते पाहूया. ताण या शब्दाची साधी-सोपी व्याख्या अशी करता येईल "अशी अवस्था ज्यामुळे आपली कार्यशक्ती आणि कार्य यांचे प्रमाण व्यस्त होईल. आणि त्यात कार्य हे कार्यशक्तीपेक्षा नेहमीच अधिक असेल'' म्हणजे मग वेळेत काम पूर्ण झाले नाही तर मग मनाशी निगडीत अशा व्याधी उदा. चिंता, काळ्जी, भूक हरपणे व त्या बरोबर शारिरीक व्याधीही चिकटतील.
अशावेळी त्या शरीराला आणि मनाला सर्वप्रथम विश्रांती मिळेल त्या शरीर-मनाची उत्तेजित अवस्था ( डिस्टर्ब्ड स्टेट ) कमी होऊन शांतता आणि स्वास्थ्य लाभेल अशा गोष्टींची गरज आहे. शरीरास स्वास्थ्य आहार विहारातून लाभू शकेल. पण मनाच्या शांततेसाठी, स्वास्थ्यासाठी मात्र ''योगाचीच'' मदत घेणे जरूरीचे आहे.
आणि मनाला स्वास्थ्य देऊ शकेल अशा आसनांचा राजा म्हणता येईल असे आसन म्हणजे 'शवासन'. वास्तविक आपल्या आहार विहारात आसनांच्या शेवटी विश्रांतीसाठी हे आसन करायचे असते. पण आत्ता मनाचा विचार करत असल्यामुळे हे आसन सर्वप्रथम सांगणार आहे.
या पुढच्या भागात आपण मनाला स्वास्थ्य देऊ शकतील अशी काही निवडक आसने आणि शवासन हे, कसे करायचे, पद्ध्ती, वेळ, स्थान वगैरे द्रुष्टीने यावर चर्चा करु.
ॐ तत्सत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा