गणेशोत्सव - २०२०
ऑगस्ट २०२०...........
............... सकाळचे १० वाजले होते. गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होउन तिसरा दिवस उजाडला होता. म्हणजे प्रतिपदा आली होती. पण लोकांची नाचायची हौस भागली नव्हती. बघ्यांच्या चेहेर्यावर उपहासपूर्ण हसू दिसायला लागले होते. मिरवणूक चालूच होती. पुढच्या वर्षी लवकर या यापेक्षा हे दहा दिवस कधी संपतात असे बर्याच जणाना झाले होते. जणू काही पुढच्या वर्षी नका लवकर येऊ हीच भावना होती. मी विसर्जन घाटावर फेरफटका मारला. नदीला जबर पाणी टंचाईमुळे पाणी नव्हते. त्यामुळे पूर्णपणे विसर्जित न झालेल्या मूर्तींचे केविलवाणे अवशेष सर्वत्र दिसत होते. तसेच एक पुलावर तर आणखी भयानक परिस्थिती होती. लोक घाइघाईत येत होते. वास्तवीक खाली घाटावर जायला व्यवस्थित मार्ग होता. पण लोक पुलावर गाड्या थांबवत होते. आणि खाली जाण्याचेही कष्ट न घेता वरून खाली मूर्ती फेकत होते. तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस लोकांना खाली जायची विनंती करत होते. पण त्यांचे फार थोडे जणच ऐकत होते. नंतर नंतर तर पोलिसांनी सुद्धा सांगणे सोडून दिले.
आणि गेल्या दहा दिवसात तर बघायला नको. कानाचे पडदे फाटतील अश्या आवाजाच्या स्पीकर्सच्या भिंती. तेच ते आवाजाच्या तालावर धावणारे दिवे, की ज्यांच्या हालचाली आणि ते गाणे याचा संबंध नाही. गाणे जलद लयीत असले की कि ते कोणत्याही दिव्यांच्या पळापळीशी जमतेच!!! ढोल लेझीमची पथके इतिहासजमा झाली होती. प्रत्येक गणेश मंडळाला प्रायोजक आले होते. त्यामुळे काय कार्यक्रम कारायचा हे ते प्रायोजक ठरवत. मंडळांची संख्या हजारावर जाउन पोहोचली होती. त्यामुळे रस्त्यातून जाताना कोणता आवाज कोणत्या मंडळाचा हे ओळ्खणे अवघड होत होते. अर्थात याचा एक फायदा झाला म्हणा. दिवसा रस्त्यात चिटपाखरूही नसायचे. एका मित्राकडे संध्याकाळी आरतीला बोलावले होते. गेलो. घरात कुठे आरास वगरे दिसेना. हळू हळू लोक जमा होत होते. आरतीची वेळ झाली. पण गणपतीची मूर्ती, आरास कुठेच दिसेना. मला हा काय प्रकार आहे ते कळेना. यजमान आले. त्यानी एक स्विच "ऑन" केला. आणि समोरील भिंतीवरचा एल. सी.डी. पडदा उजळून निघाला. त्यावर गणपतीची सुबक मूर्ती, त्याला केलेली आरास वगैरे दिसत होती. कुतुहलाने मी विचारले असता मित्र म्हणाला की "काय करणार? मूर्तीच्या किमती कमीतकमी १५००च्या पुढे आहेत. आणि मूर्ती आणली तरी इथे आरास करायला, सजवायला वेळ कुणाला आहे? पूजेला गुरूजी मिळत नाहीत. मग संगणकावर पूजेसकट सर्व प्रोग्रामीग केले. आणि त्याला सर्व आरतीच्या वेळा देऊन ठेवल्या आहेत. ती वेळ झाळी की संगणक पूजा करतो, आरती करतो, मंत्रपुष्प वाहतो. आपण फक्त नैवेद्य या मोठ्या पडद्यासमोर आणून ठेवायचा. आणि हात जोडून फक्त उभे राहयचे.सर्व सगळं आपोआप होते. तिथून बाहेर पडता पडता मी मित्राला विचारले की, "गणपतीच्या आशीर्वादाचेही प्रोग्रामीग केले आहे का? म्हणजे आपण काय मागू त्यानुसार आशीर्वाद मिळतो का?" नंतर बरेच दिवस तो मित्र माझ्याशी बोलत नव्हता.................
ऑगस्ट २००९.............
...............गणपती ही विद्येची देवता आहे. लोकमान्यानी गणेशोत्सव सुरु केला तेंव्हा त्याकाळची सामाजीक स्थिती ही वाईट होती. वाईट म्हणजे इंग्रजी अंमल होता. आणि लोकानी एकत्र यावे, आपल्या संस्कृतीबद्दल जनजागृती व्हावी, एकात्म भावना वाढावी असा उद्देश होता. इंग्रजी सत्तेविरुद्ध चळवळ करायची असेल, सत्ता उलथून टाकायची असेल तर जनतेने एकत्र येणे गरजेचे होते. म्हणून लोकांसाठी लोकमान्यानी हा उत्सव सुरू करण्यात पुढाकार घेतला. दर्जेदार समाजप्रबोधनपर चर्चासत्रे, भाषणे असे स्वरूप असायचे. मग त्यानंतर त्यात गाणे आले. हळू ह्ळू त्याचे स्वरूप बदलत गेले. विस्तार वाढला. स्वातंत्र्य मिळाले आणि प्रबोधनाची गरज संपली. आणि एखाद्या गोष्टीची गरज संपल्यावर त्याचे जे होते ते गणेशोत्सवाचे एकविसाव्या शतकात झाले. तिथीचे संदर्भ संपले. गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीलाच करायची असते. म्हणून त्या दिवसापर्यंत थांबावे लागत असे.
इथे मला ज्ञानेश्वरीचा संदर्भ द्यायचा आहे. भगवद् गीतेच्या नवव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात : "अवजानन्ती मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥११॥" त्यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात " मज अनावरणा प्रावरण।भूषणातीतासि भूषण।मज सकळ कारणा कारण। देखती ते॥१६२॥ मज सहजाते करिती।स्वयंभाते प्रतिष्ठिती।निरंतराते आव्हानिती। विसर्जती गा॥१६३॥" त्याचा अर्थ असा: "मी वस्त्र नेसवण्याजोगा नसूनही सर्वजगाला पांघरून घालणारा त्या मला पांघरूण घालतात, भूषणातीत(स्थूल, सूक्ष्म आकाररहित) निराकार असा जो मी, त्या मला अलंकार घालतात, मी सर्वजगाचा उत्पन्न करणारा (जग्त्कारण) असून त्या मलाही दुसर्या उत्पन्न करणार्या कारणाची कल्पना करतात. मी सहज अनादि नित्य असून माझ्या मूर्ती करतात. मी सदाच स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात व मी नित्य सर्वत्र (नित्य उपलब्ध स्वरूप)असताना माझे आवाहन करतात व त्या माझे विसर्जनही करतात.( संदर्भ : श्रीगुरू साखरे महाराज संपादीत 'सार्थ ज्ञानेश्वरी)
लोकसंख्या वाढली. तशी गर्दी वाढू लागली. आणि मग गर्दीला आकर्षित करण्यास महत्त्व आले. हलते देखावे, संगिताच्या तालावर नाचणार्या दिव्यांची आरास असे प्रकार वाढले. पहाटे ५ वाजेपर्यांत लोक देखावे पहायला जागू लागले, भटकू लागले. आणि त्यातून मग पादचार्यांसाठी एकमार्गी रस्त्याचा प्रयोग केला गेला. पुणेकरांनी तोही पचवला समाज प्रबोधन वगैरे, तापल्या तव्यावर पाणी पडल्याबर जसे उडून जाईल तसे उडून गेले. आणि लोकांच्या उत्साहाला २००७ मधे पहीला फटका बसला. रात्री १० नंतर ध्वनिवर्धकांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. लोकांचा उत्साह काही कमी झाला नाही. लोकमान्य आणि त्यांची तत्त्वे, कधीच काळच्या ओघात विसर्जित झाली. विसर्जनाच्या मिरवणूकांच्या कालावधीचे प्रमाण वाढले. अर्थहीन नाचणे, कानाचे पडदे फाटतील अशा आवाजातली तितकीच अर्थहीन प्रसंगाला अगदीच न शोभणारी गाणी यासाठी मिरवणूकीतला वेळ कमी पडू लागला. मिरवणूकीत आधी कोण यावरून मानापमानची नाटके रंगू लागली. मग त्यासाठी आपण चतुर्दशी उलटून गेली आहे, पौर्णिमा लागली आहे वगैरे किरकोळ तपशिल लोकोत्साहापुढे बाजूला ठेवले. आणि त्यातच ३२ तासांच्या मिरवणूकीचा ऊच्चांक नोंदवला गेला. आणि.....! आणि २००९ मधे गणेशोत्सवाला निसर्गाने न भूतो न भविष्यती तडाखा दिला. दहीहंडीच्या सुमाराला "स्वाईन फ्लू" नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला. बळी घेतले. आणि पुणेरी गणेशोत्सवाची रयाच गेली. एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या कलाकाराची त्याच्या पडत्या काळात जशी अवस्था होते तसे झाले पुणेरी गणेशोत्सवाचे. दहा दिवसातल्या रविवारीही रस्ते मोकळे असे दुर्मिळ दृश्य पायला मिळाले. ऑस्ट्रेलिया-बांगला देश क्रिकेट कसोटी सामन्यात स्टेडियममधे प्रेक्षकच नसतात. तसेच काहीसे दृश्य पुण्यातल्या गणपती मंडळानी पाहीले. आणि आणखी लोकक्षोभ होण्यापूर्वी जवळजवळ सर्व मंडळानी मिरवणूक बारा तासात संपवण्याचा मंडळांना न पचणारा पण अपरिहार्य निर्णय घेतला. सर्व एकत्र येऊन बैठका झाल्या. आणि सर्व ठरले. एका मंडळाने तर प्रतिज्ञा केली की रात्री १२ च्या आमच्या गणपतीचे विसर्जन नाही झाले तर पुढील वर्षी आमचा गणपती विसर्जन मिरवणूकीत नसेल. अट्टल दारूड्याने "मी आता दारू सोडलीये आणि मला दारू पिताना पकडून दाखवावे. मी दारू सोडून देईन." या आणि त्या मंडळाच्या विधानातला फोलपणा कोणाही शहाण्याच्या लक्षात येइल. आणि बरोबर झालेही तसेच. त्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन २ च्या सुमाराला झाले. आता इतक्या गर्दीत थोडेसे पुढे मागे(?) होणारच हो. इतके काय मनाला लावून घ्यायचे. जनतेची स्मृती ही अतिशय कमी असते हेच खरे. पहाटे ५ पूर्वी मिरवणूक संपवण्याच्या निर्धाराचे तीन तेरा वाजले, वाजवले गेले. आणि यातला उद्वेगजनक भाग म्हणजे या मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण करणार्या एका वाहिनीने " वा वा. पहा पुणेकर किती धीराचे आहेत पहा. त्यानी स्वाईन फ्लूचे सावट धीराने झुगारून दिले आहे आणि पहा कसे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आले आहेत." खरतर जनतेने आपल्या नाच धिंगाण्याच्या तल्लफेपुढे स्वाईन फ्लूचा धोका पत्करला होता. दुसर्या दिवशीचे दुपारचे १० वाजले. तरीही मिरवणूक चालूच होती.............
२०२०.............
.............आणि आज तिसरा दिवस उजाडला आहे. अजूनही मिरवणूक चालूच आहे. कुतुहलाने मिरवणूकीतल्या एकाला विचारले असता त्याने सांगितले की अजून निम्मी मंडळे बा़की आहेत. लोक बेभान होऊन नाचातच आहेत. आणि सहनशील नागरिक हताश नजरेने, बधीर होऊन पाहत आहेत. त्यांच्या चेहेर्यावर "ही कटकट संपणार कधी?" हे प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसतय..........
श्रीराम पेंडसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा