बुधवार, २३ जून, २०१०

कॉर्बेट डायरी

कॉर्बेट डायरी




"..........समोर सुमारे २५ हत्तींचा कळप रस्त्यात ठाण मांडून होता. ते हलण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. ते जाण्याची वाट बघत आम्ही जीपमधे बसून होतो. थोडेसे अस्वस्थ होऊन की हे हलणार का? आणि हलले तर कधी? सूर्य अस्ताला जायची वेळ जवळ येत होती. हाताशी फार वेळ असणार नव्हता. मागे वळून पाहिल्यावर असे दिसले कि मागून अजून १५/१६ हत्तींचा कळप ह्ळू हळू रस्त्यावर येण्याच्या विचारात आहे. त्यात पिल्ले होती. मोठाले सुळेवाले हत्ती होते. ते सर्व अजून रस्त्यावर आले नसले तरी विचार तसाच दिसत होता. धोक्याची घंटा आमच्या चालकाच्या डोक्यात वाजू लागली होती. पण तरीही तो शांत बसून होता. वाट बघत!! समोरचा कळप लवकर हलेल या आशेवर!!! आणि अचानक शेजारच्या झाडीतून ५/६ हत्ती हळू हळू बाहेर यायला लागले होते. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जायच्या बेताला आली होती. कोंडी होण्याची लक्षणे दिसायला लागली होती. काय करायचे? किती वेळ थांबायचे?............."



आभार : या डायरीची पाने लिहीताना मला सृष्टी भावे, सुश्रुत करमरकर आणि शौरी सुलाखे या तिघांची मोलाची मदत झाली. विशेषतः सृष्टी हिची मला, त्यांना वाघ दिसल्याचे वर्णन लिहीण्यात आणि नंतरच्या अपघाताबद्दलची माहीती देण्यात खूपच मदत झाली. मी या तिघांचा अत्यंत आभारी आहे. हे आभार जर मी मानले नाहीत तर या तिघांवर तो अन्यायच ठरेल. नाही का?



वि.सू. : या लेखात व्यक्त झालेली आणि मांडलेली मते ही सर्वस्वी माझी वैयक्तिक मते आहेत. सर्वजण त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही याची कृपया नोंद घ्यावी.



तयारी :

सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी जिम कॉर्बेटची "मॅन इटर्स ऑफ कुमाऊं", "टेंपल टायगर अँड अदर मॅन ईटर्स" आणि "मॅन इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग" अशी पुस्तके एका दमात वाचून काढली होती. तेंव्हापासून या कॉर्बेटसाहेबाचे कार्यक्षेत्र असलेल्या कुमाउंच्या जंगलात फिरण्याचे डोक्याने ठामपणे घेतलेले होते. सव्वीस वर्षांपूर्वी चारधाम यात्रा केली. तेंव्हा त्याची एक छोटीशी झलक पहायला मिळाली. बद्रीनाथ आणि केदारनाथच्या वाटेवर रुद्रप्रयाग हे गांव आहे. इथे अलकनंदा आणि भागिरथी या नद्यांचा संगम आहे. इथे दोन रस्ते फुटतात. एक केदारनाथला जातो तर दुसरा जोशीमठ मार्गे बद्रीनाथला जातो. इथे रुद्रप्रयाग गावाबाहेर हमरस्त्याच्या कडेला एक अनोखे स्मारक आहे. याच ठिकाणी कॉर्बेटसाहेबाने त्या आतंकी चित्त्याची शिकार केली होती. आसपासच्या परिसरात त्या चित्त्याने इतकी दहशत माजवली होती लोक अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होते. सुमारे दोन वर्षे त्या चित्त्याने हुलकावणी दिली होती आणि त्या काळात त्याने जवळ जवळ साडे चारशेहून अधिक माणसे मारली. शेवटी जिथे कॉर्बेटसाहेबाने या चित्त्याची शिकार केली तिथे एक चक्क स्मारक उभारले आहे. एक दगडी कोनशीला बसवली आहे. त्यावर "The dreadful man eating leapord of Rudraprayag rests here at the hands of Jim Corbette" असे काहीसे कोरलेले आहे आणि शिवाय तिथे तसा भला मोठा फलक पण लावला आहे. हे सगळे पाहील्यावर मग माझ्या मनात या कॉर्बेटसाहेबाने स्वतः विकसीत केलेले आणि सरकारने नंतर "प्रोजेक्ट टायगर" या नांवाने जे व्याघ्र अभयारण्य जाहीर केले ते पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. नंतर कधी तरी विषय निघालाच तर लोक आणि मित्र मंडळी संमिश्र प्रतिक्रिया देत असत. " तिथे बघण्यासारखे काहीच नाहिये. काही प्राणी दिसत नाहीत. वाघ तर मुळीच दिसत नाही. नुसतंच जंगल आहे. छे वेळ वाया घालवण्या सारखं आहे." किंवा "जंगल छान आहे. पण वाघ दिसतच नाही." वगैरे वगैरे. आता वाघ दिसणं हा पूर्णतया नशीबाचा भाग आहे हे मला माहीत आहे. अगदी लॉटरीचे लाखांचे बक्षिस लागण्यासारखे. मी त्यावर कान्हाच्या वर्णनात विस्तारने लिहीलेही आहे. पण तरीही या सर्व प्रतिक्रिया मला माझ्या, आपल्याला कॉर्बेटला जायचंय या विचारापासून कधीच परावृत करू शकल्या नाहीत. या प्रतिक्रिया बहुतांशी निसर्गप्रेमींच्या नव्हत्या. कसे असते की शेजारणीकडे डबल डोअर फ्रीझ आहे आणि आपल्याकडे नाही, म्हणून मग सोसासोसाने गरज नसताना डबल डोअर फ्रीझ घेणार्‍या गृहिणीप्रमाणे, या प्रतिक्रिया दुसरा कोणीतरी म्हणतो की कॉर्बेट जंगल छान आहे म्हणून मुद्दाम जाऊन ते पाहून आलेल्या मंडळींच्या होत्या. जानेवारीतल्या एका सकाळी मेहुण्यांचा फोन आला. "एप्रील मधे कॉर्बेटला येणार का? इन सर्च बरोबर जायचय." डोक्यात कुठेतरी तो फलक आठवला आणि जायचा निर्णय घेतला. असेही मला माझे डोके शांत ठेवण्याच्या दृष्टीने जायचे होतेच. शिवाय त्याच वेळी "इन सर्च"बरोबर कान्हाची सहलही ठरलेली होतीच म्हणा. एखाद्या व्यसनी माणसाप्रमाणे हा मोह आवरला नाही आणि "कॉर्बेट" सहलीचे आम्ही बुकिंग केले. प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून मी हल्ली ए.सी. स्लीपरने रेल्वे प्रवास करणे पसंत करतो. आणि त्यासाठी तीन महिने आधी बुकिंग करावे लागते. त्या प्रमाणे ते करून झाले. अर्थात हे सर्व "इन सर्च" ने केले. माझी ट्रीप हे बहुतेक माझ्या जिवलगांना सवयीचे झाले असावे. कारण "नीट जा बाबा." वगैरे फारसे झाले नाही. पण नंतर येणार्‍या दोन छोट्या घटना पाहिल्यावर कदाचित पुढच्या ट्रीपसाठी मला सबुरीचे सल्ले येतील. ती ट्रीप आहे - कैलास आणि मानसरोवर. कारण ही ट्रीप म्हणजे मी टाकलेले जरासे धाडसी पाऊलच आहे. आणि तसे सल्ले आले तर त्यात गैर काहीच नाहीये. एक तर मी अति धडपड्या, अति उत्साही आहे. आणि जिवलगांची आपुलकी, जिव्हाळा त्यांना स्वस्थ बसू देत नाही हेच खरे. तर अशा तर्‍हेने कॉर्बेट साहेबाचे जंगल पाहण्याची जबर उत्सुकता मनात ठेवून अखेरीस आम्ही पुणे स्टेशनवर हजर झालो......




डायरीची पाने ......



प्रस्थान :

२७ एप्रिल २०१० :

पुणे स्टेशनवरची मुख्य प्रवेशद्वाराजवळची नेहमीची जागा. ठीक दुपारी ३ वाजता तिथे पोहोचलो. हळू हळू ट्रीपचे सभासद येत होते. या ट्रीपचा प्रमुख पण यावेळीही शौरी सुलाखेच होता. आश्चर्यमिश्रीत आनंदाचा पहिला धक्का बसला तो असा की आमच्या वीसाच्या गटात १५/१६ जण तर सरासरी पंधरा वर्षाच्या आतले होते. आणि आम्ही चार म्हातारे!! मी, माझे मेहुणे आणि त्यांचे भाऊ आणि भावाची बायको. धक्का अशासाठी की आम्ही चौघे सोडून बाकीची इतर सर्व मुलेच असतील ही अपेक्षा नव्हती. आणि आनंदाचा धक्का अशासाठी की मी सहसा मुलांच्यात रमणारा आहे. माझ्या वयोगटात मी फार थोडा रमतो. जिथे अनिवार्य असेल तेंव्हाच मी मोठ्यांच्यात रमतो. अन्यथा मला मुलांच्यात वावरायला जास्त आवडते. मला भा. रा. भागवतांचा "फास्टर फेणे" खूप आवडतो. म्हणून माझे काही नातेवाईक म्हणतातही कि "हा वयाने फक्त वाढला. मनाने लहानच आहे." मी हे फारसे मनावर घेत नाही. मला जे बरे वाटते ते मी करतो. त्यामुळे गंभीर चर्चा किंवा सर्व मोठ्यांचा ग्रूप असेल आणि ग्रूपमधले मला ओळखत असतील तर ते मला सहसा त्यांच्यात घेत नाहीत. असो. यावेळी ग्रूप मोठा होता आणि सर्व मुलेच होती. म्हणून शौरीला मदतीला केतकी गोखले ही कॉलेज युवती होती. तिला मी सहलपूर्व मीटींगला भेटलो होतोच. त्यामुळे ती येणार आहे हे मला ठाउक होते. तिच या सगळ्यांच्यात मोठी होती. मला शौरीने नंतर सांगीतले की "ही खुल्या वयोगटाची ट्रीप होती. तुम्ही चारही जण ट्रेकर आणि फिरलेले आहात. म्हणून तुम्हाला आम्ही प्रवेश दिला. आणि सांगितलेपण नाही की ही खुल्या गटाची ट्रीप आहे म्हणून. इतर ज्येष्ठ नागरीकांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही या ट्रीपला येऊ नका. ही खुल्या वयोगटाची मुलांची ट्रीप असल्याने बर्‍यापैकी धावपळीची आणि धकाधकीची असते." या खुल्या गटाचा आणि माझ्या अतीउत्साहाचा फटका मला पुणे स्टेशनवर बसला. सगळे जमल्यावर आम्ही प्लॅटफॉर्मवर निघालो. ज्येष्ठ नागरीक म्हणून गेल्या तीन ट्रीपचा अनुभव असा की सामान हमाल नेणार. आणि तेच डोक्यात असल्याने मी माझी सुटकेस घेतलीच नाही. तिथेच सोडून दिली आणि तसाच निघालो. नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या पुढे! बरे उरलेल्या तीन ज्येष्ठांपैकीही कोणीही मला म्हणाले नाही की की अरे तुझी बॅग कुठाय? ट्रीपभर ते त्यांच्या कोषात असणार आहेत ही त्याची झलक होती का? की मला ती अप्रत्यक्ष वॉर्नींग होती? की मित्रा आपणच आपली सोय बघून घ्यायची असते. कोणी कोणाचा नसतो. आणि तसेही हमाल केला असता तरी आपले सामान आपण उचलायचे या स्वावलंबी(?)आणि जरा अधिकच व्यावहारिक(??) विचाराचे ते दोघे भाऊ होते. म्हणजे सामान आपल्याला उचलता येईल इतकेच घ्यायचे इतके व्यावहारीक!!! गैर आहे का? माहीत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर त्यांनी त्यांचे स्वतःचे सामान उचलले आणि गृहीत धरले की मी पण तेच केले असेल. आणि मी तेच केले आहे का हे पहायचे कष्टही त्यांनी घेतले नाहीत. का घ्यावेत? परत कोणी म्हणेल की अरे सामान तुझे आहे. आपले सामान कुठे आहे हे तू बघायचे आहेस. त्यांनी का म्हणून बघावे? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पण मग त्या ग्रूपमधल्या ट्रीपला काहीच अर्थ उरत नाही. नाही का? मी त्यांना दोष नाही देत. त्यांचे त्यांच्या दृष्टीने बरोबर असेलही. पण मग हे, "एकमेका करू सहाय्य । अवघे धरू सुपंथ ॥" या, सर्वांनी बरोबर एकत्र जाण्याच्या संकल्पनेत बसणारे नाहिये ना? सख्खे नातेवाईकच आपल्या उपयोगी पडत नाहीत आणि इतर म्हणजे मित्र मैत्रिणीच जास्त उपयोगी पडतात हे माझे लाडके मत या मुळे सिद्धच होते ना? आणि "एकमेका करू सहाय्य......" या संकल्पनेत परफेक्ट बसणारी वागणूक एका मुलाच्या माउलीने दाखवली. आणि ती ट्रीपलाही येणार नव्हती, ही आवर्जून नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. जे तिला सुचले ते आमच्या ज्येष्ठ नागरिक बंधूंना का नाही सुचले? कदाचीत त्यांच्या लक्षातही आले नसावे की माझ्या हातात बॅग नाहीये. नाहीतर त्यांनी सांगितलेही असते. पण माझ्या मनाच्या खोल सूक्ष्म कोपर्‍यात कुठेतरी आलेली कटुतेची भावना म्हणजे माझ्याच नेहमी नकारात्मक विचार करण्याच्या वृत्तीचा परिपाक आहे असे मला वाटतय. थोडेसे पुढे गेल्यावर माझ्याच लक्षात आले की सर्वांजवळ आपापले सामान आहे, आणि मीच फक्त मोकळा होतो. घोटाळा माझ्या लक्षात आला. सगळे पुढे आलेले. आता आपली बॅग गेली या विचाराने अंगावर कांटा आला आणि सॉलीड घाम फुटला. अहो, त्या बॅगमधे सर्व तिकीटे होती हो!!! बावळटपणाची लाज वाटली. पण सांगतो कोणाला? ताबडतोब बॅग राहीली बॅग राहिली असे सांगत मागे फिरलो. तितक्यात बरोबर असलेल्या मुलांपैकी एकाच्या माउलीच्या हातात ती बॅग दिसली. बिचारी स्वतःची बॅग असल्यासारखी ती ओढत आणत होती. मला खूप लाज वाटली. मी तिला थँक्स म्हटले. ती म्हणाली, "सर्व निघाल्यावर ही एकच बॅग राहीली होती. बॅगला लावलेल्या लेबलवर पेंडसे नाव होते ना!!! ते तुम्ही आहात हे माहीत नव्हते. पण पेंडसे या नांवावरून ती बॅग आपल्यापैकीच कोणाची तरी असणार असे वाटत होते. म्हणून मी घेऊन आले. मग नंतर बॅगेचा मालक शोधता येईल." पुरूषांपेक्षा बायकांनाच Presence of mind, Commonsense अधिक असतो हेच खरे. ती माऊली नसती तर? किंवा ती पुढे निघून आली आणि मागे राहिलेले आमच्या ज्येष्ठ नागरिकांसारखा विचार करणारे असते तर? विचार खूपच अस्वस्थ करणारा होता. कसंनुसं, केवीलवाणे, खजील हसण्या पलिकडे माझ्या हातात काही नव्हते. उत्साहाच्या भराचा हा फटका होता मला. प्लॅटफॉर्मवर आलो. गाडी आलेली होतीच. डबा शोधला. आणि आमच्या जाग्यावर एकदाचे स्थानापन्न झालो. फक्त आम्ही चौघे ए.सी. मधे होतो. बाकीची सर्व जनता थ्री टायर स्लीपरमधे होती. मग बाकी संध्याकाळ जशी जाईल असे वाटत होते तशी गेली. म्हणजे ते तिघे त्यांच्या कोषात. मला अगदी एकटे वाटू नये म्हणून ते मला मधून मधून संभाषणात घेत होते. यथावकाश जेवण, विषय शोधून गप्पा झाल्या. विषय संपल्यावर गप्प आणि डुलकी हेही नेहमीचे प्रयोग झाले. मग मी आणि मेहुण्यांचे बंधू आम्ही मुलांच्या डब्यात जाऊन आलो. तिथे गप्पा झाल्या. छान वाटले. आणि अखेरीस रात्री १० वाजता निद्रादेवीची आराधना करण्यासाठी आमच्या डब्यात परत आलो. झोपेत मागल्या खेपेप्रमाणे अपयश आले. मग नातीला म्हणजे अद्विकाला फोन लावून झाला. तरीही झोप येईना. आणि नेहमी प्रमाणे मध्यरात्रीनंतर सुमाचा फोन झाला. (सुमेधा ऊर्फ सुमा ही माझी मानलेली बहिण. हिच्याबद्दल कान्हाच्या ट्रीपच्या वर्णनात सांगून झालय. तेंव्हा पुन्हा सांगत बसत नाही. जर ही सुमा कोण अशी कोणाची उत्सुकता चाळवली गेली असेल तर माझे कान्हा सहलीचे वर्णन अवश्य वाचावे.) दुसर्‍या दिवशी सकाळी मेहुण्यांच्या बंधूंकडून विचारणा झाली की "इतक्या रात्री कोणाचा फोन होता रे?" माझी मानलेली बहीण आहे असे सांगून, जरी ते खरे असले तरी चालले नसते, पटले नसते. हा तुमच्या मनावरच्या संस्कारांचा प्रभाव असतो. आता या वयात, माझी मानलेली बहीण? ही संकल्पना लोकांना रुजायला, झेपायला जरा कठीणच असते ना!! आणि जरी समजा सांगितले असते की मानलेली बहिण आहे म्हणून, तरी बहीण असली म्हणून काय झाले? फोन रात्री एक वाजता? छे छे!!! शिव! शिव!! शिव!!! कान्हाच्या ट्रीपमधे कसे मी अनोळखी असल्याने मला माझे रूम पार्टनर श्री. कुलकर्णी यांनी फार विचारले नाही. पण इथे तसे होणार नव्हते. माझ्या मेहूण्यांना माझ्या सर्व बहिणी माहीत होत्या हो!!! मग माझ्या बालमनाला उगाचच त्यांची खेचण्याची लहर आली. उसळता अंगावर आलेला चेंडू हा स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर भिरकावून द्यायचा असतो. नाहीतर मग तो अंग शेकून काढतो. मी सांगून टाकले की "माझ्या एका अतिशय लाडक्या मैत्रिणीचा फोन होता. खूप खूप जीव आहे तिचा माझ्यावर. बर्‍याच दिवसात गप्पा नाही ना झाल्या म्हणून ती फारच अस्वस्थ होती, माझ्याशी बोलायला धडपडत होती. बरं तिला हीच वेळ आवडते कारण मधे मधे कोणी त्रास द्यायला नसते ना!! आणि By the way तिचे नावही रानडे आहे." ते लोकही रानडेच असल्याने त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव बघणं हा मला निखळ आनंद होता. माझे मेहुणे, त्यांना काय म्हणावे हे सुचेना. माझ्याकडे हसू की नको असा चेहेरा ते करून बघत होते. असो मजा आली. आम्ही चौघे ज्येष्ठ नागरीक ए.सी. मधे होतो. बाकीची उत्साहाची कारंजी स्लीपरमधे होती. मी दबलेले कारंजे होतो का? कारण माझ्या लहान मुलासारख्या उत्साहाचा मला अजून एक छोटासा फटका दुसर्‍या दिवशी बसायचा होता, याची सुमाच्या फोननंतर झोप लागताना मुळीच कल्पना नव्हती. तसे फार काही गंभीर मुळीच झाले नाही. पण ही जणू मला उत्साह काबूत ठेवण्याची धोक्याची सूचनाच होती.

रेल्वे प्रवास/दिल्ली स्टेशन :

२८ एप्रील२०१० :

सकाळचे ७.३०-८ वाजले होते. भोपाळ स्टेशनवर गाडी थांबलेली होती. गाडीला पँट्री कार नव्हती. नाश्ता आणायला प्लॅटफॉर्मवर उतरलो. वडा चटणी आणि पॅटीस घेतले, चहा घेतला. सर्व डब्यात आणून दिले. पाण्याचा स्टॉक संपला होता. म्हणून दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या. आणि त्याही आणून दिल्या. त्या कमी वाटल्या, म्हणून मग अजून दोन आणण्यासाठी उतरलो. बाटल्या घेतल्या. पैसे देत असताना एक नाणे खाली पडले ते उचलायला खाली वाकलो आणि गाडी सुटली. बरे ती सुटलेली कळलीच नाही. नाणे उचलले आणि गाडी हललेली दिसली. तसाच दोन काखेत दोन बाटल्या एका हातात पाकीट आणि एका हातात सुटी नाणी असे संभाळत पळत आलो आणि समोर आला त्या डब्यात शिरलो. तो पाणीवाला मागून ओरडत होता साब एक रुपिया दे दो. मी त्याला ओरडूनच सांगितले की मारो गोली रुपयेको. आणि बाटल्या आणि तोल संभाळत डब्याच्या दारातून उडी मारली. सुदैवाने गाडीने वेग घेतला नव्हता. म्हणून तोल संभाळला गेला. तिथे आत उभा असलेला एक माणूस बोंबललाच. "अरे ऐसे कैसे चढते हो यार!! एक बॉटल मुझे दे देनी थी, तो आपको तकलिफ न होती ना!!" २४ तासाच्या आत पुन्हा मला कसेनुसे होत ओशळवाणे होण्याची वेळ आली होती. मेहुणे म्हणाले, "मी घाबरलो होतो. गाडी सुटली आणि तू खाली वाकून काय करत होतास?" परत ओशाळवाणे हॅ हॅ केले आणि म्हणालो की पाकीट पडले होते ते उचलत होतो. मग रटाळ सकाळ, दुपार, गाडीतले फालतू जेवण नंतर डुलक्या घेत घेत गप्पांचा केविलवाणा प्रयत्न करता करता संध्याकाळी ५.३० ला ह. निझामुद्दीन ला येउन पोहोचलो. पुढची गाडी रात्री पावणे अकराची होती. आणि ती सुद्धा जुन्या दिल्लीहून होती. ते अंतरही तसे बरेच आहे. मग निझामुद्दीन स्टेशनवरच्या "कॉमसम" या फूड प्लाझा मधे सामान ठेऊन थोडेसे ताजे तवाने व्हायचे, जमेल तशी पोटपूजा करायची आणि जुन्या दिल्ली स्टेशनवर नेण्यासाठी येणार्‍या बसची वाट बघत वेळ काढायचा असे ठरले. त्याप्रमाणे फूड प्लाझा मधे आलो. सामान ठेवले. उडुपी पदार्थ मिळाले. ते खाल्ले. माग इकडे तिकडे टाईम पास केला. ८ वाजता आम्हाला जुन्या दिल्ली स्टेशनवर जाण्यासाठी न्यायला बस आली. काही मुले दिल्लीला बहुतेक पहील्यांदाच येत होती असे त्यांच्या संसद भवन, इंडीया गेट, विजय पथ वगैर पाहील्यानंतरच्या उद्गारावरून वाटत होते. स्टेशनवर आलो. गाडी शोधणे, डबा शोधणे जागा शोधणे वगैरे सोपस्कार व्यवस्थित पार पडले. १०.४५ ची गाडी असल्याने लगेचच निजण्याची तयारी केली. आणि नेहमीप्रमाणे सुमाच्या फोनने दिवसाची सांगता झाली. बहुतेक मेहुणे बंधू ऐकत होते. त्यांच्या कॉमेंट्स ऐकायला उद्या मजा येणार होती. याच खोडकर विचारात कधी झोप लागली ते कळलेच नाही.



रामनगर



२९ एप्रील २०१० :

गाडी स्टेशनवर थांबल्याने जाग आली. पहाटेचे ४.४० झाले होते. म्हणजे अजून रामनगर यायला जवळ जवळ अर्धा तास होता. परत झोपावे का असा विचार करत असतानाच बाहेर कोणीतरी "रामनगर" असे म्हणाल्यासारखे वाटले. खाली प्लॅटफॉर्मवर उतरलो. प्लॅटफॉर्मवर सामसूम होती. सारी गाडी चिडीचूप होती. तिथे असलेल्या एकमेव माणसाला विचारले "ये कौनसा स्टेशन है" तो म्हणाला "रामनगर". लगेच भराभर डब्यात आलो. डबा हळूहळू आळोखे पिळोखे देत जागा होत होता. रानड्यांना उठवले, सामान घेऊन खाली आलो. उत्साहाची सर्व कारंजी झोपेत असल्याने अजून कोरडीच होती. सर्व आळस देत देत उठले. "काय कटकट आहे राव. धड झोपू पण देत नाहीत." असे भाव बर्‍याच चेहेर्‍यांवर होते. शेवटी सर्व जण स्टेशनबाहेर आपापल्या सामानासकट आलो. तीन जीप तयार होत्याच. आणि आम्ही आमच्या नियोजीत "Wild Adventure" या रिसॉर्टवर येऊन पोहोचलो. आणि इथे मोबाईलची रेंज गेली. जंगलात फिरायला आलात ना? मग त्याचा आनंद लुटा. हे मोबाईल वगैरे विसरा असा जणू इशाराचा होता ना? इन सर्चचे हे नेहमीचे ठिकाण होते. झाडीने वेढलेले दोन दोनाचे कुटीरवजा ब्लॉक्स होते. एक १५ जणांची डोर्मिटरी पण होती. आज इथेच मुक्काम होता. आणि इथलीच आजूबाजूची भ्रमंती करायची होती. इथल्याच झाडावर गिधाडांची मोठी घरटी दिसली. सर्व जण ताजेतवाने झाले. चहा बिस्कीटे झाली आणि आम्ही सकाळच्या पहील्या भ्रमंतीवर निघालो. जवळच कोसी नदी होती. तिथे नदीवर डुंबायला जायचे ठरले. जाताना वाटेत लाल रंगाचा सनबर्ड, पाणकावळा(Cormorants), शेकाट्या(Stilt) वगैरे पक्षी दिसले. रिसॉर्टच्या मागच्या बाजूने मोठमोठ्या दगड गोट्यातून वाट काढत काढत नदीच्या पात्रात आलो. पाणी जेमतेम गुडघ्यापर्यंत होते. सगळे मनसोक्त पाण्यात खेळले. फक्त मी, मेहुणे आणि त्यांच्या वहिनी सोडून सर्वांनी मनसोक्त पाण्यात डुंबून घेतले. परत येताना एका ठिकाणी वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. पुन्हा दगड गोट्यातून चढत वर आलो. नाश्ता झाला. पुण्याहून निघाल्यापासून अंघोळ झाली नव्हती. लहानपणापासून संस्कार असे की चोवीस तासातून एकदातरी योग्य त्यावेळी अंघोळ झाली पाहीजे. त्यामुळे जरी ए. सी. ने प्रवास झाला असला तरीही दोन दिवसात आपली अंघोळ झाली नाहीये या विचारानेच घाण आणि मळकट वाटायला लागले होते. मग अंघोळ झाली. थोडीशी विश्रांती झाली. जेवण झाले. जेवण छान होते. अर्थात अश्या ट्रीप्सवरच्या जेवणाची घरच्या जेवणाशी कधीच तुलना करायची नसते. तरच ते जेवण छान लागते. जेवणानंतर विश्रांती झाली आणि मग आम्ही दुपारी ३ वाजता तिथून जवळच असलेल्या "सीता बनी" या मंदिरात जायला निघालो.

सर्व जण तीन जीप्स करून आम्ही त्या मंदीराच्या परीसरात आलो. रामनगरपासून सुमारे २० कि.मी. अंतरावर हे सीतेचे मंदीर आहे. सीतेला धरणीने पोटात घेतले ते या इथे, अशी अख्यायिका आहे. इथे दर रामनवमीला मोठा उत्सव असतो. मंदीराच्या परीसरात घनदाट जंगल आहे. तिन्हीबाजूने वर गेलेले हिरवेगार डोंगर आणि खळग्यात असलेले हे मंदीर. नेत्र आणि मन सुखावणारे हे दृश्य आहे. या परीसरात आम्ही तासभर थांबलो. इथे आम्हाला Yellow Throated Laughing Thrush हा पक्षी दिसला. याला हिमालयन कस्तुर असेपण म्हणतात. याचे पोट पिवळे आणि बाकी इतर भाग काळसर किंवा गडद चॉकलेटी रंगाचा असतो. सूर्य अस्ताला जाण्याच्या सुमाराला तिथून निघालो. आणि परत Wild Adventure इथे परत आलो. मग नेहमीप्रमाणे थोडीशी विश्रांती झाली. आणि ८.३० वाजता जेवायच्या हॉलमधे जमलो. जेवणाआधी एकामेकांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम सहसा साधारणपणे कंटाळवाणा होतो. म्हणून मग त्यात विविधता, आणि मनोरंजनाबरोबरच थोडेसे ज्ञान आणायचे म्हणून एक वेगळा खेळ खेळलो. त्यात चिठ्ठ्या उचलल्या गेल्या. आपल्या चिठ्ठीतल्या जुळणार्‍या विषयाची चिठ्ठी ज्याच्या कडे असेल तो जोडीदार तुमचा. मग तुम्ही तुमच्या जोडीदाराची माहिती घ्यायची तुमची माहीती त्याला द्यायची आणि वेळ आली की तुमच्या जोडीदाराची माहिती तुम्ही सांगायची आणि तुमची माहिती तुमच्या जोडीदाराने सांगायची. आणि तुमच्या विषयाबद्दल तुम्हाला काय माहिती असेल ती सांगायची. ज्ञानात भर पडली. वेळही छान गेला. तोपर्यंत जेवण लागलेले होते. जेवण झाले. बाकी जनता बाहेर अंगणात झोपली. आम्ही मात्र आमच्या खोल्यातून झोपलो. आज सुमाच्या फोनशिवाय झोप आली. कारण रेंज नसल्याने काही पर्यायच नव्हता ना!! त्यामुळे मेहूणे बंधूंनी "आज काय रेंज नसल्याने फोनची पंचाईत असेल ना? तुला हवा असेल तर आज रात्री माझा फोन देतो. कारण माझा एअरटेल असल्याने त्याला रेंज आहे." असे म्हणून त्यांनी एक शेन वॉर्न गुगली टाकला. आणि मी पण "इथे रेंज येणार नाहीये हे मी तिला सांगितलय. त्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही." असे म्हणून त्यांचा गुगली, सचिन पाय पुढे टाकून सरळ बॅटने थोपवेल तसा थोपवला. सकाळी ६ वाजता कॉर्बेटच्या जंगलात प्रवेश करायचा होता. त्यासाठी धनगढी गेटजवळ ६ वाजता जायचे होते. म्हणून लवकर उठायच्या उद्देशाने झोपी गेलो. खरच तुमची एखाद्या गोष्टीची तयारी असेल तर त्रास होत नाही. त्यामुळे सुमाचा फोन झाला नाही तरीही झोप लागली. पण झोपताना कल्पना नव्हती की कॉर्बेटमधे काय दिसणार आहे, उद्याचा दिवस कसा उजाडणार आहे? वाघ दिसण्याची स्वप्न बघत कधी झोप लागली ते कळलेच नाही...

कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात प्रवेश :

३० एप्रील २०१० :

सकाळी ५.३० ला जाग आली. चहा आला. आम्ही तयार होऊन बाहेर आलो. सर्व मुले अजून डाराडूर झोपली होती. हळू हळू कँपला जागयायला लागली. या पोरांचे एक बरे होते. उठल्यावर भराभर तयार होत होती. आज सामान बरोबर न्यायचे नव्हते. दोन दिवसांसाठी लागेल तितकेच सामान पाठीवरच्या सॅकमधे घ्यायच होते. आज आणि उद्या मुक्काम कॉर्बेटच्या जंगलाच्या अगदी खोलवर आणि मध्यभागी असलेल्या ढिकाला इथल्या वनविभागाच्या विश्राम गृहात होता. आम्ही म्हातारे तयार होतोच. आम्हाला घेऊन जाणार्‍या जीप्स तयारच होत्या. त्यात आम्ही सगळे बसलो. आणि कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या धनगढी गेट या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो. जंगले, प्राणी यांच्या अनोख्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी, निसर्गाचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी. पण? पण काय? .....

.... धनगढी गेटचे दरवाजे बंद होते. भले मोठे कुलुप. आणि दरवाज्यासमोर वनविभागाचे कर्मचारी गेट अडवून ठाण मांडून बसले होते. आज त्यांचा संप होता. आणि आज ते कुणाला आत जाऊ देणार नव्हते. ते लोक एक इंचही मागे हटायला तयर नव्हते. त्यांचे म्हणणे होते की त्यांनी सरकारला पुरेसा वेळ दिलेला होता. आणि आजची तारीख पंण दिली होती. हताशपणे बघत बसण्याशिवाय आमच्या हातात नव्हते. त्यांचे घोषणा देणे चालूच होते. आम्हाला पाहून त्यांच्या आवाजाची पट्टी वाढली. मी एकदम मनाने माझ्या नोकरीच्या काळात गेलो. मला हे नविन नव्हते. मला या मंडळींचा आडमुठेपणा माहित होता. त्यामुळे हे लवकर आटपणार नाही हा माझा अंदाज होता. हळू हळू सूर्य वर यायला लागला होता. इकडे तिकडे पाय मोकळे करण्याच्या निमित्ताने फिरून कंटाळा आला. चहाची एक राऊंड झाली. त्याबरोबर बटाटा पराठा खाऊन झाला. हे काही लवकर संपण्याची चिन्हे दिसेनात. आम्हाला पाहून त्यांना अधिकच चेव आला. "हमे आपको तकलीफ देनेकी बिलकूल इच्छा नही है. लेकीन हमभी मजबूर है. हमने गव्हर्मेंटको सही और बहुत समय दिया है." वगैरे वगैरे नक्राश्रू गाळून झाले. हे त्यांचे सगळे डायलॉग मला पाठ आहेत. शौरीने प्रयत्न करून पाहीला. मग रिसॉर्टवरून नाश्ता मागवायचा ठरला. त्याप्रमाणे नाश्ता आला. चहा झाला, ११.३० वाजले होते. कोंडी काही फुटत नव्हती. बाजूच्या एका दरवाज्यातून गाडी घुसवण्याचा प्रयत्न झाला. पण आमची एक गाडी गेल्याबरोबर इतरही गाड्या शिरल्या. आणि संपवाल्यांच्या ते लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सर्व गाड्या रोखल्या. आणि बाहेर हाकलल्या. आमच्या गाडीत मुले असल्याने त्यांनी फारशी तीव्र भूमिका घेतली नाही. मग पुढे एक दीड किलोमीटरवरून आत जंगलात शिरायाला मिळेल अशी भन्नाट आयडिया कोणाच्यातरी मेंदूतून निघाली. आमच्या तीन जीप्सपैकी दोन चालक याला तयार नव्हते. पण तिसर्‍याने त्यांना कसेबसे पटवले. एखादा गुप्त प्लॅन असल्यासारखे आम्ही निघालो आणि एक कि.मी. वर नदीचे कोरडे पात्र ओलांडल्यावर जंगलात गाड्या घातल्या. अर्धा एक कि.मी. गेल्यावर कच्चा रस्ता झाडीत लुप्त झाला. पुढे वाट नव्हती. मुकाट्याने परत फिरलो. सर्व जण वैतागले होते. परतताना त्या कोरड्या नदीपात्रात पुढे पाणी दिसत होते. असेही कोंडी लवकर फुटण्याची चिन्हे नव्हती. मग त्या नदीत डुंबायला जायचे ठरले. मला जाम कंटाळा आला होता. मी नाही गेलो. मी, रानडे वहिनी आणि दोन जीप्स असे आम्ही परत गेटजवळ येऊन थांबलो. थोड्या वेळाने व्यवस्थीत थंड होऊन इतरही सगळे परतले. दीड वाजला होता. काय करायचे याचा काहीच डोक्यात विचार नव्हता. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संप मिटेल असे वाटत होते. आणि अचानक वातावरण बदलल्याची चिन्हे दिसू लागली. संप मिटण्याची चिन्हे दिसत होती. आणि आज आत जाणार की नाही अश्या तरंगत्या दोलायमान अवस्थेतून सुट्का झाली. एकच कल्ला झाला की २ वाजता गेट उघडणार आहेत. एकदम सर्वकडे उत्साह सळसळला. सर्व जीप्स भराभर रांगेला लागल्या. बरोबर २ वाजता " मुर्दाबाद-झिंदाबाद" च्या गजरात अखेरीस गेट उघडले आणि आम्ही उत्सुकतेने एकदाचा कॉर्बेटच्या विश्वात प्रवेश केला.

जिम कॉर्बेट या प्रसिद्ध शिकार्‍याच्या नावाने उभारलेले १३१८ वर्ग कि.मी.च्या क्षेत्रावर वसलेले हे राष्ट्रीय उद्यान भारतातले सगळ्यात पहिले राष्ट्रीय संरक्षित क्षेत्र आहे. या १३१८ क्षेत्रफळापैकी ८०० कि.मी. चे बफर क्षेत्र असून ५२० कि.मी. चे कोअर क्षेत्र किंवा खोल घनदाट जंगलाचा भाग आहे. हे उद्यान उभारण्यात स्वतः जिम कॉर्बेटचा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्याच्या उत्तराखंडमधे नैनीताल जिल्ह्यात १९३६ साली हे उद्यान 'हेले राष्ट्रीय उद्यान' या नावाने उभारले गेले. इथे सापडणार्‍या वन्य जीवात प्रामुख्याने पट्टेरी वाघ(Royal Bengal Tiger), बिबट्या, रानडुक्कर, चितळ हरीण, सांबर, बार्कींग डिअर, वगैरे प्राणी आढळतात. या संरक्षित उद्यानाचा प्रमुख हेतू हळू हळू नामशेष होण्याच्या मार्गावर चाललेल्या पट्टेरी वाघांचे संरक्षण करणे हा आहे. भारतात वन्यजीव रक्षणाची मोहीम आणि भारतातला महत्त्वाकंक्षी प्रकल्प "प्रोजेक्ट टायगर" ची सुरूवात इथून झाली. हे संरक्षित क्षेत्र रामगंगा नदीच्या खोर्‍याने वेढलेले असून इथे आपल्याला या खोर्‍यातला निसर्गसौंदर्याचा नयनरम्य आविष्कार अनुभवायला मिळतो. या जंगलात वनस्पतींच्या जवळ जवळ ४५० हून अधिक जाती आहेत. इथे साल वृक्षाची दाट जंगले भरपूर प्रमाणात आढळतात. या जंगलातून रामगंगा नदी वाहते. या नदीच्या आसपासचे घनदाट जंगल यामुळे इथे वाघ जरी असले तरी ते पटकन दिसू शकत नाहीत. शिवाय वाघांना इथे भरपूर शिकारही करता येते. वाघ सहसा आपल्यपेक्षा आकाराने मोठ्या प्राण्याची शिकार करत नाही. रान बैल किंवा गवा इथपर्यंत त्याची मजल असते. पण कधीकधी भक्ष्याची टंचाई आली तर वाघ हत्तीची शिकारही करण्यास मागे पुढे पहात नाही. पण हे सामान्यपणे कधीच घडत नाही. या अभयारण्यात कोणत्याही प्रकारच्या शिकारीला परवानगी नाही. पण लाकूड आणि सरपणासाठी वृक्षतोडीला मात्र परवानगी आहे. साधारण दुसर्‍या महायुद्धाच्या काळात इथे बेकायदा शिकारीचा सुळसुळाट झाला होता. शिवाय बेसुमार वृक्षतोड पण होत होती. इथे हत्तीपण खूप प्रमाणावर दिसतात. हत्ती अगदी ५०-५० च्या कळपात दिसतात. त्यात पिल्ले, माद्या, अणि मोठाले नर हत्ती असतात. हे नर हत्ती त्या कळपाचे संरक्षणही करतात. विशेषतः जिथे मादी आणि पिल्लांना धोका आहे असे वाटते तिथे हे नर हत्ती आक्रमक होऊ शकतात. आणि हत्तीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्याच्या लक्षात राहते. त्याला स्मृतीचे वरदान आहे. त्यामुळे एखाद्याने त्याची खोडी काढली तर ती व्यक्ती किंवा तो प्राणी हत्ती लक्षात ठेवतो. घनदाट जंगल, अफाट निसर्ग सौंदर्य यामुळे हे पर्यटकांचे नंदनवन समजले जाते.

ढिकाला हे आमचे मुक्कामाचे ठिकाण धनगढी गेटपासून सुमारे ३६ कि. मी. आत घनदाट जंगलात होते. तिथले वनविभागाचे विश्रामगृह हे टाकली धुन खोर्‍याच्या सीमेवर असून रामगंगा नदीच्या काठावर आहे. हे विश्राम गृह सुमारे १०० वर्षापूर्वीचे असून अतिशय घनदाट जंगलाने वेढलेले आहे. विश्रामगृहाच्या मागील बाजूला कांडाची पर्वतराजी असून इथून निसर्गाची लयलूट दाखवणारा विशाल देखावा पहायला मिळतो. या जंगलातला रस्ता आणि निसर्गाचा आस्वाद घेत जायचे असल्याने तिथे पोहोचायला संध्याकाळ होणार होतीच. Wild Adventure चा पियुष जोशी आमच्या जीपमधे होता. खूप हिंडलेला हा इसम. त्याला जंगलाची खडा न खडा माहीती होती. रामगंगा नदीच्या काठावरून हा रस्ता काही ठिकाणी जात होता. वाटेत दिसणारे पक्षी यांच्याबद्दल तो सांगत होता. एका छोट्याश्या ओढ्याच्या पुलावर जीप आली आणि या जंगलातल्या हत्तीने आम्हाला पहिले दर्शन दिले. आपल्याच मस्तीत तो तिथे डुलत चरत उभा होता. आम्ही तिथे थांबलो. एक पांच मिनीटांनंतर तो हत्ती हळू हळू वर रस्त्यावर येऊ लागला. मग आम्ही तेथून हललो. तसेच पुढे जात असताना सुलतानपुरा इथे क्रोकोडाईल पॉईंट आहे. इथून खाली नदीचे दृश्य दिसत होते. इथे नदीला पाणी बरेच होते. त्यात मगरी मस्तपैकी डुंबताना दिसत होत्या. तिथून पुढे जाताना पुन्हा पांच हत्तींच एक कळप दिसला. आम्ही जात होतो त्यारस्त्याने आमच्या कडेच येत होता. आमच्या चालकाने गाडी थांबवली. मागे घेतली. तिथे उजवीकडे एक रस्ता जात होता. ते हत्ती या रस्त्याने जातील असा अंदाज होता म्हणून मग चालकाने गाडी या रस्त्याच्या मागे आणून उभी केली. त्यात एक पिल्लू होते. आणि एक कुटुंबप्रमुख असा सुळेवाला हत्ती होता. ते सर्व आम्हाला वाटत होते तसे त्या उजवीकडच्या रस्याने निघून गेले. तिथून पुढे जात जवळजवळ दोन तासाची चाक्कर मारून अखेरीस ढिकालाच्या विश्रामगृहावर पोहोचलो. ताजेतवाने होणे, चहा, विश्रांती जेवण हे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले. आज वाघाने दर्शन दिले नव्हते. पण ठिपक्याचे हरीण, रानडुक्कर, सांबर, घोरपड (Indian Monitor Lizzard), गळ्यात पट्टा असलेले कबुतर (Euresian Ringed Pigeon), गप्पीदास (Pied Bush Chat), संपूर्ण पिवळा (Golden Oriole) आणि काळ्या डोक्याचा (Black Hooded Golden Oriole) असे दोन्ही प्रकारचे हळद्या असे पक्षी दिसले. उद्या ढिकालाचे विश्रामगृह सोडायचे होते. आणि तिथूनच १८ कि.मी. वर असलेल्या गैराल इथल्या वनखात्याच्या विश्राम गृहात मुक्काम होता. उद्या ढिकालाच्या विश्रामगृहाजवळच असलेल्या टेहेळणी मनोर्‍यावर बसायचे होते. त्यावेली तरी वाघ दिसणार का? या विचारात झोप कधी लागली ते कळलेच नाही.

कॉर्बेट भ्रमंती/गैराल विश्राम गृह

१ मे २०१० :

सकाळी चहावाल्याच्या हाकेने खोली बाहेर आलो. जाग आधीच आली होती. चहा झाला. सकाळी नाश्ता केला आणि जंगलात फिरायला निघालो. नदीच्या काठावर आलो. आज नदी पार करून पलिकडे जायचे होते. नदीचे पात्र मोठे होते. नदीवर चार लहान पूल लागले. शेवटचे काही मीटर गाडी पाण्यातून घातली आणि पलिकडच्या तीरावर आलो. आदल्या दिवशी संध्याकाळच्या भ्रमंतीत आमच्यापैकी काही जीप्सना हत्तींनी घेरले होते. जो अनुभव आम्हालाही नंतर येणार होता. तिथे परत नदीकाठच्या रस्त्याने जंगलाकडे निघालो. आणि एका ठिकाणी रस्त्याचा शेवट होत होता तिथे आलो. तिथे आमच्याशिवाय बर्‍याच गाड्या उभ्या होत्या. तिथे समोरच्या गवतात वाघ होता असे वाटत होते. समोर हत्तीवर माणसे पण होती. बराच वेळ थांबलो. पण वाटेत शेकाट्या (Stilt) पक्षी दिसला. पण आजही वाघाने दर्शन दिले नाही. आता मनोर्‍याकडे निघालो. कारण ११ वाजायच्या आत त्या टेहेळणी मनोर्‍यावर बसायचे होते. आणि ३.३० शिवाय खाली येता येणार नव्हते. जेवण तिथेच मनोर्‍यावर येणार होते. म्हणून जवळ जवळ जेवणासारखा नाश्ता केला. आणि आम्हाला जीपने मनोर्‍याजवळ आणून सोडले. हा मनोरा खूपच उंच होता. तीन मजले होते त्याला. मनोरा वर निमुळता होत गेलेला असून प्रत्येक मजल्यावर बसायची सोय होती. पहिल्या दोन मजल्यावर खोलीसारखे असून त्याला चारीबाजूने खिडक्या होत्या. आणि तिसर्‍या मजल्यावर चारी बाजूने मोकळे होते. आणि वर अस्बेटॉसचे छप्पर होते. बसायला बाकडी होती. आणि चारी बाजूने उभे रहायला पण जागा होती. वर जायला लोखंडी जिना होता. धरायला कठडे असले तरी त्याच्या पायर्‍या म्हणजे आडवे लोखंडी बार असल्याने जरा कसरत करतच चढावे लागले. म्हणजे वरती गेल्यावर परत खाली कसे यायचे हे टेन्शन. हाच विचार बराच वेळ डोके कुरतडत होता. मधेच पाणी प्यायच्या निमित्ताने खाली जायची प्रॅक्टीस करून घेतली तेंव्हा कुठे आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेता आला. थोडक्यात हे आधुनिक मचाण होते. मचाण आणि यात फरक असा की मचाण झाडावर बांधतात, ते पटकन दिसत नाही. आणि मचाणावर बसल्यावर हालचाल किंवा कोणताही आवाज करयचा नसतो. इथे तसे नव्हते. सर्व मुले असल्याने कल्ला जरी नसला तरी बडबड बरीच होती. सर्व हॉलीडे मूड होता. तिथे चार परदेशी नागरीक पण होते. ते तिथे कशा साठी आले होते हे त्यांचे त्यांनापण माहीत नव्हते असे दिसत होते. तेव्हढेच पांच एक तास कटकट नको म्हणून त्यांच्या गाईडने त्यांना इथे आणून सोडले असावे. कारण वर टॉवरवर आल्यावर त्यांनी खाल्ले आणि मस्तपैकी पत्ते खेळायला सुरूवात केली. आम्ही मात्र संयम राखून आजूबाजूचे मनोरम दृश्य बघत होतो. समोरच रामगंगेचे पात्र दिसत होते. डावी आणि उजविकडे लांबवर पसरलेले पात्र, त्यापलीकडले घनदाट जंगल, त्या काठावरचा हत्तींचा कळप आणि आमच्या बाजूचा काठावर असलेल्या जंगलातल्या झाडावर दिसणारे पक्षी. मागील बाजूस घनदाट जंगल होते. टॉवरच्या मागेच साधारण पांचशे फूटावर एक मोठे डबके होते. त्यात पाणी होते. पण डबके कोरडे होत चालले होते. तिथे वाघ येण्याची शक्यता असते. पण ऊन प्रचंड होते. तितक्या उन्हात वाघ येण्याची शक्यता कमी होती. समोर नदी पात्रात काही हरणे डुंबत होती पलीकडच्या तीरावरच्या हत्तींच्या कळपातले हत्तीपण पाण्यात मस्तपैकी दुंबत होते. यथावकाश २ वाजता विश्रामगृहावरून जेवण आले. मागच्या डबक्यावर एका सांबराच्या जोडीने दर्शन दिले. पाणी प्यायला आली होती ती जोडी. बास. आता वाघ दिसण्याची शक्यत नव्हतीच. साडेतीनच्या सुमाराला आमच्या जीप्स आल्या. खाली उतरलो.

आता पुन्हा जंगलात चक्कर मारतच गैरालच्या विश्रामगृहाकडे जायचे होते. हे विश्रामगृह इथून सुमारे २०/२२ कि.मी. होते. तिथून निघल्यावर आमचा चालक म्हणाला की "चलो ग्रास लँड देखेंगे". ढिकालाच्या विश्रामगृहाच्या मागेच ही गवताळ जमीन होती. विश्रामगृहाला वळसा घालून या रस्त्याला कागलो. चारी बाजूने दाट जंगलाने वेढलेली ही महाकाय गवताळ जमीन. साधारण फूट दीड फूट उंच वाढलेले हिरवे गार गवत आणि एखाद्या गोर्‍यापान तरूणीच्या काळ्याभोर केसातल्या भांगाप्रमाणे दिसणारा त्या दाट गवतातून जात असलेला कच्चा रस्ता. खूप सुंदर दृष्य होते ते. एक भली मोठी चक्कर मारून परतायचे ठरवले. वातावरण छान होते. थोडेसे ढगाळ होते. पण प्रसन्न होते. आम्ही पुढे पुढे जात होतो. आणि आमच्या चालकाने एकदम गाडी हळू केली आणि तो थांबला. समोर सुमारे ५०० मी. अंतरावर पंचवीस एक हत्तींचा कळप रस्त्यात ठाण मांडून होता. ते हलण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. ते जाण्याची वाट बघत आम्ही जीपमधे बसून होतो. थोडेसे अस्वस्थ होऊन की हे हलणार का? आणि हलले तर कधी? सूर्य अस्ताला जायची वेळ जवळ येत होती. हाताशी फार वेळ असणार नव्हता. मागे वळून पाहिल्यावर असे दिसले की मागून अजून १५/१६ हत्तींचा कळप हळू हळू रस्त्यावर येण्याच्या विचारात आहे. त्यात पिल्ले होती, मोठे सुळेवाले हत्ती होते. ते सर्व अजून रस्त्यावर आले नसले तरी विचार तसाच दिसत होता. धोक्याची घंटा आमच्या चालकाच्या डोक्यात वाजू लागली होती. पण तरीही तो शांत बसून होता. वाट बघत!! समोरचा कळप लवकर हलेल या आशेवर!!! आणि अचानक शेजारच्या झाडीतून हळू हळू ५/६ हत्ती बाहेर यायला लागले होते. आता मात्र परीस्थिती हाताबाहेर जायच्या बेताला आली होती. कोंडी होण्याची लक्षणे दिसायला लागली होती. काय करायचे? किती वेळ थांबायचे? काही कळत नव्हते. आम्ही पुन्हा मागे वळून पाहीले. कळप रस्त्याकडे कूच करायला लागला होता. चालकाने क्षणार्धात निर्णय घेतला आणि पटकन जीप मागे वळवली. मागचा कळप रस्त्यावर यायच्या आत आणि धोकादायक कोंडी होण्याच्या आत आम्हाला तिथून सुटणे, पलायन करणे गरजेचे बनले होते. हत्तींचे आमच्या कडे लक्ष गेले होते. पण अजून ते आक्रमक झाले नव्हते. कारण अजून तरी त्यांना आमच्यापासून धोका वाटत नव्हता. आम्ही त्या ठिकाणाजवळून छातीत धडधडतच गेलो. आणि थोडे अंतर पुढे जाऊन थांबलो. आमच्यासारख्याच अजून दोन तीन जीप्स थांबल्या होत्या. तो हत्तींचा कळप रस्त्यावर आला. त्याने रस्ता पार केला आणि जंगलात निघून जाऊ लागला. पुढचा कळप हलण्याची चिन्हे नव्हती. म्हणून मग आहे तिथूनच परत फिरलो. आणि नदीच्या काठाकाठाने जाणार्‍या रस्त्याने, कधी जंगलातून जाणार्‍या रस्त्याने निसर्गाचा आनंद घेत गैरालच्या विश्रामगृहावर येऊन पोहोचलो. फ्रेश होणे, चहा, नंतर थोडी विश्रांती मग जेवण आणि झोप असा कार्यक्रम पार पडला. झोपताना पुन्हा डोक्यात विचार होताच की उद्या परतायचे होते. परत जाताजाता काय पहाणे होईल तेव्हढेच. त्यात तरी वाघ दिसणार का? या वेळी वाघाने अजून तरी हुलकावणी दिली होती. उद्या काय होणार या विचारातच झोपेने मेंदूचा कबजा घेतला.

कॉर्बेट सोडले आणि बिनसर आगमन

२ मे २०१० :

सकाळी ५ वाजता जाग आलीच. चहा झाला. आणि सर्व आवरून ६.३०च्या सुमाराला गैरालचे विश्रामगृह सोडले. आमची जीप नेहमीप्रमाणे स्वतःचा वेगळा पंथ असल्या प्रमाणे दुसर्‍या मार्गाने निघाली. आमच्या चालकास वाटत होते की ज्या रस्स्त्याने गेल्यावर वाघ दिसेल त्या रस्त्याने आम्ही निघालो. वाटेत जंगली कोंबडे, पिवळ्या चोचीचा धनेश असे पक्षी दिसले. पण वाघाने हुलकावणी दिली ती दिलीच. आणि अखेरीस वाघ न पाहताच धनगढी गेटजवळ आलो. आमच्याबरोबरच्या मुलांच्या जीप्सना वाघ दिसला. आणि त्या जीप्स आमच्या मागून दहा मिनीटांच्या अंतरावरच होत्या. त्यांना वाघ रस्त्यावर जिथे दिसला तेथूनच आम्ही दहा मिनीटेच आधी निघून गेलो होतो. खरच वाघ दिसणं हा नशिबाचा भाग आहे. हे इथे खर्‍या अर्थाने आज पटले. रणथंभोर किंवा कान्हासारखे आज वाघ दिसण्याच्याबाबतीत नशीब आमच्या बाजूने नव्हते हेच खरे. म्हणून मग मेहूणे बंधूंनी, "खूप वेळा वाघ पाहीला आहे. पण हत्ती तर खूप छान पहायला मिळाले ना! बस. पैसे वसूल झाले." वगैरे म्हणून मनाचे समाधान करून घेतले. पण त्यांच्याही मनात कुठेतरी वाघाने हुलकावणी दिली ही खंत असेल. ते कदाचीत कबूल करणारही नाहीत. माझ्या मनात मात्र ही खंत नक्की आहे. शेवटी तुम्ही कितीही निसर्गप्रेमी असलात, तरी हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे, आणि म्हणून 'वाघ' ही ज्या राष्ट्रिय उद्यानाची ओळख आहे तेथे येऊन वाघ दिसला नाही तर काही खरं नाही. मन हे थोडेसे खट्टू होणारच ना!!! निदान माझे तरी झाले. कदाचित मी हाडाचा निसर्ग प्रेमी नसेन. कदाचीत साठीनंतर अपेक्षीत असलेली "ठेविले अनंते ऐसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ॥" ही वृत्ती मस्तकात भिनली नसेल, म्हणूनही असल्या छोट्या छोट्या गोष्टींची खंत वाटत असेल. माहित नाही. पुढे भविष्यात इतर अभयारण्यात गेलो आणि तिथे जरी भरपूर वाघ दिसला तरीही इथे नाही ना दिसला हा विचार, ही खंत सतत, चपलेत शिरलेल्या खड्यासारखी बोचतच राहील.

धनगढी गेटजवळ आलो. ८.३० वाजले होते. इतरांसाठी न थांबता परत Wild Adventure वर जाऊन थोडे ताजे तवाने व्हायचे आणि थांबायचे ठरले. लवकर आलोच होतो म्हणून परतताना वाटेवर असलेल्या 'गार्जिया' मंदीरात जायचे ठरवले. धनगढी गेटपासून ५/६ कि.मी. अंतरावर गार्जिया गाव आहे. या गावात कोसी नदीच्या पात्रात एका निमुळत्या उंच खडकावर 'गार्जिया' देवीचे हे मंदीर वसलेले आहे. शक्तीचे प्रतिक असलेल्या या देवीचा कार्तिक पौर्णिमेला मोठा उत्सव असतो. या दिवशी हजारो भाविक या मंदीराला भेट देतात. तिथे कोसी नदीवर पुल आहे. तो पुल ओलांडून खडकापर्यंत जावे लागते. त्या खडकापर्यंत आम्ही गेलो. आणि पाहीले तर भली मोठी रांग होती. वरच्या टोकापासून जिन्याने खालपर्यंत येऊन रांग बाहेर नदीपात्रात पर्यंत आली होती. रांगेत थांबलो नाही पुलावरूनच कळसाला नमस्कार केला. आणि परत फिरलो. Wild Adventure वर येऊन पोहोचलो. थोडे ताजे तवाने होत होतो तो पर्यंत नाश्ता तयार होताच. इतरही गाड्या येऊन थडकल्या होत्या. त्या गाड्यातले सगळे उत्साहाने सळसळत होते. आणि ते योग्यही होते. कारण त्यांना वाघ बघायला मिळाला होता. या मुलांच्यातली सृष्टी भावे ही मुलगी माझ्याशी खूप बोलत असे. तिच्या चेहेर्‍यावर "याज साठी केला होता अट्टाहास......" याचे समाधान होते. तिला म्हणजे काय सांगू काय नको असे झाले होते. ती म्हणाली,

" काका काका, धमाल. वाघ दिसला."

" वा वा. ग्रेट. कसा? कुठे?"..... मी

" अहो आम्ही येत होतो ना तेंव्हा." ...... सृष्टी.

" थांब. दम खा. आणि सांग"......मी

" अहो किती भारी ना!!!..... सृष्टी

" ओ के. ठीक आहे. थोडी रिलॅक्स हो आणि बोल." मी

पण विषयच असा होता की तिला ते पटापटा कोणाला तरी सांगून टाकायचं होतं. बाकी सगळ्यांनी वाघ पाहिला होता ना!! आणि वाघ न पाहिलेल्यांपैकी मीच तिच्याशी खूप बोलत असे. त्यामुळे तिला सर्वात आधी मला सांगायचे होते. आणि त्यावेळी मलाही तिच्या उत्साहाची लागण झाली. सृष्टीची वर्णन करण्याची पद्धत आणि शैली इतकी अफाट आहे की मला क्षणभर आपण त्या जीपमधे होतो की काय असा भास झाला.

"आपण गैराल सोडले आणि परतीच्या वाटेवर निघलो. तुमची जीप मधेच कुठेतरी गुल झाली. धनगढी गेट तर जवळ येत चालले होते. वाघ दिसण्याच्या सगळ्या आशा आता संपल्या होत्या. आम्ही सर्व मनात हिरमुसले झालो होतो. इतका आटापिटा करून पुण्याहून आलो आणि वाघ दिसला नाही!!! सगळे चिडी चुप्प होते. तेव्हढ्यात आमच्यापुढे असलेली शौरीदादाची जीप गपकन थांबली. आम्हाला वाटले की असेल एखादा प्राणी किंवा हत्ती वगैरे. पण दादाने सांगितले की समोरच्या नदीच्या कोरड्या पात्रात वाघ झोपला आहे. सगळ्यांचे चेहेरे एकदम खुलले. आमच्या अंगातून एक्साईटमेंटची एक लहर सळसळत गेली. एखाद्या ट्रीपचा शेवट गोड व्हावा ही आमची इच्छा पूर्ण होणार होती तर!!! आम्ही उत्सुकतेने पाहू लागलो. आम्ही सगळे जीपवर उभे राहीलो आणि वाघ शोधू लागलो. शौरीदादा आम्हाला सारखे सांगत होता की गप्प बसा म्हणून. पण आम्ही एव्हढे उत्साहाने भारलो होतो की आम्हाला गप्प बसणे अशक्य झाले होते. आम्ही तिथे जवळ जवळ २० मिनीटे थांबलो. या आशेने की वाघ आता उठेल आणि त्याचे आम्हाला दर्शन घडेल. आणि जणू आमची इच्छा त्याने ऐकल्यासारखा वाघ चक्क उठला आणि चालू लागला. त्याच्या चालण्यात किती रूबाब होता! जणू जंगलचा राजाच वाटत होता."..........सृष्टी

सृष्टीचं म्हणणं खरं होतं. मला तर नेहमीच वाटतं की, वाघ हाच खरा वनराज आहे. उगाचच सिंहाला वनराज वनराज करून डोक्यावर चढवतात. माझ्या मते तसा सिंह हा अत्यंत बेढब आणि कुरूप प्राणी आहे. सिंहाला वनराज का म्हणतात? हे मला कधीच कळले नाही. वाघ हा सिंहापेक्षा कितीतरी पटीने देखणा आणि रूबाबदार असलेला प्राणी आहे. तसेही वाघ आणि सिंह या दोघांच्या ताकदीत काहीच फरक नाहिये. पण तरीही वनराजपद सिंहाला? कां? तर त्याचा आकार मोठा आणि भली मोठी आयाळ आहे म्हणून? की जी वाघाला नाही? माझे काय मत आहे सांगू? वाघाचा रूबाब म्हणजे राजघराण्यात जन्मलेल्या महाराजाच्या रूबाबासारखा आहे. आहे तर सिंह म्हणजे बळाचा वापर करून सार्वभौम झालेल्या राजासारखा वाटतो! जगात मीच महान असे म्हणणार्‍या हिटलरसारखा!!

" बरे मग? पुढे काय झाले?"...... मी

"पुढे काय होणार? तो उठला आणि आमच्या विरूद्ध दिशेने चालायला लागला. पुढे तिथे पाण्याचे डबके होते. तिथे तो थांबला. पाणी प्यायला आणि थोडे पुढे जाऊन झाडाच्या सावलीत जाऊन बसला. मधे दगड असल्याने आता आहाला काहीच दिसत नव्हते. पण शेवटच्या दिवशी अगदी लांब का होईना पण आम्हाला वाघ दिसला होता. अखेर माझी वाघ पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. मग आम्ही तिथून निघालो. खूप खूष होतो सगळे जण!! खरच वाघ हा कसला भारी आणि रूबाबदार प्राणी आहे हे तेंव्हा खरे आमच्या लक्षात आले.".........सृष्टी.

आणि सृष्टी इथे बोलायची थांबली. पुढे काय बोलावे ते तिला सुचेना इतकी ती एक्साईट झाली होती. बाकी इतरही वाघ दिसल्याच्या उत्साहाने सळसळत होते. त्या उत्साहातच भरपूर नाश्ता झाला. आमच्या गाड्या तयार होत्याच. आता जीप नव्हत्या. बंद टोयोटा वगैरे गाड्या होत्या. गाड्यांच्या टपावर सामान टाकले. आणि १०.३० च्या सुमाराला Wild Adventure सोडले. आणि बिनसरकडे निघालो. वातावरण ढगाळ होते. सर्व प्रदेश डोंगराळ होता. रस्ता सर्व घाटातला आणि वळणा वळणाचा होता. पण रस्ता सर्व खूप चांगला होता. सर्वजणांची पोटे भरली होती. आमच्या गाडीत ज्येष्ठ नागरीकांनी साधारण तास दोन तास तग धरला आणि सर्व पेंगू लागले. साधारण अडीच तीनचा सुमार असेल. अचानक बघता बघता अंधारून आले. आणि काहीही कळायच्या आत पाऊस कोसळायला लागला. बदा बदा पाऊस कोसळायला लागला. आणि परत अचानक सगळा माहोलच बदलला. कारण पावसाबरोबरच प्रचंड गारा कोसळायला लागल्या होत्या. सगळीकडे गाराच गारा पसरल्या होत्या जणू काही रस्त्याच्या कडेला एखादा पांढरा शुभ्र गालिचा पसरावा. आणि त्या चालकाच्या लक्षात आले की टपावरचे सर्व सामान उघडे होते. पण पाऊस थांबेपर्यंत थांबताही येणे शक्य नव्हते. तसेच हळू हळू पुढे जात राहीलो. राणीखेत मधून गेलो तेंव्हासुद्धा पाऊस पडतच होता. पण खूप कमी झाला होता. गावा बाहेर थांबलो. टपावर ताडपत्री टाकली. पण बॅगा भिजायच्या त्या भिजल्याच ना!!! सगळे आत पाणी गेले असणार होते. मला एकदम एक साहेबी म्हण आठवली. Its like locking stable doors after horses ran away. सर्व सामान नीट झाकले आणि पुढे निघालो. आता भुका लागल्या होत्या. जेवणे झाली नव्हती. साडेचार वाजून गेले होते. ताडीखेत गावात एक हॉटेल पाहून थांबलो. रामनगरहून जेवण आणले होतेच. ते आणि चहा झाला. मी नाही जेवलो कारण एकतर सकाळी नाश्ता झाला होता. आणि इतक्या उशीरा जेवून रात्रीच्या जेवणाचा निकाल लागला असता. पोटपूजा झाल्यावर तिथून निघालो. आता बिनसर सुमारे दीड एक तासाच्या अंतरावर होते. साधारण पावणे सातच्या सुमाराला बिनसरला पोहोचलो्.

उत्तराखंडमधल्या अलमोड्यापासून सुमारे ३५ किमी. वर असलेले आणि जवळ जवळ ५० चौ. कि.मी. क्षेत्रावर असलेले हे संरक्षित अभयारण्य मुख्यतः पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ७५०० फूट उंचीवर असलेले हे ठिकाण अतिशय घनदाट आणि सदाहरित जंगलाने भरलेले असल्याने इथे या प्रदेशाला एक नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. इथे सुमारे २०० जातींचे पक्षी सापडतात. पण त्याशिवाय इथे अस्वलं आणि क्वचित प्रसंगी बिबट्यापण सापडतो. तसेच Yello Throated Marten हा प्राणी भारतात फक्त इथल्याच जंगलात पहायला मिळतो. या जंगलात ओक, देवदार, र्‍होडोडेंड्रॉन आणि पाईन हे वृक्ष मुबलक प्रमाणात दिसतात. पाईन वृक्ष हे थोड्या खालच्या पातळीवर तर ओक आणि र्‍होडोडेंड्रॉन हे वृक्ष उंचीवर अधिक प्रमाणात आढळतात. १९८८ मधे सरकारने हे वन्य जीव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषीत केले. याचा प्रमुख उद्देश हा, कमी आणि विरळ होत चाललेल्या रुंद पानांच्या ओक वृक्षाच्या जंगलाचे रक्षण आणि संवर्धन करणे हा होता. बिनसर हे प्रामुख्याने निसर्गप्रेमी आणि शहरी वातावरणापासून दूर शांत वातावरणात जाणार्‍यांकरता प्रमुख आकर्षण बनले आहे. घनदाट जंगले, अफाट निसर्ग सौंदर्य, शांतता, एकांतवास आणि भरपूर पक्षी हे इथले वैशिष्ट्य.

बिनसरमधल्या वनखात्याच्या विश्रामगृहात मुक्काम होता. हे ठिकाणही इन सर्चचे नेहमीचे होते. एक मोठी खोली आणि दोन दोन बेड असलेल्या दोन खोल्या. थंडी जबर होती. दोन बेडवाल्या एका खोलीत आम्ही चौघे म्हातारे आणि इतर पोरे त्या उरलेल्या खोल्यात. दोन बेडवाल्या खोल्यांनाच फक्त टॉयलेट होते. तिथे वीज पण नव्हती. रात्री सोलर पॉवरवर दिवे चालत होते. त्यामुळे एका खोलीत एकच दिवा, नाहीतर बॅटर्‍या असे प्रकार चालू होते. पाणी देखील अगदी मर्यादीत प्रमाणात होते. इतक्या उंचीवर पाणी चढणे शक्य नव्हते. मग खालून कुठूनतरी पाणी कळश्यातून भरून आणून तिथले लोक वापरत असत. आणि विश्रामगृहासाठी पावसाचे पाणी साठवून ठेवलेले असे. त्यासाठी मोठी टाकी होती. तेच पाणी वापरायचे. बाथरूममधे चार बादल्या भरून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे आम्हा सर्वांना पाणी जपून वापरायच्या सूचना होत्या. निघताना बिनसरला थंडी असेल, गरम कपडे लागतील असे सांगितले गेले होते. बरे इतक्या थंडीची कल्पना मला नव्हती. पण आमचा शहाणपणा ना!! त्यात काय होतय! हॅ इतकी काही थंडी नसेल अश्या रूबाबात मी होतो. आणि तिथे गेल्यावर थंडीने सॉलिड झटका दिला. रात्र धड काढणे गरजेचे होते. सकाळी सूर्य वर आल्यावर काही त्रास होणार नाही याची खात्री होती.

कँडल लाईट पेक्षाही कमी उजेडात गरम गरम 'डिनर' झाले. माझे मेहुणे आणि त्यांच्या बंधूंसकट सर्व जनता आपापले सामान कितपत भिजले आहे ते पाहण्याच्या आणि वाळवण्याच्या उद्योगाला लागली होती. प्रचंड थंडीमुळे कपडे वाळणे शक्यच नव्हते. कपडे आणि इतर भिजलेले सामान यथाशक्ति पसरून झाल्यावर रानडे त्रिकूट बेडवरच्या त्या रजईत लुप्त झाले. मी बरोबर आणलेली पातळ शाल जमीनीवर हांतरली. तरी त्यातल्या त्यात एक बरे होते की जमीन लाकडी होती आणि त्यावर एक जाड गालिचा होता. म्हणजे जमीनीकडून थंडीचा बंदोबस्त झाला होता. मेहुण्यांना इतके भन्नाट आणि उबदार पांघरूण मिळाले होते त्यामुळे त्यांनी मला त्यांची स्लिपींग बॅग दिली. आज इथे मोबाईलची रेंज येत होती. पण त्यासाठी बाहेर जाऊन उभे राहवे लागणार होते. थंडीत ते शक्य नव्हते. म्हणून मग मी सुमाच्या फोनचा नाद सोडला. आणि जीन व माझ्या जॅकेटसह त्या स्लिपींग बॅग मधे घुसलो. फारच अरूंद प्रकरण होते ते. पण तरीही झोप लागली. पहाटे ५.३० वाजता नेहमीप्रमाणे जाग आली. तोंड धुवून ताजेतवाने होऊन बाहेर आलो. चांगलेच उजळले होते. आणि अवाक होऊन समोरचे दृष्य पाहू लागलो.....

बिनसर :

३ मे २०१०:

उठल्यावर चहा मिळाला. आणि विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला आलो. समोर आलमोड्याची विशाल दरी पसरली होती. संपूर्णपणे हिरव्यागर्द झाडीने वेढलेली ही दरी, त्यावर पसरलेला विरळ धुक्याचा पडदा, तो पडदा फाडून वर डोकावणारे कोवळ्या पिवळसर फिकट हिरव्या पानांचे वृक्षमाथे, आणि त्यावर पडणारे उगवत्या सूर्याचे कोवळे उन. अतिशय मनोहर दृष्य दिसत होते ते. तिथून उठलो आणि विश्रामगृहाच्या पुढील बाजूला आलो. सूर्य नुकताच उगवत होता. समोर पसरलेल्या पर्वतराजीच्या हिरव्या गार माथ्यावरून हळूच डोकवत होता. झाडांच्या पानाच्या फटीतून सोनेरी किरणांची मुक्त उधळण करत होता. ते सोनेरी किरण त्या पानांच्या फटीतून बारीक सोन्याच्या सळया जमिनीवर पडाव्यात असे वाटत होते. त्यातल्या काही सळया विश्रामगृहाच्या अंगणात पडून तिथल्या हिरवळीचा रंग पालटवत होत्या. आणि तिथले वातावरण उबदार करत होत्या. काल रात्रीच्या थंडीचा आता मागमूसही नव्ह्ता. काल रात्रीची थंडी बोचरी होती, हाडात पोहोचणारी होती. आताची थंडी सुखावह होती. कारण थंडी आणि अंगावर पडणारे कोवळे पण कोमट किरण यांचे सुरेख मिश्रण झालेले होते. आणि तो परीणाम अत्यंत सुखावह होता. हळू हळू सर्व जनता उठली होती. परत एकदा चहा झाला आणि ८ वाजता आम्ही तिथूनच २/३ कि.मी. अंतरावर असलेल्या "झीरो पॉईंट" या ठिकाणाकडे निघालो. बिनसरमधले हे सगळ्यात उंच ठिकाण. इथून वातावरण स्वच्छ असेल तर हिमालयातल्या नंदादेवी, केदारनाथ, चौखंबा, त्रिशूळ, पंचचौली, नंदा कोट या शिखरांसह सुमारे ३०० कि.मी. ची हिमालयातली बर्फाच्छादीत पर्वतरांग दिसू शकते. तसेच समोर पसरलेली विशाल दरी आणि दिसणारे हिरवेगार डोंगर हे या "झीरो पॉईंट" वैशिष्ट्य आहे. साधारण पाऊण तासाच्या भ्रमंतीनंतर तिथल्या टॉवरवर पोहोचलो. हा टॉवर कॉर्बेटमधल्या टॉवरसारखा नव्हता. व्यवस्थित बांधलेला दगडी जिना असलेल्या या टॉवर वर बसायला बाके होती. तिथे पोहोचलो. पण वातावरण थोडेसे धूसर होते. पण तरीही स्वच्छ उन पडलेले. उन कोवळे नसले तरी कडक नव्हते, सुखावह होते. संपूर्ण परीसर त्या सोनेरी उन्हात न्हाहून निघाला होता. खाली दरीत एक नदी कळसर राखाडी कपड्यावर पांढर्‍या दोर्‍याने धावदोरा घातल्यासारखी दिसत होती. मधूनच त्यावर सूर्यकिरण पडल्यावर त्याचे पात्र तेव्हढ्याच भागात सोनेरी पांढरट पत्रा पडल्यासारखे चमकत होते. तिथे आम्ही जवळ जवळ तासभर थांबलो. मनसोक्त निसर्गाचा आस्वद सगळ्यांनी लुटला. तिथे बरेच फोटो काढण्याचेही कार्यक्रमही पार पडले. आणि मग तिथून आम्ही अखेरीस परत फिरलो. झीरो पॉईंट ला जाताना आणि परत येताना अतिनील नर्तक(Ultra Marine Flycatcher), राखी वटवट्या(Gray Hooded Wrabbler), Rufus Bellied Niltava, बरेचसे Tits, Ravens, नीलिमा(Verditer Flycatcher) असे पक्षी बघायला मिळाले. अर्थात पक्षी बघायला मिळाले असे मी जेंव्हा म्हणतो तेंव्हा ते सहज दिसलेले नसतात बरे का!!! एक तर गर्द जंगलात झाडात असे पक्षी दिसायला नजर प्रचंड तयार लागते. सामान्य माणसाला तर ते कधीच दिसत नसतात असे माझे मत आहे. माझ्यासारख्या सामान्य माणूस तर, "अरे हा तर Tit आहे" असे शौरीने म्हटल्यावर आधी पटकन म्हणणार "कुठे कुठे?" मग डोळे ताणताणून पहाणार की काय दिसतय. दिसंत तर काहीच नसते. मग बर्‍याचश्या प्रयत्नानंतर तो एकदाचा दिसतो. त्यामुळे माझे हे वर्णन वाचताना असे मुळीच समजू नका की हत्ती जितक्या सहज दिसतो तितक्या सहज पक्षीपण दिसतात. तसे काही नाहिये. मला सहजपणे मुळीच दिसले नाहित. इतरांना दिसला आणि आपल्याला नाही दिसला की मग काही जण "हो हो वा वा छान दिसला की" असे म्हणतो आणि पुढे लगेचच त्याला काही कळायच्या आत म्हणतो की "काय रंग आहे हो त्याचा?" नंतर त्याच्या चूक लक्षात येते. पण एकदा गेलेला शब्दही मागे घेता येत नाही ना!!! मग शौरीसारखा समजूतदारही ही गफलत ओळखूनही "तो त्या तिरप्या गेलेल्या फांदीवर बसलेला पिवळट रंगाचा दिसतोय ना? तो" असे सांगतो. तरीही त्या माणसाला तो पक्षी काही दिसलेला नसतो बरं का!!! अर्थात हे माझे मत आहे. आणि ते मी माझ्या अश्याच काही स्वतःच्या गफलतदार अनुभवतून काढलेले आहे. मी इतकाच विचार केला की आपलेच जर असे होऊ शकते तर आपल्यासारखी बरीच अशी माणसे असणार की ज्यांचे असे होत असेल. पण ते माझ्यासारखे खुलेपणाने कबूल करायला तयार नसतात. आणि मग असे लोक न दिसताना सुद्धा म्हणून जातात की "हो तो पिवळा जर्द ना? त्या पलिकडच्या मागच्या फांदीवार बसलेला ना? वा वा किती मस्त दिसतोय" वगैरे वगैरे. प्रत्यक्षात त्याला गर्द हिरव्या पानांखेरीज काहीही दिसलेले नसते. असो. इथे या भागात र्‍होडोडेंड्रॉनची बरीच झाडे दिसली. गुलाबी रंगाकडे झुकाणार्‍या गर्द लाल रंगाचे हे फूल असते आणि याची फुले झुबक्याने असतात. र्‍होडोडेंड्रॉन हे नाव ग्री़कांकडून आले आहे. ग्रीकमध्ये "र्‍होडो" म्हणजे "रोझ" किंवा गुलाब. आणि "डेंड्रॉन" म्हणजे झाड. यात पुष्कळ रंगाची फुले येतात. हे फूल नेपाळचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाते. तर सिक्कीमने पण या फुलाला आपल्या राज्याची ओळख म्हणून मान्य केले आहे. र्‍होडोडेंड्रॉनचे सरबत इथे खूप प्रसिद्ध आहे. परत येत असताना अगदी नशिबाने Yello Throated Marten हा अतिशय दुर्मिळ प्रणी दिसला. दुर्मिळ अशासाठी की हा प्राणी फक्त इथेच पहायला मिळतो. १०.३०च्या सुमाराला परत विश्रामगृहावर आलो. भरपूर नाश्ता झाला. आणि सगळे आपापल्या रजयात गुडुप झाले.

ट्रीप आता संपत आली होती. दुपारी २ वाजता जेवण झाले. पुन्हा विश्रांतीचा एक हप्ता झाला. आणि संध्याकाळी एका शंकराच्या देवळात गेलो. जाताना विश्रामगृहाच्या मागिल बाजूला एक पायवाट होती. त्या पायवाटेने उतरलो. देवळात आलो. देवळाबाहेर एक मोकळे मैदान होते. आज भ्रमंतीचा काही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे इथेच मुलांचे निरनिराळ्या प्रकारचे सांघिक खेळ घेतले गेले. आणि त्यातच त्यांना एक खेळ दिला गेला. त्यांचे पांच पांचाचे गट पाडले. प्रत्येकाला एक विषय दिला गेला.आणि त्यावर त्यांनी १० मिनीटांचे एक नाटुकले सादर करायचे होते. त्यामुळे सगळे भराभर विश्रामगृहावर आलो. आणि सर्व गट आपापल्या तयारीला लागले. सर्व गटांनी आपापली नाटुकली सादर केली. मी आणि शौरीने परीक्षकाचे काम पाहिले. एकंदरीत मुलांची संध्याकाळ त्यांना गुंतवून ठेवणारी होती. नंतर जेवण झाले आणि परत सगळे आपापल्या रजयात लुप्त झाले. मला झोप येत नव्हती. मधेच दुपारी सुमाला फोन करून झाला होताच. चला आता ट्रीप संपली होती. उद्या लवकर उठायची घाई नव्हती. १०.३० ला जेवणासारखा नाश्ता करून रामनगरसाठी निघायचे होते. सर्वांचे फोन क्रमांकाची देवाण घेवाण झाली. यांच्यातले कोण कोण नंतर संपर्क ठेवेल याचा काहीच अंदाज येत नव्हता. नाही म्हटले तरी वयातला फरक जाणवत होताच. सृष्टीशी माझी चांगली दोस्ती जमली होती. केतकी, जयदीप आणि सुश्रुत यांच्यानंतर तीच मोठी होती न!!! आणि पुण्यात नसूनही सृष्टीने नियमीत संपर्क ठेवला आहे. वयातला फरक विसरून ही मुलगी माझ्याशी नियमीत बोलते, तिला माझ्याशी बोलावेसे वाटतय याचेच मला खूप कौतुक आहे. पण मी तिचे खास आभार अशासाठी मानतो की तिने मला त्यांना वाघ दिसल्याची छान माहिती दिली. अर्थात झोपताना उद्या कोंणते नाट्य समोर वाढून ठेवले होते याची मुळीच कल्पना नव्हती. कशी असणार कल्पना? आणि तशी ती असती तर पुढची घटना टळू शकली असती ना? असो. आता ट्रीप संपल्याची हुरहूर मनात साठली होती. बोलून दाखवता येत नव्हते. या हुरहूरयुक्त मनस्थितीत झोप कधी लागली ते कळलेच नाही.

परतीच्या वाटेवर :

बिनसर/रामनगर :

४ मे २०१० :

सकाळी ५ वाजता जाग आलीच. तरी साडेपांच पावणे सहापर्यंत लोळत पडलो होतो. पण अखेरीस उठलो. मेहुणेपण उठले होते. मुख मार्जन झाले. चहा पण मिळाला. सारी जनता डाराडूर होती. पुन्हा विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला आलो. कालच्या प्रमाणे समोरचा देखावा मनात आणि मेंदूत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. तसाच पुढच्या बाजूला आलो. पुन्हा एकदा हिरव्या गार वनश्रीचा आणि कोवळ्या सोनेरी सूर्यकिरणांचा मनोहारी लपंडाव पहायला मिळाला. समोरच्या बाजूला डावीकडे आणि उजवीकडे उंच उंच गेलेले हिरवेगार डोंगर, त्याच्या माथ्यावरून हळूच, पाहू की नको, उगाच कोणाला आपण साखरझोपेत त्रास तर देत नाहीये ना, मग हळूच डोकवावे असे करत करत हिरव्या डोंगरमाथ्यावरून हळूच डोके वर काढणारा सूर्य असे दृश्य परत इथे आलो तरच पहायला मिळणार होते. आणि ती शक्यता फारच कमी आहे. बराच वेळ ते दृश्य मनात आणि कॅमेर्‍यात साठवून ठेवत होतो. शौरी, केतकी आणि सुश्रुत सकाळी एक चक्कर मारून आले. विश्रामगृह आळोखे पिळोखे देत हळू हळू जागे होत होते. सर्वांचे आवरून झाले. तोपर्यंत शौरी वगैरे फिरून आले होते. १० वाजता नाश्ता लागला. सर्वांनी पोटभर खाऊन ख्या अशा सूचना होत्या. कारण जेवणात वेळ मधे घालवणार नव्हतो. सर्वांचा नाश्ता कम जेवण झाले. आणि आम्ही ११ च्या सुमाराला बिनसर सोडले. आज आमची म्हातार्‍यांची टॅक्सी सर्वात पुढे होती. आमच्या टॅक्सीत जयदीप आणि अजून एक मुलगा होता. आणि आमची टॅक्सी वेगानी पुढे पुढे जातच होती. आम्ही राणीखेत सोडले, अलमोडा पण मागे टाकले. जवळ जवळ २५/३० कि. मी. पुढे आलो असू. आणि आमचा टॅक्सीवाला थांबला. आम्हाला काय झाले कळेना. रानडे बंधू झोपेत होते ते पण जागे झाले. तो म्हणला कि "कुछ तो गडबड है. पिछेवाली एक गाडीको ऍक्सीडेंट हुवा है. चलो पिछे जाके देखते है." पुन्हा आम्ही मागे फिरलो. डोंगरी भाग असल्याने मोबाईलची मधूनच रेंज मिळत होती. परत अलमोड्या पर्यंत आलो. पण मागच्या दोन्ही गाड्यांचा पत्ता नव्हता. आमच्या गाडीपैकी एका गाडीने एका लहान मुलाला उडवले होते. आम्हाला तितक्यात शौरीचा निरोप आला की आम्ही त्या मुलाला घेऊन हॉस्पीटलमधे जात आहोत. तुम्ही दोन गाड्या पुढे व्हा. आम्हाला अजून ती दुसरी गाडी दिसली नव्हती. आम्ही परत यू टर्न घेतला आणि रामनगरकडे निघालो. पुढे कुठेतरी चहाची टपरी पाहून दुसर्‍या गाडीसाठी थांबायचे ठरले. त्याप्रमाणे २०/२५ कि.मी.वर एक चहाची टपरी दिसली. तिथे आम्ही वाट बघत थांबलो. साधारण पांच दहा मिनीटात दुसरी टॅक्सी आलीच. या टॅक्सीत सृष्टी होतीच. तिलाच विचारले कि काय झाले? ती म्हणाली,

"आपण बिनसरहून निघालो. तुमची गाडी सगळ्यात पुढे होती. तुमच्या मागे आमची गाडी होती. पण तुमची गाडी भन्नाट वेगाने पुढे निघून गेली. तुमच्या आणि आमच्या गाडीत ४ एक कि. मी. चे अंतर असेल. आमच्या गाडीच्या मागे शौरीदादाची गाडी होती. त्याच्या गाडीत सर्व लहान मुलेच होती. साधारण २ चा सुमार असेल. आमच्या ड्रायव्हरला फोन आला. त्याच्या बोलण्यावरून आम्हाला कळले की ऍक्सीडेंट झालाय. पण कोणाचा ते काही कळेना.".............सृष्टी

" मग?" ............मी

" आम्ही त्याला विचारले तेंव्हा तो म्हणाला की मागच्या गाडीला म्हणजे शौरीदादाच्या गाडीला ऍक्सीडेंट झाला आहे. आणि एका लहान मुलाला लागले आहे. आम्हाला वाटले की आपल्या ग्रूपपैकी कोणाला तरी लागलय की काय?"........सृष्टी

" बापरे!! मग?"..........मी

" मग केतकीताईने शौरीदादाला फोन लावला आणि आमच्या ड्रायव्हरने तुमच्या ड्रायव्हरला फोन लावून गाडी मागे वळवायला सांगितली. आणि आम्ही पण गाडी मागे वळवून त्यांची गाडी शोधत शोधत जायला लागलो." ....सृष्टी.

" हो. आम्ही गाडी मागे वळवली आणि साधारण जिथे अपघात झालाय असा निरोप होता तिथपर्यंत आलो. पण काही कोणाचा मागमूस दिसेना."........मी.

" हो. तिथे रेंज नीट येत नव्हती. मग आमच्या ड्रायव्हरने परत एकदा प्रयत्न करून पाहू म्हणून शौरीदादाच्या ड्रायव्हरला फोन आवला. आणि तो लागला. त्या ड्रायव्हरने सांगितले की आपल्यापैकी कोणालाही लागले नाहीये. तिथल्या गावातलाच एक लहान मुलगा आहे. आमचा जीव अगदी भांड्यात पडला. काका, तुम्हाला आवाज नाही ऐकू आला? अहो इतक्या जणांचे जीव भांड्यात पडल्यावर कित्ती मोठ्ठा आवाज झाला माहीत आहे? हा हा हा !!!!!!"..........सृष्टी.

तशी सृष्टी १० वी तली म्हणजे लहानच आहे. पण त्याही परीस्थीतीत तिची विनोद बुद्धी जागृत होती याचे मला खूप कौतुक वाटले.

" नाही अग. गाडीच्या आवाजात ऐकू आला नसेल. हा हा हा!!! बरे मग ग? पुढे?"..........मी.

" त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की ते लोक त्या मुलाला घेऊन हॉस्पीटलमधे गेले आहेत. तुम्ही येऊ नका. पुढे जा. आम्ही येतो मागून. आमच्या ड्रायव्हरने गाडी परत रामनगरकडे वळवली आणि तुम्हाला फोन लावला.".......सृष्टी.

" हो. म्हणूनच आम्ही पुन्हा मागे फिरलो आणि तुमची वाट बघत बसलो."........ मी.

चहा घेतला आणि तिथून निघालो. रात्री १०.३० ला परत दिल्लीला जायची गाडी होती. हे झाले नसते तर भरपूर वेळ हाताशी असणार होता. पण आता वेळापत्रक जरा अस्तव्यस्त झाले होते. तरीही हाताबाहेर गेले नव्हते. म्हणजे शौरी आणि त्याच्याबरोबरच्या मुलाना जेवणास वेळ कमी पडण्याची शक्यता होती. ते किती वाजाता पोहोचतील या वर ते अवलंबून होते. आम्हाला पोहोचेपर्यंत पावणे सात झाले होते. ते लोक साधारणतः पावणे नऊपर्यंत पोहोचतील असा अंदाज होता. आम्ही जेऊन घ्यायचे ठरले होते. आमच्या रिसॉर्टच्या बाहेरच असलेल्या दुकानातून टी शर्टची खरेदी झाली. माझ्याकडे कॉर्बेटची, मी या लेखाच्या सुरूवातीला उल्लेख केलेली पुस्तके नव्हती. ती पण मिळाली. ती विकत घेऊन टाकली. खरेदी करून रिसॉर्टवर आलो. आणि जेवायला सुरूवात केली तोपर्यंत शौरीची गाडी आलीच. आमच्या अपेक्षेपेक्षा लवकर आली. काय झाले म्हणून त्याला विचारले असता तो म्हणाला की "रस्त्याच्या मधे एक जीप उभी होती. आणि एक मुलगा त्या जीपच्या मागून अचानक पुढे आला. आमच्या ड्रायव्हरचा काही इलाज नाही चालला. त्याची काहीच चूक नव्हती. मग त्या मुलाला हॉस्पीटलमधे नेले. ट्रीटमेंट दिली." यथावकाश जेवणे झाली. टॅक्सी तयारच होत्या. त्यात सामान आणि माणसे भरली आणि रामनगर स्टेशनवर आलो. गाडी लागली नव्हती. तिच्या सुटण्याच्या वेळेच्याही १५ मिनीटे नंतर लागली. आणि जवळ जवळ अर्धा तास उशीरा सुटली. पण आत दुसरी गाडी गाठायची असे काही नव्हते. आणि नंतरची पुण्याची गाडी १० वाजता होती. त्यामुळे चिंता नव्हती. नेहमीप्रमाणे सुमाच्या फोननंतर झोप लागली. पण ट्रीप संपल्याची हुरहूर मनात साठूनच.

दिल्ली :

५ मे २०१० ते ८ मे २०१० :

सकाळी ५ वाजता दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. सामान घेऊन बाहेर आलो. आम्ही सोडून बाकी जनता १० च्या गाडीने पुण्याला परतणार होती. सर्वांचे निरोप घेतले. इतक्या दिवसाच्या सहवासाने पाय निघत नव्हता. रानड्यांचे ठीक होते. मला का कोणास ठाऊक पण वाटून गेले की रानड्यांचा त्यांच्या मनावर चांगला ताबा असला पाहिजे. त्यांना हुरहूर वगैरे काही जाणवली नसेल असे उगाचच वाटून गेले. का असे मला वाटले? माहीत नाही. कदाचीत मी फार हळवा असेन! वयाला न शोभण्या इतका!! रानडे मिलीटरीशी संबंधीत आहेत. आणि माझी अशी ठाम समजूत आहे की मिलीटरीत भावनांना महत्त्व नाही. मग रानडे एका "मिलीटरी"वाल्याचे वडिल. म्हणजे मग त्यांनी भावनांच्या आहारी जाऊन कसे चालेल ना? म्हणून मग रानड्यांनी प्रयत्नपूर्वक हुरहूर, हळवेपण असल्या बायकी भावनांना "डिलीट" केले असेल? माहित नाही. आम्ही चौघे म्हातारे बाहेर आलो.

इथे खरेतर कॉर्बेट डायरी संपत आहे. कारण कॉर्बेटची ट्रीप इथे संपली. पुढचे तीन दिवस हा या ट्रीपचा भाग नाहीत. पण इथेच थांबवले तर ते वर्णन अर्धवट वाटेल असे मला वाटले म्हणून मग पुढचे लिहीले आहे. कारण नंतर सर्व रानडे आणि मी दिल्लीत रानडे यांच्या मिलीटरीतल्या मुलाकडे राहीलो होतो. हा मुलगा माझा भाचा. अर्थात हा या ट्रीपचा भाग नव्हता. आणि असेही तिथे ते रानडे त्यांच्या कोषात होते. आता तर रानडे यांची मेजॉरीटी होती. मग खाणे आणि झोपा आणि काही खरेदी यापलीकडे फारसे नोंद घेण्यासारखे घडले नाही. मग ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे ८ मे ला राजधानीने मुंबईला यायला निघालो.

परतलो :

९ मे २०१० :

सकाळी ८.३० वाजता मुंबई सेंट्रल स्टेशनवर उतरलो. संध्याकाळी डेक्कन क्वीनचे तिकीट होते. सुमाकडे जायचे होते. त्याप्रमाणे गोरेगावला तिच्या घरी गेलो. ताजे तवाने होणे, चहा, माफक गप्पा, तिच्या वडिलांची भेट आणि त्यांच्याशी गप्पा, जेवण वगैरे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. दुपारी अडीच पावणे तीनच्या सुमाराला गोरेगावहून निघालो. सुमालाही भरपूर गप्पा मारायच्या होत्या. फोनवर बोलणे निराळे. आणि प्रत्यक्ष भेटल्यावरच्या गप्पा निराळ्या. प्रत्यक्ष भेटीतल्या गप्पांना एक प्रकारचा वेगळाच बाज असतो आनंद असतो. म्हणून ती व्ही टी. पर्यंत आली होती. खूप छान वाटले. आणि अखेरीस रात्री ९ वाजता "होम स्वीट होम" इथे येऊन पोहोचलो.

समारोप :

अखेरीस बरेच दिवस गाजत असलेली ट्रीप पार पडली. तश्या माझ्या ट्रीपा नेहमीच गाजत असतात. कारण मी त्याबद्दल सगळ्यांना सांगत सुटतो ना म्हणून!!! कदाचित माझ्यात दडलेले लहान मूल मधून मधून डोके वर काढते म्हणून असे होत असेल. या ट्रीप्समधून काय शिकलो हे शोधण्याचा प्रयत्न नसतो करायचा. माझे ते वय नाही. मुलांना ठीक आहे. पण मनुष्य स्वभाव असा असतो की काय शिकलो या पेक्षा काय जमले नाही हेच डोक्यात अधिक राहते ना? निदान माझ्यातरी राहिले की इतका आटापिटा करून वाघ दिसला नाही तो नाहीच. आणि लहान मुलांना टुकटूक करतो तसे तो दुसर्‍यांना दिसला!!! अगदी परत जरी समजा कॉर्बेटला गेलो आणि वाघ दिसला तरी पण इथे या ट्रीपला नाही ना दिसला? याची बोच कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात राहीलच. "बूंद से गयी सो हौदसे नही आती" हेच खरे. कदाचित या पुढे कित्येक वाघ दिसतील. अगदी कंटाळा येई पर्यंतही दिसतीलही. पण आता नाहीना........शिकण्यासारखे म्हणाल तर माझ्यापुरते तरी हे आहे, की असल्या छोट्या छोट्या गोष्टींची खंत मनाला लावून घ्यायची नाही. "ठेविले अनंते......" ही वृत्ती अंगी बाळगता आली तर उरलेले आयुष्य सुखी होईल ना?

आणि गेल्या शनीवारी म्हणजे १२ जूनला 'इन सर्च्'ने एक आनंद मेळावा आयोजीत केला होता. त्या मेळाव्याने या सहलीची खर्‍या अर्थाने सांगता झाली. मागच्या कान्हाच्या वर्णनात म्हटल्याप्रमाणे मला पुढच्या म्हणजे कैलास मानसरोवर ट्रीपचे वेध लागले होते. खरेतर याचे वेध मला कान्हाच्या ट्रीपपूर्वीच लागलेले होते, जेंव्हा "इन सर्च"ने कैलास मानसरोवर ट्रीपच्या तारखा जाहीर केल्या होत्या तेंव्हा. मी फक्त माझा पासपोर्ट यायची वाट बघत होतो. तसा तो आला. पैसे भरले आणि अंगात कैलासच्या ट्रीपचे वारे भरायला सुरूवात झाली.......





कॉर्बेट सहलीचे सदस्य : सृष्टी, साक्षी, नताशा, प्रद्युम्न (याला सी.आय.डी. या मालिकेतल्या नांवाच्या साम्यामुळे "ए.सी.पी" म्हणत), यश ( दया - पुन्हा सी.आय.डी.), प्रतिक, सुश्रूत, जयदीप, ईशान (याला "तारे जमिन पर" यावरून काही नाव का नाही पडले ते कळले नाही), अमेय, वेदांत, ऋतुपर्ण, संदेश, तन्मय, अद्वय आणि राजस अशी मुले उर्फ उत्साहाची कारंजी, तर शरद, माधव-मीरा असे रानडे आणि मी श्रीराम असे ज्येष्ठ नागरीक, शौरी हा आमचा सहल प्रमुख आणि केतकी ही त्याची सहकारी.

कॉर्बेट सहलीत पाहीलेले पक्षी आणि प्राणी (माणसे सोडून) : मला जी मराठी नावे मिळाली ती द्यायचा प्रयत्न केलाय.(आधार - भारतिय पक्षी, ले. डॉ. सलिम अली)

प्राणी : वाघ(Royal Bengal Tiger), बिबट्या, सांबर(Sambar Deer), ठिपक्याचे हरीण(Spotted Deer), घोरपड (Indian Monitar Lizard), हत्ती, मगर, माकडे( Indian Langoor), रानडुक्कर, Barking Deer, Hog Deer,नीलगाय(Blue Bull), Yello Throated Marten,

पक्षी : सर्पगरूड(Serpent Eagle), कापश्या घार(Gray Shouldered Kite), ससाणा(Shikara), उंदीरमार(Common Buzzard), निशाचर बगळा(Pond heron), काळा शराटी(Black Ibis), शेकाट्या(Stilt), नदी सुरय(River Turn), गरूड(Black Eagle), Changable Hawk eagle, पिवळ्या मानेचा हिमालयन कस्तुर(Yellow Throated laughing Thrush), राखी वटवट्या(Gray Hooded Gray Hooded Wrabbler), Tits, Ravens, नीलिमा(Verditer Flycatcher), राखी मस्तकी नर्तक(Gray Hooded canary Flycatcher), अतिनील नर्तक(Ultra Marine Flycatcher), स्वर्गिय नर्तक(Paradise Flycatcher), Rufus Bellied Niltava, रक्तशिंजीर(Crimson Sunbird), ठिपक्याचे कबुतर(Spotted Dove), गळ्यात पट्टा असलेले कबुतर(Eusasion Ringed Pigeon), पाणकावळा किंवा करढोक(Cormorant), गिधाड(White Rumped Vulture), विष्फुल्लिंग(Minivets), करडा तांबट(Brown Headed Barbet), राखी मस्तकाचा वेडा राघू(Chestnut Headed Bee eater), खंड्या(Kingfisher), बंड्या(White Throated King Fisher), हळद्या(Golden Oriole), कालशीर्ष हळद्या(Black Hooded Golden Oriole), Treepie, Grey Wagtail शुभ्र शीर्ष कस्तुर(White Crested Laughing Thrush), Rhesus Macaque, कालकुष्ठ किंवा पिवळ्या पाठीचा सुतार(Lesser Yellow Naped Woodpecker), रक्तशीर्ष राघू(Crimson Headed Parakeet), दुर्लाव(Quails), तांबडा रानकोंबडा(Red Jungle Fowl), राखी रानकोंबडा(Grey Jungle Fowl), फुलपाखरे(Common Mormons).



॥ तथास्तु ॥



"........ समोर २०० मी. चा उभा कडा दिसत होता. एक पाऊल जेमतेम राहिल अश्या पायर्‍या. एका बाजूला खोल दरी. एके ठिकाणी तर कठीण वळण. शेवटच्या टप्प्यावर आधारासाठी लोखंडी दांडकी बसवलेली होती. त्या बारक्या पायर्‍यांवरून वरून खाली माणसे उतरताना मुंग्यांसारखी दिसत होती. तिथे जायचे आहे. माझ्या मनात धडकी भरली. पण वर कसे जायचे या विचाराने नव्हे, तर परत उतरायचे कसे या विचाराने........."

हे कसले वर्णन आहे? कुठे गेला होतात? कधी गेला होतात? थांबा! थांबा!! थांबा!!! असे अधिर नका होऊ. सांगतो काय आहे ते. पण कशाला? सगळे व्यवस्थित वाचा ना! मानसरोवर डायरीमधे. पण थांबावे लागेल. सप्टेंबर २०१० पर्यंत.................













..................श्रीराम पेंडसे

1 टिप्पणी:

  1. "हे कसले वर्णन आहे? कुठे गेला होतात? कधी गेला होतात? थांबा! थांबा!! थांबा!!! असे अधिर नका होऊ. सांगतो काय आहे ते. पण कशाला? सगळे व्यवस्थित वाचा ना! मानसरोवर डायरीमधे. पण थांबावे लागेल. सप्टेंबर २०१० पर्यंत................."

    तुमच्या पुढील ब्लॉगची वाट पाहत आहोत.

    उत्तर द्याहटवा