रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

भास्करायन

दिनकराच्या सोनपावली सकाळ हासत आली

धरतीवरच्या जीवसृष्टीला आनंदून गेली ॥१॥



रविकिरणांच्या सोनपंखांनी पूर्व दिशा उजळली

त्या किरणांच्या मृदूस्पर्शाने काळोखी वितळली ॥२॥



काळोखी ही वितळत वितळत सवेची घेऊन जाई

पूर्वरातीच्या विद्ध सयींना सामावून घेई ॥३॥



रक्तवर्णी त्या सूर्यबिंबाचे रूप दिसे साजिरे

जणु उषःप्रभेच्या गालावरती रक्तिमाच पसरे ॥४॥



त्या किरणाच्या मदस्पर्शाने जाई जुई उमलती

मंद मंद शीतल सुगंध तो दशदिशा खुलवती ॥५॥



सूर्याची ती कोमल किरणे तरूशिखरे उजळी

रवीकिरणांच्या कोमल स्पर्शी खुलते कळी कळी ॥६॥



धरतीवरती सुवर्णरेखा रमलपटची मांडती

त्या पट चौकट कपट्यांमध्ये रहस्येही लपती ॥७॥



भास्कर असाच वरती चढता पारा त्याचा चढे

काय करावे, कसे लपावे प्रश्न चराचरापुढे ॥८॥



लता, पर्ण, सुमने खगजन ते कोमेजून जाती

मनुजन आणि इतर जीव ते तरूछाया शोधती ॥९॥



आणि अश्या या कठीण समयी मेघ गवाक्षातुनी

जलदेवी ती प्रकट होतसे दुरवस्था पाहूनी ॥१०॥



पर्जन्याचा शीत स्पर्श जणू सृष्टीला सुखवे

पुष्पजीवांच्या तनुवरती तो शहाराच फुलवे ॥११॥



दिनमणी हळू हळू परती जाता दिसेची नारंगी

मावळतीचे कपोल होती मनोहर रंगबिरंगी ॥१२॥



उषःप्रभेचे गाल पाहूनी मावळतीपण रूसली

प्रिय रमणावर नाराजीने फुगून ती बसली ॥१३॥



मावळतीचा मोहक रूसवा रमणाने काढला

दुसर्‍या दिनीच्या सहवासाचे वचन दिले तिजला ॥१४॥



रवीदिनकर तो मावळतीला संगे घेऊनी गेला

लपून बसल्या निशाचराचा काळोखही थिजला ॥१५॥



काळोखाच्या उदरामध्ये उषःप्रभा लपतसे

आतुरतेने रवीकिरणांची आस मनी धरतसे ॥१६॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा