आरोग्यम् धनसंपदा
मागील लेखात आपण पाठीच्या दुखण्यावरचे योगोपचार पाहीले. या लेखात गुडघे दुखीचा विचार करूया. मागे जेंव्हा कारणांचा विचार केला होता, तेंव्हा त्यात गुडघे दुखी याचा विचार झाला नव्ह्ता म्हणजे कारणे, लक्षणे याचा विचार झाला नव्हता. गुडघेदुखी ही सामान्यपणे वयोमानाने येणारी व्याधी आहे. एखादे अपघाताचाचे कारण असले तरच तरूण वयात गुडघ्याचा त्रास होतो. अन्यथा वयाच्या पन्नाशीनंतर साधारणपणे उद्भवणारी ही व्याधी आहे. सामान्यपणे शरीरात हाडांचे जे सांधे असतात त्यात हाडे एकमेकात गुंतलेली नसतात. तर ती स्नायूंच्या सहायाने एकमेकांना बांधलेली असतात. (अपवाद फक्त खांद्यातला व कमरेतला उखळीचा सांधा आणि कवटी मणक्यावर जिथे तोलून धरलेली असते तो सांधा.) आणि या स्नायूंच्या सहाय्याने त्याची हालचाल होते. गुडघ्याचा सांधा हा शरीरातला सगळ्यात मजबूत सांधा आहे. मांडीचे शक्तीशाली हाड आणि तंगडीचे हाड, आणि त्यावर त्याला संरक्षण म्हणून हाडाची गोल चकती अशी या सांध्याची रचना असते. हा सांधा बिजागरीचा सांधा असतो. जसे बिजागरीत या सांध्याची हालचाल ही जशी एकाच दिशेने होते तशी याची हालचाल पण एकाच दिशेने होते. म्हणजे पाय गुढग्यात मागच्या बाजूला दुमडता येतो. त्याच्या विरूद्ध दिशेने दुमडता येत नाही. आता शरीराचे सपूर्ण वजन या सांध्यावर येते. त्या मुळे हा सांधा अतिशय मजबूत असतो. कमरेतला सांधा(Hip Joint) आणि घोट्याचा सांधा(Ankle Joint) यांच्या मधे गुढगा आहे. त्यामुळे या दोन्ही सांध्यात काही गडबड झाली तर त्याचा परीणाम थेट गुडघ्याच्या सांध्यावर होतो. त्याचा तोल ढळू लागतो. या सांध्यावर दैनंदिन जीवनात वजन उचलणे, चालणे, धावणे अश्या क्रियातून खूप ताण येतो. या क्रिया होत असताना जी हालचाल होते त्याने या गुड्घ्याच्या सांध्यावर ताण येतो. पण हा सांधा मूळतः मजबूत असल्याने त्याची हालचाल अतिशय शक्तीशाली स्नायूंच्या सहाय्याने होत असते. आणि त्या मुळे या सांध्याच्या हालचालीचा आवाका, त्याचे क्षेत्र हे मोठे असते. साधारण चाळीशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते. त्यांची लांबी कमी होऊ लागते. त्यांची आक्रसण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यात शुष्कता येते. आणि मग सांधे आखडतात. ऑस्टियो आर्थ्रायटीस या व्याधीत गुडघ्यातल्या सांध्याची हाडे जवळ येतात. त्यातली पोकळी कमी होते. यात पावलाची रचना वाकडी होऊन, आणखी कारणे पाहिली तर सांध्यांच्या अती वापराने ती हाडे जवळ येऊ शकतात. किंवा न वापरानेसुद्धा हाडे जवळ येऊ शकतात. आणि मग हे कशाने होते? एक तर खेळ केळताना वेड्या वाकड्या हालचाली झाल्या तर. दुसरे कारण म्हणजे तुमचा व्यवसाय. तुमच्या उभे राहण्याच्या किंवा बसण्याच्या वेड्या वाकड्या स्थितीने गुडघ्याच्या सांध्यावर ताण येतो. तिसरे म्हणजे शरीराचे अनियंत्रीत वजन आणि मी वर म्हटल्याप्रमाने वाडते वय. आणि मग याचा परीणाम असा होतो की ती हाडे जवळ आल्याने त्यातले घर्षण वाढते हाडांची नैसर्गिक दिशा असते ती बदलते आणि परीणाम असा होतो की त्याने वेदना वाढतात. गुडघ्यावर सूज येते. हालचालींवर मर्यादा येतात. मग हळू हळू चालण्यात वाकडेपणायेतो आणि शरीराचा समतोल धळू लागतो.
आधुनिक वैद्यकाचा विचार केला तर यात प्रमुख भर विश्रांतीवर असतो. तसेच औषधे, आणि बाह्योपचारावर भर असतो. म्हनजे शेकणे, मसाज करणे वगैरे. आय्र्वेदात यावर महानारायण तेलाचा मसाज सांगितला आहे. तेल किंचीत गरम करून ते जितके जिरवता येईल तितके गुडघ्यात जिरवायचे असते. आता सध्या थंडीच्या दिवसात महानारायण तेलात गवती चहाचा अर्क (Lemon Grass Oil) मिसळावा. हा अर्क खूप उष्ण असतो. त्यामुळे याचा वापर थंडीत करावा. आणि पोटात घेताना सिंहनाद गुग्गुळ, संधीवात वटी, महारास्नादी काढा, वगैरे औषधे सांगितली आहेत. शिवाय जर दुखणे खूपच तिव्र असेल तर आधुनिक वैद्यकात शस्त्रक्रिया सांगितली आहे. यात घर्षण होणार्या हाडाची टोके कापली जातात. पण त्यामुळे व्याधी मुक्ती होत नाही. काही दिवसांनी त्रास पुन्हा उपटतोच. कारण त्यात त्या आखडलेल्या स्नायूंबद्दल काहीच केलेले नसते. म्हणजेच जर यात योग्य उपाय योजना करायची असेल तर मूळ कारण दूर केले पाहीजे.
योगोपचाराचे तत्त्व : मी वर म्हटल्याप्रमाणे मूळ कारण दूर केले पाहिजे. गुडघ्याची स्थिरता आणि शक्ती ही त्या सांध्याची बांधणी केले स्नायू आणि अस्थिबंध(Ligaments) यांच्यामुळे येते. आणि यांना बळकटी आणता आली तर गुडघ्यावरचा दाब कमी होईल, तो भार पेलण्यास सक्षम होईल. ही बळकटी आणणे हे त्या गुडघ्याच्या नैसर्गिक हालचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि हे योगासनांच्या सहाय्याने शक्य आहे. मूळ कारण काय हे आपण मगाशी पाहिले की स्नायू आखडणे. मग काय केले पाहिजे? तर दोन हाडांमधली पोकळी , अंतर वाढवले पाहीजे. आणि हे कसे होइल, तर त्या सांध्याभोवतीचे जे स्नायू आखूड झालेले आहेत त्यांची लांबी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आखडलेले स्नायू मोकळे केले पाहिजेत. म्हणजे हाडांच्या टोकावर पडणारा दाब कमी होईल. त्यातले घर्षण थांबेल. घर्षणामुळे वाढलेले तपमान कमी होईल आणि सूज कमी होईल. आणि हे आसनांच्या माध्यमातून शक्य आहे. यात आपण स्नायूंची लांबी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आखडलेले स्नायू मोकळे करतो. आणि शरीराचा ढळलेला तोल पूर्ववत करतो. या योगोपचारात गुडघ्याची बांधणी करणारे अस्थिबंध आणि हालचाल करणारे स्नायू यांची नैसर्गिक अवस्था, साध्यातली नैसर्गिक लवचिकता आणि त्यांची बळकटी, ही दोर, पट्टे, यांच्या सहाय्याने ताण देऊन पूर्ववत करता येते. यात गुडघ्याच्या सांध्याचे स्थैर्य, कमरेतल्या खुब्याच्या आणि पावलातल्या घोट्याच्या सांध्याची लवचिकता, मांडीचे हाड आणि तंगडीचे हाड यात होणारे संभाव्य घर्षणाअणि वेदना मुक्ती हे साध्य होते.
या योगोपचाराचा क्रमहा सुरूवातीला प्रथम पावलातला बिघाड नाहीसा करणे, नंतर गुडघ्याच्या स्नायूना ताणून गुडघ्याचा सांधा मोकळा करणे आणि नंतर काही योगासनांच्या सहाय्याने कमरेतल्या सांध्यावर कार्य करून मांडीच्या पुढील आणि मागच्या स्नायूंची क्षमता वाढवणे असा असतो. याविषयी सविस्तर माहीती आपण पुढच्या भागात पाहू.
ॐ तत्सत्
........श्रीराम पेंडसे
॥ श्रीराम ॥
उत्तर द्याहटवाआपला लेख खरेच अत्यंत मोलाचा असा वाटला. याचे कारण सध्या मी या गुढघे दुखीच्या त्रासातून जात आहे. इंटरनेट वरती याबद्दल शोधत असताना आपला लेख वाचनात आला. खरे तर ही प्रतिक्रिया आपल्या लेखानंतर ५ वर्षाने लिहीत आहे. पण आपण मला मार्गदर्शन करू शकाल अशी अपेक्षा करते.
माझे वय ६३ असून मी सध्या पुण्यात राहत आहे. तरी आपण सुचवलेल्या सल्ल्यानूसार पुण्यात मला कुठे योग्यतो उपचार मिळू शकेल? क्रुपया मार्गदर्शन करावे.
कळावे,
सौ. सुजाता गोवंडे