रविवार, २० सप्टेंबर, २००९

गणेशोत्सव - २०२०

ऑगस्ट २०२०...........


............... सकाळचे १० वाजले होते. गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होउन तिसरा दिवस उजाडला होता. म्हणजे प्रतिपदा आली होती. पण लोकांची नाचायची हौस भागली नव्हती. बघ्यांच्या चेहेर्‍यावर उपहासपूर्ण हसू दिसायला लागले होते. मिरवणूक चालूच होती. पुढच्या वर्षी लवकर या यापेक्षा हे दहा दिवस कधी संपतात असे बर्‍याच जणाना झाले होते. जणू काही पुढच्या वर्षी नका लवकर येऊ हीच भावना होती. मी विसर्जन घाटावर फेरफटका मारला. नदीला जबर पाणी टंचाईमुळे पाणी नव्हते. त्यामुळे पूर्णपणे विसर्जित न झालेल्या मूर्तींचे केविलवाणे अवशेष सर्वत्र दिसत होते. तसेच एक पुलावर तर आणखी भयानक परिस्थिती होती. लोक घाइघाईत येत होते. वास्तवीक खाली घाटावर जायला व्यवस्थित मार्ग होता. पण लोक पुलावर गाड्या थांबवत होते. आणि खाली जाण्याचेही कष्ट न घेता वरून खाली मूर्ती फेकत होते. तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस लोकांना खाली जायची विनंती करत होते. पण त्यांचे फार थोडे जणच ऐकत होते. नंतर नंतर तर पोलिसांनी सुद्धा सांगणे सोडून दिले.


आणि गेल्या दहा दिवसात तर बघायला नको. कानाचे पडदे फाटतील अश्या आवाजाच्या स्पीकर्सच्या भिंती. तेच ते आवाजाच्या तालावर धावणारे दिवे, की ज्यांच्या हालचाली आणि ते गाणे याचा संबंध नाही. गाणे जलद लयीत असले की कि ते कोणत्याही दिव्यांच्या पळापळीशी जमतेच!!! ढोल लेझीमची पथके इतिहासजमा झाली होती. प्रत्येक गणेश मंडळाला प्रायोजक आले होते. त्यामुळे काय कार्यक्रम कारायचा हे ते प्रायोजक ठरवत. मंडळांची संख्या हजारावर जाउन पोहोचली होती. त्यामुळे रस्त्यातून जाताना कोणता आवाज कोणत्या मंडळाचा हे ओळ्खणे अवघड होत होते. अर्थात याचा एक फायदा झाला म्हणा. दिवसा रस्त्यात चिटपाखरूही नसायचे. एका मित्राकडे संध्याकाळी आरतीला बोलावले होते. गेलो. घरात कुठे आरास वगरे दिसेना. हळू हळू लोक जमा होत होते. आरतीची वेळ झाली. पण गणपतीची मूर्ती, आरास कुठेच दिसेना. मला हा काय प्रकार आहे ते कळेना. यजमान आले. त्यानी एक स्विच "ऑन" केला. आणि समोरील भिंतीवरचा एल. सी.डी. पडदा उजळून निघाला. त्यावर गणपतीची सुबक मूर्ती, त्याला केलेली आरास वगैरे दिसत होती. कुतुहलाने मी विचारले असता मित्र म्हणाला की "काय करणार? मूर्तीच्या किमती कमीतकमी १५००च्या पुढे आहेत. आणि मूर्ती आणली तरी इथे आरास करायला, सजवायला वेळ कुणाला आहे? पूजेला गुरूजी मिळत नाहीत. मग संगणकावर पूजेसकट सर्व प्रोग्रामीग केले. आणि त्याला सर्व आरतीच्या वेळा देऊन ठेवल्या आहेत. ती वेळ झाळी की संगणक पूजा करतो, आरती करतो, मंत्रपुष्प वाहतो. आपण फक्त नैवेद्य या मोठ्या पडद्यासमोर आणून ठेवायचा. आणि हात जोडून फक्त उभे राहयचे.सर्व सगळं आपोआप होते. तिथून बाहेर पडता पडता मी मित्राला विचारले की, "गणपतीच्या आशीर्वादाचेही प्रोग्रामीग केले आहे का? म्हणजे आपण काय मागू त्यानुसार आशीर्वाद मिळतो का?" नंतर बरेच दिवस तो मित्र माझ्याशी बोलत नव्हता.................

ऑगस्ट २००९.............


...............गणपती ही विद्येची देवता आहे. लोकमान्यानी गणेशोत्सव सुरु केला तेंव्हा त्याकाळची सामाजीक स्थिती ही वाईट होती. वाईट म्हणजे इंग्रजी अंमल होता. आणि लोकानी एकत्र यावे, आपल्या संस्कृतीबद्दल जनजागृती व्हावी, एकात्म भावना वाढावी असा उद्देश होता. इंग्रजी सत्तेविरुद्ध चळवळ करायची असेल, सत्ता उलथून टाकायची असेल तर जनतेने एकत्र येणे गरजेचे होते. म्हणून लोकांसाठी लोकमान्यानी हा उत्सव सुरू करण्यात पुढाकार घेतला. दर्जेदार समाजप्रबोधनपर चर्चासत्रे, भाषणे असे स्वरूप असायचे. मग त्यानंतर त्यात गाणे आले. हळू ह्ळू त्याचे स्वरूप बदलत गेले. विस्तार वाढला. स्वातंत्र्य मिळाले आणि प्रबोधनाची गरज संपली. आणि एखाद्या गोष्टीची गरज संपल्यावर त्याचे जे होते ते गणेशोत्सवाचे एकविसाव्या शतकात झाले. तिथीचे संदर्भ संपले. गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीलाच करायची असते. म्हणून त्या दिवसापर्यंत थांबावे लागत असे.

इथे मला ज्ञानेश्वरीचा संदर्भ द्यायचा आहे. भगवद् गीतेच्या नवव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात : "अवजानन्ती मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥११॥" त्यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात " मज अनावरणा प्रावरण।भूषणातीतासि भूषण।मज सकळ कारणा कारण। देखती ते॥१६२॥ मज सहजाते करिती।स्वयंभाते प्रतिष्ठिती।निरंतराते आव्हानिती। विसर्जती गा॥१६३॥" त्याचा अर्थ असा: "मी वस्त्र नेसवण्याजोगा नसूनही सर्वजगाला पांघरून घालणारा त्या मला पांघरूण घालतात, भूषणातीत(स्थूल, सूक्ष्म आकाररहित) निराकार असा जो मी, त्या मला अलंकार घालतात, मी सर्वजगाचा उत्पन्न करणारा (जग्त्कारण) असून त्या मलाही दुसर्‍या उत्पन्न करणार्‍या कारणाची कल्पना करतात. मी सहज अनादि नित्य असून माझ्या मूर्ती करतात. मी सदाच स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात व मी नित्य सर्वत्र (नित्य उपलब्ध स्वरूप)असताना माझे आवाहन करतात व त्या माझे विसर्जनही करतात.( संदर्भ : श्रीगुरू साखरे महाराज संपादीत 'सार्थ ज्ञानेश्वरी)

लोकसंख्या वाढली. तशी गर्दी वाढू लागली. आणि मग गर्दीला आकर्षित करण्यास महत्त्व आले. हलते देखावे, संगिताच्या तालावर नाचणार्‍या दिव्यांची आरास असे प्रकार वाढले. पहाटे ५ वाजेपर्यांत लोक देखावे पहायला जागू लागले, भटकू लागले. आणि त्यातून मग पादचार्‍यांसाठी एकमार्गी रस्त्याचा प्रयोग केला गेला. पुणेकरांनी तोही पचवला समाज प्रबोधन वगैरे, तापल्या तव्यावर पाणी पडल्याबर जसे उडून जाईल तसे उडून गेले. आणि लोकांच्या उत्साहाला २००७ मधे पहीला फटका बसला. रात्री १० नंतर ध्वनिवर्धकांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. लोकांचा उत्साह काही कमी झाला नाही. लोकमान्य आणि त्यांची तत्त्वे, कधीच काळच्या ओघात विसर्जित झाली. विसर्जनाच्या मिरवणूकांच्या कालावधीचे प्रमाण वाढले. अर्थहीन नाचणे, कानाचे पडदे फाटतील अशा आवाजातली तितकीच अर्थहीन प्रसंगाला अगदीच न शोभणारी गाणी यासाठी मिरवणूकीतला वेळ कमी पडू लागला. मिरवणूकीत आधी कोण यावरून मानापमानची नाटके रंगू लागली. मग त्यासाठी आपण चतुर्दशी उलटून गेली आहे, पौर्णिमा लागली आहे वगैरे किरकोळ तपशिल लोकोत्साहापुढे बाजूला ठेवले. आणि त्यातच ३२ तासांच्या मिरवणूकीचा ऊच्चांक नोंदवला गेला. आणि.....! आणि २००९ मधे गणेशोत्सवाला निसर्गाने न भूतो न भविष्यती तडाखा दिला. दहीहंडीच्या सुमाराला "स्वाईन फ्लू" नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला. बळी घेतले. आणि पुणेरी गणेशोत्सवाची रयाच गेली. एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या कलाकाराची त्याच्या पडत्या काळात जशी अवस्था होते तसे झाले पुणेरी गणेशोत्सवाचे. दहा दिवसातल्या रविवारीही रस्ते मोकळे असे दुर्मिळ दृश्य पायला मिळाले. ऑस्ट्रेलिया-बांगला देश क्रिकेट कसोटी सामन्यात स्टेडियममधे प्रेक्षकच नसतात. तसेच काहीसे दृश्य पुण्यातल्या गणपती मंडळानी पाहीले. आणि आणखी लोकक्षोभ होण्यापूर्वी जवळजवळ सर्व मंडळानी मिरवणूक बारा तासात संपवण्याचा मंडळांना न पचणारा पण अपरिहार्य निर्णय घेतला. सर्व एकत्र येऊन बैठका झाल्या. आणि सर्व ठरले. एका मंडळाने तर प्रतिज्ञा केली की रात्री १२ च्या आमच्या गणपतीचे विसर्जन नाही झाले तर पुढील वर्षी आमचा गणपती विसर्जन मिरवणूकीत नसेल. अट्टल दारूड्याने "मी आता दारू सोडलीये आणि मला दारू पिताना पकडून दाखवावे. मी दारू सोडून देईन." या आणि त्या मंडळाच्या विधानातला फोलपणा कोणाही शहाण्याच्या लक्षात येइल. आणि बरोबर झालेही तसेच. त्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन २ च्या सुमाराला झाले. आता इतक्या गर्दीत थोडेसे पुढे मागे(?) होणारच हो. इतके काय मनाला लावून घ्यायचे. जनतेची स्मृती ही अतिशय कमी असते हेच खरे. पहाटे ५ पूर्वी मिरवणूक संपवण्याच्या निर्धाराचे तीन तेरा वाजले, वाजवले गेले. आणि यातला उद्वेगजनक भाग म्हणजे या मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण करणार्‍या एका वाहिनीने " वा वा. पहा पुणेकर किती धीराचे आहेत पहा. त्यानी स्वाईन फ्लूचे सावट धीराने झुगारून दिले आहे आणि पहा कसे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आले आहेत." खरतर जनतेने आपल्या नाच धिंगाण्याच्या तल्लफेपुढे स्वाईन फ्लूचा धोका पत्करला होता. दुसर्‍या दिवशीचे दुपारचे १० वाजले. तरीही मिरवणूक चालूच होती.............

२०२०.............

.............आणि आज तिसरा दिवस उजाडला आहे. अजूनही मिरवणूक चालूच आहे. कुतुहलाने मिरवणूकीतल्या एकाला विचारले असता त्याने सांगितले की अजून निम्मी मंडळे बा़की आहेत. लोक बेभान होऊन नाचातच आहेत. आणि सहनशील नागरिक हताश नजरेने, बधीर होऊन पाहत आहेत. त्यांच्या चेहेर्‍यावर "ही कटकट संपणार कधी?" हे प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसतय..........



श्रीराम पेंडसे
रणथंभोर राष्ट्रिय व्याघ्र प्रकल्प सहल




मी रोज सकाळी पर्वतीला जात असतो. जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात तिथे "इन सर्च आउटडोअर्स" यासंस्थेच्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजीत केलेल्या सहलींचे परिपत्रक मिळाले. माझे मेहुणे बरीच अभयारण्ये हिंडून आले आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. तेंव्हा ते म्हणाले की रणथंभोरला वाघ दिसण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. जून २३ला इन सर्च आउटडोअर्सची रणथंभोरची सहल होती. तेंव्हा त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. सहलमूल्य भरलं. आमचा १० जणांचा ग्रूप होता. ६ ज्येष्ठ नागरिक आणि उरलेले तरूण पिढीचे प्रतिनिधी असे आम्ही होतो. जायचा दिवस उजाडला. पुणे बस स्टेशनवर आलो. तिथे आमच्या ग्रूपचे इतर लोकही भेटले.



बस सुटली.सारे आपापल्या स्थानावर शांत झाले. मला संदीप खरेच्या "गाडी सुटली, रूमाल हलले, टचकन झाले डोळे ओले" या कवितेची आठवण झाली. इथे फरक इतकाच होता की इथे बस होती. गाडी नव्हती. निदान माझ्यापुरते तरी हलायला रूमाल नव्हते किंवा ओले होणारे डोळेही नव्हते. जे ओले होणारे डोळे होते ते घरी तरी होते, पुण्याबाहेर तरी होते किंवा कायमचे मिटलेले! आयुष्यात आपल्यासाठी कुणाचे तरी डोळे ओले होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाल्याचा हा इशारा होता. त्यालाच ज्येष्ठ नागरिकत्व म्हणायचं का? एकटा असा ट्रीपला कधी मी गेलो नव्हतो. अश्या मोठ्या ट्रीपला सौ. बरोबर असायची. भक्कमपणे पाठीशी असायची. पण आज ती नव्हती. जणू काही संपूर्ण बस मधे मी एकटाच आहे की काय असे वाटून गेले. एकटेपणाची खरी खुरी झळ आता जाणवू लागली होती. ग्रूप मधल्या सर्वांशी बोलणे झाले होते. पण अजून "तुम्ही कोण?, मी कोण?" या पातळीपर्यंतच ओळखपरेड पोहोचली होती. त्यामुळे त्यांच्याशी संभाषण ५/१० वाक्यांपलीकडे गेले नाही. आणि अश्या वेळी माझ्या नातीचा मेसेज आला. माझी मुलगी आणि घरातली जनता यांच्याशिवाय इतर कोणालातरी मी सहलीला जाणार आहे, हे माहित आहे आणि शुभेच्छा द्याव्या असे वाटतंय हे पाहून आनंद झाला, बरे वाटले. ही नात कोकणात डेरवणला असते. अनघा बापट तिचे नाव. अतिशय मनस्वी आणि लाघवी व्यक्तिमत्व. ही अनघा म्हणजे एक अजब रसायन आहे. त्याबद्दल विस्ताराने नंतर कधी तरी लिहिन. आत्ता फक्त इतकेच की तरल आणि भावूक कविता लिहिणे हा तिचा हातखंडा प्रयोग आहे. तसेच ललित आणि वैचारीक लिखाणातही ती उस्ताद. तिचा "शुभस्ते पंथानम्" मेसेज आला. तो असा :




"बस सुटली, रूमाल हलले, क्षणात सारे चित्र बदलले

झाडे मागे पळू लागली, गाडीमध्ये गडबड झाली,


कोणी आपले फोन उचलले, कोणी भेसूर सूर लावले,

गाडी सुटली बरे वाटले, एकदाचे सगळे स्वस्थ झाले"

आजोबांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने खास ही कविता लिहिली होती. केवळ पांच दहा मिनीटांत रचली. शारदेचा वरदहस्त घेउन आलेली ही मुलगी. आम्ही म्हणजे "र"ला "र" आणि "ट" ला "ट" लावणारे. ही मुलगी खरोखरच महान आहे.




खरंच गाडी सुटली आणि बरे वाटले. पण ते फार काळ टिकले नाही. आठवणी भरतीच्या लाटांसारख्या अंगावर येऊ लागल्या. आणि या मानसिक एकांतवासात तीन तासांत मुंबईला कधी पोहोचलो ते कळले नाही. दादरला उतरून टॅक्सीने मुंबई सेंट्रलला गेलो. पुढे जयपूर एक्सप्रेसने जायचे होते. दोन तासांचा अवधि होता. थोडी पोट पूजा केली. तिथे गाडी फलाटाला लागायची वाट बघण्यात ओळखी आणखी थोड्या गडद होत गेल्या. पुणे स्टेशनवर झालेल्या ओळखीच्या पातळीमधे आणखी वाढ झाली. संभाषणाची गाडी "तुम्ही कुठे राहता? पहिल्यांदाच येताय का? काय गरम होताय हो आज." या पातळीला येऊन पोहोचली. खरंतर ही सारी प्रश्नोत्तरे निरर्थक असतात. पण व्यक्ती कशी आहे? बोलायला हंवय का? गप्पांची हौस आहे का? एकमेकांच्यात मिसळायला हंवय का? याचा थोडा फार अंदाज येऊ शकतो. आणि मग ट्रीप आनंददायी जाणार की "बोअर" होणार हे लक्षात येते. आमच्यात दोन ज्येष्ठ नागरिक जोडपी होती. म्हणजे माझ्यादृष्टीने ते बाद. कारण एकट्या माणसाशी जोडप्याचा संवाद जुळणे सहसा अवघड असते. आणि ते बरोबरही होते. म्हणजे दहापैकी चार जण बाद. दोन तरूण होते. एक मुलगा आणि एक मुलगी. बहुतेक त्यांचे लग्न ठरले असावे असे वाटले. पण माहित नाही. काही अंदाज येत नव्हता. ते एकमेकांचे इतके जिवलग होते की, ते दोघे केवळ खोल्या वेगळ्या असल्यानेच, झोप आणि व्यक्तिगत आन्हिके सोडल्यास पूर्ण वेळ एकत्र असत. त्यांच्या भावविश्वात इतरांना प्रवेश नव्हता. त्यामुळे तेही बाद. उरले तीन. एक एकटे माझ्यासारखे ज्येष्ठ नागरिक आणि दोन तरूण मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. बस्स. या तिघांशीच संवाद साधण्याची शक्यता होती. तसा मी माझ्यापेक्षा वयाने खूप लहानात रमणारा. मला माझा एक लांबचा जावई म्हणायाचासुद्धा कि " काका, वयाने वाढला तरी मनाने लहानच राहिला." मला भा. रा. भागवतांचा "फास्टर फेणे" आवडतो, हॅरी पॉटर आवडतो. त्यामुळे तो मला असे म्हणाला असेल. मला माहित नाही. त्यामुळे तो निखिल नावाचा मुलगा आणि पूनम ही संगणकप्रणाली अभियंता यांच्याशी माझे छान सूत जुळेल असे वाटले. आणि तसेच झालेही. पण मनाच्या सुप्तकोपर्‍यात कुठेतरी शंका होती कि आपले "ज्येष्ठ नागरिक" यांच्याशी जमणे जरा अवघडच दिसतंय. एका "ज्येष्ठ नागरिक" जोडप्याबद्दल. सुरूवातीला बस स्टँडवर त्यांची भेट झाली तेंव्हाच त्यांच्या चेहेर्‍यावर मला थोडासा "कॅस्ट्रॉइल लूक" दिसला होता. पण मी माझ्या मनाचे खेळ असतील असे समजून दुर्लक्ष केले होते. त्यांच्याशी आपले जमेल असा माझा अंदाज होता, तो साफ चुकला. कसा ते पुढे येईलच.




गाडी फलाटाला लागली गाडीत बसलो. आणि इथे अजून एक सुखद धक्का वाट बघत होता. माझी मुंबईत एक मानलेली नात आहे. मुलुंडला असते. अद्विका तिचे नाव. आजवर तिला मी कधीही भेटलेलो नव्हतो. पण ती मात्र आज मला आवर्जून भेटायला आली. मी लिहिलेल्या एका कवितेतल्या ओळींचे प्रत्यंतर तेंव्हा मला प्रथम तिथे आलेलं होतं. कोण कुठली अद्विका? तिने मला यापूर्वी आयुष्यात कधीही पाहिलेही नव्हते. काय फोनवर बोलणे होत असेल तितकेच. पण केवळ तितक्या ऋणानुबंधावर तिला यावसं वाटलं? हा आश्चर्याचा पण सुखद धक्का होता. पोरगी कामावरून लवकर निघून मुद्दाम आजोबांना भेटायला मुलुंडहून धडपडत आली. मनात विचार आला की, "अरे इतक्या लांबून ही मुलगी दगदग करून भेटायला येते. मी हिच्या जागी असतो तर असे गेलो असतो का? " खूप खूप विचार करूनसुद्धा, "नसतो गेलो " असेच प्रामाणिक पण दुर्दैवी उत्तर पुन्हा पुन्हा, निदान त्यावेळी तरी येत होते. आज कदाचीत "गेलो असतो" असे उत्तर येइलही. कोणत्या अनामिक आपुलकीपोटी ही पोर भेटायला आली? कोणता ऋणानुबंध आहे हा? की गेल्या जन्मीचा हा बंध आहे? याची उत्तरे अजूनही मला सापडलेली नाहीयेत. मी बराच विचार करतो. पण या अनामिक मायेच्या ओलाव्याचे रहस्य उलगडलेले नाहीये. तेंव्हाही नव्हते आणि आजही नाही. आपल्यासाठी इतक्या लांबून कोणीतरी केवळ भेटण्यासाठी येऊ शकतं हा धक्काच मुळी सुखद होता, अनपेक्षित होता आणि न झेपणाराही होता. इथे मात्र माझे डोळे पापण्यांमागे ओले व्हायला लागले होते. केवळ वयाला शोभलं नसतं म्हणून त्या पाण्याला पापण्यांचे दरवाजे बंद केले. गाडी सुटण्यापूर्वी तिने मला वाकून नमस्कार केला. आजच्या युगात लोप पावत चाललेल्या संस्कारांच्या या दर्शनाने मात्र ते डोळ्यातलं पाणी, रखवालदाराची नजर चुकवून कैर्‍या पाडायला धावणार्‍या व्रात्य मुलासारखं, पापण्यांचे पहारे चुकवून बाहेर यायला धडपडूं लागलं. गाडी सुटली आत आलो. आणि दोन अश्रू बाहेर आले. आता मात्र मी त्याना थोपवलं नाही. बाहेर येऊ दिलं. गाडीने वेग घेतला आणि वातनुकूलित डब्याच्या थंडाव्यात ते अश्रू वाळून गेले.




सवाईमाधोपूर स्टेशनवर पाय ठेवला आणि राजस्थानी रणरणत्या ४०+ तपमानाचा पहिला फटका बसला. त्यातून ए.सी.तून बाहेर आल्यामुळे तो अधिक जाणवला. हॉटेलमधे जाण्यासाठी कँटरमधे बसलो. सीट्स वर बसलो तर भाजून निघत होते. पुढचे तीन चार दिवस काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आला. हॉटेलमधे आलो. थोडेसे ताजेतवाने होउन जेवणासाठी डायनिंग हॉलमधे आलो. एकटेपणा आता संपत आला होता. कारण तोपर्यंत ग्रुपमधल्या सहप्रवाश्यांच्या ओळखी आपण जणु काही सहज रोज भेटणारे आहोत इतक्या पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या. जेवणानंतर विश्रांती घेऊन दुपारी ४ च्या सुमाराला निघालो. आम्हाला सूचना दिल्या गेल्या होत्या की कँटरमधून कोणत्याही परिस्थित खाली उतरायला परवानगी नाही. आणि खरंच नशिबाने वाघ दिसला तर अजिबात आवाज करायचा नाही. अखेरीस आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात भाजत भाजत व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. आणि आमचा कँटर अभयारण्याच्या भव्य कमानीतून आत शिरला. (चित्र क्र. १)




राजस्थानातलं सवाई माधोपूरजवळचं हे "रणथंभोर राष्ट्रीय उद्यान". हे वर्षानुवर्षे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. एके काळी जयपूरच्या महाराजांनी आणि नंतर ब्रिटीशांनी शिकारीसाठी हे जंगल वापरलं. नंतर श्री. वाल्मिक थापर आणि श्री. फत्तेचंद राठोड यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रदेश भारत सरकारने १९५५ मधे "व्याघ्र संरक्षित क्षेत्र" म्हणून जाहिर केला. या दोघांनी १९६०-६१ सालापासून या जंगलात हिंडून वाघांचा अभ्यास केला. आज हा जो प्रकल्प आहे हा या दोघांच्या अमाप आणि निस्वार्थी कष्टांचा परिपाक आहे. सुमारे ४०० चौ. कि.मी. असलेल्या या जंगलात अधिकृतपणे सुमारे ४५/५० वाघ आहेत. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांच्या मधे असलेले हे अभयारण्य आहे. दुसर्‍या संरक्षित क्षेत्रात वाघांची संख्या घटत चालल्याने इथून वाघांच्या दोन जोड्या पाठवण्यात आल्या आहेत. "रणथंभोर" या नावाचीसुद्धा एक गम्मत आहे. 'रण' म्हणजे वाळवंट. 'थं' म्हणजे डोंगर. आणि 'भोर' म्हणजे दरी. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला वाळवंट किंवा पठार आणि त्यामधे दरी. म्हणून या प्रदेशाला रणथंभोर असे नाव पडले. सर्व प्रदेश तसा वैराण आहे. त्यामानाने जंगल कमी. फार भलेमोठे वृक्ष तिथे नाहीत. आणि प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात दिसतं तसं घनदाट जंगलही नाही. पण वड, पिंपळ, असेच वृक्ष प्रामुख्याने दिसतात. फरशीच्या स्लॅबप्रमाणे दिसणारे तुळतुळीत ओके बोके खडक हे इथल्या डोंगराचे वैशिष्ट्य.


ठरल्या कार्यक्रमानुसार तीन वेळा आम्ही इथे येणार होतो. इथे एकंदर ५ मार्ग आहेत. आणि कोणत्याही मार्गावर गर्दी होऊनये म्हणून कँटर किंवा जिप्सी गाड्याना वनप्रशासनातर्फे मार्ग ठरवून दिला जातो. इथे अभयारण्यात तीन मोठे तलाव आहेत. पदम तलाव, राजबाग तलाव आणि मलिक तलाव. (चित्र क.२) शिवाय मोगलकालीन वास्तूंचे अवशेष आहेत. इथला "जोगी महाल" हा अजूनही राजघराण्यातल्या व्यक्तींसाठी वापरात आहे. सर्व प्राणी या पाणवठ्यावर येतात. (चित्र क्र.३) तसेच मार्गाच्या बाजूला काही छोटीशी डबकीही दिसली. त्यामुळेच इथे वाघ दिसण्याची सर्वाधिक शक्यता असते. जुन्या काळातले वास्तूंचे अवशेष जागोजागी दिसत होतेच. गाडी दोन कमानीतून आत शिरली. "तो पहा...." म्हणेपर्यंत सर्व जण उठून उभे राहिले. आणि नंतर म्हणणार्‍याने वाक्य पूर्ण केले ".... मस्त मोर दिसतोय." सर्व जण फुग्यातली हवा गेल्यासारखे परत खाली बसले. चला! मोरांचे दर्शन झाले. (चित्र क्र.६) पण पुढे पुढे इतके मोर दिसले की मोर दिसण्याचे कौतुक त्या दिवशी संध्याकाळपर्यंत संपूनही गेले. निदान मला तरी तसे वाटले. जवळ जवळ एक दीड किलोमीटर गेल्यावर एका छोट्याश्या रस्त्याला गाडी वळून थांबली. इथून हा रूट सुरू होणार होता. प्रशासकीय गोष्टी पूर्ण करण्यासाठी गाडी थांबली होती. आणि तिथे एक गम्मत पाहायला मिळाली. तिथे गाडी थांबली असताना तिथल्या झाडावर काही पक्षी होते. त्याला टकाचोर म्हणतात. काळे डोके आणि काळी शेपटी. पण शेपटीचे टोक मात्र पांढरे. मधला भाग पिवळसर तपकीरी रंगाचा आणि पंखावर, एखाद्या गडद साडीच्या पदराला असणार्‍या पांढर्‍या किनारीसारखा पट्टा. (चित्र क्र.४) तुम्ही हातावर पोळीचा तुकडा, बिस्कीट वगैरे ठेवले तर ते पक्षी तुमच्या हातवर येउन बसतात. अगदी बिनधास्त पणे. आणि खातात. अजिबात घाबरत नाहीत. खूप मजा वाटते पाहताना. अक्षरशः दोन तीन पक्षी एकाचवेळी हातावर येउन बसतात. (चित्र क्र.५)




आणि आम्ही त्या "टायगर ट्रेल" वर निघालो. रस्ता अतिशय खराब होता. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर दिसणारी "फेव्हीकॉल"ची जाहिरात आठवा. त्याप्रमाणे आमचा कँटर हेलकावे घेत घेत चालला होता. या अभयारण्यात त्यामानाने प्राण्यांच्या जाती फारश्या दिसल्या नाहीत. ठिपकेदार हरणांनी पहिले दर्शन दिले. ( चित्र क्र.७) नीलगायींचे कळपही दिसले. सांबरही दिसले. ससे, रानडुक्करे, चितळ असे प्राणी दिसले. माकडे तर भरपूर होती. ठेचकाळत ठेचकाळत पुढे पुढे जात होतो. आणि अचानक कचकन ब्रेक दाबत गाडी थांबली. " काय झाले काय झाले?" असा कल्ला झाला. आणि पुढून तो गाईड म्हणाला, " शू.... शांती रखो. शेर....!" आमच्या पुढे अजून दोन गाड्या थांबल्या होत्या. आणि तिन्ही गाड्यातले आम्ही सर्व जण श्वास रोखून समोर बघत होतो. रस्त्यापासून १००एक फूटावर एक डबके होते. आणि त्यात व्याघ्रराजांची स्वारी आरामात पाण्याच्या थंडाव्याचा आस्वाद घेत शांतपणे पहुडली होती. प्राण्याना भावना असतात का? हा वादाचा विषय असेलही. पण मला जे माहीत आहे त्याप्रमाणे प्राण्याना भावना नाहीत. मानवाइतक्या त्या विकसीत तर नाहीतच नाहीत.. त्या अत्यंत अस्फूट आहेत. निद्रा, भय, मैथुन आणि पोट भरणे इतक्यापुरत्याच त्या मर्यादित आहेत. पण मला त्या वाघाच्या चेहेर्‍यावर मुक्ततेचे समाधान दिसत होते. (चित्र क्र.८) माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला माहित आहे. पण मला कायमच प्राणीसंग्रहालयातल्या किंवा सर्कशीतल्या वाघाच्या चेहेर्‍यावर दिनवाणे मिश्रित त्रासिक भावच दिसत आले आहेत. "....काय शिंची कटकट आहे राव! धड जगूही देत नाहित ही माणसे! इथे मला एक आख्खा बैल दिवसाला लागतो. आणि ही मंडळी सकाळी काही तुकडे आणि रात्री काही तुकडे देतात. छे! खर्‍याची दुनियाच नाही राहिली....." असे भाव त्या वाघाच्या तोंडावर असतात. आणि इथे? इथे मात्र भूमिका बदलल्या होत्या. आम्ही बंदिस्त होतो. तो मोकळा होता. जणू काही "...काय बघायचे असेल ते मनसोक्त बघून घ्या..." असेच त्याला जर बोलण्याची कला असती तर म्हणाला असता. लहान मुलांच्या खेळातल्या "स्टॅच्यू" च्या खेळासारखा सारखा सर्वांचा स्टॅच्यू झाला होता. एक पांच दहा मिनिटांनतर तो उठला पाण्याबाहेर आला. (चित्र क्र.९) आणि तिथून दहा पंधरा फूटावर जाऊन बसला आणि पांच एक मिनिटात झोपून ही गेला. "आता तुम्ही निघा" अशीच जणू काही सूचना होती. आम्ही तेथून निघालो. तापल्या तव्यावर पॉपकॉर्न उडावेत तसे टणाटण कँटरमधे उडत उडत अजून दोन किलोमीटरवर रस्त्याच्या टोकाला आलो. इथे बंधार्‍यामुळे एक अगदी छोटासा तलाव झाला होता. त्यात भरपूर मगरी होत्या. त्या तलावात चित्र बलाक, पाणकोंबडी, स्वर्गीय नर्तक असे बरेच पक्षी झुंडीने दिसले. थोडा वेळ थांबलो. मोर तर अगणित दिसले. परत फिरलो. वाघोबा अजूनही तिथेच विश्रांती घेत पडले होते. त्यांच्या विश्रांतीचे रहस्य आम्हाला दुसर्‍या दिवशी समजले. त्या दिवशी त्या वाघाने शिकार करून जवळ जवळ सगळी नीलगाय रिचवली होती. आणि आपल्याला कसे सणाच्या दिवशी श्रीखंड किंवा आम्रखंड दुपारी अंगावर येते तसे त्याला बहुतेक झाले होते. आम्ही परत तिथे काहीतरी हालचाल होईल या आशेने १०/१५ मिनिटे थांबलो. तितक्या वेळात त्या वाघोबाने तीन चार वेळा मान वर करून पाहिले. दोनदा जांभई दिली. शेवटी पंजा वर करून "बाय बाय"चा इशारा केला. आणि आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. संध्याकाळी मुक्कामावर परत आलो. चहा आणि मस्तपैकी गरमागरम कांदा भजी आमची वाट बघत होती. नंतर जेवणे झाली रात्री सर्वांची आपापल्या नातेवाईकांना "वाघ दिसल्या"ची फोनाफोनी, मेसेजामेसेजी झाली. वाघ इतक्या लवकर दिसेल ही अपेक्षा नसल्याने सर्व आनंदात होते.


दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता पुन्हा आम्ही व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारात पुन्हा एकदा येउन पोहोचलो. आज आता आम्हाला दुसरा "रुट मिळाला होता. आज त्या तलावांवर जायचे होते. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. वातावरणात माफक थंडावा होता. म्हणजे कालच्या मानाने बरेच थंड होते. या नवीन रूटवर आम्ही पुढे पुढे जात राहीलो. तिन्ही तलावाच्या काठी गेलो. एक तलावाच्याकाठी तिथल्या फॉरेस्ट गार्डने सांगितले की '..... शायद शेर दिख सकता हैं, कल रातमेही उसने किल किया हैं. वो वापस आयेगा...." झाले! आम्ही थांबलो. पण अर्धा तास थांबूनही काही तो "शेर" दिसला नाही. आज सकाळी बहुतेक आमचे नशिब आमच्या बाजूने नव्हते. असे सारखे सारखे वाघ दर्शन द्यायला लागले तर कसे चालेल? त्यांना पहायला कोणी फिरकणारही नाही. साधारण सकाळी १०च्या सुमाराला आम्ही परत मुक्कामी आलो. आज व्याघ्रराज नाराज होते बहुतेक. हॉटेलवर आल्यावर न्याहारी झाली. नंतर तिथल्याच शहरातल्या एका दुकानाता खरेदीला गेलो. सर्वांची खरेदी आटोपली. निदान त्या दिवसापुरती तरी. दुपारचे भोजन उरकले. आणि थोडीशी विश्रांती घेउन पुन्हा दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा व्याघ्रदर्शनाच्या आशेने कँटरने भाजत भाजत प्रवेश द्वाराजवळ येऊन पोहोचलो. यावेळी आमच्या गाईडने वाघ दिसण्याची शक्यता असणारा रूट मिळण्याची फिल्डींग लावली होती. आणि नशिबाने तसा रूट मिळाला आहे असे त्याने आम्हाला सांगितले. सर्वांचे चेहेरे एकदम खुलले. आणि आमच्या कँटरने पुन्हा एकदा त्या वनचरांच्या जादुई दुनियेत प्रवेश केला.





आम्हाला पुन्हा अगणित मोर दिसले. आता आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले होते. आणि आम्ही पुढे पुढे जात असताना आमच्या समोर तीन कँटर थांबलेले दिसले. पुढे जायला जागा नसल्याने आम्ही थांबलो. आणि आमच्या कँटरपासून १५ फूटावर एक वाघ मस्तपैकी पाण्यात डुंबत होता. ती वाघिण आहे असे त्या गाईडने सांगितले. मला पडलेला प्रश्न म्हणजे हे त्याला कसे कळले? त्या वाघिणीच्या गळ्यात कुत्र्याला बांधतात तसा पट्टा होता. कुतुहलाने त्या गाईडला विचारले असता तो म्हणाला कि तो " रेडिओ ट्रॅकर बेल्ट" आहे. (चित्र क्र. १०) मला गम्मत वाटली. आपण नाही का लहान मुलाला म्हणत कि "....तुला चॉकलेट देतो पण इथे गुपचूप बैस...." म्हणून. बहुतेक तिला तशी समज देऊन तिथे आणून बसवले असावे. की ".....इथे गुपचूप बसायचे आहे. लोक बघायला येणार आहेत. नंतर रात्री अर्धा बैल मेजवानी मिळेल....." कालच्याही वाघाचे दर्शन असेच ठरवून दिल्या सारखे वाटले. कुठेतरी कृत्रिमपणा वाटत होता. पुन्हा हे माझ्या मनाचे खेळ असतीलही. माझी ही मते ऐकून समस्त व्याघ्रप्रेमी माझ्या अंगावर चाल करून येतीलही. पण माझा नाईलाज आहे. मला जाणवलं ते हे असं होतं. कुठेतरी अनैसर्गिक वाटले. खूप सहज वाटणारा योगायोग? A far fetched coincidence? As if Tiger was meant to be present there. माहित नाही. मला मात्र राहून राहून तसे वाटत होते. पण वाघ दिसल्याच्या नादात ही गोष्ट कुणाला जाणवली नसेलही. आणि त्यामुळे कुणाला काही खटकण्याचा प्रश्नच आला नाही. मी मात्र आता इकडे तिकडे पहात होतो की काही वेगळे आणखी दिसतय का बघावं. तर समोरच्या झाडावर बंड्या दिसला. (चित्र क्र.११) हा आणि खंड्या यात फरक आहे. "किंग फिशर" म्हणजे खंड्या. आणि "व्हाईट चेस्टेड किंग फिशर" म्हणजे बंड्या. नेहमी बंड्या आणि खंड्या यांच्यात गल्लत होते. माझ्या माहितीप्रमाणे बंड्या पुष्कळ वेळा दिसतो. खंड्या फार कमी दिसतो. आकाशात आता ढगांचे संमेलन भरलं होतं. (चित्र क्र. १२) त्यानी गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यांची सूर्यकिरणांशी लढाई चालू होती. पण ढगांची गणसंख्या कमी पडल्याने त्यांना सूर्याला झाकून टाकणे नीट जमले नव्हते. आणि त्यामुळे वर छाया प्रकाशाचा मस्त खेळ रंगला होता. ढगांच्या फटीतून सूर्यकिरण, एखादा कापडी पडदा फाडून तळपती तलवार बाहेर येऊन दिसावी तसे ते दृश्य दिसत होते. (चित्र क्र. १३) आणि त्या सूर्या किरणांमुळे त्या ढगाना एक रूपेरी किनार दिसत होती. जणू काही चांदीचे मखरच वाटत होते. अतिशय विलोभनीय दृश्य दिसत होते ते. (चित्र क्र. १४) इतर जनता मात्र अनिमिष नेत्रांनी जे बघायचे ते सोडून वाघ बघण्यात दंग होती. त्यांना हे कळत नव्हते की वाघ नंतर प्राणिसंग्रहालयातही पहायला मिळू शकतो. पण हा निसर्गाचा मनोहर चमत्कार पुन्हा पहायला मिळेल याची खात्री नाही. असो हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. सुमारे २०/२५ मिनिटे थांबून आम्ही तेथून पुढे निघालो. आणि त्या रूटवर अजुन २/३ कि. मी. गेलो. आता वाघ दिसण्याची शक्यता नाही असे गाईडने जाहीर करून टाकले. आम्ही परत फिरलो. तिथे रस्त्याच्या एका बाजूला वडाचे एक झाड होते. त्याच्या पारंब्या वरून जाऊन पलिकडच्या बाजूला गेल्या होत्या. आणि एक प्रकारची नैसर्गिक कमान तयार झाली होती. जाताना ही कमान दिसली नव्हती, जाणवली नव्हती. कारण त्यादृष्टीने आम्ही बघितलेच नव्हते. जणू काही निसर्गाच्या साम्राज्याचे प्रवेशद्वारच होते ते. (चित्र क्र.१५) वरती "वेलकम" अशी पाटी निसर्गाने आपल्या भाषेत लिहिली होती. जणू काही निसर्गाला सुचवायचं होतं की, "....इथे या आणि आमचे हे अफाट सौंदर्य पहा. परत गेल्यावर तुमच्या नशिबी काँक्रिटची जंगलं आणि प्रदूषणं तर आहेतच. पण आत्ता आलाच आहात तर शुद्ध, स्वच्छ, निर्मळ आणि भरपूर ऑक्सिजनयुक्त वातावरणाचा आनंद लुटा....." आम्ही त्या कमानीतून परतीच्या मार्गाला लागलो. आणि अर्ध्या कि. मी.वर एक आश्चर्य वाट पहात होतं. आमच्या गाडीपुढेच एक वाघ रस्त्याच्या मधोमध शांतपणे चालला होता. काय डौलदार चाल होती त्याची! मागे काय आहे, कोण आहे याची त्याला फिकिर नव्हती. आम्ही त्याच्या मागे मागे त्याच्या वेगाप्रमाणे जात होतो. त्याने मागे वळून पाहण्याचे कष्टही घेतले नाहीत. साधारण ५० फूट गेल्यावर तो जंगलात जाण्यासाठी वळला. इथे मात्र आम्ही थांबलो. एकदा त्याने मागे वळून पाहिले. आणि दूरवर तो झाडीतून दिसेनासा झाला. हे मात्र नैसर्गिक दर्शन झाले. ठरवून बसवण्याचा वगैरे प्रश्नच येत नव्हता किंवा इथे आम्हाला तो दर्शन देण्यासाठीही आला नव्हता. त्याचा तो त्याच्याच मस्तीत चालला होता. तो जाताना तिथे आम्ही असायला एकच गाठ पडली. हे मात्र आमचे नशिब. हा मात्र योगायोग नक्की. वाघाचे मला अपेक्षित होते ते हे असे दर्शन. आमच्या कँटरने परतीची वाटचाल सुरु केली. जाताना त्या वाघिणीपाशी परत एकदा कौतुकाने थांबलो. परत १५/२० मिनिटे पुन्हा तेच. पुन्हा वाट बघणे कोणत्यातरी हालचालीची. आणि या वेळी मात्र वाघिणीने हालचाल केली. डोके वर केले. आमच्याकडे पाहिले, आणि पाणी प्यायला सुरुवात केली. कालच्या वाघापेक्षा ही नक्कीच निराळी(?) हालचाल होती. पण मनातली कृत्रीम दृश्याची भावना जात नव्हती. आपल्याला नक्की काय अपेक्षित होते? कोणती हालचाल हवी होती? वाघ पहायचा होता म्हणजे कसा पहायचा होता? मला काही सांगता येत नव्हते. समाधान झाले का? हो समाधान झाले. कसले समाधान? फक्त वाघ पाहिल्याचे समाधान इतकेच समाधानकारक उत्तर माझ्यापुरते तरी मी देईन. इतरांचे मला माहित नाही. संध्याकाळी ७ च्या सुमाराला हॉटेलवर परत आलो. परत कांदा भजी वाट बघत होतीच.



तिसरा दिवस. आज जंगलात जायचे नव्हते. आज सकाळी जवळच चालत फेरफटका मारायचे ठरवले होते. बाहेर पडलो. चालत चालत निघलो. आमच्या हॉटेलपासून थोडे अंतर गेल्यावर जंगल सुरू झाले. झाडी फार दाट नव्हती. पुन पक्षी पहायला मिळाले. आपल्याकडे दयाळ दिसतो. त्या कुलातला पक्षी दिसला. पुढे जाता जाता एक मोठे मुंग्यांचे वारूळ दिसले. साधारण दोन एक फूट उंचीचे असेल. त्यात मुंग्या नव्ह्त्या. तसेच पुढे गेलो. ठिपकेदार हरणे दिसली. एक छान सुतार पक्ष्याचेही दर्शन झाले. मस्तपैकी झाडाच्या खोडावर बसून धारदार चोचीने "टक टक" करत बसला होता. फिरून साधारण ११ च्या सुमाराला परत हॉटेलवर आलो. आणि विश्रांती घेतली जेवण झाले. आणि दुपारी ३ च्या सुमाराला पुन्हा एकदा या ट्रीपमधले शेवटचे अभयारण्यात निघालो. यावेळी मुख्य अभयारण्यात जायचे नव्हते. साधारण १० कि.मी. वर असलेल्या "सवाई मानसिंग" अभ्यारण्यात जायचे होते. याला "बनास सँक्चुरि" म्हणतात. इथे चिता दिसण्याचा संभव होता. वाघाच्या मानाने चित्त्याचे दर्शन खूप दुर्मिळ असते. चित्ता हा प्राणी त्यामानाने बेभरवशी आहे. वाघ सहसा कारणाशिवाय माणसांवर हल्ला करणार नाही, जो पर्यांत तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही. वाघ भुकेलेला असला तरी बहुतांशी माणसांवर तो चालून जाणार नाही. अगदी जरी वाघ तुमच्या शेजारून जात असला तरीही तो तुमच्याकडे लक्षही देणार नाही. अपवाद फक्त नरभक्षक वाघाचा. पण चित्त्याचे तसे नाही. तो माणसांवरही अकारण हल्ला करतो. सहसा चटकन दिसत नाही. तो झाडावर सहज चढू शकतो. आणि वाघाच्यामानाने खूपच चपळ असतो. चित्ता हा तसा बुजरा प्राणी आहे. आणि म्हणून त्याचे नैसर्गिक दर्शन तसे अवघड असते. त्यामुळे चित्ता दिसेल याची खात्री नव्हती. तरीही आम्ही गेलो. पुन्हा "फेव्हीकॉल" प्रमाणे ठेचकाळत गेलो. इथे प्रदेश बराच दगडाळ होता. आज कँटर नव्हता. दोन जिप्सी गाड्या करून गेलो होतो. पण "फेव्हीकॉल इफेक्ट" अजिबात कमी नव्हता. हा प्रदेश आणखी वैराण होता. नोंदणी वगैरे सोपस्कार करून मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो. कुठे एखादा ससा किंवा नीलगाय यापलिकडे काहिच दिसले नाही. शेवटी एका कड्याच्या टोकाला येऊन थांबलो. इथे सूर्यास्त पाहण्याची आयडिया होती. त्याकड्याच्या टोकावरून खाली गाव काड्यापेटीसारखे दिसत होते. तशातही आमच्यातल्या लीडरला खाली चित्त्याने मारलेली नीलगाय दिसली. पण आम्हाला चित्ता काही दिसला नाही. नंतर दिसला. पण कसा त्याचे रहस्य पुढे येईल. ढगांनी सूर्य झाकायला सुरूवात केली आणि सूर्यास्त पाहण्याच्या आशा मावळल्या. आम्ही परत फिरायचे ठरवले.


....आणि मी सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे माझा एका जोडप्याबद्दलचा चुकलेला अंदाज इथे उघड झाला. आम्ही चर्चा करत होतो की ट्रीपनंतर भेटले पाहीजे. फोटो एकमेकांना दिले पाहिजे. त्यावेळी त्या जोडप्यातली कवळी वाजली त्यांनी आपल्या सौं. ना ताकिद दिली की "तू भलते सलते बडबडू नकोस. नंतर भेटायचे जमणार नाही." तरीही मी थोडासा नेट लावून म्हणालो की लगेचच्या रविवारी भेटूया. पण नाही. त्या कवळीने आपल्या अर्धांगीला झापले. मी ऐकतोय याकडे लक्षही दिले नाही. किंबहुना मी ऐकवे अशीच इच्छा असावी असे आता मला वाटते. "आपण सहलीला आलो आहोत. आपला इतरांशी काहीही संबंध नाही. ट्रीप संपली. संबंध संपला. घरी बोलवा वगैरे संबंध अजीबात वाढवायचे नाहीत. पुन्हा चूकुन माकून पुढच्या ट्रीपला भेटलो तर पाहू. नाहीतर नाही." मला कळत नाही की ही असली माणसे ट्रीपला का येतात? माणसात मिसळायचे नसेल तर गुपचूप घरी बसा की. किंवा फिरण्याची इतकीच हौस असेल तर स्वतंत्ररीत्या ट्रीपा काढा! एखादा साथीचा रोग साथ पसरला की लागण झालेल्याना कसे वेगळे ठेवतात, तसे माणूसघाणेपणाच्या रोगाची लागण झालेलांनी इतरांपासून आणि इतरांनी त्यांच्यापासून दूर राहवे हे बरे. त्यावेळी मग मी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकांशी पुण्यात येईपर्यंत एक अक्षरही संवाद साधला नाही. माझ्या मेंदूच्या कॉम्पुटरमधून त्यांची उपस्थिती पूर्णतया "डिलिट" केली. आणि दुसरे म्हणजे ही मंडळी आपल्यापासून दूर राहणार नसतील तर पुन्हा मी कधीतरी "इन सर्च आउटडोअर्स" बरोबर गेलो तर हे ज्येष्ठ नागरिक नसतील त्याच ट्रीपला फक्त जायचे असे मनोमन ठरवून टाकले.


आम्ही परत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आलो. दोन जिप्सीपैकी आमची जिप्सी पुढे निघून आली. दुसर्‍या जिप्सीतला गाईड म्हणाला ".... रूको. शेर बतता हूँ...." ती जिप्सी थांबली. अर्थात त्यानी परत आल्यावर आम्हाला "टुक टुक" केलं. त्या गाईडने लांबवर एका झाडावर बसलेला चित्ता दाखवला. पण नंतर त्याने सांगितलेली कथा मजेदार आहे. " ये तो पकडा हुवा शेर है। इसे जंगलमे रोज छॉड दिया जाता है। मगर उसे आदतसी हुवी है इसलिये वो हर रोज शामको इधर आता है और बैठता हैं।" परत हॉटेलवर आलो. चहा , रात्री जेवण आणि नंतर झोप.


आज आता शेवटचा दिवस होता. आज रणथंभोरचा किल्ला पहायला जायचे होते. त्या किल्ल्यात एक गणपतीचे मंदिर आहे. त्रिमुखी गणपती आहे हा. महाराष्ट्रात जसे अष्टविनायकाला महत्त्व आहे तसे या गणपतीला राजस्थानात महत्व आहे. दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. आजचा दिवस गर्दी असण्याची शक्यता नव्हती. म्हणून आज आम्ही जायचे ठरवले होते. हा किल्ला त्या अभयारण्यातच आहे. मला पुन्हा पडलेला प्रश्न असा की या गणपतीच्या दर्शनाला जाणारे शेकड्याने लोक असतात. त्यांना वाघाच्या हल्ल्याचा धोका नाही का? की वाघ पर्यटक आणि स्थनिक रहीवासी यातला फरक ओळखू शकतात? ती मंडळी आपण सारसबागेत फिरावे तशी किंवा मुंबईकर जसे जुहू बीचवर बागडतात तशी आरामात चालत हिंडत होती. आणि पर्यटकांपैकी कोणी उतरण्याचा प्रयत्न केला किंवा हात पाय बाहेर काढला तरी आरडा ओरडा होत असे. असे का हे मला शेवटपर्यंत समजले नाही नंतर विचार करता मला असे वाटले की पर्यटकांपैकी कोणी भरकटला तर त्याला आवरणे अशक्य होइल आणि वाघाला आयते अन्न मिळेल. असे होऊ नये म्हणून घेतलेली ही काळजी असावी. अर्थात माझे हे मत मलाच पटलेले नाहिये. पुन्हा कँटर सकाळी ७ वाजता अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशला. आता "टायगर ट्रेल" वर जायचे नसल्याने परवानगी, पास वगैरेचा प्रश्न नव्हता.

आणि त्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी आलो. हा किल्ला इ.स. ९४४ च्या सुमाराला राजपुतांनी बांधला. समुद्र सपाटीपासून सुमारे ७०० फूट उंचीवर असलेला ह किल्ला त्याकाळी एक महत्वाचे नाके होते. ११९२ मधे महंमद घोरीकडून पृथ्विराज चौहानचा पराभव झाला. त्यानंतर त्याचा नातू गोविंदराजने राजपुतांचा लढा पुढे चालू ठेवला. पुन्हा मोगल, रजपुत, मोगल असे करत करत शेवटी अकबराने हा किल्ला १५५९ साली जिंकला. नंतर १७ व्या शतकात जयपूरच्या कछवा महाराजांकडे हा किल्ला आला. ते अगदी स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हा किल्ला जयपूरच्या महाराजांकडे होता. या किल्ल्यात हिंदूंची तीन देवळे आहेत. गणेश, शिव आणि रामलालजी यांची देवळे आहेत. १२व्या शतकात लाल दगडांनी बांधलेली ही देवळे पर्यटकांचे आकर्षण आहेत. सर्व किल्ला हिंडून पाहिला. त्रिमुखी गणपतीचे दर्शन घेतले आणि खाली आलो. कँटरमधे बसलो. आणि मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आलो. मागे वळून पाहीले शेवटचे आणि परत हॉटेलवर आलो. चहा न्याहारी झाल्यावर पुन्हा एकदा खरेदी झाली. जेवण झाले आणि दुपारच्या गाडीने परतण्यासाठी भाजत भाजत सवाई माधोपूर स्टेशनवर आलो. सगळ्यांनाच परतीचे वेध लागले होते. प्रत्येकाचे आरक्षण निरनिराळ्या ठिकाणी असल्यामुळे आता पुन्हा लवकर भेट होणार नाही यापेक्षाही ज्यांना नंतर संपर्कच ठेवायचा नव्हता त्यांचे "कॅस्ट्रॉइल लूक" चेहेरे बघण्यापासून सुटलो याचाच अधिक आनंद होता. ज्याना मनापासून भेटायचे आहे ते संपर्क ठेवतील याची खात्री होती. सकाळी बोरीवली स्टेशनवर उतरून पुण्याची बस पकडली आणि दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात परत आलो.


सहल संपली. पुन्हा एकदा मी काँक्रिटच्या जंगलात आणि माझ्या भावविश्वात प्रवेश केला. मुंबईत आलो तेंव्हाच निसर्गाची जादू ओसरली होती. जे पाहून आलो ते खरं होतं का की मला सारखं वाटत होतं तसं घडवून आणलेलं होतं? देव जाणे. पण मला जे पटलं, जसे भावलं तसं मी लिहून काढलय. त्या व्याघ्रराजाचं देखणं दर्शन कृत्रीम असावं असं मला का बरे वाटावे? कदाचीत मी काँक्रिटच्या जंगलातला प्राणी आहे. म्हणून मग या काँक्रिटच्या जंगलात माणूस रूपी श्वापदात राहणार्‍या मला, या अत्यंत देखण्या वनराजाचं दर्शन कृत्रीम वाटलं असेल, संस्थाने विलीन झालेल्या महाराजांसारखे! पण एक नक्की की ते दर्शन कृत्रीम असलं तरी त्या हिंस्त्र श्वापदाच्या चेहेर्‍यावरचे भाव मात्र निश्चितच निरागस होते, नैसर्गिक होते ..... सिमेंटच्या जंगलातल्या दोन पायावर चालणार्‍या ओळखिच्या श्वापदाच्या चेहर्‍यावर असे भाव क्वचित पहायला मिळतात. हो ना?



श्रीराम
स्वाईन फ्लू

पुणे थरारले पुणे हादरले, स्वाईन फ्लू ने पुणे हादरले

समस्त बिनधास्त पुणेकरही, स्वाईन फ्लूने सॉलिड टरकले ॥१॥


हा काय प्रकार आहे, कुणाला काहीच नाही कळले

त्यामुळे सर्वजण अगदी, निवांत आणि निर्धास्त राहीले ॥२॥

कोण फ्लू कुठला फ्लू, हा तर फ्लू मेक्सीकोतला

इतक्या लांब येईलच कसा, असा भ्रम लोकांना झाला ॥३॥

आधी एक नंतर दोन, पाहता पाहता बरेच झाले


कळत नकळत त्या राक्षसाने, विक्राळ रूप धारण केले ॥४॥

सहज पळणारे पुणेकरआता, सैरा वैरा पळू लागले

काय करावे काय नाही, काही कुणा समजेना झाले ॥५॥

देशाच्या नकाशात स्वाईन फ्लूसाठी, पुण्याने पहिला नंबर लावला

देशभरात स्वाईन फ्लूने, पुण्यात पहीला बळी मिळवला ॥६॥

एक गेला दोन गेले, करता करता दहा गेले

हे पाहून पुणेकरांसह, पाहुण्यांचेही धाबे दणाणले ॥७॥

गाड्या एस.टी. खाजगी बसेस, यांना लोकांनी दाखवली पाठ

पुण्याबाहेर जाणारी वाहने, मात्र प्रवाशांनी भरली दाट ॥८॥

शाळा बंद सिनेमे बंद, मंडई बंद बाजार बंद

सगळे व्यवहार पुणेकर जनतेने, केले उत्स्फूर्त बंदच बंद ॥९॥

बिनकामी बाहेर फिरणारे, घरात बसून "बोअर" झाले

नाईलाजाने बाहेर पडणारे, रूमाल मास्क लावू लागले ॥१०॥

चिकीत्सा आल्या, स्वयंसेवी आले, प्रतिबंधात्मक उपाय आले,


त्याने मात्र इतकेच झाले, मास्क, निलगीरीचे "मार्केट" वाढले ॥११॥

सर्व पुणेकर लावतात रांगा, अगदी कोणत्याही कारणासाठी


शाळा प्रवेश, रेल्वे तिकिटे, आणि चितळ्यांच्या बाकरवडीसाठी ॥१२॥

जो तो घाबरून पळू लागला, स्वाईन फ्लूपासून सुटकेसाठी

पुणेकरांनी लावल्या रांगा, चिकीत्सा आणि तपासणी साठी ॥१३॥

एखादा शिंकला एक खोकला, वर्तमानपत्रात तो झळकला

स्वाइनफ्लूचा एक मृत्त्यूही पहिल्या पानावर ठळक प्रकटला ॥१४॥

एक गेला, दोन गेले, आकडा दहावर जाऊन पोहोचला

नंतर मात्र "मिडिया"वाल्यांचा, सर्व उत्साहच ओसरून गेला ॥१५॥

सरकार मात्र शांतपणे, बैठका चर्चा घेतच राहिलं

सहावी पातळी जाहीर करायला, उशीर मात्र लावतच राहीलं ॥१६॥

एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येत एखादा बळी जाणारच,

असा मात्र दिशाहीन निष्कर्श पुन्हा पुन्हा काढत राहीलं ॥१७॥

दोन आठवड्यानी पुन्हा, व्यवहार सुरळीत चालू होतील

स्वाईन फ्लू आला होता, सारेच आता विसरून जातील ॥१८॥

किती निष्पाप गेले त्याची, नाही तमा, फिकीर कुणाला

जो तो आपल्या भावविश्वात, पुन्हा एकदा गुरफतून गेला ॥१९॥

मानवी आयुष्य आहे पहा, किती स्वस्त राज दरबारी,

सरकार मात्र शेखी मिरवतं, जनता रोगमुक्त आहे सारी ॥२०॥

खरचं स्वाईन फ्लू गेला?, की त्याचा जोर कमी झाला?

त्याचे उत्तर माहीत असेल, खरं तर फक्त परमेश्वरालाच ॥२१॥



श्रीराम पेंडसे
शब्दवेडा
आत्ता पर्यंत आयुष्यात, एकही शब्द लिहीला नव्हता
आता अतिव दु:खानंतर, शब्दच शब्द फ़ुटला होता
अशा दु:खी भावविश्वात, नातलग मात्र होते पारखे
अस्थीर मनाच्या आधाराला, होते सोबती तुझ्या सारखे
मी कसला भावुक होतो? मन करपून गेलं होतं
तुझ्यासारख्या जिवलगांची आशेने वाट बघात होतं
जेंव्हा सखा जिवलग होतो, त्याला बोलवावे लागत नाही
त्याला तुमचे मन कळते तेंव्हा तो यायचा थांबत नाही
लेखणी माझी सखी होते तीच माझी जिवलग असते
सखी विरहाचे दु:ख डोंब घेऊन, तीच कागदावर प्रकट होते
स्वप्नं फ़क्त कवितेत असतात तिथे वास्तवाला थारा नसतो
भावनांची तार तुटली आहे, हेच काळ सांगत असतो
मनाचे घाव भरत नाहित तुटलेली तार जोडता येत नाही
गेलेलं माणूस परत येत नाही, सतार सुरात झंकारत नाही
झंझावातासारखे शब्द येतात रिकाम्या मेंदूत गर्दी करतात
आपल्या अर्थ मोहिनीचा, तिथे स्वर्ग उभा करतात
मनाला तडा गेलेला असतो, शब्द तो सांधू पाहतात
आपल्या अर्थपूर्ण मायेची त्याला मलमपट्टी करतात
कधीतरी सांधून येईल का, मनचिताच्या काचेचा तडा
जर तो तसा सांधून आला तर मी असेन शब्दवेडा



श्रीराम पेंडसे
संस्कृती

खर तर हा विषय लिहीण्यासाठी, चर्चेसाठी घ्यायचा म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाने शिवधनुष्याला हात घालण्या सारखे आहे. म्हणजे या विषयावर लिहीण्याची माझी पात्रता आहे का हे मला माहीत नाही. पण धाडस करतोय. त्याबद्दल क्षमस्व. मला जेव्हढे माहीत आहे ते सांगतो. जिथे माझे चुकत असेल तर नसे नि:संकोच सांगावे.



प्रथम संस्कृती म्हणजे काय ते पाहूया. संस्कृती या शब्दाचा शब्दकोषातला अर्थ असा : "संस्कृती म्हणजे कल्पना, विचारधारा आणि दृष्टीकोन यांची त्या त्या समाजात रूजलेली परंपरा. संस्कृती म्हणजे मानवी ज्ञान, विश्वास आणि वागणूकी, ज्या सामाजिक विचारांवर अवलंबून आहेत त्यांची एकत्रित संरचना. संस्कृती हे एखाद्या विचाराचे समूहाचे, मूल्यांचे एकत्रिकरण आहे जे त्या गटाचे प्रतिनिधित्व करते." वाचूनच दम लागला ना? म्हणून मग मी त्याचा साधा सोपा असा अर्थ लावला की संस्कृती म्हणजे "धर्म". धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे नव्हे. ही वर सांगितलेल्या विचारधारांची मानवाने त्याच्या सोयीसाठी ठेवलेली नावे आहेत. आता धर्म या शब्दाची एक मजेदार व्याख्या पहा. "धर्म म्हणजे A natural physiological behavioural pattern of a specie. जसे शिकार करणे ही वाघाची नैसर्गिक कृती आहे. म्हणून तो त्याचा धर्म आहे. संस्कृती या शब्दाचा संधी हा "सं + कृती" असा करता येइल. इथे "कृती' म्हणजे समाजातले वागणे, बोलणे, राहणीमान, पोषाख यांच्या आचरण्याच्या पद्धती. "सं" याचा मी घेतलेला अर्थ म्हणजे संतुलीत, संस्कारीत असे म्हणता येइल. अगदी साधा सोपा अर्थ घ्यायचा झाला तर संस्कृती म्हणजे संस्कारीत कृती. A balanced or processed Action. आता संस्कार म्हणजे काय ते पहा. संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीचे, प्रथेचे एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेले परीणाम. ही गोष्ट समजण्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो. पोळी करण्यासाठी प्रथम गव्हाच्या पिठात पाणी घालतो व कणिक मळतो. म्हणजे त्यावर पाण्याचे संस्कार झाले. म्हणजेच त्या पिठाचे कण त्या पाण्यामुळे एकत्र आले, एकमेकाना बांधले गेले. नंतर पोळी लाटतो. म्हणजेच त्या मळलेल्या पिठावर वजनाचे, दाबाचे संस्कार झाले. नंतर ती पोळी तव्यावर टाकतो. नुसती तव्यावर टाकून चालणार नाही. त्याखाली उष्णता हवी. त्याशिवाय पोळी तयार होणार नाही. म्हणजे त्यावर उष्णतेचे संस्कार आले. तसे हे आहे. नुसती कणिक, पाणी, आणि शेगडी किंवा गॅस असे शेजारी शेजारी ठेऊन पोळी तयार होईल का? नाही. हे तीनही संस्कार झाल्याखेरीज ती पोळी तयार होणार नाही. ते परिणाम कसे आहेत म्हणजे चांगले की वाईट हा वेगळा मुद्दा आहे. कारण चांगले आणि वाईट या सापेक्ष गोष्टी आहेत. कशापेक्षा चांगले, वाईट हे कोण ठरवणार? म्हणून चांगले की वाईट या वादात न पडता संस्कारीत कृती म्हणजे काय ते समजून घ्यावे.


आता हे संस्कार आले कुठून? कसे आले? तर मानवाच्या या पृथ्वीवरील अस्तित्वापासून याचा उगम आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून शिकत असतो. तो जे काही शिकतो ते पाहून पाहूनच शिकतो. म्हणजे असे पहा की त्याची आई सतत त्याच्याशी बोलत असते. मग त्याची वाणी विकसीत झाली कि तो आपल्या आईचे शब्द म्हणायला शिकतो. ते मूल जसजसे वाढत जाते, त्याची बुद्धी विकसित होते तसतसे ते मूल आजूबाजूच्या व्यक्ती कश्या बोलतात, ते पाहून त्यांची नक्कल करू लागते. अगदी सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गातली मुले त्यांच्या बाईंची नक्कल करतात. घरी आल्यावर "शाळा शाळा" खेळतात. नंतर ते मूल मोठे होते. पहिली ते पांचवीपर्यंतच्या काळात त्याच्या ज्ञान मिळवण्याच्या कक्षा वाढत जातात. म्हणजे आता तो फक्त आईकडूनच शिकत नाही तर आता शिक्षक, मित्र, मित्र मैत्रिणींचे पालक या सगळ्यांचे अनुकरण करायला सुरूवात होते. आणि मग पांचवीच्यापुढे दहावीपर्यंतचा काळ हा या सर्वांचे संस्कार मनावर, शरीरावर, व्यक्तिमत्वावर कोरले जाण्याचा, पक्के रूजण्याचा काळ असतो. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात झालेले संस्कार पुसले जात नाहीत. बदलू म्हटले तरीही बदलले जात नाहीत. म्हणून हा काळ फार महत्त्वाचा आहे.


माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून प्रगती करत आहे. निरनिराळ्या गोष्टी शिकत आहे. निरनिराळे शोध सतत लावत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसागणीक माणूस प्रगतच होत आहे. आधुनिक युगात विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले आयुष्य सुलभ व कष्टहीन बनवले आहे. एकविसाव्या शतकात कष्टहीनतेच्या नादात सांस्कृतीक बदल होणे अपरिहार्य आहेत. परंपरागत चालत आलेल्या चाली रीती बदलणार नाहीत. बदलेल ते त्यांचे सादरीकरण. पूर्वीच्या काळी देवाची पूजा अर्चा यांचे खूप प्रस्थ असे. आता कालानुरूप त्याचा कालावधी कमी झालाय. पूर्वी गुरूजी पूजा सांगत असत. आता त्यांची जागा स्त्री पुरोहितांनी घेतली आहे. पूजेतल्या क्रियांचा अर्थ माहीत नसे. गुरूजींनी सांगितले की पाणी हातावरून सोडा की आपण ते सोडतो. पण ते का तसे सोडायचे हे माहीत नसते. त्याचा आता अर्थ सांगितला जातो. अनादी काळातल्या धार्मिक उपचारातला त्याकाळी गरजेचा असलेला पण आताच्या युगात अनावष्यक असलेला भाग गाळून त्यात सुटसुटीतपणा आणला गेला आहे. अर्थात त्यामागे वेळ नाही हे कारण प्रमुख आहे. अजूनही वेळ नसण्याच्या आजच्या आधुनिक संगणकाच्या युगातही आपणाला पूजा वगैरे उपचार करावेसे वाटतात हे संस्कारांचे लक्षण आहे. मग त्याच्या पद्धतीत बदल करतो. हल्ली गुरूजी मिळत नाहीत ही खंत आहे. कारण आता पाठांतराचा जमाना राहीला नाही. त्यातून आंग्लाळलेल्या संस्कृतीत संस्कृत भाषा म्हणजे आणखी अवघडच काम. शब्दोच्चाराचीच पंचईत. त्यामुळे पौरोहित्य हा प्रकार दुर्मिळ होत चालला आहे. पण संस्कार मनावर ठसलेले असल्याने पूजादि कार्ये आणि विधी करायचे तर असतात. मग यजमानानेच पोथी वाचून पूजा सांगणे हे आलं. त्यासाठी सुलभ पोथ्या तयार झाल्या. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने त्या त्या पूजेचे, संस्काराचे सुटसुटीकरण केले. कालानुरूप कालबाह्य झालेले उपचार गाळले. आजच्या काळाला अनुसरून योग्य ते उपचार ठेवले. त्यापुढेही जाऊन त्या त्या पूजेच्या कॅसेट, सी,डी, निघाल्या कि ज्यावरून पूजा सांगितली जाऊ लागली. गुरूजींची गरज संपली. पण परंपरा नाही संपली. संस्कार नाही लोप पावले. त्यांचा प्रभाव कमी नाही झाला. काळाप्रमाणे त्याचे अनुसरण्याचे मार्ग बदलले.

तिच गोष्ट इतर चाली रीतींबद्दल आहे. पोषाखाचे पहा. कसा काळानुरूप पोषाख बदलत गेला. मला आठवतय की मी कॉलेजमधे असताना म्हणजे सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी मुली साड्या नेसून येत असत, मुले मोठ्या बॉटमच्या किंवा बेल बॉटम पँट आणि शर्ट वापरत असत. आता आज साडी अदृश्य झाली आहे. तिचे स्थान आता लग्न समारंभापुरते सीमित राहिले आहे. झब्बा, कुडता , शेरवानी, धोतर, फेटे हे प्रकारसुद्धा लग्न समारंभापुरते मर्यादित राहिले आहेत. हा संस्कृतीतला बदल आहे का? नाही. माझ्या मते हा काळानुरूप झालेला सादरीकरणातला बदल आहे. आपल्या संस्कृतीवरचे हे पाश्चात्य संस्कृतीचे हे आक्रमण आहे हे मात्र नक्की. आपण आंग्लाळलो आहोत. त्याचे हे परीणाम आहेत. पण तरीही काही भागात जिथे या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला नाही अश्या भागात अजूनही आपली परंपरा पाळली जाते. अगदी साधे एक उदाहरण देतो. मला आठवतय कि माझ्या लहानपणी संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावत असत. नंतर परवचा म्हटला जाता असे. म्हणजे, रामरक्षा, मारूती स्तोत्र, "शुभंकरोती...." म्हटले जात असे. पाढे पाठ करून ते यावेळी म्हणायची पद्धत होती. आणि हे सगळे केले नाही तर जेवायला मिळत नसे. आज हे होत नाही. कारण याची ना मुलांना गरज भासते ना त्यांच्या आई वडिलांना. मग मुले साधी साधी बेरजा वजाबाकीची गणिते कॅलक्युलेटरवर सोडवतानाची केविलवाणी दृश्ये बघायला मिळतात. पाहून खेद होतो, कधी कधी राग येतो.



व्यक्तीवरच्या संस्काराचे अजून एक उदाहरण घेउया. लहानपणापासून आपल्यावर म्हणजे माझ्यावरतरी असे संस्कार झाले आहेत की आपल्यापेक्षा वडिलधार्‍या व्यक्तींना खाली वाकून नमस्कार करावा. अगदी पायाला हात लावून नमस्कार करावा. त्यांना मान द्यावा. त्यांच्याशी आदबीने बोलावे. वडिलधारी व्यक्ती म्हणजे फक्त वयाची वडिलकी असे नसून, एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असली तरी जर ज्ञानाने मोठी असली, तरीही त्या व्यक्तीला वडिलधारेपणाचा मान द्यावा अशी आम्हाला मिळालेली शिकवण. पण ही विचारधारा कुठेतरी लोप पावत चालली आहे असे उगाचच वाटून गेले. कारण आजा काल मुले घरात मुक्त वातावरण असल्याने कधी कधी उलटही बोलताना दिसतात. आणि ते पालकांकडून कौतुकमिश्रित हसण्यावारी नेले जाते. आणि मग असे लक्षात आले की हे कालानुरूप बदल झाले असू शकतील. इथे तुम्ही तुमच्या मुलांवर कसे संस्कार करता त्यावर हे अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आचार विचार, वागणूक याना फार महत्त्व आहे. कारण तेच पुढची पिढी उचलणार आहे. माझी प्राजक्ता नावाची एक मानलेली आणि अभिमानास्पद व्यक्तीमत्वाची मुलगी अमेरिकेत आहे. तिने तिच्या मुलावर योग्य आणि चांगले संस्कार केले आहेत. संस्कार केले म्हणजे काय केलय? असं कर, तसं कर, हे कर ते कर, म्हणून ती त्याच्या मागे लागली नाही. तिने कोणतीही गोष्ट मुलाला आग्रहाने किंवा मारून मुटकून शिकवली नाही. तर तिने स्वतःच्या वर्तनाचा वस्तुपाठ त्याच्यासमोर ठेवला. ती स्वतः आपल्या आई बाबाना, आजी आजोबांना, सासू सासर्‍यांना खाली वाकून नमस्कार करते. त्याप्रमाणे तो मुलगा आईचे बघून रोज देवाला नमस्कार करतो, रामरक्षा वगैरे स्तोत्रे म्हणतो. अमेरिकेत जाऊनही त्या मुलीने आपली संस्कृती सोडलेली नाही. ती आंग्लाळलेली नाही. ती स्वत: मनाने भारतीयच आहे, तिच्या सूक्ष्म मनाच्या गाभार्‍यात आपली संस्कृती घट्ट रूजलेली आहे, रूतलेली आहे. मी मागे म्हटलं आहे की आपण वागू त्याचे आपली मुले अनुकरण करतात. आपली वाणी आणि आपली कृती या एकमेकांना पूरक असायला हव्यात. तो चांगला नागरीक व्हावा म्हणून जे संस्कार करायला हवेत ते त्याचे आई वडिल जाणून बुजून आपल्या स्वतःच्या वागणूकीतून करतात. अर्थात ही गोष्ट खरी की त्या मुलांनाही ते घ्यावेसे वाटले पाहीजे. आणि एक गोष्ट नक्की की मुले वाईट गोष्टी चटकन उचलतात. म्हणून संस्कार कोणाचे याला खूप महत्त्व आहे. संस्कार हे चांगले किंवा वाईट असे नसतात. संस्कार हे संस्कारच असतात. ते जिथे रूजणार आहेत ती माती सक्षम हवी. सुपिक हवी. तरच येणारी फळे चांगली असतील. खडकावर बीज रूजणं हा फक्त दैवी चमत्कारच असतो. आणि जर हल्लीच्या काळात जर संस्कारांचे विडंबन झाले असेल तर त्याला प्रामुख्याने दूरदर्शनच सर्वस्वी जबाबदार आहे असेच मी म्हणेन. मग हे आपण बदलू शकत नसू तर "कालाय तस्मैनमः' असे म्हणून मी सोडून द्यायला शिकलोय. असो. मुद्दा हा आहे की आपण अजून संस्कृती सोडली नाहीये. आपण सवलती घेतो आहोत. कधी कधी त्याचा अतिरेक होतो.


संस्कृती संस्कृती म्हणत असताना, सुसंस्कृत असणं म्हणजे काय असाही प्रश्न बर्‍याचवेळा पडतो. सुसंस्कृत असणं याचा अर्थ पाहिला तर त्याला इतर अनेक कंगोरे आहेत. नुसतं लिहायला वाचायला येणं म्हणजे सुशिक्षित असणं. पण सुशिक्षित असलेला सुसंस्कृत असेलच असं नाही. दोन्ही मध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. उच्च विद्याविभूषित असणारा, मोठ्या हुद्द्यावर काम करणारा, गलेलठ्ठ पगार घेणारा मनुष्य सुसंस्कृत असेलच असे नाही. भलेही तो घरी देवाधर्माचं करत असेल, परंतु माणसाशी माणूस म्हणून वागणं जर त्याला जमत नसेल तर तो सुसंस्कृत आहे असं मी म्हणणार नाही. हेच.. एखादा अडाणी, शेतमजूर.. मिळणारे पैसे देवाधर्माच्या नावाखाली न घालता, जर एखाद्या गरजूला देत असेल, बायको-मुलांना सुखी ठेवण्यासाठी धडपडत असेल तर तो सुसंस्कृत आहे असे माझे मत आहे. समाजाला (यामध्ये कुटुंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी, आणि इतर समाज हे सगळेच आले) कोणत्याही प्रकारे त्रास होईल असं वर्तन न करणारा म्हणजे सुसंस्कृत अशी व्याख्या मी माझ्या पुरती केली आहे.
शेवटी संस्कृती संस्कृती म्हणजे आहे तरी काय....?? "जुने ते सोने.." असा सूर न लावता काळानुरूप जे योग्य ते उपयोग्य असे मानले तर सामाजिक जाणिवेची संस्कृती जपणं म्हणजे संस्कृती !! "कालाय तस्मै नम:" म्हणताना आपणही त्या बदलत्या काळाचा एक भाग आहोत हे विसरून कसं चालेल? बरोबर ना?
आरोग्यम् धनसंपदा - १० : पाठ दुखी

मागच्या लेखात आपण दमा किंवा श्वासाचा विकार पाहिला होता. आजच्या वेगवान आणि वेळेचा विचार न करता काम करण्याच्या युगात आणखी नेहमीच आढळणारी व्याधी म्हणजे पाठ, कंबर दुखी, मान दुखी. विषयाचा आवाका तसा मोठा आहे. त्यामुळे या भागात आपण पाठ व कंबरदुखी याचे स्वरूप कारणे याचा विचार करू. (मानदुखी याचा विचार नंतर स्वतंत्ररीत्या करू.) यावरचे योगावर आधारलेले उपचार आणि इतर उपचार याचा विचार पुढच्या भागात करू.

आपल्या कामाची पद्धत, आपली बैठक, त्या अवस्थेत किती वेळ बसून राहतो यावर त्या व्याधीची तीव्रता अवलंबून असते. आजच्या युगात सर्वसामान्यपणे आढळणारी ही व्याधी आहे. या लेखात आपण पाठदुखी/कंबर दुखी याचा विचार करू, आणि मानदुखी यावर नंतर पाहू. पाठदुखीवरचे उपचार पाहण्यापूर्वी प्रथम पाठदुखी म्हणजे नक्की काय ते पाहू. ढोबळमानाने पाठदुखी म्हणजे छातीचा मागचा भाग, कंबर कुल्ले या अवयवात सतत किंवा अधून मधून वेदना होणे. पाठदुखी किंवा वेदना म्हणजे तरी काय? तर त्या ठिकाणचे स्वास्थ्य बिघडणे. तिथे काहीतरी बिनसल्याची जाणिव होणे.

पाठीच्या कण्याला दुखापत होणे हे महत्त्वाचे कारण आहे. बर्‍याचवेळा काय कारणाने पाठ दुखायला लागली ते कळतही नाही. आपपण वाहन चालवताना खड्ड्यातून वाहन गेले तर पाठीच्या मणक्याला दुखापत होऊ शकते. काही काही रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्सचा अतीरेक असतो. हे स्पीड ब्रेकर्स हे "बॅक ब्रेकर्स" आहेत. खेळाडूना पाठीची दुखापत लवकर होण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ क्रिकेटमधे वेगवान गोलंदाजाना पाठीचे दुखणे लवकर लागू शकते.

काम करताना आपली बसण्याची पद्धत ही सुद्धा बर्‍याचदा कारणीभूत असते. आपण बसताना पोक काढून बसतो. कारकून खुर्ची आणि टेबल यांच्या उंचीचे प्रमाण कधी कधी योग्य नसते. त्यामुळेबसण्याची वेडीवाकडी स्थिती होते. संगणकासमोर बसून काम करताना बर्‍याच वेळा खुर्ची गोल फिरणारी असते. किंवा खुर्चीत बसून काम करताना एखादा कागद किंवा काहीही वस्तू हवी असल्यास ती खुर्चीवरून न उठता वेडे वाकडे हात वारे करून घ्यायची सवय लागते. किंवा काही वेळा आपण बसलेलो असताना एखादी वस्तू वार्‍याने म्हणा किंवा इतर कारणाने पडायला लागली असताना आपण अचानक घाई घाईने हालचाल करतो. आणि हात वळवून ती वस्तू चटकन धरण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी स्नायूंची वेडी वाकडी हालचाल झाल्याने ते लचकतात. एखादी जड वस्तू उचलताना ती योग्य पद्धतीने उचलली गेली नाही तर पाठीत उसण भरू शकते. आपण उत्साहाच्या भरात उचलायला जातो. वजन उचलायचे असल्यास किंवा ढकलायचे असल्यास ते एका विशिष्ट पद्धतीनेच उचलावे लागते. तरच पाठीच्या कण्याला त्रास होत नाही. अन्यथा पाठीच्या कण्याला दुखापत होते. मणका सरकणे, त्यातील अंतर कमी होणे वगैरे प्रकार होतात.

पाठदुखी आणि कंबरदुखी यावरईल उपचार पाहण्या पूर्वी त्यामागचे शरीरशास्त्र पाहूया. आपण कोणत्याही स्थितीत असलो तरी गुरूत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरावर दाब पडत असतो. त्यात पाठीच्या कण्यावर येणारा दाब हा उभ्या, बसलेल्या आणि झोपलेल्या अवस्थेत निरनिराळा असतो. झोपलेल्या अवस्थेत ७ कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी, उभे असताना १० कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी आणि बसलेल्या अवस्थेत १५ कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी असा असतो. म्हणजेच बसलेल्या अवस्थेत दाब सर्वाधिक असतो. हल्लीच्या आधुनिक जीवनात बैठे काम अधिक असते. आणि म्हणून ज्यांना बैठे काम अधिक करावे लागते त्यांना पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आणि म्हणून हल्ली पाठदुखीचे प्रमाण अधिक वाढले आहे. आपल्या पाठीच्या कण्यात एकूण ३३ मणके आहेत. ते एकमेकांवर एखाद्या लगोरीसारखे रचलेले असतात. आणि ते स्नायुंच्या सहाय्याने पक्के बांधलेले असतात. त्याची सहजा सहजी मोड तोड होत नाही. आपल्या मानेत सात मणके, छातीत बारा मणके, कमरेत पांच, कटीबंधात पांच तर शेपटात चार मणके असतात. उत्क्रांतीच्या ओघात शेपूट गळून गेली. आणि त्यामुळे शेपटीतले मणके हे एकमेकांना जोडले गेले. आता यात कमरेतले पांच मणके हे रूंद आणि मोठे असतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त दाब सहन करू शकतात. वजन पेलू शकतात. तिथली हालचाल ही वळणे, वाकणे अशा प्रकारची असते. म्हणून पाठ दुखत असताना डॉक्टर सांगतात की, "फार वळू नका, पुढे वाकू नका" छातीतले मणके मध्यम आकाराचे असतात. त्यामधे त्यामानाने वळण्याची हालचाल जास्त आहे. मानेतले मणके हे सर्वात लहान. त्यामुळे त्यात हालचाल मुक्त असते. पण मग ते तसे नाजूकही असतात. जेंव्हा मूल जन्माला येते तेंव्हा त्याचा पाठीचा कणा हा एखाद्या दोरीसारखा सरळ असतो.पण नंतर मूल जसे डोके वर उचलू लागते तस मानेत कणा पुढील बाजूने वक्र व्हायला लागतो. आणि अशा तर्हेने वय वाढायला लगले की कणा पूर्णपणे विकसित होताना छातीच्य भागात पुढील बाजूने आंतर्वक्र व कमरेच्या भागात पुढील बाजूने बहिर्वक्र होतो. दोन मणक्यामधे एक रबरी चकती सारखी वस्तू असते. ती चकती एखाद्या शॉक ऍबसॉर्बरसारखे काम करते. त्यामुळे धक्के अधिक चांगल्या प्रकारे सहन केले जातात. या मणक्यातील छिद्रातून चेता बाहेर पडत असतात. आता हा पाठीचा कणा मांडीतल्या हाडामधे म्हणजेच खुब्यातल्या सांध्यामधे एखाद्या उलट्या लंबकासारखा आहे. त्यामुळे यात पुढे वाकणे ही क्रिया नैसर्गिक आहे. मागे वाकणे ही क्रिया मर्यादीत आहे.

आधुनिक जीवनशैलीत आपाण या खुब्याच्या सांध्यात असलेली हालचाल, तिथले स्थितीस्थापकत्व घालवून बसलो आहोत. सर्व सामान्यपणे असे दिसून येईल की पुढे वाकताना आपण कमरेतून वाकण्याच्या ऐवजी गुढघ्यातून वाकतो. कंबर स्थिर ठेवून संपूर्ण कणा पुढे किंवा मागे नेणे हे होत नाही.कण्याच्या व्याधी सुरू होण्याचे मुख्य कारण म्हणजे कण्याची हालचाल जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. वाकडी तिकडी करतो. उदहरणासाठी आपण असे पाहूया की एक व्यक्ती बँकेत कारकून आहे.त्या व्यक्तीला सतत उजवा हात पुढे घेउन काम करावे लागत आहे. असे झाले की खांदे आणि पाठीचा कणा यत असणार्या तराजूसारख्या रचनेचा तोल बिघदतो. ती व्यक्ती असे वर्षानुवर्षे काम करत राहीली की त्याकण्याची वाकडी स्थिती व्हायल लागते. तोअल धळतो. दोन मणक्यामधे सूज यायला लागते. आणि अशी सूज आली की हालचाल बंद होते. ही हालचाल बंद होणे ही शरीराने केलेली संरक्षणाची नैसर्गिक व्यवस्था आहे. पण आपन काय करतो की अशी हालचाल बंद झाली की जबरदस्तीने हालचाल करतो. कारण अशी हालचाल बंद होणे हे परवडण्यासारखे नसते. मग तात्पुरत्या वेदनाशामक औषधे घेऊन काम पुढे सुरू ठेवतो. पण त्याने मूळचे कारन दूर होत नाही. बरे वेदनाशामक औषधांना मर्यादा असतात. ती फार काळ घेता येत नाहीत. आणि मग अशी स्थिती येते की त्या औषधांचा उपयोग होईनासा होतो. हळूहळू वरचा मणका खालच्यावरून सरकायला लागतो, त्यात 'गॅप' पडायला लागते. वेड्या वाकड्या स्थितीमुळे चकतीवर असमतोल दाब पडून ती झिजायला लागते. किंवा ती मागे ओढली जाते आणि माग दुखण्याची न संपणारी मालिका सुरू होते. कधी कधी अतिरेक झाला तर मज्जारज्जूलाही ईजा पोहोचण्याच संभव असतो. स्पर्श, दाब, वेदना यातून निर्माण होणारा दाह हे एक दुष्टचक्र आहे. मग ती व्यक्ती आपल्याला दुखणार नही अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करते.व त्याने शरीराला वक्रता येते. पुढे पुढे हालचाल मंदावते. कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत बदल होतो. हालचालींवर बंधने येतात.स्नायूंचा आकार आणि लांबी यात बदल होतो. व शेवटी आपल्या पायवर त्याला उभे राहणे अशक्य होते. आणि मग सर्वसामान्य दृश्य असे दिसते की आता आपण गांभिर्याने यावर विचार करायला लागतो. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते, किंवा उशीर झालेला असतो.आणि हा दु:खद प्रवास शस्त्रक्रियेशी येऊन थांबतो.परंतु अश्या शस्त्रक्रियेनंतरहि दुखणे जाईल याची खात्री डॉक्टर देतीलच असे नाही. आणि मग रूग्ण हतबल होतो.

या दुखःद अवस्थेतून सहिसलामत बाहेर येणे शक्य आहे. त्यासाटी प्रयत्नपूर्वक वेळ देणे आणि बर्‍याच मनोनिग्रहाची गरज आहे. या पुढिल लेखात यावर यशस्वी मात करण्याचे उपाय पाहूया. यात दिनचर्या, औषधे, योगोपचार याचा समावेश असेल.



ॐ तत्सत्



श्रीराम पेंडसे

आरोग्यं धनसंपदा-९

॥ आरोग्यं धनसंपदा ॥

मागल्या लेखात आपण दिनचर्या यावर पाहीले होते. त्यात काही आसने पाहिली होती. ती आसने ही विशिष्ट रोगांवर उपयोगी होती. तसेच सर्वसामान्य लोकांनाही की ज्यांना काहीही झालेलेनाही अशांनाही ती उपयोगी पडतील असे मी म्हटले होते. आज आपण आता पुन्हा दिनचर्या यावर चर्चा करू. आपण पाहत आहोत की सध्या स्वाईन फ्लूने थैमान मांडले आहे. आणि हा श्वासाशी संबंधतीत विकार आहे. आपण जर नीट लक्ष देऊन पाहिलेत तर असे लक्षात येईल की स्वाईन फ्लूने दगावलेले सर्वजण किंवा अत्यवस्थ असलेले सर्व हे श्वास अडकल्याने, श्वास कमी पडल्याने अत्यवस्थ झाले आणि दगावले. हे सर्वजण "व्हेंटीलेटर"वर होते. म्हणून आज आपण दमा किंवा अस्थमा यासंबंधी पाहूया. दमा याला आयुर्वेदात तमक श्वास असे म्हणतात. तम म्हणजे अंधार. जो विकार अंधारात आपले गुण उधळतो म्हणजेच अंधारात, रात्री अधिक त्रासदायक असतो म्हणून त्याला तमक श्वास असे नाव आहे. यात रूग्णाला श्वासाला अडथळा निर्माण होतो, श्वास अडल्यासारखे वाटते. अर्थात छातीशी संबंधीत किंवा हृदयाशी संबंधीत लागणारा दम इथे याचा इथे विचार केलेला नाही. कारण त्याच्या चिकित्सेची दिशा ही पूर्णतया निराळी आहे. याला आधुनिक वैद्यकशास्त्रात "कार्डिऍक अस्थमा" म्हणतात.


आता याची कारणे पाहू. साधारणपणे दमा हा एक ऋतू संपताना आणि दुसरा सुरू होताना होतो. थंडी पावसाळ्यात याचा जोर अधिक असतो. हवेतील आर्द्रता, ढगाळ वातावरण यात हा तीव्रतेने आढळून येतो. या शिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रदूषण. यामुळे होणार्‍या दम्याला आधुनिक वैद्यकात "ऍलर्जिक ब्राँकायटिस" म्हणतात. यात टायरचा वास, धूर, धूळ, विशिष्ट मेणाचे वास, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व विषारी वायू, कचरा पेटीतील वास आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहनांच्या संख्येमुळे होणारे, वायू प्रदूषण यामुळे फुफ्फुसांच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि दम लागणे, श्वास अडकणे असे त्रास सुरू होतात. ऍलर्जी असल्यानेही श्वासाचा त्रास होउ शकतो. सामान्यपणे पपई, आंबा, संत्रे, केळं, चिक्कू, पेरू,अननस, कलिंगड तसेच काकडी, टॉमेटो, फळांचे थंड रस, किंवा मिल्क शेक्सफळभाज्या फ्रीजमधले पाणी अश्या अनेक गोष्टींची ऍलर्जी होऊ शकते. म्हणून या सर्व वस्तूंचा वापर हा तारतम्याने करावा. यापैकी आपणच आपणास कशाची ऍलर्जी आहे हे पाहून त्याप्रमाणे त्या त्या वस्तूचा वापर टाळल्यास या रोगावर विजय मिळवणे शक्य आहे.


इतर कारणांत सतत गारव्यात काम करणे म्हणजे ए.सी. मधे बराच वेळ काम करून लगेचच गरम वातावरणात बाहेर येणे, जेवणानंतर दूध, फळांचा ज्युस, आईसक्रीम खाणे, वारंवार फ्रीजचे पाणी पिणे, वारंवार जेवणात फळांचा वापर करणे ही कारणे आहेत. तसेच रोजच्या जेवणात डालडा आणि रिफाईंड तेलाचा वापर हेही कारण असते. आजच्या युगात रोजच्या जेवणात डालडाचा वापर खूपच कमी असतो. पण बाहेरच्या हॉटेलमधील पदार्थात तो वापर बराच असतो. त्यामुळे नेहमी नेहमी बाहेरचे खाण्याची वेळ ज्यांच्यावर येते त्यांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा अतिरेकी वापर, शिळी मिठाई, शिळे अन्न तसेच अतिप्रमाणात बटाटा वांगे, अळू खाण्यानेही याचा त्रास होऊ शकतॉ. अर्थात सर्वांना त्रास होइलच असे नाही. पण ही कारणे असू शकतात हे लक्षात ठेवावे. म्हणजे आपणास कशाने त्रास होतो आहे हे समजले तर त्याप्रमाणे उपाययोजना करता येऊ शकते.



दम्याच्या लक्षणांचा विचार करायचा झाला तर त्यात वारंवार होणारी सर्दी, वेळी अवेळी तोंडातून पडणारे कफाचे बेडके, ताप, कणकण, शिंका येणे, डोकीदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यातून पणी येणे अश्या लक्षणांचा समावेश आहे. तसेच इतर आण्खी लक्षणात छातीत गच्च होणे, श्वास लागणे, श्वास कमी असल्याची जाणिव होणे, छातीतून आवाज येणे अशी लक्षणे असतात. आणखी एक प्रमुख गोष्ट म्हणजे यात झोपल्यावर त्रास वाढतो, पण उठून बसल्यावर बरे वाटते. पण दमा छातीच्या विकाराने, हृदयाच्या त्रासाने असेल म्हणजेच "कार्डिऍक अस्थमा" मुळे दम लागत असेल तर मात्र झोपल्याने, विश्रांतीने बरे वाटते. शिवाय इतर किरकोळ कारणात शिंकेचा अवरोध केल्याने दम लागणे कृमी, जंत मल मूत्रप्रवृत्तीचा अवरोध यांचा समावेश आहे.


आता याच्या चिकित्सेचा विचार करूया. यात चिकित्सेच्या तीन दिशा आहेत. एक म्हणजे औषधविना चिकित्सा, घरात उपलब्ध असणारी द्रव्ये वापरून केलेली चिकित्सा आणि ग्रंथोक्त चिकित्सा. सर्वप्रथम औषधविना चिकित्सा पाहूया. यात दीर्घ श्वसन आणि प्राणायाम याचा समावेश आहे. जवळ कोणते औषध नसेल तर गरम पाणी सतत पीत राहवे. त्याने श्वासनलिका प्रसरण पावतात व फुफ्फुसातला वायू मोकळा होतो. तसेच त्रास असताना सतत लवंग चघळत राहवी. दीर्घ श्वसनात हवा हळू हळू आताघेऊन हळू हळू सोडावा. आणखी एक गोष्ट आवर्जून करावी. ती म्हणजे संध्याकाळी लवकर जेवावे. सूर्यास्ताच्या सुमारास जेवावे. संध्याकाळी ६ ते ६.३० नंतर जेवायचे नाही असा निश्चय करावा. साधी सहज उपलब्ध असणारी द्रव्ये वापरून उपचार करताना लवंग चघळावी असे मगाशी सांगितले आहेच. दूध प्यायचे असल्यास पिंपळी सिद्ध किंवा लसूण सिद्ध दूध प्यावे. ते बाधत नाही. व त्याने कफवृद्धी होत नाही. हे दूध तयार करताना एक कप दूध आणि एक कप पाणी एकत्र करावे. त्यात लहान मुलांसाठी करायचे असल्यास ३ ते ४ पिंपळ्या आणि मोठ्या माणसांसाठी १०पिंपळ्या किंवा लसणीच्या ४-५ पाकळ्या त्यात मिसळून ते मिश्रण एक कपाइतके उरवावे. त्यात चवीप्रमाणे पत्री खडीसाखर मिसळून असे दूध प्यायला हरकत नाही. इथे एक खुलासा करतो. पिंपळी आणि पिंपळ वृक्ष याचा काहीही संबंध नाही. पिंपळी हे मिरे किंवा नागवेल या कुलातले असून त्याचा वेल असतो. मिर्‍यासारखी फळे याला येतात. फरक इतकाच की मिरे साबुदाण्यासारखे गोल असतात तर पिंपळी ही लांबुळकी असते. म्हणून याला "लेंडी पिंपळी" असेही म्हणतात. पिंपळी हे निसर्गातले श्वासाच्या अवरोधावरचे सर्वोत्तम औषध आहे. अवरोध म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास कमी पडणे. त्रिकटू चूर्ण दोन चिमूट चूर्ण पाण्यात उकळून गार करून घेणे. त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरे आणि पिंपळी यांचे समभाग चूर्ण असते. सहज उपल्ब्ध असणार्‍या वनस्पतीत तुळशीची १० पाने रोज चावून खावीत. कोरफडीचा गर मिरपूड लावून खावा.

आता आपण ग्रंथोक्त उपचार काय आहेत ते पाहू. यात सांगितलेली औषधे सामान्यपणे बाजारात "रेडी मेड" उपलब्ध असतील. एखादे औषध न मिळाल्यास पुण्यात शनीवार पेठेत "हरी परशुराम औषधालय" इथे मिळू शकतील. अर्थात ही औषधे घेताना तज्ञांचा सल्ला घेतल्याखेरीज वापरण्याचा विचार करू नये. तज्ञांचा सल्ला इतक्यासाठीच घ्यायचा की रूग्णाच्या अवस्थेनुसार रोगाच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार त्या औषधांची मात्रा, घेण्याचे प्रमाण, व घेण्याच्या वेळा बदलतील.


ज्यावेळी वेग जास्त असेल म्हणजेच आजार अधीक तीव्र असेल तेंव्हा कनकासव १ ते २ चमचे तितक्याच पाण्याबरोबर देणे. मात्र कनकासवात धोत्रा असल्याने त्याचा वापर अगदी गरज असेल तेंव्हा करावा. खोकल्याचा त्रास कमी झाल्यावर थांबवावे. त्रास जास्त असेल तर चौसष्ट पिंपळी चूर्ण मधातून चाटवावे. साधारण हरभर्‍याच्या दाण्याइतके चूर्ण चार पांच वेळा मधातून चाटवावे. रजन्यादिवटी सतत चघळत राहणे. हा हळद, कोरफड आणि कडू जिरे याचा पाठ आहे. अगदीच "इमर्जन्सी" आली तर श्वासकुठार २ गोळ्या कुटून मधातून घ्याव्यात. दिवसातून तीन चारवेळा हरकत नाही. पण श्वासकुठारचा वापर जितका कमीत कमी करता येईल तितका करावा. कारण यात मनशीळ यासारखी काही द्रव्ये आहेत ज्यांच्या अतीवापराने वाईट "साईड इफेक्ट्स" होऊ शकतात. आजाराचा जोर तीव्र असण्याच्या काळात छातीस महानारायण तेलाने मर्दन करावे. साधे तिळाचे तेल घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून किंचीत कोमट करावे आणि त्यातेलाने छाती चोळल्यासही चालेल. आणि असे छाती चोळल्यावर ती गरम पाण्याने शेकावी. व्याधीची तीव्रता असताना वापरण्याची आणखी दोन औषधे आहेत. त्यपैकी एक म्हणजे सुवर्णबृहत् वातचिंतामणी. याच्या दोन गोळ्या वेगावस्थेत घ्याव्यात. आणि दुसरे म्हणजे अभ्रक भस्म. हे शेंगदाण्याइतके घेउन मधात मिसळून ठेवावे. आणि दिवसातून चार वेळा द्यावे.

आता त्रासाची तीव्रता थोडीशी कमी झाली कि दमा गोळी, ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण या गोळ्या प्रत्येकी ३ घ्याव्यात, एकत्र कुटून त्या पाण्याबरोबर सकाळी आणि संध्याकळी घ्याव्यात. शिवाय २०० मि.ली. खोकला काढ्यात ५ ग्रॅ. पिंपळी चूर्ण मिसळून दोन्ही जेवणानंतर ४-४ चमचे तितक्याच पाण्याबरोबर घ्यावे. पोट साफ नाही असे वाटत असेल तर गंधर्व हरितकी १ च्मचा चूर्ण गरम पाण्याबरोबर रात्री जेवणानंतर घ्यावे. किंवा १०-१५ मनुका पान्यात भिजवून थेवून ते पाणी घ्यावे. लहान मुलांना बाहवा मगजाचा काढा द्यावा. ५ ते १० ग्रॅ. बाहवा मगज एक कप पाण्यात टाकून त्याचा अर्धा कप उकळवावा. यात अंगात ताकद राखून कफाचे विलयन करण्याची याची क्षमता आहे.

आता हे होऊ नये म्हणून काही करता येईल का? याला आयुर्वीदात अपुनर्भव चिकित्सा म्हणतात. यात वारंवार कफ होऊ नये, कायम फुफ्फुसे स्वच्छ आनी मोकळी राहवीत, हृदयाला बल मिळावे म्हणून अभ्रक भस्म १ भाग, घौसष्ट पिंपळीचूर्ण २ भाग, मृगशृंग भस्म १ भागा आणि अस्सल वंशलोचन १ भाग एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्यावे. लहान मुलांना हरभर्‍याच्या दाण्याइतके आणि मोठ्याना त्याच्या दुप्पट मधातून किंवा गरम पाण्यातून द्यावे. हेच वासापाक बरोबर घेतल्यास अति उत्तम. वासापाकाबरोबर चौसष्ट पिंपळी चूर्ण घ्यावे.

लहान मुलांना जंत कृमी यामुळे दमा होऊ शकतो. हे कायमचे काढण्यासाठी सतापा काढा २-२ चमचे पाण्याबरोबर द्यावा. मोठ्यांनी ४-४ चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावा. शिवाय कृमीनाशक वटी सकाळ आणि संध्याकाळी ३-३ गोळ्या कुटून पाण्यासह घ्याव्यात. आणि कपिलादीवटी ६ गोळ्या रात्री निजताना बारीक करून पाण्यासह घ्याव्यात. लघुमालिनीवसंत हे तापावरचे अगदी सोपे औषध आहे.


आणि समारोप करताना एक सूचना द्यावीशी वाटते ती ही की वारंवार होणारी सर्दी, खोकला, ताप याची परिणीती अनियंत्रीत दमा होण्यात होऊ शकते. यासाठी सर्दी खोकला हा आटॉक्यात राहील याची काळजी घ्यावी. म्हणजे दमा हा त्रासदायक ठरणार नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवता येईल.



श्रीराम पेंडसे