रविवार, २४ जानेवारी, २०१०

बोध कथा

बोध कथा


बोध कथा म्हणजे आपला वाचनात येणार्‍या काही गोष्टी की ज्यातून काही शिकायला मिळते. आता आपले वय हे काही शिकायचे राहिलय का? ते ज्याने त्याने ठरवावे. वाचकांपैकी काहींचे संसार अश्या अवस्थेला येऊन पोहोचले असतील की "आता आमच्या आयुष्यात नव्याने काही शिकण्यासारखे राहीले नाहीये" असे काहींना वाटेल, तर काहींना वाटेल की "अजून आमचे आयुष्य तर खर्‍या अर्थाने सुरू व्हायचय. मग आत्ता त्याची चिंता कशाला? जेंव्हा वेळ येईल तेंव्हा पाहू." त्यामुळे या गोष्टींमधून काय बोध घ्यायचा हे सांगण्याचा अधिकार मला आहे की नाही हेही मला ठाऊक नाही. मी स्वतःसुद्धा पहिल्या गटातल्या लोकांपैकी असलो तरी या गोष्टी तुम्हाला सांगाव्या असे मला वाटले. या गोष्टी इंग्रजीत आहेत. मी लिहीलेल्या नाहीत हे आधीच स्पष्ट करतो. मी फक्त मराठीत आणण्याचे काम करतोय. मला या गोष्टींचे मूळ लेखक ठाउक नाहीत. पण मला त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्या असे मला वाटले म्हणून त्या अनामिक लेखकांची क्षमा मागून मी यांचे मराठीकरण करत आहे. यातली पहिली गोष्ट ही मूळची अकबर-बिरबलाची नाही याची आवर्जून नोंद घ्यावी. तुम्ही त्यांच्या गोष्टींची पुस्तके चाळून काढाल आणि तुम्हाला त्यात सापडणार नाही. म्हणून हे आधीच स्पष्ट केले. पण अकबर बिरबलाची गोष्ट असली की त्याचा परीणाम चटकन होतो, लवकर पटते असे मला वाटले म्हणून मी त्याचे अकबर-बिरबलाच्या गोष्टीत रूपांतर केले आहे.

जवळ जवळ सर्वांचेच आयुष्य अडचणींनी भरलेले असते. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत सुखी असलेला माणूस मला तरी पाहण्यात नाही. जसे बिनचूक बांधकाम दुनियेत पहायला सापडणार नाही. कुठेतरी बारीकशी फट राहतेच कि जी लक्षातसुद्धा येत नाही. तसे एखाद्या सर्व सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीचे आयुष्य असते. हे आयुष्य एखादी फट किंवा खुर्चीचा तुटलेला पाय जसा आपण "एम सील" ने जोडतो तसा आपण आपल्या तारतम्याचा, विवेकबुद्धीचा वापर "एम सील" सारखा करून आपले जीवन सुखी करायचे आहे. आणि त्यात आपल्या जीवनसाथीचा सहभागही खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहीले असेल तर तुमच्या लक्षात येईल की "एम सील"च्या दोन कांड्या असतात. एक पांढरी आणि एक काळी. या दोन्ही कांड्या एकत्र नीट मळून एकजीव करून त्याने अनावश्यक फटी, भोके बुजवायची असतात. तश्या त्या बुजवल्यावर ते "एम् सील" सेट होते. म्हणजे घट्ट होते. मग मात्र ते तुटता तुटत नाही. त्या जागा अभंग राहतात. निदान तिथे तरी अडचण येणार नाही याची खात्री असते. तसे संसारात, आपण आणि आपल्या जीवनसाथीचे मन, विचार, संस्कार आणि वागणे त्या "एम् सील" सारखे एकजीव करून संसारातली त्रासदायक भोके बुजवायची असतात, मतभेदांच्या फटी काढून टाकायच्या असतात. यात आपण बर्‍याचवेळा अयशस्वीसुद्धा होतो. तसे का होते? तर त्या फटी, ही भोके, आपल्याला ते "एम् सील" सेट होईपर्यंत लक्षातच येत नाहीत. आणि मग तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. पती पत्निच्या मनाचे, त्यांच्या स्वभावाचे, आचार विचारांचे, त्यांच्यावरच्या संस्कारांचे "एम् सील" हे विवाहानंतरच्या काळात सेट होण्यापूर्वीच ज्यांना ही भोके कळतात, या फटी लक्षात येतात ते संसार यशस्वी होतात. ते आनंदी असतात. सुखी असतात. ते पुन्हा अश्या फटी पडणार नाहीत, तडे जाणार नाहीत याची काळजी घेतात. आणि या फटींचा, संसारातल्या साखळीच्या कमकुवत कड्यांचा, तडे जाण्याच्या क्षणांचा, आधीच अंदाज येणे हीच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे असे मला वाटते.

मी वर म्हटल्याप्रमाणे अंदाज सगळ्यांना येतो असे नाही. किंबहुना फार थोड्यांना हे जमते. मग या गोष्टीतून ही गुरूकिल्ली सापडेल का? माहीत नाही. ज्याने त्याने ठरवायचे आहे की आपण यातून काही घेऊ शकतो का? पण मी थोडासा विचार केल्यावर मला असे वाटले की घेता येईल. किती ते माहीत नाही. पण सूज्ञांना या गोष्टी नक्की विचार करायला लावतील असे मला वाटले म्हणून हा मराठीकरणाचा उद्योग.



एक

अकबर बादशहा हा हल्ली सुखी नव्हता. त्याच्याकडे धन दौलत होती. सत्ता होती. पण तो सुखी नव्हता. समाधानी नव्हता.

असाच एके दिवशी तो शहरातून फेरफटका मारत असताना त्याला एक मजूर काम करताना दिसला. त्या मजूराच्या चेहेर्‍यावर समाधान होते. तो काम करताना गात होता. बादशहाला हे पाहून अतोनात आश्चर्य वाटले. मी या भूमीचा सार्वभौम बादशहा की ज्याला संपत्तीची ददात नाहीये, सर्व सुखे हात जोडून समोर उभी आहेत, तरीही मी सुखी नाहीये, समाधानी नाही, आणि हा एक क्षुल्लक मजूर ज्याचे पोट रोजी कमाईवर अवलंबून आहे, हा इतका सुखी कसा? अखेर बादशहाने न राहवून त्या मजूराला विचारले,

"तू काम करताना गाणी म्हणतो आहेस. तू इतका सुखी कसा?"

"खाविंद, मी एक सामान्य मजूर आहे. त्यामुळे माझ्या गरजाही मर्यादीत आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला दोन वेळचे जेवायला आणि डोक्यावर छप्पर असले की माझे काम भागते."

बादशहा निरुत्तर होऊन तेथून निघून गेला. पण त्याचे त्या उत्तराने समाधान झाले नाही. तो महालात आला. त्याने विचार केला की आपल्याला याचे उत्तर फक्त बिरबलच देऊ शकेल. म्हणून त्याने बिरबलाला बोलावणे पाठवले. बिरबल आला. आणि बादशहाने बिरबलाला त्या मजूराची कथा सांगितली. बिरबलने सर्व शांतपणे ऐकून घेतले. आणि म्हणाला,

"खाविंद, मला असे वाटते की हा मजूर "९९ क्लब" चा अधिकृत सभासद नाहिये. आणि खाविंद, माफी असावी, पण तुम्हीही या क्लबचे सभासद आहत. म्हणून तुम्हाला असं वाटतय."

बादशहाला आश्चर्य वाटले. तो बिरबलाला म्हणाला,

" ही "९९ क्लब" काय भानगड आहे? आणि तू असं कसं म्हणतोस? मला काहीही माहित नसूनही मी याचा सभासद कसा?"

"महाराज, सांगतो. पण हे काय आहे हे तुम्हाला पटकन कळणार नाही. तर हे नक्की काय आहे हे नीट कळण्यासाठी त्या मजूराच्या घराच्या पायरीवर ९९ मोहोरांनी भरलेली एक थैली ठेवा."

बादशहा काही बोलला नाही. त्याचा बिरबलावर विश्वास होता. त्याने बिरबलाने सांगितले तसे करण्याची सेवकांना आज्ञा दिली.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्या मजूराने ती थैली पाहीली. थैली उघडून पाहिल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना. तो आनंदातिशयाने ओरडला,

" वा वा! इतक्या सोन्याच्या मोहोरा!!!! भाग्य उजळलेले दिसते."

त्याने ती थैली घरात नेली आणि त्यातल्या मोहोरा मोजल्या. त्या ९९ भरल्या. त्याला वाटले की आपले मोजण्यात काहीतरी चुकले. त्याने त्या पुन्हा मोजल्या. तरीही त्या ९९च भरल्या. त्याने त्या परत परत मोजल्या. ९९ च होत्या. त्याला नवल वाटले. १०० वे नाणे कुठे गेले? कोणी ९९ नाणी थैलीत नक्की ठेवणार नाही. मग त्या १०० व्या नाण्याचे काय झाले? त्याने खूप शोधले. पण त्याला काही ते शंभरावे नाणे सापडले नाही. तो अस्वस्थ झाला. त्याला सुचेना. हे जर १०० वे नाणे सापडत नसेल तर मग ते आपण कष्टाने मिळवायलाच हवे. पण आपण १०० हा आकडा पूर्ण करायचाच असा त्याने निर्धार केला. मग त्यासाठी काय वाटेल ते करावे लागले तरी चालेल.

आणि त्या दिवसापासून त्या मजूराचे आयुष्यच बदलले. शेवटी त्याने हे नाणे मिळवण्यासाठी खूप कष्ट करण्याचे ठरवले. नेहमीपेक्षा अधिक. खूप जास्त. आपण काहीही करून हे शंभरावे नाणे मिळवायचेच या प्रयत्नात तो त्याची तहान भूक विसरला. त्याचे काम करतानाचे गाणे थांबले. बादशहाला हा बदल पाहून अतिशय नवल वाटले. धक्का बसला. त्याने बिरबलाला पुन्हा बोलावणे पाठवले. बिरबल उत्तरला,

"महाराज, हा मजूर आता "९९ क्लब" चा अधिकृत सभासद झाला आहे. "९९ क्लब" हे नाव अश्या लोकांना दिले जाते, कि जे सुखी आहेत, ज्यांच्याकडे पुरेशी संपत्ती आहे, पण ते समाधानी नाहीत. कारण ते नेहमी अधिक मिळवण्यासाठी धडपडत असतात. ते नेहमी या शेवटच्या शंभराव्या मोहोरेसाठी आटोकाट प्रयत्न करत असतात, धडपड करत असतात. मला ही शंभरावी मोहोर एकदाची मिळू दे, म्हणजे मी आयुष्यभरासाठी सुखी आणि समाधानी होईन अशी त्यांची धारणा असते.

खाविंद, आपण आयुष्यात थोडक्यातही समाधानी असतो. असू शकतो, होऊ शकतो. पण ज्या क्षणी आपल्याला आणखी मिळते, चांगले आणि अधिक मिळते, त्या क्षणापासून आपण त्याहीपेक्षा अधिक मिळवण्याचा अट्टाहास करतो. त्यासाठी आपण आपली तहान भूक गमावून बसतो. झोप गमावतो. मनस्वास्थ्य जाते. आपल्या आजूबाजूच्या लोकाना, आपल्या आप्ताना आपण दुखावतो. आपल्या संसारात आपले लक्ष राहत नाही. आणि हे सर्व का? तर खरोखर गरज नसलेले अधिक मिळवण्याच्या हव्यासापोटी. आणि हीच आपण आपल्या मनस्वास्थ्याची, अधिक मिळवण्याच्या हव्यासाची, आकांक्षेची, किंमत मोजत असतो.

आणि ही अवस्था हेच "९९ क्लब" चे अधिकृत सभासदत्व आहे."

बादशहा निरुत्तर झाला!!!



दोन

फार फार पूर्वीच्या काळच्या गुरूकुल पद्धतीतल्या शिक्षणाच्या काळातली ही गोष्ट आहे.

एकदा एक शिष्य आपल्या गुरूकडे अतिशय दु:खी मनस्थित गेल आणि म्हणाला,

"गुरूजी, मी व्यथित आहे. दु:खी आहे. मला कळत नाहीये की मला काय झालय. मला उपाय सांगा."

"काय झालय बाळा?"

पण त्याला काही सांगता येईना. मग गुरूजी म्हणाले,

"एक काम कर. एक ग्लास घेऊन ये". गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे त्याने ग्लास आणला.

"आता तो पाण्याने भर. त्यात मूठभर मीठ टाक. आणि व्यवस्थित ढवळ." त्याने गुरूजींनी सांगितले तसे तसे केले. मग त्याला गुरूजी म्हणाले,

" आता हे पी." , त्याला ते आवडले नाही. पण गुरूअवज्ञा करायची नाही म्हणून तो त्यातले घोटभर पाणी प्यायला. गुरूजीनींनी विचारले,

"कसे लागतय?"......गुरूजी

"अतिशय वाईट चव आहे."

"खारट लागतय?".......गुरूजी

"हो"

"ठीक आहे. आता चल माझ्याबरोबर."......गुरूजी

गुरूजी त्याला एका तलावाच्याकाठी घेऊन गेले. त्यांनी शिष्याला त्यातलावात मूठभर मीठ भिरकावून द्यायला सांगितले. ते म्हणाले,

"आता या तलावातले पाणी पी." शिष्याने त्यांची आज्ञा पाळली आणि तो पाणी प्यायला. गुरूजींनी विचारले,

"कसे लागतय?"

"चव छान आहे." शिष्य उत्तरला.

"मीठाची खारट चव लागतीये?" ......गुरूजी

"छे. अजिबात नाही."

मग गुरूजींनी शिष्याचा हात धरून त्याला आपल्या जवळ बसवले. त्याच्या पाठीवरून अत्यंत मायेने हात फिरवला आणि त्याला म्हणाले,

"आयुष्यात दु:खे ही एखाद्या शुद्ध मिठासारखी असतात. त्याचा खारटपणा कधी कमी नसतो किंवा जास्तही नसतो. त्याची तीव्रता कधीच बदलत नसते. तसे आयुष्यातली दु:खे ही तशीच असतात. त्यांची तीव्रता, त्यांचे डोंगर कधीही कमी जास्त होत नसतात. पण त्या दु:खाची चव ही, आपण ते दु:ख कसे घेतो, कोणत्या प्याल्यात ठेवतो त्याला महत्त्व आहे. म्हणून मग तुम्ही दु:खी असाल तर फक्त तुमच्या हातात ते दु:ख झेलण्याची क्षमता वाढवणे इतकेच असते. म्हणून जीवनात, "प्याला" होणे थांबवा. "तलाव" व्हा. म्हणजे मग दु:खाची झळ बसणार नाही."



तीन



एकदा एक वाटसरू वाटचाल करत करत एका खेड्याच्या सीमेवर आला. तिथे त्याला रस्त्याच्या कडेला बरीच गर्दी दिसली. कुतूहलाने तो त्या गर्दीत शिरला आणि काय भानगड आहे ते पाहू लागला.

त्याला असे दिसले कि दोन खेळाडू तलवार युद्धाचा खेळ खेळत होते. त्यांचे खेळात पूर्ण लक्ष केंद्रित झाले होते. आणि सभोवतालचे प्रेक्षक अगदी स्तब्ध राहून खेळ बघत होते. हा वाटसरूही खेळ पाहू लागला. थोड्यावेळाने त्यापैकी एका योध्याच्या चेहेर्‍यावर ईर्षा, आसूया दिसायला लागली. आणि सगळी गर्दी तिथून पांगली, नाहीशी झाली. तिथे फक्त हा वाटसरू आणि एक नव्वदीतला म्हातारा असे दोघेच जण राहीले. तो म्हाताराही जायला लागल्यावर वाटसरूने त्या म्हातार्‍याला थांबवले. आणि विचारले,

"अहो, अजून तर खेळ संपला नाहिये. मग सगळे लोक का निघून गेले? आता तर खरी मजा यायला सुरूवात झालीये. मग असे का?"

तो म्हातारा त्यावर उत्तरला,

"मित्रा तू या देशात नवा दिसतोस. आतापर्यंत खेळ चालू होता तो खेळ होता. सारे कसे निर्मळ, स्वच्छ वातावरणात चालले होते. पण ज्या क्षणी त्यातल्या एकाच्या चेहेर्‍यावर आसूया, ईर्षा दिसली त्या क्षणी त्या खेळातलातला खेळाचा भाग संपला. त्यातला खॅळ संपून व्यक्तिगत दुश्मनी सुरू होण्याची ही वेळ असते. सगळे लोक खेळ पहायला आलेले होते. त्यातला खेळ संपल्यावर ते सर्व निघून गेले."

आणि तो म्हातारा त्या वाटसरूकडे किंवा त्या खेळाडूंकडे लक्षही न देता पाठ फिरवून निघून गेला.

(एका जपानी लोककथेवरून)



.........श्रीराम पेंडसे

1 टिप्पणी:

  1. वा! सुंदरच कथा आहेत. अनुवादही सुरेखच केलेला आहेत. धन्यवाद!

    तुमच्या ब्लॉगरच्या सेटिंगमधे जाऊन जर "भाषा" मराठीच्या ऐवजी इंग्रजी सेट केलीत तर मथळ्याचा पट्टा जो आता अर्धवट दिसत आहे, तो पूर्ण दिसू लागेल. मराठीत लिहीलेले मराठीतच दिसत राहील.

    उत्तर द्याहटवा