शनिवार, २० मार्च, २०१०

आरोग्यम् धनसंपदा - हृदय विकार - भाग २

मागच्या भागात आपण हृदयाची रचना पाहीली. या भागात आपण हृदयच्या विकारची कारणे आणि लक्षणे यांचा विचार करूया. आपण मागच्या भागात पाहीले होते की सर्व शरीराकडून येणारे रक्त प्रथम हृदयात येते. तेथून ते Pulmaonary Artery किंवा महारोहिणीमधून फुफ्फुसाकडे जाते. शरीरातली ही एकमेव Artery की जी अशुद्ध रक्त वाहून नेते. तसेच हे रक्त फुफ्फुसात शुद्ध झाल्यावर ते हृदयाकडे महानीले (Pulmonary Vein) द्वारे येते आणि मग तिथून सर्व शरीराकडे फिरवले जाते. ही महा नीला शरीरातली एकमेव नीला की जी शुद्ध रक्त वाहते. शरीरातल्या बाकी रक्त वाहिन्यात रोहिणी ही शुद्ध रक्त तर नीला ही अशुद्ध रक्त वाहिनी आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या असतात त्यांना Coronory Arteries म्हणतात. ही जरी बाहेरून नेहमीच्या आकाराची दिसली तरी आतून त्यात किटण जमते.आपल्या आहारातले तेल, चरबी (Fat) यांचे किटण असते. या किटणाला Atheroscelerotic Plaque असे म्हणतात. सहाजिकच त्यातून जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. याला Angina Pectoris म्हनतात. या पुढील पायरी म्हणजे रक्तात गुठळी होते. आणि रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो. यालाच Myocardial Infarction किंवा सामान्यांच्या भाषेत Heart Attack म्हणतात. यालाच वैद्यकिय परिभाषेत Coronory Artery Spasm असे म्हणतात. ही विकृती कधी कधी थोडा वेळ टिकते विष्रांतीने बरे वाटतेआणि रूग्ण पुन्हा व्यवस्थित होतो. म्हणजेच Angina Pectoris कडे दुर्लक्ष झाले तर त्याचे रूपांतर Myocardial Infarction मधे होऊ शकते.

आता आपण ह्र्दयविकाराची सर्वसामान्य कारणे पाहूया. आधुनिक वैद्यकात डॉक्टरमंडळी चार प्रमुख कारणे सांगतात. ती म्हणजे अशी : Hurry, Marry, Curry and Brewary. आता हे काय प्रकरण आहे ते पाहूया. शब्दावरून अर्थ दिसतो आहेच. पण कसे ते पहा.

Hurry म्हणजे घाई. आपले जीवन हे वेगवान आहे हे आपण पाहतोच. कामाचा ताण आजच्या युगात खूप पडतो. मी अगदी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे नोकरीला जाण्याची वेळ ठरलेली, येण्याची वेळ ठरलेली नाही. मग मनावर ताण येतो. याला Executive Syndrome असेही म्हणतात. तसेच स्वतःचा व्यवसाय आहे, अश्यावेळी पण मनावर प्रचंड ताण येतो. आणि या ताणाचा हृदयावर परीणाम होतो.

Marry म्हणजे अनुवांशिकता. जर आपल्या घराण्यात, आई वडिलांना जर हृदयाचा त्रास सेल तर तो त्यांच्या संततीत येऊ शकतो. अर्थात अगदी सुरूवातीपासून काळजी घेतली तर यावर संपूर्ण मात करता येऊ शकते. ही गोष्ट आपल्या हाता नाही. म्हणून याला वैद्यकात Uncontrollable Factor असे म्हणतात कारण या गोष्टी तुमच्या हातात नसतात. पण या गोष्टी थोड्याप्रमाणात नियंत्रणात आणता येतात. कारण माहीत असल्याने तुम्ही सुरूवातीपासून काळजी घेऊ शकता. आणि अनुवांशिकतेवर मात करता येते.

Curry म्हणजे आहार. आहारतल्या सवयी या बर्‍याच वेळा मारक ठरतात. मारक म्हणजे आहारातल्या काही पदार्थांचे अतीसेवन हे मारक ठरते. सर्वसामान्यपणे अती तेलकट पदार्थ, बटाटा, भात, तूप, लोणी, मांसाहारी पदार्थाचाचे अतीसेवन, मसालेदार पदार्थ या गोष्टी हृदयविकाराला आमंत्रण देणार्‍या असतात. यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. रक्तातली अपाचीत चरबी जायला जागा नसल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या Walls वर आतल्या बाजूने साठून राहायला लागते. परीणामी रक्तवाहिन्यांचा आकार आतून कमी व्हायला लागतो. रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण व्हायला लागतो. परीणाम? हृदयावरचा ताण वाढतो.

Brewary म्हणजे आधुनीक युगातली समाजातली मद्य सेवनाची सवय. हे मद्य सेवन हे जवळ जवळ नेहमीच सामाजिक प्रतिष्ठेची गरज म्हणून केले जाते. तिथपर्यंत एक वेळ ठीक आहे. पण बर्‍याचवेळा आपल्या क्षमतेचा विचार न करता मद्यपान होते. आणि त्याच्या अतिरेकाचे पर्यावसान हृदयविकारात होते. जरी आपल्या संस्कृतीत सुरापान लिहीले असले तरी त्यालाही काही त्यात अटी आहेत. पुराणकथातही कोणी उठसुट सुरापान करताना दिसत नाही. त्याचे उल्लेखही नाहीत. आधुनिक कालाचा विचार केला तर असे दिसेल की ही आपल्याला गोर्‍या कातडीची देणगी आहे. ब्रिटिशांनी आपल्याला वाईटाबरोबर बर्‍याच चांगल्या गोष्टीही दिल्या आहेत. पण आपण त्या न घेता त्यांच्या वाईट गोष्टी नेमक्या उचलल्या आहेत. त्यांची शिस्त आपण कानाडोळा करतो. कारण कुठलीही शिस्त पाळायची असेल तर एक तर त्याची सवय व्हावी लागते नाहीतर प्रचंड मनोधैर्य तरी लागते. मद्यपान ही तशीच गोष्ट आहे. आपण त्यांचे अनुकरण करताना हे विसरतो की मद्यपान ही त्यांची संस्कृति आहे. त्यांच्याकडच्या हवामानाचा विचार करता त्यांच्याकडे ते योग्य आहे. त्यांच्या अतीथंड हवामानात ते बाधणारे नाही. त्यांच्या शरीर मानाचा विचार करता, त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांच्या हवामानाला ते योग्य आहे. पण ही आपली संस्कृती नाही. ही आपल्या इथल्या उष्ण हवामानात बाधणारी गोष्ट आहे. तो फक्त आपल्या संस्कृतीचा कधी काळी भाग होता. हे आपण विसरतो. आपण सोयिस्कररीत्या त्याचा स्विकार करतो. मानसिक ताण तणावाच्या नावाखाली त्याच्या आहारी जातो. आणि मग हृदयविकारासारख्या Silent Killer ला आमंत्रण देतो. तो Killerही आनंदाने त्याचा स्विकार करतो. तो त्याच्या सवयीप्रमाणे छुप्या, दबक्या, मांजरीच्या पावलानी येतो. आणि आपल्याला कळते तोपर्यंत उशीर झालेला असतो. उशीर अशासाठी की एकदा आला की तो जात नाही. त्याला नियंत्रणाखालीच ठेवावा लागतो. हा कधीच नियंत्रणात येत नाही का? येतो. पण ती नेहमीच तारेवरची कसरत असते. सततची डोक्यावर टांगती तलवार असते. हृदयविकार झाल्यावरच्या शिस्तीत जरासुद्धा इकडे तिकडे होणे जिवावर बेतू शकते. आणि इथे मानसिक धैर्याची गरज भासते. आहे ते स्विकारून त्याच्याशी लढण्याच्या मानसिकतेची गरज असते. यासंदर्भात माझ्या एका मित्राचे उद्गार बोलके आहेत. त्याला हृदयविकाराचा त्रास होता. तो म्हणायचा कि,

" मी पांच ब्लॉक्सचा मालक आहे. माझा एक ब्लॉक मॉडेल कॉलनीत आहे. बाकीचे चार माझ्या heart मधे आहेत. मला मॉडेल कॉलनीतला ब्लॉक ठेवायचा आहे. बाकीचे चार विकायचे आहेत. मी त्याला गिर्‍हाइक शोधतोय."

विनोदाचा भाग सोडला तर त्या उदगाराततून दिसणारे मानसिक धैर्य वाखाणण्यासारखे आहे. पुढे दुर्दैवाने हृदयविकारानेच या मित्राचा बळी गेला.

इथपर्यंत प्रमुख कारणे पाहील्यावर इतर कारणांचा विचार करू. इतर कारणात मधुमेह आणि रक्तदाब यांचा समावेश होतो. तंबाखूच्या सेवनाचा, सिगारेट ओढणे, म्हातारपण याचा समावेश होतो. मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मधुमेही किंवा रक्तदाबाच्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येईलच असे नाही. पण या रुग्णांनी हे लक्षात ठेवले पाहीजे की आपण याची सहज शिकार होऊ शकतो. त्यामुळे आपण Sitting Duck होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. नंतरची जी दोन कारणे आहेत की तंबाखूचे सेवन, आणि सिगारेट ओढणे ता दोन गोष्टी मनोनिग्रहाने टाळता येण्यासारख्या आहेत. म्हणून याना controllable Factor असे म्हणता येईल. आणखी इतर कारणात अजून एक कारण सांगता येईल. ते म्हणजे लिंग भेद. म्हणजे असे की पुरूष आणि स्त्री यांच्या जननक्षमतेचा विचार केला तर स्त्री जननक्षम आहे तो पर्यंत तिला नैसर्गिक संरक्षण आहे. म्हणून स्त्री व पुरूष यांच्या हृदयविकाराचे प्रमाण १:२ असे असते. पण स्त्री म्हातारी झाल्यावर म्हणजे तिची जननक्षमता संपल्यावर मात्र ते १:१ येते. पण पुरूषाच्या बाबतीत असे नसते. त्याला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अजून महत्वाचे कारण म्हणजे लठ्ठपणा आणि आळशी पणा (Obesity and Sedentaries).

या पुढच्या लेखात आपण हृदयविकारातल्या निरनिराळ्या अवस्थातल्या लक्षणांचा आणि त्या अनुशंगाने येणार्‍या तपासण्यांचा विचार करू.

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

करप्शन

श्री. संदीप खरे यांच्या 'नेणिवेची अक्षरे' या काव्यसंग्रहात त्यांची "दाढी काढून पाहिला....." अशी एक कविता आहे. ही कविता ते " आयुष्यावर...." कार्यक्रमातही खूपच प्रभावीपणे सादर करतात. ही कविता म्हणजे माझ्या या कवितेमागची प्रेरणा आहे. आणि म्हणून श्री. संदीप खरे यांची क्षमा मागून ही कविता सादर करत आहे.........



लाच मागुनी पाहिला लाच खाऊनी राहिला

नीच श्रेणीचाच सेवक तृप्त होऊनी माजला ॥धृ.॥



पैसे खाऊनी वाढला ईमले बांधुनी राहिला

तरीही त्याचा मुखडा तोही दीनवाणा राहिला ॥१॥

लाच मागुनी........



सरकारी कारकून साधा लुचपतीचा बादशा

जन जनांच्या गरजेलाही सहजी तो सोकावला ॥२॥

लाच मागुनी........



सस्पेंड करूनी पाहीला हाकलूनी पण पाहिला

तरी त्याच्या भुकेलाही अंत नाही राहिला ॥३॥

लाच मागुनी.........



भूक त्याची मोठ्ठी होती चलनी गठ्ठेही पुरेना

गरजू चेहेरा पाहुनी तो तरीही नाही पाझरला ॥४॥

लाच मागुनी..........



तो खवैय्या बैठकीचा कुणाचेही ऐकेचना

कोणत्याही शक्तीचाही बांध नाही राहिला ॥५॥

लाच मागुनी..........



तो नसेही एकटाची भास दाखवी तो तसा

म्हणूनी सर्व तेची लोणी पोटी भरूनी राहिला ॥६॥

लाच मागुनी..........



आणि त्याचे घरही सारे खणखणी ओसांडले

खण्ण नादही आसमंती भरभरूनही राहिला ॥७॥

लाच मागुनी पाहिला...........



सस्पेंशन भोगुनीही सारे लोभटची तो राहिला

काल-पानी पुढेची चालू हात त्याने पसरला ॥८॥ ( काल-पानी म्हणजे मागील पानवरून पुढे चालू असे आपण म्हणतो ना....)

लाच मागुनी पाहिला...........



आणि शेवटी नशिब त्याचे त्यावरी रुसले पहा

अजूनी अजूनी करता करता जेरबंदी जाहला ॥९॥



लाच मागुनी पाहिला लाच खाउनी राहिला..........?????



खवैयेगिरीचा कर्करोगही, सर्वदूरची फोफावला

विश्वरक्षक ईश्वरदेखील नाही त्यातून बचावला ॥१०॥

लाच मागुनी पाहिला...........





देवदर्शन सह्जी नाही रांगेला तो लागला

कळसी दर्शन घेऊनी तो मनी अतृप्त राहीला ॥११॥

लाच मागुनी पाहिला...........



रांग मोठी म्हणूनी तो इतर मार्गी लागला

देवस्थानी तिजोरीचा गाभा भरूनी वाहीला ॥१२॥



लाच मागुनी पाहिला लाच खाऊनी राहिला

नीच श्रेणीचाच सेवक तृप्त होऊनी माजला ॥धृ.॥





............श्रीराम पेंडसे

भास्करायन

दिनकराच्या सोनपावली सकाळ हासत आली

धरतीवरच्या जीवसृष्टीला आनंदून गेली ॥१॥



रविकिरणांच्या सोनपंखांनी पूर्व दिशा उजळली

त्या किरणांच्या मृदूस्पर्शाने काळोखी वितळली ॥२॥



काळोखी ही वितळत वितळत सवेची घेऊन जाई

पूर्वरातीच्या विद्ध सयींना सामावून घेई ॥३॥



रक्तवर्णी त्या सूर्यबिंबाचे रूप दिसे साजिरे

जणु उषःप्रभेच्या गालावरती रक्तिमाच पसरे ॥४॥



त्या किरणाच्या मदस्पर्शाने जाई जुई उमलती

मंद मंद शीतल सुगंध तो दशदिशा खुलवती ॥५॥



सूर्याची ती कोमल किरणे तरूशिखरे उजळी

रवीकिरणांच्या कोमल स्पर्शी खुलते कळी कळी ॥६॥



धरतीवरती सुवर्णरेखा रमलपटची मांडती

त्या पट चौकट कपट्यांमध्ये रहस्येही लपती ॥७॥



भास्कर असाच वरती चढता पारा त्याचा चढे

काय करावे, कसे लपावे प्रश्न चराचरापुढे ॥८॥



लता, पर्ण, सुमने खगजन ते कोमेजून जाती

मनुजन आणि इतर जीव ते तरूछाया शोधती ॥९॥



आणि अश्या या कठीण समयी मेघ गवाक्षातुनी

जलदेवी ती प्रकट होतसे दुरवस्था पाहूनी ॥१०॥



पर्जन्याचा शीत स्पर्श जणू सृष्टीला सुखवे

पुष्पजीवांच्या तनुवरती तो शहाराच फुलवे ॥११॥



दिनमणी हळू हळू परती जाता दिसेची नारंगी

मावळतीचे कपोल होती मनोहर रंगबिरंगी ॥१२॥



उषःप्रभेचे गाल पाहूनी मावळतीपण रूसली

प्रिय रमणावर नाराजीने फुगून ती बसली ॥१३॥



मावळतीचा मोहक रूसवा रमणाने काढला

दुसर्‍या दिनीच्या सहवासाचे वचन दिले तिजला ॥१४॥



रवीदिनकर तो मावळतीला संगे घेऊनी गेला

लपून बसल्या निशाचराचा काळोखही थिजला ॥१५॥



काळोखाच्या उदरामध्ये उषःप्रभा लपतसे

आतुरतेने रवीकिरणांची आस मनी धरतसे ॥१६॥

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

आरोग्यम् धनसंपदा - हृदय विकार - भाग १

आरोग्यम् धनसंपदा - हृदय विकार - भाग १

या आणि यानंतरच्या काही भागात हृदयाचे विकार यांचा विचार करू. यात हृदयाचे शारीर म्हणजे त्याची थोडक्यात रचना आणि कार्य पाहू या. नंतर त्यात येणारे अडथळे आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या व्याधी, तक्रारी आणि त्यांची तीव्रता, त्यांची लक्षणे, त्यासाठी कराव्या लागणार्‍या तपासण्या यासंबंधीची माहिती पाहू या. नंतर त्यावरचे उपचार की ज्यात आयुर्वेदिय उपचार, योगोपचार, पथ्यापथ्य, काळजी यांचा समावेश असेल. रक्तदाब हा जरी स्वतंत्र विकार असला तरी तो काही प्रमाणात हृदयाशी संबंधीत आहे. तसेच अजून एक हृदयाशी संबंधीत विकार म्हणजे मधुमेह. रक्तदाब आणि मधुमेह हे दोघेही हृदयविकाराला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत असतात. रक्तदाब आणि मधुमेह म्हणजेच हृदयविकार असे समीकरण मांडता येणार नाही. ७५% रुग्णांच्या बाबतीत हृदयविकाराबरोबर मधुमेह किंवा रक्तदाब किंवा दोन्ही असण्याची शक्यता असते. उलट प्रत्येक मधुमेही किंवा रक्तदाबाच्या रुग्णाला हृदय विकार असेलच असे नाही. पण अश्या रूग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आणि ती म्हणजे हृदयविकार होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहीजे. जागरूक राहीले पाहिजे. कारण रक्तदाब आणि मधुमेह हे दोन राहू केतु असे भारी आहेत की ते स्वतः आग लावणार नाहीत. कोणतीही मदतही करणार नाहित. पण आगीत तेल ओतण्याचे काम मात्र इमानदारीत करतील. एखादा किरकोळ अपघात झाल्यानंतर जमणार्‍या बघ्यांसारखे हे दोघे आहेत. म्हणून या दोघांबद्दलही याच लेखांमधून विस्ताराने पाहू. या सगळ्यांसाठी किती लेख लागतील माहित नाही. पण कमीत कमी आणि आवश्यक तितकीच वैद्यकिय परिभाषा वापरून ही माहिती कंटाळवाणी न होण्याचा मी प्रयत्न करीन. वैद्यकिय व्यवसायातील वाचकाना ही माहिती अपुरी वाटण्याचा संभव आहे. म्हणून मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते की ही माहिती सामान्यांसाठीच आहे. त्यांना यातले धोके समजणे इतकाच या माहितीचा आवाका आहे. त्यामुळे ही माहिती ढोबळ मानाने आहे हे लक्षात ठेवावे. मागील लेखांमधून दिलेली सूचना मी पुन्हा देणार आहे. इथे आपण हृदयाचा विचार करत आहोत. थेट मृत्यूशी भेट असू शकते.आणि म्हणून ही माहिती, यातील उपचार यांचा तारतम्याने वापर करायचा आहे. तज्ञ मार्गदर्शनाखालीच करायचा आहे. या माहितीचा उपयोग एखाद्या मार्गदर्शक तत्त्वांसारखा करायचा आहे. आपण जे करतो आहोत ते योग्य दिशेने चालले आहे ना, हे पहाण्यापुरता याचा उपयोग करावा. हृदयविकारात मानसिक ताण नेहमीच बर्‍याच प्रमाणात असतो. आपण करतो आहोत ते बरोबर आहे या विचारानेसुद्धा हा मानसिक ताण कमी झाला, तरीही हृदयावरचा ताण खूपच कमी होईल, आणि त्याचे स्वास्थ्य हे लवकर मिळवता येईल.

सर्वप्रथम आपण हृदयाची रचना आणि कार्य पाहूया. रक्ताभिसरण यंत्रणेत हृदयासह फ़ुफ़्फ़ुसे, दोन्ही रक्तवाहिन्या म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या या मह्त्वाच्या आहेत. हृदय हा शरीरातला अतिशय नाजूक अवयव आहे. आणि म्हणून याला छातीच्या हाडाच्या पिंजर्‍यात ठेवलेले आहे. त्या पिंजयात ते एका लवचिक आवरणात ठेवलेले असते. त्याला Pericardium म्हणतात. यात पाण्यासारखा द्राव असतो. त्याला Pericardial Fluid असे म्हणतात. त्या द्रावाने हृदयाला वेढलेले असते. हा द्राव एखाद्या Shock Absorber सारखा काम करतो. छातीचे पुढचे हाड, पाठीचा कणा, त्याना जोडलेल्या फासळ्या आणि या सर्वांभोवतीचे स्नायू असे हदय सर्व बाजूने वेढलेले आहे. हृदयाच्या खालील बाजूस एक लवचिक पडदा असतो. त्याला Diaphram असे म्हणतात. जवळ जवळ त्यावरच हे हृदय ठेवलेले असते. त्यामुळे हृदय सर्वबाजूने संरक्षित असते. हृदय आणि फुफ्फुसे हे दोन्ही अवयव नाजूकच. म्हणून ते शेजारी आणि एकाच सोसायटीत राहतात. जणू एकमेकांना संभाळून. आणि छातीचा सर्वबाजूने संरक्षित पिंजरा ही त्यांची सोसायटी. कामाचा सर्वाधिक भार उचलावा लागणारे हे अवयव आहेत. हृदयाला विश्रांती नाही. डोके, मेंदू यांना थोडीतरी विश्रांती मिळू शकते. पण हृदयाला नाही. हे सतत अविरत काम करत असते, वंगणाशिवाय, कोणत्याही आधाराशिवाय. हृदयाचा आकार बदामासारखा असतो. चांगल्या निरोगी हृदयाचा आकार हा आपल्या हाताच्या मुठीइतका असतो. हृदयचे सतत काम चालू असल्याने त्याचे स्नायू हे शरीरातल्या इतर स्नायूंसारखे नसतात. ते इतर स्नायूंसारखे कार्य करत नाहीत. पण हृदयाचे स्नायू मात्र सतत हालचाल करत असल्याने यांची आंतरीक ताकद खूप जास्त आहे. या स्नायूंवर आपले नियंत्रण आणि नियमन नाही. आपल्या इच्छेप्रमाणे याचे कार्य नाही चालत. म्हणजे कार जशी हवी तेंव्हा थांबवता येते किंवा चालू करता येते तसे याचे करता येत नाही. म्हणून याना अनिच्छावर्ती स्नायू म्हणतात. आपले हृदय हे एखाद्या चार बीएचके फ़्लॆटसारखे आहे. याचे चार कप्पे असतात. दोन उजव्या बाजूचे आणि दोन डाव्या बाजूचे. सर्वप्रथम अशुद्ध रक्त उजव्या वरच्या कप्प्यात येते. याला Aurical म्हणतात. तेहून ते खालच्या उजव्या कप्प्यात येते. या कप्प्याला Ventricle असे म्हणतात. हे रक्त उलटे परत फ़िरू नये म्हणून त्यात Non Return झडपा असतात. तेथून ते रक्त दोन्ही फ़ुफ़्फ़ुसात जाते. तिथे ते सूक्ष्म रक्तवाहिन्यातून वायुकोशाभोवती फ़िरते आणि प्राणवायूची आणि कार्बन डाय ऒक्साईड या वायूंची देवाण घेवाण होऊन रक्त शुद्ध होते. हे शुद्ध झालेले रक्त पुन्हा डाव्या बाजूच्या कप्प्यात येते आणि तेथून ते शरीराला पुरवले जाते. रक्तात हिमोग्लोबिन नावाचे द्रव्य असते. ते संपूर्ण शरीराला प्राणवायू पुरवण्याचे काम करते. रक्त शरीरभर फ़िरताना त्यातील प्राणवायू वापरला जातो आणि कमी होतो. हे रक्त पुन्हा हृदयाद्वारे फ़ुफ़्फ़ुसात येते व त्यातले हिमोग्लोबीन फ़ुफ़्फ़ुसातला प्राणवायू शोषून घेते आणि शुद्ध होते. महारोहीणी द्वारे सर्व रक्त हृदयात परत येते व शरीरभर पुरवले जाते. नंतर महानीलेद्वारे ते परत शुद्धीकरणासाठी हृदयाकडे येते.

रक्त शरीरात दोन ठिकाणी शुद्ध होते. फ़ुफ़्फ़ुसे आणि मूत्रपिंडे. फुफ्फुसात वायूदोष काढले जाता आणि मूत्रपिंडात रक्तातले जलदोष वेगळे काढले जातात. आणि दोन्हीचे कार्य बिघडले तर हृदयाच्या क्षमतेवर परीणाम होतो. हृदय सारखे आकुंचन आणि प्रसरण पावत आसते. आणि ही आकुंचन-प्रसरणाची एक क्रिया म्हणजे एक ठोका असतो. हृदयाच्या एका ठोक्यात साधारण ७० सी.सी. रक्त हृदयाबाहेर फ़ेकले जाते. आणि असे हृदयाचे साधारण ७२ ते ८० ठोके एका मिनिटात होतात. म्हणजे तितक्यावेळा रक्त हृदयाबाहेर पडते. हृदयातले रक्त ज्या दाबाने बाहेर फ़ेकले जाते तो साधारण १२० मि.मी. (Mercury) असतो.व शेवटच्या टोकाजवळ हा दाब जवळ जवळ शून्य असतो. या दाबातील फ़रकामुळे हृदयातले रक्त तेथपर्यंत पोहोचते. आता हे रक्त पुन्हा हृदयापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हे शरीराच्या हालचालींमुळे हे शक्य होते. अर्थात या अशुद्ध रक्तवाहिन्यात Non Return झडपा असतात. त्या झडपा ते रक्त पुन्हा उलटे जाऊ देत नाहीत.

हृदयाचे स्नायू सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांनाही रक्तपुरवठा होणे आवश्यक आहे. हृदयाच्या स्नायूंना सुमारे २०० सी. सी. रक्त लागते. या वाहिन्याना Coronary Artries म्हणतात. आणि या रक्ताभिसरणाला Coronary Circulation म्हणतात. या दोन वाहिन्या असतात. डावी आणि उजवी रक्तवाहिनी. या दोन्हीपैकी एक थोडीशी मजबूत (Superior) असते. या मधून जास्त रक्त जाते. याला Dominant Circulation म्हणतात. जेंव्हा त्रास होतो तेंव्हा या दोन्हीपैकी एका किंवा दोन्हीही रक्त वाहिन्यात अडथळा येतो. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. हृदयाचे कार्य मंदावते. इतर अवयवांना असा अडथळा आला की इतर कोठूनतरी रक्तपुरवठा होऊन त्याचे कार्य सुधारते. पण हृदयाला तशी सोय नाहीये. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यात अडथळा आला की त्याच्या कार्यात विक्षेप निर्माण होतो. ज्यावेळी हृदयाला रक्तपुरवठाच कमी होतो त्या त्रासाला अंजायना म्हणतात. अश्या कमी रक्तपुरवठ्यामुळे हृदयाच्या एका भागास प्राणवायू कमी पडतो. आणि हृदय अधिकाधीक मागते. Angie म्हणजे रडणे म्हणून त्याला हृदयाच्या स्नायूंचे अढिक रक्तपुरवठ्यासाठी रडगाणे म्हनतात. (Its a cry of cardic muscles for increased blood supply.) ज्या मंडळींना असा त्रास होतो ते लोक त्या मानाने भाग्यवान असतात. कारण अश्या अंजायनाच्या त्रासात तो कमी रक्तपुरवठ्याचा भाग इतर शीरांना आपल्याकडे ओढून घेतो. त्यामुळे अश्या व्यक्तीना हृदयविकाराच्या झटक्याचा त्रास होत नाही. अंजायना हा बसल्या जागी होत नाही. पळणे, मानसिक तणाव अश्यावेळी हा त्रास होतो. आणि त्यातून मग हृदयविकाराचा झटका येउ शकतो. म्हणून अंजायना ही वेळीच काळजी घेण्याची धोक्याची सूचना आहे.

रविवार, २४ जानेवारी, २०१०

बोध कथा

बोध कथा


बोध कथा म्हणजे आपला वाचनात येणार्‍या काही गोष्टी की ज्यातून काही शिकायला मिळते. आता आपले वय हे काही शिकायचे राहिलय का? ते ज्याने त्याने ठरवावे. वाचकांपैकी काहींचे संसार अश्या अवस्थेला येऊन पोहोचले असतील की "आता आमच्या आयुष्यात नव्याने काही शिकण्यासारखे राहीले नाहीये" असे काहींना वाटेल, तर काहींना वाटेल की "अजून आमचे आयुष्य तर खर्‍या अर्थाने सुरू व्हायचय. मग आत्ता त्याची चिंता कशाला? जेंव्हा वेळ येईल तेंव्हा पाहू." त्यामुळे या गोष्टींमधून काय बोध घ्यायचा हे सांगण्याचा अधिकार मला आहे की नाही हेही मला ठाऊक नाही. मी स्वतःसुद्धा पहिल्या गटातल्या लोकांपैकी असलो तरी या गोष्टी तुम्हाला सांगाव्या असे मला वाटले. या गोष्टी इंग्रजीत आहेत. मी लिहीलेल्या नाहीत हे आधीच स्पष्ट करतो. मी फक्त मराठीत आणण्याचे काम करतोय. मला या गोष्टींचे मूळ लेखक ठाउक नाहीत. पण मला त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्या असे मला वाटले म्हणून त्या अनामिक लेखकांची क्षमा मागून मी यांचे मराठीकरण करत आहे. यातली पहिली गोष्ट ही मूळची अकबर-बिरबलाची नाही याची आवर्जून नोंद घ्यावी. तुम्ही त्यांच्या गोष्टींची पुस्तके चाळून काढाल आणि तुम्हाला त्यात सापडणार नाही. म्हणून हे आधीच स्पष्ट केले. पण अकबर बिरबलाची गोष्ट असली की त्याचा परीणाम चटकन होतो, लवकर पटते असे मला वाटले म्हणून मी त्याचे अकबर-बिरबलाच्या गोष्टीत रूपांतर केले आहे.

जवळ जवळ सर्वांचेच आयुष्य अडचणींनी भरलेले असते. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत सुखी असलेला माणूस मला तरी पाहण्यात नाही. जसे बिनचूक बांधकाम दुनियेत पहायला सापडणार नाही. कुठेतरी बारीकशी फट राहतेच कि जी लक्षातसुद्धा येत नाही. तसे एखाद्या सर्व सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीचे आयुष्य असते. हे आयुष्य एखादी फट किंवा खुर्चीचा तुटलेला पाय जसा आपण "एम सील" ने जोडतो तसा आपण आपल्या तारतम्याचा, विवेकबुद्धीचा वापर "एम सील" सारखा करून आपले जीवन सुखी करायचे आहे. आणि त्यात आपल्या जीवनसाथीचा सहभागही खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहीले असेल तर तुमच्या लक्षात येईल की "एम सील"च्या दोन कांड्या असतात. एक पांढरी आणि एक काळी. या दोन्ही कांड्या एकत्र नीट मळून एकजीव करून त्याने अनावश्यक फटी, भोके बुजवायची असतात. तश्या त्या बुजवल्यावर ते "एम् सील" सेट होते. म्हणजे घट्ट होते. मग मात्र ते तुटता तुटत नाही. त्या जागा अभंग राहतात. निदान तिथे तरी अडचण येणार नाही याची खात्री असते. तसे संसारात, आपण आणि आपल्या जीवनसाथीचे मन, विचार, संस्कार आणि वागणे त्या "एम् सील" सारखे एकजीव करून संसारातली त्रासदायक भोके बुजवायची असतात, मतभेदांच्या फटी काढून टाकायच्या असतात. यात आपण बर्‍याचवेळा अयशस्वीसुद्धा होतो. तसे का होते? तर त्या फटी, ही भोके, आपल्याला ते "एम् सील" सेट होईपर्यंत लक्षातच येत नाहीत. आणि मग तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. पती पत्निच्या मनाचे, त्यांच्या स्वभावाचे, आचार विचारांचे, त्यांच्यावरच्या संस्कारांचे "एम् सील" हे विवाहानंतरच्या काळात सेट होण्यापूर्वीच ज्यांना ही भोके कळतात, या फटी लक्षात येतात ते संसार यशस्वी होतात. ते आनंदी असतात. सुखी असतात. ते पुन्हा अश्या फटी पडणार नाहीत, तडे जाणार नाहीत याची काळजी घेतात. आणि या फटींचा, संसारातल्या साखळीच्या कमकुवत कड्यांचा, तडे जाण्याच्या क्षणांचा, आधीच अंदाज येणे हीच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे असे मला वाटते.

मी वर म्हटल्याप्रमाणे अंदाज सगळ्यांना येतो असे नाही. किंबहुना फार थोड्यांना हे जमते. मग या गोष्टीतून ही गुरूकिल्ली सापडेल का? माहीत नाही. ज्याने त्याने ठरवायचे आहे की आपण यातून काही घेऊ शकतो का? पण मी थोडासा विचार केल्यावर मला असे वाटले की घेता येईल. किती ते माहीत नाही. पण सूज्ञांना या गोष्टी नक्की विचार करायला लावतील असे मला वाटले म्हणून हा मराठीकरणाचा उद्योग.



एक

अकबर बादशहा हा हल्ली सुखी नव्हता. त्याच्याकडे धन दौलत होती. सत्ता होती. पण तो सुखी नव्हता. समाधानी नव्हता.

असाच एके दिवशी तो शहरातून फेरफटका मारत असताना त्याला एक मजूर काम करताना दिसला. त्या मजूराच्या चेहेर्‍यावर समाधान होते. तो काम करताना गात होता. बादशहाला हे पाहून अतोनात आश्चर्य वाटले. मी या भूमीचा सार्वभौम बादशहा की ज्याला संपत्तीची ददात नाहीये, सर्व सुखे हात जोडून समोर उभी आहेत, तरीही मी सुखी नाहीये, समाधानी नाही, आणि हा एक क्षुल्लक मजूर ज्याचे पोट रोजी कमाईवर अवलंबून आहे, हा इतका सुखी कसा? अखेर बादशहाने न राहवून त्या मजूराला विचारले,

"तू काम करताना गाणी म्हणतो आहेस. तू इतका सुखी कसा?"

"खाविंद, मी एक सामान्य मजूर आहे. त्यामुळे माझ्या गरजाही मर्यादीत आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला दोन वेळचे जेवायला आणि डोक्यावर छप्पर असले की माझे काम भागते."

बादशहा निरुत्तर होऊन तेथून निघून गेला. पण त्याचे त्या उत्तराने समाधान झाले नाही. तो महालात आला. त्याने विचार केला की आपल्याला याचे उत्तर फक्त बिरबलच देऊ शकेल. म्हणून त्याने बिरबलाला बोलावणे पाठवले. बिरबल आला. आणि बादशहाने बिरबलाला त्या मजूराची कथा सांगितली. बिरबलने सर्व शांतपणे ऐकून घेतले. आणि म्हणाला,

"खाविंद, मला असे वाटते की हा मजूर "९९ क्लब" चा अधिकृत सभासद नाहिये. आणि खाविंद, माफी असावी, पण तुम्हीही या क्लबचे सभासद आहत. म्हणून तुम्हाला असं वाटतय."

बादशहाला आश्चर्य वाटले. तो बिरबलाला म्हणाला,

" ही "९९ क्लब" काय भानगड आहे? आणि तू असं कसं म्हणतोस? मला काहीही माहित नसूनही मी याचा सभासद कसा?"

"महाराज, सांगतो. पण हे काय आहे हे तुम्हाला पटकन कळणार नाही. तर हे नक्की काय आहे हे नीट कळण्यासाठी त्या मजूराच्या घराच्या पायरीवर ९९ मोहोरांनी भरलेली एक थैली ठेवा."

बादशहा काही बोलला नाही. त्याचा बिरबलावर विश्वास होता. त्याने बिरबलाने सांगितले तसे करण्याची सेवकांना आज्ञा दिली.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्या मजूराने ती थैली पाहीली. थैली उघडून पाहिल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना. तो आनंदातिशयाने ओरडला,

" वा वा! इतक्या सोन्याच्या मोहोरा!!!! भाग्य उजळलेले दिसते."

त्याने ती थैली घरात नेली आणि त्यातल्या मोहोरा मोजल्या. त्या ९९ भरल्या. त्याला वाटले की आपले मोजण्यात काहीतरी चुकले. त्याने त्या पुन्हा मोजल्या. तरीही त्या ९९च भरल्या. त्याने त्या परत परत मोजल्या. ९९ च होत्या. त्याला नवल वाटले. १०० वे नाणे कुठे गेले? कोणी ९९ नाणी थैलीत नक्की ठेवणार नाही. मग त्या १०० व्या नाण्याचे काय झाले? त्याने खूप शोधले. पण त्याला काही ते शंभरावे नाणे सापडले नाही. तो अस्वस्थ झाला. त्याला सुचेना. हे जर १०० वे नाणे सापडत नसेल तर मग ते आपण कष्टाने मिळवायलाच हवे. पण आपण १०० हा आकडा पूर्ण करायचाच असा त्याने निर्धार केला. मग त्यासाठी काय वाटेल ते करावे लागले तरी चालेल.

आणि त्या दिवसापासून त्या मजूराचे आयुष्यच बदलले. शेवटी त्याने हे नाणे मिळवण्यासाठी खूप कष्ट करण्याचे ठरवले. नेहमीपेक्षा अधिक. खूप जास्त. आपण काहीही करून हे शंभरावे नाणे मिळवायचेच या प्रयत्नात तो त्याची तहान भूक विसरला. त्याचे काम करतानाचे गाणे थांबले. बादशहाला हा बदल पाहून अतिशय नवल वाटले. धक्का बसला. त्याने बिरबलाला पुन्हा बोलावणे पाठवले. बिरबल उत्तरला,

"महाराज, हा मजूर आता "९९ क्लब" चा अधिकृत सभासद झाला आहे. "९९ क्लब" हे नाव अश्या लोकांना दिले जाते, कि जे सुखी आहेत, ज्यांच्याकडे पुरेशी संपत्ती आहे, पण ते समाधानी नाहीत. कारण ते नेहमी अधिक मिळवण्यासाठी धडपडत असतात. ते नेहमी या शेवटच्या शंभराव्या मोहोरेसाठी आटोकाट प्रयत्न करत असतात, धडपड करत असतात. मला ही शंभरावी मोहोर एकदाची मिळू दे, म्हणजे मी आयुष्यभरासाठी सुखी आणि समाधानी होईन अशी त्यांची धारणा असते.

खाविंद, आपण आयुष्यात थोडक्यातही समाधानी असतो. असू शकतो, होऊ शकतो. पण ज्या क्षणी आपल्याला आणखी मिळते, चांगले आणि अधिक मिळते, त्या क्षणापासून आपण त्याहीपेक्षा अधिक मिळवण्याचा अट्टाहास करतो. त्यासाठी आपण आपली तहान भूक गमावून बसतो. झोप गमावतो. मनस्वास्थ्य जाते. आपल्या आजूबाजूच्या लोकाना, आपल्या आप्ताना आपण दुखावतो. आपल्या संसारात आपले लक्ष राहत नाही. आणि हे सर्व का? तर खरोखर गरज नसलेले अधिक मिळवण्याच्या हव्यासापोटी. आणि हीच आपण आपल्या मनस्वास्थ्याची, अधिक मिळवण्याच्या हव्यासाची, आकांक्षेची, किंमत मोजत असतो.

आणि ही अवस्था हेच "९९ क्लब" चे अधिकृत सभासदत्व आहे."

बादशहा निरुत्तर झाला!!!



दोन

फार फार पूर्वीच्या काळच्या गुरूकुल पद्धतीतल्या शिक्षणाच्या काळातली ही गोष्ट आहे.

एकदा एक शिष्य आपल्या गुरूकडे अतिशय दु:खी मनस्थित गेल आणि म्हणाला,

"गुरूजी, मी व्यथित आहे. दु:खी आहे. मला कळत नाहीये की मला काय झालय. मला उपाय सांगा."

"काय झालय बाळा?"

पण त्याला काही सांगता येईना. मग गुरूजी म्हणाले,

"एक काम कर. एक ग्लास घेऊन ये". गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे त्याने ग्लास आणला.

"आता तो पाण्याने भर. त्यात मूठभर मीठ टाक. आणि व्यवस्थित ढवळ." त्याने गुरूजींनी सांगितले तसे तसे केले. मग त्याला गुरूजी म्हणाले,

" आता हे पी." , त्याला ते आवडले नाही. पण गुरूअवज्ञा करायची नाही म्हणून तो त्यातले घोटभर पाणी प्यायला. गुरूजीनींनी विचारले,

"कसे लागतय?"......गुरूजी

"अतिशय वाईट चव आहे."

"खारट लागतय?".......गुरूजी

"हो"

"ठीक आहे. आता चल माझ्याबरोबर."......गुरूजी

गुरूजी त्याला एका तलावाच्याकाठी घेऊन गेले. त्यांनी शिष्याला त्यातलावात मूठभर मीठ भिरकावून द्यायला सांगितले. ते म्हणाले,

"आता या तलावातले पाणी पी." शिष्याने त्यांची आज्ञा पाळली आणि तो पाणी प्यायला. गुरूजींनी विचारले,

"कसे लागतय?"

"चव छान आहे." शिष्य उत्तरला.

"मीठाची खारट चव लागतीये?" ......गुरूजी

"छे. अजिबात नाही."

मग गुरूजींनी शिष्याचा हात धरून त्याला आपल्या जवळ बसवले. त्याच्या पाठीवरून अत्यंत मायेने हात फिरवला आणि त्याला म्हणाले,

"आयुष्यात दु:खे ही एखाद्या शुद्ध मिठासारखी असतात. त्याचा खारटपणा कधी कमी नसतो किंवा जास्तही नसतो. त्याची तीव्रता कधीच बदलत नसते. तसे आयुष्यातली दु:खे ही तशीच असतात. त्यांची तीव्रता, त्यांचे डोंगर कधीही कमी जास्त होत नसतात. पण त्या दु:खाची चव ही, आपण ते दु:ख कसे घेतो, कोणत्या प्याल्यात ठेवतो त्याला महत्त्व आहे. म्हणून मग तुम्ही दु:खी असाल तर फक्त तुमच्या हातात ते दु:ख झेलण्याची क्षमता वाढवणे इतकेच असते. म्हणून जीवनात, "प्याला" होणे थांबवा. "तलाव" व्हा. म्हणजे मग दु:खाची झळ बसणार नाही."



तीन



एकदा एक वाटसरू वाटचाल करत करत एका खेड्याच्या सीमेवर आला. तिथे त्याला रस्त्याच्या कडेला बरीच गर्दी दिसली. कुतूहलाने तो त्या गर्दीत शिरला आणि काय भानगड आहे ते पाहू लागला.

त्याला असे दिसले कि दोन खेळाडू तलवार युद्धाचा खेळ खेळत होते. त्यांचे खेळात पूर्ण लक्ष केंद्रित झाले होते. आणि सभोवतालचे प्रेक्षक अगदी स्तब्ध राहून खेळ बघत होते. हा वाटसरूही खेळ पाहू लागला. थोड्यावेळाने त्यापैकी एका योध्याच्या चेहेर्‍यावर ईर्षा, आसूया दिसायला लागली. आणि सगळी गर्दी तिथून पांगली, नाहीशी झाली. तिथे फक्त हा वाटसरू आणि एक नव्वदीतला म्हातारा असे दोघेच जण राहीले. तो म्हाताराही जायला लागल्यावर वाटसरूने त्या म्हातार्‍याला थांबवले. आणि विचारले,

"अहो, अजून तर खेळ संपला नाहिये. मग सगळे लोक का निघून गेले? आता तर खरी मजा यायला सुरूवात झालीये. मग असे का?"

तो म्हातारा त्यावर उत्तरला,

"मित्रा तू या देशात नवा दिसतोस. आतापर्यंत खेळ चालू होता तो खेळ होता. सारे कसे निर्मळ, स्वच्छ वातावरणात चालले होते. पण ज्या क्षणी त्यातल्या एकाच्या चेहेर्‍यावर आसूया, ईर्षा दिसली त्या क्षणी त्या खेळातलातला खेळाचा भाग संपला. त्यातला खॅळ संपून व्यक्तिगत दुश्मनी सुरू होण्याची ही वेळ असते. सगळे लोक खेळ पहायला आलेले होते. त्यातला खेळ संपल्यावर ते सर्व निघून गेले."

आणि तो म्हातारा त्या वाटसरूकडे किंवा त्या खेळाडूंकडे लक्षही न देता पाठ फिरवून निघून गेला.

(एका जपानी लोककथेवरून)



.........श्रीराम पेंडसे

रविवार, ३ जानेवारी, २०१०

आरोग्यम् धनसंपदा - १/२०१०

आरोग्यम् धनसंपदा

मागील लेखात आपण पाठीच्या दुखण्यावरचे योगोपचार पाहीले. या लेखात गुडघे दुखीचा विचार करूया. मागे जेंव्हा कारणांचा विचार केला होता, तेंव्हा त्यात गुडघे दुखी याचा विचार झाला नव्ह्ता म्हणजे कारणे, लक्षणे याचा विचार झाला नव्हता. गुडघेदुखी ही सामान्यपणे वयोमानाने येणारी व्याधी आहे. एखादे अपघाताचाचे कारण असले तरच तरूण वयात गुडघ्याचा त्रास होतो. अन्यथा वयाच्या पन्नाशीनंतर साधारणपणे उद्भवणारी ही व्याधी आहे. सामान्यपणे शरीरात हाडांचे जे सांधे असतात त्यात हाडे एकमेकात गुंतलेली नसतात. तर ती स्नायूंच्या सहायाने एकमेकांना बांधलेली असतात. (अपवाद फक्त खांद्यातला व कमरेतला उखळीचा सांधा आणि कवटी मणक्यावर जिथे तोलून धरलेली असते तो सांधा.) आणि या स्नायूंच्या सहाय्याने त्याची हालचाल होते. गुडघ्याचा सांधा हा शरीरातला सगळ्यात मजबूत सांधा आहे. मांडीचे शक्तीशाली हाड आणि तंगडीचे हाड, आणि त्यावर त्याला संरक्षण म्हणून हाडाची गोल चकती अशी या सांध्याची रचना असते. हा सांधा बिजागरीचा सांधा असतो. जसे बिजागरीत या सांध्याची हालचाल ही जशी एकाच दिशेने होते तशी याची हालचाल पण एकाच दिशेने होते. म्हणजे पाय गुढग्यात मागच्या बाजूला दुमडता येतो. त्याच्या विरूद्ध दिशेने दुमडता येत नाही. आता शरीराचे सपूर्ण वजन या सांध्यावर येते. त्या मुळे हा सांधा अतिशय मजबूत असतो. कमरेतला सांधा(Hip Joint) आणि घोट्याचा सांधा(Ankle Joint) यांच्या मधे गुढगा आहे. त्यामुळे या दोन्ही सांध्यात काही गडबड झाली तर त्याचा परीणाम थेट गुडघ्याच्या सांध्यावर होतो. त्याचा तोल ढळू लागतो. या सांध्यावर दैनंदिन जीवनात वजन उचलणे, चालणे, धावणे अश्या क्रियातून खूप ताण येतो. या क्रिया होत असताना जी हालचाल होते त्याने या गुड्घ्याच्या सांध्यावर ताण येतो. पण हा सांधा मूळतः मजबूत असल्याने त्याची हालचाल अतिशय शक्तीशाली स्नायूंच्या सहाय्याने होत असते. आणि त्या मुळे या सांध्याच्या हालचालीचा आवाका, त्याचे क्षेत्र हे मोठे असते. साधारण चाळीशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते. त्यांची लांबी कमी होऊ लागते. त्यांची आक्रसण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यात शुष्कता येते. आणि मग सांधे आखडतात. ऑस्टियो आर्थ्रायटीस या व्याधीत गुडघ्यातल्या सांध्याची हाडे जवळ येतात. त्यातली पोकळी कमी होते. यात पावलाची रचना वाकडी होऊन, आणखी कारणे पाहिली तर सांध्यांच्या अती वापराने ती हाडे जवळ येऊ शकतात. किंवा न वापरानेसुद्धा हाडे जवळ येऊ शकतात. आणि मग हे कशाने होते? एक तर खेळ केळताना वेड्या वाकड्या हालचाली झाल्या तर. दुसरे कारण म्हणजे तुमचा व्यवसाय. तुमच्या उभे राहण्याच्या किंवा बसण्याच्या वेड्या वाकड्या स्थितीने गुडघ्याच्या सांध्यावर ताण येतो. तिसरे म्हणजे शरीराचे अनियंत्रीत वजन आणि मी वर म्हटल्याप्रमाने वाडते वय. आणि मग याचा परीणाम असा होतो की ती हाडे जवळ आल्याने त्यातले घर्षण वाढते हाडांची नैसर्गिक दिशा असते ती बदलते आणि परीणाम असा होतो की त्याने वेदना वाढतात. गुडघ्यावर सूज येते. हालचालींवर मर्यादा येतात. मग हळू हळू चालण्यात वाकडेपणायेतो आणि शरीराचा समतोल धळू लागतो.

आधुनिक वैद्यकाचा विचार केला तर यात प्रमुख भर विश्रांतीवर असतो. तसेच औषधे, आणि बाह्योपचारावर भर असतो. म्हनजे शेकणे, मसाज करणे वगैरे. आय्र्वेदात यावर महानारायण तेलाचा मसाज सांगितला आहे. तेल किंचीत गरम करून ते जितके जिरवता येईल तितके गुडघ्यात जिरवायचे असते. आता सध्या थंडीच्या दिवसात महानारायण तेलात गवती चहाचा अर्क (Lemon Grass Oil) मिसळावा. हा अर्क खूप उष्ण असतो. त्यामुळे याचा वापर थंडीत करावा. आणि पोटात घेताना सिंहनाद गुग्गुळ, संधीवात वटी, महारास्नादी काढा, वगैरे औषधे सांगितली आहेत. शिवाय जर दुखणे खूपच तिव्र असेल तर आधुनिक वैद्यकात शस्त्रक्रिया सांगितली आहे. यात घर्षण होणार्‍या हाडाची टोके कापली जातात. पण त्यामुळे व्याधी मुक्ती होत नाही. काही दिवसांनी त्रास पुन्हा उपटतोच. कारण त्यात त्या आखडलेल्या स्नायूंबद्दल काहीच केलेले नसते. म्हणजेच जर यात योग्य उपाय योजना करायची असेल तर मूळ कारण दूर केले पाहीजे.

योगोपचाराचे तत्त्व : मी वर म्हटल्याप्रमाणे मूळ कारण दूर केले पाहिजे. गुडघ्याची स्थिरता आणि शक्ती ही त्या सांध्याची बांधणी केले स्नायू आणि अस्थिबंध(Ligaments) यांच्यामुळे येते. आणि यांना बळकटी आणता आली तर गुडघ्यावरचा दाब कमी होईल, तो भार पेलण्यास सक्षम होईल. ही बळकटी आणणे हे त्या गुडघ्याच्या नैसर्गिक हालचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि हे योगासनांच्या सहाय्याने शक्य आहे. मूळ कारण काय हे आपण मगाशी पाहिले की स्नायू आखडणे. मग काय केले पाहिजे? तर दोन हाडांमधली पोकळी , अंतर वाढवले पाहीजे. आणि हे कसे होइल, तर त्या सांध्याभोवतीचे जे स्नायू आखूड झालेले आहेत त्यांची लांबी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आखडलेले स्नायू मोकळे केले पाहिजेत. म्हणजे हाडांच्या टोकावर पडणारा दाब कमी होईल. त्यातले घर्षण थांबेल. घर्षणामुळे वाढलेले तपमान कमी होईल आणि सूज कमी होईल. आणि हे आसनांच्या माध्यमातून शक्य आहे. यात आपण स्नायूंची लांबी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आखडलेले स्नायू मोकळे करतो. आणि शरीराचा ढळलेला तोल पूर्ववत करतो. या योगोपचारात गुडघ्याची बांधणी करणारे अस्थिबंध आणि हालचाल करणारे स्नायू यांची नैसर्गिक अवस्था, साध्यातली नैसर्गिक लवचिकता आणि त्यांची बळकटी, ही दोर, पट्टे, यांच्या सहाय्याने ताण देऊन पूर्ववत करता येते. यात गुडघ्याच्या सांध्याचे स्थैर्य, कमरेतल्या खुब्याच्या आणि पावलातल्या घोट्याच्या सांध्याची लवचिकता, मांडीचे हाड आणि तंगडीचे हाड यात होणारे संभाव्य घर्षणाअणि वेदना मुक्ती हे साध्य होते.

या योगोपचाराचा क्रमहा सुरूवातीला प्रथम पावलातला बिघाड नाहीसा करणे, नंतर गुडघ्याच्या स्नायूना ताणून गुडघ्याचा सांधा मोकळा करणे आणि नंतर काही योगासनांच्या सहाय्याने कमरेतल्या सांध्यावर कार्य करून मांडीच्या पुढील आणि मागच्या स्नायूंची क्षमता वाढवणे असा असतो. याविषयी सविस्तर माहीती आपण पुढच्या भागात पाहू.



ॐ तत्सत्



........श्रीराम पेंडसे

सोमवार, २८ डिसेंबर, २००९

स्वप्न

स्वप्न



आज अचानक मनी उसळला

कल्लोळ आठवणींचा

तिच्या जन्मदिनी ध्यास घेतला

स्वप्ने रंगवण्याचा ॥१॥



स्वप्नाच्या या सुरम्य जगती

सयी विहार करती

आठवणींच्या पडद्यावरती पुष्पें

मोहक फुलती ॥२॥



मनात चित्रे उमटत येता

रंग उधळण करती

दीपावलीच्या जणू रातीच्या

नभांगणासम दिसती ॥३॥



स्वप्नी रंगता भान विसरले

तन मन मोहरले

मनोराज्यी ते डुंबत डुंबत

चिंब चिंब झाले ॥४॥



स्वप्ने सारी मनोरम असती

निर्मळ जलसम ती

ज्याच्यासंगे जळ ते मिसळे

तेचि रंग खुलती ॥५॥



स्वप्नांच्या या रंग जलाशयी

मन चित्त विहरती

जणू सागरी मत्स्य कन्यका

सळ सळ सळ पळती ॥६॥



गट्टी जमली नभो मंडळी

शुक्र तारकांशी

शोधित राही चित्त बावरे

मनमिलन राशी ॥७॥



चंद्रकोरीच्या बग्गीमध्ये

विसावले मन माझे

चांदरातीच्या शीतलतेने

मनीचा दाह विझे ॥८॥



इंद्रलोकी मी असेन नृपती

सखी असे राणी

स्वर्गभूमीतील मनराज्यांची

मनरम हीच कहाणी ॥९॥



देवभूमीतील तरू शिखरांवर

फुले तारकांची

वार्‍यासंगे तरू डोलता

होई पखरण त्यांची ॥१०॥



शुभ्र सड्यातून जाता जाता

वाट लुप्त झाली

मार्ग त्यातूनी शोधित असता

वसुंधरा टक्करली ॥११॥



धक्क्याने त्या उंच उडालो

धडपड गडबड झाली

सखी मात्र त्या बग्गीमध्ये

राहूनच गेली ॥१२॥



बग्गीमागे पळता पळता

पाताळी कोसळलो

धरतीने मग मला झेलले

भानावर आलो ॥१३॥



आणि!! अचानक जागा झालो

मधुर खग ध्वनीनी

मन मोहरले शांत जाहले

प्रभात किरणांनी ॥१४॥



डोळे उघडून पहाता पहाता

एक सत्य दिसले

मंच रिकामा दिसला...आणि

स्वप्नची उधळूनी गेले


..........श्रीराम पेंडसे