आरोग्यम् धनसंपदा - हृदय विकार - भाग १
या आणि यानंतरच्या काही भागात हृदयाचे विकार यांचा विचार करू. यात हृदयाचे शारीर म्हणजे त्याची थोडक्यात रचना आणि कार्य पाहू या. नंतर त्यात येणारे अडथळे आणि त्यामुळे निर्माण होणार्या व्याधी, तक्रारी आणि त्यांची तीव्रता, त्यांची लक्षणे, त्यासाठी कराव्या लागणार्या तपासण्या यासंबंधीची माहिती पाहू या. नंतर त्यावरचे उपचार की ज्यात आयुर्वेदिय उपचार, योगोपचार, पथ्यापथ्य, काळजी यांचा समावेश असेल. रक्तदाब हा जरी स्वतंत्र विकार असला तरी तो काही प्रमाणात हृदयाशी संबंधीत आहे. तसेच अजून एक हृदयाशी संबंधीत विकार म्हणजे मधुमेह. रक्तदाब आणि मधुमेह हे दोघेही हृदयविकाराला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत असतात. रक्तदाब आणि मधुमेह म्हणजेच हृदयविकार असे समीकरण मांडता येणार नाही. ७५% रुग्णांच्या बाबतीत हृदयविकाराबरोबर मधुमेह किंवा रक्तदाब किंवा दोन्ही असण्याची शक्यता असते. उलट प्रत्येक मधुमेही किंवा रक्तदाबाच्या रुग्णाला हृदय विकार असेलच असे नाही. पण अश्या रूग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आणि ती म्हणजे हृदयविकार होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहीजे. जागरूक राहीले पाहिजे. कारण रक्तदाब आणि मधुमेह हे दोन राहू केतु असे भारी आहेत की ते स्वतः आग लावणार नाहीत. कोणतीही मदतही करणार नाहित. पण आगीत तेल ओतण्याचे काम मात्र इमानदारीत करतील. एखादा किरकोळ अपघात झाल्यानंतर जमणार्या बघ्यांसारखे हे दोघे आहेत. म्हणून या दोघांबद्दलही याच लेखांमधून विस्ताराने पाहू. या सगळ्यांसाठी किती लेख लागतील माहित नाही. पण कमीत कमी आणि आवश्यक तितकीच वैद्यकिय परिभाषा वापरून ही माहिती कंटाळवाणी न होण्याचा मी प्रयत्न करीन. वैद्यकिय व्यवसायातील वाचकाना ही माहिती अपुरी वाटण्याचा संभव आहे. म्हणून मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते की ही माहिती सामान्यांसाठीच आहे. त्यांना यातले धोके समजणे इतकाच या माहितीचा आवाका आहे. त्यामुळे ही माहिती ढोबळ मानाने आहे हे लक्षात ठेवावे. मागील लेखांमधून दिलेली सूचना मी पुन्हा देणार आहे. इथे आपण हृदयाचा विचार करत आहोत. थेट मृत्यूशी भेट असू शकते.आणि म्हणून ही माहिती, यातील उपचार यांचा तारतम्याने वापर करायचा आहे. तज्ञ मार्गदर्शनाखालीच करायचा आहे. या माहितीचा उपयोग एखाद्या मार्गदर्शक तत्त्वांसारखा करायचा आहे. आपण जे करतो आहोत ते योग्य दिशेने चालले आहे ना, हे पहाण्यापुरता याचा उपयोग करावा. हृदयविकारात मानसिक ताण नेहमीच बर्याच प्रमाणात असतो. आपण करतो आहोत ते बरोबर आहे या विचारानेसुद्धा हा मानसिक ताण कमी झाला, तरीही हृदयावरचा ताण खूपच कमी होईल, आणि त्याचे स्वास्थ्य हे लवकर मिळवता येईल.
सर्वप्रथम आपण हृदयाची रचना आणि कार्य पाहूया. रक्ताभिसरण यंत्रणेत हृदयासह फ़ुफ़्फ़ुसे, दोन्ही रक्तवाहिन्या म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या या मह्त्वाच्या आहेत. हृदय हा शरीरातला अतिशय नाजूक अवयव आहे. आणि म्हणून याला छातीच्या हाडाच्या पिंजर्यात ठेवलेले आहे. त्या पिंजयात ते एका लवचिक आवरणात ठेवलेले असते. त्याला Pericardium म्हणतात. यात पाण्यासारखा द्राव असतो. त्याला Pericardial Fluid असे म्हणतात. त्या द्रावाने हृदयाला वेढलेले असते. हा द्राव एखाद्या Shock Absorber सारखा काम करतो. छातीचे पुढचे हाड, पाठीचा कणा, त्याना जोडलेल्या फासळ्या आणि या सर्वांभोवतीचे स्नायू असे हदय सर्व बाजूने वेढलेले आहे. हृदयाच्या खालील बाजूस एक लवचिक पडदा असतो. त्याला Diaphram असे म्हणतात. जवळ जवळ त्यावरच हे हृदय ठेवलेले असते. त्यामुळे हृदय सर्वबाजूने संरक्षित असते. हृदय आणि फुफ्फुसे हे दोन्ही अवयव नाजूकच. म्हणून ते शेजारी आणि एकाच सोसायटीत राहतात. जणू एकमेकांना संभाळून. आणि छातीचा सर्वबाजूने संरक्षित पिंजरा ही त्यांची सोसायटी. कामाचा सर्वाधिक भार उचलावा लागणारे हे अवयव आहेत. हृदयाला विश्रांती नाही. डोके, मेंदू यांना थोडीतरी विश्रांती मिळू शकते. पण हृदयाला नाही. हे सतत अविरत काम करत असते, वंगणाशिवाय, कोणत्याही आधाराशिवाय. हृदयाचा आकार बदामासारखा असतो. चांगल्या निरोगी हृदयाचा आकार हा आपल्या हाताच्या मुठीइतका असतो. हृदयचे सतत काम चालू असल्याने त्याचे स्नायू हे शरीरातल्या इतर स्नायूंसारखे नसतात. ते इतर स्नायूंसारखे कार्य करत नाहीत. पण हृदयाचे स्नायू मात्र सतत हालचाल करत असल्याने यांची आंतरीक ताकद खूप जास्त आहे. या स्नायूंवर आपले नियंत्रण आणि नियमन नाही. आपल्या इच्छेप्रमाणे याचे कार्य नाही चालत. म्हणजे कार जशी हवी तेंव्हा थांबवता येते किंवा चालू करता येते तसे याचे करता येत नाही. म्हणून याना अनिच्छावर्ती स्नायू म्हणतात. आपले हृदय हे एखाद्या चार बीएचके फ़्लॆटसारखे आहे. याचे चार कप्पे असतात. दोन उजव्या बाजूचे आणि दोन डाव्या बाजूचे. सर्वप्रथम अशुद्ध रक्त उजव्या वरच्या कप्प्यात येते. याला Aurical म्हणतात. तेहून ते खालच्या उजव्या कप्प्यात येते. या कप्प्याला Ventricle असे म्हणतात. हे रक्त उलटे परत फ़िरू नये म्हणून त्यात Non Return झडपा असतात. तेथून ते रक्त दोन्ही फ़ुफ़्फ़ुसात जाते. तिथे ते सूक्ष्म रक्तवाहिन्यातून वायुकोशाभोवती फ़िरते आणि प्राणवायूची आणि कार्बन डाय ऒक्साईड या वायूंची देवाण घेवाण होऊन रक्त शुद्ध होते. हे शुद्ध झालेले रक्त पुन्हा डाव्या बाजूच्या कप्प्यात येते आणि तेथून ते शरीराला पुरवले जाते. रक्तात हिमोग्लोबिन नावाचे द्रव्य असते. ते संपूर्ण शरीराला प्राणवायू पुरवण्याचे काम करते. रक्त शरीरभर फ़िरताना त्यातील प्राणवायू वापरला जातो आणि कमी होतो. हे रक्त पुन्हा हृदयाद्वारे फ़ुफ़्फ़ुसात येते व त्यातले हिमोग्लोबीन फ़ुफ़्फ़ुसातला प्राणवायू शोषून घेते आणि शुद्ध होते. महारोहीणी द्वारे सर्व रक्त हृदयात परत येते व शरीरभर पुरवले जाते. नंतर महानीलेद्वारे ते परत शुद्धीकरणासाठी हृदयाकडे येते.
रक्त शरीरात दोन ठिकाणी शुद्ध होते. फ़ुफ़्फ़ुसे आणि मूत्रपिंडे. फुफ्फुसात वायूदोष काढले जाता आणि मूत्रपिंडात रक्तातले जलदोष वेगळे काढले जातात. आणि दोन्हीचे कार्य बिघडले तर हृदयाच्या क्षमतेवर परीणाम होतो. हृदय सारखे आकुंचन आणि प्रसरण पावत आसते. आणि ही आकुंचन-प्रसरणाची एक क्रिया म्हणजे एक ठोका असतो. हृदयाच्या एका ठोक्यात साधारण ७० सी.सी. रक्त हृदयाबाहेर फ़ेकले जाते. आणि असे हृदयाचे साधारण ७२ ते ८० ठोके एका मिनिटात होतात. म्हणजे तितक्यावेळा रक्त हृदयाबाहेर पडते. हृदयातले रक्त ज्या दाबाने बाहेर फ़ेकले जाते तो साधारण १२० मि.मी. (Mercury) असतो.व शेवटच्या टोकाजवळ हा दाब जवळ जवळ शून्य असतो. या दाबातील फ़रकामुळे हृदयातले रक्त तेथपर्यंत पोहोचते. आता हे रक्त पुन्हा हृदयापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हे शरीराच्या हालचालींमुळे हे शक्य होते. अर्थात या अशुद्ध रक्तवाहिन्यात Non Return झडपा असतात. त्या झडपा ते रक्त पुन्हा उलटे जाऊ देत नाहीत.
हृदयाचे स्नायू सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांनाही रक्तपुरवठा होणे आवश्यक आहे. हृदयाच्या स्नायूंना सुमारे २०० सी. सी. रक्त लागते. या वाहिन्याना Coronary Artries म्हणतात. आणि या रक्ताभिसरणाला Coronary Circulation म्हणतात. या दोन वाहिन्या असतात. डावी आणि उजवी रक्तवाहिनी. या दोन्हीपैकी एक थोडीशी मजबूत (Superior) असते. या मधून जास्त रक्त जाते. याला Dominant Circulation म्हणतात. जेंव्हा त्रास होतो तेंव्हा या दोन्हीपैकी एका किंवा दोन्हीही रक्त वाहिन्यात अडथळा येतो. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. हृदयाचे कार्य मंदावते. इतर अवयवांना असा अडथळा आला की इतर कोठूनतरी रक्तपुरवठा होऊन त्याचे कार्य सुधारते. पण हृदयाला तशी सोय नाहीये. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यात अडथळा आला की त्याच्या कार्यात विक्षेप निर्माण होतो. ज्यावेळी हृदयाला रक्तपुरवठाच कमी होतो त्या त्रासाला अंजायना म्हणतात. अश्या कमी रक्तपुरवठ्यामुळे हृदयाच्या एका भागास प्राणवायू कमी पडतो. आणि हृदय अधिकाधीक मागते. Angie म्हणजे रडणे म्हणून त्याला हृदयाच्या स्नायूंचे अढिक रक्तपुरवठ्यासाठी रडगाणे म्हनतात. (Its a cry of cardic muscles for increased blood supply.) ज्या मंडळींना असा त्रास होतो ते लोक त्या मानाने भाग्यवान असतात. कारण अश्या अंजायनाच्या त्रासात तो कमी रक्तपुरवठ्याचा भाग इतर शीरांना आपल्याकडे ओढून घेतो. त्यामुळे अश्या व्यक्तीना हृदयविकाराच्या झटक्याचा त्रास होत नाही. अंजायना हा बसल्या जागी होत नाही. पळणे, मानसिक तणाव अश्यावेळी हा त्रास होतो. आणि त्यातून मग हृदयविकाराचा झटका येउ शकतो. म्हणून अंजायना ही वेळीच काळजी घेण्याची धोक्याची सूचना आहे.
अरे वा! अतिशय महत्त्वाच्या विषयावर सुंदर विवेचन करता आहात. मलाही नक्कीच उपयोगी पडेल.
उत्तर द्याहटवामीही माझे अनुभव http://www.manogat.com/node/5150 इथे लिहीले आहेत. आणि http://nvgole.blogspot.com/2009/05/blog-post_9920.html#links या दुव्यावरही काही माहिती आहे. ती अवश्य वाचावी.
आपल्या पुढल्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे.