" अगा वैकुंठीच्या राया....."
भीमसेनी स्वर मंडपात घुमले आणि सवाई गंधर्व महोत्सवाचा मंडप एकदम चित्रासारखा स्तब्ध झाला. जवळ जवळ १२००० श्रोते पुतळ्यासारखे बसून कानात प्राण आणून ऐकत होते. भान विसरले होते. त्या सुरात ताकदच इतकी जबरदस्त होती की मंडपाबाहेर चहाच्या स्टॉलवरची वेळ घालवणारी, रेंगाळणारी मंडळीही लहान मुलांच्या "स्टॅच्यू"च्या खेळासारखी, आहेत तशी स्तब्ध झाली. भीमसेनजी भान हरपून गात होते आणि श्रोतेही तितकेच भान विसरून ऐकत होते. मी नेहमी जे माझ्या मित्रांना म्हणत आलोय आणि अजूनही म्हणतो त्याचा प्रत्यय आला, की भीमसेनांचे सर्वोत्कृष्ट गाणे ऐकायचे असेल तर फक्त सवाई गंधर्व महोत्सवामधले गाणे ऐकावे. मला वाटते की त्याचे कारण असे असावे की ते श्रोत्यांच्या टाळ्यांसाठीचे, "वन्समोअर"चे गाणे नव्हते, तर ती गुरुंना वाहिलेली श्रद्धांजली होती. ती तिकीट लावून केलेली लक्ष्मी क्रीडा मंदीर किंवा टिळक स्मारक मधली मैफल नव्हती, तर ती गुरूची सेवा होती. या महोत्सवाला नुसते प्रसिद्धीचे वलय नसते तर यातील वातावरण भारीत असते. निराळेच असते. मुंबईचे गुणिदास संमेलन घ्या, दिल्लीच्या इंडिया गेटवरचा कार्यक्रम घ्या, किंवा कलकत्त्याचा आय.टी.सी. महोत्सव घ्या, सवाईचे भारीत वातावरण तिथे नसते. आणि म्हणून बडे बडे कलाकार इथे येण्यात बहुमान समजतात. उत्सुक असतात. पंडितजींच्या आमंत्रणाची वाट बघत असतात. मानधनाचा विचार न करता केवळ पंडितजींच्या शब्दासाठी येणारे कलाकार आहेत. वसंतराव देशपांडे तर घरचे कार्य असल्यासारखे सवाईत वावरत असत. यावातावरणातल्या प्रसन्नपणाची एक मजेदार गोष्ट सांगतो. त्यावेळी कार्यक्रम रेणूका स्वरूप शाळेच्या पटांगणावर होत असे. प्रत्येक रात्री श्रोत्यांवर गुलाब पाण्याचा फवारा उडवला जात असे. संपूर्ण मंडपभर.
वसंतराव आणि पु. ल. देशपांडे यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. १९७० किंवा १९७१ चा सुमार असावा. नक्की सन आठबत नाही. सवाई गंधर्व महोत्सवाच्या काळात पु. ल. यांचे "बटाट्याची चाळ" आणि "असा मी असामी" चे पुण्यात प्रयोग होते. रात्रीचा प्रयोग झाला की पु. ल. सवाईच्या मंडपात येउन बसत असत. महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. शेवटी भीमसेनांचे गाणे आणि त्याआधी वसंतराव. त्यादिवशी पु. ल. वसंतरावांना हार्मोनियमच्या साथीला बसले. दीड तास वसंतराव अफाट गायले. नंतर भीमसेनांचे गाणे होते. पु. ल. मुकाट्याने उठून प्रेक्षकात जाऊन बसले. भीमसेन स्वरमंचावर आले. इकडे तिकडे पाहिले. प्रेक्षकात पु. ल. दिसल्यावर, भीमसेन स्वरमंचावरून खाली आले, पु. लं चा हात धरून त्याना सन्मानाने स्वरमंचावर घेउन आले आणि हार्मोनियमवर साथ करण्याची विनंती केली. नंतर भीमसेनांचे जवळ जवळ पावणे दोन तास अफलातून गाणे. गाणे संपल्यावर छप्पर फाटेल असा टाळ्यांचा झालेला कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आहे.
भीमसेन या महोत्सवाचा प्राण आहेत. खरेतर भीमसेन हे भारतीय संगीताचा प्राण आहेत. मी १९६१-६२ च्या सुमाराला गाणे ऐकायला सुरूवात केली. मी तेंव्हा मुंबईत राहत होतो. वडिलांच्या आग्रहावरून विलेपार्ल्याला लोकमान्य सेवा संघात भीमसेनांची मैफल प्रथमच ऐकली. आणि त्यावेळीही शास्त्रिय संगीतातले शून्य कळण्याच्या काळात जे ऐकले ते भन्नाट वाटले. आजही काही कळतय आहे असे नाही. त्यावेळी जितके कळत होते, किंबहुना जितके कळत नव्हते, तितकेच आजही कळत नाहीये. पण तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली होती ती ही की, मंत्रमुग्ध होण्यासाठी संगीत कळण्याची जरूरी नाही. आणि हे माझे मत आजही कायम आहे. यमन कल्याण किंवा तोडीचा आनंद घेण्यासाठी, हंसध्वनी किंवा शुद्ध कल्याणसारख्या मन प्रसन्न करणार्या मैफलीचा आनंद घेण्यासाठी त्या रागाची सरगम किंवा स्वरमांडणी माहित असण्याची गरज नाही. उत्कृष्ट श्रीखंडाचा आस्वाद, आनंद, हा चक्क्यातले "फॅट" % कळले तरच घेता येतो का? नाही. " वा वा. श्रीखंड फारच मस्त झालय" असं आपण म्हणतो. पण त्याचबरोबर " चक्क्यात फॅट % किती आहे हो?" असे विचारत नाही. श्रीखंड खाण्याने मिळणारा आनंद पुरेसा असतो. तसे आहे हे.
आणि मग ऐकायची भूक वाढत गेली तसतसे इतर कलाकारही ऐकायला लागलो. त्यात वसंतराव देशपांडे हा अवलिया कलाकार भरभरून ऐकला. वसंतराव हे एक अजब रसायन आहे. ख्याल, नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा, गझल, भावगीत, सिनेसंगीत वगैरे सर्व क्षेत्रात मुक्तपणे आणि तितक्याच समर्थपणे संचार करणारे हे कलंदर व्यक्तिमत्व. वसंतराव खरे नावारूपाला आले आणि लोकप्रिय झाले ते " कट्यार..."मुळे. इतके दिवस फक्त गायक म्हणून श्रोत्यांना ठाऊक असलेले वसंतराव, नट म्हणून प्रेक्षकांपुढे "कट्यार काळजात घुसली" मधून आले. आणि प्रचंड गाजले. त्यांचे "कट्यार ...." लोकानी डोक्यावर घेतले. पण तरीही वसंतरावांच्या अफाट कर्तृत्वाला योग्य ती प्रसिद्धी मिळाली नाही. म्हणून मी त्यांना "शापित गंधर्व" म्हणतो. बडी बडी टीकाकार म्हणवणारी मंडळी या सिद्धहस्त कलाकाराला गायक मानायला तयार नव्हती. इतकच काय तर आकाशवाणीनेही त्याना गायक म्हणून मान्यता दिली नाही. पुणे आकाशवाणीतल्या एका निवृत्त अधिकार्यांना भेटायचा योग आला होता. ते आकाशवाणीचे "राजापेक्षा राजनिष्ठ" नोकर होते. वसंतरावांचा विषय निघाला. वसंतरावाना आकाशवाणीने मान्यता का दिली नाही असे विचारता त्यांचा चेहेरा एरंडेल प्यायल्यासारखा झाला. तेंव्हाच त्यांची आकाशवाणीवरची "राजनिष्ठा" लक्षात आली. त्यानी अंगावरून झुरळ झटकावे तसा तो विषय झटकून टाकला. फक्त इतकेच गुळमुळीत उत्तर दिले की त्यांचे स्वर शुद्ध नव्हते. गाणे तुटक तुटक असे. मी त्यावर म्हणालो की "मग कुमारजी सुद्धा तुटक तुटकच गातात की". पण त्या गृहस्थांना, ते निवृत्त का होईना पण सरकारी सेवक असल्याने माझे म्हणणे आवडले नाही. त्यांच्याकडे त्याचे समाधानकारक उत्तर नव्हते. राजनिष्ठ नोकर असल्याने आकाशवाणी म्हणते ते बरोबरच असले पाहिजे इतकेच त्यांना ठाउक होते. म्हणून मग त्यांनी "कुमार गंधर्वांची गोष्ट वेगळी आहे. त्याना एकच फुफ्फुस आहे. म्हणून त्यांचे असे होते." वगैरे थातुर माथुर म्हणून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आणि मीसुद्धा "हो का? असेल असेल" असे म्हणून उगाच न संपणारा वाद नको, म्हणून तिथून काढता पाय घेतला.
पंडीत जसराजही खूप ऐकले आहेत. जसराजांचा आवाज अतिशय मुलायम. अंगावरून मोरपिस फिरवल्यासारखे वाटावे असा. श्रोत्यांना बांधून ठेवण्याची जबर शक्ती त्या आवाजात आहे. मला आठवतय कि १९७४/७५चा सुमार असावा. सन नक्की आता आठवत नाही. पंडीतजी काही वर्षाच्या अनुपस्थितीनंतर सवाईत गात होते. नुकतेच जीवघेण्या दुखण्यातून बाहेर आले होते. त्यावर्षी ते अफाट गायले. मला वाटते ते "दरबारी" गायले होते. द्रुतची बंदिश "अजब तेरी दुनिया मालिक" संपवली आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आणि त्यानंतर जसराज आणि सवाई गंधर्व महोत्सव हे समीकरण बनले. जोग, गोरख कल्याण, अहिर भैरव, नट भैरव, भैरव, जयजयवंती. आणि गेल्या वर्षी तर शुद्ध सारंग. किती किती मैफली. त्यात झाकिर तबल्याच्या साथीला असेल तर मग जसराज अधिकच खुलायचे.
मी गाणे ऐकायला सुरूवात केल्यानंतरच्या काळात म्हणजे १९६० ते १९८५ या दोन तपात भारतिय शास्त्रिय संगीतावर भीमसेन, जसराज, कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे या चार महान कलाकारांचा जबरदस्त प्रभाव होता. किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, बेगम परवीन सुलताना, उस्ताद अमीरखानसाहेब ही महान मंडळी होती. उ. सलामत अलीखान नझाकत अली खान हेही त्या काळात लोकप्रिय होते. पण त्यांचे कार्यक्षेत्र पाकिस्तानात होतं. रवी शंकर, विलायत खान, हरीप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा वगैरे वाद्य संगीत-दिग्गज मंडळी होती. यांचे महत्त्वा अजीबात कमी होत नाही. पण ही सर्व भारताबाहेर जास्त रमत असत. परदेशात हे कलाकार भारतापेक्षा अधिक लोकप्रिय होते. पण भीमसेन, वसंतराव, जसराज, आणि कुमारजी हा भारतीय संगीताचा प्राण होता असे मला वाटते. चौखांबी तंबू होता जणूकाही. मी म्हणतो त्या काळात या चॉघांनी शास्त्रिय संगीताची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहीली होती.
मला असे वाटते की भीमसेनांचे व्यक्तिमत्व आणि गाणे हे एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे आहे. सर्व कुटुंबाला दिशादर्शक, मार्गदर्शक, आणि कडक शिस्तीचे. सर्वांना संभाळून घेणारे. प्रसंगी कुटुंबप्रमुखाप्रमाणे कानपिचक्याही देणारे. शिस्तीच्यासंदर्भात पंडितजींचा एक मजेदार किस्सा आठवला. मुंबईत एक कार्यक्रम होता. एक मोठे मंत्री दर्जाचे नेते येणार होते. मंत्रीजींना नेहमीप्रमाणे पाऊण तास उशिर झाला. त्यानंतर संयोजकांचे तासभर भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी पंडितजींचा "आजचे प्रमुख कलाकार पं भीमसेन जोशी आहेत." इतकाच उल्लेख केला. बाकी सर्व मंत्रीस्तुती होती. पंडितजींना फक्त २० मिनिटे दिली होती. पंडितजी बरोबर २० मिनिटे गायले. अफाट गायले. त्यानंतर प्रेक्षकांनी आरडा ओरडा केला की अजून गा. पंडितजी जाग्यावरून उठले आहीत. मग मंत्रीजी जाग्यावरून उठले. पंडितजींच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले की, "सर्व प्रेक्षकांची इच्छा आणि आग्रह आहे तरी आपण अजून गावे." पंडितजींनी काय केले असेल? पंडितजींनी आपले घड्याळ मंत्रीजींना दाखवले आणि म्हणाले, "मला २० मिनिटांचा वेळ दिला गेला होता. त्याप्रमाणे गायलो. वेळेची बंधने ही पाळली जावीत असे मला वाटते. आता आणखी गाणे योग्य होणार नाही." असे म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिला. आणि ते गायले नाहित. पंडितजींनी आपल्या गाण्यात फारसे धाडसी प्रयोग केले नाहीत. "धोपट मार्गा सोडू नको" असे त्यांचे गाणे असे. त्यांना कधीतरी विचारले गेले होते की तुम्ही तेच तेच राग मैफलीत का सादर करता? तेंव्हा त्यांनी उत्तर दिले होते की श्रोते मला काय येतय हे पहायला येत नाहीत. माझ्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. श्रोत्यांना आनंद देणे महत्त्वाचे. त्यामुळे त्यांना समजेल, आवडेल असे मी गातो.
त्याउलट वसंतरावांचे गाणे आक्रमक. साहसी. त्यांच्या गळ्यातून अश्या काही मुश्किल स्वरावली बाहेर पडत असत, आणि या जागा ते इतक्या सहजतेने घेत असत कि ऐकणारे चकित होउन जात. वसंतरावांचे व्यक्तिमत्व किंचितसे खोडकर. किंवा शाळेतल्या अतिशय हुशार पण व्रात्य मुलासारखे. जाता जाता टपली मारणारे. खोड्या काढणारे. त्यांच्या गाण्यात आव्हान असे कि "पहा मी किती सहज गातोय ते. तुम्हाल येइल का असे?" किंवा हुशार मुलगा म्हणतो ना की " अरे इतके सोपे गणित येत नाही? पहा कसे सोडवायचे ते." भीमसेनांचे गाणे हे कसोटी क्रिकेट सारखे आहे, तर वसंतरावांचे गाणे हे एकदिवसिय सामन्यासारखे आहे. त्या सामन्याचा जीव फक्त ५० षटकांचा. पण तरीही त्यात क्रिकेटचे तंत्र आत्मसात नसले तर खेळाडू अपयशी ठरेल. तसे वसंतरावांची मैफल ही दीर्घ नसली तरीही तांत्रिकदृष्ट्या अतिशय परीपूर्ण असते. ताना अणि सरगम हे वसंतरावांचे बलस्थान. आणि म्हणूनच वसंतरावांच्या ताना आणि सरगम ही श्रोत्यांना नागाप्रमाणे डोलवत असे. पण वसंतराव फारसे ख्याल गायनात रमत नसत. त्यांचा ख्याल हा जेमतेम ३५ ते ४० मिनिटांचा असे. ते नाट्यगीते, ठुमरी, दादरा, भावगीत अश्या उपशास्त्रिय प्रकारात अधिक खुलायचे. मला या संदर्भात त्यांची न्यूयॉर्कमधली एक मैफल आठवतीये. मी हजर नसलो तरी माझ्याकडे ध्वनिमुद्रण आहे. त्यात वसंतराव जेमतेम अर्धातास "भीमपलास" गायले आहेत. नंतर श्रोत्यानी आग्रह केला "नाट्यगीत म्हणा". त्यावर ते नेहमीच्या त्यांच्या अनुनासिक आवाजात म्हणाले, "नाट्यगीतेच म्हणायची आहेत ना? म्हणतो. पण त्याआधी मी तुम्हाला आमच्या संगीत नाटकाबद्दल सांगितले तर चालेल का?" "हो हो. चालेल चालेल." "तुम्हाला आमच्या नाटकातले संगित कसे असते ते सांगतो व त्याची झलक दाखवतो. आणि मग जसा वेळ असेल तशी काही नाट्यगीते म्हणतो. चालेल?" "हो. चालेल चालेल." " ठीक आहे. मी यासाठी पांच प्रमुख संगित नाटके आधार म्हणून घेणार आहे. की जी मराठी संगित नाटकाचा प्राण समजला जातात. सॉभद्र, मानापमान, शाकुंतल,शारदा आणि मृच्छकटिक. ही ती नाटके." आणि असे म्हणून त्यानंतर वसंतराव तासभर गाण्यासह बोलले आहेत. इथे एक उल्लेख जाताजाता करायचा आहे तो असा कि, पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे या दोघांनी वसंतरावांच्या स्वतंत्र मुलाखती घेतलेल्या आहेत. मुलाखतकाराने कमीतकमी बोलून कलाकाराला अधिकाधिक कसे बोलू द्यायचे असते याचा या मुलाखती म्हणजे आदर्श वस्तुपाठ आहेत. यापैकी वपुंनी घेतलेली मुलाखत ही आलुरकरांनी "मराठी संगीत नाटकाची वाटचाल" या नावाने दोन भागात प्रसिद्ध केलेली आहे. वसंतप्रेमींनी ही मुलाखत जरूर ऐकावी.
कुमार गंधर्वांचे गाणे हा वेगळाच विषय आहे. त्यांचे गाणे हे कानाला अतिशय गोड, सुरेल लागते. पण गूढ. जी.ए. कुलकर्णींच्या गोष्टींसारखे. फ्रेंच भाषा समजत नाही पण ऐकायला गोड. समजायला अतिशय कठिण. तसे. अफाट प्रतिभासंपन्न गाणे. अतिशय सुबक मांडणी. आपल्याला काय सादर करायचे आहे याचा मुद्देसूद आराखडा डोक्यात तयार असावा असे सादरीकरण. त्यांची निर्गुणी भजने लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी काही रागांची निर्मितीही केली आहे. त्यांचे "अनुपरागविलास" हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी निर्माण केलेल्या रागांबद्दल तांत्रिक माहिती आणि त्या रागातल्या चीजा त्यांनी दिल्या आहेत. शास्त्रिय संगिताचा अभ्यास करणार्यांनी हे पुस्तक जरूर अभ्यासावे. पण त्यांच्या गाण्यावर त्यांच्या साथ न देणार्या प्रकृतीचे सावट होते. त्यांच्या ताना थोड्याश्या तुटक तुटक असायच्या. पण असामान्य प्रतिभेच्या जोरावार त्यांनी या त्रुटींवर समर्थपणे मात केली. इतकी कि या गोष्टी, त्यांचे गाणे ऐकताना लक्षातही येत नसत. त्यांचा अतिशय गोड स्वर कानावर पडला की श्रोते भान विसरत असत. गाणे ऐकण्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे गाणे मी ऐकले तेंव्हा मला त्यांचे गाणे शाळेच्या हेडमास्तरसारखे वाटायचे. मुलांना हेडमास्तरांची नेहमी भीति वाटते. पण त्याचबरोबर शिस्त आणि बुद्धिमत्तेचा आदरही असतो. तसे कुमारांचे गाणे ऐकताना मला वाटायचे.
आणि जसराजजींच्या गाण्याबद्दल काय बोलायचे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचे गाणे अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे. अतिशय सुरेल व गोड गळा. तितकेच प्रसन्न व्यक्तीमत्व. गातानाच्या त्यांच्या भावमुद्रा अतिशय लोभसवाण्या असत. वसंतरावांप्रमाणे सुंदर ताना. आणि हातखंडा सरगम. त्यांच्यावर काही जणांचा असा आक्षेप असे की ते फार ठाय लयीत गातात. त्यामुळे त्यांचे गाणे खूप संथ आहे. मला कळत नसल्यामुळे, हे मला फारसे मान्य नाही. माझ्यासारख्या अस्सल कानसेनाला ते गाणे ऐकताना असे वाटते कि त्यावेळी त्या ठाय लयीची गरजच आहे. रागाचा शास्त्राशुद्ध विस्तार, रंजक मांडणी आणि श्रोत्यांना गुंगवून ठेवण्याचे कसब ही त्यांची वैशिष्ट्ये. त्यांचे दुसरे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रागातल्या बंदिशींचे बोल हे यावनी नसतात. हिंदू देवतांच्या स्तुतीपर बोल असतात. मला माहित असलेला अपवाद म्हणजे त्यांची भैरव रागामधली "मेरो अल्ला मेहेबान" ही बंदिश आणि तोडी रागामधली "अल्ला जाने अल्ला जाने" ही बंदिश. इतर असतील तर निदान मला तरी माहित नाहियेत. पण माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे यावनी बंदिशी नाहित. जर असतील तर कृपया जाणकारांनी माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती. जसराजांचे गाणे कधीही आक्रमक वाटलेच नाही. मला ते नेहमी आईच्या मायेसारखे वाटत आले आहे. आपण दु:खात असलो की आईने पदराखाली घेतल्यावर जशी मनाला शांतता मिळते तसे, मला त्यांची मैफल ऐकत असताना आपल्याला आईने पदराखाली घेतले आहे असे मला सारखे वाटायचे. गेल्या काही महिन्यांपूर्वी हा मला अनुभव आला. माझ्यावर माझी प्रिय व्यक्ती सोडून देवाघरी जाण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. त्यावेळी असाच सकाळी फिरायला गेलो असता पंडितजींचा एक नितांतसुंदर भैरव ऐकत होतो. हुबळीतली मैफल होती. ५० मिनिटांच्या त्या मैफलीत हा मला अनुभाव आला. मी पूर्णपणे स्वतःला विसरून गेलो. मी कुठे आहे, काही मला काही आठवत नाही इतका मी ब्लँक झालो होतो. मा़झे सर्व दु:ख तेव्हढ्यापुरते तरी पूर्णपणे मी विसरलो. वास्तविक भैरव हा तसा उग्र प्रकृतीचा, प्रवृत्तीचा राग. इतका उग्र राग हा इतका मुलायम होऊ शकतो यावर इतके दिवस माझा विश्वास नव्हता. त्यादिवशी तो बसला. आणि ही पंडितजींच्या मधुर रेशमी आवाजाची करामत होती.
तर असे हे चार प्राण. पांचवा प्राण अर्थात श्रोते. भारतीय शस्त्रिय संगीत या चॉघांशिवय अपुरे आहे. इतरही खूप कलाकार आहेत. त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचे म्हणजे मालीनीताई राजूरकर, बेगम परवीन सुलताना, पंडित राजन साजन मिश्रा, पंडित जितेंद्र अभिषेकी, किशोरताई आमोणकर, अजय चक्रवर्ती, गुंदेचा बंधू, वीणाताई सहस्रबुद्धे, आरती अंकलीकर. ही सारी दिग्गज मंडळी आहेत. पण या सर्वात सध्या आपल्या गाण्याने श्रोत्यांवर मोहिनी घातली आहे ती अजयजींची बुद्धीवान कन्या कौशिकी चक्रवर्ती. अफाट तयारी, अतिशय सुरेल आवाज, ताल आणि सरगम वर प्रचंड प्रभुत्व या जोरावर ती खूपच लोकप्रिय झाली आहे. तिची मैफल ऐकणे हा एक प्रचंड आनंददायी आणि सुखद अनुभव आहे. विशेषतः तिचा "सुंदर ते ध्यान..." हा अभंग तर खास लोकप्रिय आहे. हा अभंग गाताना ती अमराठी आहे, तिला मराठीचा गंध शून्य आहे हे जाणवतही नाही.
असेच अनेक तरूण कलाकार आहेत की जे बर्याच जणांना ठाऊकही नाहीत. पण अफाट गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. मी ऐकलेल्या काही कलाकारांपैकी गोव्याची आरती नायक ही सुरेल गायिका. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगित अलंकार (एम.ए.) ही पदवी तसेच "सूरसिंगार संसद"च्या सूरमणी पुरस्काराने सन्मानीत, वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठानचा "वामनदाजी" पुरस्कार. अशी ही गुणी कलाकार. अत्यंत सुरेल आवाज, अफाट तयारी, ख्यालाची नेटकी आणि सुबक मांडणी नीटस सादरीकरण ही तिच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये. तिची मैफल ऐकणे हा एक निखळ आनंददायी अनुभव आहे. नाव न सांगता हिचे गाणे ऐकले तर आपण एखाद्या दिग्गज कलाकाराचे गाणे ऐकतोय असे वाटावे. हेमा उपासनी ही मी ऐकलेली आणखी एक तरूण कलाकार. सवाई गंधर्वमधले तिचे गाणे खूपच छान झाले होते.
कुठल्याही मैफलीचा शेवट हा नेहमी भैरवीने होतो. भैरवी हा हुरहूर लावणारा राग आहे. जरी त्यात गाणे संपल्याची आर्त जाणिव असली तरी अशीच मैफल पुन्हा रंगण्याची खात्रीही असते. भैरवीचे हे वैशिष्ट्य आहे. भीमसेनांची "बाबुल मोरा..." असो किंवा " हरीका भेद न पाये..." असो, वसंतरावांचे "ना मारो पिचकारी..." असो ही सर्व हुरहूर लावतात. लावतात. जसराजांचे "निरंजनी नारायणी..." आणि "माई सावरे रंगराची..."तर अतिशय आनंद-भैरवी आहेत. पण मैफलीची सांगता भैरवीने करायची नाही ही गोष्ट सहसा आढळत नाही पण गेल्या महिन्यात कौशिकीची पुण्यातली मैफल मात्र भैरवीशिवाय संपली. लोकांना ती आणखी गाईल असे वाटतानाच तिने प्रेक्षकांना नमस्कार केला आणि रंगपटात निघूनही गेली. नंतर लोकाना कळले की मैफल संपलीये.
तर ही अशी मी सदर केलेली आठवणींची एक मैफल. यात लिहिलेली ही पूर्णतया माझी मते आहेत. सर्व रसिक माझ्यामताशी सहमत असतीलच असे नाही किंबहुना नसतीलच. असे जे रसिक माझ्या मताशी सहमत नसतील अश्या सर्व रसिकांच्या बहुमूल्य मतांचा मी आदर करतो. त्या रसिकांनी आपली मते अवश्य मांडावीत. आणि हे माझे निवेदन हिच माझ्या लेखाची भैरवी आहे.
ॐ तत्सत
khup chhan...........
उत्तर द्याहटवाtoo gud
उत्तर द्याहटवाasa mast mahit denara ani tarihi rochak swatachi mate aslea lekh khup divasani vachayala milala...