गुरुवार, ३० जुलै, २००९

माझा मी

वयाची नुकतीच साठी उलटली
एक पर्व पार पडलं
आता यानंतर पुढे काय
हे मात्र नाही उमगलं १

इथे मागे वळून पाहताना
मनात विचारांचं आंदोलन आलं
षट-दशकांच्या या आयुष्यात
काय कमावल, काय गमावलं? २

आत्तापर्यंतचं सारं आयुष्य
वाळूसारखं निसटून गेलं
आता हाती कणही नव्हता
जीवन सारं सुनं झालं ३

मित्र नाहीत, सखे नाहीत
वर्षे कशी सरत गेली
नाती, नातलगांची लेणी मात्र
आयुष्यभर बोचत राहीली ४

आता जीवनाच्या उतरणीवर
एक मात्र अप्रूप घडलं
जे जिवलग कधी भेटले नाहीत
त्यांचं मनोरम दर्शन घडलं ५

कोण कुठला, कोण कुठली
कशी अनामिक मैत्री झाली
पुन्हा एकदा मन-चित्ताची
सतार सुरात झंकारू लागली ६

शब्द जमले, तारा जुळल्या
विचारांच्या धारा जुळल्या
विद्ध नाते-संबंधाच्या ही
खोल खोल जखमा भरल्या ७

कुणी म्हणे दादा, कुणी बाबा,
कुणी म्हणे दोस्ता, तर कुणी आजोबा
आणि तरीही सर्व सुहृदांचा
जमला मनोहर निर्मळ घरोबा ८

हे चित्र दिसत होतं कसं?
की ऒल मायनस नो प्लस
जगाकडे पहायची वृत्ती बदलली
तर असेल सर्व प्लसच प्लस! ९

तुम्ही आलात तुम्ही बोललात
तुम्हाला भेटून छान वाटलं
नाही आलात नाही बोललात
कार्यबाहुल्यामुळे नसेल जमलं १०

तरीही मन अस्वस्थच होतं
एक गोष्ट टोचत होती
आपल्यासाठी कुणाला वेळ नाही ही
हिरवळीतल्या कांट्यासारखी बोचत होती ११

मी वाट पाहतोय त्या क्षणाची
बोचणारा कांटा निघून जाण्याची
आणि तो कांटा निघून गेल्यावर
मिळणार्‍या चित्त समाधानाची १२

पण कांटा निघून गेला तरी
मनाची बोच जाईल का?
भरल्या जखमेच्या व्रणासारखी
नंतर ती त्रास देईल का? १३

शनिवार, २५ जुलै, २००९

मैफल

" अगा वैकुंठीच्या राया....."
भीमसेनी स्वर मंडपात घुमले आणि सवाई गंधर्व महोत्सवाचा मंडप एकदम चित्रासारखा स्तब्ध झाला. जवळ जवळ १२००० श्रोते पुतळ्यासारखे बसून कानात प्राण आणून ऐकत होते. भान विसरले होते. त्या सुरात ताकदच इतकी जबरदस्त होती की मंडपाबाहेर चहाच्या स्टॉलवरची वेळ घालवणारी, रेंगाळणारी मंडळीही लहान मुलांच्या "स्टॅच्यू"च्या खेळासारखी, आहेत तशी स्तब्ध झाली. भीमसेनजी भान हरपून गात होते आणि श्रोतेही तितकेच भान विसरून ऐकत होते. मी नेहमी जे माझ्या मित्रांना म्हणत आलोय आणि अजूनही म्हणतो त्याचा प्रत्यय आला, की भीमसेनांचे सर्वोत्कृष्ट गाणे ऐकायचे असेल तर फक्त सवाई गंधर्व महोत्सवामधले गाणे ऐकावे. मला वाटते की त्याचे कारण असे असावे की ते श्रोत्यांच्या टाळ्यांसाठीचे, "वन्समोअर"चे गाणे नव्हते, तर ती गुरुंना वाहिलेली श्रद्धांजली होती. ती तिकीट लावून केलेली लक्ष्मी क्रीडा मंदीर किंवा टिळक स्मारक मधली मैफल नव्हती, तर ती गुरूची सेवा होती. या महोत्सवाला नुसते प्रसिद्धीचे वलय नसते तर यातील वातावरण भारीत असते. निराळेच असते. मुंबईचे गुणिदास संमेलन घ्या, दिल्लीच्या इंडिया गेटवरचा कार्यक्रम घ्या, किंवा कलकत्त्याचा आय.टी.सी. महोत्सव घ्या, सवाईचे भारीत वातावरण तिथे नसते. आणि म्हणून बडे बडे कलाकार इथे येण्यात बहुमान समजतात. उत्सुक असतात. पंडितजींच्या आमंत्रणाची वाट बघत असतात. मानधनाचा विचार न करता केवळ पंडितजींच्या शब्दासाठी येणारे कलाकार आहेत. वसंतराव देशपांडे तर घरचे कार्य असल्यासारखे सवाईत वावरत असत. यावातावरणातल्या प्रसन्नपणाची एक मजेदार गोष्ट सांगतो. त्यावेळी कार्यक्रम रेणूका स्वरूप शाळेच्या पटांगणावर होत असे. प्रत्येक रात्री श्रोत्यांवर गुलाब पाण्याचा फवारा उडवला जात असे. संपूर्ण मंडपभर.
वसंतराव आणि पु. ल. देशपांडे यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. १९७० किंवा १९७१ चा सुमार असावा. नक्की सन आठबत नाही. सवाई गंधर्व महोत्सवाच्या काळात पु. ल. यांचे "बटाट्याची चाळ" आणि "असा मी असामी" चे पुण्यात प्रयोग होते. रात्रीचा प्रयोग झाला की पु. ल. सवाईच्या मंडपात येउन बसत असत. महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. शेवटी भीमसेनांचे गाणे आणि त्याआधी वसंतराव. त्यादिवशी पु. ल. वसंतरावांना हार्मोनियमच्या साथीला बसले. दीड तास वसंतराव अफाट गायले. नंतर भीमसेनांचे गाणे होते. पु. ल. मुकाट्याने उठून प्रेक्षकात जाऊन बसले. भीमसेन स्वरमंचावर आले. इकडे तिकडे पाहिले. प्रेक्षकात पु. ल. दिसल्यावर, भीमसेन स्वरमंचावरून खाली आले, पु. लं चा हात धरून त्याना सन्मानाने स्वरमंचावर घेउन आले आणि हार्मोनियमवर साथ करण्याची विनंती केली. नंतर भीमसेनांचे जवळ जवळ पावणे दोन तास अफलातून गाणे. गाणे संपल्यावर छप्पर फाटेल असा टाळ्यांचा झालेला कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आहे.
भीमसेन या महोत्सवाचा प्राण आहेत. खरेतर भीमसेन हे भारतीय संगीताचा प्राण आहेत. मी १९६१-६२ च्या सुमाराला गाणे ऐकायला सुरूवात केली. मी तेंव्हा मुंबईत राहत होतो. वडिलांच्या आग्रहावरून विलेपार्ल्याला लोकमान्य सेवा संघात भीमसेनांची मैफल प्रथमच ऐकली. आणि त्यावेळीही शास्त्रिय संगीतातले शून्य कळण्याच्या काळात जे ऐकले ते भन्नाट वाटले. आजही काही कळतय आहे असे नाही. त्यावेळी जितके कळत होते, किंबहुना जितके कळत नव्हते, तितकेच आजही कळत नाहीये. पण तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली होती ती ही की, मंत्रमुग्ध होण्यासाठी संगीत कळण्याची जरूरी नाही. आणि हे माझे मत आजही कायम आहे. यमन कल्याण किंवा तोडीचा आनंद घेण्यासाठी, हंसध्वनी किंवा शुद्ध कल्याणसारख्या मन प्रसन्न करणार्‍या मैफलीचा आनंद घेण्यासाठी त्या रागाची सरगम किंवा स्वरमांडणी माहित असण्याची गरज नाही. उत्कृष्ट श्रीखंडाचा आस्वाद, आनंद, हा चक्क्यातले "फॅट" % कळले तरच घेता येतो का? नाही. " वा वा. श्रीखंड फारच मस्त झालय" असं आपण म्हणतो. पण त्याचबरोबर " चक्क्यात फॅट % किती आहे हो?" असे विचारत नाही. श्रीखंड खाण्याने मिळणारा आनंद पुरेसा असतो. तसे आहे हे.
आणि मग ऐकायची भूक वाढत गेली तसतसे इतर कलाकारही ऐकायला लागलो. त्यात वसंतराव देशपांडे हा अवलिया कलाकार भरभरून ऐकला. वसंतराव हे एक अजब रसायन आहे. ख्याल, नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा, गझल, भावगीत, सिनेसंगीत वगैरे सर्व क्षेत्रात मुक्तपणे आणि तितक्याच समर्थपणे संचार करणारे हे कलंदर व्यक्तिमत्व. वसंतराव खरे नावारूपाला आले आणि लोकप्रिय झाले ते " कट्यार..."मुळे. इतके दिवस फक्त गायक म्हणून श्रोत्यांना ठाऊक असलेले वसंतराव, नट म्हणून प्रेक्षकांपुढे "कट्यार काळजात घुसली" मधून आले. आणि प्रचंड गाजले. त्यांचे "कट्यार ...." लोकानी डोक्यावर घेतले. पण तरीही वसंतरावांच्या अफाट कर्तृत्वाला योग्य ती प्रसिद्धी मिळाली नाही. म्हणून मी त्यांना "शापित गंधर्व" म्हणतो. बडी बडी टीकाकार म्हणवणारी मंडळी या सिद्धहस्त कलाकाराला गायक मानायला तयार नव्हती. इतकच काय तर आकाशवाणीनेही त्याना गायक म्हणून मान्यता दिली नाही. पुणे आकाशवाणीतल्या एका निवृत्त अधिकार्‍यांना भेटायचा योग आला होता. ते आकाशवाणीचे "राजापेक्षा राजनिष्ठ" नोकर होते. वसंतरावांचा विषय निघाला. वसंतरावाना आकाशवाणीने मान्यता का दिली नाही असे विचारता त्यांचा चेहेरा एरंडेल प्यायल्यासारखा झाला. तेंव्हाच त्यांची आकाशवाणीवरची "राजनिष्ठा" लक्षात आली. त्यानी अंगावरून झुरळ झटकावे तसा तो विषय झटकून टाकला. फक्त इतकेच गुळमुळीत उत्तर दिले की त्यांचे स्वर शुद्ध नव्हते. गाणे तुटक तुटक असे. मी त्यावर म्हणालो की "मग कुमारजी सुद्धा तुटक तुटकच गातात की". पण त्या गृहस्थांना, ते निवृत्त का होईना पण सरकारी सेवक असल्याने माझे म्हणणे आवडले नाही. त्यांच्याकडे त्याचे समाधानकारक उत्तर नव्हते. राजनिष्ठ नोकर असल्याने आकाशवाणी म्हणते ते बरोबरच असले पाहिजे इतकेच त्यांना ठाउक होते. म्हणून मग त्यांनी "कुमार गंधर्वांची गोष्ट वेगळी आहे. त्याना एकच फुफ्फुस आहे. म्हणून त्यांचे असे होते." वगैरे थातुर माथुर म्हणून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आणि मीसुद्धा "हो का? असेल असेल" असे म्हणून उगाच न संपणारा वाद नको, म्हणून तिथून काढता पाय घेतला.
पंडीत जसराजही खूप ऐकले आहेत. जसराजांचा आवाज अतिशय मुलायम. अंगावरून मोरपिस फिरवल्यासारखे वाटावे असा. श्रोत्यांना बांधून ठेवण्याची जबर शक्ती त्या आवाजात आहे. मला आठवतय कि १९७४/७५चा सुमार असावा. सन नक्की आता आठवत नाही. पंडीतजी काही वर्षाच्या अनुपस्थितीनंतर सवाईत गात होते. नुकतेच जीवघेण्या दुखण्यातून बाहेर आले होते. त्यावर्षी ते अफाट गायले. मला वाटते ते "दरबारी" गायले होते. द्रुतची बंदिश "अजब तेरी दुनिया मालिक" संपवली आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आणि त्यानंतर जसराज आणि सवाई गंधर्व महोत्सव हे समीकरण बनले. जोग, गोरख कल्याण, अहिर भैरव, नट भैरव, भैरव, जयजयवंती. आणि गेल्या वर्षी तर शुद्ध सारंग. किती किती मैफली. त्यात झाकिर तबल्याच्या साथीला असेल तर मग जसराज अधिकच खुलायचे.
मी गाणे ऐकायला सुरूवात केल्यानंतरच्या काळात म्हणजे १९६० ते १९८५ या दोन तपात भारतिय शास्त्रिय संगीतावर भीमसेन, जसराज, कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे या चार महान कलाकारांचा जबरदस्त प्रभाव होता. किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, बेगम परवीन सुलताना, उस्ताद अमीरखानसाहेब ही महान मंडळी होती. उ. सलामत अलीखान नझाकत अली खान हेही त्या काळात लोकप्रिय होते. पण त्यांचे कार्यक्षेत्र पाकिस्तानात होतं. रवी शंकर, विलायत खान, हरीप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा वगैरे वाद्य संगीत-दिग्गज मंडळी होती. यांचे महत्त्वा अजीबात कमी होत नाही. पण ही सर्व भारताबाहेर जास्त रमत असत. परदेशात हे कलाकार भारतापेक्षा अधिक लोकप्रिय होते. पण भीमसेन, वसंतराव, जसराज, आणि कुमारजी हा भारतीय संगीताचा प्राण होता असे मला वाटते. चौखांबी तंबू होता जणूकाही. मी म्हणतो त्या काळात या चॉघांनी शास्त्रिय संगीताची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहीली होती.
मला असे वाटते की भीमसेनांचे व्यक्तिमत्व आणि गाणे हे एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे आहे. सर्व कुटुंबाला दिशादर्शक, मार्गदर्शक, आणि कडक शिस्तीचे. सर्वांना संभाळून घेणारे. प्रसंगी कुटुंबप्रमुखाप्रमाणे कानपिचक्याही देणारे. शिस्तीच्यासंदर्भात पंडितजींचा एक मजेदार किस्सा आठवला. मुंबईत एक कार्यक्रम होता. एक मोठे मंत्री दर्जाचे नेते येणार होते. मंत्रीजींना नेहमीप्रमाणे पाऊण तास उशिर झाला. त्यानंतर संयोजकांचे तासभर भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी पंडितजींचा "आजचे प्रमुख कलाकार पं भीमसेन जोशी आहेत." इतकाच उल्लेख केला. बाकी सर्व मंत्रीस्तुती होती. पंडितजींना फक्त २० मिनिटे दिली होती. पंडितजी बरोबर २० मिनिटे गायले. अफाट गायले. त्यानंतर प्रेक्षकांनी आरडा ओरडा केला की अजून गा. पंडितजी जाग्यावरून उठले आहीत. मग मंत्रीजी जाग्यावरून उठले. पंडितजींच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले की, "सर्व प्रेक्षकांची इच्छा आणि आग्रह आहे तरी आपण अजून गावे." पंडितजींनी काय केले असेल? पंडितजींनी आपले घड्याळ मंत्रीजींना दाखवले आणि म्हणाले, "मला २० मिनिटांचा वेळ दिला गेला होता. त्याप्रमाणे गायलो. वेळेची बंधने ही पाळली जावीत असे मला वाटते. आता आणखी गाणे योग्य होणार नाही." असे म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिला. आणि ते गायले नाहित. पंडितजींनी आपल्या गाण्यात फारसे धाडसी प्रयोग केले नाहीत. "धोपट मार्गा सोडू नको" असे त्यांचे गाणे असे. त्यांना कधीतरी विचारले गेले होते की तुम्ही तेच तेच राग मैफलीत का सादर करता? तेंव्हा त्यांनी उत्तर दिले होते की श्रोते मला काय येतय हे पहायला येत नाहीत. माझ्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. श्रोत्यांना आनंद देणे महत्त्वाचे. त्यामुळे त्यांना समजेल, आवडेल असे मी गातो.
त्याउलट वसंतरावांचे गाणे आक्रमक. साहसी. त्यांच्या गळ्यातून अश्या काही मुश्किल स्वरावली बाहेर पडत असत, आणि या जागा ते इतक्या सहजतेने घेत असत कि ऐकणारे चकित होउन जात. वसंतरावांचे व्यक्तिमत्व किंचितसे खोडकर. किंवा शाळेतल्या अतिशय हुशार पण व्रात्य मुलासारखे. जाता जाता टपली मारणारे. खोड्या काढणारे. त्यांच्या गाण्यात आव्हान असे कि "पहा मी किती सहज गातोय ते. तुम्हाल येइल का असे?" किंवा हुशार मुलगा म्हणतो ना की " अरे इतके सोपे गणित येत नाही? पहा कसे सोडवायचे ते." भीमसेनांचे गाणे हे कसोटी क्रिकेट सारखे आहे, तर वसंतरावांचे गाणे हे एकदिवसिय सामन्यासारखे आहे. त्या सामन्याचा जीव फक्त ५० षटकांचा. पण तरीही त्यात क्रिकेटचे तंत्र आत्मसात नसले तर खेळाडू अपयशी ठरेल. तसे वसंतरावांची मैफल ही दीर्घ नसली तरीही तांत्रिकदृष्ट्या अतिशय परीपूर्ण असते. ताना अणि सरगम हे वसंतरावांचे बलस्थान. आणि म्हणूनच वसंतरावांच्या ताना आणि सरगम ही श्रोत्यांना नागाप्रमाणे डोलवत असे. पण वसंतराव फारसे ख्याल गायनात रमत नसत. त्यांचा ख्याल हा जेमतेम ३५ ते ४० मिनिटांचा असे. ते नाट्यगीते, ठुमरी, दादरा, भावगीत अश्या उपशास्त्रिय प्रकारात अधिक खुलायचे. मला या संदर्भात त्यांची न्यूयॉर्कमधली एक मैफल आठवतीये. मी हजर नसलो तरी माझ्याकडे ध्वनिमुद्रण आहे. त्यात वसंतराव जेमतेम अर्धातास "भीमपलास" गायले आहेत. नंतर श्रोत्यानी आग्रह केला "नाट्यगीत म्हणा". त्यावर ते नेहमीच्या त्यांच्या अनुनासिक आवाजात म्हणाले, "नाट्यगीतेच म्हणायची आहेत ना? म्हणतो. पण त्याआधी मी तुम्हाला आमच्या संगीत नाटकाबद्दल सांगितले तर चालेल का?" "हो हो. चालेल चालेल." "तुम्हाला आमच्या नाटकातले संगित कसे असते ते सांगतो व त्याची झलक दाखवतो. आणि मग जसा वेळ असेल तशी काही नाट्यगीते म्हणतो. चालेल?" "हो. चालेल चालेल." " ठीक आहे. मी यासाठी पांच प्रमुख संगित नाटके आधार म्हणून घेणार आहे. की जी मराठी संगित नाटकाचा प्राण समजला जातात. सॉभद्र, मानापमान, शाकुंतल,शारदा आणि मृच्छकटिक. ही ती नाटके." आणि असे म्हणून त्यानंतर वसंतराव तासभर गाण्यासह बोलले आहेत. इथे एक उल्लेख जाताजाता करायचा आहे तो असा कि, पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे या दोघांनी वसंतरावांच्या स्वतंत्र मुलाखती घेतलेल्या आहेत. मुलाखतकाराने कमीतकमी बोलून कलाकाराला अधिकाधिक कसे बोलू द्यायचे असते याचा या मुलाखती म्हणजे आदर्श वस्तुपाठ आहेत. यापैकी वपुंनी घेतलेली मुलाखत ही आलुरकरांनी "मराठी संगीत नाटकाची वाटचाल" या नावाने दोन भागात प्रसिद्ध केलेली आहे. वसंतप्रेमींनी ही मुलाखत जरूर ऐकावी.
कुमार गंधर्वांचे गाणे हा वेगळाच विषय आहे. त्यांचे गाणे हे कानाला अतिशय गोड, सुरेल लागते. पण गूढ. जी.ए. कुलकर्णींच्या गोष्टींसारखे. फ्रेंच भाषा समजत नाही पण ऐकायला गोड. समजायला अतिशय कठिण. तसे. अफाट प्रतिभासंपन्न गाणे. अतिशय सुबक मांडणी. आपल्याला काय सादर करायचे आहे याचा मुद्देसूद आराखडा डोक्यात तयार असावा असे सादरीकरण. त्यांची निर्गुणी भजने लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी काही रागांची निर्मितीही केली आहे. त्यांचे "अनुपरागविलास" हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी निर्माण केलेल्या रागांबद्दल तांत्रिक माहिती आणि त्या रागातल्या चीजा त्यांनी दिल्या आहेत. शास्त्रिय संगिताचा अभ्यास करणार्‍यांनी हे पुस्तक जरूर अभ्यासावे. पण त्यांच्या गाण्यावर त्यांच्या साथ न देणार्‍या प्रकृतीचे सावट होते. त्यांच्या ताना थोड्याश्या तुटक तुटक असायच्या. पण असामान्य प्रतिभेच्या जोरावार त्यांनी या त्रुटींवर समर्थपणे मात केली. इतकी कि या गोष्टी, त्यांचे गाणे ऐकताना लक्षातही येत नसत. त्यांचा अतिशय गोड स्वर कानावर पडला की श्रोते भान विसरत असत. गाणे ऐकण्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे गाणे मी ऐकले तेंव्हा मला त्यांचे गाणे शाळेच्या हेडमास्तरसारखे वाटायचे. मुलांना हेडमास्तरांची नेहमी भीति वाटते. पण त्याचबरोबर शिस्त आणि बुद्धिमत्तेचा आदरही असतो. तसे कुमारांचे गाणे ऐकताना मला वाटायचे.
आणि जसराजजींच्या गाण्याबद्दल काय बोलायचे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचे गाणे अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे. अतिशय सुरेल व गोड गळा. तितकेच प्रसन्न व्यक्तीमत्व. गातानाच्या त्यांच्या भावमुद्रा अतिशय लोभसवाण्या असत. वसंतरावांप्रमाणे सुंदर ताना. आणि हातखंडा सरगम. त्यांच्यावर काही जणांचा असा आक्षेप असे की ते फार ठाय लयीत गातात. त्यामुळे त्यांचे गाणे खूप संथ आहे. मला कळत नसल्यामुळे, हे मला फारसे मान्य नाही. माझ्यासारख्या अस्सल कानसेनाला ते गाणे ऐकताना असे वाटते कि त्यावेळी त्या ठाय लयीची गरजच आहे. रागाचा शास्त्राशुद्ध विस्तार, रंजक मांडणी आणि श्रोत्यांना गुंगवून ठेवण्याचे कसब ही त्यांची वैशिष्ट्ये. त्यांचे दुसरे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रागातल्या बंदिशींचे बोल हे यावनी नसतात. हिंदू देवतांच्या स्तुतीपर बोल असतात. मला माहित असलेला अपवाद म्हणजे त्यांची भैरव रागामधली "मेरो अल्ला मेहेबान" ही बंदिश आणि तोडी रागामधली "अल्ला जाने अल्ला जाने" ही बंदिश. इतर असतील तर निदान मला तरी माहित नाहियेत. पण माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे यावनी बंदिशी नाहित. जर असतील तर कृपया जाणकारांनी माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती. जसराजांचे गाणे कधीही आक्रमक वाटलेच नाही. मला ते नेहमी आईच्या मायेसारखे वाटत आले आहे. आपण दु:खात असलो की आईने पदराखाली घेतल्यावर जशी मनाला शांतता मिळते तसे, मला त्यांची मैफल ऐकत असताना आपल्याला आईने पदराखाली घेतले आहे असे मला सारखे वाटायचे. गेल्या काही महिन्यांपूर्वी हा मला अनुभव आला. माझ्यावर माझी प्रिय व्यक्ती सोडून देवाघरी जाण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. त्यावेळी असाच सकाळी फिरायला गेलो असता पंडितजींचा एक नितांतसुंदर भैरव ऐकत होतो. हुबळीतली मैफल होती. ५० मिनिटांच्या त्या मैफलीत हा मला अनुभाव आला. मी पूर्णपणे स्वतःला विसरून गेलो. मी कुठे आहे, काही मला काही आठवत नाही इतका मी ब्लँक झालो होतो. मा़झे सर्व दु:ख तेव्हढ्यापुरते तरी पूर्णपणे मी विसरलो. वास्तविक भैरव हा तसा उग्र प्रकृतीचा, प्रवृत्तीचा राग. इतका उग्र राग हा इतका मुलायम होऊ शकतो यावर इतके दिवस माझा विश्वास नव्हता. त्यादिवशी तो बसला. आणि ही पंडितजींच्या मधुर रेशमी आवाजाची करामत होती.
तर असे हे चार प्राण. पांचवा प्राण अर्थात श्रोते. भारतीय शस्त्रिय संगीत या चॉघांशिवय अपुरे आहे. इतरही खूप कलाकार आहेत. त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचे म्हणजे मालीनीताई राजूरकर, बेगम परवीन सुलताना, पंडित राजन साजन मिश्रा, पंडित जितेंद्र अभिषेकी, किशोरताई आमोणकर, अजय चक्रवर्ती, गुंदेचा बंधू, वीणाताई सहस्रबुद्धे, आरती अंकलीकर. ही सारी दिग्गज मंडळी आहेत. पण या सर्वात सध्या आपल्या गाण्याने श्रोत्यांवर मोहिनी घातली आहे ती अजयजींची बुद्धीवान कन्या कौशिकी चक्रवर्ती. अफाट तयारी, अतिशय सुरेल आवाज, ताल आणि सरगम वर प्रचंड प्रभुत्व या जोरावर ती खूपच लोकप्रिय झाली आहे. तिची मैफल ऐकणे हा एक प्रचंड आनंददायी आणि सुखद अनुभव आहे. विशेषतः तिचा "सुंदर ते ध्यान..." हा अभंग तर खास लोकप्रिय आहे. हा अभंग गाताना ती अमराठी आहे, तिला मराठीचा गंध शून्य आहे हे जाणवतही नाही.
असेच अनेक तरूण कलाकार आहेत की जे बर्‍याच जणांना ठाऊकही नाहीत. पण अफाट गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. मी ऐकलेल्या काही कलाकारांपैकी गोव्याची आरती नायक ही सुरेल गायिका. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगित अलंकार (एम.ए.) ही पदवी तसेच "सूरसिंगार संसद"च्या सूरमणी पुरस्काराने सन्मानीत, वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठानचा "वामनदाजी" पुरस्कार. अशी ही गुणी कलाकार. अत्यंत सुरेल आवाज, अफाट तयारी, ख्यालाची नेटकी आणि सुबक मांडणी नीटस सादरीकरण ही तिच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये. तिची मैफल ऐकणे हा एक निखळ आनंददायी अनुभव आहे. नाव न सांगता हिचे गाणे ऐकले तर आपण एखाद्या दिग्गज कलाकाराचे गाणे ऐकतोय असे वाटावे. हेमा उपासनी ही मी ऐकलेली आणखी एक तरूण कलाकार. सवाई गंधर्वमधले तिचे गाणे खूपच छान झाले होते.
कुठल्याही मैफलीचा शेवट हा नेहमी भैरवीने होतो. भैरवी हा हुरहूर लावणारा राग आहे. जरी त्यात गाणे संपल्याची आर्त जाणिव असली तरी अशीच मैफल पुन्हा रंगण्याची खात्रीही असते. भैरवीचे हे वैशिष्ट्य आहे. भीमसेनांची "बाबुल मोरा..." असो किंवा " हरीका भेद न पाये..." असो, वसंतरावांचे "ना मारो पिचकारी..." असो ही सर्व हुरहूर लावतात. लावतात. जसराजांचे "निरंजनी नारायणी..." आणि "माई सावरे रंगराची..."तर अतिशय आनंद-भैरवी आहेत. पण मैफलीची सांगता भैरवीने करायची नाही ही गोष्ट सहसा आढळत नाही पण गेल्या महिन्यात कौशिकीची पुण्यातली मैफल मात्र भैरवीशिवाय संपली. लोकांना ती आणखी गाईल असे वाटतानाच तिने प्रेक्षकांना नमस्कार केला आणि रंगपटात निघूनही गेली. नंतर लोकाना कळले की मैफल संपलीये.
तर ही अशी मी सदर केलेली आठवणींची एक मैफल. यात लिहिलेली ही पूर्णतया माझी मते आहेत. सर्व रसिक माझ्यामताशी सहमत असतीलच असे नाही किंबहुना नसतीलच. असे जे रसिक माझ्या मताशी सहमत नसतील अश्या सर्व रसिकांच्या बहुमूल्य मतांचा मी आदर करतो. त्या रसिकांनी आपली मते अवश्य मांडावीत. आणि हे माझे निवेदन हिच माझ्या लेखाची भैरवी आहे.

ॐ तत्सत

आरोग्यं धनसंपदा-८

मागिल काही लेखात आपण दिनचर्या आणि काही आसने पाहिली. त्या आसनांचे परिणाम आणि उपयोग मी सांगितले होते. त्यावेळी मी असेही म्हणालो होतो की प्रत्येक आसनाचा स्वतंत्ररीत्या उपयोग सांगणे कठीण आहे. मागिल लेखात जी आसने पाहीली त्यात आपण विपरीत करणी या आसनचा विचार केला नव्हता. म्हणजे ते राहून गेले नव्हते. मी ती आसने सांगताना हे आसन गाळले होते. कारण त्यात आणि शवासनात थोडासाच फरक होता. म्हणून त्याचा स्वतंत्र विचार केला नव्हता. या लेखात त्याचा विचार नंतर करुया.
या सर्व आसनांबद्दल लिहिताना त्या त्या आसनाचा उपयोग सांगितला होता. त्यावेळी मी म्हटले होते की प्रत्येक आसनाचा स्वतंत्र परिणाम सांगणे अशक्य आहे. या सर्व आसनांच्या एकत्रित परिणामाचा विचार केला पाहिजे. आणि त्यावेळी एक गोष्ट सांगितली नव्हती. ती सांगतो. ती म्हणजे ही सर्व आसने काहीही झाले नसताना , काहीही होऊ नये म्हणूनही करावीत. सर्वसाधारण स्वास्थ्यासाठीही ही आसने करावीत. सर्वसामान्य स्वास्थ्यासाठी किंवा ही आसने ज्यासाठी सांगितली आहेत त्यासाठी करताना काही शंका उपस्थित होतील. त्यासंबंधी पाहूया. सर्वप्रथम नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे आसने कधी करावीत. कुठे करावीत वगैरे.
सर्वसाधारणपणे सकाळी आसने करावीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी वातावरण स्वच्छ असते. वाहनांनी सोडलेल्या धूराचे साम्राज्य नसते, माणसांची वर्दळ अजिबात नसते. वातावरणातली धूळ जमिनीवर बसलेली असते. त्यामुळे हवा शुद्ध असते. शिवाय आपल्याकडे येणार्‍या लोकांची वर्दळही नसते. त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपणास आसने करता येतात. संध्याकाळी वाहने माणसे यांच्या रहदारीमुळे वातावरणातले प्रदूषण वाढलेले असते. म्हणून सहसा हा योगाभ्यास संध्याकाळी करू नये. अर्थात आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण वगैरेमुळे सकाळी वेळ होणे शक्य होईल असे नाही. मग त्यांनी हा अभ्यास करायचा नाही का? करायचा. अवष्य करायचा. संध्याकाळी करायचा. मी फक्त योग्य वेळ सांगितली. मग संध्याकाळी आसने करायची असतील तर वेळ निवडताना शक्यतो अशी वेळ निवडावी की हा अभ्यास करताना कोणाचा व्यत्यय येणार नाही. तुम्ही सुरूवात केली आणि बेल वाजली, कोणीतरी आले. असे झाले की मग ते जे एक वातावरण निर्माण झालेले असते ते बिघडते. आपल्या आसनांची, आपल्या आसनात जाण्याच्या मनस्थितीची, लय बिघडते. एक मजेदार उदाहरण सांगतो. क्रिकेटची आवड असणार्‍यांना हे पटकन कळेल. एखादा फलंदाज सुंदर खेळत असताना मधेच शीतपेये आली की त्याची एकाग्रता भंग पावते, लय सुटते आणि तो नंतर लगेचच बाद होतो. तशी आपल्या मनाची एकाग्रता भंग पावते. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण हा अभ्यास करणार ती खोली बर्‍यापैकी मोकळी असावी. हवेशीर असावी. त्यात खेळती हवा असावी. कसे आहे की पंखा लावला की हवा खेळेल की. पण जर खोलीत सामानाची फार गर्दी असेल तर पंखा लावूनही हवा खेळती राहणार नाही. जरी खिडक्या असल्या तरी. आता, १ बीएचके, २ बीएचके च्या युगात हे जरा कठीणच आहे हे मला मान्य. पण नक्की काय असावे हे जर कळले तर आपण त्या दिशेने त्यातल्यात्यात साध्य करण्याचा प्रयत्न करू शकू. कोणत्याही योगाभ्यासात शरीर आणि मन याला महत्त्व आहे. आणि म्हणून या योगाभ्यासाचा मानसिक आणि शारीरीक आनंद, जर हा अभ्यास विनाव्यत्यय झाला तर घेता येईल आणि त्याचा योग्यतो उपयोग होईल. हा योगाभ्यास करताना शांतता असावी. संगित ऐकत योगासने करू नयेत. आणि संगित हवेच असेल तर ते इतपत असावे की कानावर काहीतरी सूर पडत आहेत. पण ते काय आहेत ते कळत नाहीये. भाजी आमटीतल्या मिठासारखे आहे हे. मीठ जास्त झाले तर पदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. त्या मिठाकडेच लक्ष जाईल. पण जर मीठ योग्यप्रमाणात असेल तर त्यामिठाचे अस्तित्व जाणवणार नाही. पण पदार्थाचा आस्वाद घेता येईल. संगीत वाद्य संगीत असावे. कंठ्य संगीत असू नये. कारण मग आपल्या शरीरावर लक्ष न राहता त्या संगितावर लक्ष केंद्रित होईल. मंद आवाजात रवीशंकरांची सतार, किंवा हरीप्रसादांची बासरी, किंवा शिवकुमारांचे संतूर असे असावे. की ज्यायोगे वातावरणही प्रसन्न असेल आणि आपल्याला आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. जे या अभ्यासच्या परिणामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
दुसरा प्रश्न मम्हणजे पोषाख काय असावा. महत्त्वाचे म्हणजे पोषाख हा सैलसर असावा. पुरूषानी "टी शर्ट" आणि ट्रॅक सूट पेहेरावा. स्त्रियांनी पण असाच पोषाख करायला हरकत नाही. पण याला पर्याय म्हणून सलवार कुडता हरकत नाही. बाकी इतर साहित्य त्यात्या आसनात आले आहेच.
तिसरा लोकप्रिय प्रश्न म्हणजे काय खावे. म्हणजे या व्यायामाआधी खाल्ले तर चालेल का? त्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही आहे. कसे ते सांगतो. खाल्ले तर चालेल. कारण या सर्व स्थिती स्थिर अवस्था असल्याने खाण्याचा संबंध येत नाही. पण खाल्ले तर सामान्यपणे आपल्या मनावर पेंग येते. झोप लागण्याची शक्यता असते. म्हणून खाऊ नये. पण खायचेच असेल तर त्याला पर्याय असा की हा अभ्यास करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हलका आहार घ्यावा.
नंतरचा येणारा प्रश्न म्हणजे किती वेळ आसने करावीत? खरे तर याचे निश्चित उत्तर देणे अवघड आहे. सर्वसामान्यपणे ढोबळमानाने रोज तासभराचा सराव करावा. आणि प्रत्येक आसनाला कमीतकमी १५ मिनिटे तरी द्यावीत. आता १५ मिनिटे दिल्यास तासात ही सर्व आसने बसणार नाहीत. मग तासाभरात आसने करून मग १० मिनिटे शवासन करावे. हे वेळेचे गणित ज्याचे त्याने ठरवायचे आहे. तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ, आणि हा योगाभ्यास करण्याची तुम्हाला कितपत गरज वाटते आहे, किती निकड आहे त्यावर हे अवलंबून आहे. कशाला प्राधान्य द्यायचे - आपल्या प्रकृतीला की काम आणि पैसा याला हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
आणि आता थोडेसे विपरित करणी या स्थितीबद्दल पाहूया. बरीचशी शारीरीक दमणूक झाली कि या आसनात बरे वाटते. तसेच उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्तींना रक्तदाब वाढलेल्या काळात या आसनात आराम मिळतो. या आसनात कसे जायचे हे दाखवणारी दोन चित्रे दिली आहेत. त्या चित्रावरून सहज कळेल की त्या अवस्थेत कसे जायचे. बाकी इतर माहिती मागील लेखात आली आहे. म्हणून फक्त चित्रे इथे दिली आहेत.
या अवस्थेत १५ मिनिटे ते अर्धा तासपर्यंत राहता येते. शरीर अणि मनावर आलेला थकवा, मरगळ याने दूर होण्यस मदत होते. चांगली विश्रांती मिळते. ह्रदयविकार असणार्‍या व्यक्तींना गुरुत्वाकर्षणामुळे ह्रदयावर येणारा ताण या आसनात कमी होतो.
या पुढील लेखात आपण पुन्हा एकदा दिनचर्या, पथ्यापथ्य यावर चर्चा करू.

॥ ॐ तत्सत् ॥
॥ जय श्रीराम ॥

आरोग्यं धनसंपदा-७

मागच्या दोन लेखात आपण काही आसने पाहिली. ती सर्व आसने ही विश्रांतीची आसने समजली जातात. आणि त्यावेळी मी म्हटले होते की या विश्रांतीच्या आसनांचा राजा म्हणता येईल असे आसन म्हणजे शवासन. आपले आयुष्य आनंदी करायचे असेल तर शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की झोपेत शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळेलच की. पण तसे नाहीये. झोप ही नेहमी अनियंत्रीत असते. झोपेत शरीर आणि मनावर ताबा ठेवता येत नाही. आणि म्हणून झोप हा विश्रांतीचा हुकूमी एक्का ठरू शकत नाही. शास्त्राशुद्ध पद्धतीने केलेले शवासन शरीर आणि मनावरचा ताण काढून टाकण्यात प्रभावी ठरते.
शवासनात आपण शरीर आणि मनावर लक्ष ठेवत असल्याने पूर्णपणे जागे असतो. हाच झोप आणि शवासन यातला फरक आहे. शवासन ही नियंत्रित आणि विचारपूर्वक शरीराला, मनाला दिलेली विश्रांती आहे. हठयोग प्रदिपीकेत म्हटलय की :
उत्तानं भूमॉ शयनं शववत् तद् शवासनम् ॥
शवासनं शांतीहरं चित्त विश्रंतीकारकम् ॥
एक गोष्ट ध्यानात ठेवावी की शवासन हे दिसयला खूप सोपे पण करायला अतिशय कठीण आसन आहे. \"त्यात काय मोठेसे? नुसते पडून तर राहायचे आहे." इतके ते सोपे नाहिये. आता आपण प्रत्यक्ष शवासन कसे करायचे ते पाहू. यात नेहमीप्रमाणे साहित्या, कृती, परिणाम वगैरे पद्धतीने पाहू.
साहित्य :
दोन ब्लँकेट, ऊशी, दोन विटा.
कृती :
दिलेले साहित्य सर्व एकदम वापरायचे नाही. निरनिराळ्याप्रकारचे साहित्य वापरून आप्ल्य शरीरास जे योग्य वाटेल, चालेल त्याप्रमाणे सहित्य निवडायचे आहे. दोन ब्लँकेट, दोन विटा, एक ब्लँकेट आणि एक उशी, एक ब्लँकेट आणि एक वीट किंवा नुसते एक ब्लँकेट अश्या निरनिराळ्याप्रकारे सहित्याच्या रचना करून शवासन करता येते. त्यापैकी दोन ब्लँकेटवर हे आसन कसे करायचे ते पाहूया.
एका ब्लँकेटची लांबीच्या बाजूने तिहिरी घडी करा. भिंतीपासून तीन फूट अंतर सोडून ब्लँकेट भिंतीला काटकोनात ठेवा.दुसर्‍या ब्लँकेटची रूंदीच्या बाजूने तिहेरी घडी करून ती घडी पहिल्या ब्लँकेटवर एका टोकाला इंग्रजी 'टी' अक्षरासारखी काटकोनात ठेवा. आणि चित्रात दाखवल्यासारखे बसा.( चित्र क्र.१) पाय गुडघ्यात वाकवून उभे करून ठेवा. हाताचे तळवे मागे जमिनीवर टेकवा. नंतर कोपरे जमिनीवर टेकवत संपूर्ण पाठ ब्लँकेटवर टेकवा. कुल्ले किंचीत उच्लून पायाकडे किंचित ढकलत जमिनीवर आणा.दोन्ही पावलात साधारण एक फूटाचे अंतर ठेवा. पावलाच्या करंगळ्या जमिनीकडे आणायचा प्रयत्न करा.दोन्ही हात आपल्या शरीरापासून सुमारे फूटभर अंतरावर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे. बोटे पसरलेली. हाताचे आंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. (चित्र क्र.२) डोळ्याच्या पापण्या, वरची पापणीखाली आणत डोळे हळूवार मीटा. ओठ थोडेसे विलग, जीभ जबड्यात सैल सोडा. श्वासोत्श्वास हा नैसर्गिक चालू द्या. ही स्थिती १० ते १५ मिनिटे ठेवा.
आसनातून बाहेर येताना प्रथम हात दुमडून छातीवर घ्या, पाय दुमडून पोटाजवळ घ्या. सावकाशपणे ऊजव्या कुशीवर वळा. कुशीवर वळताना तुम्ही पाठीखाली जे काही घेतले असेल त्यावरून पूर्‍णपणे खाली या. नंतर सावकाश पोटावर पालथे वळा. हात आणि पाय लांब ताणून द्या आणि मग आपले तळहात आणि गुढगे यांचा वापर करत सावकाश ऊठून बसा.
परिणाम आणि चिंतन :
आपण मागे पाहिलेच आहे की या आसनामुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि मनाला शांती मिळते. प्रत्यक्ष या आसनात आपण १५ मिनिटे असताना काय करायचे आहे ते पहा.
डोळे मिटल्यानंतर सर्वप्रथम आपल्या खोलीबाहेरून येणारे आवाज ऐका. आपल्या खोलीतले आवाज ऐका. आपल्या श्वासावर आपले लक्ष केंद्रित करा.ञानंतर आपल्या शरीराची जाणिव होते आहे का ते पहा. आपल्या शरिराचे कोणते अवयव जमिनीला टेकलेले आहेत त्ते स्पर्शाने जाणवते का ते पहा. म्हणजे आपले शरीर जमिनीवर कसे पडले आहे त्याची जाणिव त्या स्पर्शातून होइल. कोणता अवयव कमी जास्त टेकला आहे ते जाणवेल. नंतर सर्व अवयव शिथील करण्याचा सराव करा. बंद डोळ्यापुढे असे दृश्य आणा की आपल्याला जो अवयव शिथील करायचा आहे त्या अवयवातून आपला श्वास बाहेर पडतोय अशी कल्पना करा. प्रत्यक्ष श्वास हा नाकातूनच बाहेर पडणार आहे. आपल्याला फक्त कल्पना करायची आहे. ट्यमुळे तुम्ही ज्या अवयवातून श्वास बाहेर पडतोय अशी कल्पना कराल, ते ते अवयव शिथील होऊ लागतील. यात गुडघे, कोपरे. खांदे,कमरेतले खुब्यातले सांधे शिथील होतील. नाभी हळू हळू जमिनीकडे ढकलत उदरपोकळिचे स्नायू ढिले करा. सर्व शारीरीक क्रिया शांत झाल्यावर श्वासावर लक्ष केंद्रित करा.
मागील दोन लेखात सांगितलेली आणि शवासन असे मिळून रोज केल्यास शरीर आणि मनावरचा ताण नाहीसा होइल. या पांच आसनांचा संच सर्वसाधारण स्वास्थ्यासाठी वापरावा.
यापुढील लेखत आपण पुन्हा दिनचर्या याबद्दल पाहणार आहोत.
ॐ तत्सत्

श्रीराम पेंडसे

आरोग्यं धनसंपदा-६

आरोग्यम् धनसंपदा
मागच्या लेखात आपण दोन आसनांचा विचार केला होता. ती म्हणजे सुप्तवीरासन आणि सुप्तबद्धकोनासन. आज आपण पुढील आसने बघणार आहोत. आजच्या लेखात आपण विपरितदंडासन, सेतुबंध सर्वांगासन आणि शवासन यांचा विचार करण्याचा प्रयत्न करुया. प्रयत्न म्हणालो इतक्यासाठीच की यातल्या शवासनाचा विचार करताना बर्‍याच इतर गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. म्हणून कदाचित शवासन पुढील लेखात पहावे लागेल. पुन्हा एकदा मागे सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून देतो. आणि ती म्हणजे या पाचही आसनांचे एकत्रीत परिणामांची चर्चा सर्वात शेवटी करू.


विपरितदंडासन :
हे आसन तीन प्रकारने करता येते. तिन्ही प्रकारात वेगवेगळी अनुभूती येते. कारण या तिन्ही प्रकारात शरीराच्या अवस्थेत थोडा थोडा फरक होतो. आणि तितका थोडासा फरक वेगळा परिणाम साधण्यास, वेगळी अनुभूती देण्यास पुरतो. अजून एक गोष्ट. विपरीत म्हणजे उलट. आपण नेहमी उभे राहतो. तेंव्हा आपले डोके छातीच्या वर असते. परंतु हे आसन केल्यानंतर आपल्या डोक्याची अवस्था ही छातीच्या पातळीच्या खाली जाते. जवळ जवळ शीर्षासनासारखी स्थिती होते. चित्र पाहिल्यावर हे अधिक स्पष्ट होईल.

प्रकार १ : जमिनीवरील विपरितदंडासन
साहित्य : लोड, उशी, ब्लँकेट
कृति : लोड आणि उशीची रचना चित्रात दाखवल्याप्रमाणे करा.( चित्र क्र.१) म्हणजे उशी आडवी आणि त्यावर लोड उभा. म्हणजे वरून पाहिले तर + खुणेसारखी रचना व्हायला हवी. चित्र क्र.१ मधे दाखवल्याप्रमाणे ब्लँकेटची तिहेरी घडी करून ती लोडापुढे ठेवा. नंतर त्या लोडावर बसा.(चित्र क्र.२) गुडघ्यात पाय थोडेसे दुमडून ठेवा. हाताचे तळवे जमिनीवर टेकून कोपरे जमिनीवर आणा. आणि हळू हळू लोडावर झोपत पाठ लोडावर टेकवा आणि खांदे ब्लँकेटच्या घडीवर आणा. पाय सरळ करा. हाताचे तळवे छताकडे, कोपरे जमिनीवर टेकलेली आणि पावले उभी आणि जमिनीला काटकोनात.(चित्र क्र.३) या स्थितीत किमान १० मिनीटे पडून रहा.
या आसनावस्थेतून बाहेर येताना पाय गुढघ्यात दुमडा,हात कोपरात दुमडून छातीवर घ्या, ऊजव्या कुशीवर वळत लोडावरून खाली या, हात पाय लांब करत ताणून द्या आणि उठून बसा.
फायदे आणि परिणाम : छातीचा पिंजरा डोक्याच्याबाजूला जमिनीकडे कललेला असल्याने काही फासळ्या पायाकडे, काही वर्तुळाकार आणि काही मानेकडे ताणल्या जातात. उदरपोकळी जमिनीला समांतर राहते. पाठीचा कणा "विपरीत" दिशेने वक्र झाल्याने उदरपोकळीत साठलेले रक्त शुद्धिकरणासाठी विनासायास फुफ्फुसाकडे व ह्रदयाकडे जाऊ शकते. फासळ्या उघडल्यामुळे फुफ्फुसाच्या प्रसरणाला अधिक जागा मिळते आणि श्वासोश्वास सुलभ होण्यास मदत होते.

प्रकार २ : खुर्चीवरचे विपरितदंडासन - १
यात जमिनीवरच्या आसनापेक्षा यात पाठीच्या कण्याला वक्रता अधिक येते.
साहित्य : दोन लोड, उशी, ब्लँकेट, खुर्ची.
कृति : खुर्ची, दोन लोड व ब्लँकेटची चित्रात दाखवल्याप्रमाणे रचना करा. खुर्चीसमोर दोन लोड एकमेकांवर ठेवा. त्यावर ब्लँकेटची तिहेरी घडी ठेवा.(चित्र क्र.४) खुर्चीवर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय आत घालून बसा.(चित्र क्र.५) नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे गुढघ्यात पाय दुमडून पाय आणि मांड्या यांचा काटकोन करा. आणि खुर्ची हाताने धरून ठेवत पाठीवर झोपत शरीर ब्लँकेटच्या दिशेने न्या. खांदे ब्लँकेटवर ठेवा. खुर्चीच्या आतील बाजूने हात घालून खुर्चीचे मागचे पाय धरा. छातीच्या तळापासून खुब्यापर्यंतचे शरीर खुर्चीच्या बैठकीवर आणि मान उशीवरून जमिनीकडे तिरकी ठेवा.(चित्र क्र.६) ही आसन स्थिती आपल्याला सहन होईल त्याप्रमाणे ५ मि. ते १० मि. ठेवा.
आसनातून बाहेर येताना हात बाहेर काढून खुर्चीची पाठ धरा, खांदे कोपरातून उचलत खुर्चीत सावकाश ऊठून बसा. व खुर्चीतून बाहेर या.
फायदे आणि परिणाम : लोडावरील आसनापेक्षा या स्थितीत शरीराला बाक अधिक मिळतो. छातीचा पिंजरा सर्व बाजूने उघडल्यामुळे फुफ्फुसाच्या प्रसरणाला अधिक जागा मिळते.

प्रकार २ : खुर्चीवरचे विपरितदंडासन - २
साहित्य : ब्लँकेट, खुर्ची.
कृति : यात वरील प्रकार १ पेक्षा फार फरक नाही. खांद्याखालचे दोन्ही लोड काढून टाकलेले आहेत.(चित्र क्र.७) डोक्याचा माथा ब्लँकेटवर टेकल्यावर दोन्ही हाताचे कोपरे खुर्चीच्या विरूद्ध दिशेला जमिनीवर टेकवून हाताचे तळवे डोक्यामागे ठेवा आणि बोटे एकमेकात गुंतवा. अशी आसनस्थिती ३ ते ५ मि. ठेवा. नंतर वर सांगितल्याप्रमाणे बाहेर या.
फायदे आणि परिणाम : या आसनात पाठीच्या कण्याला ताण बसल्यामुळे आणि छातीचा पिंजरा सर्वाधिक प्रसरण पावल्यामुळे फुफ्फुसे व ह्रदय यांची कार्यक्षमता वाढते तसेच ऊदरपोकळीचेही प्रसरण झाल्यामुळे तेथील अवयवांची क्षमता वाढते.

सेतुबंध सर्वांगासन :
साहित्य : लोड, ब्लँकेट
कृति : लोड उभा ठेवून त्यामागे ब्लँकेटची तिहेरी घडी आडवी ठेवा.(चित्र क्र.८) ब्लँकेटच्या विरूद्ध दिशेला तोंड करून पाय गुढग्यात दुमडून लोडावर बसा.(चित्र क्र.९) दोन्ही हातानी लोड धरून ठेवून त्यावर हळूहळू उताणे झोपा. झोपताना खांदे जमिनीवर आणा. मान व डोके ब्लँकेटवर आणा. पाय सरळ करा. हात शरीराला काटकोनात ठेवून तळवे आकाशाकडे करा.(चित्र क्र.१०) ५ ते १० मि. या स्थितीत पडून राहिल्यावर हात कोपरात दुमडून छातीवर घ्या, पाय गुढघ्यात दुमडून पोटाजवळ घ्या. ऊजवीकडे वळत लोडावरून खाली येत कुशीवर वळा आणि उठून बसा.
फायदे आणि परिणाम : या आसनात उदरपोकळी जमिनीला समांतर राहते. छातीचा आकार वक्राकार झाल्याने सर्व फासळ्या ताणल्या जातात. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. मान व डोके जमिनीला समांतर राहिल्याने मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो.
हे आसन विश्रांतीचे आहे. याचा अभ्यास संध्याकाळी अवश्य करावा. दिवसभराचा थकवा याने दूर होतो व मेंदू ताजातवाना होतो. ह्रदयविकार असणार्‍या व्यक्तिंना संपूर्ण शारिरीक आणि मानसिक विश्रांती या आसनात मिळते.

पुढील लेखात आपण शवासनाचा विचार करू.

आरोग्यं धनसंपदा-५


आरोग्यं धनसंपदा
मागच्या लेखात मी म्हटले होते कि आपण पांच सोप्या आसनानी सुरूवात करूया. पण त्यात अजून एक आसन मी वाढवणार आहे. त्यामुळे आपण आता सहा आसनांचा विचार करणार आहोत. पण त्याआधी पुन्हा एकदा काही गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते. एक म्हणजे प्रत्येक आसनाचा स्वतंत्र परिणाम सांगणे अवघड आहे. फारफारतर तुम्हाला काय जाणवेल हे सांगता येईल. याचा उपयोग काय हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. उदा. तिखटाची चव आपल्याला ठाउक आहे. पण भाजीत किंवा आमटीत तिखट का घालायचे याचे समाधानकारक उत्तर देता येणार नाही. फक्त चव येण्यासाठी इतकेच सांगता येईल. तसे आहे हे. सुप्तवीरासन केल्यावर काय जाणवेल हे सांगता येइल. उपयोग? नेमकेपणा अवघड आहे. कारण हा त्या चार पांच आसनांचा एकत्रित परिणाम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहसा ही सर्व आसने कोणत्यातरी जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावी. म्हणजे गुरू पाहिजे. मग आपले काही चुकत नाही ना याची खात्री होते. आपल्या आसनावस्थेत काही सुधारणा हवी आहे का तेही समजते. आणि हवी असेल तर ती करता येऊ शकेल. समजा एखादा मुलगा शाळेत न जाता वर्षानुवर्षे तीच तीच उदाहरणे घरी सोडवत आहे. अगदी मन लाऊन अभ्यास करत आहे. पण ५ वी च्यापुढे काही जात नाही. कां? तर तो काय सोडवतो आहे, ते बरोबर आहे का ते पाहायला कोणी नाही. म्हणून या योगाभ्यासाला गुरू हवा. "आम्ही घरी करतो ना. अगदी नेमाने करतो." असे म्हणणारे खूपजण भेटतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या काहीना काही छोट्या छोट्या तक्रारी चालूच असतात की हे असच होतय आणि तेच दुखतय वगैरे वगैरे. जर घरी करतोय तर मग असे का होतं? बरं तर वाटलच पाहिजे. पण वाटत तर नाही. कां? प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे घरी करतो म्हणून घरी करणे होत नाही. व्यवधाने बरीच. अडथळे खूप. आज अमुक अमुक ठिकाणी जायचे आहे. योगाला सुट्टी. आज काय साखरपुड्याला जायचे आहे, बारश्याला जायचे आहे. सुट्टी. अश्या सुट्ट्या खूप आणि योग कमी अशी अवस्था होते. दुसरे म्हणजे तो म्हणतो त्याप्रमाणे खरंच घरी करत असतो. पण ते चूक की बरोबर हे तपासून पाहीले जात नाही. मी मागच्या लेखात म्हटले होते की आसन नीट झाले नाही तर अपाय होणार नाही. पण उपयोगही होणार नाही. आणि म्हणून आपण जे आसन करत आहोत ते योग्य आहेना, कुठे चुकत तर नाही ना, आसनस्थितीत कुठे बदल हवा आहे का हे तज्ञाने पाहणे गरजेचे आहे.
यानंतरच्या काही लेखात आपण प्रामुख्याने सुप्तवीरासन, सुप्तबद्धकोनासन, विपरितदंडासन, सेतुबंध, विपरितकरणी, आणि शवासन या आसनांबद्दल पाहू. सर्वसाधारणपणे यासाठी लागणारे साहित्य, कसे करायचे याची आकॄतीसह कॄती, आणि नंतर त्याचा ढोबळमानाने परिणाम आणि उपयोग असा क्रम राहिल. या गटातली सर्व आसने विश्रांतीच्या अवस्थेतली आहेत.शरीराला सर्वाधिक विश्रांति हे शरीर आडव्या अवस्थेत असताना मिळते. ही सर्व आसने झोपून स्थितितली आहेत, तेंव्हा ज्या व्याधित विश्रांतीची गरज आहे अश्या व्याधित ही आसने जास्त उपयोगी आहेत्.उद. ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे की ज्यात नुसते पडून राहण्याने आराम मिळतो.

सुप्तवीरासन :-
हे आसन जमिनीवर झोपून करायचे आहे. पण ज्याना जमिनीवर बसणे, झोपणे कठीण जाते त्यांना घरातील दिवाण,बाक किंवा स्टीलची खुर्ची यांचा आधार घेऊन हे करता येईल.
साहित्य/साधने - लोड व उशी ( हे दोन्ही कापसाचे असावे. फोम किंवा कॄत्रिम धाग्याचे नको.), एक ब्लँकेट किंवा जाड सुती सोलापुरी चादर, बाक, दिवाण किंवा सोफा, खुर्ची वगैरे.
रीत - सर्वप्रथम जमिनीवरील आसनाचा विचार करू. जमिनीवर सतरंजी घालून त्यावर लोड ऊशी, ब्लँकेट याची चित्रात दाखवल्याप्रमाणे एखाद्या शिडीसारखी रचना करावी. (चित्र क्र. १) लोड भिंतीला टेकून ठेवावा म्हणजे त्यावर झोपताना तो मागे सरकणार नाही. लोडासमोर त्याच्या विरूद्ध बाजूला पाय करून बसावे. दोन्ही हात मागे नेऊन हातानी लोड धरून ठेवावा. (चित्र क्र. २) आणि कुल्ल्याचा खालचा भाग जमिनीवर, कंबर लोडावर, पाठ व छातीचा पिंजरा उशीवर आणि मान व डोके ब्लँकेटच्या घडीवर येईल अश्या तर्‍हेने त्यावर उताणे झोपावे.(चित्र क्र. ३) पाय लांब, ताठ सरळ ठेवावेत, पावलात साधारणपणे एक फूटाचे अंतर ठेउन पावले उभी, जमिनीला काटकोनात व समांतरअसावीत.
आता जर खाली झोपणे अवघड असेल तर काय करायचे ते पाहू.
भिंतीपासून दोन फूटावर बाक भिंतीला काटकोनात ठेवा. लोड उशी आणि ब्लँकेट चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवा. (चित्र क्र.४) बाकाच्या कडेवर बसा. (चित्र क्र.५) दोन्ही हाताने लोड धरून कंबरलोडावर टेकवतत्यावर झोपा. पाय लांब करा. टाचा जमिनीवर टेकून पावले भिंतीवर टेकवा.आसनात स्थिर झाल्यावर हात दुमडून डोक्याच्यामगे ठेवा. (चित्र क्र. ६)
या दोनही आसनस्थित सुमारे १० मिनीटे राहवे.
फायदे आणि परिणाम : यात छातीचा पिंजरा जमिनीला समांतर राहतो. साहित्याच्या रचनेमुळे पिंजरा दोन्हीबाजूनी ताणला जातो. पाठीला आधार मिळाल्यामुळे छातीचा पिंजरा विस्तारला जातो. ह्रदयाच्या आकुंचन प्रसरणाला पुरेशी जागा उपलब्ध होते. फुफ्फुसाच्या प्रसरणाला पूर्ण स्वातंत्र्य मिळून त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

सुप्तबद्धकोनासन :-
हे आसन जमिनीवर झोपूनच करायचे आहे.
साहित्य/साधने - लोड व उशी ( हे दोन्ही कापसाचे असावे. फोम किंवा कॄत्रिम धाग्याचे नको.), एक ब्लँकेट किंवा जाड सुती सोलापुरी चादर सुई पांढरा पट्टा.
रीत :- यात साधनाची मांडणी ही सुप्तवीरासनाप्रमाणेच करायची आहे. (चित्र क्र. १) लोडापुढे बसताना चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय दुमडून पायाचा नमस्कार घालयचा सआणि तो सुटू नये म्हणून पट्टा बांधून ठेवायचा. (चित्र क्र. ७) मांड्याची मागची बाजू जमिनीलाटेकवण्याचा प्रयत्न करा. मांड्या नाही टेकल्या तर त्याखाली गुडघ्याच्याखाली चादरीची घडी किंवा उशीचा आधार द्या. आअणि दोन्ही हातानी लोड धरून सुप्तवीरासनाप्रमाणेच कंबर, पाठ मान डोकी टेकवत लोडवर झोपा. (चित्र क्र. ८) हात शरीराशी काटकोनात ठेवा. (चित्र क्र. ८) या अवस्थेत किमान ५ मिनिटे ते १० मिनिटे थांबा.
फायदे आणि परिणाम : या आसनात पायाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो, आणि उदरपोकळी आणि चातीच्या पिंजर्याकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. ह्रदयाला विश्रांती मिळते. अन्नपचनही नीट होण्यास मदत होते.
पुढील लेखात उरलेल्या चार आसनांचा विचार करु.

ह्रदयविकार, अस्थमा, रक्तदाब,पोटाचे विकार, मणक्याचे विकार, मधुमेह, कंपवात, संधिवात इत्यादी आजारांवर पुण्यात कबीरबाग मठ संस्थेत उपचार केले जातात. तिथे पुण्याबाहेरील रूग्णाची राहण्याची सोयही केली जाते. ज्याना कोणाला योगावर आधारीत संजीवन उपचार घ्यायचा आहे त्यानी खालील पत्त्यावर संपर्क साधून चौकशी करावी. तसेच ज्यांना या क्षेत्रात अभ्यास करून स्वतंत्रपणे योगचिकित्सक म्हणून काम करण्याची इच्छा आहे अशांसाठी योगोपचाराचे शास्त्राशुद्ध शिक्षण देणारा अभ्यासक्रम संजीवन योग फाउंडेशनने सुरु केलेल आहे. हा अभ्यासक्रम योगतत्त्वज्ञान, पाश्चात्य वैद्यक (ऍलोपाथी), आयुर्वेद, योग प्रात्यक्षिके यावर आधारित आहे. हया अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम दर वर्षी जुलै महिन्यात सुरू होतो. या अभ्यासक्रमाच्या माहितीसाठीसुद्धा खालील ठिकाणी संपर्क साधावा.

संजीवन योग फाउंडेशन
कबीरबाग मठ संस्था
५१, नारायण पेठ
पुणे ४११ ०३०
दूरध्वनी : ०२०-२४४५०१८१, २४४८४४२३, २४४८०४२४
फॅक्स : ०२०-२४४८१९३७
इ मेल : drkarandikar@hotmail.com

ॐ तत्सत
जय श्रीराम

आरोग्यं धनसंपदा-४

मागच्या लेखात मी दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर लिहिले होते. त्यात आपण आजच्या युगास पोषक दिनचर्या कशी असावी हे पाहिले होते. आजच्या लेखात मानवी मन, त्याचा शरीराशी संबंध व त्याअनुशंगाने संपूर्ण स्वास्थ्यासाठी योगाभ्यास याचा विचार करू.
मी मागे म्हटल्याप्रमाणे मानवी मन ही अतिशय क्लिष्ट व समजण्यास अवघड गोष्ट आहे. माणसाच्या मनात काय विचारांची आंदोलने आहेत ते फक्त त्या व्यक्तिलाच समजेल. दुसर्‍या व्यक्तिला त्या व्यक्तिच्या चेहेर्‍यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून, लिहिण्याच्या पद्धतीवरून, अक्षराच्या वळणावरून, स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवरून मनातले विचार हे थोड्याफार प्रमाणात समजू शकतात. पण ते निश्चित नाही. ते म्हणजे हवामानखात्याच्या अंदाजासारखे आहे. मानवी मन एखाद्या बॅंकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टसारखे आहे. तो व्हॉल्ट फक्त त्याच्या मालकालाच उघडता येतो. आणि त्यात काय आहे हे फक्त त्या मालकालाच माहित असते. बँकेच्या व्हॉल्टमधे प्रथम बँक किल्ली लावून पहिले कुलूप उघडते आणि नंतरच मग तो व्हॉल्ट फक्त मालकाच्या किल्लीनेच उघडतो. इथे तसे नाहीये. फार फार तर इतपत म्हणता येईल की इथे मानवी मनाच्या बाबतीत मनोविकारतज्ञ आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या किल्लीने तुमच्या मनाचे पहिले कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न अश्यासाठी म्हणतो कि ते मनाचे कुलूप उघडले जाईल याची खात्री नसते. अंधारात तीर मारण्यासारखे आहे ते. कारण काही व्यक्ती आपल्या मनाची दारे इतक्या घट्ट बंद करतात की कोणत्याही किल्लीने ती दारे उघडत नाहीत.
हे असं का होते? तर त्याला निश्चित कारणे नाहीत. ३+२=५ असे वैज्ञानिक गणिती उत्तर त्याला नाही. पुष्कळ कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून एखादी व्यक्ती स्वतःभोवती एक अभेद्य भिंत बांधते. अनियमीत दिनचर्या, अनियमित आहार, जेवणाच्या अनियमित वेळा, विश्रांतीचा आभाव, कॉटुंबिक समस्या, कामाचा ताण आणि त्यामुळे येणार्‍या कार्यपद्धतीच्या समस्या अश्या अनेक कारणांनी मनाचे संतुलन बिघडते. त्या व्यक्तिची जडण घडण कशी आहे, स्वभाव कसा आहे, तो स्वभाव लहानपणापासून कसा आणि कोणत्या वातावरणात विकसित झाला आहे, त्यावर कोणते संस्कार झाले आहेत, कॉटुंबिक वातावरण कसे आहे त्यावर त्याच्या मनोकोषाची जडण घडण, त्याची अभेद्यता अवलंबून आहे. निरोगी, निरामय, आनंदी व्यक्तिच्याबाबतीत हा मनोकोष, ही भिंत त्रासदायक ठरत नाही.
मागच्या लेखात मी म्हटलं होतं की शरीर हे वस्तूरूप आहे. पण मन मात्र तसे नाही. ते वस्तूरूप नाही. त्याला आकार नाही. जडत्व नाही. ती एक उर्जा आहे. पंचेंद्रिये, पंचकर्मेंद्रियेही भॉतिक आहेत. त्यांच्या संरचनेत अडथळा आला की शारीरीक व्याधि निर्माण होतात. व्याधी हे 'विघटन' या शब्दाचे रूप आहे. आणि या संरचनेत बदल होण्याची पूर्वसूचना मनाला, चित्ताला मिळते. चित्त तुमच्या मेंदूत धोक्याची घंटा वाजवतं. पण आपण कामाच्यामागे आणि पैश्याच्या मागे पळण्याच्या नादात या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो. मग शारीरीक व्याधि, दु:ख व त्यातून मानसिक अशांतता निर्माण होते.
मन ही एक उर्जा आहे. म्हणून ती प्रवाही आहे. तिचा निश्चित मार्ग आहे. योगशास्त्रात या उर्जेला 'चित्त' म्हणतात. आणि या उर्जेच्या नैसर्गिक संचाराला 'वृत्ति' म्हणतात. आणि या नैसर्गिक संचारात, त्याच्या मार्गात बाधा आली, अडथळा आला कि मग व्याधिची निर्मिती होते. ही वृत्ति म्हणजे उर्जेची नैसर्गिक ओढ. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे व कर्मेंद्रियाचे कार्य हे एक उर्जेवर चालते. त्या इंद्रियाची विशिष्ट विषयाकडे नैसर्गिक ओढ असते. जसे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या विषयांकडे अनुक्रमे कान, त्वचा, जिभ, डोळे व नाक यांची नैसर्गिक ओढ आहे. मग तो विषय आणि इंद्रिय याबरोबर मन आले, सुख-दु:ख या संवेदना आल्या. सुख ही अनुकूल आणि दु:ख ही प्रतिकूल संवेदना आहे. आणि दु:ख या संवेदनेमुळे व्याधी शरीरात आली हे जाणवते.
दु:ख या संवेदनेची जाणिव त्या व्यक्तिला बर्‍याच आधी झालेली असते. डॉक्टरना ते जाणवेलच असे नाही. पण मनाला ती जाणिव मात्र होते. पण त्यातून मार्ग काढण्याची मनाची क्षमता नाही. ती क्षमता बुद्धिची आहे. सार-असार म्हणजे चांगले वाईट बुद्धिला समजतं. पण एकट्या बुद्धीचं ते काम नाही. मग यातून मार्ग काढण्यासाठी मन व बुद्धी एकमेकांशी समन्वीत झाल्या पाहीजे. एकत्र आल्या पाहिजेत. त्याला "चित्ताचे समत्व" म्हणतात. व्याधि ही मनोव्यथा या अवस्थेत असतानाच त्यावर वार झाला पाहिजे. म्हणजे व्याधि समूळ जाईल. आणि योगशास्त्राने हे शक्य आहे. यालाच योगशास्त्र "चित्तवृत्ती निरोध" असं म्हणतं.
आणि हा वृत्तीनिरोध, अभ्यास आणि वैराग्य याच्या सहाय्याने करता येईल असे महामुनी पतंजली म्हणतात. यातील वैराग्या क्षणभर बाजूला ठेवूया. कारण हा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या कक्षेतला विषय नाही. पण अभ्यास मात्र शक्य आहे. अभ्यास पुस्तकाच्या सहाय्यानेही करता येईल. पण मग ते फक्त शाब्दिक ज्ञान होईल. त्यात आनुभविक ज्ञान येणार नाही. जसे पुस्तके वाचून पोहता येणार नाही. किंवा पाकशास्त्रावरची पुस्तके वाचून केलेला पदार्थ त्याच्या चित्रात दाखवल्यासारखा होईल याची खात्री नसते. त्यापेक्षा तो भलताच निघतो. म्हणून तो पदार्थ किंवा पाककला जसे आईच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी शिकणे गरजेचे आहे, तसा इथे गुरुपदेश आवश्यक आहे. गुरू असणे, प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. माझे गुरुजी डॉ. करंदीकर उर्फ आचार्य योगानंद म्हणतात, "कोणत्याही आसनाचा अभ्यास हा पायरी पायरीने केला पाहिजे. एकदम १००% अवस्था प्राप्त होणार नाही. प्रथम शारीरिक अवस्था, नंतर शरीरांतर्गत होणार्‍या बदलांची जाणिव, त्यातून होणारे मानसिक व बौद्धिक बदल आणि सर्वात शेवटी अनुभवाला येणारी "आनंदावस्था" असा हा कष्टसाध्य व दीर्घ प्रवास असला तरी यात यश निश्चित आहे. अशी अवस्था चांगल्यापैकी जमू लागली व जास्त वेळ टिकवता आली म्हणजे आपोआप वेगळे वृत्तिनिरोध अनुभवता येतात. शुद्धता, संतोष, तप आणि स्वाध्याय याही अवस्था अनुभवता येतात. प्रत्येक आसनात चालू असणार्‍या श्वासावर चित्त ठेवून प्राणायाम ही साधतो आणि मन निर्विचार होवून कोणत्याही विषयोपभोगाची इच्छा मनात उरत नाही. श्रद्धा, निष्ठा ठेवून अनुष्ठानपूर्वक केलेला दीर्घ अभ्यास 'आसनजय' अवस्था प्राप्त करून देतो. महामुनी पतंजलीनी आसनजयाच्या व्याख्येत सांगितले आहे कि "ततो द्वंन्द्वानभिघातः॥" म्हणजे सुख-दु:ख शीत-ऊष्ण अश्या द्वंद्वापासून वेगळे असलेले स्वास्थ्य अनुभवता येते. ही अवस्था अनुभवण्याची आहे. व म्हणुन ती "शब्दातीत" आहे."
म्हणुन आपण पांच सोप्या आसनांनी सुरूवात करणार आहोत. नेहमी योगासनाचा विचार करताना अमुक तमुक आसनाचा उपयोग काय याचे नेमके उत्तर देणे शक्य नसते. आसनांच्या बाबतीत जो परिणाम अपेक्षित आहे, तो सर्व, किंवा त्या गटात असणार्‍या सर्व आसनांचा एकत्रित परिणाम असतो हे लक्षात ठेवावे. त्यामुळे अमुक एखादे आसन कश्यासाठी आहे हे सांगणे अवघड आहे. ढोबळ मानाने सांगता येईल. पण नेमका परीणाम, ज्याला इंग्रजीत "पिन पॉइंट इफेक्ट" म्हणतात, तसे सांगणे कठिण आहे. कारण मी याच लेखात म्हटल्याप्रमाणे गणिती तत्त्व लागू पडणार नाही. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेले तरी ३+२=५ हेच उत्तर येईल. पण एखाद्या आसनाचे तसे नाही. सुप्तवीरासनाचा उपयोग एखाद्या व्यक्तिला होईल पण तशाच प्रकारच्या व्याधिने त्रस्त असणार्‍या दुसर्‍या व्यक्तिस त्याचा तितकाच उपयोग होईलच असे नाही. जरी आसन तेच असले, करण्याची पद्धत तीच असली तरीही.
ही पांच आसने म्हणजे सुप्तवीरासन, सुप्तबद्धकोनासन, विपरीत दंडासन, विपरीत करणी, आणि सेतुबंधसर्वांगासन. यासह शवासन केल्यास ही आसने मानसिक शांतता, स्वास्थ्य आणि शरीराला तसेच मनाला विश्रांती देतील. वरीलपैकी शवासनासह तीन आसने प्रत्येकी २० मिनीटे केल्यास मनाला आणि शरीराला आनंददायी विश्रांती मिळू शकेल. या पुढील लेखात वरील आसने करण्याच्या पद्धती, साहित्य व आसनांचा स्थूल मानाने परिणाम याचा विचार करू.

॥ ॐ तत्सत ॥
॥ जय श्रीराम ॥

आरोग्यं धनसंपदा - १

आजचे जीवन हे वेगवान जीवन आहे. आपण पाहतो कि , माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे, त्यांच्याशी निगडित उद्योग वाढू लागले आहेत. या उद्योगांचा एक पैलू पाहिलात तर असे लक्षात येईल की सकाळी जाण्याची वेळ ठरलेली असते, पण संध्याकाळची परत येण्याची वेळ निश्चित नाही. तुम्ही जितके जास्त वेळ काम कराल, जितका जास्त वेळ कंपनीत थांबाल, तेव्हधे तुम्ही अधिक निष्ठावंत, अधिक यशस्वी, अधिक कार्यक्षम असे सध्याचे गणित झाले आहे. य गणितीसूत्रात बसणार्‍यांवर मग पैशांचा, वेतनाचा वर्षाव होत असतो. आणि या वर्षावाकडे पाहून कामाचे तास किती याकडे काणाडोळा करण्याची वृत्ती निर्माण होते. व परीणाम म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष! विश्रांतीचा आभाव आणि काम व पैसा याच्या शर्यतीत 'टॉप'ला येण्याची धडपड यात मनःस्वास्थ्य हरवत चालले आहे.
या धडपडीच्या, धकाधकीच्या जीवनात, विश्रांतीचा आभाव याचबरोबर आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष हे अनेक रोगांचे मूलभूत कारण बनले आहे. साधी एक गोष्ट विचारात घ्यायची झाली तर सुमारे ४० वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक आहे. कारणे काहीही असोत, पण आज कामामुळे मानसिक ताण वाधला आहे व त्यातून उच्च रक्तदाब, ह्रदयविकार मधुमेह असे विकार वाढण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
आयुर्वेदांत ॠतुचर्या, दिनचर्या निरोगी जीवनासाठी सांगितली आहे. जरी क्षणभर गृहित धरलं की हजारो वर्षापूर्वीचे निकष आज लागू पडणार नाहीत. तरीही त्यातील निम्मा भाग हा त्यात कालानुरूप थोडाफार फरक करून आपल्या स्वास्थ्यासाठी वापरता येइल. आयुर्वेदात सांगितलेले आहार विहार आपण कालबाह्या समजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. दमनूक करणारे खेळ व दिशाहीन व्यायामप्रकार आज आपण महत्त्वाचे मानतो. प्राणायाम व योगासने या सारख्या शारीरीक आणि मानसिक विश्रांती देणार्‍या व्यामप्रकारांना तुच्छ लेखतो. "फास्ट फूड"लामहत्व येत चालले आहे. आणि याचे प्रमुख कारण कुतुंबातील प्रमुख व्यक्तींना उपलब्ध असणारा वेळ. आज दोघेही "मिया-बिबी" नोकरी करण्याच्या जमान्यात वरील गोष्टींना वेळच मिळत नाही. मग अजार, ताण तणाव, त्रास यांची मालिका सुरू होते. या दुष्टचक्रातून बाहेर पडले पाहीजे याची जाणिव मनाच्या कोपर्‍यात कोठेतरी होते. पन पैसा आणि काम याच्या दलदलीत पाय घट्ट रूतून बसलेला असतो. तो काही बाहेर निघता निघत नाही. आपण यात हळू हळू अडकत जातो. आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडतो तेंव्हा चरकातून बाहेर पडणार्‍या उसासारखी आपली अवस्था होते.
जर चक्रातून बाहेर पडणारा उंस व्हायचे नसेल तर थोड्याश्या प्रयत्नाने काळ काम वेग यांच्या शर्यतीत राहून हे साध्य करता येऊ शकेल. त्यासाठी थोडा वेळ आणि प्रचंड मनोनिग्रहाची गरज आहे. यागोष्टी आपल्या दिनचर्येचा भाग झाल्या पाहिजेत. आपण रोज अंघोळ करतो हा एक आपल्या दिनचर्येचा भाग झाला. असं होत नाही की " आज अंघोळ केली आहे. आता चार दिवस नाही केली तरी चालेल." किंवा असेही होत नाही की, " काय बुवा, कामाच्या व्यापात आठवडाभर अंघोळीला वेळच झाला नाही." अंघोळ हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.
हा शारीरीक ताण तणाव कमी होउन आप्लले "फास्ट" जीवन सुखी, सुसह्य आणि आनंदी करण्याचा हेतु या लेखमालेत आहे. रोजचा आहार-विहार, सर्वसामान्यांना सहज जमतील अशी पथ्ये, व्यायामप्रकार आणि योगासने यांच्या वापराने आपले दैनंदिन जीवन कसे सुखकर करता येईल हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
ही लेखमाला म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. फक्ता एक दिशादर्शक असा त्याचा तारतम्याने वापर करायचा आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती. एखादी गोष्ट मला योग्य आहे, ती दुसर्याला योग्य आहे म्हणजे ती तिसर्याला योग्य असेलच असे नाही. त्याच्या प्रकृतीनुसार त्याला ती योग्य-अयोग्य ठरणार आहे. पण तरीही इथे सांगितलेल्या गोष्टी, आसने, पथ्ये सामान्यपणे सर्वांना उपयुक्त ठरतील, सहज जमतील अशीच घेण्याचा प्रयत्न असेल. यात क्षणभर गृहित धरूया कि एखाद्याला उपयोग होणार नाही. पण अपायही नक्की होणार नाही. " अहो, तुम्ही सांगितले. आम्ही केले. पण उपयोग काय झाला? शून्य." असे होऊ नये यासाठी ही धोक्याची छोटीशी सूचना !!
पुढील भागात मानवी मन, मनाचे महत्त्व, त्याचे दैनंदिन जीवनातले स्थान व त्याच्या स्वास्थ्यासाठीचे प्रयत्न याविषयी थोडीशी चर्चा करू.
ॐ तत्सत
जय श्रीराम

शब्द

माझी मैत्रिण प्राजक्ता पटवर्धन. एक कवियत्री आणि ललित लेखक. खूपच छान लिहिते. तिचा ब्लॉग वाचणे हा एक निखळ आणि निर्मळ आनंद आहे. "शब्द" ही कविता केवळ तिच्या प्रेरणेने आणि सततच्या प्रोत्साहनानेच लिहिणे जमले आहे. त्यामुळे याचे श्रेय तिला आहे. मी निमित्तमात्र आहे.


शब्द
मला कधीच कळले नाही
कवीला शब्द कसे सुचतात
इथे तर गदिमांच्या समोर
शब्द हात जोडून उभे राहतात ॥१॥

पु. ल. म्हणतात,
शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलिकडले
पण इथे आम्हाला
शब्दांच्यापलिकडले सोडाच
पण काहीही नाहि कळले अलिकडले ॥२॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द शब्द म्हणजे एकापुढे एक अक्षर?
पण मग आपल्या भावना कशा सांगेल निरक्षर? ॥३॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द म्हणजे मनाच्या अथांग जलाशयाचे तरंग
शब्द दाखवतात माणसाच्या व्यक्तिमत्वाचे रंग
जसा उथळ पाण्याला फार खळखळाट
तसे शब्द दाखवतात मनाचा खळबळाट ॥४॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द ही मनाची फुले आहेत
शब्द हे भावनांचे तरंग आहेत
शब्द हे विकारांचे धुमारे आहेत
शब्द हा जीवनाचा आधार आहे ॥५॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द विचारांचा आकृतीबंध आहे
शब्द संस्कारांचा आकार आहे
शब्द वार्‍याची झुळूक आहे
शब्द सोसाट्याचे वादळ आहे ॥६॥


शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हे प्रभावी हत्यार आहे
शब्द हा भात्यातला बाण आहे
भावना आणि वाणी यांचा आधार आहे
शब्द हे मनाचे द्वार आहे॥७॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हा प्रणव आहे
शब्द हा ॐकार आहे
शब्द हा मन चित्ताच्या
अस्तित्वाचा साक्षात्कार आहे ॥८॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हा सप्त सुरांच्या
अस्तित्वाचा आधार आहे
शब्द हा जीवन संगिताचा
भव्य दिव्य गंधार आहे ॥९॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द शब्द हा वाक्यांचा त्राता आहे
शब्द शब्द हा अर्थाचा आधार आहे
शब्द शब्द हा व्याकरणाचा गाभा आहे
शब्द शब्द हा शब्दकोषाचा आत्मा आहे ॥१०॥

पण मग या शब्दांनी काय घडलं?
शब्दशब्दांनी सारे जीवन समजलं?
आयुष्याच्या परमेश्वरी देणगीचं
अवघं अबोध रहस्य उलगडलं? ॥११॥

पहा काय झालं ते :-
शब्दांनी सारी दु:खे सुसह्य झाली
शब्दांनी अवघी सुखे अधिक फुलली
शब्दाशब्दाच्या गाभार्‍यातून
आयुष्याची वाटचाल सोपी झाली ॥१२॥

पण आयुष्याच्या एका टप्प्यात
एक वेळ अशी येते
की शब्द तिथे संपून जातात
आणि मन अंतर्मुख होते ॥१३॥

एकदा शब्द संपले
की मन अज्ञातात जाते
शब्दांच्या पलिकडच्या
अथांग पोकळीत हरवते ॥१४॥

त्या शब्दांच्या पलीकडे
आपण नेहमी एकटेच असतो
नाही तिथे कोणी सखे सोयरे
आपणच आपले मित्र असतो ॥१५॥

तिथे आपले व्यक्तिमत्व हरवते
तिथे आपले अस्तित्वच संपते
तिथे आपले जीवनच संपते
ती न परतीची वाट असते ॥१६॥

म्हणून शब्दावाचून फक्त कळते
संगितातली एक वीराणी
कोण जाणे आहे का ती
कदाचीत आयुष्याची भैरवी ॥१७॥


श्रीराम पेंडसे

गुरुवार, २३ जुलै, २००९

निसर्गायन

निसर्गायन

वळ्वी पावसाचा शिडकावा
आसमंतात आणी गारवा
देई दग्ध तन मनास
मोहक शीतल थंडावा ॥१॥

परिसर कुंद झाला
निसर्ग बहरू लागला
अशा या धुंद समयी
आसमंत भारला ॥२॥

रानवाटा खुणावती
वनकिन्नर बोलावती
बहरलेली नटलेली वनश्री
आम्हा आनंदे आमंत्रिती ॥३॥

प्रसन्न वनश्रीने भरलेल्या
हिरवी शाल पांघरलेल्या
वळणी रानवाटेवर
निसर्गानंद लुटूया ॥४॥

जलप्रवाह खळखळती
ओढे मंद झुळझुळती
पवनांच्या झुळूकीवर
तरु शिखरे डोलती ॥५॥

हिरवा शालू नेसूनी
फुलांचे दागिने लेवूनी
नटली आमुची वनदेवी
वातावरण भारूनी ॥६॥

लता वेलींनी द्वार सजले
सारे वनचर तिथे जमले
मनमोहक परिसरी
स्वागतास सज्ज झाले ॥७॥

असे इथे वनचरांचे
तरू नभ-चरांचे
सर्वत्र दिसतसे
साम्राज्य आनंदाचे ॥८॥

लता वृक्ष खुणावती
सांबर मयुर मोहवती
पक्षी मधुर गात
जणू यक्ष बोलवती ॥९॥

हे शहरी चरांनो
नीरस जनांनो
फक्त काम आणि काम
करणार्‍या भूमिपुत्रांनो ॥१०॥

दूषिततेतून बाहेर पडूया
तन पिडा मागे ठेवूया
या जादुई परिसरात
निरोगी मन घडवूया ॥११॥



श्रीराम पेंडसे

सोमवार, १३ जुलै, २००९

आरोग्यं धनसंपदा - 3

॥ आरोग्यं धनसंपदा ॥
आपण मागच्या लेखात मानवी मनाचे व्यापार आणि त्याचे महत्त्व पाहिले होते. या लेखमालेचा उद्देश हा आपले दैनंदिन जीवन ताण तणावमुक्त व्हावे, शारिरीक स्वास्थ्य लाभावे हा आहे. आणि मी त्यावेळी असेही सांगितले होते कि यात मनाचा सहभाग बराच आहे. मन व शरीर एकमेकांवर अवलंबून असणार्‍या गोष्टी आहेत. एक बिघडले कि दुसरे बिघडतेच. आणि म्हणून दोन्हीचे स्वास्थ्य राहणे गरजेचे आहे. दोन्हीपैकी एक चाक पंक्चर होउन चालणार नाही. आणि दोन्ही तर नाहिच नाही. म्हणून स्वास्थ्याचा विचार करताना दोन्हीचा विचार झाला पाहीजे. दोन्हीचे स्वास्थ्य लाभले तर त्याला "संपूर्ण स्वास्थ्य" म्हणता येइल.
मागच्या लेखात मी म्हटले होते कि आपण मनस्वास्थ्यासाठी योगासनात आसनांचा राजा म्हणता येइल अश्या "शवासना"चा विचार आपण करू. पण नंतर विचार करताना मला वाटले कि त्याही आधी दिनचर्या सांगितली पाहिजे. जेंव्हा आपण दैनंदिन दृष्टीकोनातून स्वास्थ्याचा विचार करतो त्यावेळी पहिली गोष्ट प्रामुख्याने विचारात घेतली पाहिजे ती अशी कि आहार विहार किंवा दिनचर्या. दिनचर्येची व्याख्या अशी कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. शब्दकोषात त्याचा अर्थ सापडेल. पण मला अपेक्षित असलेला अर्थ आणि यालेखमालेचा उद्देश याचा विचार करता मी त्याची व्याख्या अशी केली आहे कि " आपल्या मनाच्या आणि शरिराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने रोजच्या रोज विशिष्ट क्रमाने केलेली कृत्ये." अर्थात अशी कृत्ये कि जी केल्यावाचून पर्याय नाही. आज हे केलं नाही तर चालेल हा निकष ज्या कृत्यांच्याबाबतीत लागू पडणार नाही अशी कृत्ये. एक छोटेसे उदाहरण देतो कि ज्यामुळे क्रम आणि अनिवार्यता या दोन्हीचे स्पष्टीकरण मिळेल. सकाळी फिरणे हे अनिवार्य कृत्यात बसत नाही. सकाळी फिरले तर उत्तमच. पण नाही फिरलात तर तोटा नाही. तोटा होउ शकेल पण तो दीर्घकालिन असेल. पण सकाळी उठल्याबरोबर दात घासणे हे मात्र अनिवार्य कृत्यात बसते. आज दात घासले आहेत. आता तीन दिवस घासले नाहित तरी चालेल. असे चालेल का? नाही. चालणार नाही. म्हणून हे अनिवार्य कृत्यात बसेल. आता एकदा दात सकाळी घासल्यावर नंतर प्रत्येक खाण्यावर दात घासले तर उत्तमच. पण गरज नाही. प्रत्येक वेळी खाण्यानंतर नाही घासले तरी चालतील. मात्र सकाळी उठल्यावर गरजेचे आहे.
आता या दिनचर्येत कशाचा समावेश होउ शकेल ते पाहू. आयुर्वेदात याला आहार विहार म्हणतात. आहार म्हणजे खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळावगैरे. आणि विहार म्हणजे हालचाल, राहणीमान व इतर दैनंदिन कृत्ये. मगाशी आपण स्वास्थ्य या एका शब्दाचा उल्लेख केला. स्वास्थ्य हे 'स्वस्थ' या शब्दाचे रूप आहे. जरा विचार करायला लावणारी एक गोष्ट सांगतो. एखादी व्यक्ती शरीराने सुदृढ आहे, मनाने स्वस्थ आहे. मग त्या व्यक्तिला आरोग्यसंपन्न म्हणता येइल का? जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) स्वास्थ्याची काय व्याख्या केली आहे पहा. "अशी अवस्था की ज्यात शारीरीक, मानसिक आणि अध्यात्मिक समाधान लाभले आहे." ( It is a state of physical, mental and spititual well being.) यातल्या अध्यात्मिक या भागावर आपण सध्यातरी चर्चा करणार नाही. फक्त त्यासंदर्भात काही गोष्टी सांगतो. शारीरीक आणि मानसिक या शब्दाबरोबरच अध्यात्मिक या शब्दालाही खूप महत्त्व आहे. "अध्यात्म म्हणजे चित्ताचे समत्व" असे ज्ञानेश्वर म्हणतात. हे काय आहे ते समजाऊन सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात कि "समत्व म्हणजे जेथे मन आणि बुद्धिचे ऐक्य झाले आहे अशी अवस्था." सध्याची उपचारपद्धति पाहिली तर असे लक्षात येइल कि आधुनिक वैद्यक शरीराचा मळ काढून टाकणे, शरीरावरील आणि मनावरील आघातांची तीव्रता कमी करणे यातच समाधानी असते. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेले चित्तचे समत्व इथे नाहीच. आधुनिक वैद्यकात चित्त ही संकल्पनाच नाही. आधुनिक वैद्यक मन यापलिकडे जातच नाही. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि अंतःकरण यामुळेच शरीराचे व्यापार चालू राहतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त पहिल्या दोनांवरच आधुनिक वैद्यकात सध्या उपचार करतात. तिसर्‍यावर त्यांच्याकडे उपाय नाहीत. पण अंतःकरण किंवा चित्ताचा विचार योगशस्त्रात होतो. आणि या विचाराचा अभ्यास हा वेगळा विषय आहे. त्याबद्दल नंतर चर्चा करू. सध्या दिनचर्या यापुरतीच चर्चा मर्यादित ठेउ.
यावर आयुर्वेदात सखोल चर्चा आहे. आहार-विहाराचे बरेच नियम सांगितलेले आहेत. काय करावे, काय करू नये याचा दीर्घ विचार त्यात आहे. मी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे हे ग्रंथ अतिप्राचिन आहेत्. त्यामुळे त्यातील आहार विहाराच्या कल्पना त्या काळच्या आहेत. आजच्या काळासाठी त्या कालबाह्य असतील. पुन्हा त्यातले आजच्या काळाला काय अनुरूप करता येइल ते पाहू. त्या काळचे उल्लेख आणि संदर्भ न देता त्याचे आजच्या परिस्थितीनुरूप रूपांतर केले आहे. यातले आपण किती घ्यायचे, काय सोडून द्यायचे, काही गोष्टी कालनुरूप कश्या आज चपखल बसतील याचे बदल कसे करायचे ते तुम्ही ठरवायचे आहे.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. प्रातःविधीनंतर वड, करंज वगैरे झाडाच्या कडू तुरट तिखट रसाच्या मऊ मृदू टोकांच्या काड्या हिरड्यांना न दुखवता चावाव्यात. आजही गुजराथी लोक हे करतात. याला "दातण" म्हणतात. आधुनिक काळात याची जागा "ब्रशिंग"ने घेतली आहे. परिणाम एकच. मुख आणि दांत स्वच्छ व्हावेत. खाण्यानंतर दांतात काही अन्नकण अडकून राहतात. सर्वसामान्यपणे आपण रात्री जेवणानंतर दांत ब्रशने घासत नाही. (हे वाचल्यावर काहीजण म्हणतील आम्ही घासतो. एकदम मान्य. म्हणूनच मी सर्वसामान्य हा शब्द वापरला.) अशावेळी या दांतात अडकलेल्या कणाचे दुर्गंधीत रूपांतर होते. मी या लेखात दिनचर्येची व्याख्या सांगताना म्हटले होते त्याप्रमाणे रात्री दांत घासणे हा दिनचर्येचा भाग होउ शकणार नाही, ते एक शरीराला लागलेले चांगले वळण असेल. पण सकाळी उठल्यावर दांत घासणे हा दिनचर्येचा भाग होइल.
यानंतर आयुर्वेदाने सांगितलेला उपचार म्हणजे सर्वांग अभ्यंग. अभ्यंग म्हणजे तेलाने मर्दनकरणे. यासाठी निरनिराळी औषधीसिद्ध तेलं वापरायला सांगितली आहेत. आजच्या जगात हे शक्य नाही. हा प्रकार आज काल फक्त बाळंतिणिच्याबाबतीत केला जातो. पण याचा ग्रंथोक्त उपयोग असा सांगितला आहे कि याने वार्धक्य, श्रम, वात यांचा नाश होतो. दृष्टी स्वच्छ होते. आयुष्य वाढते. यानंतर व्यायाम सांगितला आहे. व्यायाम कधी करावा, किती करावा, कोणी करावा तसेच अति व्यायामाचे दुष्परिणाम याचे विस्तृत विवेचन प्राचीन ग्रंथातून आढळते. अतिव्यायामाने तृष्णा, श्रम, श्वास, ग्लानी, शक्तिपात, खोकला आणि प्रसंगी वांतीही उत्पन्न होऊ शकते.
नंतर येतो तो क्रम स्नानाचा. स्नान करताना ऊन पाणी वापरावे. ऊन पाण्याने स्नान करताना गळ्याखालून स्नान करावे. केसाला आणि मस्तकालामात्र थंड पाणी वापरावे. कारण ऊन पाण्याने डोक्यावरून स्नान केल्यास केसांस आणि दृष्टीस धक्का पोहोचतो. स्नान कधी करू नये याबद्दल सांगताना म्हटलं आहे कि स्नान भोजनानंतर तसेच ज्वर व इतर विकारांत करू नये.
भोजन कोणत्या काळी, कोणाबरोबर करावे याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वेही या ग्रंथातून सांगितली आहेत. सध्या ही कालबाह्य असली तरी त्यातला घेण्यासारखा भाग म्हणजे भोजन शांतपणे बसून, सावकाश आणि चवीने घ्यावे. घाई गडबड केल्याने अपचनाचा धोका होऊ शकतो. ग्रंथातून चर्चा करताना त्यात काय खावे, कोणत्या काळात खावे, कोणत्या ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये याची सखोल चर्चा केलेली आहे. उदाहरणादाखल एक दोन गोष्टी सांगतो. थंडीत (हेमंत ऋतुत) खूप भूक लागते व म्हणून अशावेळी मधुर आम्ल, लवण रसाचे तसेच स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. परंतु उन्हाळ्यात म्हणजे वसंत आणि ग्रीष्म ऋतुत उन्हामुळे शरीरातील कफदोष कमी होऊन वायुदोषाची वृद्धी होते. म्हणून या काळात तिखट, खारट व आंबट पदार्थांचे सेवन अत्यल्प प्रमाणात करावे तसेच व्यायामही करू नये.
थोडक्यात वाग्भटाचार्यांच्या शब्दात सांगायचे तर :

" नक्तं दिनानि मे यान्ति , कथंभूतस्य संप्रति ॥
दु:खमांग न भवत्येवं , नित्यं सन्निहितस्मृती: ॥

इत्याचारः समासेन, यं प्राप्नोति समाचरत ॥
आयुरारोग्य ऐश्वर्यं यशोलोकांश्च शाश्वताम ॥

म्हणजे
" मी काय करतोय, कोठे आहे, माझे वय काय, माझे मन कोठे गुंतले आहे हे क्षणोक्षणी ध्यानात असू द्यावे, म्हणजे दु:ख होत नाही. हा थोडक्यात सदाचार सांगितला आहे. याप्रमाणे जो आपली वर्तणूक ठेवेल तो दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्यं, यश अणि मोक्ष पावेल."

पुढील लेखात मन आणि शरीर यांच्या स्वास्थ्यासाठी योगाच्या माध्यमातून सहज सुलभ काय करता येइल हे पाहू.

॥ ॐ तत्सत ॥