शनिवार, २६ डिसेंबर, २००९

निर्झरी

निर्झरी

संध्याकाळचे साडे पांच वाजत आले होते. मुंबई सेंट्रलच्या फलाटावर मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. अस्वस्थतेचे कारण? मी दोघींची वाट पाहत होतो. आता कुणाचीतरी वाट बघण्याचे माझे वय कधीच संपले होते हा भाग निराळा. पण तरीही मी, त्या दोघीही येत नव्हत्या म्हणून अस्वस्थ होतो. वाट बघायच्या वयातही मी कोणाची वाट बघीतल्याचे आठवत नाही. आणि आता माझी वाट बघणारी, कधीच "वाट पाहून पाहून दमले" म्हणत आपल्या निर्मात्याकडे निघून गेली. मग मी आता कोणाची वाट पहात होतो? थांबा. असे चमकून पाहू नका. किंवा काय हिरवट म्हातारा दिसतोय राव, अश्या चमत्कारिक नजरेनेही नका बघू! मी वाट पहात होतो त्यातली एक म्हणजे, जयपूर एक्सप्रेस!!! गाडी फलाटाला लागायची वाट बघत होतो. पांच पन्नासला गाडी सुटणार होती, आणि अजून गाडीचा पत्ता नव्हता. गाडी येणार कधी? आपण डबा शोधणार कसा? उगाचच माझे बी.पी. वाढायला लागले होते. अखेरीस गाडी आली. डबा शोधला. बसलो. आता दुसरीची वाट बघत होतो. कोण ही दुसरी? एक पंचविशीतली तरूणी!! अल्लड? अवखळ? आवाजावरून तरी तसे वाटायचे. पण प्रत्यक्ष काय ते माहीत तव्हते. लवकरच कळणार होते. माझी उत्सुकता ताणली गेली होती. ही तरूणी म्हणजे माझी मानलेली नात अद्विका. अद्विका चेतन. ही मला आज भेटायला येणार होती. वेळ दहा, फारतर पंधरा मिनीटेच उरलेला! आता ही बाई कधी येणार? बोलणार कधी? का नुसता माझा चेहेरा पहायला येणार होती कोण जाणे! बरे मी काही गाजलेले व्यक्तीमत्व नव्हतो, की आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीने, विशेषतः मुलीने मला भेटायला धडपडत यावे! मला काही कळत नव्हते. फक्त इतकेच कळत होते की ज्या अर्थी ही महान मुलगी इतकी तडतड करत भेटायला येतीये म्हणजे जगाच्या दृष्टीने नसलो तरी कोणाच्यातरी दृष्टीने विशेषतः तिच्या दृष्टीने आपण काहीतरी आहोत. कदाचित विशेष आहोत. पण तरीही माझे वाढलेले बी.पी. काही कमी होत नव्हते. अद्विका उर्फ योगिता उर्फ योगी ही माझी मुंबईतली मुलुंडला राहणारी नात. नातं पूर्णतया मानलेलं. पण ते नातं रक्ताचं असावं अश्या ओढीने ही मुलगी मला, भांडुपहून संध्याकाळची मुंबईची तुफान गर्दी कापत कापत भेटायला येत होती. रक्ताच्या नात्यातही ही ओढ आजच्या दिवसात अभावानेच पहायला मिळते. ही मुलगी इतकी धडपड करून येत आहे - केवळ काही दिवसांच्याओळखीवर - याचंच खरंतर मला कौतुक होते. अप्रूप होतं. कोणत्या अनामिक आपुलकीपोटी ही पोर भेटायला आली? कोणता ऋणानुबंध आहे हा? की गेल्या जन्मीचा हा बंध आहे? मी बराच विचार करतो. किती जण विशेषतः मुली केवळ काही दिवसांच्या ओळखीवर भेटायला येतील? इतके कशाला? मी स्वतःला हाच प्रश्न विचारून पाहीला की मी स्वत: तिच्याजागी असतो तर असा गेलो असतो का? हा प्रश्न मी मला, माझ्या मनाला त्यानंतर कित्येकवेळा विचारला, अजूनही विचारतो आणि त्याचं उत्तर प्रामाणिकपणे सांगायचे, तर "नाही, नसतो गेलो" असेच येत राहिले. या अनामिक मायेच्या ओलाव्याचे रहस्य उलगडलेले नाहीये. तेंव्हाही उलगडले नव्हते आणि आजही उलगडलेले नाही. याची उत्तरे अजूनही मला सापडलेली नाहीयेत. एक तर मला असे कोणी भेटायला येऊ शकेल आणि ते ही एक मुलगी आणि ती पण काही दिवसांच्या ओळखीवर? हे माझ्या स्वप्नातही नव्हते. माझ्या तर्कसंगत बुद्धीला ते झेपत नव्हते. इतक्या लांबून. कामावरून लवकर निघून, आपल्याला कोणीतरी भेटायला येऊ शकतं यावर एकतर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या सततच्या नकारात्मक वृत्तीच्या मनाला ते पटत नव्हतं. पण तरीही ते सत्य होतं. ती जेंव्हा मला म्हणाली होती की, "आजोबा, मी तुम्हाला भेटायला येणार आहे." तेंव्हा मी ते फारसे मनावर घेतले नव्हते. पण खरंच तिचा आदल्या दिवशी फोन आला तेंव्हा मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. आयुष्यात मला असं कोणी भेटायला येण्याच्या वेळा फार थोड्या आल्या. मी कोणालातरी भेटायला जाण्याचे योगच अधिक आले. मला भेटायला लोक कधी आले? आई, वडिल आणि आता सौ. गेल्यावर. त्यामुळे " मी स्टेशनवर भेटायला येते" असे तिने म्हटल्यावर माझ्या मनात अपार उत्सुकता, आनंद दाटून आला होता. इतके दिवस तिच्याशी फोनवर बोलणारा मी, आता काय बोलू असा प्रश्नही मनात कुठेतरी अस्वस्थ करत होता. फोनवर बोलणे निराळे हो! तिथे आपला चेहेरा दिसत नसतो. पण प्रत्यक्षात भेट झाल्यावर बोलणे निराळे. तिथे नेहमीच बोबडी वळते. नेहमी लंब्या चौड्या गप्पा मारणारा मी. पण प्रत्यक्ष भेट आणि तीही तुलनेने एका अनोळखी तरूण मुलीशी? काय बोलू मी? वयात असलेला खूप मोठा फरक आणि तरूण पिढीचे विषय! कसे जमणार? नाही म्हटले तरी थोडेसे टेन्शन आले होते. अखेर ती आली. गाडी सुटायला १० मिनिटे असताना ती आली. ती आली! तिने पाहिले!! तिने जिंकले!!!..... थांबा. परत असे या सुप्रसिद्ध उद्गारांनी दचकू नका. ती माझी नात आहे हे लक्षात ठेवा. अहो मी वर म्हणालो ना? मला सॉलिड टेन्शन आले होते हो! त्यामुळे मी ती आल्यावरची प्रतिक्रिया दिली आहे बरे का!! अहो मुलींना भेटून सैर भैर होण्याचे माझे वय केंव्हाच सरले आहे!!! पण अद्विका आली तीच मुळी वार्‍याच्या, एखाद्या मंद, सुखावणार्‍या झुळुकीसारखी. भर उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्या असताना वाहू लागलेल्या थंड गार झुळूकीसारखी! सगळे टेन्शन पूर्णपणे कादून टाकणारी झुळूक होती ती. एखाद्या मुलीशी बोलताना येणारा अवघडपणा घालवून टाकणारी झुळूक. ही मुलगी जरी मुंबईची अशक्य गर्दी तुडवत आली असली तरी चेहेरा प्रसन्न आणि हसरा होता. इतक्या गर्दीतून धडपडत आल्याचा लवलेशही चेहेर्‍यावर नव्हता. आपण आपल्या सख्ख्या आजोबांशीच बोलत आहोत अशी वागण्यातली सहजता! तरीही तिच्या चेहेर्‍यावर आजोबांना बघण्याची उत्सुकता लपत नव्हती. सर्वच आजोबा-नातींचं सूत नेहमीच जमते असे नाही. पण काही नातींचे आजोबा लोक हे खूप आवडते असतात. लाडके असतात आणि जणू अश्याच आपल्या आवडत्या सख्ख्या आजोबांना भेटल्यावर होणारा आनंद अद्विकाच्या चेहेर्‍यावरून स्पष्ट ओसांडून वाहत होता. दहा मिनीटे इकडच्या तिकडच्या, हवापाण्याच्या गप्पा झाल्या. खरतर दहा मिनिटे हा काही गप्पा मारण्यासाठी पुरेसा वेळच नव्हे. दहा मिनिटात होते ती फक्त ओळख. कारण तितक्या वेळात आणखी काय बोलणार ना? पण तरीही, ती आवर्जून आल्याचे मला प्रचंड कौतुक होते. काय बोललो याला महत्त्व नव्हतेच. काही वेळा कितीही भडाभडा बोलले तरीही ते अपुरे पडते, आणि काही वेळा अतिशय कमी शब्दात किंवा काहीही न बोलता बरेच काही समजते. काही लोकांची ही खासियत असते की ही मंडळी डोळ्यांनी बोलतात. अगदी पटकन सांगता येईल असे उदाहरण म्हणजे माझ्या पिढीतला महान कलावंत - राज कपूर. तो मनुष्य डोळ्यांनी बोलायचा. या मुलीला बोलायची जबर आवड आहे, त्याचप्रमाणे हिची ही पण एक खासियत आहे की हिचा चेहेरा बोलका आहे आणि तितकेच तिचे डोळेही प्रचंड बोलके आहेत. तिची बडबड चालू असली तरीही ती डोळ्यानी खूप बोलते. वेगळं बोलते. म्हणून म्हणालो की काय बोललो याला महत्त्व नव्हतेच. ती आवर्जून आली याचाच मला जबर आनंद झाला होता. गाडी सुटण्याची घंटा झाली. डब्यातून तिच्या बरोबर खाली उतरलो. आणि निघताना तिने मला भर प्लॅटफॉर्मवर अगदी वाकून नमस्कार केला. मी इकडे तिकडे चमकून बघितलं की कोणी पाहत नाहिये ना? कारण "हाय, फाईन, थँक यू" या युगात हरवत चाललेल्या सुसंस्काराचे दर्शन होते. लोकांना न पटणारे!! चेष्टेला आमंत्रण देणारी कृती होती ती. पण खरंतर तिच्यावरच्या संस्कारांचे हे दर्शन, सुखद होते. तर ही अशी, अद्विका या अतिशय लोभसवाण्या, सालस, सरळ स्वभावाच्या पण तरीही अत्यंत मनस्वी मुलीशी माझी झालेली ही पहिली प्रत्यक्ष आमने सामने भेट. तसे ही प्रत्यक्ष भेट होण्याआधी मी तिच्याशी भरपूर गपा मारल्या होत्या आणि अजूनही गप्पा मारतो. अगदी मनापासून गप्पा मारतो. बोलघेवडेपणा हा तिचा आवडता छंद. निदान मला तरी असे वाटले. आणि मला हिच्याशी आता मी काय बोलू असा प्रश्न कधीच पडला नाही. त्यातून हे अजब रसायन उलगडत गेलं. पण याची सुरूवात कशी झाली?......

...... या भन्नाट मैत्रीची सुरूवात अशी झाली. तर ऒर्कुटवर मी मागे, कुणाचे नविन स्क्रॅप आले आहेत का हे बघत होतो. महिना एप्रील असावा. सौ. जाउन सात आठ महिनेच झाले होते. मन अतिशय अस्वस्थ असायचे. मग अशावेळी मी ऑर्कुटवर वेळ घालवत असे. कोणी बोलायला असले की मग मला विसरायला होत असे. त्यावेळी मला "अद्विका चेतन" नावाच्या व्यक्तिने माझी प्रोफ़ाईल वाचलेली दिसली. नांव थोडेसे वेगळे होते. Uncommon होते. म्हणून कुतुहलाने तिची प्रोफाईल वाचली. आणि मैत्रीची विनंती केली. मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे वयातल्या खूप मोठ्या फरकामुळे विनंती मान्य होईल की नाही ते ठाउक नव्हते. पण तिने ती विनंती मान्य केली. आणि तिने जो पहीला मला स्क्रॅप पाठवला, त्यातून तिच्या मोठ्यांचा आदर ठेवण्याच्या संस्कारीत मनाचे पहीले दर्शन घडले. तिने लिहीले होते. " सर्वप्रथम तुम्हाला माझा आदरपूर्वक नमस्कार." मी तिला विनंती केली होती की मल काका नको म्हणू. त्यावर तिचे उत्तर, " ठीक आहे. मग मी तुम्हाला आजोबा म्हणते. कारण मी कोणाला आजोबा अशी हाक मारायला कोणीच नाहीये." आणि मग इथून या आजोबा नातीच्या, सख्ख्या नसलेल्या पण सख्ख्या वाटाव्या अश्या नात्याची वीण घट्ट होत गेली, त्यातून एक मनोरम, आनंददायी चित्र तयार व्हायला लागले. स्क्रॅपच्या माध्यमातून आणि नंतर मेलच्या मधून बोलत होतो. ऑन लाईन ही बोलत होतो. मग मी तिला फोनवर बोलशील का? अशी विनंती केली. ती विनंतीही तिने मान्य केली. आम्ही फोनवर बोलू लागलो. बोलता बोलता कळले की "चेतन" हे तिचे "अहो' आहेत. आणि मग तिच्याशी गप्पा मारताना अद्विका हे व्यक्तीमत्व हळू हळू साकार व्हायला लागले. आणि ही मुलगी अफाट आहे याचे प्रत्यंतर मला लगेच ती प्रत्यक्ष भेटायला येणार आहे असे म्हणाली तेंव्हा आले. ते कसे याचा किस्सा वर आला आहेच.

अद्विका तरूण पिढीची प्रतिनिधी आहे. तरीही ही मुलगी आधुनिकता आणि पारंपारीक संस्कार यांचे अनोखे पण आल्हाददायी मिश्रण आहे. ती एकत्र कुटुंबात राहते. अगदी मिळून मिसळून. हे ही हल्ली त्या मानाने कमी दिसणारे दृष्य आहे. घरी सासरे, सासू आणि दोन नणंदा आहेत. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचे वागणे नाही पटले तरी पण ही मुलगी सर्वांशी अगदी मिळून मिसळून आहे. छोट्या छोट्या कुरबुरी प्रयेक घरात असतातच. माझ्या मते जगात असे Ideal सुखी कुटुंब नाही, की ज्या घरात सून आणि मुलगी असताना सून कोण आणि मुलगी कोण असा प्रश्न पडावा! जे कोणी असे म्हणत असतील की "आम्ही खूप सुखी आहोत." त्यापैकी जवळ जवळ सर्व जण खोटेच बोलत असतात असे मी मानतो. प्रत्येक कुटुंबात मतभेद हे असतात. छोट्या मोठ्या कुरबुरी असतातच. पण त्या कुरबुरी, छोटे मोठे वाद झेलायला, त्या कुरबुरींच्या काट्यांचे सुखद फुलात रूपांतर करायला धैर्य लागते, तशी मानसिकता लागते, क्षमता लागते, आणि जबर इच्छाशक्ती लागते. आणि हे सर्व तिच्याकडे आहे असे मला तिच्याशी बोलताना, तिला प्रत्यक्ष भेटल्यावर वाटले. मी अद्विकाच्या या सुखी कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून आलोय. मी त्यांचा मनमिळावू पाहुणचार अनुभवून आलोय. त्यांच्या घरातले आनंदी वातावरण पाहून आलोय. ती घरातली सून वाटण्यापेक्षा मुलगीच वाटते. या कुटुंबाला भेटल्यावरच मी हे बोलतोय. या मनस्वी मुलीची दोन लक्षात येणारी वैशिष्ट्ये आहेत. तिची ती बलस्थाने आहेत. बलस्थाने म्हणजे मला असे म्हणायचे आहे की या दोन गोष्टी म्हणजे तिची Identity आहे. ओळख आहे, एक म्हणजे रानावनातून खडकातून खळखळत वाहणार्‍या निर्झरासारखे खळखळून हसणे, आणि दुसरे म्हणजे गप्पांचे प्रचंड वेड. बरे गप्पा म्हणजे फालतू बडबड नव्हे बरे का! एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवण्याची, आपलेसे करून घेण्याची क्षमता तिच्या गप्पात आहे. एखादा एरंडेल प्यायल्यासारखा चेहेरा बदलण्याची खात्री तिच्या या हास्य-धबधब्यात आहे. तुमच्या मनावरचे मळभ काढून टाकण्याची ताकद तिच्या व्यक्तिमत्वात, तिच्या नुसत्या उपस्थितीत आहे. याचं प्रत्यंतर मला नेहमीच तिच्याशी गप्पा मारताना येतं. तिच्या उपस्थितीत दु:खाला नेहमीच No Entry असते. मग ती अशी अचानक भेट असो, किंवा फोनवरची गप्पांची मैफल असो. तिचे आणखी एक वेड म्हणजे हिंदी सिनेमे. या मुलीला सिनेमाचे प्रचंड वेड आहे. आधुनिक हिंदी सिनेमांचा हा जणू चालता बोलता ज्ञानकोषच आहे. मला स्वतःला हिंदी सिनेमांचे बिलकूल वेड नाही. मी फारसे सिनेमे बघतही नाही. पण तिच्याकडचा सिनेमाच्या बाबतीतला माहितीचा साठा पाहून मी चकित झालो. ही मुलगी मनस्वी आहे असे मी म्हणालो होतो. मनस्वी म्हणजे मला नक्की काय म्हणायचे आहे? सर्व मनस्वी माणसे थोडी हट्टी असतात. पण सर्व हट्टी माणसे मनस्वी नसतात. मनस्वी म्हणजे ही मुलगी स्वतःच्या मतांबद्दल आग्रही आहे. तिची मते ठाम असतात. कोणत्याही गोष्टीत. जे स्वतःला पटत नाही ते ती नाही स्विकारणार. एखादी गोष्ट तिला नसेल पटत तर ती तोंडावर सांगेल. पण तेही समोरच्या व्यक्तीचा योग्य तो आदर ठेवूनच. पण तरीही समोरच्या व्यक्तीने पटवून देईपर्यंत ती आपल्याच मतावर ठाम राहील. माझ्या मते याला हट्टीपणा नाही म्हणत. माझ्या मते हट्टीपणा म्हणजे समोरच्याचे मत ऐकून न घेणे, त्याला त्याचे मत सिद्ध करण्याची संधी न देणे. ती तसे नाही करणार. ती म्हणेल की तुमचे म्हणणे पट्वून द्या. पण पटले नाही मात्र साफ साफ सांगून टाकेल. मग तिथे कोण आहे हे ती नाही पाहणार. पण तरीही ती समोरच्याचा योग्य तो मानच ठेवेल. याला मी मनस्वी व्यक्तीमत्व म्हणतो. आपल्या आयुष्यात दु:खे नेहमीच येतात. दु:खे कोणाला चुकलेली नाहीत. आणि त्या दु:खाची तीव्रता, झळ त्या आपल्यालाच कळते. कारण आपल्याला ते भोगावे लागते. आपण त्यातून गेलेलो असतो. आपल्या दु:खात आपण दुसर्‍याकडे मदतीची हाक देतो तेंव्हा आपण हे विसरतो की तो पण अश्याच प्रसंगातून गेला असू शकेल. पण या ग्रेट मुलीचे वैशिष्ट्य असे की ही एखाद्याच्या मदतीला आपलाच प्रॉब्लेम आहे असे समजून जाईल. आणि यथाशक्ति मदत करेल. आपल्या काही कटकटी आपल्यालाच सोडवाव्या लागतात. पण अशावेळी एखादी व्यक्ती नुसती मदतीला धावून आली तरी ते पुरेसे होते. मला हे एकदा तिच्याबाबतीत जाणवले. असाच मी कधीतरी प्रचंड अस्वस्थ होतो. कारण नेहमीप्रमाणे सौ. च्या आठवणी!! मी तिला हे त्यादिवशी सांगितले की "मी आज खूप अस्वस्थ आहे." ती पटकन विचारही न करता म्हणाली, "मी येऊ का?" नाहीतर काय होते? "हं ठीक आहे. मी पहातो कसे जमतय ते!!!" किंवा " बघू. आज जमणार नाही. चार दिवसांनी चालेल का?" तो पर्यंत आपली गरज संपलेली असते. अद्विकाला असे पटकन येणे शक्य नाहीये हे मलाही माहीत होते. पण नुसते ती म्हणाली हेच मला तेंव्हातरी पुरेसे होते. अर्थात यात तिची, एकदा एखाद्याला आपले मानल्यानंतर त्याच्या दु:खात सहभागी होण्याची वृत्तीच दर्शवते नाही का?

.........त्यानंतर अद्विकाने मला दुसरा धका दिला तो पुढच्याच महीन्यात म्हणजे जुलै २००९ मधे, माझ्या वाढदिवसाच्यादिवशी. वाढदिवस हा काही साजरा करण्याचा विषय, निदान माझ्या दृष्टीने तरी, राहिलेला नाहीये. लक्षात ठेवून वाढदिवस साजरे होतात ते फक्त नेते मंडळींचे. आपल्यासारख्या सामान्यांचे नाहीत! आणि त्यातून परमेश्वराने माझ्या वाढदिवसाच्या दोनच दिवस आधी सौ. ला आपलेसे करून घेऊन वाढदिवस हा विषय या पुढे कायमचा संपवून टाकला आहे. वाढदिवसाचे कौतुक ज्या वयात असतं आणि वाढदिवस साजरे करण्याचं जेंव्हा माझं वय होतं, त्या वयात, वाढदिवसाच्या दिवशी पालकांना नमस्कार केल्यावर " आज का बरं? काय आहे आज?" अशी रूक्ष स्वरात विचारणा व्हायची. पूर्वी कसे ढिगभर मुले असायची. कुणाकुणाचे वाढदिवस लक्षात ठेवणार ना? पण आमच्या बाबतीत तसे नव्हते. आम्ही एकटेच होतो!! मग आम्हीच अवघडत सांगत असू की "आज माझा वाढदिवस आहे." " अस्सं? आज तुझा वाढदिवस आहे का? बरं ठीक आहे." पालक फारच खूष असले तर, "अरे वा . छान!!!" पण त्यानंतर फुलस्टॉप. अश्याच संवादांची सवय लागलेली. इतरांचे वाढदिवस आमच्या पालकांच्या लक्षात राहतात. आठवणीने पेढे, हार किंवा गुलाबाची फुले आणली जायची. आपल्याच वाढदिवसाचा काय प्रॉब्लेम आहे? हे कधीच न सुटलेले कोडे होते. आणि हेच त्यावेळी मनावर कोरले गेलेले होते की वाढदिवस हा आपल्यासाठी नाही. बरं फक्त माझ्याच बाबतीत हे होत होतं असं नाही. माझ्या बहिणींच्या बाबतीतही हाच प्रकार होत असे. आम्हाला हार तुरे नको होते. पेढेही नको होते. चार मायेच्या, प्रेमाच्या शब्दांनी काम भागले असते. पण नाही. ते कधिच झाले नाही. त्यामुळे हे आपल्यासाठी नाही हेच मनावर बिंबलेले. अर्थात मोठेपणी हे चित्र बदलले. पण तरीही आपले वाढदिवस हे महत्त्वाचे नाहीतच हेच मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, दगडी पायर्‍यांवरून घसरू नये म्हणून टाकीचे घाव घालून खड्डॅ पाडलेले असतात ना तश्या पर्मनंट खड्ड्यांसारखे, घट्ट रूतुन बसलेले होते. आमच्या लहानपणी आम्ही महत्त्वाचे नव्हतो. आमच्या मोठेपणी आता आपले कौतुक बास असे मनावर ठसले होते. मला इथे व. पु. काळे यांचे एक वाक्य आठवले. जे माझ्या पक्के लक्षात राहिले आहे. " लहानपणी आम्ही आमच्या आई वडिलांच्या गाद्या काढत होतो. आता आम्ही आमच्या मुलांच्या गाद्या काढतो." आणि अश्या मानसिक नकारात्मक पार्श्वभूमीवर ही मुलगी केवळ मला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला मुंबईहून आली? हा जिव्हाळा माझ्या बुद्धीबाहेरचा होता. धक्का मला आवाक करणारा होता,आनंददायी होता, सुखाचा होता, तरीही मला न पेलणारा होता. मला त्या दिवशी झालेला आनंद, मला तरी शब्दात न मांडता येणारा आहे. वर्णन करण्यापलिकडचा आहे. मला वाटते की बहुतेक माझा तो आयुष्यातला सर्वात आनंदी वाढदिवसाचा दिवस असावा. सौ.च्या अकाली मृत्यूचे कायमचे मळभ वाढदिवसावर असूनही तो दिवस मला आनंदाचा गेला. समाधानाचा गेला. त्या दिवशी अद्विका, तिचे "अहो" आणि तिचे तिला वडिलांप्रमाणे असलेले त्यांचे कौटुंबिक मित्र असे तिघे जण आले होते. मला तर त्या दिवशीही धड बोलायला सुचत नव्हते. मला माझ्या भावना आवरणं अवघड जात होतं. खूप धडपड करावी लागत होती. मला कसंबसं जमलं ते. हे सर्व तिला कळलं होतं. मी ते चेहेर्‍यावर न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तरीही त्या चतुर मुलीच्या हे लक्षात आलं होतं. त्यादिवशी तिने आजोबांच्या या मनस्थितीवर अतिशय सहजतेने पांघरूण घातलं. आजोबांची विचीत्र मनोअवस्था आपल्याला समजली आहे हे तिने तेंव्हा जाणवू दिलं नव्हतं. आपण आपल्या सख्ख्या आजोबांबरोबर आहोत, या कुटुंबातलेच एक आहोत अश्या सहजतेने ती वावरली होती. पण नंतर कधीतरी विषय निघाला असताना तिने, माझी मनस्थिती माझ्या डोळ्यात दिसली होती हे बोलून दाखवलं होतं. पण त्यादिवशी तिच्या चेहेर्‍यावर समाधान होते. आजोबांना भेटून शुभेच्छा दिल्याचा आनंद चेहेर्‍यावरून ओसांडून जात होता. आणि म्हणून हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील. हा दिवस असा संस्मरणिय झाला, अतिशय आनंदी गेला! कसं सांगू? शब्द सुचत नाहीयेत. याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे अद्विका ऊर्फ योगिता उर्फ योगी या माझ्या महान नातीलाच द्यावे लागेल. आणि हे श्रेय मी जर तिला नाही दिले, तर हा तिच्यावर नुसताच अन्याय नाही, तर तिचा स्वतःचा, तिच्या सुंदर, निरागस भावनांचा, तिच्या माझ्यावरच्या निर्मळ मायेचा हा अपमानच ठरेल......

.....त्यानंतर मी या माझ्या लाडक्या नातीला दोन तीन वेळा भेटलेलो आहे. त्यात मला आणखी एक गोष्ट कळली म्हणजे ही मुलगी रागावते पण. तिला रागही येतो. तसा सगळ्यानाच येतो हो!!! पण तिला राग येतो हे मला कळण्याचे काहीच कारण नव्हते. कारण अद्विका माझ्यावर कधीच रागवली नाहीये अणि ती दुसर्‍यावरही चिडलेले मी पाहीले नाहीये. त्यामुळे हा तिच्या स्वभावाचा पैलू तिने मला सांगितल्यावर कळला. गपा मारतान मी तिला विचारले होते की,

"तू कधी रागवली आहेस का?"

" हो, आजोबा. चिक्कारवेळा. मला राग आवरला नाही की मी लहानपणी वस्तू फेकायची. अगदी लहान असताना मी जेवणाचे ताट पण फेकले आहे. पण आता मी रागावली ना की सांगते कि गप्प बसा सगळे जण. मला शांत बसू द्या जरा. असे मी म्हणते आणि डोळे मिटून बसून राहते."

ही गेल्या महीन्यातली भेट नेहमीचे जिवलग भेटावे अशी सहज होती. त्यात सहजता होती. त्यावेळी तिची अजून एक मैत्रीण भेटली. सुनीता तिचे नाव. या मुलीने मला आधीच मित्र केले होते. भेटण्याचा योग हा नंतर आला. अद्विकाप्रमणे ही पण मला आजोबा म्हणते. अद्विकाप्रमाणे हिच्याशीपण मी भरपूर गप्पा मारल्या आहेत. अतिशय सुस्वभावी आणि मन मिळावू मुलगी आहे ही. अद्विकाची मैत्रिण शोभावी अशी. त्या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी आहेत. मागे एक हिंदी सिनेमा आला होता. "सीता और गीता". या दोघींच्या प्रवृत्तीही त्या सिनेमातल्या व्यक्तीमत्वासारख्या होत्या असे मला उगाचच वाटून गेले. या दोघींना गेल्या महिन्यात भेटण्याचा योग आला. त्यात पहिल्या भेटीचे टेन्शन नव्हते. मला मुंबई सेंट्रल स्टेशनवर आलेल्या अवघडलेपणाचा आता लवलेशही नव्हता. बोबडी वळण्याचा प्रश्न नव्हता. अद्विकाच्या वागण्यातली ती सहजता, मोकळेपणा, पहिल्या दिवशीची आपुलकी जशीच्या तशी टिकून होती. ती आजोबांबद्दल वाटणारी माया, ते प्रेम, जिव्हाळा कायम होता. गप्पांना विषयाची कमतरता नव्हती. मी त्यांच्या घरी भोजनाचा पाहूणचारही घेऊन आलोय. तिच्या "अहों"शी पण गप्पा मारून आलोय. हे दोघेही "मेड फॉर इच अदर" आहेत. तिचे "अहो" हे पण तिच्या इतके बोलघेवडे नसले तरी पण बोलके आहेत, अतिशय सुस्वभावी आहेत. त्यांच्याशी गप्पा मारणे हा ही एक निखळ आनंद आहे. मनमिळावू आहेत. फक्त फरक इतकाच आहे की तिच्या मानाने ते अबोल आहेत. म्हणजे त्यांना बोलायला नकोय का? तर मला तसे नाही वाटत! बोलायला हवंय. गप्पाही ते मारतील. पण या लेखाच्या नायिकेसारखा हास्य आणि गप्पांचा धबधबा नसेल तो. अगदी मितभाषी! अर्थात तिच्या उपस्थितीत फार थोड्याना गप्पांचा चान्स मिळतो. पण माझ्यासारख्यांना तसे चालतेही. कारण ती बोलत असताना मलाच काय पण कोणालाही कधीच कंटाळा येत नाही. कुणाच्या घरी अगदी पहिल्यांदा गेल्यावर मला नेहमीच अवघडल्या सारखे होते. पण त्यादिवशी मात्र असे बिलकूल झाले नाही हेच तिच्या सुस्वभावी, मनमिळावू, व्यक्तीमत्वाचे खूप मोठे यश आहे असे मला वाटते. आणि या अश्या निरागस आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाने, अतिशय सुस्वभावी मुलीने मला आजोबा मानले, एखादी सख्खी नात काय करेल अशी मनापासून माझ्यावर माया केली, निखळ, निर्मळ आणि निर्व्याज प्रेम केले, हे मी माझे भाग्यच समजतो. माझ्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षण मी माझ्या मनाच्या खोल कप्प्यात, जसे लहान मूल त्याला दिलेली कॅडबरी झोपतानासुद्धा आपल्या मुठीत घेऊन झोपते, तसे अगदी जिवापाड जपून ठेवीन. अत्तर उडाले तरी जसा अत्तराचा वास कमी होत नाही, तसा या क्षणांचा सोनचाफ्याच्या सुगंधासारखा मन सुखावणारा, मनाला दिलासा देणारा परीणाम कधीही कमी होणार नाही. तरी या अश्या माझ्या अफाट नातीला उदंड सुखी आयुष्य लाभो, तिच्या आनंदाचा, हास्याचा धबधबा कधीच न आटो, तिच्या आयुष्याचे आनंदवन होवो, आणि तिच्या या निरागस आणि आनंदी व्यक्तीमत्वाने तिच्या सहवासात आलेल्यांच्या मनात आणि तिच्या आनंदमयी कुटुंबात सतत सुख व समाधानाची कारंजी फुलत राहोत, तिच्या आयुष्याची सतार कायम जुळलेल्या सुरात झंकारत राहो, अशी मी या जगाचे नियंत्रण करणार्‍या शक्तीकडे मना पासून प्रार्थना करतो. पु. ल. म्हणतात तसे, "केवळ वयाची वडिलकी यापलिकडे हातात काहीही नाहीये. तेंव्हा फक्त आशीर्वाद द्यायचा की मोठी हो, यशस्वी हो, मुली औक्षवंत हो "



............श्रीराम पेंडसे

३ टिप्पण्या:

  1. khupach aavdla lekh, advika ya navatach advait aahe, tichya svabhavala nav hi ekdam perfect match aahe, aaani tiche aajoba hi tevdhech mahan aahet, karan konala aapla mhanayla barach moth man lagt....chan ashich nati hi manala taj thevtat, aani janmojanmichya olkhinchi janiv manala karun detat.....good.

    उत्तर द्याहटवा
  2. सोशल नेटवर्किंग साईटच्या नावाने विनाकारण ओरडणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन आहेच त्याशिवाय नात्यांच्या सुरेख विणेवर प्रकाश टाकणारेही आहे. जोडलेली नाती ही जास्त पक्की होतात, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यावर आपण शिक्कामोर्तब केलेत.

    उत्तर द्याहटवा
  3. Aajoba, Nati hi navapramane astat, mahanje bagha na NATI hi nastatch muli 'Na'-'Ti'. Jevha he gudh ukalale jate tevha nati japnyacha prayas karava lagat nahi, ti aapsukach japali jatat.Barobar na o aajoba???

    उत्तर द्याहटवा