रविवार, २२ फेब्रुवारी, २००९

आरोग्यं धनसंपदा 2
मागच्या लेखात आपण दैनंदिन जीवनात कोणत्या मानसिक आणि शारिरीक ताणाला सामोरे जात असतो याचा थोडक्यात आढावा घेतला होता आणि त्यावेळी म्ह्टले होते की पुढील लेखात मानवी मन, मनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व वगैरेचा विचार करु.
खरंतर मानवी मन या विषयाला हात लावणं हा थोडस धाडसी विचार आहे हे मान्य. भल्या भल्या महान मंडळीनी त्यावर संशोधन केले आहे. त्यावर मी बोलणे कितपत योग्य आहे हा एक विचार आहे. म्हणून आधीच एक गोष्ट सांगतो की मी यातला तज्ञ नाही. पण मला आलेले अनुभव व मी जे काही शिकलो आहे त्यावर हे सर्व आधारित आहे.
मानवी मन ही एक अतिशय गुंतागुंतीची गोष्ट, वस्तू आहे. आता वस्तू म्हटलं की तिथे त्रिमीतीच्या व्याख्या आल्या. जडत्त्व आलं. कोणतीही जड वस्तू ही त्रिमीतीच्या माध्यमातून आपणांस समजू शकते. त्याला आकार आला म्हणजे लांबी, रुंदी, जाडी आली. रंग, रुप आलं. वास, चव हे ही गुण काही प्रमाणात चिकटले. कोणतीही जड वस्तू ही शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यां माध्यमांतून आपणांस समजू शकते. तिचे ज्ञान होते. ती वस्तू दाखवता येते. पण मनाचे तसे नाही. जसं आयुर्वेदात शरीरशास्रात सांगितलं आहे की आपलं जड शरीर त्रिदोषांपासून बनलेले आहे. त्रिदोष म्हणजे कफ, वात, पित्तदोष. आपल्याला सर्वसाधारणपणे माहित असलेले कफ म्हणजे खोकला किंवा थुंकीतून पडणारा कफ नव्हे, वात म्हणजे पोटातून येणारे गुडगुड आवाजही नव्हेत, किंवा पित्त म्हणजे बाईल नाही. "दोष" ही संकल्पना आहे, दोष म्हणजे डिफेक्ट्स नव्हेत. ते दाखवता येत नाहीत. त्याचे शरीरावरचे परिणाम दिसतात. शरीर हे या तीन दोषांची संतुलित अवस्था आहे. यातील एकाचे जरी संतुलन बिघडले तरी व्याधी निर्माण होते. तसे मनाचे आहे. मन दाखवता येत नाही. तरी त्याचे अस्तित्व त्या त्या व्यक्तिला जाणवते. एका व्यक्तिला दुसरया व्यक्तिच्या मनाचे अस्तित्व जाणवत नाही, समजत नाही. समजतात ते परिणाम. मनाचे शरीरावरचे परिणाम दिसतात, जे समजताना कधी कधी आपल्या मनाचे आपल्याच शरीरावरचे परिणाम समजत नाहीत. पण दुसर्याच्या न दिसणार्या मनाचे त्या व्यक्तिच्या शरीरावरचे, वागण्यातले परिणाम मात्र दिसतात.
स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवनात शरीर आणि मन या दोन्हीच्या स्वास्थ्यास महत्त्व आहे. दोन्हीपैकी एकाचे जरी स्वास्थ्य बिघडले तरी आपले जीवन दु:खी होऊ शकते. म्हणजे शरीर त्रास देत असेल तर मनस्वास्थ्य बिघडेल आणि मन थारयावर नसेल तर शरीराकडे दुर्लक्ष होऊन त्याचेही स्वास्थ्य बिघडते. आणि म्हणून स्वास्थ्यासाठी जेव्हा योगसाधनेचा विचार होतो तेव्हा शरीर व मन या एकमेकांवर अवलंबून असणार्या वस्तूंना महत्त्व आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वस्तू म्हटल्यावर जडत्त्व आलं. म्हणजेच शरीर आणि मन या दोन्ही जड स्वरूपीच आहेत. फक्त मन हे सूक्ष्म आहे आणि य दोन्हींना बांधून ठेवणारा आत्मा हा मात्र चैतन्यरुपी आहे. आत्म्याच्या अस्तित्त्वानेच मन व शरीराला अस्तित्त्व आहे. पण सामान्यपणे आपण आत्म्याच्या बाबतीत काहीच करु शकत नाही. ती एक उर्जा आहे. म्हणून मग आत्म्याचे अस्तित्त्व असेपर्यंत या उरलेल्या दोघांना सांभाळून, अंजारुन गोंजारुन आपले आपल्या हातात असलेले जीवन आपणास सुखी करता येईल.
शरीर जड असल्याने क्षर आहे. क्षर म्हणजे झीजणारे, जीर्ण होणारे आहे. पण मनाचे तसे नाही. मन अत्यंत अस्थिर, चंचल असते. मन स्थिर झाले कि त्याला आपण चित्त म्हणतो. मन हे अत्यंत शक्तिमान आहे. पण जोपर्यंत ते स्थिर होत नाही तोपर्यंत ते शरीराच्या द्रुष्टीने कोणतेही विधायक कार्य करु शकत नाही. जसे पाण्याच्या वाफेत प्रचंड शक्ति आहे, पण ती वाफ बाहेर जाऊ दिली तर ती शक्ति वायाच जाते, नाही का? पण जर ती वाफ कोंडली, तिला दिशा दिली तर तिचे रुपांतर यांत्रिक शक्तित करता येते. तसेच मनाच्या चंचलतेवर ताबा मिळवता आला, नियमनाने एकाग्र करता आले तर शरीरालाही स्वास्थ लाभू शकेल. म्हणून मन एकाग्र करण्याची आवश्यकता आहे, जे योगाच्या माध्यमातून साधता येते. याच माध्यमातून शरीर आणि मनाचि शक्ती विकास पावू शकते.
आता आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार करायचा झाला तर सर्व प्रथम आपण ''ताण - तणाव'' म्हणजे काय ते पाहूया. ताण या शब्दाची साधी-सोपी व्याख्या अशी करता येईल "अशी अवस्था ज्यामुळे आपली कार्यशक्ती आणि कार्य यांचे प्रमाण व्यस्त होईल. आणि त्यात कार्य हे कार्यशक्तीपेक्षा नेहमीच अधिक असेल'' म्हणजे मग वेळेत काम पूर्ण झाले नाही तर मग मनाशी निगडीत अशा व्याधी उदा. चिंता, काळ्जी, भूक हरपणे व त्या बरोबर शारिरीक व्याधीही चिकटतील.
अशावेळी त्या शरीराला आणि मनाला सर्वप्रथम विश्रांती मिळेल त्या शरीर-मनाची उत्तेजित अवस्था ( डिस्टर्ब्ड स्टेट ) कमी होऊन शांतता आणि स्वास्थ्य लाभेल अशा गोष्टींची गरज आहे. शरीरास स्वास्थ्य आहार विहारातून लाभू शकेल. पण मनाच्या शांततेसाठी, स्वास्थ्यासाठी मात्र ''योगाचीच'' मदत घेणे जरूरीचे आहे.
आणि मनाला स्वास्थ्य देऊ शकेल अशा आसनांचा राजा म्हणता येईल असे आसन म्हणजे 'शवासन'. वास्तविक आपल्या आहार विहारात आसनांच्या शेवटी विश्रांतीसाठी हे आसन करायचे असते. पण आत्ता मनाचा विचार करत असल्यामुळे हे आसन सर्वप्रथम सांगणार आहे.
या पुढच्या भागात आपण मनाला स्वास्थ्य देऊ शकतील अशी काही निवडक आसने आणि शवासन हे, कसे करायचे, पद्ध्ती, वेळ, स्थान वगैरे द्रुष्टीने यावर चर्चा करु.
ॐ तत्सत

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

दोन फुल्ल एक हाफ
लोकसत्ताच्या रविवारच्या "लोकरंग" पुरवणीत वरील नांवाचे एक सदर येते. त्यात दोन मोठ्या आणि एक छोटी गोष्ट येते. त्याप्रमाणे या गोष्टी आहेत. या गोष्टींचा निर्माता मी नाही. म्हणजे त्या मी लिहिलेल्या नाहीत. मूळच्या या खूपच लहान गोष्टी होत्या. मला जेंव्हा त्या सांगितल्या त्यावेळी मला वाटले कि तुम्हालापण या गोष्टी सांगाव्यात. म्हणून मी त्यात माझा मसाला मिसळून, तिखट मीठ लावून वाढवून सांगीतल्या आहेत. त्यातून तुम्हाला जे निष्कर्ष काढायचे असतील ते काढा. त्यातून काय शिकायचे ते तुम्ही ठरवा. कारण तुमच्यावर जसे संस्कार झाले असतील - तुमच्या वाडवडीलांचे तुमच्यावरचे संस्कार, त्यांची शिकवण, तुम्ही ज्या वातावरणात वाढलात त्याचा तुमच्यावरचा परिणाम, तुमच्यावर तुमच्या शाळेत जे संस्कार झाले असतील ते, तुम्हाला असलेले मित्र मैत्रिणींच्या आचार विचारांचा तुमच्यावरचा जो परिणाम असेल तो, तुमच्या भोवती जमा झालेल्या नातेवाईकांचा जो गोतावळा असेल त्यांचे तुमच्यावरचे संस्कार - त्याप्रमाणे तुम्ही त्यातून अर्थ काढाल. म्हणून तुम्हाला मी, काय करा हे सांगणार नाही. मी फक्त गोष्टी सांगण्याचे काम करीन. अर्थ तुम्ही काढा. तुम्ही " हॅरी पॉटर" च्या गोष्टी वाचल्या असतील तर त्यात "बोगार्ट" नावाचा एक प्राणी आहे. हा प्राणी कोणाला दिसत नाही. त्याला स्वतःचे रूप नाही. तो एका कपाटात बंदीस्त आहे. त्याला बाहेर काढल्यावर त्याच्यासमोर जो कोणी येईल, त्याच्या मनात ज्याची भीति असेल त्याचे तो रूप घेतो. असा काहीसा हा प्रकार आहे. तेंव्हा या गोष्टींचा आनंद घ्या. नाही आवडल्या तर एखादा सर्वसामान्य हिंदी सिनेमा आपण जसा पाहून दुसर्‍या दिवशी विसरून जातो तसे विसरून जा.


एकदा एक शेतकरी आपल्या शेतात आपले काम उरकून दुपारचे जेवण जेउन विश्रांती घेत झाडाखाली पहुडला होता. तो झोपलेला नव्हता. त्याचे सगळीकडे लक्ष होते. शेजारी त्याचा हत्ती चरत होता. शेतकर्‍याची विश्रांती झाली. तो उठला. त्याने हत्तीला गोंजारले. प्रेमाने त्याच्या गंडस्थळावरून हात फिरवला. हत्तीला "खाली बस" म्हटल्यावर हत्ती खाली बसला. मग शेतकर्‍याने हत्तीला आंघोळ घातली. स्वच्छ केले. "उठ" म्हटल्यावर हत्ती उभा राहिला.
हे सर्व एका झाडाआडून यम पहात होता. त्याला खूप आश्चर्य वाटले. तो झाडाआडून बाहेर आला. तो शेतकर्‍याला म्हणाला,
" तू एव्हढा लहान. तो हत्ती किती मोठा. तू त्याला कसे काय कंट्रोल करतोस?"
शेतकरी हंसला. तो यमाला म्हणाला.
" तुला या गोष्टी कळणार नाहीत. तुला लेका, सतत मेलेले प्राणी आणि मेलेली माणसे हाताळायची सवय आहे. जिवंत माणसे, प्राणी तुला समजणार नाहीत. तेंव्हा तू त्या भानगडीत पडू नकोस. आपला कडेकडेने तुझ्या घरी जा."
यमाला नाही म्हटलं तरी थोडा राग आला. पण शेतकर्‍याच्या बोलण्यावर यमाकडे काही उत्तर नव्हते. यम मुकाट्याने स्वर्गाकडे गेला. त्याला काही चैन पडेना. त्याने आपल्या दूतांना आज्ञा दिली,
" जा रे खाली पृथ्वीवर जा. आणि एक जिवंत माणूस पकडून घेउन या."
यमदूत पृथ्वीवर आले ते एका जंगलात उतरले. चालता चालता एका नदीकाठी त्यांना एक झोपडी दिसली. झोपडीबाहेर एका ब्राह्मण झाडाखाली बाजेवर विश्रांती घेत पहुडला होता. या दूतांनी त्याला पाहिले. आणि मागचा पुढचा विचार न करता त्याला उचलला. बरे उचलला तर उचलला, पण त्याला बाजेसकट उचलला. जसजसे वर जाऊ लागले तशी हवा गार झाली. आणि त्या ब्राह्मणाला जाग आली. त्याने पाहीले कि आपण भलतीकडे आहोत. त्याने यमदूतांना लगेचच ओळखले. तो म्हणाला,

" तुम्ही मला कुठे नेत आहात? माझ्याहातून काय पाप घडले कि त्यामुले तुम्ही मला उचललेत?"
" ते आम्हाला ठाउक नाही. ते तू आमच्या साहेबाला विचार."
" ठिक आहे. पण निदान एक कागद पेन्सिल तरी द्या. मी तुमच्या साहेबांना चिट्ठी लिहितो. ती तरी त्यांना द्याल ना ?"
ठीक आहे असे म्हणून एकाने हवेत हात फिरउन कागद काढला, एकाने पेन्सिल दिली. ब्राह्मणाने चिट्ठी लिहिली. बंद केली. ही सर्व वरात स्वर्गात यमाकडे येउन पोहोचली. यमाला भगवंतानी स्वर्गाबाहेर जागा दिली होती. कुणी एखादा परवानगी नसलेला आत शिरू नये म्हणून ही व्यवस्था भगवान विष्णूंनी केली होती. यमदूत ब्राह्मणाला म्हणाले,
" तू इथे थांब. तुझी चिट्ठी आमच्या साहेबाला देउन येतो."
दूत यमाकडे गेले. यमाने विचारले,
" आणलात जिवंत माणूस?"
" हो. पण त्याने तुम्हाला चिट्ठी दिली आहे."
यमाने उत्सुकतेने चिट्ठी उघडून वाचली. चिट्ठी वाचताच तो एकदम विचारात पडला. त्याने आपल्या दूतांना आज्ञा दिली कि त्या ब्राह्मणाला जिथून आणले तिथे सोडून या. दूतांना आश्चर्य वाटले. आपल्या साहेबाला झालय काय? एकदा आणा म्हणतो. एकदा सोडा म्हणतो. पण ते हुकूमाचे दास होते. विचारायची त्यांना परवानगी नव्हती. त्यांनी त्या ब्राह्मणास उचलले.
इकडे दूतांची पाठ फिरताक्षणी यम तिथून सुटला तो थेट भगवान विष्णूंकडे त्यांच्या महालात पोहोचला. भगवंत दुपारचे भोजन उरकून विश्रांती घेत होते. डोक्यापाशी दासी वारा घालायला. देवी पाय चेपत आहेत. सर्व कसे अगदी "आहा...!" चालले होते. त्यात ही कटकट येउन पोहोचली. विष्णू मनातून थोडेसे त्रासले. पण त्यांना हे व्यक्त करण्याची परवानगी नव्हती. कारण ते भगवंत होते. त्रिलोकाचे तारणहार होते. ते प्रसन्न मुद्रेने यमाला म्हणाले,
" बोल. बाबा. काय आहे?"
यमाने भगवंताच्या पायांवर लोळण घेतली.
" भगवंत,मला क्षमा करा. अभय द्या."
भगवंताना काही कळेना. एक तर दुपारच्या विश्रांतीत व्यत्यय आला होता. लवकर ही बला जावी म्हणून ते यमाला म्हणाले,
" अरे पण झालय तरी काय? नीटपणे सांगशील का?"
"आधी अभय द्या"
"दिले"
यमाने काहीही न बोलता ती ब्राह्मणाने दिलेली चिट्ठी भगवंताना दिली. विष्णूनी चिट्ठी उघडून वाचली. आणि ते पोट धरून हसायला लागले. यमाला काही कळेना. तो निर्बुद्ध चेहेर्‍याने भगवंतांकडे पहायला लागला. आपले हसू आवरून भगवंत म्हणाले,
" यमा, लेका तुला त्या ब्राह्मणाने सॉलिड टोपी घातली आहे. यापुढे तू बाह्मणावर विश्वास ठेऊ नकोस."
त्या चिट्ठीत लिहिले होते :
" हे महामूर्ख यमधर्मा ! तुझी बुद्धी खरच भ्रष्ट झालेली दिसते. अरे तू मला , प्रत्यक्ष भगवंताना, ब्राह्मणाच्या वेषात ओळखू शकला नाहीस? काय म्हणावे काय तुला? तुला थोड्याश्या विश्रांतीची गरज आहे असं दिसतय!"
आणि खाली भगवान विष्णूंची लफ्फेदार सही होती.

- ० - ० - ० -



हा ब्राह्मण पुढे खरंच मेल्यावर स्वर्गात गेला. त्याने प्रत्यक्ष यमाच्या धोतराला हात घातलेला असल्यामुळे भगवान विष्णूंनी त्याची सर्व पापं त्याच्या आयुष्याच्या जमाखर्चातून डिलिट केली होती. त्यामुळे त्याला स्वर्गात थेट प्रवेश मिळाला होता. काही जुन्या आणि वयस्क टेनिस खेळाडूंना त्यांच्या पूर्वपुण्याईच्या जोरावर विंबल्डन वगैरे स्पर्धात जसा पात्रता फेरी न खेळता थेट प्रवेश मिळतो ना तसा.
स्वर्गाच्या दारातून आत पाऊल टाकल्यावर तेथे असालेल्या द्वारपालाला तो म्हाणाला,
" मी इथे आलोय खरा! पण मला एकदा नरक बघायचा आहे. मला दाखवता का? "
द्वारपाल ब्राह्मणाकडे विचित्र चेहेर्‍याने बघायला लागला.
" मित्रा, तुला काय ही अवदसा आठवली आहे? अरे मोठ्या मुश्किलीने स्वर्गप्राप्ती होते. आणि तू हे काय मागतो आहेस? "
" मी इथेच राहणार आहे. पण फक्त एकदा मला नरक पाहू द्या. मग मी पुन्हा काही म्हणणार नाही. "
द्वारपालांचा नाईलाज झाला. ते म्हणाले,
" ठिक आहे. ती समोरची लिफ्ट खाली चालली आहे. त्यातून तू जा. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. ती लिफ्ट तिथे फक्त दहा मिनिटे थांबेल. त्याच्याआत तुला परत यावे लागेल. नाही तर मग तुला नरकातच राहवे लागेल. इथे परत कधीही येता येणार नाही."
" छे हो. एवढा वेळ कशाला लागतोय. मी फक्त पाहून येणार. "
" ते तू पहा. आम्ही तुला सावध केले आहे. "
तो ब्राह्मण द्वारपालाने दाखवलेल्या लिफ्टने खाली आला. नरकात पाउल टाकले. आणि आष्चर्यचकित होउन तिथेच खिळून उभा राहिला. अतिशय मंगल वातावरण होते. जिकडे तिकडे सुरेख दिव्यांची रोषणाई केलेली होती. अतिशय मधुर पक्क्वन्नांनी सजलेली दुकाने, उंची वस्त्रे प्रवरणांची दुकाने होती. मंद, मन मोहवणारे यक्ष किन्नरांचे मधूर संगीत ऐकू येत होते. अप्सरा नॄत्य करत होत्या. अतिशय प्रसन्न वातावरण होते. सगळीकडे दिवाळीसारखे वातवरण होते. त्याला वाटले कि हे स्वर्गाचेच एक दालन असावे. त्या द्वारपालाने आपल्याला चुकीचे सांगीतले. पण खरे खोटे करायाला त्याला वेळ नव्हता. दहा मिनिटांची मर्यादा होती ना. ब्राह्मण मुकाट्याने मागे फिरला. वर चाललेल्या लिफ्टमधून परत वर स्वर्गात आला.
ब्राह्मणाने स्वर्गात पाऊल टाकले. तिथेही अतिशय प्रसन्न वातावरण होते. शुद्ध स्वच्छ हवा. आपण शहरी प्रदूषित वातावरणापासून सुटका करुन घेण्यासाठी जसे निसर्गाच्या सान्निध्यात जातो. जंगलात, राना-वनात जातो. तिथे जसे शुद्ध वातावरण असते तसे होते तिथे. मनमोहक निसर्ग, जिकडे तिकडे घनदाट हिरवेगार जंगल, फळा फुलांनी बहरलेले वृक्ष. रसाळ फळे झाडाला लगडलेली. तिथे त्या ब्राह्मणाला एक पाऊलवाट दिसली. तो त्या पाऊलवाटेने जाउ लागला. थोडा वेळ चालल्यावर त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीत त्याने प्रवेश केला. अतिशय स्वछ झोपडी होती ती. तिथे तीन पाने मांडली होती. बसायला मृगजीन, केळीच्या पानावर जेवण वाढलेले. जेवण म्हणजे सर्वोत्तम रसाळ फळे, कंदमुळे होती. पण बाकी चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हते. ब्राह्मण विचारात पडला. काय करावे?
तितक्यात त्याला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव येताना दिसले. दोन्ही देवांनी त्याचे प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. विचारपूस केली. पण त्या ब्राह्मणाला कुठेतरी काहीतरी खटकत होते. अखेरीस धीर करून त्याने भगवंताना विचारले,
" हे काय? मी एकटाच? बाकी कोणीच दिसत नाही. कुठे गेले सगळे?"
विष्णू हसले. ते म्हणाले,
" त्याचं काय आहे की तुला मिळालेल्या वरदानाला बाकी कोणीच पात्र ठरलं नाही."
ब्राह्मणाचा चेहेरा अगदी कोरा. तो निर्बुद्ध चेहेर्‍याने भगवंतांकडे पाहायला लागला. त्याचा गोंधळ विष्णूंच्या लक्षात आला. ते त्याला म्हणाले,
" तुला कळेल अश्या भाषेत सांगायचे तर, क्वालिफाईंग राऊंडमधेच सगळे गळाले. तू एकटाच पास झालास. म्हणून तुला स्वर्गात थेट प्रवेश मिळाला आहे."
ब्राह्मण अस्वस्थच होता. काय करावे त्याला काही समजेना. त्याच्या मनात विचारांचे वादळ माजले होते. शेवटी धीर एकवटून तो विष्णूंना म्हणाला,
" भगवंत, मला क्षमा करा. पण मला नरकात पाठवा. मला इथे नको. ही झोपडी, हे फळ फळावळ. हे कही मला झेपणार नाही. "
ब्राह्मणाला वाटले होते कि स्वर्गात पृथ्वीपेक्षा आणखी चकचकीत वातावरण असेल. पण हे तर भलतेच निघाले.
आता आश्चर्य करण्याची भगवंतांची पाळी होती. ते त्याला परोपरीने समजाऊ लागले.
" अरे, महाप्रयासाने ही संधी मिळते. आणि तुला हे भिकेचे डोहाळे काय लागले आहेत. तू असे करू नकोस. माझे ऐक."
" नाही. मला नरकातच जायचे आहे. "
विष्णूंनी त्याला परोपरीने समजावले. पण ब्राह्मण आपल्या निर्णयावर ठाम होता. अखेर विष्णूंचा नाईलाज झाला. त्यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून ब्रह्मदेवांना विनंती केली. कि तुम्हीतरी त्याला समजवा. पण ब्राह्मण ऐकण्याच्यापलिकडे गेलेला होता. अखेरीस निराश होउन भगवंत त्याला म्हणाले,
" ठिक आहे. तुझी मर्जी. तू जाऊ शकतोस. पण एक लक्षात ठेव. मागच्यावेळी जसा तुला दहा मिनिटांचा पर्याय होता तसा आता मिळणार नाही. कारण तू तुझ्या इच्छेने चालला आहेस. तेंव्हा त्या समोरच्या लिफ्टने खाली जाता येईल. पण ती 'नॉन रिटर्न' लिफ्ट आहे. "
" भगवंत, मी जातो. "
ब्राह्मण भगवंतांच्या पाया पडला. ब्रह्मदेवांच्याही तो पाया पडला. विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला. त्याचे शुभ चिंतिले. आणि ब्राह्मणाने त्या लिफ्टमधे पाऊल ठेवले. लिफ्ट ब्राह्मणाला नरकाच्या दारात सोडून गेली. ब्राह्मणाने एक सुटकेचा नि:श्वास टाकला. आणि त्याने नरकात आत्मविश्वासपूर्वक पाऊल टाकले.
नरकात पाऊल टाकताक्षणी त्याच्या नाकात घाणीचा भपकारा शिरला. जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते. आपल्याकडे महापालिकेची कचराकुंडी समजा कोणी महापालिका सफाईकामगाराने जर महिनाभर साफ केली नाही तर त्या रस्त्याला किंवा गल्लीला जसे स्वरूप येइल तसे स्रर्वत्र दिसत होते. कुजट वास, मल मूत्राचे साम्राज्य, महारोग्यासारखे दिसणारे लोकं आणि प्राणी. जणू काही मृत्यूने धूमकूळ घातल्यासारखे चित्र दिसात होते. पलिकडील बंद दालनातून किंकाळ्या, रडण्या-ओरडण्याचे आवाज येत होते. आणखी एका दालनासमोर शिक्षेच्या सुनावणीसाठीची रांग लागलेली होती.
ब्राह्मण पुन्हा बधीर. स्वतःच्या पुन्हा पुन्हा थोबाडीत मारून घेत होता. पण त्याला आता पुरते कळून चुकलेले होते कि वेळ गेलेली आहे. लिफ्ट निघून गेलेली होती. आणि असूनही काही ऊपयोग नव्हता. कारण विष्णूंनी आधिच "वॉर्निंग" दिलेली होती. "आलिया भोगासी असावे सादर " हे संतवचन किती खरे आहे त्याची आता त्याला सत्यता पटली. शेवटी तो तिथल्या द्वारपालाजवळ गेला. आणि त्या द्वारपालाला विचारले,
" काहो? मी मागच्यावेळी इथे आलो होतो तेंव्हा इथले वातावरण वेगळेच होते."
" वेगळे म्हणजे कसे? "
" मंगल, प्रसन्न ." आणि असे म्हणून ब्राह्मणाने त्यावेळच्या एखाद्या सणासारख्या असलेल्या वातावरणाचे, वर्णन केले.
तो द्वारपाल हे ऐकून खो खो हसायला लागला. ब्राह्मणाची तिसर्‍यांदा अवाक होण्याची वेळ आली. शेवटी द्वारपालाने आपले हसू कसे बसे आवरले. आणि तो प्रसन्न चेहर्‍याने ब्राह्मणाला म्हणाला,
" मित्रा, मागच्यावेळी तू आला होतास तेंव्हा जे पाहिले होतेस ती आमच्या "नरका"ची दूरदर्शनवरची कमर्शियल जाहिरात होती. आता पाहतो आहेस ते सत्य आहे. हाच खरा नरक आहे."
ब्राह्मणाने कपाळावर हात मारून घेतला. तो खरंच मरायचेसुद्धा विसरून गेला !


- ० - ० - ० -




हा ब्राह्मण पृथ्वीवर असताना त्याचा भिक्षूकीचा व्यवसाय होता. गांवाबाहेर त्याची झोपडी होती. पूजा अर्चा करण्यासाठी तो गांवात येत असे. आणि दिवेलागणीला परत घरी येत असे. असाच एके दिवशी तो परत येत असाताना त्याला एक वाघ भेटला. तो वाघ त्याला म्हणाला,
" मी तुला खातो."
ब्राह्मण डगमगला नाही. तो वाघाला म्हणाला,
"मी तुझे लग्न लाविन."
वाघाला काही कळेना. त्याने पुम्हा गर्जना केली आणि म्हणाला,
" मी तुला आता खाणार."
ब्राह्मण अजिबात घाबरला नाही. आपल्या जाग्यावर पाय घट्ट रोवून उभा राहिला आणि पुन्हा वाघाला जोरात म्हणाला,
" मी तुझे लग्ना लावून देईन."
आता मात्र वाघाला काय करावे ते सुचेना. तितक्यात तेथून एक उंदीर चालला होता. त्याला वाघाने थांबवले. वाघ उंदराला म्हणाला,
" मी याला म्हणतोय कि तुला खातो , तर हा म्हणतोय कि मी तुझे लग्न लावून देइन. याला काहीतरी समजावून सांग."
त्या उंदराने अतिशय केविलवाण्या नजरेने वाघाकडे पाहिले. उदास चेहेर्‍याने आणि थरथरत्या आवाजात तो वाघाला म्हणाला,
" तू शहाणा असशील तर याच्या नादी लागू नकोस. कडेकडेने आपला तुझ्या गुहेत जा. अरे, मी सुद्धा एकेकाळी तुझ्यासारखा पट्टेरी वाघ होतो. पण हा मला भेटला. त्याने माझे लग्न लावून दिले. आणि आज माझी काय अवस्था झालिये बघ. तेंव्हा वेळीच स्वतःला वाचव. "
आणि वाघाला तसेच बधीरावस्थेत सोडून उंदराने तेथून काढता पाय घेतला.


- ० - ० - ० -

शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

येकदा गेलेला येणे नाही
त्याचा विचार करो नये काही
उरलेले आयुष्य करावे सुप्रवाही
आपुलेच आपण ॥१॥

गेलेल्यात जीव गुंतऊ नये
उरलेल्यांवर जीव सोडो नये
शरीरास क्लेश देओ नये
जाणावे हे परी ॥२॥


सत्य पचवणे सोपे नाही
ते मनाला अति कष्ट देई
तरीही प्रयत्न दोडो नाई
पूर्वक निर्धारे ॥३॥


शांत बसोनी करावा विचार
घालावा मनाला आवर
सवंगडी घालती मायेची पाखरं
नित्य नेहमी ॥४॥


आपुले मन करी विचार अति
त्यात वेळ घालवावा किती
अशाने होइल आयुष्याची माती
जाणिव असो द्यावी ॥५॥


अशा संयमी आचारविचाराने
नित्यनियमीत दिनचर्येने
वेळ सत्कारणी लावल्याने
होइल जीवन सुखी ॥६॥

पचनी कार्याचा निर्धार करावा
भक्तीमार्गाचा आधार घ्यावा
जपजाप्यात जीव रमवावा
सुखी जीवनासाठी ॥७॥

घावा आप्तांचा आधार
सखेसोबती सल्लागर
होइल आनंदी जीवन साकार
अमृतापरी ॥८॥

आयुष्य हे परमेश्वरी देणं
करो नये त्याची हेळसांड
सोडू नये नित्या कर्मकांड
दैनंदिन व्यवहारे ॥९॥

आपणास ज्याची आवड असे
मनचित्त त्यत गुंततसे
त्याचा ध्यास लागतसे
निसर्ग नियम हा ॥१०॥

ते अध्यात्मचिंतन असेल
किंवा निसर्ग भ्रमंती असेल
ज्ञानार्जनाचा संकल्प असेल
नेटका करावा ॥११॥

गेलेल्याची स्मृती बाळगावी
आनंदीवृत्ती जतन करावी
कार्यशैली स्वभावे आचरावी
योग्य शिकवणीची ॥१२॥

स्मृती ही फक्त स्मृती असावी
ती आचरणांची स्मृती असावी
बुद्धीचा पगडा घेणारी नसावी
आनंदी वृत्ती ती ॥१३॥

करावे आपुले जीवन आदर्शवत
धरावे समाजसेवेशे व्रत
असावी सेवावृत्ती सर्वांप्रत
हेची राहणीमान ॥१४॥

असतील भवती बघे जन
सल्ले देतील सर्व जन
त्यात अधिक सोयरे जन
हीच जग रहाटी ॥१५॥

ही सर्व मंडळी जमतील
निरूपयोगी सल्ले देतील
वेल येता पळोनी जातील
ध्यानी धरावे ॥१६॥

नीर क्षीर विवेक ठेवावा
सखेसोबत्यांचा विश्वास करावा
कार्याचरण वृत्तीचा निर्धार करावा
सुसह्य जीवनासाठी ॥१७॥

परी सल्ल सन्मार्गाचा
सत्कर्म आचरण्याचा
कोणाकडूनही आला परी
स्विकारावा निश्चिंते ॥१८॥

असे सल्ले असती निर्मळ
शांत तळ्याचे स्फटिक जळ
त्यात सहजी वाहे मळ
दु:खी मनाचा ॥१९॥

त्यात दुष्वृत्ती वाहतील
चित्त स्वच्छ होइल
मनाची बोच जाइल
निष्क्रियतेची ॥२०॥

॥ॐ तत्सत॥
॥जय श्रीराम॥
॥जय जय रघुवीर समर्थ॥