रणथंभोर राष्ट्रिय व्याघ्र प्रकल्प सहल
मी रोज सकाळी पर्वतीला जात असतो. जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात तिथे "इन सर्च आउटडोअर्स" यासंस्थेच्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजीत केलेल्या सहलींचे परिपत्रक मिळाले. माझे मेहुणे बरीच अभयारण्ये हिंडून आले आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. तेंव्हा ते म्हणाले की रणथंभोरला वाघ दिसण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. जून २३ला इन सर्च आउटडोअर्सची रणथंभोरची सहल होती. तेंव्हा त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. सहलमूल्य भरलं. आमचा १० जणांचा ग्रूप होता. ६ ज्येष्ठ नागरिक आणि उरलेले तरूण पिढीचे प्रतिनिधी असे आम्ही होतो. जायचा दिवस उजाडला. पुणे बस स्टेशनवर आलो. तिथे आमच्या ग्रूपचे इतर लोकही भेटले.
बस सुटली.सारे आपापल्या स्थानावर शांत झाले. मला संदीप खरेच्या "गाडी सुटली, रूमाल हलले, टचकन झाले डोळे ओले" या कवितेची आठवण झाली. इथे फरक इतकाच होता की इथे बस होती. गाडी नव्हती. निदान माझ्यापुरते तरी हलायला रूमाल नव्हते किंवा ओले होणारे डोळेही नव्हते. जे ओले होणारे डोळे होते ते घरी तरी होते, पुण्याबाहेर तरी होते किंवा कायमचे मिटलेले! आयुष्यात आपल्यासाठी कुणाचे तरी डोळे ओले होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाल्याचा हा इशारा होता. त्यालाच ज्येष्ठ नागरिकत्व म्हणायचं का? एकटा असा ट्रीपला कधी मी गेलो नव्हतो. अश्या मोठ्या ट्रीपला सौ. बरोबर असायची. भक्कमपणे पाठीशी असायची. पण आज ती नव्हती. जणू काही संपूर्ण बस मधे मी एकटाच आहे की काय असे वाटून गेले. एकटेपणाची खरी खुरी झळ आता जाणवू लागली होती. ग्रूप मधल्या सर्वांशी बोलणे झाले होते. पण अजून "तुम्ही कोण?, मी कोण?" या पातळीपर्यंतच ओळखपरेड पोहोचली होती. त्यामुळे त्यांच्याशी संभाषण ५/१० वाक्यांपलीकडे गेले नाही. आणि अश्या वेळी माझ्या नातीचा मेसेज आला. माझी मुलगी आणि घरातली जनता यांच्याशिवाय इतर कोणालातरी मी सहलीला जाणार आहे, हे माहित आहे आणि शुभेच्छा द्याव्या असे वाटतंय हे पाहून आनंद झाला, बरे वाटले. ही नात कोकणात डेरवणला असते. अनघा बापट तिचे नाव. अतिशय मनस्वी आणि लाघवी व्यक्तिमत्व. ही अनघा म्हणजे एक अजब रसायन आहे. त्याबद्दल विस्ताराने नंतर कधी तरी लिहिन. आत्ता फक्त इतकेच की तरल आणि भावूक कविता लिहिणे हा तिचा हातखंडा प्रयोग आहे. तसेच ललित आणि वैचारीक लिखाणातही ती उस्ताद. तिचा "शुभस्ते पंथानम्" मेसेज आला. तो असा :
"बस सुटली, रूमाल हलले, क्षणात सारे चित्र बदलले
झाडे मागे पळू लागली, गाडीमध्ये गडबड झाली,
कोणी आपले फोन उचलले, कोणी भेसूर सूर लावले,
गाडी सुटली बरे वाटले, एकदाचे सगळे स्वस्थ झाले"
आजोबांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने खास ही कविता लिहिली होती. केवळ पांच दहा मिनीटांत रचली. शारदेचा वरदहस्त घेउन आलेली ही मुलगी. आम्ही म्हणजे "र"ला "र" आणि "ट" ला "ट" लावणारे. ही मुलगी खरोखरच महान आहे.
खरंच गाडी सुटली आणि बरे वाटले. पण ते फार काळ टिकले नाही. आठवणी भरतीच्या लाटांसारख्या अंगावर येऊ लागल्या. आणि या मानसिक एकांतवासात तीन तासांत मुंबईला कधी पोहोचलो ते कळले नाही. दादरला उतरून टॅक्सीने मुंबई सेंट्रलला गेलो. पुढे जयपूर एक्सप्रेसने जायचे होते. दोन तासांचा अवधि होता. थोडी पोट पूजा केली. तिथे गाडी फलाटाला लागायची वाट बघण्यात ओळखी आणखी थोड्या गडद होत गेल्या. पुणे स्टेशनवर झालेल्या ओळखीच्या पातळीमधे आणखी वाढ झाली. संभाषणाची गाडी "तुम्ही कुठे राहता? पहिल्यांदाच येताय का? काय गरम होताय हो आज." या पातळीला येऊन पोहोचली. खरंतर ही सारी प्रश्नोत्तरे निरर्थक असतात. पण व्यक्ती कशी आहे? बोलायला हंवय का? गप्पांची हौस आहे का? एकमेकांच्यात मिसळायला हंवय का? याचा थोडा फार अंदाज येऊ शकतो. आणि मग ट्रीप आनंददायी जाणार की "बोअर" होणार हे लक्षात येते. आमच्यात दोन ज्येष्ठ नागरिक जोडपी होती. म्हणजे माझ्यादृष्टीने ते बाद. कारण एकट्या माणसाशी जोडप्याचा संवाद जुळणे सहसा अवघड असते. आणि ते बरोबरही होते. म्हणजे दहापैकी चार जण बाद. दोन तरूण होते. एक मुलगा आणि एक मुलगी. बहुतेक त्यांचे लग्न ठरले असावे असे वाटले. पण माहित नाही. काही अंदाज येत नव्हता. ते एकमेकांचे इतके जिवलग होते की, ते दोघे केवळ खोल्या वेगळ्या असल्यानेच, झोप आणि व्यक्तिगत आन्हिके सोडल्यास पूर्ण वेळ एकत्र असत. त्यांच्या भावविश्वात इतरांना प्रवेश नव्हता. त्यामुळे तेही बाद. उरले तीन. एक एकटे माझ्यासारखे ज्येष्ठ नागरिक आणि दोन तरूण मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. बस्स. या तिघांशीच संवाद साधण्याची शक्यता होती. तसा मी माझ्यापेक्षा वयाने खूप लहानात रमणारा. मला माझा एक लांबचा जावई म्हणायाचासुद्धा कि " काका, वयाने वाढला तरी मनाने लहानच राहिला." मला भा. रा. भागवतांचा "फास्टर फेणे" आवडतो, हॅरी पॉटर आवडतो. त्यामुळे तो मला असे म्हणाला असेल. मला माहित नाही. त्यामुळे तो निखिल नावाचा मुलगा आणि पूनम ही संगणकप्रणाली अभियंता यांच्याशी माझे छान सूत जुळेल असे वाटले. आणि तसेच झालेही. पण मनाच्या सुप्तकोपर्यात कुठेतरी शंका होती कि आपले "ज्येष्ठ नागरिक" यांच्याशी जमणे जरा अवघडच दिसतंय. एका "ज्येष्ठ नागरिक" जोडप्याबद्दल. सुरूवातीला बस स्टँडवर त्यांची भेट झाली तेंव्हाच त्यांच्या चेहेर्यावर मला थोडासा "कॅस्ट्रॉइल लूक" दिसला होता. पण मी माझ्या मनाचे खेळ असतील असे समजून दुर्लक्ष केले होते. त्यांच्याशी आपले जमेल असा माझा अंदाज होता, तो साफ चुकला. कसा ते पुढे येईलच.
गाडी फलाटाला लागली गाडीत बसलो. आणि इथे अजून एक सुखद धक्का वाट बघत होता. माझी मुंबईत एक मानलेली नात आहे. मुलुंडला असते. अद्विका तिचे नाव. आजवर तिला मी कधीही भेटलेलो नव्हतो. पण ती मात्र आज मला आवर्जून भेटायला आली. मी लिहिलेल्या एका कवितेतल्या ओळींचे प्रत्यंतर तेंव्हा मला प्रथम तिथे आलेलं होतं. कोण कुठली अद्विका? तिने मला यापूर्वी आयुष्यात कधीही पाहिलेही नव्हते. काय फोनवर बोलणे होत असेल तितकेच. पण केवळ तितक्या ऋणानुबंधावर तिला यावसं वाटलं? हा आश्चर्याचा पण सुखद धक्का होता. पोरगी कामावरून लवकर निघून मुद्दाम आजोबांना भेटायला मुलुंडहून धडपडत आली. मनात विचार आला की, "अरे इतक्या लांबून ही मुलगी दगदग करून भेटायला येते. मी हिच्या जागी असतो तर असे गेलो असतो का? " खूप खूप विचार करूनसुद्धा, "नसतो गेलो " असेच प्रामाणिक पण दुर्दैवी उत्तर पुन्हा पुन्हा, निदान त्यावेळी तरी येत होते. आज कदाचीत "गेलो असतो" असे उत्तर येइलही. कोणत्या अनामिक आपुलकीपोटी ही पोर भेटायला आली? कोणता ऋणानुबंध आहे हा? की गेल्या जन्मीचा हा बंध आहे? याची उत्तरे अजूनही मला सापडलेली नाहीयेत. मी बराच विचार करतो. पण या अनामिक मायेच्या ओलाव्याचे रहस्य उलगडलेले नाहीये. तेंव्हाही नव्हते आणि आजही नाही. आपल्यासाठी इतक्या लांबून कोणीतरी केवळ भेटण्यासाठी येऊ शकतं हा धक्काच मुळी सुखद होता, अनपेक्षित होता आणि न झेपणाराही होता. इथे मात्र माझे डोळे पापण्यांमागे ओले व्हायला लागले होते. केवळ वयाला शोभलं नसतं म्हणून त्या पाण्याला पापण्यांचे दरवाजे बंद केले. गाडी सुटण्यापूर्वी तिने मला वाकून नमस्कार केला. आजच्या युगात लोप पावत चाललेल्या संस्कारांच्या या दर्शनाने मात्र ते डोळ्यातलं पाणी, रखवालदाराची नजर चुकवून कैर्या पाडायला धावणार्या व्रात्य मुलासारखं, पापण्यांचे पहारे चुकवून बाहेर यायला धडपडूं लागलं. गाडी सुटली आत आलो. आणि दोन अश्रू बाहेर आले. आता मात्र मी त्याना थोपवलं नाही. बाहेर येऊ दिलं. गाडीने वेग घेतला आणि वातनुकूलित डब्याच्या थंडाव्यात ते अश्रू वाळून गेले.
सवाईमाधोपूर स्टेशनवर पाय ठेवला आणि राजस्थानी रणरणत्या ४०+ तपमानाचा पहिला फटका बसला. त्यातून ए.सी.तून बाहेर आल्यामुळे तो अधिक जाणवला. हॉटेलमधे जाण्यासाठी कँटरमधे बसलो. सीट्स वर बसलो तर भाजून निघत होते. पुढचे तीन चार दिवस काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आला. हॉटेलमधे आलो. थोडेसे ताजेतवाने होउन जेवणासाठी डायनिंग हॉलमधे आलो. एकटेपणा आता संपत आला होता. कारण तोपर्यंत ग्रुपमधल्या सहप्रवाश्यांच्या ओळखी आपण जणु काही सहज रोज भेटणारे आहोत इतक्या पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या. जेवणानंतर विश्रांती घेऊन दुपारी ४ च्या सुमाराला निघालो. आम्हाला सूचना दिल्या गेल्या होत्या की कँटरमधून कोणत्याही परिस्थित खाली उतरायला परवानगी नाही. आणि खरंच नशिबाने वाघ दिसला तर अजिबात आवाज करायचा नाही. अखेरीस आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात भाजत भाजत व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. आणि आमचा कँटर अभयारण्याच्या भव्य कमानीतून आत शिरला. (चित्र क्र. १)
राजस्थानातलं सवाई माधोपूरजवळचं हे "रणथंभोर राष्ट्रीय उद्यान". हे वर्षानुवर्षे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. एके काळी जयपूरच्या महाराजांनी आणि नंतर ब्रिटीशांनी शिकारीसाठी हे जंगल वापरलं. नंतर श्री. वाल्मिक थापर आणि श्री. फत्तेचंद राठोड यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रदेश भारत सरकारने १९५५ मधे "व्याघ्र संरक्षित क्षेत्र" म्हणून जाहिर केला. या दोघांनी १९६०-६१ सालापासून या जंगलात हिंडून वाघांचा अभ्यास केला. आज हा जो प्रकल्प आहे हा या दोघांच्या अमाप आणि निस्वार्थी कष्टांचा परिपाक आहे. सुमारे ४०० चौ. कि.मी. असलेल्या या जंगलात अधिकृतपणे सुमारे ४५/५० वाघ आहेत. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांच्या मधे असलेले हे अभयारण्य आहे. दुसर्या संरक्षित क्षेत्रात वाघांची संख्या घटत चालल्याने इथून वाघांच्या दोन जोड्या पाठवण्यात आल्या आहेत. "रणथंभोर" या नावाचीसुद्धा एक गम्मत आहे. 'रण' म्हणजे वाळवंट. 'थं' म्हणजे डोंगर. आणि 'भोर' म्हणजे दरी. एका बाजूला डोंगर दुसर्या बाजूला वाळवंट किंवा पठार आणि त्यामधे दरी. म्हणून या प्रदेशाला रणथंभोर असे नाव पडले. सर्व प्रदेश तसा वैराण आहे. त्यामानाने जंगल कमी. फार भलेमोठे वृक्ष तिथे नाहीत. आणि प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्यात दिसतं तसं घनदाट जंगलही नाही. पण वड, पिंपळ, असेच वृक्ष प्रामुख्याने दिसतात. फरशीच्या स्लॅबप्रमाणे दिसणारे तुळतुळीत ओके बोके खडक हे इथल्या डोंगराचे वैशिष्ट्य.
ठरल्या कार्यक्रमानुसार तीन वेळा आम्ही इथे येणार होतो. इथे एकंदर ५ मार्ग आहेत. आणि कोणत्याही मार्गावर गर्दी होऊनये म्हणून कँटर किंवा जिप्सी गाड्याना वनप्रशासनातर्फे मार्ग ठरवून दिला जातो. इथे अभयारण्यात तीन मोठे तलाव आहेत. पदम तलाव, राजबाग तलाव आणि मलिक तलाव. (चित्र क.२) शिवाय मोगलकालीन वास्तूंचे अवशेष आहेत. इथला "जोगी महाल" हा अजूनही राजघराण्यातल्या व्यक्तींसाठी वापरात आहे. सर्व प्राणी या पाणवठ्यावर येतात. (चित्र क्र.३) तसेच मार्गाच्या बाजूला काही छोटीशी डबकीही दिसली. त्यामुळेच इथे वाघ दिसण्याची सर्वाधिक शक्यता असते. जुन्या काळातले वास्तूंचे अवशेष जागोजागी दिसत होतेच. गाडी दोन कमानीतून आत शिरली. "तो पहा...." म्हणेपर्यंत सर्व जण उठून उभे राहिले. आणि नंतर म्हणणार्याने वाक्य पूर्ण केले ".... मस्त मोर दिसतोय." सर्व जण फुग्यातली हवा गेल्यासारखे परत खाली बसले. चला! मोरांचे दर्शन झाले. (चित्र क्र.६) पण पुढे पुढे इतके मोर दिसले की मोर दिसण्याचे कौतुक त्या दिवशी संध्याकाळपर्यंत संपूनही गेले. निदान मला तरी तसे वाटले. जवळ जवळ एक दीड किलोमीटर गेल्यावर एका छोट्याश्या रस्त्याला गाडी वळून थांबली. इथून हा रूट सुरू होणार होता. प्रशासकीय गोष्टी पूर्ण करण्यासाठी गाडी थांबली होती. आणि तिथे एक गम्मत पाहायला मिळाली. तिथे गाडी थांबली असताना तिथल्या झाडावर काही पक्षी होते. त्याला टकाचोर म्हणतात. काळे डोके आणि काळी शेपटी. पण शेपटीचे टोक मात्र पांढरे. मधला भाग पिवळसर तपकीरी रंगाचा आणि पंखावर, एखाद्या गडद साडीच्या पदराला असणार्या पांढर्या किनारीसारखा पट्टा. (चित्र क्र.४) तुम्ही हातावर पोळीचा तुकडा, बिस्कीट वगैरे ठेवले तर ते पक्षी तुमच्या हातवर येउन बसतात. अगदी बिनधास्त पणे. आणि खातात. अजिबात घाबरत नाहीत. खूप मजा वाटते पाहताना. अक्षरशः दोन तीन पक्षी एकाचवेळी हातावर येउन बसतात. (चित्र क्र.५)
आणि आम्ही त्या "टायगर ट्रेल" वर निघालो. रस्ता अतिशय खराब होता. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर दिसणारी "फेव्हीकॉल"ची जाहिरात आठवा. त्याप्रमाणे आमचा कँटर हेलकावे घेत घेत चालला होता. या अभयारण्यात त्यामानाने प्राण्यांच्या जाती फारश्या दिसल्या नाहीत. ठिपकेदार हरणांनी पहिले दर्शन दिले. ( चित्र क्र.७) नीलगायींचे कळपही दिसले. सांबरही दिसले. ससे, रानडुक्करे, चितळ असे प्राणी दिसले. माकडे तर भरपूर होती. ठेचकाळत ठेचकाळत पुढे पुढे जात होतो. आणि अचानक कचकन ब्रेक दाबत गाडी थांबली. " काय झाले काय झाले?" असा कल्ला झाला. आणि पुढून तो गाईड म्हणाला, " शू.... शांती रखो. शेर....!" आमच्या पुढे अजून दोन गाड्या थांबल्या होत्या. आणि तिन्ही गाड्यातले आम्ही सर्व जण श्वास रोखून समोर बघत होतो. रस्त्यापासून १००एक फूटावर एक डबके होते. आणि त्यात व्याघ्रराजांची स्वारी आरामात पाण्याच्या थंडाव्याचा आस्वाद घेत शांतपणे पहुडली होती. प्राण्याना भावना असतात का? हा वादाचा विषय असेलही. पण मला जे माहीत आहे त्याप्रमाणे प्राण्याना भावना नाहीत. मानवाइतक्या त्या विकसीत तर नाहीतच नाहीत.. त्या अत्यंत अस्फूट आहेत. निद्रा, भय, मैथुन आणि पोट भरणे इतक्यापुरत्याच त्या मर्यादित आहेत. पण मला त्या वाघाच्या चेहेर्यावर मुक्ततेचे समाधान दिसत होते. (चित्र क्र.८) माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला माहित आहे. पण मला कायमच प्राणीसंग्रहालयातल्या किंवा सर्कशीतल्या वाघाच्या चेहेर्यावर दिनवाणे मिश्रित त्रासिक भावच दिसत आले आहेत. "....काय शिंची कटकट आहे राव! धड जगूही देत नाहित ही माणसे! इथे मला एक आख्खा बैल दिवसाला लागतो. आणि ही मंडळी सकाळी काही तुकडे आणि रात्री काही तुकडे देतात. छे! खर्याची दुनियाच नाही राहिली....." असे भाव त्या वाघाच्या तोंडावर असतात. आणि इथे? इथे मात्र भूमिका बदलल्या होत्या. आम्ही बंदिस्त होतो. तो मोकळा होता. जणू काही "...काय बघायचे असेल ते मनसोक्त बघून घ्या..." असेच त्याला जर बोलण्याची कला असती तर म्हणाला असता. लहान मुलांच्या खेळातल्या "स्टॅच्यू" च्या खेळासारखा सारखा सर्वांचा स्टॅच्यू झाला होता. एक पांच दहा मिनिटांनतर तो उठला पाण्याबाहेर आला. (चित्र क्र.९) आणि तिथून दहा पंधरा फूटावर जाऊन बसला आणि पांच एक मिनिटात झोपून ही गेला. "आता तुम्ही निघा" अशीच जणू काही सूचना होती. आम्ही तेथून निघालो. तापल्या तव्यावर पॉपकॉर्न उडावेत तसे टणाटण कँटरमधे उडत उडत अजून दोन किलोमीटरवर रस्त्याच्या टोकाला आलो. इथे बंधार्यामुळे एक अगदी छोटासा तलाव झाला होता. त्यात भरपूर मगरी होत्या. त्या तलावात चित्र बलाक, पाणकोंबडी, स्वर्गीय नर्तक असे बरेच पक्षी झुंडीने दिसले. थोडा वेळ थांबलो. मोर तर अगणित दिसले. परत फिरलो. वाघोबा अजूनही तिथेच विश्रांती घेत पडले होते. त्यांच्या विश्रांतीचे रहस्य आम्हाला दुसर्या दिवशी समजले. त्या दिवशी त्या वाघाने शिकार करून जवळ जवळ सगळी नीलगाय रिचवली होती. आणि आपल्याला कसे सणाच्या दिवशी श्रीखंड किंवा आम्रखंड दुपारी अंगावर येते तसे त्याला बहुतेक झाले होते. आम्ही परत तिथे काहीतरी हालचाल होईल या आशेने १०/१५ मिनिटे थांबलो. तितक्या वेळात त्या वाघोबाने तीन चार वेळा मान वर करून पाहिले. दोनदा जांभई दिली. शेवटी पंजा वर करून "बाय बाय"चा इशारा केला. आणि आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. संध्याकाळी मुक्कामावर परत आलो. चहा आणि मस्तपैकी गरमागरम कांदा भजी आमची वाट बघत होती. नंतर जेवणे झाली रात्री सर्वांची आपापल्या नातेवाईकांना "वाघ दिसल्या"ची फोनाफोनी, मेसेजामेसेजी झाली. वाघ इतक्या लवकर दिसेल ही अपेक्षा नसल्याने सर्व आनंदात होते.
दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता पुन्हा आम्ही व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारात पुन्हा एकदा येउन पोहोचलो. आज आता आम्हाला दुसरा "रुट मिळाला होता. आज त्या तलावांवर जायचे होते. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. वातावरणात माफक थंडावा होता. म्हणजे कालच्या मानाने बरेच थंड होते. या नवीन रूटवर आम्ही पुढे पुढे जात राहीलो. तिन्ही तलावाच्या काठी गेलो. एक तलावाच्याकाठी तिथल्या फॉरेस्ट गार्डने सांगितले की '..... शायद शेर दिख सकता हैं, कल रातमेही उसने किल किया हैं. वो वापस आयेगा...." झाले! आम्ही थांबलो. पण अर्धा तास थांबूनही काही तो "शेर" दिसला नाही. आज सकाळी बहुतेक आमचे नशिब आमच्या बाजूने नव्हते. असे सारखे सारखे वाघ दर्शन द्यायला लागले तर कसे चालेल? त्यांना पहायला कोणी फिरकणारही नाही. साधारण सकाळी १०च्या सुमाराला आम्ही परत मुक्कामी आलो. आज व्याघ्रराज नाराज होते बहुतेक. हॉटेलवर आल्यावर न्याहारी झाली. नंतर तिथल्याच शहरातल्या एका दुकानाता खरेदीला गेलो. सर्वांची खरेदी आटोपली. निदान त्या दिवसापुरती तरी. दुपारचे भोजन उरकले. आणि थोडीशी विश्रांती घेउन पुन्हा दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा व्याघ्रदर्शनाच्या आशेने कँटरने भाजत भाजत प्रवेश द्वाराजवळ येऊन पोहोचलो. यावेळी आमच्या गाईडने वाघ दिसण्याची शक्यता असणारा रूट मिळण्याची फिल्डींग लावली होती. आणि नशिबाने तसा रूट मिळाला आहे असे त्याने आम्हाला सांगितले. सर्वांचे चेहेरे एकदम खुलले. आणि आमच्या कँटरने पुन्हा एकदा त्या वनचरांच्या जादुई दुनियेत प्रवेश केला.
आम्हाला पुन्हा अगणित मोर दिसले. आता आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले होते. आणि आम्ही पुढे पुढे जात असताना आमच्या समोर तीन कँटर थांबलेले दिसले. पुढे जायला जागा नसल्याने आम्ही थांबलो. आणि आमच्या कँटरपासून १५ फूटावर एक वाघ मस्तपैकी पाण्यात डुंबत होता. ती वाघिण आहे असे त्या गाईडने सांगितले. मला पडलेला प्रश्न म्हणजे हे त्याला कसे कळले? त्या वाघिणीच्या गळ्यात कुत्र्याला बांधतात तसा पट्टा होता. कुतुहलाने त्या गाईडला विचारले असता तो म्हणाला कि तो " रेडिओ ट्रॅकर बेल्ट" आहे. (चित्र क्र. १०) मला गम्मत वाटली. आपण नाही का लहान मुलाला म्हणत कि "....तुला चॉकलेट देतो पण इथे गुपचूप बैस...." म्हणून. बहुतेक तिला तशी समज देऊन तिथे आणून बसवले असावे. की ".....इथे गुपचूप बसायचे आहे. लोक बघायला येणार आहेत. नंतर रात्री अर्धा बैल मेजवानी मिळेल....." कालच्याही वाघाचे दर्शन असेच ठरवून दिल्या सारखे वाटले. कुठेतरी कृत्रिमपणा वाटत होता. पुन्हा हे माझ्या मनाचे खेळ असतीलही. माझी ही मते ऐकून समस्त व्याघ्रप्रेमी माझ्या अंगावर चाल करून येतीलही. पण माझा नाईलाज आहे. मला जाणवलं ते हे असं होतं. कुठेतरी अनैसर्गिक वाटले. खूप सहज वाटणारा योगायोग? A far fetched coincidence? As if Tiger was meant to be present there. माहित नाही. मला मात्र राहून राहून तसे वाटत होते. पण वाघ दिसल्याच्या नादात ही गोष्ट कुणाला जाणवली नसेलही. आणि त्यामुळे कुणाला काही खटकण्याचा प्रश्नच आला नाही. मी मात्र आता इकडे तिकडे पहात होतो की काही वेगळे आणखी दिसतय का बघावं. तर समोरच्या झाडावर बंड्या दिसला. (चित्र क्र.११) हा आणि खंड्या यात फरक आहे. "किंग फिशर" म्हणजे खंड्या. आणि "व्हाईट चेस्टेड किंग फिशर" म्हणजे बंड्या. नेहमी बंड्या आणि खंड्या यांच्यात गल्लत होते. माझ्या माहितीप्रमाणे बंड्या पुष्कळ वेळा दिसतो. खंड्या फार कमी दिसतो. आकाशात आता ढगांचे संमेलन भरलं होतं. (चित्र क्र. १२) त्यानी गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यांची सूर्यकिरणांशी लढाई चालू होती. पण ढगांची गणसंख्या कमी पडल्याने त्यांना सूर्याला झाकून टाकणे नीट जमले नव्हते. आणि त्यामुळे वर छाया प्रकाशाचा मस्त खेळ रंगला होता. ढगांच्या फटीतून सूर्यकिरण, एखादा कापडी पडदा फाडून तळपती तलवार बाहेर येऊन दिसावी तसे ते दृश्य दिसत होते. (चित्र क्र. १३) आणि त्या सूर्या किरणांमुळे त्या ढगाना एक रूपेरी किनार दिसत होती. जणू काही चांदीचे मखरच वाटत होते. अतिशय विलोभनीय दृश्य दिसत होते ते. (चित्र क्र. १४) इतर जनता मात्र अनिमिष नेत्रांनी जे बघायचे ते सोडून वाघ बघण्यात दंग होती. त्यांना हे कळत नव्हते की वाघ नंतर प्राणिसंग्रहालयातही पहायला मिळू शकतो. पण हा निसर्गाचा मनोहर चमत्कार पुन्हा पहायला मिळेल याची खात्री नाही. असो हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. सुमारे २०/२५ मिनिटे थांबून आम्ही तेथून पुढे निघालो. आणि त्या रूटवर अजुन २/३ कि. मी. गेलो. आता वाघ दिसण्याची शक्यता नाही असे गाईडने जाहीर करून टाकले. आम्ही परत फिरलो. तिथे रस्त्याच्या एका बाजूला वडाचे एक झाड होते. त्याच्या पारंब्या वरून जाऊन पलिकडच्या बाजूला गेल्या होत्या. आणि एक प्रकारची नैसर्गिक कमान तयार झाली होती. जाताना ही कमान दिसली नव्हती, जाणवली नव्हती. कारण त्यादृष्टीने आम्ही बघितलेच नव्हते. जणू काही निसर्गाच्या साम्राज्याचे प्रवेशद्वारच होते ते. (चित्र क्र.१५) वरती "वेलकम" अशी पाटी निसर्गाने आपल्या भाषेत लिहिली होती. जणू काही निसर्गाला सुचवायचं होतं की, "....इथे या आणि आमचे हे अफाट सौंदर्य पहा. परत गेल्यावर तुमच्या नशिबी काँक्रिटची जंगलं आणि प्रदूषणं तर आहेतच. पण आत्ता आलाच आहात तर शुद्ध, स्वच्छ, निर्मळ आणि भरपूर ऑक्सिजनयुक्त वातावरणाचा आनंद लुटा....." आम्ही त्या कमानीतून परतीच्या मार्गाला लागलो. आणि अर्ध्या कि. मी.वर एक आश्चर्य वाट पहात होतं. आमच्या गाडीपुढेच एक वाघ रस्त्याच्या मधोमध शांतपणे चालला होता. काय डौलदार चाल होती त्याची! मागे काय आहे, कोण आहे याची त्याला फिकिर नव्हती. आम्ही त्याच्या मागे मागे त्याच्या वेगाप्रमाणे जात होतो. त्याने मागे वळून पाहण्याचे कष्टही घेतले नाहीत. साधारण ५० फूट गेल्यावर तो जंगलात जाण्यासाठी वळला. इथे मात्र आम्ही थांबलो. एकदा त्याने मागे वळून पाहिले. आणि दूरवर तो झाडीतून दिसेनासा झाला. हे मात्र नैसर्गिक दर्शन झाले. ठरवून बसवण्याचा वगैरे प्रश्नच येत नव्हता किंवा इथे आम्हाला तो दर्शन देण्यासाठीही आला नव्हता. त्याचा तो त्याच्याच मस्तीत चालला होता. तो जाताना तिथे आम्ही असायला एकच गाठ पडली. हे मात्र आमचे नशिब. हा मात्र योगायोग नक्की. वाघाचे मला अपेक्षित होते ते हे असे दर्शन. आमच्या कँटरने परतीची वाटचाल सुरु केली. जाताना त्या वाघिणीपाशी परत एकदा कौतुकाने थांबलो. परत १५/२० मिनिटे पुन्हा तेच. पुन्हा वाट बघणे कोणत्यातरी हालचालीची. आणि या वेळी मात्र वाघिणीने हालचाल केली. डोके वर केले. आमच्याकडे पाहिले, आणि पाणी प्यायला सुरुवात केली. कालच्या वाघापेक्षा ही नक्कीच निराळी(?) हालचाल होती. पण मनातली कृत्रीम दृश्याची भावना जात नव्हती. आपल्याला नक्की काय अपेक्षित होते? कोणती हालचाल हवी होती? वाघ पहायचा होता म्हणजे कसा पहायचा होता? मला काही सांगता येत नव्हते. समाधान झाले का? हो समाधान झाले. कसले समाधान? फक्त वाघ पाहिल्याचे समाधान इतकेच समाधानकारक उत्तर माझ्यापुरते तरी मी देईन. इतरांचे मला माहित नाही. संध्याकाळी ७ च्या सुमाराला हॉटेलवर परत आलो. परत कांदा भजी वाट बघत होतीच.
तिसरा दिवस. आज जंगलात जायचे नव्हते. आज सकाळी जवळच चालत फेरफटका मारायचे ठरवले होते. बाहेर पडलो. चालत चालत निघलो. आमच्या हॉटेलपासून थोडे अंतर गेल्यावर जंगल सुरू झाले. झाडी फार दाट नव्हती. पुन पक्षी पहायला मिळाले. आपल्याकडे दयाळ दिसतो. त्या कुलातला पक्षी दिसला. पुढे जाता जाता एक मोठे मुंग्यांचे वारूळ दिसले. साधारण दोन एक फूट उंचीचे असेल. त्यात मुंग्या नव्ह्त्या. तसेच पुढे गेलो. ठिपकेदार हरणे दिसली. एक छान सुतार पक्ष्याचेही दर्शन झाले. मस्तपैकी झाडाच्या खोडावर बसून धारदार चोचीने "टक टक" करत बसला होता. फिरून साधारण ११ च्या सुमाराला परत हॉटेलवर आलो. आणि विश्रांती घेतली जेवण झाले. आणि दुपारी ३ च्या सुमाराला पुन्हा एकदा या ट्रीपमधले शेवटचे अभयारण्यात निघालो. यावेळी मुख्य अभयारण्यात जायचे नव्हते. साधारण १० कि.मी. वर असलेल्या "सवाई मानसिंग" अभ्यारण्यात जायचे होते. याला "बनास सँक्चुरि" म्हणतात. इथे चिता दिसण्याचा संभव होता. वाघाच्या मानाने चित्त्याचे दर्शन खूप दुर्मिळ असते. चित्ता हा प्राणी त्यामानाने बेभरवशी आहे. वाघ सहसा कारणाशिवाय माणसांवर हल्ला करणार नाही, जो पर्यांत तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही. वाघ भुकेलेला असला तरी बहुतांशी माणसांवर तो चालून जाणार नाही. अगदी जरी वाघ तुमच्या शेजारून जात असला तरीही तो तुमच्याकडे लक्षही देणार नाही. अपवाद फक्त नरभक्षक वाघाचा. पण चित्त्याचे तसे नाही. तो माणसांवरही अकारण हल्ला करतो. सहसा चटकन दिसत नाही. तो झाडावर सहज चढू शकतो. आणि वाघाच्यामानाने खूपच चपळ असतो. चित्ता हा तसा बुजरा प्राणी आहे. आणि म्हणून त्याचे नैसर्गिक दर्शन तसे अवघड असते. त्यामुळे चित्ता दिसेल याची खात्री नव्हती. तरीही आम्ही गेलो. पुन्हा "फेव्हीकॉल" प्रमाणे ठेचकाळत गेलो. इथे प्रदेश बराच दगडाळ होता. आज कँटर नव्हता. दोन जिप्सी गाड्या करून गेलो होतो. पण "फेव्हीकॉल इफेक्ट" अजिबात कमी नव्हता. हा प्रदेश आणखी वैराण होता. नोंदणी वगैरे सोपस्कार करून मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो. कुठे एखादा ससा किंवा नीलगाय यापलिकडे काहिच दिसले नाही. शेवटी एका कड्याच्या टोकाला येऊन थांबलो. इथे सूर्यास्त पाहण्याची आयडिया होती. त्याकड्याच्या टोकावरून खाली गाव काड्यापेटीसारखे दिसत होते. तशातही आमच्यातल्या लीडरला खाली चित्त्याने मारलेली नीलगाय दिसली. पण आम्हाला चित्ता काही दिसला नाही. नंतर दिसला. पण कसा त्याचे रहस्य पुढे येईल. ढगांनी सूर्य झाकायला सुरूवात केली आणि सूर्यास्त पाहण्याच्या आशा मावळल्या. आम्ही परत फिरायचे ठरवले.
....आणि मी सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे माझा एका जोडप्याबद्दलचा चुकलेला अंदाज इथे उघड झाला. आम्ही चर्चा करत होतो की ट्रीपनंतर भेटले पाहीजे. फोटो एकमेकांना दिले पाहिजे. त्यावेळी त्या जोडप्यातली कवळी वाजली त्यांनी आपल्या सौं. ना ताकिद दिली की "तू भलते सलते बडबडू नकोस. नंतर भेटायचे जमणार नाही." तरीही मी थोडासा नेट लावून म्हणालो की लगेचच्या रविवारी भेटूया. पण नाही. त्या कवळीने आपल्या अर्धांगीला झापले. मी ऐकतोय याकडे लक्षही दिले नाही. किंबहुना मी ऐकवे अशीच इच्छा असावी असे आता मला वाटते. "आपण सहलीला आलो आहोत. आपला इतरांशी काहीही संबंध नाही. ट्रीप संपली. संबंध संपला. घरी बोलवा वगैरे संबंध अजीबात वाढवायचे नाहीत. पुन्हा चूकुन माकून पुढच्या ट्रीपला भेटलो तर पाहू. नाहीतर नाही." मला कळत नाही की ही असली माणसे ट्रीपला का येतात? माणसात मिसळायचे नसेल तर गुपचूप घरी बसा की. किंवा फिरण्याची इतकीच हौस असेल तर स्वतंत्ररीत्या ट्रीपा काढा! एखादा साथीचा रोग साथ पसरला की लागण झालेल्याना कसे वेगळे ठेवतात, तसे माणूसघाणेपणाच्या रोगाची लागण झालेलांनी इतरांपासून आणि इतरांनी त्यांच्यापासून दूर राहवे हे बरे. त्यावेळी मग मी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकांशी पुण्यात येईपर्यंत एक अक्षरही संवाद साधला नाही. माझ्या मेंदूच्या कॉम्पुटरमधून त्यांची उपस्थिती पूर्णतया "डिलिट" केली. आणि दुसरे म्हणजे ही मंडळी आपल्यापासून दूर राहणार नसतील तर पुन्हा मी कधीतरी "इन सर्च आउटडोअर्स" बरोबर गेलो तर हे ज्येष्ठ नागरिक नसतील त्याच ट्रीपला फक्त जायचे असे मनोमन ठरवून टाकले.
आम्ही परत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आलो. दोन जिप्सीपैकी आमची जिप्सी पुढे निघून आली. दुसर्या जिप्सीतला गाईड म्हणाला ".... रूको. शेर बतता हूँ...." ती जिप्सी थांबली. अर्थात त्यानी परत आल्यावर आम्हाला "टुक टुक" केलं. त्या गाईडने लांबवर एका झाडावर बसलेला चित्ता दाखवला. पण नंतर त्याने सांगितलेली कथा मजेदार आहे. " ये तो पकडा हुवा शेर है। इसे जंगलमे रोज छॉड दिया जाता है। मगर उसे आदतसी हुवी है इसलिये वो हर रोज शामको इधर आता है और बैठता हैं।" परत हॉटेलवर आलो. चहा , रात्री जेवण आणि नंतर झोप.
आज आता शेवटचा दिवस होता. आज रणथंभोरचा किल्ला पहायला जायचे होते. त्या किल्ल्यात एक गणपतीचे मंदिर आहे. त्रिमुखी गणपती आहे हा. महाराष्ट्रात जसे अष्टविनायकाला महत्त्व आहे तसे या गणपतीला राजस्थानात महत्व आहे. दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. आजचा दिवस गर्दी असण्याची शक्यता नव्हती. म्हणून आज आम्ही जायचे ठरवले होते. हा किल्ला त्या अभयारण्यातच आहे. मला पुन्हा पडलेला प्रश्न असा की या गणपतीच्या दर्शनाला जाणारे शेकड्याने लोक असतात. त्यांना वाघाच्या हल्ल्याचा धोका नाही का? की वाघ पर्यटक आणि स्थनिक रहीवासी यातला फरक ओळखू शकतात? ती मंडळी आपण सारसबागेत फिरावे तशी किंवा मुंबईकर जसे जुहू बीचवर बागडतात तशी आरामात चालत हिंडत होती. आणि पर्यटकांपैकी कोणी उतरण्याचा प्रयत्न केला किंवा हात पाय बाहेर काढला तरी आरडा ओरडा होत असे. असे का हे मला शेवटपर्यंत समजले नाही नंतर विचार करता मला असे वाटले की पर्यटकांपैकी कोणी भरकटला तर त्याला आवरणे अशक्य होइल आणि वाघाला आयते अन्न मिळेल. असे होऊ नये म्हणून घेतलेली ही काळजी असावी. अर्थात माझे हे मत मलाच पटलेले नाहिये. पुन्हा कँटर सकाळी ७ वाजता अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशला. आता "टायगर ट्रेल" वर जायचे नसल्याने परवानगी, पास वगैरेचा प्रश्न नव्हता.
आणि त्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी आलो. हा किल्ला इ.स. ९४४ च्या सुमाराला राजपुतांनी बांधला. समुद्र सपाटीपासून सुमारे ७०० फूट उंचीवर असलेला ह किल्ला त्याकाळी एक महत्वाचे नाके होते. ११९२ मधे महंमद घोरीकडून पृथ्विराज चौहानचा पराभव झाला. त्यानंतर त्याचा नातू गोविंदराजने राजपुतांचा लढा पुढे चालू ठेवला. पुन्हा मोगल, रजपुत, मोगल असे करत करत शेवटी अकबराने हा किल्ला १५५९ साली जिंकला. नंतर १७ व्या शतकात जयपूरच्या कछवा महाराजांकडे हा किल्ला आला. ते अगदी स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हा किल्ला जयपूरच्या महाराजांकडे होता. या किल्ल्यात हिंदूंची तीन देवळे आहेत. गणेश, शिव आणि रामलालजी यांची देवळे आहेत. १२व्या शतकात लाल दगडांनी बांधलेली ही देवळे पर्यटकांचे आकर्षण आहेत. सर्व किल्ला हिंडून पाहिला. त्रिमुखी गणपतीचे दर्शन घेतले आणि खाली आलो. कँटरमधे बसलो. आणि मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आलो. मागे वळून पाहीले शेवटचे आणि परत हॉटेलवर आलो. चहा न्याहारी झाल्यावर पुन्हा एकदा खरेदी झाली. जेवण झाले आणि दुपारच्या गाडीने परतण्यासाठी भाजत भाजत सवाई माधोपूर स्टेशनवर आलो. सगळ्यांनाच परतीचे वेध लागले होते. प्रत्येकाचे आरक्षण निरनिराळ्या ठिकाणी असल्यामुळे आता पुन्हा लवकर भेट होणार नाही यापेक्षाही ज्यांना नंतर संपर्कच ठेवायचा नव्हता त्यांचे "कॅस्ट्रॉइल लूक" चेहेरे बघण्यापासून सुटलो याचाच अधिक आनंद होता. ज्याना मनापासून भेटायचे आहे ते संपर्क ठेवतील याची खात्री होती. सकाळी बोरीवली स्टेशनवर उतरून पुण्याची बस पकडली आणि दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात परत आलो.
सहल संपली. पुन्हा एकदा मी काँक्रिटच्या जंगलात आणि माझ्या भावविश्वात प्रवेश केला. मुंबईत आलो तेंव्हाच निसर्गाची जादू ओसरली होती. जे पाहून आलो ते खरं होतं का की मला सारखं वाटत होतं तसं घडवून आणलेलं होतं? देव जाणे. पण मला जे पटलं, जसे भावलं तसं मी लिहून काढलय. त्या व्याघ्रराजाचं देखणं दर्शन कृत्रीम असावं असं मला का बरे वाटावे? कदाचीत मी काँक्रिटच्या जंगलातला प्राणी आहे. म्हणून मग या काँक्रिटच्या जंगलात माणूस रूपी श्वापदात राहणार्या मला, या अत्यंत देखण्या वनराजाचं दर्शन कृत्रीम वाटलं असेल, संस्थाने विलीन झालेल्या महाराजांसारखे! पण एक नक्की की ते दर्शन कृत्रीम असलं तरी त्या हिंस्त्र श्वापदाच्या चेहेर्यावरचे भाव मात्र निश्चितच निरागस होते, नैसर्गिक होते ..... सिमेंटच्या जंगलातल्या दोन पायावर चालणार्या ओळखिच्या श्वापदाच्या चेहर्यावर असे भाव क्वचित पहायला मिळतात. हो ना?
श्रीराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा