रविवार, २५ एप्रिल, २०१०

मृत्यू

मृत्यू म्हणजे काय आहे?

उत्तर नसलेले कोडे आहे

न परतीच्या रेषेपलिकडचे

न सुटणारे गणित आहे १



लक्ष्मणरेषा पार केल्यावर

उत्तर सापडणारे सत्य आहे

परत येता येणार नाही

म्हणून बंद कुपीतले कूट आहे २



मृत्यू म्हणजे काय आहे?

अंधार खाईची खाण आहे,

जीवनाचे अस्तित्व पुसल्याच्या

कटू सत्याची जाण आहे? ३



"शी ईज नो मोअर"

म्हणणं किती साधं आहे

डोक्यावर पांढरी चादर टाकणं

किती किती सोपं आहे!! ४



श्वास थांबला हालचाल थांबली

आवाज थांबला डोळे निमाले

व्यक्तीमत्वाच्या अस्तित्वाच्या

सर्वच खुणा नष्ट झाल्या ५



काल होती आज नाही

इतकं का ते सोपं आहे?

अपरिहार्य सत्य असलं तरी

पचवणं खूप जड आहे ६



पोकळी आहे म्हणून अस्तित्व आहे

अस्तिव संपलं की पोकळी होते

त्या अस्तित्वाची सवय असते

म्हणून ती पोकळी टोचत राहते ७



मागे राहिलेले जिवलग जीव

गत जीवाला शोधत राहतात

जीव तर सापडत नाहीच नाही

सयी मात्र मेंदू कुरतडत राहतात ८



मन चित्त अहंकार आत्मा

न दिसणार्‍या गोष्टी आहेत

कोणतेही वस्तुमान नसलेल्या या

बुद्धीजीवी संकल्पना आहेत ९



कोणत्याही अशा संकल्पनेला

अंत हा कधीच असत नाही

तरीही एखादे व्यक्तीमत्व

कधीच अमर का असत नाही? १०



एखादी पणती विझली तरी

आपण ती जपून ठेवून देतो

एखादे अस्तित्व विझले तर

लगेच जाळून मोकळे होतो ??? ११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा